कूर्ग- २/२

Submitted by विशाखा-वावे on 1 November, 2023 - 10:57

भाग पहिला
कूर्ग १/२
https://www.maayboli.com/node/84306

रविवारी सकाळी बाहेर सुंदर धुकं होतं. छान थंडी पडली होती. आदल्या दिवशी सकाळी बरेच पक्षी दिसले होते, पण आज मात्र धुक्यात तेही बाहेर पडलेले दिसत नव्हते.

नाश्ता वगैरे करून बाहेर पडलो. आज अ‍ॅबी फॉल्स हा धबधबा पहायचा बेत होता. पाऊणेक तासात तिथे पोचलो. धबधबा छानच आहे, पण प्रचंड गर्दी होती. अर्थात आपणही त्याच गर्दीचा भाग असताना गर्दीची तक्रार करण्यात काय अर्थ आहे? धबधबा पाहून बाहेर पडताना येणार्‍या गाड्यांची लांबलचक रांग बघून त्यामानाने आपण कमी गर्दीत धबधबा बघितला, या विचाराने उलट हायसं वाटलं.

abbi_falls.jpg

अ‍ॅबी फॉल्सकडून मडिकेरीकडे परत येताना ’मंडलापट्टी’ नावाच्या ठिकाणाची पाटी दिसली. आज इतर कुठे जायचं ठरवलेलं नव्हतं, त्यामुळे वेळ आहे तर इथे जाऊन पाहू, असा विचार केला. त्या फाट्यापासून पंधरावीस किलोमीटरवर हे ठिकाण आहे. खूप उंचीवर आहे. पुढचा रस्ता खडकाळ आहे, त्यामुळे तिथे जीपने जावं लागतं असं कळलं. मग आमची गाडी तिथेच पार्क केली आणि जीप ठरवली. असंख्य जीपगाड्या तिथे होत्या आणि त्यांचा भरपूर धंदा होत होता. जीपमधून जाताना लक्षात आलं की अगदी शेवटचे चारपाच किलोमीटर सोडले तर बाकी रस्ता तसा चांगला होता, आपल्या कारने येऊ शकलो असतो. काही जणांनी तिथपर्यंत गाड्या आणल्याही होत्या. तिथून पुढे मात्र जीपच हवी. ही सगळी एक छोटीशी अर्थव्यवस्थाच निर्माण झालेली आहे. एका कन्नड चित्रपटामुळे हे ठिकाण प्रसिद्ध झालं आणि मग तिथे पर्यटक गर्दी करायला लागले. जीप चालवणार्‍यांची दबावफळी असल्यामुळे तिथले रस्ते सुधारत नाहीत असंही ऐकलं. चिकमगळूरला गेलो होतो, तेव्हा ’क्यातनमक्की’ या उंचावरच्या ठिकाणीसुद्धा असंच, जीपने जावं लागलं होतं. तिथला जीप ड्रायव्हरही ’हा रस्ता सुधारणार नाही’ असं म्हणाला होता, त्याचाही अर्थ हाच असणार.

मंडलापट्टीला पोचल्यावर मात्र खरोखरच फार सुंदर विहंगम दृश्य दिसलं.
mandalapatti3.jpg

आधी अचानक पाऊस आला, पण आला तसा लगेच थांबलाही आणि स्वच्छ ऊन पडलं.

mandalapatti1.jpg

तिथे सर्वात उंच जागी एक लहानसं मचाण बांधलेलं आहे. पलीकडे थोडं खाली उतरून कठड्याजवळ उभं राहून खालचा मोठा प्रदेश पाहता येतो.

mandalapatti2.jpg

अशा ठिकाणी निसर्गासमोर आपण आपोआप नम्र होतो. असं दृश्य डोळ्यात किंवा कॅमेर्‍यात पूर्णपणे साठवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो अपुरा पडतो.

mandalapatti.jpg

आमच्या जीपच्या चालकाने पाऊण तासात परत यायला सांगितलं होतं, त्यामुळे निघणं भाग होतं. शिवाय आता भूकही लागायला लागली होती. परत पाऊणेक तास जीप, मग कारने अर्धाएक तास प्रवास करून मडिकेरीला आलो आणि जेवलो. कूर्गला आल्यावर कॉफी पावडर, मसाले आणि चॉकलेट्स ही खरेदी केली नाही तर ’फाऊल’ धरतात. त्यामुळे ती केली, शिवाय इतरही काही बारीकसारीक वस्तू घेतल्या आणि परतीचा रस्ता धरला.
संध्याकाळी काकांबरोबर त्यांच्या कॉफीच्या मळ्यात चक्कर मारली. कॉफी, काळी मिरी, वेलचीची वगैरे लागवड बघितली. चिकमगळूरलासुद्धा तिथली कॉफी इस्टेट बघितली होती. पण इथे काका झाडांकडे ’इस्टेट’ म्हणून न बघता आम्ही जसे कोकणात आमच्या झाडांबद्दल प्रेमाने बोलतो, तसे बोलत होते, त्यामुळे छान वाटलं. मला अशा ठिकाणी गेल्यावर एक गमतीशीर अनुभव येतो. एकदा कोकणात एका ठिकाणी कुठल्यातरी कार्यक्रमासाठी गेलो असताना एका पर्यटक-निवासात उतरलो होतो. तेव्हा उन्हाळा होता, बागेत कोकमं होती. जिथे उतरलो होतो, तिथल्या काकू मला कोकम या फळाची ओळख करून देऊन त्याचं ताजं सरबत कसं करायचं ते दाखवायला लागल्या. मला मनातून फारच गंमत वाटली, कारण आमच्याकडेही कोकमाची झाडं आहेत, असं सरबत घरी करताना मी लहानपणापासून बघत आले आहे, कित्येकदा कोकमाच्या आंबटढाण बिया नुसत्या मीठ लावून चघळल्या आहेत. अर्थात हे त्यांना कसं कळणार, त्यामुळे मीही ते गंभीरपणे ऐकून घेतलं. चिकमगळूरला कॉफी इस्टेट दाखवताना सुरुवातीला आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवून तिथला माणूस म्हणाला, ’This is mango tree' आम्ही मनात म्हटलं, बरं झालं सांगितलंत! नाही तर आम्ही कधी आंब्याचं झाड बघितलंय? कूर्गचे काकाही उत्साहाने कॉफीबरोबरच पोफळी, मिरीच्या वेली वगैरे दाखवत होते.

वाटेत ही एक नेहमीपेक्षा खूप मोठी गोगलगाय दिसली.

snail.jpg

फिरून आल्यावर खोलीसमोरच्या गच्चीतून रस्त्याच्या पलीकडे झाडावर बसलेला हा ’मलबार राखी धनेश’ दिसला. काळोख पडल्यामुळे याहून स्पष्ट फोटो मिळाला नाही. Happy

IMG-20231029-WA0048.jpg

रात्री आमच्या खोलीच्या समोर एक कोळी त्याचं जाळं विणताना दिसला. आम्ही जवळजवळ पहिल्यापासून त्याचं हे काम पाहिलं.

spider.jpg

सोमवारी सकाळी नाश्त्याला तांदुळाचे वेगळ्या प्रकारचे, जाडसर डोसे होते. आदल्या दिवशी राईस बॉल्स होते आणि त्याआधी नीर डोसे. सोबत रोज वेगळ्या चवीची चटणी, सांबार, भाजी वगैरे. रात्रीचं जेवणही छानच असायचं. आपण नेहमी उतरतो तशा प्रकारचं हॉटेल आणि अशा ’होम स्टे’ मधला हा फरक महत्त्वाचा वाटला. इथलं जेवण घरगुती, साधं, तरीही चवदार आणि अनौपचारिक होतं.

नाश्ता करून बंगळूरला जाण्यासाठी निघालो. वाटेत कुशलनगर नावाच्या गावी असलेली बौद्ध मोनास्टरी बघितली. तिथेही आत प्रचंड गर्दी होती. गर्दी नसताना तिथे कदाचित छान वाटत असेल, पण आम्हाला तरी तिथे फार थांबावंसं वाटलं नाही. बुजबुजाट वाटला. आत बरीच दुकानं, रेस्टॉरंट्सही होती. तिथे फार वेळ न थांबता पुढे निघालो. म्हैसूर यायच्या थोडंसं आधी जेवायला थांबलो आणि मग कुठेच न थांबता थेट बंगळूरला घरी येऊन पोचलो!
एकंदर प्रवास आणि सहल छान झाली. गर्दी मात्र प्रत्येक ठिकाणी खूप होती. विशेषत: मंडलापट्टीसारख्या ठिकाणी जर शांतपणे जरा वेळ घालवता आला असता, तर आवडलं असतं. पण सुट्टीच्या दिवसांमध्ये अशी गर्दी असणारच, हे स्वीकारलं पाहिजे आणि गर्दी टाळायची असेल तर सुट्टीच्या दिवसांत प्रसिद्ध ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. Happy

IMG-20231101-WA0043.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो.

“दबावफळी“ हा नवीन शब्द समजला !

छान वर्णन.. काही फोटो वेगळेच आहेत..
आंबा कोकम तांदूळमुळे एक कोकण टच येऊन आता जास्त आत्मीयता वाटू लागली आहे या जागेबद्दल...
बाकी सुट्टीच्या दिवशी गर्दी अनुभवायला प्रसिद्ध स्थळ काय नाक्यावरच्या गार्डनला सुद्धा जाऊ नये.. पण एखाद्या ठिकाणी फिरायचा एखादा ठराविकच सीजन असेल तर गर्दी टाळता ही येतं नाही.

असं दृश्य डोळ्यात किंवा कॅमेर्‍यात पूर्णपणे साठवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो अपुरा पडतो >>>> अश्यावेळी आम्ही पॅनोरमा मोड वापरतो Happy

मस्त वर्णन आणि फोटो सुंदर. डूबारे हत्ती कॅम्प बद्दल नाही लिहिलं? तिथे आम्ही हत्तींना अंघोळ घातली होती (पैसे देवुन). नुकतीच ऑस्कर मिळालेली डॉक्युमेंटरी पाहिल्यावर या कॅम्पची आठवण आली होती.

Club Mahindra मधे वाचलेला कुर्गी लोकांचा इतिहास कितपत खरा आहे कोणास ठाऊक. पण thrilling वाटला. ग्रीक योद्धा अलेक्झांडरची एक सैनिक तुकडी दमल्यामुळे / विद्रोह केल्यामुळे आणि इथला भौगलिक प्रदेश आवडल्यामुळे इथेच राहिली. मग त्यांनी स्थानिक स्त्रियांशी लग्न केली ते कूर्गी...... त्यांचं built, चेहरेपट्टी पाहता काही अंशी सत्य असु शकतं.

मीरा, डूबारे कँपला नाही गेलो आम्ही.
क्लब महिंद्रा राजाज सीटजवळ आहे ना बहुतेक? नाव बघितल्याचं आठवतंय. मस्तच लोकेशन असणार मग ते! Happy

कूर्गी लोकांच्या इतिहासाची ही कथा ऐकली नव्हती.

ऋन्मेष, panorama मीही वापरते Proud

प्रतिसादांसाठी सगळ्यांना धन्यवाद Happy

Back to top