भेट -भाग २

Submitted by केजो on 1 November, 2023 - 11:08

भेटायचं ठरलं तर खरं, पण संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं. आईकडे आल्यावर शांतता मिळते, मुलंही मागे-पुढे करत नाहीत. तिकडे औरंगाबादला नवरा,मुलं, सासू-सासरे, नोकरी ह्या सगळ्यात स्वतःशी बोलायला वेळच नसतो. पण पुण्याला आलं की जरा निवांतपणा मिळतो. आणि मग जुन्या खपल्या निघत राहतात. इतकी वर्ष साठवून ठेवलेल्या, सगळ्यानपासून- कशाला स्वतःशीही नाकारलेल्या काही आठवणी पिंगा घालत राहतात. पन्नाशीकडे झुकताना हल्ली जाणवायला लागलंय की, आता वेळ फार उरला नाहीये. अधून मधून कोणाच्या तरी हार्ट अटॅकची, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजची, ऍक्सिडेंटची बातमी येत राहते. जीवन क्षणभंगुर आहे हे लहानपणापासून ऐकलं असलं तरी आता ते पटायला लागलंय. त्यामुळे आता ह्या मनाला मोकळं करायचंय, सगळे गुंते सोडवायचेत. काहीतरी सांगायचं राहून गेले असं नको वाटायला. आपली वेळ यायच्या आधीच...
तिचं आवडीचं "एक आधी कहानी थी, जो मिलके सुनानी थी..." गाणं लुपवर ऐकत ती शांत पडून राहिली. मग एकदम शांत वाटलं. संध्याकाळपर्यंत काहीतरी करत उगाच वेळ घालवला. साडेपाचला आईच्या हातचा कडक चहा पिऊन मग मात्र ती तयारीला लागली. आताशा केसांमधली चांदी छान चमकू लागली होती, चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही त्यांचं अस्तित्व दाखवू लागल्या होत्या. उगाच वय लपवणाऱ्यांमधली ती कधी नव्हतीच. तरी आज आपण केस डाय करायला हवे होते रविवारी, निदान फेशियल तरी, असं उगाच वाटून गेलं. मग तोंडावर पाणी मारताना ते विचारही वाहून गेले. आताशा तो तरी कुठे तसा दिसतो. पोट सुटलंय, टक्कल पडलंय आणि चष्माही! पण नवरा मात्र अजूनही स्वतःला सांभाळून आहे. त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे तो अजूनही चाळिशीतलाच दिसतो. त्याची उंची, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि हसरा चेहरा डोळ्यांसमोर आल्यावर तिला उगाच आपण काहीतरी मोठा अपराध करून पकडले गेलोय, अशी जाणीव झाली. इतक्या वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आपला छोटासा संसार, सुख-समृद्धीने भरलेले घर असतानाही कुठेतरी एक बोच जाणवत राहते खरी. कोणाच्याच आयुष्यात सतत चढता आलेख नसतो. जोडीदार आपल्या पसंतीचा असला तरीही सगळ्यात जास्त ठेच जवळच्या माणसांकडूनच मिळते, हेही तितकंच खरं. त्या जखमांना कुरवाळत बसण्यापेक्षा, ह्या टप्प्यावर खपल्यांना धक्का लागत नाही ना, एवढंच जपायचं. जशा जुन्या गोष्टींना आपण विसरायचा प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तशाच अव्यक्त भावनाही व्यक्त करून त्यांच्या बंधनातून आता मोकळं व्हायचंय. स्वतःच स्वतःला समजावत राहिली की, जे मी आज करायचं ठरवलंय त्यात काहीही वावगं नाहीये.
मग त्यातल्या त्यात मॅचिंग कानातले, टिकली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून आरशात प्रसन्न मनानी तिनं स्वतःलाच एक छानसं स्मित दिलं. पण मनातल्या विचारांचं ओझं चेहऱ्यावर दिसून येतच होतं.
साडेसहाच्या ठोक्याला ती खाली उतरली. तो बाईक घेऊन उभाच होता. हेल्मेटमुळे चेहरा वाचता नाही आला पटकन. तिनी हलकेच त्याच्या खांदयावर हात ठेवला आणि थोडं अंतर ठेवून त्याच्यामागे ओढणी सावरत बसली. बाईक सुरु झाली आणि मग तिनं मागचं हॅन्डल पकडत तोल सावरला, त्याच्या खांद्यावरचा हात काढून घेतला. तो काहीतरी बोलला, पण मागे ऐकू आलं नाही. त्यामुळे ती थोढीशी पुढे होऊन तो काय बोलतोय हे ऐकायचा प्रयत्न करू लागली. कानावर फक्त "स्पीडब्रेक!" एवढंच आलं आणि ती तिच्या नकळत त्याच्यावर हलकीशी आपटलीच. पटकन आधारासाठी तिनी त्याच्या खांदयावर हात ठेवला.
"म्हणून सांगतोय, खांदयावर हात ठेव! मलाही सावरायला बरं पडेल." त्या शब्दांनी तिच्या अंगावर काटा आला. श्वास वाढू लागले आणि छातीच्या ठोक्यांची धडधड आता आजूबाजूच्या ट्रॅफिकला निशब्द करून टाकेल असं वाटू लागलं. तो काहीतरी बोलत होता, ऑफिसबद्दल, ट्रॅफिकबद्दल, पण तिच्या कानाच्या पाळया गरम झाल्या होत्या. शब्द कानावर पडूनही अर्थच लागत नव्हता. त्याच्या पर्फ्युमचा मंद सुगंध तिला आणखीनच वेडंपिसं करत होता. सरते शेवटी ती थोडी मागे सरकून बसली, मागच्या हँडलला घट्ट धरून.
"ऐकू येत नाहीये, पाषाणला पोचलो की बोलू..." एवढंच मोट्ठ्यानी ओरडून सांगितलं आणि ती स्वतःला शांत करू लागली. काय होतंय हे मला? वय काय आणि ह्या अशा भावना अजूनही आहेत माझ्यात? छे, भलतंच काहीतरी! पुन्हा एकदा काय बोलायचंय ह्याची मनाशी उजळणी करून घ्यावी नाहीतर आयत्या वेळी घोटाळा करून ठेवायचे. इतकी वर्ष पुन्हा पुन्हा उगाळत बसलेल्या, स्वतःच्या मनात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या आठवणी मुक्त करायच्या होत्या आज. "ती सध्या काय करते?" वरून काही गोष्टींचा उलगडा झालेला, थोडी हिम्मतही आलेली. तरीही सिनेमा बघणं आणि प्रत्यक्ष जीवनात स्वतःच्या भूतकाळाशी सामना करणं, खूपच वेगळं!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults