हृदयसंवाद (६) : हृदयविकाराचा झटका

Submitted by कुमार१ on 30 October, 2023 - 00:51

भाग ५ : https://www.maayboli.com/node/84289
.. ..... .... .... ...
अंतिम भाग
करोनरी वाहिन्यांमध्ये Atherosclerosisमुळे मेद आणि अन्य घटकांचा पापुद्रा कसा तयार होतो ते आपण मागच्या भागात पाहिले. आता या आजाराचा पुढचा टप्पा पाहू.
आजार वाढत असताना एका स्थितीत हा पापुद्रा फुटतो. त्याचबरोबर रक्तातील बिंबिका पेशी (platelets) सक्रिय होतात. परिणामी रक्तगुठळी तयार होते तसेच रक्तवाहिनीचे आकुंचन होते. या सर्वांमुळे वाहिनीत बऱ्यापैकी अडथळा निर्माण होतो. हा अडथळा किती काळ टिकतो आणि त्याची तीव्रता किती, यानुसार रुग्णाला कुठल्या प्रकारचा त्रास होतो ते ठरते. साधारणपणे दोन प्रकारचे रुग्ण आढळतात :
१. निव्वळ छातीतील वेदना (stable angina)
२. हृदयविकाराचा झटका (myocardial infarction)

१. निव्वळ छातीतील वेदना : या प्रकारात अचानक कधीतरी छातीत दुखू लागते. ही वेदना मध्यम स्वरूपाची असते आणि ती सुमारे पाच ते पंधरा मिनिटे टिकते. बऱ्याचदा अशी वेदना कुठलेतरी श्रम केल्यानंतर होते. छातीत दुखू लागल्यानंतर विश्रांती घेतली किंवा nitroglycerinया औषधाची गोळी घेतली असता ती थांबते. काही जणांच्या बाबतीत स्वस्थ बसले असताना देखील अशी वेदना होऊ शकते आणि काही वेळेस धूम्रपान केल्यानंतर ती उद्भवते.

२. हृदयविकाराचा झटका : जेव्हा करोनरी वाहिन्यांमध्ये अडथळा मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा हृदयस्नायूंना गरज असणाऱ्या रक्तापेक्षा खूप कमी पुरवठा होऊ लागतो आणि ऑक्सिजन अभावी त्या पेशींवर परिणाम होतो. परिणामी काही पेशींचा समूह मृत होतो (infarction). जेव्हा हृदयस्नायूंचा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा तिथे काही रासायनिक घडामोडी होतात आणि त्यातून काही आम्लधर्मी आणि अन्य पदार्थ तयार होतात. या पदार्थांमुळे वेदनेचे चेतातंतू सक्रिय होतात व त्यामुळे रुग्णाला वेदना जाणवते.

हृदयविकाराच्या झटक्याचे काही प्रकार असतात. त्यातील सर्वाधिक आढळणारा प्रकार आधी पाहू.

प्रकार-१चा झटका
रुग्णाला प्रत्यक्ष झटका येण्यापूर्वी एक दोन दिवस आधी छातीत कसेतरी होणे आणि खूप दमल्यासारखे वाटू शकते. परंतु सर्वांच्याच बाबतीत अशी पूर्वलक्षणे येत नाहीत. काहींच्या बाबतीत ध्यानीमनी नसताना अचानक झटका देखील येऊ शकतो.

हृदयविकाराचा जो नमुनेदार झटका असतो त्या प्रसंगी सर्वसाधारणपणे अशा घडामोडी होतात :
• बऱ्याच वेळेस हा झटका पहाटे किंवा सकाळी लवकरच्या वेळात येतो कारण या वेळेस शरीरातील नैसर्गिक स्थिती अशी असते :
१. sympathetic चेतासंस्था उत्तेजित होते. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
२. हृदय-ठोक्याची गती आणि रक्तदाबात वाढ होते.
३. हृदयस्नायूंचे काम वाढते आणि त्यांचा ऑक्सिजनचा वापरही वाढतो.
४. रक्तातील प्लेटलेट्स एकमेकांना चिकटण्याची प्रक्रिया वाढते.

वेदनेचे वर्णन
१. तीव्र असते; एकदा दुखू लागल्यावर सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत ती थांबत नाही.
२. ती छातीच्या मधोमध जाणवते. परंतु त्याचबरोबर मान, खांदा, जबडा किंवा डावा हात या भागांमध्येही ती पसरू शकते.
३. वेदनेचा प्रकार : छातीच्या मधोमध कोणीतरी वजन ठेवल्यासारखे वाटणे / किंवा पिळवटले जाणे / नुसतेच दुखणे किंवा जळजळणे.
४. काहींच्या बाबतीत पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता आणि वात अडकल्याची भावना देखील जाणवू शकते.

५. काही जणांत खालील अन्य लक्षणे उद्भवू शकतात :
* शरीरात काहीतरी भयंकर घडणार आहे अशी भावना
चक्कर येणे आणि/ किंवा बेशुद्ध पडणे
* खोकला, मळमळ आणि/ किंवा उलटी
* दरदरून घाम सुटणे
* दम लागणे, नाडीचे ठोके जलद आणि अनियमित होणे
* कोणीतरी आपला गळा घोटते आहे अशी भावना होणे.
* पोट फुगणे

रुग्ण तपासणी :
रुग्णाचे निरीक्षण आणि स्टेथोस्कोपने तपासणी केली असता खालील बदल झालेले दिसतात :
१. नाडीची गती : बऱ्याच वेळा वाढलेली परंतु काही वेळेस कमी झालेली. तालबिघाड असू शकतात.
२. रक्तदाब : बऱ्याच वेळा वाढलेला परंतु काही परिस्थितीत कमी झालेला असतो.

३. श्वसनाची गती वाढलेली असते
४. तापमान : पहिल्या 24 ते 48 तासांमध्ये थोडा ताप येऊ शकतो

५. छातीची तपासणी : हृदयाचे विशिष्ट ध्वनीबदल, खरखर तसेच फुफ्फुसांच्या भागावरही काही बदल ऐकू येऊ शकतात.
६. हात व पाय : यांच्या टोकांना निळसरपणा किंवा पांढरेफटक पडणे किंवा सूज येणे.

महत्त्वाच्या रोगनिदान चाचण्या :
१. इसीजी : यामध्ये हृदयातील विशिष्ट भागांच्या बिघाडानुसार निरनिराळे बदल दिसतात. असे बदल सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये दिसतात. अर्थात वैशिष्ट्यपूर्ण बदल न दिसणे किंवा इसीजी नॉर्मल येणे याही शक्यता असतात.

२. ट्रोपोनिनची पातळी : ही अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. या विषयावर स्वतंत्र लेख इथे वाचता येईल : https://www.maayboli.com/node/65025?page=3

troponin.jpeg

जेव्हा हार्ट अटॅकचा संशय येण्यासारखी लक्षणे रुग्णामध्ये दिसत असतात तेव्हा डॉक्टरांनी ताबडतोब रक्तावरील ट्रोपोनिनची चाचणी करायची असते. जर ती पॉझिटिव्ह आली तर रोगनिदान पक्के होते. परंतु जर का ती निगेटिव्ह असेल आणि लक्षणे असतीलच, तर मग ती चाचणी त्यानंतर तीन आणि नंतर सहा तासांनी पुन्हा करायची असते.
म्हणजेच, रुग्णालयात लक्षणे असलेला रुग्ण दाखल होता क्षणीच ती चाचणी करणे महत्त्वाचे- नव्हे अत्यावश्यक- असते.

३. गरजेनुसार काही प्रतिमातंत्र चाचण्या (angiography) करता येतात.

रोगनिदान
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार :
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन (विशिष्ट कटऑफच्या वर)
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा

* याप्रमाणे खात्रीशीर निदान झाल्यावर विशिष्ट तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार केले जातात. या लेखमालेत सुरुवातीस स्पष्ट केल्यानुसार हा मुद्दा या लेखमालेच्या कक्षेबाहेर आहे.

लक्षणांची रुग्णभिन्नता
आतापर्यंत वर्णन केलेला आजार नमुनेदार आहे. परंतु काही रुग्णांमध्ये याबाबत भिन्नता आढळते ती अशी :
१. दीर्घकालीन मधुमेही रुग्णांच्या बाबतीत वेदनेशी संबंधित चेतातंतूवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यांना छातीत वेदना जाणवतेच असे नाही.
२. वृद्धांच्या बाबतीत स्मृतिभ्रंश किंवा बिघडलेले मानसिक संतुलन असल्यास त्यांना संबंधित लक्षणे समजू शकत नाहीत. त्यामुळे ही घटना कुटुंबीयांच्याही लक्षात यायला वेळ लागतो.
३. पुरुषांशी तुलना करता स्त्रियांमध्ये लक्षणविरहित झटका येण्याचे प्रमाण अधिक असल्याने बऱ्याचदा लवकर निदान होत नाही.

झटक्याचे अन्य प्रकार
वरील प्रकार-१ व्यतिरिक्त जे अन्य काही प्रकार असतात त्यातले दोन प्रमुख प्रकार पाहू.

A. प्रकार-२ : यामध्ये हृदयस्नायूंची ऑक्सिजनची मागणी वाढते परंतु त्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नाही म्हणून झटका येतो. हा प्रकार होण्यास करोनरी वाहिन्यांचे अचानक आकुंचन, एनिमिया किंवा श्वसन दुर्बलता हे कारणीभूत असतात.

B. प्रकार-३ : झटक्यामुळे आलेला तात्काळ मृत्यू. अशाप्रसंगी मृत्यू इतक्या वेगात येतो की त्यावेळेस रक्तात ट्रोपोनिन वगैरे रसायने सोडली देखील गेलेली नसतात. काही वेळेस असा रोगी रुग्णालयात मृत अवस्थेत आणला जातो किंवा तिथे आणल्या आणल्याच त्याला डॉक्टरने हात लावण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो.

अनिश्चित रोगनिदान
छातीत दुखणे आणि त्याच्या जोडीने वर उल्लेख केलेली काही लक्षणे, हृदय वगळता इतर अनेक आजारांमध्येही दिसू शकतात. रुग्णाची तपासणी आणि चाचण्या केल्यानंतर प्रत्येक वेळेस ‘नमुनेदार चित्र’ दिसतेच असे नाही. अशा प्रसंगी त्याला रुग्णालयात थांबवून ठेवायचे की घरी सोडायचे असा पेचप्रसंग निर्माण होतो. या प्रसंगी खालील प्रकारचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन कामी येते :

संभाव्य लक्षणे >>> रुग्णालयात दाखल >> डॉ. नी तपासल्यानंतर The HEART score असा काढतात :
History
ECG मधले बदल
Age (<45 , >65 )
Risk factors ( 0/1-2/3)
Troponin ( पातळीनुसार)

वरीलपैकी प्रत्येक मुद्द्याला ० ते २ गुण देतात. त्यानुसार HEART score १० पैकी किती हे कळते.
मग निर्णयप्रक्रिया अशी :
0-3: कमी धोका >>> लवकर घरी पाठवता येते.
4-6: मध्यम धोका >>> रुग्णालयात निरीक्षण चालू.
7-10: सर्वाधिक धोका >>> तातडीने योग्य ते उपचार

भविष्यात या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल. त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.
**************************************************************************
समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम विवेचन डॉक. लक्षणे विस्ताराने सांगितली हे फार योग्य!

मागच्या महिन्यात दोन्ही जबडे एकमेकांना ओढत असल्याचा त्रास १-२ दिवस होता. डॉ ने ECG काढून घ्यायला लावला.

लकीली ECG नॉरमल आला आणि नंतर दुखणे थांबले १-२ दिवसांनी.

तर, जबडा ओढला जाणे हे येऊ घातलेल्या झटक्याचे लक्षण असते का?

धन्स.
जबडा ओढला जाणे हे येऊ घातलेल्या
>> जबडा दुखणे किंवा तिथे अस्वस्थता वाटणे असे होऊ शकते.
अर्थात निव्वळ एका लक्षणावरून निदान होत नाही.

म्हणजे खात्री नी काही सांगता येत नाही.कोणाला कधी अटॅक येईल.
पण अटॅक येण्याची कारण आपल्याला माहीत करून डॉक्टर नी दिली आहेत.
ती कारण आपण टाळू शकतो.काळजी घेवु शकतो.
. इतके आपल्या हातात आहे.
योग्य वेळी योग्य डॉक्टर आणि योग्य उपचार मिळणे हा पण नशिबाचा च भाग आहे..

तरुण वयात हार्ट अटॅक आणि मधुमेह समाजात पसरत आहे ते चिंताजनक आहे.
आहार मधील बदल,व्यायामाचा अभाव आणि स्ट्रेस ही मुख्य कारण असावीत .

<< म्हणजे खात्रीनी काही सांगता येत नाही.कोणाला कधी अटॅक येईल. >>
एक्झॅक्टली, गेल्या भागात मी याच संदर्भात विचारले होते.
१. डॉ. नीतू मांडके सारखा तज्ञपण स्वतःचा मृत्यू ओळखू शकला नाही.
२. नुसते ब्लड प्रेशर मोजून फारसा फायदा नाही, त्याबरोबर कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड यांचे प्रमाण मोजणे अधिक उपयोगी आहे.
३. कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडमुळे हार्ट अटॅकची शक्यता कळली तरी blockage शोधण्यासाठी कुठलीच सोपी टेस्ट उपलब्ध नाही. (स्ट्रेस टेस्ट आणि एकोकार्डियोग्राम अश्या टेस्ट annual checkup मध्ये केल्या जात नाहीत. )

सहमत. भविष्यातील त्रासाबद्दल खात्रीने सांगता येणार नाही हे बरोबर.

सोप्या चाचण्यांमध्ये अलीकडे एका चाचणीची भर पडली आहे. त्यासाठी रुग्णाने वेगळे काही करायचं नाही. उपाशीपोटीची ग्लुकोज आणि TG पातळी यांना एक log सूत्र लावून TyG index असा एक निर्देशांक काढला जातो.

धोका असलेल्या निवडक लोकांच्या बाबतीत डॉक्टर याचा विचार करू शकतात.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9502283/

अमकी च टेस्ट करा असे कोणी डॉक्टर ना सांगू शकत नाही.
आणि doctor च्या सहमती पत्र शिवाय कोणती लॅब टेस्ट करत नाही..
काही टेस्ट बाबत तरी अशी procedures असते..
Heart' मध्ये दोष निर्माण झाला किंवा रक्तदाब जास्त वाढला किंवा कमी झाला तर हार्ट aattack येतो.
पण अटॅक मुळे सर्वानाच मृत्यू येत नाही .
काही लोकांना ब्रेन stroke पण येतो.
त्या मुळे कोणती तरी एक क्षमता माणूस गमावून बसतो.किंवा कोमा मध्ये पण जातो.

Aattack मुळे मृत्यू येण्याची शक्यता बाकी शक्यता पेक्षा किती जास्त असते.

सध्या भारतातील तरुणांना येणारे अचानक हार्ट अटॅक आणि गेल्या तीन वर्षातील कोविड-19 यांचा परस्पर संबंध तपासण्यासाठी आयसीएमआर ने 18 ते 45 या वयोगटासाठी विशेष अभ्यास ऑगस्ट 2023 मध्ये चालू केलेला आहे. यथावकाश त्याबद्दल समजावे अशी अपेक्षा आहे.

ज्यांना कोविड होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते अशा तरुणांनी काही काळ तरी अतिश्रम टाळावेत असा तूर्त सल्ला आहे.

https://www.cnbctv18.com/healthcare/icmr-launches-2-studies-to-probe-ris...
https://www.ndtv.com/india-news/explained-link-between-covid-19-and-incr...

शुभ सकाळ.

माझ्या इतर आजारांमुळे पोटाची परिस्थिती कायम वर खाली असते. त्यात कामाचा स्ट्रेस भयंकर आहे तो ही शरीरावरच निघतो. परवा घरातले काही उरलेले संपवायचा प्रयत्न केला व काल वेळ होता म्हणून जवळ पास वर्शा दीड वर्शाने टिप टॉप थाली खायला गेले. तिथे ही फार पोट भर खाल्ले असे नाही. रात्री एकदम कमी खाल्ले . ह्या आठवड्यात पेट स्कॅन करायचा प्लान होता . त्या आधीची रक्त तपासणी आज करायची ह्या हिशेबाने आज सकाळी काही खायचे नाही असे ठरवले होते.

रात्री/ पहाटे ३.४५ ला जाग आली व अस्वस्थ वाटा त होते. घाम /उलटी सेन्शेशन/ पोट बिघड ले आहे कि काये असे वाटणॅ सर्व झाले. आता अ‍ॅटेक येतो कि काय असे वाटले. मग हळू हळू बाहेर जायचे कपडे घालुन ठेवले, बॅगेत किल्ली ठेवुन बॅग दारापाशी ठेवली व एक दार आतले उघडून ठेवले. छातीत किंवा कुठेच काही दुखत नव्हते मग एक ग्लास गार पाणी पिउन पॉड कास्ट ऐकत पडून राहिले.

त्रास पुढे सुरू झालाच तर सरळ ब्याग उचलून लिफ्ट ने खाली जायचे व सिक्युरिटीला मला हॉस्पिटल मध्ये सोड असे सांगायचे असे ठरवले होते.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जवळच आहे. अ‍ॅडमिट व्हायचे व लेकीला फोन करायचा तोपरेन्त उजाडले असेल. पण पुढे काही त्रास झाला नाही.

सा त सव्वा सातला सरळ ब्लड टेस्ट चा प्लान कॅन्सल केला व चहा मारी केले. ( कमी शुगर) पण अगदीच थकवा आलेला होता. मग परत आराम केला. आता कुत्रा फिरवून आले. एक तारीख त्यामुळे रेंट पे केले. आज ऑफिसात नाही अशी जीमेल सेटिन्ग असते ती केली. आता काही काम नाही. आज अगदी कमी खाणार व आराम करणार. जमले तर पेट स्कॅन ची अपॉइन्ट मेंट घेइन पण ते कधी कधी अगदी उद्याच बोलवतात. ते काही जमायचे नाही. बघु. नाही तर पार दिवाळी नंतर.

मुख्य म्हणजे त्रास होत होता तेव्हा ह्या बाफ ची आठवण झाली. घरातील बायकांना पण हार्ट अ‍ॅटेकचा त्रास होउ शकतो. नक्की लक्ष ठेवत जा.
उद्या रक्त तपासणीत लिपिड प्रो फाइल पण करणार आहे.

कालचा दिवस शांततेत गेला. वीक नेस आहे. पण कामाला जाणार आहे. तिथे हार्ट अ‍ॅटेक टाइप सिचुएशन रोजच असते. पण शांततेत काम करणार आहे.

एक के रळी अभिनेत्री ३५ वर्शाची आठ महिने प्रेग्नंट ही काल हार्ट अ‍ॅटेक ने वारली. पण तिचे बाळ वाचवले आहे असे वाचले. कसला स्ट्रेन पडला असेल हार्ट वर? प्रेयर्स.

एल्विस प्रिसले पण वय झाले तसे काही ही विचित्र व भयंकर हाय कॅलरी खात असत. व नाही नको करणा रे कोणी नाही. जायच्या दिवशी त्यांनी असाच एक भयंकर हाय कॅलरी सेंडविच खाल्ला होता व टॉयलेट गेल्यावर तिथेच बहुतेक अ‍ॅटेक आला व वारले अश्या स्थितीत सापडले. लिहायचे तात्पर्य की एका वयानंतर आपण काय खातो ह्याचा पुनर्विचार करून टोटल इन टेक कमी ठेवावा. ( हे मी स्वतःलाच सांगत आहे.)

एक केरळी अभिनेत्री ३५ वर्शाची आठ महिने प्रेग्नंट ही काल हार्ट अ‍ॅटेकने वारली.
>>>
खरे आहे. वाईट वाटतं अशा बातम्या वाचून.

बऱ्याचदा लोकांकडून एक मुद्दा लक्षात घेतला जात नाही. जी तरुण व्यक्ती अशी अचानक जाते, तिचा पूर्वीचा आरोग्य इतिहास आपल्याला काहीच माहित नसतो. त्यामुळे निव्वळ मृत्यूच्या बातमीवरून कुठला निष्कर्ष काढणे शक्य नसते आणि मत देणेही अवघड असते.

Adult congenital heart diseases या प्रकारचे काही आजार असतात. याचे एक उदाहरण म्हणजे हृदयाच्या डाव्या व उजव्या कर्णिकेदरम्यान भोक असणे. याचा एक उपप्रकार असा आहे, की ज्यात जन्मापासून ते थेट चाळीशीपर्यंत कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. त्यानंतरच्या आयुष्यात काही लक्षणे दिसतात.

तरुणपणात जर कुठलीच संबंधित लक्षणे नसतील तर मुद्दामहून कोणी डॉक्टरकडे जात नाही. त्यामुळे असे काही आजार दीर्घकाळ सुप्त असतात.

चांगली माहिती डॉक्टर. वाचतोय. एक विचारतो.
शाळा कॉलेजमध्ये मुलांच्या आरोग्य तपासण्या होतात त्यात काही हृदयविकार समजू शकतात का?

शाळा कॉलेजमध्ये मुलांच्या आरोग्य तपासण्या होतात त्यात....
>>> चांगला प्रश्न. स्वानुभव सांगतो.

मी एका शालेय आरोग्य तपासणीसाठी सलग पाच वर्षे जात होतो. ज्या मुलांच्या बाबतीत संबंधित लक्षणे पालकांनाच दिसलेली असतात त्या मुलांना आधीच तज्ञ डॉक्टरकडे नेऊन त्यांचे निदान केले गेलेले असते.

आता प्रश्न येतो तो वरकरणी निरोगी दिसणाऱ्या मुलांचा. शालेय आरोग्य तपासणी ही चाळणी चाचणी असल्यामुळे त्यात आम्ही मुलाच्या छातीवर फक्त स्टेथो ठेवून ऐकतो. साधारण २०० मुलांमागे २ मुलांच्या बाबतीत मला संशयास्पद हृदय-खरखर ऐकू आली होती. अशा मुलांना तज्ञ डॉक्टरांकडे दाखवावे अशी चिठ्ठी पालकांना दिली जाते.

अर्थात पुढे त्याचे काय रिपोर्ट्स येतात ते आमच्यापर्यंत सहसा पोचत नाहीत.

माझ्या शाळेतील आरोग्य तपासणीचा अनुभव म्हणजे त्यात कळते की कुणाला चष्मा लागायची शक्यता आहे का? ( अनेक मुले पालकांना सांगायला घाबरत असत). दाताचा काही प्रॉब्लेम आहे का? ( कीड वगैरे), मूल अशक्त आहे का? अंगावर खरूज वगैरे आहे का? इ. जुजबी तपासणी असे. हृदयविकाराच्या सखोल चाचण्या होत नसत, वर डॉ.कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे stethoscope ने ठोके ऐकले जात.

(थोडेसे अवांतर. क्षमस्व)
कुणाला चष्मा लागायची शक्यता... दाताचा काही प्रॉब्लेम …
>>
अगदी बरोबर. दात आणि डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा शालेय तपासण्या खरोखर वरदान आहेत. ग्रामीण भागात तर त्यांची नितांत गरज आहे. त्या संदर्भातील माझा एक अनुभव पूर्वी इथे लिहिलेला आहे :

https://www.maayboli.com/node/82475?page=2
Submitted by कुमार१ on 25 September, 2022 - 07:34

भरत,
प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या रक्तचाचण्या पाचव्या भागात इथे दिल्या आहेत :
https://www.maayboli.com/node/84289

"धोका मूल्यमापन : प्रयोगशाळा चाचण्या" हा परिच्छेद पाहा.

हा लेख वाचला.
आधीचे वरवर वाचले आहेत.
वाचते नीट अजून.
चांगली माहिती डॉ.

माझ्या पतीचा (वय ३४)मृत्यू चे निदान cardiac arrest असेच केले होते.
जागेवरच गेला तो. आधी काही history नव्हती.
काही लक्षणे जसे की hyper acidity, कधी कधी छाती दुखणे ही आधीपासून होती.
पण प्रत्येक वेळेला acidity नाहीतर gas असेल निदान झाले. तुम्ही नमूद केल्या त्या test करायचे माहिती नव्हते, कुणी सुचवलेही नाही doc पैकी. Ecg, regular checkup वगैरेकेले होते, त्याला एकदा करोना होऊन गेला होता.असो.
Awareness पाहिजे. ही लेखमाला प्रत्येकाने वाचायला हवी.

किल्ली,
माझ्या पतीचा (वय ३४)मृत्यू चे निदान cardiac arrest असेच केले होते.
>>> होय, अत्यंत दुःखद घटना आहेच ती आणि आम्ही सगळेजण दुःखात सहभागी आहोतच.

तरुणांच्या बाबतीत जेव्हा असे अचानक होते तेव्हा वरच्या लेखात दिलेली
" प्रकार-२ : .. हा प्रकार होण्यास करोनरी वाहिन्यांचे अचानक आकुंचन,"
ही एक शक्यता राहते.
या व्यतिरिक्त पूर्वीचा इतिहास काहीच माहित नसेल किंवा 'छुपा हृदय-बिघाड' असेल तर आता सांगणे कठीण जाते.
..
* त्याला एकदा करोना होऊन गेला होता
>>>
होय, याबाबतीत आता आपल्या आयसीएमआरने नुकतेच संशोधन हाती घेतलेले आहे. ते मार्गदर्शक ठरावे.

किल्ली तुम्ही खूपच धीराच्या आहात.

आमच्याक डे पण हार्ट अ‍ॅटेक अ‍ॅट एज ५२ व त्यातून मृत्यु हे मी दोनदा अनुभवले आहे. सासरे व पती. त्यामुळे लिहावे वाट्ते. हार्ट अ‍ॅ टेक वेदना सुरु झाल्याच्या एका तासात इमर्जन्सी मेडिकेअर उपलब्ध पाहिजे. मला कार चालवता येत असती तर मी न वर्‍याला गाडीत घालून अपोलो ला नेले असते. अपोलो इमर्जन्सी साठी मी खूपच जाहिरात कॉपी लिहिली आहे एके काळी. पण गांभिर्याची कल्पना येत नाही घरा त ल्याना. वाइट म्हणजे त्या वर्शी वॅलेंटाइन्स डेलाच मी स्वतःचा चेक अप. होल बॉडी चेक अप करुन घेतला होता. त्या ला पण विचारले होते आपण जोडीने करुन घेउ. पन त्याने बिल्कुल नकार दिला. उडवूनच लावले. तेव्हा माझ्या हातात त्याचे रिपोर्ट्स असते तर मी नक्की प्रिवेंटिव्ह अ‍ॅक्षन घेतली असती. पण तो वयाने दहा वर्शे मोठा त्यात सांगलीकर त्यामुळे नाही म्हणजे नाही. म्हटल्यावर गप्प बसले. अ‍ॅटिट्युड चा पण फरक पडतो.

प्रतिसाद अस्थानी वाटले तर उडवून टाका कुमार जी.

One should use only a cardiac ambulance at the time of heart attack. This was advised to my cousin by doctors when his father, my uncle had a severe heart attack.

* प्रतिसाद अस्थानी वाटले तर>>> अजिबात नाही हो ! व्यक्तिगत अनुभवकथनामुळे तर चर्चा अधिक उपयुक्त होते. त्याचे नेहमीच स्वागत आहे.
..
* only a cardiac ambulance >>> होय, ज्यांना ती लवकर मिळेल ते खरेच भाग्यवान !

Pages