चंद्रामागे जाणारा व परत येणारा शुक्र बघण्याचा थरारक अनुभव

Submitted by मार्गी on 13 October, 2023 - 04:47

✪ दिवसा झालेले चंद्र- शुक्राचे पिधान
✪ क्षणार्धात अदृश्य व थोड्या वेळाने परत दृश्यमान होणारा शुक्र!
✪ ध्यानाचा अनुभव- जणू पूर्ण अंधार आणि क्षणार्धात आलेला प्रकाश
✪ दिवसा उजेडीसुद्धा शुक्र बघता येतो
✪ आकाशातील आश्चर्ये आपल्याला विनम्र करतात

सर्वांना नमस्कार. आपल्याला दिसणारं आकाश एक जादूचा पेटारा आहे! अंधा-या रात्री दिसणारं आकाश बघताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. अशाच एका अवाक् करणा-या अनुभवाबद्दल आपल्यासोबत शेअर करत आहे. हा अनुभव अगदी वेगळा होता कारण तो दिवसा आलेला होता! दिवसाच्या वेळी आपण चंद्र तर बघूच शकतो आणि सौर फिल्टर वापरून सौर डागसुद्धा बघू शकतो. पण आपण शुक्र व गुरू असे तेजस्वी ग्रहसुद्धा दिवसा बघू शकतो. हे चंद्र व शुक्राचं पिधान (म्हणजे चंद्रामुळे झाकला गेलेला व थोड्या वेळाने चंद्राच्या पलीकडून दिसायला लागलेला शुक्र) ह्या वर्षी २४ मार्चला झालं होतं. त्याबद्दल लिहायचं राहून गेलं होतं. ते आता लिहीत आहे.

(इथे http://niranjan-vichar.blogspot.com/2023/10/thrilling-experience-of-watc... आकाश दर्शनाशी संबंधित माझे इतर लेख वाचता येतील व टेलिस्कोपने घेतलेले फोटोजही बघता येतील.)

हे पिधान २४ मार्चच्या संध्याकाळी झालं. आकाश स्वच्छ होतं. तृतीया असल्यामुळे चंद्राची बारीक कोर होती. हे बघण्यासाठी टेरेसवर गेलो तेव्हा चंद्र शोधावा लागला. भिंतीच्या सावलीचा उपयोग करून अपेक्षित जागी म्हणजे पश्चिमेच्या बाजूला चंद्राचा शोध घेतला. भर ऊन, गडद निळं आकाश आणि बारीकशी कोर असल्यामुळे लगेच सापडला नाही. बायनॅक्युलरचीही मदत घेतली आणि मग सापडला. आणि डोळ्यांनी तेजस्वी आकाशासोबत जुळवून घेतल्यावर डोळ्यांनीही दिसला. अगदी बारीक १३% प्रकाशित चंद्राची कोर. आणि विशेष म्हणजे बायनॅक्युलरमधून त्याच्या अप्रकाशित बाजूच्या अगदी जवळ शुक्रही दिसला! गंमत म्हणजे शुक्र चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी दिसत होता. कदाचित त्याचा कोनीय आकार चंद्रापेक्षा खूपच कमी असल्यामुळे तसं दिसत असेल.

ठीक ४:०५ वाजता क्षणार्धात शुक्र चंद्राच्या अप्रकाशित भागामुळे झाकला गेला! दिसतोय दिसतोय आणि अचानक अदृश्य झाला. आकाश अतिशय तेजस्वी असल्यामुळे ह्यावेळी फोटो घेता आला नाही. आणि बायनॅक्युलरमधून बघताना डोळेही दुखत होते. शुक्र चंद्रापलीकडून परत बाहेर येण्याची वेळ ५:४५ ही होती. तोपर्यंत थोडा ब्रेक घेतला.

अशाच चंद्र- मंगळ पिधानाचा मी घेतलेला व्हिडिओ. चंद्रावर "उगवणारा" मंगळ: http://niranjan-vichar.blogspot.com/2021/04/blog-post_18.html

परत ठरलेल्या वेळेच्या थोडं आधी निरीक्षणाला सुरूवात केली. ह्यावेळीही सूर्यास्त जवळ आलेला असूनही आकाश तितकंच तेजस्वी आहे. दुसरी सावली वापरून चंद्र बघायला सुरूवात केली. बायनॅक्युलरने चंद्राचं निरीक्षण सुरू केलं. आणि ठरलेल्या क्षणी अगदी अचानक शुक्र प्रकट झाला! अगदी रोमांचक अनुभव. अनुपस्थिती किंवा अंधार किंवा शून्य आणि क्षणार्धात प्रकट झालेला तेजस्वी शुक्र! ह्यावेळीही शुक्र चंद्रापेक्षा तेजस्वी वाटला. काही मिनिटांनी शुक्र चंद्राला चिकटून नुसत्या डोळ्यांनीही बघता आला. तेजस्वी निळ्या आकाशामध्ये तो फिकट पिवळ्या बिंदुसारखा दिसतोय. मधून मधून हरवतोय, पण चंद्राच्या स्थितीच्या अंदाजाने परत बघता येतोय. शुक्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो आणि त्याची बारीकशी कोर असते, तेव्हा तो दिवसाही सहजपणे दिसू शकतो. पण त्यासाठी सूर्यप्रकाश टाळण्याची काळजी घ्यावी लागते आणि त्याची आकाशातली स्थिती अचूक माहिती असावी लागते. ह्यावेळी चंद्रामुळे शुक्र शोधायला अगदी सोपा गेला.

तेजस्वी ग्रह- शुक्र व गुरू हे दिवसाही बघता येऊ शकतात. आणि कदाचित विश्वास बसणार नाही, पण अंधा-या ठिकाणी आदर्श स्थितीत त्यांच्यामुळे सावल्याही पडतात! दुस-या महायुद्धामध्ये सैनिकांनी शत्रूने सोडलेली अज्ञात वस्तु समजून शुक्रावर फायरिंगसुद्धा केलं आहे! आकाशात अशी अनेक आश्चर्य आहेत व ते बघून आपण नम्र होतो. आपण किती छोटे आणि नगण्य आहोत, ही जाणीव आपल्याला होते. आता पावसाळ्यानंतर आकाश दर्शनाचे महिने सुरू होत आहेत. माझी आकाश दर्शनाची सत्रही सुरू होत आहेत. सर्वांना happy sky watching! आपले जवळचे लोक व ह्यात आवड असलेल्यांसोबत हा लेख शेअर करू शकता. धन्यवाद.

(निरंजन वेलणकर 09422108376 वर दिलेल्या ब्लॉगवर माझे विविध लेख वाचता येतील व टेलिस्कोपिक फोटोजही बघता येतील. फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील व असं सेशन आपल्याकडे आयोजित करायचं असेल तर संपर्क करू शकता. धन्यवाद.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!! खूप मस्त.
तुम्ही असे लेख ग्रुप डिफॉल्ट का ठेवता? सर्वांकरता ठेवा ज्यायोगे ज्यांना कोणाला या विषयात रुचि आहे ते माबोचे सदस्यत्व घेतील.

ह.पा., हो मीही ऐकलं आहे हे शुक्राच्या बाबतीत.
सूर्य किंवा चंद्र उगवण्यापूर्वी पूर्व दिशेला जसा थोडा उजेड दिसतो, तसा (तितका नाही अर्थात, पण थोडा) शुक्रासाठीही दिसतो असंही ऐकलं आहे.

गावी असताना सकाळी गावच्या पाठीमागे असणारा डोंगर चढायला जायचो व्यायाम म्हणून तेव्हा कड्यात उभ राहून अनेक वेळा तेजस्वी शुक्र बघितला आहे.
उगवत्या सूर्याच्या बाजूला.
खूप सुंदर दृश्य असायचे .
सुर्य उदय होण्यापूर्वी पूर्व दिशेला आकाश विविध रंगाने उजलून निघालेल्या असायचे.
त्याच बरोबर सूर्या बरोबर शुक्र ही तेजस्वी जोडी बघण्यात खूप मजा वाटायची

भारी वावे! अश्या मानवनिर्मितप्रकाशमुक्त ठिकाणी जाऊन तो अनुभव घ्यायला फार मजा येईल.

सर्वांना नमस्कार व मन:पूर्वक धन्यवाद! Happy

चर्चेमध्ये भर घातल्याबद्दलही धन्यवाद.

@ सामो जी, ह्याची कल्पनाच नव्हती. डिफॉल्ट सेटींगच तसं असावं. आता बदल केला आहे. पुढच्या लेखांच्या वेळेस काळजी घेईन. धन्यवाद.