Aatmapamphlet - मराठी चित्रपट मार्केंटींगमध्ये कमी पडतात का? आणि का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 October, 2023 - 11:52

मराठी चित्रपट मार्केंटींगमध्ये कमी पडतात का? आणि का?

Aatmapamphlet नावाचा मराठी चित्रपट गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. मला आज हे नाव कानावर पडले.

चित्रपटाचे कौतुकच वाचले, त्यामुळे ट्रेलर बघितला. पुन्हा एकदा लहान मुलांची लव्हस्टोरी. विषयात नावीन्य नाही. पण सादरीकरणात असावे. तसेच लव्हस्टोरीपलीकडे काहीतरी असावे असे वाटते. एखादा डार्क ह्युमर वगैरे. कारण जातीभेद देखील दाखवला आहे त्यात. चित्रपट लोकांपर्यंत वेळीच पोहोचला असता तर नक्कीच चर्चा झाली असती असे मटेरीअल एकंदरीत वाटले.
IMDb अगदी ९/१० दाखवले आहे, टाईम्स ऑफ ईंडिया ४/५ स्टार दाखवत आहे.
ट्रेलर ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=oSEWI7V5CRQ

हा सुद्ध परेश मोकाशी चित्रपट आहे. या आधी वाळवी पाहिला होता. चांगला चित्रपट आहे हे कानावर पडताच कोण सोबत आहे हे न बघता एकटाच रात्रीचा शो बघून आलेलो. आवडलेला. त्यावर धागाही काढलेला. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं बघतील.

पण या वरच्या Aatmapamphlet चित्रपटाबद्दल गूगल करताना अजून काही बातम्या नजरेस पडल्या त्या अश्या की काही ठिकाणी पब्लिक नसल्याने याचे शो रद्द करावे लागले. कधी मराठी चित्रपटांना जास्त शो नाही म्हणून ओरडा असतो, तर ईथे आहे तोच शो चार माणसे बघून रद्द होत आहे.

काय आहे हे? यांना मार्केटींग करता येत नाही का? की मार्केटींगचे महत्व समजत नाही का? की बजेट प्रॉब्लेम असतो? पण व्यवसाय म्हटले की त्यावर तोडगा काढावाच लागणार ना? सोशल मिडिया मध्ये जरी प्रभावी मार्केटींग केली तरी जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पिक्चर पोहोचवता नाही येऊ शकत का? आपण मायबोलीवर मराठी चित्रपट कसा वाटला धागा काढतो. मी स्वतः मायबोलीवर कित्येक मराठी चित्रपटांबद्दल स्वतंत्र धागे काढले आहेत, जे हिंदीबाबत केले नाही. ही जी एक मातृभाषेतील कलाकृतींबद्दल आत्मियता असते ती आपल्या सर्वातच कमी जास्त प्रमाणात असते. याचा फायदा घेऊन मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ईतके कठीण आहे का? कारण आपल्याला कितीही वाटले की मराठी चित्रपटांना प्रोत्साहन द्यावे तरी आपणही चार लोकांना तेव्हाच सांगणार जेव्हा तो आपल्यापर्यंत पोहोचणार. जो ट्रेलर बनवला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचायला हवा ना, की आपणच जाऊन शोधायचा. नक्कीच काहीतरी चुकतेय.. चर्चा अपेक्षित.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली वृत्तपत्रांत चित्रपटांच्या जाहिराती येणं बंद झालंय का? म्हणजे काही काही चित्रपटांच्या पहिलं पान भरून जाहिराती महिना महिना येत असतात.
एका फार्मा कंपनीचा मालक चित्रपटही प्रोड्युस करतो. त्याच्या चित्रपट + कफ सिरपच्या पान पानभर जाहिराती असत.

लोकसत्तेत अर्धा पान भरून नाटकांच्या जाहिराती असतात. पण इतक्यात चित्रपटांच्या जाहिराती पाहिल्याचं आठवत नाही.

सकाळ ने चित्रपटाच्या जाहिराती सवलतीच्या दराने छापायला नकार दिल्यामुळे पुण्यात अनेक वर्षे इतर वर्तमानपत्रात जाहिराती यायच्या. सिनेमा हॉल मधे चित्रपटाच्या जाहिराती साठी ही वर्तमानपत्रे घ्या अशी एक स्लाईड दाखवत. त्यात सकाळ चे नाव नसायचे.

पण ना सकाळचा खप कमी झाला ना यांचा वाढला. आता सवलतीच्या दरात कुणीच जाहिराती देत नसल्याने बंद झाल्या. ज्या बॅनर्स ना परवडते किंवा कॅंपेनचा हिस्सा म्हणून येतात.

ते लोण सर्वत्र जायला किती वेळ लागणार?

हं.
---
https://www.instagram.com/p/CyJPlKKRjhH/

ललित प्रभाकरने हा चित्रपट पाहून बाहेर पडताच लाइव्ह रील केली. त्यात सुनील बर्वे आणि चित्रपटाचा दिग्दर्शकही बोललेत.

हा कोणत्या भाषेतला चित्रपट आहे आणि नक्की नाव काय आहे हेच कळत नव्हते. गुगलायचे कष्ट घेतले नाहीत आणि तोपर्यंत विकांत गेला होता. नाव सोपे असायला हवे होते आणि निदान मराठी आहे हेही लगेच समजले असते तर प्रेक्षक वर्ग वाढला असता. आता लोकांना बघायचा असला तरी या विकांतापर्यंत असायला हवा. हे लोक चला हवा मध्ये आले होते पण या चित्रपटासाठी आलेत याची कल्पना नव्हती.

कुठे ते आठवत नाही पण दिग्दर्शक म्हणाला की चरीत्र आहे पण एका पानभर /पॅम्प्लेटभर एवढं… तर सिनेमाचं माव आत्मपान हवं हहोतं ना … उत्सुकता अन् हटके म्हणून दिलं असावं

नावाचा उलगडा ट्रेलर मध्येच केला आहे. मोठ्या लोकांचे आत्मचरित्र असते तसे आपल्या बेंड्याचे हे आत्म pamphlet आहे.>> असली दवणीय कोटी ऐकूनच लोक गेले नसणार पिक्चरला

मस्त धमाल आहे चित्रपट. आजच पाहिला. वेगळीच ट्रिटमेंट दिलेय. Coming of age (शाळाची आठवण येते) + धर्म, जाती इ वर खुसखुशीत कमेंटरी. बघाच एकदा.

कलाकारांच्या निवडीबद्दल 100 मार्क. वातावरण निर्मिती, वास्तवातील घटना आणि हिरोच्या आयुष्यातले टप्पे मस्त घेतलेत. साधा सोपा मनोरंजक चित्रपट. दिग्दर्शकाचा चित्रपट.

पानभर चरित्राला अडीच तास चित्रपट? एक वीस मिनिटाची शॉर्ट फिल्म बनवायची होती... काहीही

Submitted by च्रप्स on 11 October, 2023 - 17:54 >>> का ?

उद्याचा बूक माय शो चेक केला.
काम लवकर उरकले तर ८.३० चा शो जमेल.
पण मोजून आठ सीट भरल्या आहेत. त्यात मजा नाही.
वाळवीला रात्री दहाच्या शो ला एकटा गेलेलो. थिएटर बरेच भरलेले. लोकं हसत खिदळत होते. त्यामुळे एकटा असूनही मजा येत होती.
त्यामुळे हा चित्रपट मनोरंजक असला तरी अंधारात एकटे बघायला मजा येईल का याबद्दल साशंक आहे.
बरे कंपनी म्हणून लेकीला न्यावे तर तिचे वय वर्षे नऊ. तिला ८० दशकातील संदर्भ काही कळणार नाही.

https://youtu.be/Hrk-VWzpbSc?si=6WhGKDD0a4jbSI7d

परेश मोकाशी आणि आशिष बेंडेंची मुलाखत आहे इथे या चित्रपटाच्या संदर्भात!!
चित्रपटाच्या नावावर पण चर्चा झालीय या मुलाखतीत Happy

सोसायटीतल्या जमेल तितक्या लोकांच्या तिकीटा काढल्या तर तुम्हाला सोबतही होईल शिवाय मराठी सिनेमा चालवला हे समाधान मिळेल.

Aatmapamphlet
काय अर्थ या नावाचा?>>> तो म्हणतो ना… माझ्यासारख्या. एव्हढ्याश्या माणसाचे आत्मचरित्र नसते हे मला माहिती आहे मग आपण याला आत्म पॅम्प्लेट म्हणूया.

Aatmpamphalate नावाचा मराठी चित्रपट गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. मला आज हे नाव कानावर पडले. --- स्वतःचे धागे वाचत नाहीस वाटतं हल्ली. 9 सप्टेंबर ला इथे एक महिना आधी ट्रेलर टाकलाय https://www.maayboli.com/node/61689 आपलेच धागे बघत नाहि वर म्हणायचं मराठी प्रेक्षकापर्यंत मराठी चित्रपट पोचत नाही नायतर हे असले धागे.

रच्याकने, लेकीला म्हटलं आत्मपॅम्फ्लेट नावाचा मराठी सिनेमा बघायला जातेय तर तिने विचारलं की हॉरर मूव्ही आहे का?

हॉरर मूव्ही आहे का?## मामीच्या चेहऱ्यावर काय भाव उमटले असतील ह्याची कल्पना करत होतो

मला दिसत आहे जाई
रविवार पर्यंतचे.. नवी मुंबई..
लोकेशन बदलून बघा.. कदाचित तुमच्या इथे नसेलच

परेश मोकाशी नाव ऐकून मी बघणार Happy

पानभर चरित्राला अडीच तास चित्रपट? एक वीस मिनिटाची शॉर्ट फिल्म बनवायची होती... काहीही>>> तुमच्या प्रतिक्रियांपेक्षा वाचण्यापेक्षा तरी नक्कीच उपयुक्त वेळ जाईल हा चित्रपट पाहून.. पिक्चर न बघता ही असली प्रतिक्रिया?

आज पाहिला आत्मपॅम्फ्लेट...मस्त आहे...खुसखुशीत संवाद....छान acting...आणि विशेष म्हणजे जातीभेदाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडणारा...खुसखुशीत पण तरीही अभ्यासपूर्ण वाटला चित्रपट...पण आपल्या समाजाचं दुर्भाग्य म्हणावं की अजून काय, चित्रपट पाहायला आम्ही theater मध्ये मोजून 9 लोकं होतो..
मधल्या age मधला आशिष,त्याची आई ,बोर्‍या ,लहानपणीची सृष्टी विशेष आवडले....
मायबोलीवर बर्‍यापैकी मार्केटींग झालीच आहे...इथला प्रेक्षकवर्ग चोखंदळ आहे..तर सर्वांनी आवर्जून पाहावा असा चित्रपट आहे...मायबोलीकरांना नक्की आवडेल ...

पानभर चरित्राला अडीच तास चित्रपट? एक वीस मिनिटाची शॉर्ट फिल्म बनवायची होती... >>>यावर पण चित्रपटाच्या शेवटी भाष्य केले आहे आत्मपॅम्फ्लेट म्हणता म्हणता आत्मब्रोशर झाले असे Lol ...आणि चित्रपट अडीच तासाचा नाही तर दीड तासाचा आहे.

Pages