टोमॅटोच्या वड्या

Submitted by तृप्ती आवटी on 29 September, 2023 - 19:23
Tomato Burfee
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप ताज्या टोमॅटोंचा रस (प्युरे), २ कप खवलेला नारळ, पावणे-दोन कप साखर, पाव कप खवा किंवा मावा पावडर

क्रमवार पाककृती: 

२ चमचे तुपावर नारळाचा चव भाजून घ्यावा. छान खमंग वास सुटला की त्यात टोमॅटोचा रस, साखर, मावा पावडर घालून एकजीव मिश्रण करावे. मध्यम आंचेवर आटवत ठेवावे. साखर सुटायला लागली गॅस बंद करून मिश्रण जरा गार होउ द्यावे. थाळ्याला तुपाचा हात लावून त्यावर मिश्रण एकसारखे थापावे. उचटण्यानं वड्या आखून घ्याव्या. पूर्ण गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढ्या
अधिक टिपा: 

१. चांगले लाल झालेले टोमॅटो कच्चेच, न सोलता, न शिजवता, बिया न काढता मिक्सरध्ये घालायचे आहेत. नाकं तेवढी काढून घ्यावीत.
२. खवा घालणार असल्यास आधी थोड्या तुपावर भाजून घ्यावा.
३. मूळ कृतीत एकास एक प्रमाण आहे. मला पुढच्या पिढीचा अतीशहाणपणाचा वारसा चालवणं भाग असल्यानं पाव कप का होइना साखर कमी घालते.
४. आंतरजालावर इतर काही पाककृती आहेत ज्यात टोमॅटो शिजवून, सालं काढून, तो लगदा चाळणीतून गाळून घेतला आहे. पण आपण टोमॅटो कच्चेच, न सोलता, न शिजवता, बिया न काढता मिक्सरध्ये घालायचे आहेत. आणि हो, नाकं तेवढी काढून घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
माय
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा आली का रेसिपी?
भारी दिसतोय रंग - चव मला इम्याजिन करता येत नाहीये, तेव्हा करून बघणं भाग आहे. Happy

त्या काढून टाकलेल्या नाकांनी कांदे सोलता येतील ना? म्हणजे उगा वाया जायला नकोत! Proud

छान

टोमॅटोच्या वड्या.. इंटरेस्टिंग.. कधी खाल्ला ऐकला नव्हता हा प्रकार.. छान दिसतेय

धन्यवाद सर्वांना.

काढून टाकलेल्या नाकांनी कांदे सोलता येतील ना >>> तेवढ्यासाठीच तर नाकं वेगळी काढायची आहेत Biggrin