लेखनस्पर्धा १: 'स्त्री असणं म्हणजे…' - स्वाती आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 September, 2023 - 15:28

'टायटॅनिक'मधली केट विन्स्लेटने साकारलेली रोज आठवते?

पैशाच्या मोहापायी तिच्या आईने तिची सोयरीक एका धनिक वणिकाशी जुळवली आहे. संपत्ती आणि त्यायोगे येणारी सत्ता यांची झापडं या तिच्या भावी नवर्‍याच्या डोळ्यांवर जन्मजात आहेत. त्यापलीकडचं जग त्याला दिसत नाही. रोज त्याच्या प्रतिष्ठेला साजेशी शोभेची बाहुली बनून राहिली तर तो तिला (आणि तिच्या आईलाही) जन्मभर ऐषारामात ठेवेल याबद्दल शंका नाही, पण गाद्यागिरद्यांच्या ढिगार्‍याखाली रुतलेल्या वाटाण्यासारखा एक सल रोजला छळतो आहे. तिच्या मनोवृत्ती आणि आवडीनिवडी खूप खूप निराळ्या आहेत. या भावी पतीच्या जगात कितीही प्रयत्न केला तरी तिला रममाण होताच येत नाही. तिचा बुद्धिमान, बहुश्रुत, कलासक्त जीव या भपकेबाज वर्तुळाला अगदी विटतो!

'आता उरलेलं सगळं आयुष्य असं 'लिटल वाइफी' होऊन जगायचं?! त्यापेक्षा मेलेलं काय वाईट!' असं वाटून एका रात्री ती डेकवर जाते, कठडा ओलांडते आणि डोळे मिटून आता समुद्रात उडी मारायची म्हणेतो कर्मधर्मसंयोगाने नेमका तिथे आलेला जॅक तिला थांबवतो.

ते संवाद फार इन्टरेस्टिंग आहेत. तो भावनिक आवाहन करत नाही, धाकदपटशा दाखवत नाही, तिला असा निर्णय घेत असल्याबद्दल कमकुवत ठरवत नाही, फक्त उडी मारली तर पाणी किती गार असणार आहे त्याबद्दल बोलतो. एक अनवस्था प्रसंग टळतो, पण दुसरा त्याहून दुर्धर प्रसंग ओढवतो - त्यांना परस्परांची एक 'अंतरीची खूण' पटते आणि एका प्रेमकथेची नांदी होते.

पुढे जॅक हा उत्तम चित्रकार असल्याचं रोजला कळतं. तिला स्वतःला चित्रकलेची जाण असते. त्याची चित्रं पाहताना ती म्हणते "तुला माणसं 'दिसतात'!" हुबेहूब चेहरे आणि शरीरं रेखाटणं ही कुसर झाली, त्यामागची व्यक्ती पाहता आणि रेखाटता येणं ही कला!
"You have a gift, Jack! You 'see' people!”
"I see you!"
यावर ती बहुधा 'तू किती सुंदर आहेस!' असं काहीतरी ऐकायच्या अपेक्षेने मोठ्या दिमाखात विचारते, "...and??"
तो तिच्या डोळ्यांत बघत उत्तर देतो, "you wouldn't have jumped!"
ती चमकते!
त्याने थांबवलं नसतं तरीही वैफल्याचा तो क्षणिक आवेग ओसरल्यावर तिचा विचार बदललाच असता, आणि आयुष्याने मांडलेल्या अडथळ्यांच्या शर्यतीत तिने आपला मार्ग शोधलाच असता हे तिचं तिलादेखील जाणवलेलं नसतं, पण त्याला 'दिसलं' आहे.

संपूर्ण चित्रपटातला हा माझा सर्वात आवडता प्रसंग आहे!

परवा कधीतरी स्त्रियांमध्ये आत्महत्येचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी असतं असा International Association of suicide preventionचा अहवाल पाहण्यात आला आणि मला या प्रसंगाची आठवण झाली.

बायकांची जात चिवट खरी! अगदी गर्भावस्थेपासूनच बाळीचे पाय याबाबतीत पाळण्यात दिसतात. बहुतांश मनुष्यसमूहांत प्रतिकूल परिस्थितीतदेखील तगून राहणार्‍या स्त्रीभ्रुणांची संख्या पुल्लिंगी भ्रुणांच्या तुलनेत अधिक असते, आणि स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत दीर्घायुषीही असतात.
शिवाय या दीर्घायुष्यातल्या रजोनिवृत्तीपर्यंतच्या मोठ्या कालखंडात संप्रेरकांची कवचकुंडलं तिचं अनेक आधीव्याधींपासून बर्‍याच अंशी संरक्षण करत असतात.
पुरूष शारीरिकदृष्ट्या तुलनेने बलवान असतीलही, पण ही महापुरातही तगणारी लव्हाळी आहे हे निश्चित.

बरं, निसर्गाचा पक्षपात तिथेच संपत नाही.
स्त्रियांची ऐंद्रिय अनुभव घेण्याची क्षमता पुरुषांच्या तुलनेत अधिक असते.
त्यांना रंग, रस, स्पर्श, गंधांतले बारकावे पुरुषांच्या तुलनेत अधिक जाणवतात. रंगांधळेपणाचं प्रमाणही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांत कमी आढळतं.
फूड सायन्सच्या क्षेत्रात यामुळेच सेन्सरी पॅनल्सवर सहसा स्त्रिया अधिक असतात.
निसर्गाने स्त्रीची जडणघडणच मुळी आस्वादिकेची केली आहे.

आणि त्यात भर घातली आहे उत्क्रांतीच्या प्रवाहाने.
स्त्रीला तीव्र शारीरिक संवेदनांबरोबरच तीव्र सहसंवेदनेचीही देणगी (बहुधा पिढ्यान्पिढ्यांच्या बालसंगोपनाच्या अनुभवातून) मिळालेली आहे. आपल्या गोतावळ्यातील व्यक्तींच्या सुखदु:खांशी तिला चटकन आणि सहज समरस होता येतं, तसंच त्यांच्या भावनिक गरजा समजून त्या पूर्ण करण्याची धडपड करण्याकडे तिचा कल अधिक असतो.

एकूण भरभरून जगण्यासाठी, नव्हे जगण्याचा उत्सव करता येण्यासाठी तिला इतर कोणावर किंवा कशावर अवलंबून राहायची आवश्यकताच नाही.

समाजव्यवस्थेत स्त्रीला दुय्यम स्थान होतं आणि आहे, समान संधी, समान मोबदला, समान प्रतिष्ठा, समान हक्क अजूनही मिळत नाहीत, अजूनही पिता/भ्राता/भर्ता/पुत्रांच्या टेकूशिवाय तिला तिच्या पायांवर उभं राहाता येतं आणि यायला हवं हे अनेकांच्या गावीच नसतं, हे सगळं सगळं खरं आहे.
त्या असमानतेचा विरोध जिथे जसा शक्य होईल तसा प्रत्येकीने आणि प्रत्येकाने करावाच. पण कुठल्याही मोहिमेची आखणी करताना SWOT (strengths, weaknesses, opportunities, threats) analysis आवश्यक असतो.
आपली बलस्थानं काय आहेत हे आधी आपलं आपल्याला माहीत असायला हवं, जे मिळालेलं नाही त्याबद्दल तक्रार करण्याच्या भरात जे मिळालेलं आहे ते अ‍ॅप्रिशिएट करायचं राहून जाऊ नये म्हणून या लेखाचा प्रपंच.

टिपा:
१. बहुतांश लेख हा जीवशास्त्रीय गुणधर्मांवर आधारीत असल्यामुळे स्त्री आणि पुरुष हे उल्लेख त्याच (सिसजेन्डर) संदर्भाने वाचावेत. शारीरिक बाह्यलक्षणे आणि चेतासंस्था निरनिराळ्या लिंगांची असणार्‍यांबाबत विधानं करण्याइतका विदा माझ्या वाचनात अजून आलेला नाही.
२. मी जीवशास्त्रातली किंवा समाजशास्त्रातली तज्ज्ञच काय, पण त्या विषयांची अभ्यासकदेखील नाही. हे सहज वाचनात हाती लागलेले ज्ञानकण आहेत. यापेक्षा निराळी किंवा अधिक अद्यायवत माहिती तुमच्याकडे असल्यास जरूर शेअर करा, मला जाणून घ्यायला आवडेल.
३. अशा प्रकारचे प्रयोग आणि त्यांचे निष्कर्ष यांना सांख्यिकीची चौकट असते. 'आमच्याकडे उलट बाबाच आईपेक्षा जास्त भावनाप्रधान आहेत' अशा प्रकारची उदाहरणं कितीही खरी आणि हृद्य असली तरी अशा चर्चेत अस्थानी आणि अप्रस्तुत ठरतात.

संदर्भसूची:
१. The gestational foundation of sex differences in development and vulnerability
२. Empathy: Gender effects in brain and behavior
३. Sex differences in the neural basis of emotional memories
४. Women live longer than men
५. Gender and senses

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला. जनरलीच 'माता आणि भगिनी' स्फुटांचा कंटाळा आला आहे , त्यामुळे तर रिफ्रेशिंग आणि रिअलिस्टिक वाटला.

लेख आवडला. रिफ्रेशिंग व रिअलिस्टिक ला +१

निसर्गानेच जे फायदे/तोटे दिले आहेत ते आहेतच. पण उत्क्रांती व बालसंगोपनाची पिढ्यानपिढ्याची जडणघडण आहे (नर्चर) त्यात आता कुटुंबाच्या बदललेल्या स्वरूपातून कसे बदल होत जातील हे इंटरेस्टिंग आहे. अर्थात हे बदल एक दोन पिढ्यांत होणार नाहीत.

हाय स्वाती -
हा लेख खूप आवडला. आणि तुझे आवाहन आवडले.

टायटॅनिकचा विश्लेषणात्मक भाग आवडला.

आपली बलस्थानं काय आहेत हे आधी आपलं आपल्याला माहीत असायला हवं, जे मिळालेलं नाही त्याबद्दल तक्रार करण्याच्या भरात जे मिळालेलं आहे ते अ‍ॅप्रिशिएट करायचं राहून जाऊ नये म्हणून या लेखाचा प्रपंच. - हे वाक्य आणि हा स्टँड सर्वाधिक आवडला.

>>>यावर ती बहुधा 'तू किती सुंदर आहेस!' असं काहीतरी ऐकायच्या अपेक्षेने मोठ्या दिमाखात विचारते, "...and??"
तो तिच्या डोळ्यांत बघत उत्तर देतो, "you wouldn't have jumped!"

खतरनाक दिसतोय हा प्रसंग. मी नीट पाहीला नव्हता.

धन्यवाद.

सामो, ही माहिती संकलित करून निराळ्या लेखात देता आली तर बरं होईल.
पूर्वप्रकाशित असेल तर नुसती लिंक देऊन भागेल.

होय.

सुंदर लेख! रिफ्रेशिंग आणि रिअलिस्टिक ला +१
टायटॅनिक मधली केट - इथून सुरू झाल्यामुळे लेखात साहजिकपणे लगेचच ओढला गेलो. Happy त्या प्रसंगाचं वर्णन फार छान केलं आहेस.

सुंदर लेख स्वातीताई. वाचताना वाचकाला सातत्यानं ‘आपल्याला हेच म्हणायचं होतं‘ ही जाणीव होणं हे त्या लेखाशी जुळलेलं सगळ्यात मोठं कनेक्शन असतं असं मला वाटतं आणि ते कनेक्शन हा लेख वाचताना अगदी सहज जुळलं.

सुरेख लिहिलं आहेत. विक्टम मेंटॅलिटी किंवा एकदम दुसर्‍या टोकावरची झाशी न गाठता एक स्त्री असणं फार प्रभावीपणे लिहिलं आहेस. खरं तर असा लेख वाचल्यावर प्रतिसादात आपण काय लिहावं असा प्रश्नच पडतो पण दाद दिल्याशिवाय रहावत नाही.

चांगलं लिहिलंय स्वाती.बरंच पटलं.मला स्वतःला हा लेख अजून 2 परिच्छेद मोठा झाला असता तरी आवडलं असतं, बलस्थानं, swot अनालिसिस याबद्दल अजूनही येऊदे.

छान लेख स्वाती.
अनंत काळाची माता, अबला, सबला, भ्रूणहत्त्या, अत्याचार इ. सगळ्या समस्या खऱ्याच असल्या तरी तेच तेच वाचून भयंकर कंटाळा येतो. ( वाचून कंटाळा येतो तर वर्षानुवर्षे भोगून किती कंटाळा येत असेल! ची टेप नको). त्या सगळ्याच्या पार्श्वभूमी वर ही नवी झुळूक आवडली. आपली बलस्थाने काय आहेत आणि स्वॉट चांगले मुद्दे आहेत.

मस्तं लेख स्वाती!
पुरूष शारीरिकदृष्ट्या तुलनेने बलवान असतीलही, पण ही महापुरातही तगणारी लव्हाळी आहे हे निश्चित>>>> हे वाक्यं विशेष आवडलं.

सुरेख लिहिलंय!
टायटॅनिक मधली केट वाचताना आपोआप tomorrow is another day म्हणणारी "गॉन विथ द विंड" मधली स्कार्लेट ओ हारा आठवली!
पुरूषप्रधान जगात स्त्रीला "पुरूषांसारखे" व्हावे लागते ही स्त्री पुरूष समानतेच्या वाटचालीतली सर्वात मोठी शोकांतिका आहे! Unless we appreciate, respect and integrate the nature and nurture of womanhood we will never achieve equity.

पुरूषप्रधान जगात स्त्रीला "पुरूषांसारखे" व्हावे लागते ही स्त्री पुरूष समानतेच्या वाटचालीतली सर्वात मोठी शोकांतिका आहे! +१००

स्त्रियांची ऐंद्रिय अनुभव घेण्याची क्षमता पुरुषांच्या तुलनेत अधिक असते.
त्यांना रंग, रस, स्पर्श, गंधांतले बारकावे पुरुषांच्या तुलनेत अधिक जाणवतात.

माहितीपूर्ण, सुंदर लेख !!!

>>>>पुरूषप्रधान जगात स्त्रीला "पुरूषांसारखे" व्हावे लागते ही स्त्री पुरूष समानतेच्या वाटचालीतली सर्वात मोठी शोकांतिका आहे!
हे वाक्य फार पटले.

खूप सुंदर लिहिलं आहे.

पुरूषप्रधान जगात स्त्रीला "पुरूषांसारखे" व्हावे लागते ही स्त्री पुरूष समानतेच्या वाटचालीतली सर्वात मोठी शोकांतिका आहे! >> फारच पटत हे नेहमीच.

खूप सुंदर लिहिलं आहे.
पुरूषप्रधान जगात स्त्रीला "पुरूषांसारखे" व्हावे लागते ही स्त्री पुरूष समानतेच्या वाटचालीतली सर्वात मोठी शोकांतिका आहे! >>>>+१

वा! फार सुरेख लिहिलंयस! "आपली बलस्थानं काय आहेत हे आधी आपलं आपल्याला माहीत असायला हवं, जे मिळालेलं नाही त्याबद्दल तक्रार करण्याच्या भरात जे मिळालेलं आहे ते अ‍ॅप्रिशिएट करायचं राहून जाऊ नये" >>> हा पॉझिटिव थॉट फार आवडला.

स्त्रीला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम (स्पर्धा) करायची गरज कधीच नव्हती.....
कारण ती पुरुषांपेक्षा दोन पाऊले पुढेच चालत होती !

महेश मांजरेकरांच्या एका वेबसिरीज मधलं जबरा वाक्य.

सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार. Happy

>>> देअर इज मच मोअर टु लाइफ दॅन जेंडर.
मिलाओ हाथ, अमा! Happy

>>> टायटॅनिक मधली केट - इथून सुरू झाल्यामुळे लेखात साहजिकपणे लगेचच ओढला गेलो
क्लिकबेट - किंवा क्लिककेट म्हणू. Lol

>>> पुरूषप्रधान जगात स्त्रीला "पुरूषांसारखे" व्हावे लागते ही स्त्री पुरूष समानतेच्या वाटचालीतली सर्वात मोठी शोकांतिका आहे
मला हे कदाचित कळलं नाही, कारण जो अर्थ लागला तो पटला नाही.
आपण 'हे पुरुषांसारखं / ते स्त्रियांसारखं' असं म्हणताना स्टीरिओटाइप्सना खतपाणी तर घालत नाही ना?

>>> स्त्रीला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम (स्पर्धा) करायची गरज कधीच नव्हती.....
मोटिव्हेशनल वाक्य म्हणून ठीक आहे, पण आयुष्य ही स्पर्धा नाही आणि पुरूष हे प्रतिस्पर्धी नाहीत असं आपलं मला वाटतं.
'पुरुषांइतकं' किंवा 'पुरुषांपेक्षा' मोठं होऊन दाखवणं हे काही माझ्या आयुष्याचं ध्येय किंवा परिपूर्ती असू शकत नाही. Happy

>>> मला स्वतःला हा लेख अजून 2 परिच्छेद मोठा झाला असता तरी आवडलं असतं
मलाही! काल गडबडीत (प्रामाणिकपणे सांगायचं तर तिरिमिरीत Proud ) लिहिला. हाताला वेळ झाला तर/की थोडं विस्ताराने लिहायचा प्रयत्न करते. Happy

Pages