कुमारी चैककन्या च किशोरी युवती यतिः|
अप्रौढा चैव प्रौढा च वृद्धमाता बलप्रदा ।
महोदरी मुक्तकेशी घोररुपा महाबला ॥
.
स्त्रीची अनेक रुपे आहेत कुमारी, कन्या, किशोरी, युवती, अप्रौढा, प्रौढा, वृद्धा. पैकी मला 'क्रोन' किंवा वृद्धा हे रुप सर्वात जास्त आकर्षित करते. अं हं वय वाढल्यामुळेच फक्त नाही. ते एक कारण आहेच परंतु समाजाने दुर्लक्षिलेले, आणि सर्वाधिक निरुपयोगी आणि नॉनग्लॅमरस समजला जाणारा असा हा टप्पा कसा असेल याची उत्कंठा मला स्वस्थ बसू देत नाही. आपल्याकडेही नवदुर्गांमध्ये 'कालरात्री' ही क्रोनच म्हणजे वृद्धाच दाखवलेली आहे. क्रोनचा संबंध क्राऊन म्हणजे मुकुटाशीसुद्धा लावला जातो. निसर्गाने, नियतीने, स्त्रीला चढविलेला मानाचा, अनुभवाचा मुकुट. युवती, माता आदि रुपांना ग्लॅमर आहे, भविष्य आहे. आई हे रुप तर पवित्रच मानले गेलेले आहे. पण व्हॉट अबाऊट सुरकुतलेली वृद्धा, म्हातारी स्त्री, वयस्क बाई? कसे आहे हे रुप?
.
आपण पहातो - वृद्धा या ट्प्प्यावरील स्त्रियांची दखल म्हणावी तितकी घेतली जात नाही, त्यांच्याकडे समाज निखळ दुर्लक्षच करतो. 'तारुण्य' या संकल्पनेने ऑब्सेस असलेला समाज नाइलाजास्तव, स्त्रीच्या 'वृद्धत्वाच्या' ट्प्प्याला मान्य करतो - असे वाटावे अशी परिस्थिती आहे. आता या विधानाला आधार काय? तर रस्त्यातून , काठी टेकत टेकत, खुरडत चालणारी एखादी वृद्ध स्त्री घ्या - किती लोकं हॉर्न वाजवतात, त्याहून जास्त लोकं 'आपल्याला, उशीर करते' म्हणुन मनातल्या मनात चरफडतात. नोकरीच्या क्षेत्रातही, एजिझम म्हणजे वय वाढल्याने केला जाणारा अन्याय, भेदभाव ठळक जाणवतो. सुझन सॉन्टॅग यांच्या एका निबंधात त्यांनी 'humiliating process of gradual sexual disqualification' याबद्दल मत मांडलेले आहे. समाजाच्या या वृत्तीतून आलेले डेस्परेशन हे स्त्रियांत - कलप लावून पांढरे केस लपविणे, वजन आटोक्यातच नाही तर स्वतःला शिडशिडीत ठेवण्याचा अट्टाहास त्यातून आलेल फॅड डाएटस, कपड्यांची काळजीपूर्वक निवड आदि गोष्टींतून जाणवु लागते. बरेचदा 'वाढते वय' नाकारले जाते. आपणही सहज म्हणुन जातो - " असे कपडे शोभत नाही हो. जरा तरी वयाची बूज राखावी माणसाने." का बरं समाज स्त्रीमधील बदल स्वीकारु शकत नाही. असा एखादा दिवस असतो का की स्त्रियांना उपरती होते - आजपासून लाल, केशरी, गुलाबी कपडे घालायचेच नाही बरं का, पेस्टल अणि सफेद किंवा काळाच रंग वापरायचा? लिप्स्टिकही अगदी हलकी लावायची. का म्हणुन हा बदल स्त्रियांनी अंमलात आणायचा, स्वीकारायचा? का नाही आपण वृद्ध किंवा पोस्ट मेनॉपॉझल स्त्रियांना आकर्षक अगदी तडक भडक कपड्यात स्वीकारु शकत? का कुजबूज केली जाते, त्यांना विचित्र कटाक्ष दिले जातात, रोखून पाहीले जाते, त्यांना पोच नाही असे समजले जाते एकंदर हास्यास्पद मानले जाते . या सर्व गोष्टी समाजाचा आरसा आहेत. 'बुड्ढी घोडी लाल लगाम' अशासारख्या म्हणी काय दर्शवितात? त्यातून मग ‘Embracing your age’ आदि वाक्प्रचार आणि संकल्पना निघतात त्या फक्त स्त्रियांच्या संदर्भात.
.
खरं तर हा टप्पा असतो अनुभवामधुन आलेल्या शहाणपणाचा. या वयात बरेच कष्ट झेललेले असतात - मग ते शारीरीक असो किंवा मानसिक आंदुळण्यातून झालेला त्रास. तसेच आनंद, प्रेमाचे चढ-उतार, यश अशा सकारात्मक, नकारात्मक अनुभवांतूनही स्त्री 'माधवी/ वारुणी' बनलेली असते. तिच्यात प्रगल्भता आलेली असते. समाजाला, आसपासच्या लोकांना, घरादाराला देण्यासारखे खूप काही कमावलेले, असते. बरेचदा आत्मपरीक्षण, आयुष्यासंबंधी, चिंतन झालेले असते. मोकळा वेळ असतो, उर्जा असते, कल सुद्धा असतो आणि कोणी ललना या वयात डॉक्टरेट पदवी मिळवते, कोणी नृत्य शिकू लागतात तर कोणी स्वतःचेच अन्य पैलू एक्स्प्लोअर करतात. अनेकजणी नवनविन वाटा चोखाळतात, आतापावेतो वेळ न मिळाल्याने अपूर्ण राहीलेली स्वप्ने, ध्येय पूर्ण करायच्या मार्गावरती अग्रेसर होतात. हे अनुभवांती जीवनास दिले गेलेले, सकारात्मक वळण नाही तर काय आहे.
.
बाह्यरुपाला अवास्तव महत्व देणार्या, झगमगाटाला, ग्लॅमरला भुलून आंतरिक गुणावगुण तसेच मानसिक शक्तीस किंमत न देणारा समाज, स्त्रीच्या या सर्वोत्तम, सर्वाधिक सुंदर अशा रुपाची दखल घेइल अशी आशा करु यात.
लेखन स्पर्धा-१ - स्त्री असणं म्हणजे ..- सामो
Submitted by सामो on 19 September, 2023 - 05:40
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलय.
छान लिहिलय.
सही सामो. शेवटच्या ओळी विशेष
सही सामो. शेवटच्या ओळी विशेष आवडल्या.
खूप छान लेख आहे.
खूप छान लेख आहे.
छान लिहिलं आहे सामो.कदाचित
छान लिहिलं आहे सामो.कदाचित एजिझम चा त्रास मेल्स ना पण होत असावा.सर्व देव, राम कृष्ण इंद्र हे 6 पॅक ऍब्स सहित पोस्टर मध्ये दाखवतात.
'फिट' शरीर, व्हिजिबल सुंदर स्किन, केस याचा संबंध मनात 'ही व्यक्ती मृत्यूपासून बरीच दूर' असा लावला जात असेल.
नेहमीप्रमाणेच छान चिंतनशील
नेहमीप्रमाणेच छान चिंतनशील लेखन.
मला वाटतं वयाच्या साठीनंतर काही स्त्रिया आता आपलं वय झालंय असं ठरवून टाकतात. तर काहींच्या बाबतीत उलट होतं. शारीरिक व्याधी त्रास देत नसतील तर त्यांना आपलं वय झालंय असं वाटत नसावं..
जीवनाला इतका वेग आला आहे की थांबलेल्या माणसासोबत थांबणं शक्य होत नाही.
पण आता वेळ घालवायला, मन रमवायला बऱ्याच गोष्टी आहेत.
हेही नसे थोडके!
शेवटच्या ओळी विशेष आवडल्या.
>>>>>>कदाचित एजिझम चा त्रास
>>>>>>कदाचित एजिझम चा त्रास मेल्स ना पण होत असावा.
होय एजिझमचा त्रास पुरुषांनाही होतो पण समाजात एक समज असाही आहे - 'पुरुष वय वाढतं तसं चांगले दिसत जातात. एज सुटस देम. उदा - शॉन कॉनेरी'
उतार वयात अधिक यशस्वी असल्याने, त्यांना तरुण मुली मिरवायला (फ्लाँट) मिळातात. डेमी मूर - अॅश्तन कचर सारखे प्रकरण एखादेच.
स्त्रियांना जास्त हॉस्टीलिटी चा सामना करावा लागतो- हे नक्की.
शर्मिला, प्राची हपा, मानसी,
शर्मिला, प्राची हपा, मानसी, अनु - आपल्या सर्वांचे खूप आभार.
खूप छान व अंतर्मुख करणारी
खूप छान व अंतर्मुख करणारी मांडणी. स्त्रीत्वाच्या विविध अवस्थांमधला एक दुर्लक्षित पैलू तुम्ही उचलला आहे.
नक्की पहा या लेखाच्या पार्शभूमीवर.
शेवटची सहस्रअनुमोदन.
कालच अशा भोसले यांच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग पाहिले. लता मंगेशकर गेल्यानंतरचा कार्यक्रम.
"नव्वदीला जवळ आली आहे हि व्यक्ती" हे केवळ निसर्गाने वय नावाचे काहीतरी निर्माण केलेय म्हणून म्हणायचे. नाहीतर आशाजींनी वय हा प्रकार जणू कालबाह्यच ठरवला आहे
अतुल खूप आभार.
अतुल खूप आभार.
>>>>>>>कालच अशा भोसले यांच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग पाहिले. लता मंगेशकर गेल्यानंतरचा कार्यक्रम.
शोधते.