फलज्योतिष कशासाठी

Submitted by पशुपत on 11 September, 2023 - 06:58

फल ज्योतिष याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात कुतूहल निश्चितच असते. त्याच्यावर विश्वास असणाऱ्या लोकांमध्ये तर याबद्दल खूप आकर्षण असते .
यासंदर्भात दोन-तीन विचार मला वाचकांसमोर ठेवायचे आहेत आणि त्यावर साधक अशी चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.

पहिली गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की फल ज्योतिष हे निश्चितच शास्त्रीय पद्धतीने भविष्याबद्दल केलेल्या तर्काचे मांडणी आहे. ज्या गोष्टींचा तर्क करण्यासाठी कुठलीही विचारसरणी, विज्ञान, शास्त्र किंवा पूर्वानुभव उपयोगी पडत नाही त्या गोष्टींच्या भविष्याबद्दल तर्क करण्यासाठी ही पद्धती अस्तित्वात आली असावी.
म्हणजे नेमके काय हे सांगण्यासाठी एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
एक विद्यार्थी अतिशय हुशार आहे, परीक्षेसाठी त्याची तयारी पूर्ण झालेली आहे . त्याला आत्मविश्वासही आहे . पण परीक्षेला जाताना नेमकी त्याच्या सायकलला रिक्षाची धडक बसते , तो जायबंदी होतो आणि पेपराला दोन तास उशिरा पोहोचतो आणि एका तासात लिहिता येईल एवढं प्रश्नांची उत्तरे लिहून तो उत्तीर्ण होतो पण जो विद्यार्थी त्या विषयात प्रथम येण्याची क्षमता असलेला आहे तो कसाबसा पास होतो . हे अवास्तव कशामुळे घडले याचे उत्तर विज्ञान पुढील प्रमाणे देईल कि त्याला अपघात झाला, तो उशिरा पोहोचला, त्याने पूर्ण उत्तरे लिहिली नाहीत , वगैरे म्हणून!
पण ह्या मुलाच्या बाबतीतच नेमकं पेपराच्या वेळेलाच असा प्रसंग का घडला हा प्रश्न मानवी मनाला निश्चितच भेडसावणारा आहे . या घटनेकडे पाहण्यासाठी खरे ज्योतिषाचा आधार निश्चित घेता येत असतो.
म्हणजे पत्रिका पाहून कोणीतरी ज्ञानी माणूस हे आधीच सांगू शकतो की या मुलाच्या बाबतीत अशा तऱ्हेच्या घटना घडण्याची शक्यता आहे. हे जर आधीच ठाऊक झाले तर त्या मुलाच्या संदर्भात या घटना टाळण्यासाठी उपाययोजना काही हद्दीपर्यंत निश्चितच करता येतील.
आणखीन एक उदाहरण सांगतो .
जीवनाच्या प्रवासाला निघालेल्या मनुष्याला गाडीत बसल्यावर जर कोणीतरी सांगितलं की अरे मित्रा ही गाडी अशा ठिकाणी जाणार आहे जिथे खूप थंडी आहे , तर तो जाताना त्या थंडीचा सामना करण्यासाठी निश्चितच थोडीशी पूर्वतयारी करू शकतो. जसे की मधल्या कुठल्या स्टेशनवर त्याला शक्य असेल तर उतरून चांगले गरम कपडे, शाल अशा वस्तूंची खरेदी करणे वगैरे .. की ज्यामुळे त्याच्या पुढे येऊ घातलेल्या समस्येला तो चांगल्या रीतीने हाताळू शकेल.
हे उदाहरण शब्दशः न घेता मुद्दा समजावून सांगण्यापुरते घेतले आहे याची जाण ठेवावी.
त्यामुळे ज्योतिष ढोबळपणे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या किंवा चांगल्या गोष्टी यांचं थोडंसं निदान आधीच करू शकत असेल तर त्या दृष्टीने त्या गोष्टी हाताळण्यासाठी त्याकडे बघण्या इतपत सामंजस्य जर माणसाने दाखवलं तर ते शास्त्र निश्चितच उपयोगी ठरेल.

पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की कुठलीही गोष्ट प्रमाणात केली तर ती उपयुक्त असते ! प्रमाणामध्ये सर्व काही असावे.

फलज्योतिष या विषयावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी कृपया कुठलेही प्रतिसाद देऊ नयेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते ज्योतिष हे 'सेल्फ-अवेअर्नेस' टूल(साधन ) आहे. 'फल' ज्योतिषापेक्षा मला ते ललित किंवा क्रिएटिव्ह रायटींग करण्याचे फॉडर म्हणुन आवडते. कारण प्रत्येक राशीत, योग/दॄष्टी आदिंमध्ये 'आर्केटाइप्स' खच्चून भरलेले आहेत.
- कुंडलीतील चवथे घर
- आम्ही सार्‍या चंद्रसख्या
- धनु राशीच्या शुक्रास पत्र
- कन्या रास/ ६ व्या घरातील शुक्र
- ब्युटी द बीस्ट (प्लूटो + ट्रान्स्फॉर्मेशन)
- बुध नेपच्युन‌ जोडी
- चवथ्या घरातील प्लूटो

पशुपत आणि सामो सहमत.

१) हल्लीच्या व्यवहाराचा मुद्दा म्हणजे चरितार्थ कशावर चालणार आणि त्यात कितपत संपत्ती मिळेल. ते ज्योतिष सांगते.
२)परदेश का देशातच?
३)नोकरी, व्यवसाय,दुकानदारी,भागीदारी का स्वतंत्र. यावर चांगला उजेड पडतो.
४) नेतागिरी,राजकारण?
५)सरकारी का विरोधी प्रवृत्ती
६) ज्यांचा आपल्या चांगल्या आणि वाईटावर प्रभाव पडतो परंतू ते प्राक्तन आपल्या हातात नसते अशा लोकांचा विचार -आईवडील,भाऊ बहिण,इतर आप्त, शेजारी,बाहेर वरिष्ठ,कनिष्ठ आणि सहकारी.
हे काही थोडे विचार ज्योतिष सांगते. जिथे प्रयत्न काही कामाचे नसतात तिथे.

बरोबर, अगदी अचूक माहिती जरी नाही मिळणार तरी थोडी शक्यता / दिशा कळली तर त्या माहिती नुसार तयारी करता येऊ शकते..

फलज्योतिष या विषयावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी कृपया कुठलेही प्रतिसाद देऊ नयेत.>>>
इथे चर्चा खुंटते. मी माझ्या फलज्योतिष लेखना वरील प्रतिक्रियांवर अशी बंधने घातली नाहीत. त्यामुळे धागा भरकटण्याचा धोका असतो हे मान्य आहे. पण तिथेही चर्चा झालेली आहे

लज्योतिष या विषयावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी कृपया कुठलेही प्रतिसाद देऊ नयेत.>>>
इथे चर्चा खुंटते>>>>

ज्योतिष विषय विश्वासार्ह की नाही हा धाग्याचा विषय असेल तर दोन्ही बाजू येऊन धुमश्चक्री करता येईल. इथे धाग्याचा विषय ज्योतिष सल्ला बघा व पाऊल उचला असा आहे. इथे ज्योतिष चुक,सल्ला घेणे चुक ही चर्चा अस्थानी आहे. तुमचे ज्योतिषविषयक अनुभव मांडा हेच इथे अभिप्रेत आहे. असासल्ला घेणे चुक का बरोबर असा धागा काढुन तिथे श्रद्धाळु व अश्रद्धाळु मिळुन चर्चा करता येईल

विद्यार्थी परिक्षेला जातांना सायकल -रिक्षा धडक होणे यांतून पत्रिकेत वर्तविलेले " अंदाज " यांचा संबंध लावता येत नाही.
विद्द्यार्थ्याचे चालतांना लक्ष नसेल, रिक्षावाल्याचे समोरच्या रहदारीकडे लक्ष नसेल , ब्रेक लागले नाही यापैकी कुठलेही कारणे धडक बसण्याकरिता कारण ठरलेले असू शकते. अशा अपघाती घटनांत कामाकडे लक्ष नसणे , कुणा एकाचा ( क्वचित अनेकांचा) हलगर्जीपणा हेच कारण असते. याठिकाणी, कामाकडे लक्ष दिले असते तर धडक १०० % टाळता आली असती.

( रिक्षा चालकाचे किंवा विद्यार्थ्याचे किंवा दोघांचेहे लक्ष नसेल तर ) परिक्षा संपवून परत येतांनाही धडक बसण्याची शक्यता आहे - मग भलेही पत्रिकेत काहीही अंदाज वर्तवलेले असू देत.

<< म्हणजे पत्रिका पाहून कोणीतरी ज्ञानी माणूस हे आधीच सांगू शकतो की या मुलाच्या बाबतीत अशा तऱ्हेच्या घटना घडण्याची शक्यता आहे. हे जर आधीच ठाऊक झाले तर त्या मुलाच्या संदर्भात या घटना टाळण्यासाठी उपाययोजना काही हद्दीपर्यंत निश्चितच करता येतील. >>

----- पत्रिका पाहून असे वर्तवलेले अंदाज खरे ठरतात याला कुठलाही पुरावा नाही. केवळ अंदाज आहेत, स्टॅटिस्टीक बघितले तर अंदाजांपैकी काही खरे ठरणारच असतात.

काल दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली, अनेक निष्पाप लोक दगावले. सरकारी आकडा केवळ १८ सांगतो. त्याआधी कुंभमेळ्यांत अनेक लोक चेंगराचेंगरीत गेले. हे अपघांत होणार आहे हे आधीच ठाऊक झाले असते तर सरकारनी घटना टाळण्यासाठी उपाययोज केली असती. आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट याप्रमाणे पत्रिका तयार करणे बंधनकारक केले असते.

सामो , तुमचा दृष्टिकोन बरोबर आहे...
उदय , तीच तर खरी मेख आहे ना. तशा विचित्र~ वेगळ्यावेगळ्या खूप शक्यता आहेत , पण नेमकी त्यातली एकच घटना एखाद्याच्या बाबतीत, कुठल्यातरी एखाद्याच वेळेला घडत असते.. मुद्दा असा आहे की त्या व्यक्तीच्या जीवनात तशा तऱ्हेचा योगायोग घडण्याची शक्यता जास्ती असेल तर त्याप्रमाणे आधी कळल्यास तो कायमच सतर्क राहून ते टाळण्याचा प्रयत्न करू शकेल..
(सामो सुद्धा तेच सांगताहेत..)

<< इथे धाग्याचा विषय ज्योतिष सल्ला बघा व पाऊल उचला असा आहे. >>

<< मुद्दा असा आहे की त्या व्यक्तीच्या जीवनात तशा तऱ्हेचा योगायोग घडण्याची शक्यता जास्ती असेल तर त्याप्रमाणे आधी कळल्यास तो कायमच सतर्क राहून.... >>

मुद्दा हा आहे की कुठलीही घटना/भविष्य खात्रीशीरपणे आधी कळण्यासाठी ज्योतिष्य कुचकामी आहे आणि तरीही लोक या भंपकपणावर (अंध)विश्वास ठेऊन मूर्ख बनतात. आक्षेप त्यालाच आहे. तुम्ही हा धागा "विनोदी लेख" भागात हलवला आणि डिस्क्लेमर लिहिलेत की हा धागा मनोरंजनासाठी आहे, तर मग काही हरकत नाही.

>>>>फल ज्योतिष याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात कुतूहल निश्चितच असते. त्याच्यावर विश्वास असणाऱ्या लोकांमध्ये तर याबद्दल खूप आकर्षण असते
यासंदर्भात दोन-तीन विचार मला वाचकांसमोर ठेवायचे आहेत आणि त्यावर साधक अशी चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.>>>
<< इथे धाग्याचा विषय ज्योतिष सल्ला बघा व पाऊल उचला असा आहे. >>

वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे ज्योतिषकीय निकषांवर पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली. फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग आहे त्याला आधुनिक विज्ञानाच्या निकषांचा आधार नाही. पण जवळपास ९० टक्के लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात असे आढळून आले आहे. एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट 'भाग्य` दिवाळी ९७ च्या अंकात म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रांजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही."
मग विवाहासारखा आयुष्यातील एक मोठा निर्णय घेताना वधूवरांची व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक आहेत की नाहीत हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे कसे ठरवायचे? विवाहपूर्व वैद्यकीय तपासणी करुन काही शारिरिक बाबी समजू शकतात पण मानसिक पिंड/ प्रकृती समजण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांची मदत होउ शकते. वैवाहिक आयुष्याचा दीर्घ काळ असलेल्या टप्प्यात व्यक्तिमत्वांमधे बदल होणे ही स्वाभाविक असते. ते बदल जर परस्परांना पूरक राहिले नाहीत तर मग सहजीवन अवघड बनत जाते. मग गुणमेलनाला सक्षम पर्याय म्हणुन वधूवरांसाठी / विवाहेच्छुक स्त्री पुरुषांसाठी कोणती मानसशास्त्रीय चाचणी विकसित करावी? अशा प्रश्नांवर मला सामाजिक जाणीवा असलेल्या मानसतज्ञांची वेळोवेळी मदत हवी आहे. मानसतज्ञ म्हणजे मुख्यत्वे कौन्सिलर, सायकॉलॉजिस्ट व सायकियाट्रिस्ट, मानसशास्त्राचे प्राध्यापक.

प्रकाश तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणलात .
या संदर्भामध्ये दोघांची एकमेकांबरोबर जमवून घेण्याची मानसिकता ही जास्ती प्रबळ ठरते का वैयक्तिक इगो या जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीला मागे सारतो, यावर नवरा बायकोचे जमेल किंवा नाही हे ठरते !
यातही दोघांच्या स्वभावाचे आकलन आणि ते स्वीकारण्याची मानसिकता सतत जागृत ठेवण्याची जाणीव ही विविध मार्गाने मिळवता येईल. किती गुण जुळतात हे पडताळून पाहणे हा त्याचा एक भाग असू शकतो !

भविष्यात काय होईल, माझ्या वाट्याला काय येईल, काय प्रतिकूल घडु शकते ते कसे टाळता येईल, किंवा त्याचा सामना करण्यास तयारी करता येईल, याची उत्सुकता ते काळजी बहुतेकांना असते.
फलजोतिष्य अथवा इतर कुठलेही शास्त्र/विज्ञान/तंत्र एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात भविष्यात काय होईल हे आजघडीला सांगु शकत नाही, तथ्यपूर्ण शक्यताही वर्तवु शकत नाही. (Predictive analytics/science हे वेगळे विषय आहेत.)
जोडीदार निवडायला किंवा अजुन कशासाठी विज्ञानाने (अथवा अजुन कुठल्याही शास्त्राने) काहीतरी करायला हवे ही त्यात अमुक अमुक सांगावे ही केवळ एक विश लिस्ट झाली. हळूहळू जशा डेव्हलपमेंट्स होतील तसे या क्षेत्रात काही टेक्निक्स डेव्हलप होतीलही. पण तो पर्यंत त्याला फलज्योतिष हा पर्याय आहे असे म्हणता येणार नाही. त्यावर विश्वास ठेवणारे त्याचा करतील वापर ही गोष्ट वेगळी. एखादा गोष्ट करावी किंवा करू नये यासाठी योग्य मार्गदर्शिका नाही म्हणुन मी काटा/छापा करून ठरवतो ते माझ्या समाधानासाठी. काटा/छापा करण्याने मार्गदर्शन मिळते असे मात्र नाही.

"ज्याच्या प्राक्तनात जे आहे तेच होणार", "कुठलीही गोष्ट जेव्हा व्हायची आहे तेव्हाच होते, आधीही होत नाही नंतरही होत नाही" ही भारी वाटणारी, भूल पाडणारी पण अशास्त्रीय / अवैज्ञानिक विधाने आहेत. कारण यावर विश्वास ठेवणारी मंडळी जे काही होईल ते प्राक्तनात होते म्हणून झाले आणि जे काही नाही झाले ते नव्हते म्हणुन नाही झाले म्हणणार. कुठलीही गोष्ट जेव्हा होईल तेव्हा पहा जेव्हा व्हायची तेव्हाच झाली म्हणणार. ही विधाने falsifiable नाहीत हे आधी लक्षात घेतले पाहिजे. अशा विधानावर आधारीत केलेल्या दाव्यांना (आम्ही ते बदलू शकत नाही, पण त्याची पूर्वकल्पना देऊन त्याचा सामना करण्यास मदत करू शकतो वगैरे) काय अर्थ आहे हे ज्याने त्याने ठरवावे.

ही विधाने falsifiable नाहीत हे आधी लक्षात घेतले पाहिजे.>>>>>?
मानव तुम्हाला काय म्हणायचे आहे? मानव आता मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो.
" मानव, तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही दुसर्यांसाठी खूप कष्ट करता. पण त्याचे लोकांना कवतिक नाही. त्याचे चीज होत नाही. तुमच्या मुळे तुमचे ऑफिस चालते आहे. पण प्रमोशन मात्र दुसऱ्यांचे होते. ... पुढच्या सहा महिन्यात मात्र काही आश्चर्य कारक घटना घडतील व हे चित्र बदलेल. रवी चौथ्या घरातून भाग्यस्थानी प्रवेश करेल... एक प्रभावी व्यक्तिमत्व तुमच्या मदतीला धावून येणार आहे.
नेहमी पांढरे वस्त्र, फुले आणि चपला वापरा. आणि मारुती रायाचे स्त्रोत्र पठण चालू ठेवा. इति शुभम भवतु."
काय बरोबर सांगितले की नाही? ह्या सालचे पूर्ण भविष्य मागवून घ्या. किंमत केवळ...
जेव्हा big bang झाली तेव्हाच आपल्या सर्वांचे भविष्य ठरवले गेले आहे.

" मानव, तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही दुसर्यांसाठी खूप कष्ट करता. पण त्याचे लोकांना कवतिक नाही. त्याचे चीज होत नाही. तुमच्या मुळे तुमचे ऑफिस चालते आहे. पण प्रमोशन मात्र दुसऱ्यांचे होते. ... पुढच्या सहा महिन्यात मात्र काही आश्चर्य कारक घटना घडतील व हे चित्र बदलेल. रवी चौथ्या घरातून भाग्यस्थानी प्रवेश करेल... एक प्रभावी व्यक्तिमत्व तुमच्या मदतीला धावून येणार आहे.
नेहमी पांढरे वस्त्र, फुले आणि चपला वापरा. आणि मारुती रायाचे स्त्रोत्र पठण चालू ठेवा. इति शुभम भवतु.">>>>
केकू Lol

सहा महिने झाल्यावरही प्रमोशन नाही. Sad
"प्रयत्न कमी पडलेत... मनापासून केले असते तर परिणाम दिसायलाच हवे होते. स्पष्टच सांगितले आहे. तुम्ही पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करा...
( वर बघत ) देणारा द्यायला बसलाच आहे, पण तो कुणाला देणार बापडा? प्रयत्न करणार्‍यालाच ना ? चला आता पुन्हा नव्या दमाने प्रयत्न करायचा. "

काही क्षणानंतर,
"एक थोडा बदल सुचवितो, चामड्याच्या चपला वापरणे टाळा.
आता मागच्याच महिन्यात प्रमोशन मिळालेले गणपतराव यांनी माझ्या सल्ल्यानुसार उपाययोजना केली होती. तुम्ही येण्याच्या अगोदरच ते आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. काम झाल्यावर लोक विसरुन जातात, पण गणपतराव आम्हाला विसरले नाही. प्रमोशन मिळाल्यावर पहिल्या पगार वाढीत फूल ना फुलाची पाकळी भेट म्हणून दिली ( समोर ठेवलेल्या कोर्‍या करकरित पाकिटावर एक स्वप्नाळू नजर ). आम्ही काहीही मागत नसतो , गरजही नाही, त्याने जे दिले आहे त्यातच आनंदी आहोत. आता लोक त्यांच्या इच्छे नुसार जेव्हा देतात त्यावेळी त्यांना नाही म्हणणे पण तत्वात बसत नाही. "

केशवकूल - " तुमच्या घरांत आधीच्या पिढीमधे कुणाला गुडघ्याचा आजार होता का? तसे स्पष्ट लिहीलेले दिसत आहे. "
" आठवा... आठवा... आजी ? आजोबा ? काका ? मावशी ? मामा ? "
तुमचे उत्तर काहीही असले तरी माझे उपायांचे दोन मोठे पॅरा तयार आहेत. आम्ही डिजीटल करन्सी स्विकारतो. Happy

>>फलजोतिष्य अथवा इतर कुठलेही शास्त्र/विज्ञान/तंत्र एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात भविष्यात काय होईल हे आजघडीला सांगु शकत नाही, तथ्यपूर्ण शक्यताही वर्तवु शकत नाही. (Predictive analytics/science हे वेगळे विषय आहेत.)<<
प्रिडिक्टिव अ‍ॅनलिटिक्स हे वेगळे विषय कसे आहेत किंवा ते काय आहे, हे जरा समजावुन सांगा...

फलज्योतिष एका इव्हेंट (जन्म) वेळी ग्रहांची काय परिस्थिती होती यावरून त्या मनुष्याच्या भविष्यात काय घडु शकते हे कळते याचा दावा करते.

प्रेडीक्टिव्ह ऍनॅलिटिक्स हे एक अशा कुठल्या एका पर्टीक्युलर इव्हेंटवेळेच्या डेटावर पुढले सगळे प्रेडिक्शन्स करत नाही. सतत मॉनिटरिंग करून ह्युज डेटाबेस ऍनालाईज करत, त्यातील पॅटर्न्स शोधुन प्रेडीक्शन करते.
व्यक्तींच्या भविष्यासाठी प्रेडीक्टिव्ह ऍनॅलिटीक्स वापरायचे म्हटले तर जन्मापासुन पुढे जेवढा डेटा मिळेल - जनुके, बर्थ डिफेक्ट्स (असल्यास) आर्थिक-सामाजिक स्थिती, वैयक्तिक आवडी निवडी, कल, स्वभाव, त्याच्या जीवनात घडत जाणाऱ्या मुख्य घटना, होणारे आजार - इन्फेक्शन इत्यादि इत्यादि (आणि असा इतर लोकांचा मोठा हिस्टोरीकल डेटाबेस) यावरून काही प्रेडिक्शन्स करू शकेल.
प्रेडिक्टिव्ह ऍनालिटिक्स माझा विषय नाही पण एक त्याची ढोबळ कल्पना आहे. फलज्योतिष विषय आला की अनेकजण त्याची प्रेडीक्टिव्ह ऍनॅलिटिक्सशी तुलना करून त्यात तथ्य आहे असे सांगतात. असा काहीतरी डेटा गोळा करून प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न पूर्वी झाला असेल. पण एका इव्हेंटवर आधारित नऊ ग्रहांच्या स्थितीचा डेटा आणि हिस्ट डेटाबेस तोकडा तेव्हा यावरून त्याची मर्यादा लक्ष्यात यावी.

तुमचे उत्तर काहीही असले तरी माझे उपायांचे दोन मोठे पॅरा तयार आहेत. आम्ही डिजीटल करन्सी स्विकारतो. >> Biggrin Rofl

>>फलज्योतिष एका इव्हेंट (जन्म) वेळी ग्रहांची काय परिस्थिती होती यावरून त्या मनुष्याच्या भविष्यात काय घडु शकते हे कळते याचा दावा करते.<<
काय परिस्थिती होती हे कसं कळतं बुवा? त्यामागे डेटा, ठोकताळे (आताच्या भाषेत अ‍ॅल्गरिथम?) इ. असतात का? डेटा/अ‍ॅल्गरिथम इन्कंप्लीट/फॉल्टी असु शकतो, पण प्रोसेस महत्वाची..

बाय्दवे, फलज्योतिष सोडा, आज कंप्युटरच्या मदतीने १०-१५ हजार वर्षांपुर्वि एखाद्या घटने दरम्यान ग्रहस्थिती कशी होती हे समजु शकते. आता हा डेटा कुठे स्टोर केला आहे का, तर नाहि. त्यामागे गणित आहे..

>>...यावरून काही प्रेडिक्शन्स करू शकेल..<<
एक्झॅक्टली. तेच तर ढोबळमानाने फल्ज्योतिष करते, उपल्ब्ध डेटा+ठोकताळ्याच्या आधारे.. बघा काय साम्य आढळतंय का...

जन्मावेळी ग्रहांची परिस्थिती ऐवजी स्थिती (position) हवे.
या एका इव्हेंटवर आधारीत पुढले सगळे भविष्य.

आणि मी म्हणतोय एखादी व्यक्ती माझ्याबाबत काही प्रेडीक्टिक्शन करा म्हणण्यास आली असता "जनुके, बर्थ डिफेक्ट्स (असल्यास) आर्थिक-सामाजिक स्थिती, वैयक्तिक आवडी निवडी, कल, स्वभाव, त्याच्या जीवनात घडत जाणाऱ्या मुख्य घटना, होणारे आजार - इन्फेक्शन इत्यादि इत्यादि" असा डेटा घेऊन त्या व्यक्तीबाबत काही प्रेडिक्शन करता येणे. (उदा: क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता, किंवा कुठले क्षेत्र टाळलेले उत्तम, आरोग्याच्या काय समस्या उद्भवू शकतात, लाईफ एक्स्पेक्टन्सी इ.) दोन्हीत मला साम्य वाटत नाही.
केवळ नाडीपरीक्षा करून सगळे रोग निदान, आणि दुसरे रुग्णाची हिस्टरी, सध्याचे सिम्पटम्स, रक्तचाचणी, फॅमिली हिस्टरी, इतर आवश्यक त्या चाचण्या यावरून ज्ञात रोगांचे निदान यात साम्य वाटत नाही तसेच ते.

कॉम्प्युटरच्या साहाय्याने दहा पंधरा हजार वर्षांपूर्वी पर्यंत एखाद्या वेळी ग्रहांची काय स्थिती होती हे झटक्यात माहीत होणे आणि फलज्योतिष याचा काय संबंध? (त्यांना कुंडली मांडण्यास त्यावेळी ग्रहांची स्थिती हवी असते ती स्वतः गणित मांडत बसण्यापक्षा आता चुटकीसरशी मिळते एवढा भाग वगळता.)

ज्योतिष हा विषय काही जणांचा अभ्यासाचा, काहीसाठी टिंगलीचा असतो. प्रत्येकाचे आपापले अनुभव/ ठोकताळे असतात

एक गमतीशीर अनुभव, हा फलज्योतिष शी संबंधित आहे की नाही माहित नाही.. पण वरील चर्चेवरून आठवला

पदवीधर झाल्यानंतरचा लगेच चा काळ, नोकरी साठी पायपिट चालू होती. एकंदर स्ट्रगल च काळ..
एक आजोबा होते, एकदा त्यांच्या कडे आमचा पूर्ण ग्रुप गेला.
त्यांनी आमचे हात बघितले, आणि काहीतरी नंबर पकडायला सांगितला असावा.

एकीला सांगितलं तुझा करीअर उत्तम असेल.. शेवटपर्यंत नोकरी करशील वगैरे वगैरे
दुसरीला सांगितलं तुझं करिअर किंवा नोकरी अस काही विशेष दिसत नाही .. थोडक्यात गृहिणी होशील वगैरे...

झालं. आम्ही बाहेर पडल्यावर खो खो हसायला लागलो,

कारण जिल्हा सांगितलं नोकरी / करिअर करशील तिच्या घरचे तिच्यासाठी जोरदार वर्षांशोधन करत होते... आणि त्याच्या समाजात / कुटुंबात नोकरी वगैरे करण्याचे प्रघात नव्हते.
उलट जिल्हा सांगितलं तू करिअर करणार नाहीस, तिच्यासाठी आयुष्य म्हणजे करिअर अस सरळ समीकरण होतं.

पण नंतर अशी काही चक्र फिरली की जिला कायम नोकरी करशील सांगितलेलं ती खूप मोठ्या हुद्द्यावर अतिशय जोखमीच काम करते आहे.

आणि दुसरीला काही कारणांनी करियर बासनात गुंडाळून मुलांची/ घराची जबाबदारी घ्यायला लागली.

आम्ही कधीही भेटलो तर ते आजोबा त्यांची भविष्यवाणी आणि त्या वयात केलेली त्यांची टिंगल/ मस्करी सगळ्यांनाच आठवते..

ज्योतिष हा विषय काही जणांचा अभ्यासाचा, काहीसाठी टिंगलीचा असतो. प्रत्येकाचे आपापले अनुभव/ ठोकताळे असतात

एक गमतीशीर अनुभव, हा फलज्योतिष शी संबंधित आहे की नाही माहित नाही.. पण वरील चर्चेवरून आठवला

पदवीधर झाल्यानंतरचा लगेच चा काळ, नोकरी साठी पायपिट चालू होती. एकंदर स्ट्रगल च काळ..
एक आजोबा होते, एकदा त्यांच्या कडे आमचा पूर्ण ग्रुप गेला.
त्यांनी आमचे हात बघितले, आणि काहीतरी नंबर पकडायला सांगितला असावा.

एकीला सांगितलं तुझा करीअर उत्तम असेल.. शेवटपर्यंत नोकरी करशील वगैरे वगैरे
दुसरीला सांगितलं तुझं करिअर किंवा नोकरी अस काही विशेष दिसत नाही .. थोडक्यात गृहिणी होशील वगैरे...

झालं. आम्ही बाहेर पडल्यावर खो खो हसायला लागलो,

कारण जिल्हा सांगितलं नोकरी / करिअर करशील तिच्या घरचे तिच्यासाठी जोरदार वर्षांशोधन करत होते... आणि त्याच्या समाजात / कुटुंबात नोकरी वगैरे करण्याचे प्रघात नव्हते.
उलट जिल्हा सांगितलं तू करिअर करणार नाहीस, तिच्यासाठी आयुष्य म्हणजे करिअर अस सरळ समीकरण होतं.

पण नंतर अशी काही चक्र फिरली की जिला कायम नोकरी करशील सांगितलेलं ती खूप मोठ्या हुद्द्यावर अतिशय जोखमीच काम करते आहे.

आणि दुसरीला काही कारणांनी करियर बासनात गुंडाळून मुलांची/ घराची जबाबदारी घ्यायला लागली.

आम्ही कधीही भेटलो तर ते आजोबा त्यांची भविष्यवाणी आणि त्या वयात केलेली त्यांची टिंगल/ मस्करी सगळ्यांनाच आठवते..

गणित या विषयात प्रॉबॅबिलिटी किंवा गेम थेअरी नावाचे खूप महत्त्वाचे विषय आहेत. या शास्त्रामध्ये कुठलीही गोष्ट घडण्याच्या शक्यतेविषयी जाणून घेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यातही पुढच्या वेळेला असेच घडेल असे निश्चित सांगता येत नाही पण असे घडण्याची शक्यता किती आहे हे ते सांगू शकते आणि ते खूप अंशी ऍक्युरेट पण असते .
हीच विचार करण्याची पद्धत जर आपण फलज्योतिषशास्त्रा बद्दल मांडायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये साधर्म्य असे आहे की विविध ग्रहांच्या एकमेकांच्या संगतीतून कुठल्या शक्यता निर्माण होतात याचा स्टॅटिस्टिक्स नुसार शक्यतेचा ठोकताळा बांधला गेला असू शकतो! त्यामुळे हे दोन ग्रह अशा अशा स्थितीत असताना असं घडण्याची शक्यता असते , त्यामुळे इतके वेळा असे घडले आहे म्हणून परत घडण्याची शक्यता इतके परसेंट आहे हे निश्चित सांगता येईल. मात्र याच्यात परम्टेयूशन आणि कॉम्बिनेशन्स अगणित असल्यामुळे ऍक्युरेट भाकीत करणं तितकंच अवघड निश्चित होत जातं. आणि त्यामुळेच शक्यता वर्तवण्यात चुका घडल्यास त्या शास्त्रावरचा विश्वास कमी होत जातो.

Pages