घर

Submitted by सामो on 6 September, 2023 - 11:41

एप्रिलमध्ये जुने घर सोडून नव्या घरी रहावयास आलो. जुन्या घराने इतका जीव लावला होता की, जणू काही जीवाभावाच्या मैत्राला सोडून आल्यासारखे वाटले. त्या घराला जीव लागण्याच्या अनेक कारणापैकी एक कारण म्हणजे चवदाव्या मजल्यावरच्या, या घराच्या बाल्कनीमधुन दिसणारा सताड अगदी क्षितिजापर्यंत जाणारा रस्ता. अगदी 'वॉल्ट व्हिटमनच्या' सॉन्ग ऑफ द ओपन रोड' या कवितेतील रस्त्यासारखा. अक्षरक्षः तसाच -
Afoot and light-hearted I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me leading wherever I choose.

जरा खाली उतरले की पाय फुटेल तिकडे जावे आणि गर्दीमधील एकांत उपभोगावा असे आमचे लोकेशन होते. गावाच्या बरोब्बर केंद्रस्थानी. जिकडे जाउ तिकडे रोमांचक दुकाने. कुठे नाना दगड, स्फटिक, खडे विकणारी दुकाने, कुठे पुस्तकांची दुकाने तर कुठे बागा, कुठे स्टारबक्स सारखे जगप्रसिद्ध कॅफे, तर कुठे स्थानिक टुमदार कॅफे, पिझ्झा रेस्टॉरंटस. बरं फक्त फेरफटका मारायचा असेल तर दहा पावलांवरती हडसन नदीचा किनारा. लांबच लांब पसरलेला. १०,०००-१५,००० पावले काठाकाठाने, सहज चालता येइल असा. उन्हाळ्यात, हेमंतात, या नदीवर उतरलेले गीझ, त्यांची पिल्ले. तर नाताळात किनार्‍यावरील मॉल मध्ये केलेली भव्य आणि अतिशय सुंदर, रंगीबेरंगी रोषणाई. हा सगळा जंतर मंतर सोडून कुठे दुसरीकडे जावयास माझ्या मनाची अजिबात तयारी होत नव्हती. अगदी दोन पावलांवरती गावचे वाचनालय. जुन्या घराने खरच भरभरुन दिले. जाता जाता म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी नवर्‍याने लिहीलेला लेख एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला, ते जर्नल पोस्ट पेटीत, येउन पडले होते जे आम्ही घेतले व त्या घराला फॉरेव्हर म्हणजे अगदी कायमचा रामराम ठोकला. जाता जाताही घराने आशीर्वादच दिले. अर्थात नवर्‍याच्या जागलेल्या रात्रीच्या रात्री आणि मेहनत होतीच.
.
पण 'अन्नासाठी फिरविशी दाही दिशा' या उक्तीनुसार घर तर सोडावेच लागणार होते. नव्या घरात आलो खरे पण हे घर फारच वेगळे वाटले. एक तर शांत शांत. घरासमोरच 'ब्रह्मकुमारी लोकांचे ग्लोबल हार्मनी टेंपल', अक्षरक्षः दहा पावलांवरती त्या गावतील मोठ्ठे मेडिटेशन सेंटर. बसेसची मस्त सोय असल्यामुळे, अमेरीकेमधील सर्वात जुन्या गणपतीच्या देवळात जायला अक्षरक्षः बसची फक्त अर्ध्या तासाची जर्नी. ट्राफिकच्या फास्ट लेनमधुन एकदम एक्झिट घेउन कंट्री रोड ला लागल्यासारखे झाले. पहीले काही दिवस जरा चुकचुकल्यासारखे वाटले खरे. पण हळूहळू फायदेही दिसू लागले. आसपास दुकाने फार नसल्यामुळे, अचानक होणार्या, अनप्लॅनड खर्चांवरही नियंत्रण आले. आसपास, पायी फिरण्याकरता बागा सापडल्या. इथेसुद्धा अगदी घराजवळ वाचनालय सापडले. घर मोठे असल्यामुळे, अनेक रोपे आणली गेली - स्नेक प्लँट, तुळस, फुलांची रोपे, बांबूची रोपे. घर एकदम हिरवे गार होउन गेले. भरपूर खिडक्या असल्यामुळे, सूर्यप्रकाश व हवा खूप लाभली. हळूहळू घराशी गट्टी होत गेली. माबोवरच्या एका मैत्रिणीशी गाठभेट झाली. काही कारणांनी, मुलगीही आमच्याकडेच रहायला आल्याने, तिचा सहवास लाभू लागला. एकंदर झाला तो बदल स्वागतार्हच होता. पण अजुनही २ ट्रेन्स करुन, जाउन, जुन्या घरापाशी रेंगाळणे काही कमी होत नाही.
.
लहानपणी एका ज्योतिषाने हात पाहून सांगीतलेले की खूप घरे फिरणार ही. ते तंतोतंत खरे घडले. विवाहोपरांत गृहप्रवेश केलेले आमचे मुंबईचे घर, ज्या घरात माझी मुलगी रांगायला शिकली, 'एक पाय नाचीव रे गोविंदा, घागरीच्या छंदा' करत दुडूदुडू चालायला शिकली. तर एक घर जिथे ती लहानाची मोठी झाली. एक घर जिथे तिचे टीनेज गेले, एक घर असेही होते जिथे माझे आजारपण गेले, त्या घराचे तर फक्त भकास पांढरे फट्ट छतच आठवते आणि बाहेर सिकाडा किटकांच्या पायांचा होणारा भेसूर आवाज. तर आता हे घर - न जाणो माझा गुणाचा जावई इथे या घरातच आम्हाला भेटायला पहील्यांदा येइल. यु नेव्हर नेव्हर नो. अजुन तरी कशातच काही नाही. पण मनात मांडे रचायला काय हरकत आहे. सगळी शेखचिल्लीची स्वप्ने. माझी खात्री आहे - खूप काही मस्त मस्त हे घर पाहीलही. आमेन!! किती तरी आठवणी घराच्या चार भिंतीत बहरलेल्या असतात. आपल्या सुखदु:खाच्या क्षणांचा घर हे साक्षी असते. खरोखर वास्तू जागती, असते. आणि माझी खात्री आहे वास्तुपुरुष हा तथास्तु म्हणत असतो. तेव्हा वास्तूत, नेहमी शुभ बोलावे, शुभ विचार करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
शेवटचे वाक्य लाख मोलाचे आणि ते फक्त वास्तु पुरता मर्यादित न ठेवता समग्र जीवनात प्रत्येक क्षणी अंगिकारणे अधिक उपयोगी पड़ते. हल्ली बरेचदा नेमके उलट घडते आणि दुसऱ्याचे अहित चिंतण्याच्या वृत्तीने प्रभावलय दुषित होतच राहते आणि वैखरीने दोष मात्र कर्मापेक्षा दैवाला दिला जातो ही शोकांतिका !!

गावी घरी देवघराच्या जवळ जमीनीवर एक टेंगूळ असल्यासारखा उंचवटा होता. तिथे फूल वाहायला लागायच. तिथे वास्तुपुरुष असतो असे सांगितले होते. वाडवडिलांचे गुप्तधन असेल असेही कुणी म्हणायच. वडील नसल्यास मला पुजा करावी लागे. मी सोवळ्याची चड्डी नेसून मनोभावे पूजा करत असे. गावकी व भावकी सोडल्यावर जेव्हा ते घर विकल त्यानंतर घेणार्‍या माणसाचा तरुण मुलगा काही वर्षांनी गेला. बामनाच घर लाभल नाही असे नंतर ऐकीवात आले. जो चार आणे रोजावर आमच्या शेतात आजोबांच्या काळात काम करत होता त्याच माणसाने आमची शेती व घर नंतर घेतले.

माझ्या लहानपणीच्या घरात बरेचदा प्लँचेटस झालेली आहेत. या घरात आम्हाला सतत विचित्र अनुभव येत हेही खरे आहे. आता ते तेव्हाच्या माझ्या अनडायग्नोस्ड बायपोलरमुळे होते की कसे ते नक्की कळत नाही. पण फार त्रास झालेला आहे त्या घरात. मला व आईला. ते घर ज्यांना विकले त्यांनाही वेड लागल्याचे ऐकिवात आले. त्या बाईंवर उपचार झाले किंवा कसे, आधीपासून त्यांना प्रॉब्लेम होता का - काही माहीत नाही.

छान लिहिलंय.

नवीन घराबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.

आपण वास्तव्य केलेली प्रत्येक वास्तू, तो परिसर आपल्याला काही ना काही आठवणी देतंच.

छान. तुम्हाला शुभेछा.
अशीच अनेक घरे बदलली. दरवेळी सध्याच्या घरात पुरेसं राहिलं की तेच बेस्ट वाटू लागतं. जवळ ट्रेल सापडतात, शाळा, पार्क्स, अरीना, शेजारी.. असदी हायवेचे exits सगळ्याच्या आठवणी बनत जातात. Happy

आवडला लेख - खूपच रिलेट झाला. प्रत्येक वास्तू मधल्या आठवणी वेगवेगळ्या- आपलं वय, अनुभव, आयुष्यातली ती ती फेज यावर बदलणाऱ्या. कुठलाही बदल सुरुवातीला बोचरा वाटतो, पण हळूहळू रुळल्यावर त्या त्या ठिकाणची गम्मत कळायला लागते. Happy

छान लिहिले आहे.
या घरात छान आठवणी निर्माण होवोत या शुभेच्छा तुला. Happy

नवीन घरासाठी अभिनंदन सामो. Happy . छान लिहिलंयस. तुझ्या घरांमधे फिरून आले Happy
आपण वास्तव्य केलेली प्रत्येक वास्तू, तो परिसर आपल्याला काही ना काही आठवणी देतंच.>>. अंजूला मम.
मी सुद्धा परत माझ्या पूर्वीच्या जागी आले राहायला. रिडेव्हलप झाली बिल्डिंग.
पाच वर्ष ज्या रेंटच्या घरात होते ते ही जवळचं आहे. मलापण तिकडचा परिसर, रस्ता, दुकानं बोलावताएत असं वाटतं, मग जाते एखादी चक्कर मारते. घर काही बघता येणार नाही दुसरे भाडेकरू राहाताएत.

नव्या घरालापण आपलंस केलंस! मस्त.

तुझ्या आधीच्या घरी आले होते आता पुढच्या वेळेस नव्या घराला पण भेट देईन. Self invitation न काय!

छान आठवणी लिहिल्यात.
नवीन वास्तू तथास्तु म्हणत इच्छापूर्ती करेलच.
बायपोलर उल्लेख आणि प्रतिसादात लहानपणीच्या घराचं वाचून जरा धस्स झालं.

सामो, नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा !

आपण कमी जास्त कितीही वेळ राहिलो असलो तरी निघताना जीव घुटमळतोच..कधी कधी हॉटेल, हॉस्टेल ची खोली याबाबतही असा अनुभव येतो.

@मेघना, खरे आहे कोणत्याही बदलाशी रुळल्यानंतर गंमत येउ लागते.
@अनु, अस्मिता, उबो खूप आभार
@वर्षा हो झाडांकरता मागे मोट्ठी बाल्कनी होती व तू मला नेहमी रोपे लाव म्हणायचीस Happy जमलं या घरात.
@धनुडी - किती मस्त गं रिडेव्हलप झालेलं स्वतःचं घर. मस्त.
@मामी - जरुर जरुर जरुर ये. गेल्या वेळी तुला ओढत न्यावं लागलं होतं Happy यावेळी आपण होउन ये.
@अमा, कुमार खूप आभार
@झकासराव - त्रास सुरु १७ व्या वर्षी झाला. मग मी आय आय टी हॉस्टेलमध्ये गेले व तिथे मला जरा घरच्या वातावरणापासून ब्रेक मिळाल्याने तिथे सिव्हिअर त्रास झाला नाही. पण१७-२१ वर्षे निव्वळ भयावह होती.

मी सुद्धा परत माझ्या पूर्वीच्या जागी आले राहायला. रिडेव्हलप झाली बिल्डिंग. >>> अरे वा, तुझंही अभिनंदन.

बायपोलर उल्लेख आणि प्रतिसादात लहानपणीच्या घराचं वाचून जरा धस्स झालं. >>> सेम.

छान लेख. नवीन घराबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. बालपणीचे घर माझ्यामते सगळ्यात जास्त लक्षात राहत असावे.

Pages