वैवाहिक सहजीवन

Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 September, 2023 - 01:44

पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल. स्त्रीमुक्तीचा विचार जसा सशक्त होत गेला तसा विवाह संस्थेचे भवितव्य अशक्त होत गेले.पुढील काही शतकात विवाह संस्था नामशेष होत जाईल असे आमचे भाकित आहे.आपला देश किमान तीन शतकात एकाच वेळी वावरतो. त्यामुळे कैक पिढ्या जातील. विवाह संस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशन वाढत जाईल. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सहजीवन व व्यक्तिस्वातंत्र्य एकाच वेळी जपता आले पाहिजे हा विचार लिव्ह इन मधे करार स्वरुपात केला जातो. अजून हा प्रकार प्रायोगिक अवस्थेत आहे. पण भविष्यात याला चांगले दिवस आहेत असेही भाकित या निमित्त वर्तवतो.
पुरोगामी विचारांच्या जेष्ठ लोकांच्या सहजीवनात अजून एक बाब येते. जेष्ठत्वाच्याच नव्हे तर एकूण सहजीवनातील प्रवासात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास ही स्वतंत्रपणॆ होत असतो. तो या टप्पात परस्पर पूरक राहिला असतोच असे नाही. दोन्ही व्यक्तिमत्वे विचारांनी, आर्थिक दृष्ट्याही स्वतंत्र असतात. तसेही सहजीवन ही तडजोडच असते. पुरोगामी विचारांमधे व्यक्ति स्वातंत्र्याला, विचार स्वातंत्र्याला अधिक महत्व आहे. सहजीवनाच्या एका टप्प्यावर जेव्हा व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक राहत नाहीत त्या टप्प्यात तडजोडी करत सहजीवन जगणे जाचाचे बनत जाते. चिडचिड वाढते. आतापर्यंत सहन केले आता नाही असा विचार बळावू लागतो. शिवाय तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असता. मग आता तडजोडी करत का जगायचे? आता पर्यंत केल्याच ना! तुमचे उर्वरित ऎक्टिव्ह आयुष्य थोडे असते. ते आपल्या मनाप्रमाणे जगावे असे वाटत राह्ते. त्यात सहजीवनाचे ओझे व्हायला लागते. त्यामुळे उतारवयातही घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हे निरिक्षण तसे धक्कादायक वाटते. ज्या काळात एकमेकांना एकमेकांची गरज आहे त्याच काळात हे प्रमाण कसे वाढत चालले असा प्रश्न उपस्थित होतो. तसेही जेष्ठ ही काही एकजिनसी संकल्पना नाही. पण मुले व आईवडील अशा चौकटीत सोयीसाठी ती एकजिनसी ग्राह्य धरली जाते. व्यक्तिस्वांतंत्र्याचा अतिरेक असे जरी म्हटले जात असले तरी कुठल्या बिंदूपासून तो अतिरेक व कुठपर्यंत तो विवेकी असे काही ठोस उत्तर नसते. ते सापेक्ष आहे.अनेकदा असे होते की आयुष्याच्या उत्तरार्धात पतिपत्नी एकमेकांना कंटाळलेले असतात. मग एकमेकांची डोकी खात बसतात. तडजोडींची संख्या वाढायला लागक्ली की "सहजीवन" हे "सहनजीवन" होते. मग मागचे हिशोब निघतात. कधी जुने हिशोब चुकते केले जातात. असे स्कोअर सेटलिंग चालू असते. या वयात घटस्फोट घेणे ही एकमेकांना परवडणारे नसते मग नाईलाजाने संसार रेटत राहतात. तुम्ही एकटे राहिलात तरी ही समाजाशी तडजोड ही करावीच लागते. मग अपरिचतांशी तडजोड करत बसण्यापेक्षा परिचितांशी तडजोड केलेली बरी असा समन्वय साधला जातो.
करोना काळात एक निरिक्षण आहे. हे निरिक्षण जेष्ठांच्या सहजीवनालाही लागू आहे. एकमेकांच्या "स्पेस" वर या सामायिक काळात अतिक्रमण झाले. एकमेकांच्या सहवासात जास्त काळ गेल्याने एकमेकांचे गुणदोष समोरासमोर प्रकर्षाने दिसू लागले. परिणिती एकमेकांना सहन करण्याची वेळ आली. कुटुंबासाठी वेळ दया, घरासाठी वेळ द्या हे जे पुर्वी सांगाव लागायच तेच इथे प्रश्नांकित झाले. घटस्फोट ही बाब असफल वैवाहिक जीवन, विवाहाचे अपयश अशी मानली जाते. त्यामुळे वाढलेल्या घटस्फोटांची संख्या ही विवाहसंस्थेला उतरती कळा किंवा विवाहसंस्थेची गरज कमी कमी होत चालल्याचे लक्षण म्हणता येईल. आता त्याला पर्यायी व्यवस्था म्हणुन लिव्ह इन रिलेशनशिप उदयास आली आहे. त्याचे प्रमाण ही एका वर्गात लक्षणीय वाढते आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशा तत्वावरचे हे एक प्रकारचे ट्रायल मॅरेज आहे. तो सामंजस्याने सहजीवन जगण्याचा एक प्रकारचा करार आहे. तो लिखित वा मौखिक/ अलिखित असू शकतो. त्याला कायद्याची मान्यताही आहे. स्त्री व पुरुष दोघेही कमावते असल्याने एकमेकांच्या प्रॉपर्टीवर, आर्थिक कमाईवर हक्क न सांगता परस्परांची लैंगिक, वैचारिक, सांस्कृतिक भूक परस्पर संमतीने भागवून सहजीवन जगणे हा हेतु. या सहजीवनाच्या प्रवासात होणार व्यक्तिमत्वातील बदल जर परस्परांना घातक ठरु लागले तर सहजीवनातून बाहेर पडण्याचे प्रत्येकाचे हक्क सुरक्षित ठेवुन हा मार्ग अवलंबला जातो. अजून तरी हा प्रायोगिक अवस्थेत आहे. एकमेकांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा अवकाश जपत सहजीवन जगणे ही तशी कसरतच आहे. त्यासाठी विवेकी प्रगल्भता लागते. ती आपोआप येत नाही. तो व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. आपली शारिरिक व मानसिक प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी वेळोवेळी डॉक्टर्स, सायकियाट्रिस्ट,सायकॉलॉजिस्ट, कौन्सिलर्स अशा तज्ञांची मदत घ्यावी लागते. काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. शरीराच्या फिटनेसाठी जशा जिम्स आहेत तशा मनाच्या फिटनेसाठी माईंड जिम्स ही आहेत.
मला वाटते 2021 मधे जेष्ठांचे लिव्ह इन हे सरिता आव्हाड यांचे लोकसत्तेतील पंधरा दिवसांनी चालणारे सदर सर्वांनीच वाचले असेल. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी निरिक्षणे व उदाहरणॆ त्यात दिली आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच्या काळात हे मुलगा मुलगी दोघांकडच्यांना लागू आहे. >> सहमत.

मी तर म्हणतो की म्हातारपणी बायकांनी घटस्फोट घेऊच नये. इतकी वर्ष ट्रेनिंग दिलेला नवरा सोडायचा कशाला? फारतर वटसावित्रीच्या पूजेला म्हणावं की हा सातवा जन्म असू दे.

उबो, मानसशास्त्रीय कसोट्या तुलनेने बर्‍याच विश्वासार्ह आहेत. हे मी तुमची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी लिहिल होत. तुलनेने म्हणजे गुणमेलनाच्या तुलनेत अशा अर्थाने. "शिवाय या अश्या टेस्टमध्ये fake results ची, दरवेळी वेगळा रिझल्ट मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे मानसशास्त्रीय टेस्ट कितपत विश्वासार्ह आणि उपयोगी आहेत, याबद्दल शंकाच आहे." यावरच अधिक माहिती हवी आहे. माझी सायकोमेट्री २०१० ला झाली होती. या वेळी एमसीएमआय ३ केली. पहिली माझ्या आयबीएस संदर्भात व दुसरी कौटुंबिक प्रश्नासाठी.
मग हेच आधी सांगायला पत्रिकेच्या कुबडीचा आधार कशाला लागतो?>>>> हीच तर गोची आहे. पण या परिच्छेदातील मुद्दे तर्कशुद्ध आहेत तुमचे.

मानसशास्त्रिय टेस्टस खूप खूप तोकड्या आहेत, अपुर्‍या आहेत हे खरे आहे. मी खूपदा या टेस्टस देते. ठोकताळे सांगणारे ठोकळे रिझल्ट येतात व वाटत रहाते अरे हा तर टिप ऑफ आईसबर्गही नाही.

विवाहाला पर्याय म्हणून लिव-इन आणि डेटिंग-परीचय याच्या पुढली पायरी- एकमेकांचा अधिक सहवास लाभावा म्हणून लग्नाआधी केलेले लिव-इन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्यात गुंतणेच नको आहे तर दुसर्‍यात विवाह बंधनाकडे वाटचाल करणे आहे.
वेस्टर्न जगाबद्दल बोलायचे तर इथेही लग्नाआधी एकमेकांसोबत रहायचे हे किती विचारपूर्वक ठरवले, लग्नाआधी किती काळ लिव -इन झाले यावरुन लग्न कितपत यशस्वी होईल याचे ठोकताळे बांधणे चालते.

व्यक्तीस्वातंत्र्याचा संस्कार लहानपणापासून हवा मात्र्र वैवाहिक बंधनाचा-जोडीदाराचा विचार करताना, एकत्रित अवकाशात काय असेल याचा विचार करणे फार महत्वाचे. नुसते माझी स्पेस जपली जावी म्हणणे सोपे आहे पण नात्यात स्पेसची देवाणघेवाण येते. 'माझा कोपरा' म्हणजे नेमके काय? त्याच्या चौकटी किती घट्ट आहेत? समोरच्या व्यक्तीच्या कोपर्‍याबद्दल तुम्हाला खरोखर काय वाटते? वगैरे मुद्दे आले. एकत्रित अवकाशाचा विचार करताना, एकमेकांसोबत सहजतेने काय वाटून घेता येणार आहे? त्यापुढे जावून काय वाटून घ्यायची तयारी आहे? याबद्दल स्वतःशी आणि संभाव्य जोडीदाराशी बोलुन याबाबतचे चित्र स्पष्ट व्हायला मदत होते. 'मी कसे असायला हवे' या पलिकडे मला यातले खरोखरीच काय झेपणार आहे याचा प्रामाणिक विचार हवा. कारण समोरचा काय किंवा तुम्ही स्वतः काय , शेवटी प्रत्येकाचा स्वतःचा असा पिंड असतो. मला अमुक हवे म्हणताना त्याची वास्तवाशी सांगड घालता यायला हवी. तुम्ही कुठे रहाता तिथल्या कायदेकानूंमुळे, इतर परीस्थितीमुळे हे वास्तव बदलू शकते याची जाणीवही हवी.

एखाद्या परीस्थितीत व्यक्ती कशी वागते यातून तिचे व्यक्तीमत्व समजण्यास मदत होते. साधे छंदांबद्दल बोलायचे तर एकच छंद दोन व्यक्ती वेगळ्या प्रकारे हाताळतात. सो कॉल्ड बोअरिंग गोष्टी एकत्र करतानाही व्यक्तीबद्दल बरेच काही कळते. लग्नानंतर कुटुंब विभक्त असणार असले तरीही व्यक्तीची आई-वडील, भावंडे, मित्र-मैत्रीणी या नात्यातली देवाण-घेवाण काय दर्जाची आहे हे समजून घेणे, त्यासाठी मुद्दाम वेळ देणे केल्यास व्यक्तीची जडण-घडण कळण्यास मदत होते. अगदी एकत्र राहीले नाही तरी सुट्टीच्या दिवशी अर्धा दिवस/पूर्ण दिवस देत अशा प्रकारचा परीचय करुन घेता येतो. परीचय करुन घ्यायच्या काळात, कठीण प्रश्नांवर बोलताना व्यक्तीने मांडलेले विचार आणि तिचा वावर यातली तफावत ओळखता येणे गरजेचे. त्याही पुढे जावून ती तफावत योग्य पद्धतीने दाखवून देत, अधिकचा संवाद याबाबतची कंफर्ट लेवल किती हे बघणेही आले. त्याचवेळी अधूनमधून स्वतःलाही प्रश्न विचारुन तुम्ही आतुन नक्की कसे आहात हे जोखणे गरजेचे.

सामो, मानसशास्त्रीय टेस्ट बाबत प्रतिक्रिया महत्वाची आहे. त्यावर सायकॉलॉजिस्ट लोकांच काय म्हणण आहे हे जाणुन घेण्यास उत्सुक आहे
स्वाती 2 वर राधानिशा ने दिलेले अनिल भागवतांच्या जीवनसाथ या 12 पुस्तकांचा मालिकांचा दस्तऐवज खूपच महत्वाचा आहे. तुमची मांडणी साधारण त्या प्रकारची आहे. मानवी नात्यांची गुंतागुंत तर्कबुद्धी व विवेकाच्या आधारे सोडवणे खरच कठीण काम आहे. कदाचित भविष्यात ए आय च्या मदतीने व्यक्तिमत्वे एकमेकांशी जुळतात की नाही? हे भारतीय पार्श्वभूमीवर सांगणारी प्रणाली तयार होईल.मानवी नातीच जिथे वेगाने बदलत आहेत तिथे कशा कशाचे अंदाज बांधणार असा प्रश्नही पडतोच.

चांगले लिहिले आहे. प्रतिसादही चांगले आहेत.

लग्नसंस्थेत आता काही राहिले नाही असं वाटायला लागलं आहे, उगाच ओढतो आहोत आपण ती परंपरा. मला तरी ९०% वैवाहिक आयुष्य अपयशी दिसते, सर्व माणसं असुखी दिसतात. किमान ५०% लोक जरी वैवाहिक सहजीवनात सुखी दिसले असते तरी मी याला 'बेनेफिट ऑफ डाऊट' दिला असता. फक्त यापेक्षा समाजमान्य व सुरक्षित पर्याय आपल्याला माहीत नाही म्हणून हे करत रहायचं. माझा तरी दिवसेंदिवस यावरचा विश्वास उडत चालला आहे. ही अनैसर्गिक संस्था आहे, लग्नाला समाजाचे नियम आहेत पण शरीराला मनाला निसर्गाचे नियम आहेत. निसर्गाच्या ओढीपुढे हे काय टिकणार..! ओढूनताणून कसं सुखी होणार कुणी.

स्त्रियांना तर अजिबात स्पेस वगैरे प्रकार माहितीही नसतात, तडजोड करतकरत इतक्या दूर यावं लागतं की व्यक्तिस्वातंत्र्य दूरची गोष्ट व्यक्तीमत्व सुद्धा हरवून जातं, स्वार्थी जगणं भाग पडतं , मुलं झाल्यावर तर सगळ्या शक्यताच संपतात. माझ्या मुलांनी लग्न करू नये असं मला मनापासून वाटतं पण करणार असतील तर तो त्यांचा निर्णय असेल. जगभर फिरावं , आवडत्या पार्टनरसोबत रहावं, मुलं होऊ द्यावीत/ न द्यावीत, दत्तक घ्यावीत , प्राण्यांसाठी-पृथ्वीसाठी-समाजासाठी काही तरी करावं, छान करिअर करावं, स्वतः ला आनंद मिळेल ते करावं. रूळलेल्या वाटा निवडून मर्यादित आयुष्य जगू नये. सहन करू नये आणि करायलाही लावू नये. मी त्यांना यातून मोकळं केलंलं आहे.

धन्यवाद सामो, Happy
लग्न संस्था म्हणजे नैसर्गिक सुनामीसाठी लाकडं रचून धरण बांधल्यासारखं आहे.

प्र घा,
इथे अमेरीकेत काँपॅटिबिलीटी टेस्ट्स असतात. दर वर्षी यादी प्रसिद्ध करतात. या वर्षीची यादी
मात्र टेस्टनुसार कितीही काँपॅटिबिलीटी असली तरी लग्नाचे नाते जुळले म्हणजे पुढे सगळे कायम सुरळीत असे होत नाही ना! ते लग्न चालवणे हे दोघांना एकमेकांच्या साथीने शिकावे लागते. परफेक्ट कुणीच नसते, काही ना काही कमतरता प्रत्येकात असणार. त्यामुळे स्वतःच्या कमतरता समजून घ्याव्या लागतात आणि एकमेकांच्या कमतरता कशा प्रकारे संभाळायच्या यावर विचारही करावा लागतो. आपल्या नव्या नात्यात इतरांना किती ढवळाढवळ करु देता, सीमारेषा कशा लढवता यानेही बराच फरक पडतो. पुढेही वेगवेगळ्या टप्प्यावर त्या नात्यात चढ उतार येणार, आणि त्यावर दोन्ही बाजूने काम करावे लागेल हे समजून उमजून प्रवास करावा लागतो.

आमच्या अमेरीकन मित्र मंडळीत पहिले लग्न वर्ष-दोन वर्षात संपले मात्र दुसरे लग्न आनंदाचे, दीर्घकाळ टिकलेली जोडपी आहेत. त्यांचे म्हणणे - 'पहिले लग्न प्रेमात पडून खूप तरुण वयात केले मात्र 'प्रेम आहे तर...' म्हणत एकमेकांकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या, होणारे अपेक्षाभंगही चुकीच्या पद्धतीने हाताळले, इगो इतका की काही झाले तरी बोट समोरच्याकडे. शेवटी वाईट पद्धतीने लग्न संपले. काही काळाने जरा शहाणपण आल्यावर पुन्हा प्रेमात पडून दुसरे लग्न केले तेव्हा आधीच्या लग्नातल्या चूका टाळल्या. '

फक्त यापेक्षा समाजमान्य व सुरक्षित पर्याय आपल्याला माहीत नाही म्हणून हे करत रहायचं.>>>>. इथेच तडजोडीचा मुद्दा येतो. तुम्ही एकटे राहिलात तरी ही समाजाशी तडजोड ही करावीच लागते. मग अपरिचतांशी तडजोड करत बसण्यापेक्षा परिचितांशी तडजोड केलेली बरी असा समन्वय साधला जातो.

>>> उतारवयातही घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हे निरिक्षण तसे धक्कादायक वाटते. ज्या काळात एकमेकांना एकमेकांची गरज आहे त्याच काळात हे प्रमाण कसे वाढत चालले असा प्रश्न उपस्थित होतो.
का धक्कादायक वाटतं? त्या वयात जास्त गरज आहे असं का वाटतं?
कुठल्याही नात्याकडे 'म्हातारपणची काठी' म्हणून पाहणं म्हणजे त्या नात्याची कबर आपल्या हातांनी खोदायची सुरुवात करणं.
आईबाप, भावंडं, मित्रमंडळी कुठल्याही कारणाने दुरावतात तेव्हा आपण 'मूव्ह ऑन' करतोच ना? मग लग्नालाच इतकं जिवापाड लोंबकळून राहाण्याचा अट्टहास का असतो?

मग अपरिचतांशी तडजोड करत बसण्यापेक्षा परिचितांशी तडजोड केलेली बरी असा समन्वय साधला जातो.
>>> बरोबर आहे प्र घा, पण अपरिचतांची जबाबदारी चोवीस तास अंगावर येत नाही, तेवढी भावनिक गुंतवणूक करावी लागत नाही त्यात, ती घरात शिरत नाही.

मग लग्नालाच इतकं जिवापाड लोंबकळून राहाण्याचा अट्टहास का असतो?
>>> प्रत्यक्ष सुखापेक्षा संभाव्य सुखाच्या आशेने माणूस या आयडियाला धरून राहतो. तशीच प्रवृत्ती आणि सोशल कंडिशनिंग असते.

सोशल (चुकून सोशिक लिहिणार होते - फ्रुइडियन स्लिप! Proud ) कंडिशनिंग हेच खरं.
शेतीप्रधान समाजव्यवस्थेचा एक भाग म्हणून सुरू झालेली प्रथा आता बदललेल्या समाजव्यवस्थेत मोडीत निघाली नाही तरच नवल!

का धक्कादायक वाटतं? त्या वयात जास्त गरज आहे असं का वाटतं?>>>>
स्वाती_आंबोळे, संध्या छाया भिवविती हृदया। मन हळव झालेले असत. अशा वेळी भावनिक आधाराची गरज वाटते. आयुष्याची थोडीच वर्षे शिल्ल्क असतात ती आनंदाने घालवावी. कधीकधी जीवनेच्छा कमी होते. आसक्ती संपत जाते व विरक्ती वाढत जाते. हे सगळ्यांच बाबतीत होते असे नव्हे पण भारतीय पार्श्वभूमीवर बहुसंख्यांचे होते. घटस्फोट घेउन कायदेशीर विभक्त राहण्यापेक्षा विवाहांतर्गतच विभक्त राहू म्हणजे परस्परांची गरज वाटली तरी दोर तोडून टाकलेले नसतात. तसा माणूस हा परस्परावलंबी आहे. म्हणजे परस्परउपयुक्तता टिकून राहण्याकडे त्याचा कल असतो. म्हातारपणाची काठी ही आता सेवाक्षेत्रात गेली आहे हे खरे पण सहजीवनात जर तडजोड करुन राहिले तर ते अन्य पर्याया पेक्षा कमी त्रासाचे आहे हे गणित तो मांडत असतो. मुले मोठी झाली की ती आईबापांची रहात नसतात त्यांचा अवकाश बदलतो. हे मी सर्वसाधारण मध्यम वर्गातील निरिक्षण सांगतो आहे.

प्रघा, मला काही समजलं नाही, उतारवयात किंवा एकूणच विवाह टिकवण्याकडे भारतीय मध्यमवर्गीयांचा कल असतो की नसतो? की पूर्वी असायचा आणि आता नसतो असं म्हणताहात? आणि नसेल उरला तर नसेना का! कालप्रवाहाच्या रेट्याने घडणारा बदल उलटायचा प्रयत्न का करायचा?
ही चर्चा नक्की कशाबद्दल आहे?

ही चर्चा नक्की कशाबद्दल आहे?>>>>> सहजीवन या मुद्द्यावरील अनेक पैलू समजावून घेण्याबद्दल आहे. आपली मते व्यक्त करण्याबद्द्ल आहे.

पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. >>> श्रोते पण असतात ?

काही आदिवासी जमातींच्या चालीरिती पुस्तक हुडकून टाकतो इथे. डॉ. गोविंद गारे आणि उत्तमराव सोनवणे यांचे पुस्तक आहे. एक फिल्म्स डिवीजन ची डॉक्युमेंटरी देखील आहे.
अजूनही पचनी पडलेले नाही. आपले पुरोगामित्व म्हणजे सरड्याची चाल कुंपणापर्यंतच.

तोपर्यंत हे वाचा.
झारखंड मधे एका गावातल्या आदिवासी जमातीत लग्नाची प्रथा नव्हती. लिव्ह इन मधेच ते राहत. अशा ५०१ जोडप्यांचे सामूहिक लग्न तिथल्या मंत्र्यांनी लावून दिले. कारण दिले कि आर्थिक कारणांमुळे लग्ने होत नव्हती.

खरे तर महाराष्ट्रासहीत देशाच्या अनेक आदिवासी बहुल भागात लग्नं साध्याच पद्धतीने करतात. बर्‍याच ठिकाणी लग्नाआधी काही काळ लिव्ह इन मधे इच्छुक जोडपे राहते. त्यात जोडीदार सक्षम वाटला तरच लग्न लावले जाते.
काही ठिकाणी शामियाने उभारले जातात. इच्छुक जोडप्यांसाठी गाव रात्रभर नृत्य गाणी करून सोहळा करते. मोहाची दारू पाजली जाते. त्यानंतर पुढचे काही दिवस ( बहुधा २१ दिवस) या जोड्या शामियान्यात राहतात. जोडीदार आवडला नाही तर दुसर्‍या जोडीदारासोबत राहण्याची परवानगी असते. परवानगी हा शब्द इथे अनाठायी आहे.
यात अनुरूप जोड्या शेवटी एकमेकांसोबत राहतात.
https://www.abplive.com/news/india/why-are-the-tribals-opposing-the-unif...

लिव इन आणि आदिवासी जमातींचा हा आढावा.
https://www.herzindagi.com/hindi/society-culture/strange-live-in-relatio...

मनं , विचार जुळणे हे महत्वाचे आहेच. पण लैंगिक असमाधान हे लग्नं न टिकण्याचं एक प्प्रमुख कारण आहे. विचार जुळतात कि नाही हे तपासता येते. पण लैंगिक असमाधान लग्नानंतर लक्षात आले तर पुढे काहीच करता येत नाही. अशा परिस्थितीत फसलेल्या जोडप्यांच्या बाबतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो.

आउट ऑफ बॉक्स हा वाकप्रचार खरे तर इथे चुकीचा आहे, कारण आपण लग्नसंस्था निर्माण केली तीच कृत्रिम आहे. एकत्र राहण्यासाठी एकमेकांना सुख आणि समाधान देणे हाच क्रायटेरिया पूर्वी कधी तरी असेल.

मात्र सध्या तरी लग्नसंस्था अंगवळणी पडलेली आहे. जोडीदार बदलणे हे सोपे नाही. मानसिक दृष्ट्या तयारी नसते. भावनिक गुंतवणूक सुद्धा असते. आपण अशा वातावरणात वाढलोय त्यामुळे आदिवासींच्या या रूढी जास्त नैसर्गिक / स्वाभाविक आहेत त्या पचनी पडत नाहीत.
त्याबद्दल त्यांना शंभर गुण. समाजात पुढे असे बदल व्हावेत.

सध्याच्या पिढीला मात्र सात जन्माची साथ सारख्या कल्पना आवडतात. मुरलेल्या लोणच्यासारखं नवरा बायकोचं नातं बनतं, त्यांना त्यांच्या मर्जीने राहू द्यात. ज्यांना लग्न काटेरी वाटतं त्यांना सहज वेगळे होता आले पाहिजे. हे असे होऊच नये म्हणून लैंगिक शुचितांचा बाऊ काढून आदिवासींच्या रूढी स्विकारल्या पाहिजेत.

त्या ऐवजी त्यांनाच लग्न करा म्हणून मागे लागलेत.

मात्र सध्या तरी लग्नसंस्था अंगवळणी पडलेली आहे. जोडीदार बदलणे हे सोपे नाही. मानसिक दृष्ट्या तयारी नसते. भावनिक गुंतवणूक सुद्धा असते.>>>>>प्रचंड सहमत. शेतात बैलगाडीला दोन बैल लावले जातात. काही काळाने दोन बैलांच्या क्षमता व सिन्क्रोनायझेशन मधे फरक पडू लागतो. गाडीच्या जू वर मग दोन्ही बैलांची ओढाताण होते पर्यायाने बैलगाडी हाकणे ही गाडीवानाला कष्टाचे जाउ लागते. मग थकलेल्या बैलाला बाजूला काढले जाते व नवीन दमाच्या बैलाला गाडीला जुंपले जाते. शर्यतीच्या गाड्यांना तर एकदम ताजे दमाचे दोन्ही बैल लागतात. बर बैलगाडीला दोन बैल असणॆ कंपल्सरी असते. एका बैलाच्या छकड्याच्या क्षमतेवर मर्यादा असतात. त्यामुळे बैल बदलणेही कंपल्सरी होते. संसाराचा गाडा हाकतानाही असेच काहीसे होते. सहजीवनातील क्षमता व सिंक्रोनायझेशन मधे फरक पडला की गाडा बिघडायला सुरवात होते. बैलगाडीचे उदाहरण हे आमच्या शेतातच लहानपणी पहात आलो आहे. आता ट्रॅक्टर च्या जमान्यातही अजून काही ठिकाणी बैलगाड्या वापरल्या जातातच.

परदेशांत तिनापैकी एक लग्नाचा घटस्फोट होतो म्हणतात. मग तिथे काही सखोल विचार न करता होत असतील का लग्नं?
त्याचं उत्तर असं आहे की. 'त्यांची पद्धत methode in madness ' आमची अमनधपक्याने.
शिवाय कुठल्याही फसलेल्या गोष्टींवर ते पुस्तक लिहितात. बेस्टसेलर.

>>> कुठल्याही फसलेल्या गोष्टींवर ते पुस्तक लिहितात
मुळात घटस्फोट झाला म्हणजे(च) लग्न 'फसलं' हे तुमचं गृहितक दिसतं आहे. घटस्फोट झाला नसेल, पण जोडीदारांपैकी एकाला किंवा दोघांनाही (आणि पर्यायाने घरातील मुलं किंवा ज्येष्ठ यांनाही) सहजीवनातून सुख मिळत नसेल तर त्याला तुम्ही यशस्वी लग्न म्हणाल का?

देशात तिनांतल्या अडीच लग्नांत लोक अनिच्छेने किंवा कोणीतरी ' करा हो सहन - घटस्फोट घ्या म्हणायला लोकांचं काय जातंय' असले सल्ले दिल्यामुळे मारूनमुटकून राहातात म्हणे, त्याचं काय?

आचार्य, 'घोटुल'ची माहिती भारी आहे, धन्यवाद. Happy

Pages