दोन बाजू

Submitted by सुमुक्ता on 11 January, 2017 - 06:04

सध्या मला एक मोठाच प्रश्न सतावीत आहे मला. सर्वच बाबतीत असे नाही पण बऱ्याच बाबतीत मला कोणतीच बाजू ठामपणे घेता येत नाही. सगळ्यांचे सगळे बरोबरच वाटते आणि त्याचबरोबर चुकीचेही वाटते. आता सैफ-करीना ने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले त्यावरून एवढा गदारोळ माजला. सुरुवातीला मला पण थोडे विचित्र वाटले पण मग मी विचार केला की माझ्या मुलाचे नाव ठेवताना ना मी आई- वडिलांना विचारले ना सासूसासऱ्यांना मग सैफ-करीना ने काय म्हणून जनतेचा विचार घ्यावा (किंवा करावा)??? हेही पटले. पण तरीही तैमूर नाव ठेवायला नकोच होते हे ही पटले. आता पहिल्या विचाराचे पारडे किंचित जड होते हे मी नाकारणार नाही पण तरीही दोन्ही बाजू आपापल्या परीने बरोबरच वाटल्या.

माझा एक मित्र अविकसित देशांमध्ये खेडोपाडी फुकट इंटरनेट कसे देता येईल ह्यावर संशोधन करतो. त्याच्या फेसबुक पोस्ट्स पहिल्या की भारावल्यासारखे वाटते. त्यामुळे खेडोपाडी इंटरनेट सुविधा सहजपणे आणि शक्यतोवर फुकट उपलब्ध व्हावी हे मला पटते. पण त्याचबरोबर नेट न्यूट्रॅलिटी आवश्यक आहे असेही वाटते. आता थोड्याफ़ार संशोधनानंतर आणि प्रयत्न केल्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत पण प्रत्येक प्रश्न असा सुटेलच असे नाही ना!!!

बंगलोरच्या विनयभंग प्रकरणानंतर स्त्रियांना दोष देणारे लोक पहिले आणि प्रचंड संताप आला. स्त्रियांवर विविध प्रकारे बंदी घालणे हे चूकच. पण थोडा विचार केला आणि मला जाणवले की मी स्वतःसुद्धा मला स्वतःला जपूनच असते. साधारण काळ-वेळ, कुठे जातोय, बरोबर कोण आहे ह्याचे भान ठेवूनच कपडे घालते. विनयभंग करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हे खरेच, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंदी येऊ नये हेही खरे पण जोवर असे प्रसंग सतत घडत आहेत तोवर स्त्रियांनी स्वतःला जपणे महत्वाचे हेही खरेच.

आमिर खानचा दंगल खूप आवडला. त्यामध्ये गीताच्या कोचचे पात्र जरा खटकले. कोचची उगीचच बदनामी झाल्यासारखे वाटले. पण त्याचबरोबर दर्शकांनी चित्रपट पहाताना थोडा विचार करावा असेही वाटले. सगळेच प्रसंग खरे आणि तंतोतंत असतील तर तो सिनेमा न होता डॉक्युमेंटरी होईल. त्यामुळे मनोरंजन करणारे काही प्रसंग चित्रपटात टाकले जातातच. असे असले तरी गीताच्या खऱ्या आयुष्यातील कोचबद्दल थोडेसे वाईटसुद्धा वाटले.

ब्रिटनमध्ये ब्रेक्सिट झाल्यावर विविध माध्यमांमध्ये भरपूर चर्चा घडल्या सर्व चर्चा मी वाचत होतेच. तेव्हा कधी ब्रेक्सिटच्या बाजूने बोलणाऱ्यांचे पटायचे कधी विरुद्ध बाजूने बोलणाऱ्यांचे पटायचे. ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये रहाणे फ्री ट्रेड वगैरेच्या दृष्टीने महत्वाचे आहे हे जरी खरे असले तरी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी इतर युरोपियन देशांमध्येसुद्धा काही राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेतच की. अर्थात ब्रेक्सिटचा निर्णय चूक की बरोबर हे येणारा काळ ठरवेलच पण तोवर ह्या दोन्ही बाजू आपपल्या परीने मला बरोबर वाटत रहातीलच.

असेच माझ्या मनामध्ये विविध विषयांवरचे द्वंद्व सतत चालूच असते कधी एक बाजू पटते मग दुसऱ्या बाजूचा विचार केला की ती बाजूसुद्धा पटते. एकाद्या बाजूचे पारडे जाड झाले की मग मी ठरवते की हा विचार आपल्याला पटतो आहे. मग फारच हिय्या करून कधी सोशल मीडिया पोस्टस मधून किंवा इतरांच्या लेखांवर दिलेल्या प्रतिक्रियांमधून मी व्यक्त होते. पण विरोधात असलेल्या व्यक्तीला माझी मते मलाच पटवून देता येत नाही कारण कुठेतरी दुसरी बाजूसुद्धा पटतच असते. कधी कधी वाटते आपला अभ्यास कमी पडतो म्हणून आपल्याला ठामपणे काही पटत नाही. पण एखाद्या विषयावर जितके वाचन मी करते, जितक्या चर्चा मी ऐकते आणि करते तितक्या जास्त प्रमाणात दोन्ही बाजू पटायला लागतात.

हल्ली सोशल मीडियाच्या प्रसारामुळे लोक खूप छान व्यक्त व्हायला लागलेली आहेत आपली मते खुलेपणाने ठामपणे मांडत आहेत. हा बदल खूपच स्वागतार्ह असला तरी सरसकटीकरण आणि आणि शिक्के मारणेसुद्धा वाढत चालले आहे त्याबद्दल फार वाईट वाटते. मोंदीविरोधात बोलले की काँग्रेसी आणि मोंदीचे कौतुक केले की भाजप्ये. पण भारतीय हा शिक्का अस्तित्वातच नाही. स्त्रियांच्या बाजूने बोलले की स्त्रीवादी. थोडी पुरुषांची बाजू घेतली पुरुषप्रधान संस्कृतीची द्योतक. पण माणूस हा शिक्का कुठे आहे?? ट्रम्प महाशयांचे एखादे भाष्य थोडे जरी पटायचा अवकाश; मग शिक्क्यांना अंतच नाही. अशा वेळेस माझ्यासारख्या कुंपणावर घुटमळणाऱ्या व्यक्तीला व्यक्त होणे फारच कठीण जाते.

अशा वेळी एकच प्रश्न पडतो: कोणतीच बाजू ठामपणे घेता न येणे ही माझ्यात असलेली उणीव आहे की नाण्याला दोन बाजू असतात त्या पाहता येणे हे माझे कौशल्य आहे???

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.

विरोधात असलेल्या व्यक्तीला माझी मते मलाच पटवून देता येत नाही कारण कुठेतरी दुसरी बाजूसुद्धा पटतच असते. कधी कधी वाटते आपला अभ्यास कमी पडतो म्हणून आपल्याला ठामपणे काही पटत नाही. पण एखाद्या विषयावर जितके वाचन मी करते, जितक्या चर्चा मी ऐकते आणि करते तितक्या जास्त प्रमाणात दोन्ही बाजू पटायला लागतात.
>> असेच मलाही वाटते.

तसे १००% काळे किंवा १००% पांढरे काहीच नसते त्यामुळे त्यातल्या त्यात आपल्या समजुतींना पटेल आणि आपल्याला बरोबर वाटेल अशी बाजू घ्यावी. प्रत्येक गृहीतकाला एखादा तरी अपवाद असतोच असे म्हणतात. त्यामुळे त्या अपवादाबद्दल विचार करण्याऐवजी चांगले काय असेल असा विचार करणे अधिक उत्तम. शेवटी तुम्ही विचार करत आहात आणि वाचन - चिंतन करत आहात यातच तुमचे चांगला नागरीक होणे आलेले आहे. कुठलीही गोष्ट आंधळेपणाने न स्विकारता आपापले पारखुन स्विकारणे महत्त्वाचे !

छान लिहिलय .
माझाही हा गोंधळ बर्‍याचदा होत असतो मग दोन पावलं मागे सरकुन तटस्थपणे विचार करावा लागतो , पण फार काळ तटस्थ राहुनही चालत नाही , जी बाजु जरा जास्त योग्य वाटते तिकडे वळावं लागतं.

हा गोंधळ/उणीव नाही. ओपन माइण्ड असल्याचे प्रूफ आहे हे. म्हणजे एका अर्थाने कौशल्यच.

आपले जे मत आहे त्याच्या विरोधी मत समजावून घेणे, ते मत असलेल्यांबद्दल आधीच पूर्वग्रह करून न घेणे, राजकीय बाबतीत कोणता पक्ष/पार्टी आहे यावरून त्याबद्दल आपले मत न ठरवता जो इश्यू/घटना/वक्तव्य/निर्णय आहे त्याबद्दल जरा (बाजूच्या व विरोधी आर्ग्युमेण्ट्सचा) सखोल अभ्यास करून आपले मत स्वतंत्रपणे बनवणे, व नवीन माहिती समजली तर ते बदलायची तयारी असणे हे चांगलेच आहे.

(मात्र हे पुलंच्या असा मी असामी मधल्या "मला सर्वांचीच मते पटायची" सारखे नसावे. त्या उदाहरणात कदाचित कोणतीच मते किंवा माहिती स्वतंत्रपणे पारखून न घेतल्याने तसे असेल. ते वेगळे)

त्यामुळे सरसकटीकरण व शिक्क्यांची फिकीर न करता आपले जे मत आहे ते लिहायचे. इथे माबोवर बरेच लोक समोर काय लिहेले आहे त्याचा प्रतिवाद न करता तुम्ही फुरोगामी आहात, ढोंगी आहात, ब्रिगेडी/कम्युनिस्ट आहात, नागपूरहून आदेश घेउन आलेले आहात, आयटीसेल वाले आहात (आणि हे राहिलेच - छुपे संघी सुद्धा Happy ) हा "प्रतिवाद" करत बसतात. त्यांचा चॉईस.

उदा: नेहरूंच्या किंवा मनमोहन सिंगांच्या एखाद्या धोरणावर विरोधी मत असेल तर टीका करताना "पण मला त्यांच्याबद्दल आदरच आहे, गांधीजींबद्दल्ही..." वगैरे पुस्त्या जोडायची गरज नाही. त्या एका टीकात्मक पोस्टवरून तुम्ही जर भाजप्ये/हिंदुत्त्ववादी किंवा सनातनी आहात असे जर कोणी समज करून घेत असतील तर खुशाल घेउदेत. पण त्यांची एखादी चांगली गोष्टही पटली असेल तर तिची तितक्याच खुल्या दिलाने तारीफ करता आली पाहिजे. ट्रम्प बद्दल तेच. मोदींबद्दलही.

यातून कोणत्याही बाफवर, कोणत्याही राजकीय वादात कधीही लिहीताना कसलेही बॅगेज डोक्यावर नसल्याने जो मोकळेपणा येतो त्याची मजा वेगळीच आहे. Don't lose that.

लेखातले पहिले पाच पॅराग्राफ म्हणजे पाच स्वतंत्र धागे आहेत, बनू शकले असते Happy

लेख आवडला, पटला. अर्थात माझ्या मनात काही असा गोंधळ नसतो. पण व्यक्ती तितक्या प्रकृती नुसार कित्येकांना चर्चेदरम्यान असे होत असणार.

माझा फंडा असा आहे की कुठलीही बाजून १०० विरुद्ध ० अशी क्लीअर नसणार,
तसेच ५० विरुद्ध ५० अशी अगदी समसमानही नसणार.
तर, आपल्याला जी बाजू वरचढ वाटते, भले ५१ विरुद्ध ४९ का असेना, तर तिला समर्थन द्यायचे. आणि हे समर्थन १०० टक्के द्यायचे. उगाच दुसरी बाजूही तशी बरोबर आहे म्हणत तिचे कौतुक करून तिलाही भाव देऊ नये. खास करून जर तुम्हाला दोघांपैकी एकच सिलेक्ट करता येणार आहे, आणि तुम्ही ५१ वालेच करणार आहात. तर समोरच्यालाही तेच कसे योग्य आहे हेच पटवून द्यायचे असते. त्याचे मत ५०-५० करून त्याने ४९ वाले निवडण्याची शक्यता निर्माण व्हावी अशी स्थितीच उद्भवू द्यायची नाही.

धन्यवाद सर्व प्रतिकियांसाठी!!!

तसे १००% काळे किंवा १००% पांढरे काहीच नसते >>> अगदी. पण ग्रे शेड पुष्कळ लोकांना कळत नाही त्यामुळे मला नक्की काय म्हणायचे आहे ते मला जर नीट मांडता आले नाही तर मग मला काही मतच नाही असे समोरच्याला वाटू शकते. त्याचप्रमाणे कोणा एकाची बाजू घेऊन मला स्वतःवर कोणताही शिक्का मारून घ्यायला आवडत नाही.

फारएण्ड खूप मस्त प्रतिसाद. वाद विवादास्पद धाग्यांवर मी माझी मते प्रदर्शित करायला जात नाही. कारण दोन्ही बाजू थोड्या थोड्या बरोबर वाटल्यामुळे त्या मतांना defend करणे मला जमत नाही. सगळ्याच बाबतीत असं होतं असं नाही पण बर्‍याच वेळा दोन्ही बाजू आपापल्या परीने बरोबर वाटत असतात.

लेखातले पहिले पाच पॅराग्राफ म्हणजे पाच स्वतंत्र धागे आहेत, बनू शकले असते >>> Lol
तसा तैमुरबद्दल धागा मायबोलीवर कसा काय आला नाही याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे Wink

आणि हे समर्थन १०० टक्के द्यायचे. उगाच दुसरी बाजूही तशी बरोबर आहे म्हणत तिचे कौतुक करून तिलाही भाव देऊ नये.>>> तेच तर जमत नाही. कारण दोन्ही बाजूचे थोडेथोडे पटत असते. सद्ध्या मी काळे-पांढरेच्या ऐवजी ग्रे शेड विश्वास ठेवते. १००% चूक किंवा १००% बरोबर असे काहीच नसते. फक्त ते ठामपणे मांडणे जमत नाही

छान लिहिलंय. पटलं. माझाही गोंधळ होतोच दोन बाजुत.
ग्रे शेड्स +१

ओपन माइण्ड असल्याचे प्रूफ आहे हे>+१

खूपच छान लिहिलंय. ज्याचं मन दोन्ही बाजू समजून घ्यायला तयार असतं त्यालाच कोणती बाजू खरोखरीच बरोबर आहे ते कळू शकतं ना. त्यामुळे असं दोन्ही बाजू थोड्या थोड्या बरोबर वाटणं हे स्वाभाविक आहे, उलट दुराग्रही नसल्याचं, ओपन minded असल्याचंच लक्षण आहे .

लेखात मनातील द्वंद्व चांगले व्यक्त केले आहे.
मनाचा खुलेपणा असणे हे चांगले आहे. त्यामुळे आपण कुठल्याही कळपात वावरू शकतो.

पण, जर का एखाद्या महत्वाच्या बाबतीत आपले एकाच बाजूने ठाम मत असेल तर न घाबरता ते ठणकावून सांगावे. अशा वेळेस आपल्याला आधार द्यायला नाटककार इब्सेनचे हे वाक्य लक्षात ठेवायचे, '' The strongest man in the world is the man who stands alone''.
आपली ठाम बाजू कालांतराने इतरांना पटू शकते.

@ कुमार१, '' The strongest man in the world is the man who stands alone''.
आपली ठाम बाजू कालांतराने इतरांना पटू शकते.
>>> +१

धन्य्वाद सस्मित, आनंदिनी, कुमार, सचिन काळे Happy

, '' The strongest man in the world is the man who stands alone''. >>> मस्तच. सहम्त आहेच!! कोणतीही एक बाजू पटत असेल तर निश्चितपणे हा ठामपणा हवाच.

>>>>>>अशा वेळी एकच प्रश्न पडतो: कोणतीच बाजू ठामपणे घेता न येणे ही माझ्यात असलेली उणीव आहे की नाण्याला दोन बाजू असतात त्या पाहता येणे हे माझे कौशल्य आहे???

बाप रे!!! इतकं माझ्या मनातलं लिहीलयत तुम्ही की मला प्रचंड eerie फीलिंग आलय. अगदी हेच्च अस्सेच!!!! १००% मला हाच प्रश्न नेहमी पडतो.

सध्या कट्टर लोकांची संख्या वाढते आहे हे कधीकधी चिंताजनक वाटतं , ओपन माइंडेडनेस कुठेतरी हरवतो आहे असं वाटतं . तेव्हा ओपन माइंडेड असणं हे उत्तमच .

बाजूच्या व विरोधी आर्ग्युमेण्ट्सचा) सखोल अभ्यास करून आपले मत स्वतंत्रपणे बनवणे, व नवीन माहिती समजली तर ते बदलायची तयारी असणे हे चांगलेच आहे. मात्र हे पुलंच्या असा मी असामी मधल्या "मला सर्वांचीच मते पटायची" सारखे नसावे. >> +१

प्रत्येक बाबतीत मत असावेच किंवा असतेच, असे व्यक्तिशः मला तरी वाटत नाही. मुलाचे नाव तैमूर ठेवले किंवा मुलीचे नाव हिडिंबा ठेवले याने मला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे काहीच मत नाही हा पण पर्याय असतो.
I can live with doubt and uncertainty and not knowing . I think it is much more interesting to live not knowing than have answers which might be wrong. - Richard Feynman

सुमुक्ता: लेख निसटला होता.आता नीट वाचला,पटला.माझंही असंच होतं.
मला वाटतं जोवर स्वतःचं (भावनिक किंवा आर्थिक किंवा सेल्फ एस्टीम चं) संभाव्य नुकसान समोर दिसत नाही, अंगावर येत नाही तोवर आपल्याला सर्वच बाजू पटतात, स्वतःला पटवता येऊ शकतात (ज्या आधिक्य असलेल्या समूहात आपण त्याक्षणी वावरतोय त्यानुसार.काहीवेळा काही भांडणं इतकी वर्थ नसतात की ती आपण जिंकलीच पाहिजेत.किंवा 'at what cost are we winning war' जास्त महत्वाचं ठरतं.)
पण जिथे एखादं मत, दुसऱ्याची एखादी ऍक्शन आपल्या अस्तित्वावर घाला आणणारी असेल तिथे मात्र आपली बाजू ठामपणे मांडणं, जिंकणं गरजेचं ठरतं.