मुलांचे क्युट से किस्से ...

Submitted by छन्दिफन्दि on 4 September, 2023 - 22:32

मुले म्हणजे देवाघरची मुले असं म्हणतात. ह्याच फुलांना थोडी मोठी झाली की शिंग फुटतात. मग हट्ट, उलट उत्तरं .. ह्या वाटेने जाता जाता कधी कधी पालक म्हणून ती शिंगे (किंवा फुलांचे काटे ) आपल्याला बोचतात.

पण त्या आधीचा काळ फारच अगदी छान असतो. त्यांचं निरागस, निष्पाप मन कधी आपल्या काळजाला हात घालत, (लिहिताना, पुलंचं "निरागसता का काय म्हणतात त्या गुणाने कधी कार्ट काळजाला हात घालेल नेम नाही " आठवलंच ) तर कधी कधी चानस हसू फुलवत.
अशाच काही गमती.

***

आम्ही नुकतेच US ला शिफ्ट झालो होतो.
आमच्या नर्सरीतल्या लेकाची पीड़ियाट्रीशनकडची पहिलीच अपॉइंटमेंट होती. सुरुवातीला नर्स आमच्या कडून माहिती घेत तिच्या सिस्टिम मध्ये टाकत होती. होता होता तिने विचारलं,
" अँड race ?"
इतका वेळ टंगळ मंगळ करणाऱ्या लेकाने त्वरीत तो ओळखीचा शब्द पकडला आणि पटकन म्हणाला.
"कालच आमच्या शाळेत running race झाली, आणि आमचा ग्रुप जिंकला. " त्या उत्तराबरोबर सगळी खोली हसण्याच्या आवाजाने भरून गेली.

***

साधारण दोन एक वर्षाचा असेल. स्वयंपाक घरात आला. मी तिकडेच काम करत होते. फ्रिजच दार काही कारणाने उघड होत.
फ्रिजच्या दरवाज्यात त्याला पांढरे बॉल्स एका लायनीत मांडून ठेवलेले दिसले. छोटे डोळे चमकले आणि एक बॉल उचलला. चिमुकल्या हातातून बॉल निसटला,.
"फटॅक.." चिमुकले डोळे विस्फारून बघतच बसले, बॉल उसळून वर नाही आला. पण फुटला. आतून थोडा जेल आणि अजून एक पिवळा सॉफ्ट बॉल बाहेर पडला. अरे हे तर जादूचं आहे काहीतरी .
छोट्या छोट्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये हसू उमटले. अजुन दोन तीन दिसतायत वरती. अजून एक "फटॅक.." अरे परत तसच झालं, एक अजून "फटॅक" पुन्हा तेच.
मी फक्त २-३ फुटांवरून हे सगळं बघत होते.
मी पुरती गोंधळून गेले. छोटूच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणार आश्चर्य बघू कि त्याला अजुन पसारा करण्यापासून थांबवू आणि मौल्यवान अंडी वाचवू. खरं सांगते सगळं नीट समजायला आणि त्यावर action घ्यायला तीस एक सेकंद लागली. तिथपर्यंत ३-४ अंडी फुटली होती
त्या ३० सेकंदात केलेला पसारा आवरण्यात माझा कमीतकमी अर्धा तास तरी गेला हे वेगळ नकोच सांगायला !

***

घरातले शेवटचे दोन आंबे कापून दिले. हापूस आंबा म्हणजे तुमच्या सगळ्यांसारखा आमचाअत्यंत लाडका. आंबा मुटु मुटु संपवून स्वारी आत स्वयंपाक घरात आली. त्याची उंची ओट्याशी पण पोहोचली नव्हती. हातातील वाटी ओट्यावर ठेवली आणि म्हणाला
"अजुन ...?"
"संपला "
त्याने डोळे वर करून पाय उंचावून बोट दाखवले "तो बघ तिकडे, दे ना !"
" राजा, तो आंबा नाहीये, ती बाठ आहे, म्हणजे आंब्याची बी. बघ किती मोठीये. ए, जर बिनबाठीचे म्हणजे सीडलेस आंबे आले तर .... "
अहाहा ! बिनबाठीचा मोठा रसाळ आंबा, त्याचा सुमधुर रस, झालच तर बरोबर गरमागरम पुऱ्या .. स्वर्गसुखच ... माझं स्वप्नरंजन सुरु...
"पण बी नशेल तर अजून आंबे कशे मिळतील ??" मान तिरकी करून वर बघत त्या निरागस चेहऱ्याने मला प्रश्न केला.
खाडकन स्वप्न भंगलं ! मी अचंबित !! एकाच क्षणी बाळाच्या चाणाक्षपणाचं खूप सारं कौतुक आणि स्वतःच्या तारे तोडणाऱ्या डोक्याचं *** (जाऊन दे मी आता त्या भावना सांगत नाही :))

तुमच्याकडे पण छोट्यांच्या काही गमती असतील तर जरूर सांगा.

तळटीप- हा धागा छोट्या मुलांच्या गोड गमती असा आहे. त्यात उगाच बोजड विचार आणि विश्लेषण नाही आणले तरच उत्तम! धन्यवाद!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी मुलीला अनेक गोष्टी एकाच वाक्यातुन शिकवुन, शहाणे करुन सोडण्याच्या अट्टाहासापायी, मी तिला उदाहरणे देत असे - हा फ्रॉक बघ तुझ्यावरती अगदी स्ट्रॉबेरीसारखा लाल चुटुक दिसतो आहे, हा फ्रॉक बघ पानासारखा हिरवा गार दिसतो आहे इ.
मी एकदा काळा पेहेराव केला आणि ती मला म्हणाली आई तू काळीभोर अगदी बॅटसारखी दिसते आहेस.
.
मी हा किस्सा रीडर्स डायजेस्टला पाठवला होता. तो प्रकाशित झाला की नाही माहीत नाही परंतु त्यांचे एका वर्षाचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळाले होते.

>>>>>>त्या ३० सेकंदात केलेला पसारा आवरण्यात माझा कमीतकमी अर्धा तास तरी गेला हे वेगळ नकोच सांगायला !
हाहाहा.
पण त्रागा करायचा नाही. अशा सांडलवणीतूनच मुलं शिकत असतात Happy

छान किस्से
हल्ली शाळांमधे स्रिया किंवा मुलीच शिकवायला असतात विशेषतः प्राथमिक शिक्षणात. माझा पुतण्या आणि आम्ही सारे शाळा शाळा खेळत होतो तर तो म्हणाला बाबा आपल्यात फक्त आईच टिचर होऊ शकते. Only girls are teachers.

माझी पुतणी तेव्हा साडे तीन वर्षांची असेल. एकांच्या घरी गेलेलो. त्यांच्या घरी खाली कोंबड्या होत्या. साहजिकच त्यांना रमत गमत बघून ती वर गेली.
जेवणं झाली आणि गप्पा टप्पा चालू होत्या. तर मध्येच ही दोन पायांवर खाली बसली आणि फ्रॉकचा घेर छान पसरवून गोल केला.
" अग मध्येच काय झालं? अशी का बसलियेस?"

" अग, मी कोंबडी झालिये, आणि अंड देत्ये ..."
जो काही हशा पिकला...

माझ्या अमेरिकेतील ६ वर्षाच्या नातवाला त्याचे खेळणे सापडत नव्हते... आणि त्याला मोबाईल आम्ही वर्ज्य केला होता.... काही वेळाने तो म्हणाला आजोबा! तुमचा मोबाईल वापरून माझे खेळणे शोधा ना? मला कळेना....
तो म्हणाला " गूगल करा ना! सापडेल!!

अग, मी कोंबडी झालिये, आणि अंड देत्ये ..." Lol

गूगल करा ना! सापडेल!!>> यावरुन आठवलं, माझी मुलगी मोबाईलवर कोणतातरी गेम खेळत होती. लेकाला पण तो गेम खेळायचा होता म्हणून तिच्याकडे तो सारखा दिदी मलापण दे ना करत मागे लागला होता. पण ती काही देत नव्हती. मग त्याने माझा मोबाईल घेतला, प्ले स्टोअर मध्ये गेला. त्याला अजून लिहता, वाचता येत नाही त्यामु़ळे तो वॉईस कमांड देतो. तर त्याने प्ले स्टोअर मध्ये कमांड दिली '' दिदी बघतेय तो गेम, दिदी खेळतेय तो गेम" Lol

माझी ऑफिस मधली एक सहकारी drawings/ पेंटिंग्ज जायला लागलेली. फारच सुंदर काढायची ती.

एकदा माझा ४-५ वर्षाचा मुलगा, काहीतरी काढत बसलेला. N राहवून त्याला म्हंटल, " अरे ती एक मावशी आहे ना, ती इतकी सुंदर चित्र काढते.."
पटकन मन वर करून अत्यंत निरागसपणे विचारलं, " माझ्यापेक्षाही सुंदर??? "
मला खर बोलू की खोटं ह्या संभ्रमात काही सुचेना...

नंतर त्याच मैत्रिणीला सांगितलं, तर हसत म्हणते, "सांगायच ना, नाही रे बाबा तुझ्या येवढं छान नाही जमत तिला.. "

>>>>मला खर बोलू की खोटं ह्या संभ्रमात काही सुचेना...
अर्रे इस मे संभ्रम की क्या बात है???? Sad Sad एवढ्याश्या चिमुकल्यापुढे सत्यवादी धर्मराज व्हायची काहीच गरज नाही Happy

अर्रे इस मे संभ्रम की क्या बात है???? Sad Sad एवढ्याश्या चिमुकल्यापुढे सत्यवादी धर्मराज व्हायची काहीच गरज नाही Happy >>>> खर आहे. पण मला पट्कन थाप मारायला सुचत नाही Sad Sad Sad

त्या दिवशी शाळेत मधल्या सुट्टीत एक किंडरगार्डन चा मुलगा रडायला लागला.. अगदी उमाळे फुटत होते त्याला.

" Xyz ने एका किड्याला मारल...". परत सुरू

" माझ्या बाबांनी सांगितलय कोणत्याही प्राण्याला मारायचं नाही ..... " परत रडण सुरू .
त्याला कस बस गप्प करत होते.. पण मनात हसायला येत होत, " अरे तुझे पिताश्री आणि तुम्ही कुटुंबीय रोज जे सी फुड खात ते कुठल्या अहिंसेच्या मार्गाने मिळवता..?" अर्थात ते त्यांचं अन्न असतं हा भाग निराळा...

पण मनात हसायला येत होत, " अरे तुझे पिताश्री आणि तुम्ही कुटुंबीय रोज जे सी फुड खात ते कुठल्या अहिंसेच्या मार्गाने मिळवता..?" अर्थात ते त्यांचं अन्न असतं हा भाग निराळा...
>>>

हा भाग निराळा आणि तोच महत्त्वाचा आहे.
उद्देश निराळा असतो म्हणून तर एखाद्या खूनी व्यक्ती आणि सीमेवरील जवानांमध्ये फरक असतो.

आम्ही सुद्धा मांसाहारी आहोत आणि घरी मुलांना हेच शिकवतो की निरुपद्रवी मुक्या जीवांना त्रास देऊ नये.

असो, हा वेगळा विषय आहे. पण अगदीच राहवले नाही म्हणून बोललो. ते यासाठी की मांसाहारी लोकांना कोणा प्राण्याच्या जीवाचे काही पडले नसते असा गैरसमज कोणाच्या मनात कधी राहू नये..

मी हे स्वतंत्र धाग्यात घेतो.
कारण त्या दिवशी अश्या गैरसमजाला खतपाणी देणारे मी मुलांच्या अभ्यासक्रमात पाहिले.

तुम्ही ह्या बाबतीत भावनिक झालात तर कठीण आहे..

पण त्या परिस्थितीत लॉजिकल contradiction होतं.
मला आता वरची कॉमेंट वाचून बा.भ. बोरकर यांची आठवण झाली. .

कवितेच्या ओळी आहेत की किस्सा ते नेमक आठवत नाहीये..

" मी गेल्यावर माझा देह नदीत टाका... इतके वर्ष मी त्यांना खाल्ले आता त्यांची पाळी किंवा ऋण मुक्त होऊ अस काहीतरी..."