याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83950
"तुमच्या सगळ्या मैत्रिणीच आहेत का? आय मीन आजपर्यंत तुमच्या एकाही मित्राचा मी उल्लेख ऐकलेला नाही." साक्षी म्हणाली.
"टोळी होती कॉलेजला यांची, आणि हा म्होरक्या. वीस पंचवीस जण एकत्र असायचे. नाव काय ठेवलं होतं तुझं?"
"गप्प ना स्नेहल."
"हा. सालार, म्हणजे कमांडर. आता आठवलं. कुणी ठेवलं होतं रे हे नाव?"
"मोहैदिन..." तो म्हणाला.
"म्हणजे मित्र होते तर." साक्षी म्हणाली.
"मित्र होते, आणि मैत्रीण सुद्धा होती. सांगितलं का हिला?"
"स्नेहल..."
"कोण होती सर?" साक्षीने साळसूदपणे विचारले.
"माहिती नाही मला." तो गाडी चालवत म्हणाला.
"शरावती... मैत्रीण, सखी, प्रेयसी, इत्यादी इत्यादी. म्हणजे कॉलेजमध्ये फेमस असतील, तर शरा आणि मनिषच."
"सिरीयसली?" साक्षी म्हणाली.
"येस. सरांना शरापुढे काही दिसत असेल तर शपथ. शराच्या प्रेमात आकंठ बुडालेले."
"अजून सांगा ना." साक्षी उत्साहाने म्हणाली.
"गप्प बस साक्षी. स्नेहल तूसुद्धा."
"हो. आम्ही गप्पच बसणार. तिथे जाऊन जे काही बोलायचं ते तू बोलायचं."
"हो मीच बोलेन."
"पण, एक विचारू मनिष?" स्नेहलने विचारले.
"विचार ना."
"अजय कुठे आहे आजकाल?"
गप्प.
तो गप्प झाला.
सिनियरला आज कित्येक दिवसांनी त्याच्या नावाने कुणीतरी विचारलं होतं.
"माहिती नाही, नो कॉन्टॅक्ट."
"अरे, तुझा सगळ्यात जवळचा मित्र ना तो."
"कॉलेजनंतर संबंध संपला स्नेहल." तो त्रोटकपणे म्हणाला.
"ओके. स्ट्रेंज." ती म्हणाली.
"ते जाऊ द्या. शराविषयी बोलूयात." साक्षी उत्साहाने म्हणाली.
"आता शराविषयी एकही शब्द नाही." "ओके. चला तिचं घर आलं."
त्याने गाडी थांबवली.
तिघेजण खाली उतरले.
साक्षी पुढे निघालो.
"स्नेहल, ती शराची सख्खी बहिण आहे, माहितीये तिला सगळं."
"काय?" स्नेहलला शॉकच बसला.
हो मॅडम. चला.
ते एक दुमजली घर होतं. बाहेर एक गेट होता. आजूबाजूला बरीच मोठी बाग होती, एरिया मोठा होता.
तिघेजण गेट उघडून आत गेले, आणि घराकडे निघाले.
"सर. नीट बोला." साक्षी म्हणाली.
"हो ग."
त्याने बेल वाजवली.
आणि तो झटकन मागे फिरला.
अचानक त्याची धडधड प्रचंड वाढली.
"मनिष." स्नेहल ओरडली.
तेवढ्यात दार उघडलं.
कोण हवय आपल्याला? एक उतारवयीन स्त्री समोर होती.
"प्राजक्ता." स्नेहल न राहवून म्हणाली.
आपण कोण?
"मी तिची मैत्रीण. स्नेहल. आणि ही साक्षी."
"बरं आत या. हे कोण."
"ड्रायव्हर. आमचा ड्रायव्हर..." साक्षी म्हणाली.
तो अचानक भानावर आला. पण आता गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
सगळेजण आत आले.
"मी प्राजक्ताला बोलावते. प्राजक्ता..."
"आले आई," ती बाहेर आली.
...आता भांबावण्याची पाळी तिची होती. ती अक्षरशः स्तब्ध झाली.
"हाय. अग तू फोन सुद्धा उचलला नाहीस माझा? किती वेळ? शेवटी मला यावं लागलं." स्नेहल म्हणाली.
"हो ना. सूरगाण्याला जायचंय ना?" साक्षी म्हणाली.
"सुरगाणा, काय आहे प्राजक्ता हे?"
"अहो आई, तुम्हाला सांगायचं विसरलेच. आज सुरगाण्याला परफॉर्मन्स होता. आदिवासी लोकांसाठी. पण जाणं आणि परत येणं शक्य नाही, म्हणून मी गेले नाही."
"अगं तुला बोलले होते मी, माझी गाडी आहे. घरचा ड्रायव्हर आहे. तरीही? तुझ्याविना आम्हाला शक्य नाही होणार." साक्षी म्हणाली. "राघवला घे ना सोबत. त्यालाही मस्त वाटेल फिरायला..."
"नाही शक्य." ती कोरडेपणाने
"अग जर त्या इतकं म्हणतायेत, तर जा ना. नेहमी काम काम काम करत असतेस. जाऊन ये."
"मग. चल आवर पटकन." स्नेहल म्हणाली.
"ठीक आहे." ती सुन्नपणे म्हणाली.
थोड्याच वेळात ती तयार होऊन आली. सोबत तिचं बाळ कड्यावर होतं...
...झोपलेलं, शांतपणे...
आज पहिल्यांदा तो त्याला बघत होता.
त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं...
'...राघव...' तो पुटपुटला.
"ड्रायव्हर, बॅग घे." स्नेहल म्हणाली.
त्याने बॅग उचलली.
"आई मी लवकर येईन."
"हो, निवांत ये."
सगळेजण घराबाहेर आले.
"पुढे कोण बसणार आहे?" स्नेहल म्हणाली.
"तुम्हा दोघिंपैकी कुणीही." प्राजक्ता कोरडेपणाने म्हणाली.
"अगं."
"बस करा. इथून निघूयात आता." प्राजक्ता म्हणाली.
साक्षी पुढे बसली.
स्नेहल आणि प्राजक्ता मागे.
त्याने निमूट गाडी काढली.
थोडा दूर गेल्यावर...
"गाडी थांबव मनिष..." तिच्या आवाजात कोरडेपणा होता.
त्याने गाडी बाजूला घेतली.
हायवे वरून भरधाव गाड्या जात होत्या.
"उतर खाली..."
"काय?"
"खाली उतर..."
...तो निमूट खाली उतरला.
"याला सांभाळशिल प्लीज?" त्याने स्नेहलकडे राघवला दिले.
तीसुद्धा खाली उतरली.
तो तिच्या समोर होता...
खाड...
आसमंतात आवाज घुमला.
दोघीजणी सुन्न होऊन बघतच राहिल्या.
ती अजूनही रागाने धुमसत होती.
त्याचा गाल अक्षरशः लालेलाल झाला.
"मूर्ख आणि बालिशपणाचा कळस केलास तू. कळलं का तुला. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, की तू असा वागशील. मूर्खा, माझं लग्न मोडलं असतं आज तू... कळतय? सुसाईड करू मी? मूर्खा कळत कसं नाही तुला, नाही प्रेम करत मी तुझ्यावर. माझं प्रेम, माझं सर्वस्व फक्त माझा मुलगा आणि माझा नवरा आहे."
"अग..."
"एक शब्द बोलू नकोस. माझं हात अजूनही थरथर कापतोय भीतीने...आणि तुम्ही दोघीजणी. तुम्हाला सुद्धा अक्कल नव्हती?
तुझ्याकडे सगळं असेल, पण मला नकोय तू. जा रे, शोध ना कुणी दुसरी. अजून एक. तुझ्या विषयी मला काहीही वाटत नाही. अगदी काहीही नाही. एक मित्र म्हणून मानत होते. आता तेही नाही. आताच्या आता घरी सोड मला..."
"...अग मी फक्त."
"गप्प बस मूर्खा. गप्प बस. अगदी अगदी गप्प बस."
"मी बोलू?" स्नेहल शांतपणे म्हणाली.
"काही बाकी आहे?"
"हो. आता जर तुला घरी सोडलं, तर तुझ्या सासूबाईंना शंभर टक्के संशय येईल. आणि उद्या जर तुझ्या घरी कळलं, की तू परफॉर्म केला नाही, तर अजून वाईट."
"धमकी देतेय मला?"
"रियालिटी सांगतेय. आणि हे कुठून ना कुठून कळेलच."
"मग काय करू मी?"
"परफॉर्म..."
"मी तुला त्या अवस्थेत दिसतेय?"
"शांत झालीस तर नक्कीच बेस्ट देशील."
तिने दीर्घ श्वास घेतला.
"तू माझ्या नजरेतून साफ उतरला आहेस मनिष..." चला. तुम्हाला हे हवं ते करूयात. निघुयात सुरगाण्याला...
"...साक्षी." तो म्हणाला...
"काय सर?"
"प्लीज ड्राईव्ह कर यार. आय थिंक आय शुड लिव राईट नाऊ."
"तूही येणार आहेस. पळपुटेपणा करू नकोस." ती अजूनही धुमसत होती.
"मनिष. बस कर..." स्नेहल म्हणाली.
सर्वजण पुन्हा गाडीत बसले.
गाडी निघाली.
सूरगाण्याच्या दिशेने...
*****
तिला बघून तिचा ग्रुप अचंबित झाला.
तू येणार नव्हतीस ना.
"आले. स्नेहल मॅडम सोबत..."
"...हाय मॅडम." तिच्या ग्रुपच्या मुली म्हणाल्या.
"आय फिल आय शुड एन्जॉय द इव्हणिंग हीयर."
"डेफिनेटली मॅडम."
"प्राजक्ता. राघवला आम्ही सांभाळतो. यू प्लीज..." स्नेहल म्हणाली.
तिने राघवला जवळ घेतले.
प्राजक्ता चेंजिंग रूममध्ये गेली.
"मनिष." स्नेहल म्हणाली.
"बोल ना."
"प्लीज सांभाळ आता याला."
"मी?"
"मग? प्रेयसी तुझी, बाळ तिचं. झाली तितकी मेहनत पुरे झाली माझी."
"ये बाई, मला बाळांसोबत खेळण्याचा अजिबात अनुभव नाही, आणि आवड सुद्धा नाही. आठवतय कॉलेज मध्ये मी भारताची लोकसंख्या किती जास्त आहे आणि लोकांनी मुलं जन्माला का घालू नयेत यावर लेक्चर दिलं होतं."
"तू मूर्ख होतास आणि आहेस. नीट सांभाळ." स्नेहल रागाने म्हणाली.
मनिषने त्याला कडेवर घेतलं...
त्याने जोरात भोकाड पसरलं...
"बघ स्नेहल..."
"त्यालाही कळतय... तू मूर्ख आहेस ते. ट्राय कर. बाय."
"स्नेहल..."
तो रडत होता...
...आणि हा पूर्णपणे गलितगात्र...
"... अरे शांत हो. प्लीज..."
...तो रडतच होता...
"...हे. हे.." त्याने एक बोट त्याच्या हातात दिलं.
त्याने ते पकडलं.
तो कुतूहलाने त्याच्याकडे बघू लागला.
"गुड." तो म्हणाला.
हे तेवढ्यात स्पिकरचा आवाज झाला...
... तो पुन्हा रडायला लागला.
"सिरीयसली..."
तो त्याला उचलून बाजूला घेऊन गेला... थोडं लांब.
तो थोडा शांत झाला.
"...आय थिंक एव्हरिथिंग विल बी फाईन नाव." तो पुटपुटला.
तो त्याच्या बोटाशी खेळत होता.
"हे बडी." मनिष म्हणाला.
त्याने त्याच्याकडे बघितले.
"अच्छा बघतोय होय. ओके. चल गप्पा मारायच्या?"
तो कुतूहलाने त्याच्याकडे बघू लागला.
"ओके. आय थिंक तूच माझं ऐकशील आज. मेबी."
तो हसला.
"हसतोय अजून. खरच... आईवर गेलाय.
तर बडी, एक छानशी गोष्ट सांगू? तुझ्या मॉमवर मी इतकं प्रेम करतो ना, की काहीच बोलू शकत नाही जास्त. हिरो जाऊ दे, एक माणूस म्हणून मी उभा नाही राहू शकत. इश्युच आहे माझा.
तुझी ममा राईट आहे. मी खरच मूर्ख आहे. मला असं वाटतं, मी सगळं जग जिंकेन, सगळं जग तुझ्या ममाच्या पायाशी आणून ठेवेल. सिली मी. बडी मला कुठे थांबावं कळतच नाही रे. आय डोन्ट नो."
त्यानेही मान हलवली.
"आईशपथ तुला कळतय रे सगळं... हुशार आहेस. तर बडी. एक सांगू? तुझ्या ममावर, आणि तुझ्यावर... मी जीवापाड प्रेम करेन. आताही करतोच रे. जगातलं सगळं बेस्ट, तुम्हा दोघांसाठी. जगातलं सगळ्यात बेस्ट हजबंड, तुझ्या ममासाठी, आणि बेस्ट पप्पा तुझ्यासाठी...पण सगळं संपलं असं वाटतंय रे आता... खूप त्रास होतोय, कुणावर जीवापाड प्रेम करावं आणि झिडकारून लावावं असं... यू कॅन फिल द पेन..."
"... येस अँड आय कॅन रिलेट टू." मागून आवाज आला.
स्नेहल उभी होती.
"यार स्नेहल..."
"यार मनू, कळतय का आज, कुणावर आपण जीवापाड प्रेम केलं आणि त्याने झिडकारून टाकल्यावर कसं वाटतं?"
तो गप्प बसला.
"तुला सांगू मनिष. कायम असं वाटायचं, यार माझ्यामध्ये काय कमी आहे शरापेक्षा? होती ती मॉडेल, होती ती सगळ्यांची क्रश, पण मी कुठे कमी होते रे? "
"स्नेहल, एकाच वेळी दोन व्यक्तींवर कसं प्रेम करू? सांग ना तू?"
"इश्यू माझा नाहीये मनिष. इश्यू माझा नाहीये. मी कधीही तू माझ्यावर प्रेम केलं नाहीस म्हणून तुटले नाही."
"मग?"
"व्हॉट अबाऊट अदर्स? मी एकटीच होते?"
"मी काय चुकलो."
"तू किती मुलींना सरळ झिडकारून टाकलंस याचा विचार केला? तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी फक्त शरा होती?"
"मग मी काय करायला हवं होतं स्नेहल?"
"फक्त एक चांगली व्यक्ती म्हणून नीट समजावून सांगायला हवं होतंस मनिष. पण नाही, तू तुझ्याच धुंदीत जगत होतास. तुला असं वाटत होतं, की या जगातला सगळ्यात मोठा सुपरस्टार तूच आहेस."
तो हसला.
"हसतोय काय?"
"अग, तुला काय वाटलं, हा विचार मी कधी केला नसेल?"
"काय?"
"मॅडम, ज्या सर्व गोष्टींवर मला कॉलेजमध्ये गर्व होता ना, त्या सगळ्या मी गमावल्या होत्या. ज्या मनिषवर तू प्रेम केलं होत ना, तो कधीच हरवून गेला होता. स्नेहल, तू मला माझ्या वाईट फेजमध्ये कधीही बघितलं नाहीस. आणि तेव्हा मी सतत हाच विचार केला होता..."
"...म्हणजे?"
"म्हणजे ज्या गोष्टींविषयी तू बोलतेय ना, ज्याचा मला अहंकार होता ना, मी सर्व गमावलं होतं..."
एव्हाना राघव त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेला होता.
"स्नेहल, दोन वर्ष... दोन वर्ष मी आजारपणात काढली. एक संपलं, दुसरं चालू. दुसरं संपलं, तिसरं चालू... माझा जॉब गेला. स्वतःच रंग रूप सोड ग, अस्तित्व सगळं गमावलं... स्नेहल मी जिवंत कसा राहिलो असेल हे मला माहिती...
...आणि एक दिवस ती मला मंदिरात दिसली...आणि माझं आयुष्य बदललं. हा जो मनिष दिसतोय ना, तो फक्त तिच्यामुळे. नाहीतर...
...जाऊ दे. एक सांगतो. मला जाणीव आहे स्नेहल. मला जाणीव आहे. जस्ट आता प्राजक्ताला गमवायचं नाहीये. खरच गमवायचं नाहीये. हा छोटू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलाय ना, त्याला गमवायचं नाहीये."
त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले.
"शांत हो." ती म्हणाली.
थोडावेळ कुणीही काहीही बोललं नाही.
"बाय द वे, मी आज तुझ्यासोबत का आले माहितीये?"
"बोल ना."
"कारण उद्या माझा कॉलेजचा शेवटचा दिवस आहे. मी रीजाईन केलंय."
"आता...मी काय बोलावं? सगळ्यांनीच निघून जायचं म्हटल्यावर."
"अरे. आपण इतकेही जवळ नव्हतो मनिष."
"तू माझी मैत्रीण होतीस स्नेहल, आय मीन आहेस. "
"मग अस समज की तुझी मैत्रीण तिची स्वप्ने पूर्ण करायला चालली आहे. अरे मी फक्त काम काम काम करत होते रे... मला फक्त काम हवं होतं म्हणून...पळत होते जुन्या आठवणीपासून पण आता नाही. आता असं वाटतंय, मला आवडतं ते करावं."
"यार आधी माझे डोळे पुस बरं." याला पकडलंय मी तर दोघेही हात बांधले गेलेत.
ती हसली. तिने त्याचे डोळे पुसले.
"मनिष... एक सांगते. कॉलेज संपताक्षणी मी लग्न केलं. अरेंज मॅरेज. पहिल्याच रात्री माझ्यावर अक्षरशः बलात्कार झाला नवऱ्याकडून. आणि त्यानंतर प्रत्येक रात्री तो माझे अक्षरशः लचके तोडत राहिला. मुलगा झाला मला वर्षभरात... शेवटी तो सहा महिन्यांचा असताना घर सोडलं... आई बाबांकडे आले. त्यांच्यावर जबाबदारी नको म्हणून जॉब पकडला. आणि तो पाच वर्षांचा असताना गेला मनिष. अचानक. गणपती बाप्पाच्या विसर्जनाला गेला, आणि त्याच्याकडेच गेला. मागच्याच वर्षाची गोष्ट. मनिष. संपलं माझं आयुष्य रे. असं वाटत होतं, त्या दिवशी मीही जावं बाप्पाकडे. जाब विचारायला... नाही झालं शक्य. दररोज रात्री बोलते त्याच्याशी. सांगते त्याला, ममा किती प्रेम करते तुझ्यावर...
...याला खेळवत असताना बघितलं तुला, असं वाटलं माझ्या बाळाला असा बाप मिळाला असता तर? किती छान राहिलं असतं ना सगळं?"
"एक सांगू स्नेहल?"
"बोल ना."
"शेवटी आपण तिघेही अधुरे राहिलो. ना शरा, ना मी, ना तू... सगळेजण आपल्याच धुंदीत राहिलो, आणि नियती खेळत राहिली. पण तुझं आयुष्य अजूनही संपलेल नाही. जा. स्नेहल आय प्रॉमिस, तू खूप सक्सेसफुल होशील. तुझे सगळे स्वप्न पूर्ण होतील..."
"...मला मनू मिळेल? ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं?"
"हो नक्की मिळेल. या मनूपेक्षा खूप चांगला, समजदार, आणि तुझ्यासाठी तितकाच उत्कट, हळवा मिळेल... आशीर्वाद आहे. मनूचा आशीर्वाद वाया जात नाही..."
"... थॅन्क्स... चल जाते मी." नाहीतर तुझ्यासारखीच रडेन...
"जा. यशस्वी भव."
ती तिथून निघून गेली.
"बडी, तू झोपलास यार. खूप गप्पा मारायच्या होत्या. आयुष्यात पुन्हा चान्स मिळतो का नाही. आपली पहिली आणि शेवटची भेट ठरेल बहुतेक ही. खूप जीव आहे तुझ्यावर माझ्या. अरे, एका भेटीत तुझ्या ममापेक्षा तू जास्त आवडायला लागला मला.
सो लिट्ल बेबी, आय विल ऑलवेज बी विथ यू. अँड होप समडे, मॉम विल बी विथ अस."
"शी इज हियर ऑलरेडी. मनिष."
त्याने मागे वळून बघितले.
मागे प्राजक्ता उभी होती....
क्रमशः
लगेच नवीन भाग.. !! Thumbs up
लगेच नवीन भाग.. !!
Thumbs up
प्रामाणिक मत सांगायला नको
प्रामाणिक मत सांगायला नको वाटतंय.
पण सांगतो,
खूप जास्त बालिश होत आहे हे. पुढे कथा वळण घेईल अशी अपेक्षा.
पुभाप्र...!!
पुभाप्र...!!
Balish
Balish