Tour du Mont Blanc भाग १० - सातवा दिवस आणि अखेर

Submitted by वाट्टेल ते on 10 August, 2023 - 09:46

आज finale त्यामुळे फ्रेडलाच प्रचंड घाई होती. रोज आम्हाला वारंवार ब्रेक देणाऱ्या त्याने आज जराही विश्रांती न देता घोड्यावर बसवले. ७:३० ७:४० ला वगैरेच निघालो. आधी बराचसा चढ आणि त्यात आम्ही निवडलेला रस्ता म्हणजे अक्षरश: गायींची सकाळची किंवा एकूणच दिवसभरात कधीही आन्हिके करण्याची जागा होती. कालच्या चीज फॅक्टरीला टेकाडावरून ज्या गायी उतरत होत्या, त्याच्या मागच्या बाजूला हा रस्ता असावा असे वाटते. दगड माती बर्फ पाणी गवत फुले सिमेंट डांबर लाकूड लोखंड एवढ्या सगळ्या गोष्टींवरून ७ दिवस चाललो होतो. आज शेणावरून चालणे झाले, काही राहिले म्हणून नाही. अनायासे शेणखत मिळत असल्यानेचे असेल पण वाटेने सुंदर सुंदर फुलझाडे झुडुपे अगदी बहरली होती.
10_1.jpg
काल मुक्कामाच्या इथे भेटलेली २ तरुण मुले, बाहेरच कुठेतरी झोपली होती बिचारी आणि आत मजेत चढत होती. त्यांची दुसऱ्या एका म्हाताऱ्याबरोबर रेस चालू होती, त्यांच्यातल्या त्यांच्यात. ती सगळी मंडळी आम्हाला पास करून पुढे गेली. दम लागला तर क्चचित बसत होतो, अगदीच नाही असे नाही पण एकूण नेहमीपेक्षा जास्त वेगाने पुढे जात होतो हे नक्की. एक बर्फाचा आणि मग पाण्याचा मोठा patch ओलांडायचा होता, तो झाल्यावर फ्रेडने बाकीचांना ‘सुटा’ म्हणून मुभा दिली आणि वर एक mountain hut आहे तिथे थांबा असे सांगितले.
10_2.jpg
त्याप्रमाणे आम्ही पुढे पुढे गेलो. आणि वर जाऊन बसलो. पाठोपाठ पारू- कुलकर्णीपण आलेच. मग पुढे निघालो. अजून दोन तीनशे फुटांवरच आजचे summit होते. Trip मधले शेवटचे summit, इथून आता पुढे फक्त खाली उतरणार म्हणून तिथे बऱ्यापैकी फोटोसेशन झाले.
उतार सुरु झाला आणि आपण कोलोरॅडोत तर नाही अशी भावना झाली. अशक्य दगड, शिळा होत्या. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा म्हणत म्हणत फ्रेडच्या पावलांवर पाऊल ठेऊन पुढे सरकत होते. आजही ती वाट डोळ्यांसमोर आली तर काटा येतो. Descent पण तसाच जबरदस्त होता. आम्ही किमान उतरत तरी होतो. आम्हाला उलट येणारे लोक त्यावरून चालत येत होते , त्यांची मला जास्त दया आली. विशेषतः असे उतरताना एक एक पाऊल , एकेक क्षण alert रहावेरून लागते. या उतारावरून दरीत कोसळण्याची भीती नसली तरी किंचित पाय वाकडा-विचित्र पडला, मुडपला, मुरगळला तर काय होईल हा भीतीचा गोळा होता. ७ दिवस फिरताना मध्ये ३-४ वेळा तरी हेलिकॉप्टर दिसलेले. डोंगरात हेलिकॉप्टर दिसणे ही फारशी चांगली खूण नाही इति फ्रेड. तेव्हा आपल्याच दोन्ही पायांवर धडपणे खालपर्यंत उतरायचे आहे इतकेच डोक्यात ठेवले. मात्र या वेळेसाठी साजेसे माझ्याकडे रेकॉर्डेड गाणे नव्हतेच. उतरताना पडोसन मध्ये ‘एक चतुर नार’ च्या कडव्यांमध्ये आणि शेवटीपण किशोर जे काही गातो ते आणि तेच डोक्यात येत होते आणि त्याची गंमतही वाटत होती. शेवटच्या आरडाओरडीत सुनील दत्त खाली कोसळत, पडत असतो तसेच आपण फरपटत किशोरकुमारने म्हणजे फ्रेडने सेट केलेल्या फास्ट लयीत उतरत आहोत असे वाटायला लागले. एकदाचे खाली पोहोचलोकीच डोक्यातले ते गाणे आणि गाण्यातला शेवटचा कल्लोळ एकदाचा संपेल असे वाटले.
उतारावर फोटो काढता येतील अशी परिथिती नव्हती, हा फोटो डेंजर उतार संपला तेव्हा
10_3.jpg
तेवढ्यात फ्रेड अचानक म्हणाला “STOP” आणि त्याने सर्वांना एकदम चिडीचूप केले. बघतो तर ५० एक फुटांवर ibex बसले होते, त्यांचे चारणे, मुक्त विहार चालू होता, आमची दखलही न घेता. आम्हीही थोडे त्यांना न्याहाळून आमच्या वाटेल लागलो.
10_4.jpg
अगदी १ पर्यंत वाट अशीच तुडवत राहिलो आणि शेवटी थांबून जेवायचे ठरवले. आज कुसकुसचे ( वरीसारखे धान्य) सॅलड होते. बीट, टोमॅटो , मक्याचे दाणे, कधी कोणती धान्ये, क्चचित टोफू, ऑलिव्ह, green leafy काहीही आणि त्यावर काही dressing अशी सॅलड फ्रेड उत्तम बनवत असे. गाईडच्या ट्रैनिंगमध्ये याचेही ट्रैनिंग होते. ब्राउनीसुद्धा अतिगोड नाही, अति moist किंवा कोरडी पण नाही, थोडक्यात perfect bliss point होता. इथे पोहोचेपर्यंत विशेषतः: डाव्या गुढग्याने गुढगे टेकायला सुरुवात केली होती पण मी रेटून नेट होते, आता शेवटच्या २-३ तासांचा प्रश्न होता. जरा stretch केले, biofreeze चोपडले, तेवढ्यावर उरलेला प्रवास झाला असता. नंतरची वाट जरा सरळ होती. एका वळणावर, तिथल्या एका माणसाने जरा बाजूने चालायला सांगितले. प्रकार काय म्हणून बघत आम्ही २ मिनिटे त्याच्याजवळच थांबलो तर TMB रेस करणारे काही लोक पाठून जोरजोरात पळत येत होते. त्यात एक बाईपण होती. आम्हाला त्यांना cheer करायला म्हणून ओरडण्याचे त्राणही फारसे नव्हते पण तरी ओरडलो. आमची अवस्था बघून तेच आम्हाला cheer करून गेले.
पुढे उतरत राहिलो, आता फार अवघड नसले तरी शरीराने थकायला झाले होते, कदाचित आता तास दोन तासात ट्रेक संपणार म्हणून तसे वाटत असेल. शेवटच्या तासात आता अजून अर्धा तास, अजून १०० मीटर वगैरे मधाचे बोट तो लावत होता. १०० मीटर horizontal की vertical असे मी विचारले, पण दुर्दैवाने त्याच्या डोक्यावरून गेले. जमिनीवरचे अंतर धरायचेच नाही, किती वर किंवा किती खाली हीच मोजपट्टी होती. ३०० मीटर म्हणजे ३०० मीटर किंवा कदाचित अधिक down असाच त्याचा अर्थ.
10_5.jpg
मध्ये एक सुंदर धबधबा लागला, तिथपर्यंत पोहोचता येणार नव्हते. तसे अनेक धबधबे वाटेत बघितले, त्यामानाने या शेवटच्याला त्याचे dues नीट दिले नाहीत असे वाटते, कारण तो खरोखर सुंदर होता.
10_6.jpg
एकदाचे Notre Dame La Gorge चर्च आले. एरवी कोणत्याही दिवशी मध्ये असे चर्च लागले असते तर आम्ही आत डोकावलो असतो आज मात्र , नुसते बाहेरून बघत, हं ठीक आहे असा शेरा देऊन पुढे निघालो. हे ते प्रसिद्ध Notre Dame नव्हे असेच खूप जुने १४-१५ च्या शतकातले आहे. तसेच चर्च जिनिव्हामध्ये नंतर पहिले. या चर्चचे महत्व म्हणजे इथे रस्ता संपून दोनदार चालू होतो ( किंवा उलट). इथे प्रदक्षिणा पूर्ण झाली.
10_7.jpg10_8.jpg
तिथून हॉटेलपर्यंत मोठ्या गाडीनेच जाणार होतो. गाडीवाल्याने आमच्या माथी ४ पावले कमी चालण्याचे पाप नको म्हणून लांब रस्त्यावर parking मध्ये सगळ्यात लांब spot शोधून गाडी पार्क केलेली. साडेतीनच्या सुमारास तिथपर्यंत पोहोचलो. आता ज्याला त्याला आपापले मार्ग दिसत होते.

सर्वांनाच आणि विशेष करून फ्रेडला निरोप देताना वाईट वाटले. आमचे १५ किलोचे सामान रोज ज्या बॅगमधून जायचे त्याला टॅग दिले होते त्यावर मेंढीचे चित्र होते. पहिल्याच दिवशी यावरून त्याने I am shephard and you are sheep असा विनोद केला होता. पण खरोखर shephard पाळेल, हाकेल तसेच तो आम्हाला हाकत होता हे खरे. त्याने दिलेला एकूण support, त्याचे माहिती सांगणे, सर्वांना सामावून घेणे कौतुकास्पद होते. या माणसाची शारीरिक capacity ( म्हणजे तशी सगळ्याच guide ची) अफलातून,दुसऱ्याच दिवशी तो डोलोमाईट्स ट्रेकला असाच ग्रुप घेऊन जाणार होता. कायम डोंगरभागांत राहिलेला. घरी जाणीवपूर्वक टीव्हीसुद्धा घेतलेला नाही. चालताना, संध्याकाळी भरपूर गप्पा मारायचा. फ्रेंच लोक ग्रुप मध्ये नाहीत यामुळे खुश होता. या फ्रेंच माणसाला, अन्य फ्रेंच माणसे खडूस असतात, लाऊड असतात वगैरे वगैरे म्हणून नको होती. हे एकूण relate झाले. पुन्हा युरोपात गाईड घेऊन ट्रेकला गेले तर फ्रेडलाच विचारेन हे निश्चित.

गाडीवाल्याने आमची मुटकुळी हॉटेलच्या दारात आणून टाकली. पोटी घेऊन २-३ मजले चढण्याची सवय जाऊ नये म्हणून या वेळी हॉटेलवाल्याने २ऱ्या मजल्यावरच खोल्या दिल्या. पोती बॅगा सगळेच वाहून वर नेले. ७ दिवस चाललेला ट्रेक संपला. तो कधीपासून करण्याचे डोक्यात होते ते साध्य झाल्याने भरून पावले. अशा एका break ची नितांत गरज पुरवली गेली. आहे त्या शारीरिक, मानसिक क्षमतेची कसोटी झाली. comfort झोन च्या बाहेर पडणे - अधून मधून का होईना गरजेचे असते, ते ही झाले. इतपत फिटनेस होताच की ट्रेक केला पण recover अगदी लगेच झाले पण अजून stamina वाढवण्यासाठी बळ मिळाले, उमेद मिळाली. स्वतःशी संवाद झाला. आल्प्सला त्याच्या भव्यतेच्या तोडीचे संगीत ऐकवले, त्या वातावरणासह ते माझ्याही कानांत भरून घेतले. अगदीच कधी low वाटले तर या ७-८ दिवसांची डबी उघडेन, एकेक रस्ता, वळण, ओढे,वाटेवरच्या अनेक क्षणांचे अवलोकन करेन. आहे त्या गोष्टीतून बाहेर येण्याएवढे बळ मिळेल ही खात्री वाटावी इतकं संचित निश्चित गाठीला लागलं. शिवाय TMB चा ही शिक्का बसल्याने आमचा भाव मित्रमंडळीत एकूणात थोडा वधारलेला आहे. आल्प्समधली मैयादेवी मला पावली असे म्हणायला हरकत नाही.

Tour Du Mont Blanc सुफळ संपूर्ण !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख झाला ट्रेक आणि लेखमालाही छान झाली. नुसतं चालण्याचं आणि परिसराचं वर्णन न करता मनात आलेल्या विचारांबद्दल, मूडबद्दल, ऐकलेल्या संगीताबद्दलही लिहिण्याची तुमची शैली आवडली. मला वाटतं किलिमांजारोच्या लेखमालिकेतही अशाच प्रकारे लिहिलं आहात. पुलंच्या लेखनातले संदर्भही आवडले.

TMB चा ही शिक्का बसल्याने आमचा भाव मित्रमंडळीत एकूणात थोडा वधारलेला आहे. >>>
विषयच नाही TMB म्हणजे मोठी कमाई !

असेच ट्रेक करत रहा, लिहित रहा

खूप मस्त झाली मालिका. लेखनशैली फार आवडली त्यामुळे मजा आली रोजचे वर्णन वाचायला.

खूपच मस्त झाली आहे मालिका. लिहिण्याची स्टाईल पण खुसखुशीत.. तुमचा ग्रूप ही छान जमून आला होता बहूतेक..
ही जागा खुणवू लागली आहे आता.

छान लेखमाला .
डोळे निववणारे फोटो आणि तुमची जी काय तंद्री लागायची ती शब्दातून पोहचली नेमकी त्यामुळे अजूनच छान.

वावे+१
ग्रेट ! मस्त झाली लेखमाला ! सुंदर वर्णन फोटो आणि सगळंच !
इथे आहोत तोपर्यंत नवऱ्याला मनवते ह्या ट्रेक साठी .. hope for the best !