नमस्कार
ऋन्मेऽऽष यांच्या या धाग्यावर (https://www.maayboli.com/node/82986?page=2#new ) झालेल्या चर्चेनुसार हा नवा धागा काढतो आहे.
एक विनंती : त्या धाग्यावर वर्णन केलेले प्रकरण आपल्या सर्वांच्या माहितीचे आहे. त्याचा कुठलाही संबंध इथे न जोडता स्वतंत्रपणे आणि तटस्थ चर्चा व्हावी ही अपेक्षा.
खालील मजकुरात मी काही शंका उपस्थित केल्यात. त्यातल्या काही बाळबोध सुद्धा वाटू शकतील. परंतु मनातील अशा सर्व शंकांचा निचरा व्हावा हाच हा धागा काढण्यामागचा हेतू आहे.
** ** **
समाजात अनेक जणांवर अचानक काही ना काही शारीरिक आपत्ती ओढवते- जसे की अपघात, गंभीर आजार आणि त्याची शेवटची अवस्था. अशा प्रसंगी मोठी आर्थिक तरतूद करण्याची वेळ येते. ज्यांच्या बाबतीत अशी कौटुंबिक तरतूद करता येणे अवघड असते, ते लोक आर्थिक मदतीसाठी निरनिराळ्या वृत्त आणि समाजमाध्यमांमधून आवाहन करतात. आपणही बऱ्याच वेळा अशा प्रकारची आवाहने वाचतो.
संबंधित बातमीमध्ये ऑनलाईन पैसे कोणत्या बँक खात्यात पाठवायचे याची योग्य ती माहिती दिलेली असते. या प्रकारची सेवा देणारी काही संस्थळे किंवा ॲप्स अलीकडे निर्माण झालेली आहेत. त्यांच्यामार्फतही मदतीचे आवाहन केले जाते आणि तिथे आपण मदत पाठवू शकतो. तिथे ज्याला रक्कम पाठवायची त्याच्याबद्दलची माहिती, त्याची एकंदरीत शारीरिक परिस्थिती, दाखल केलेले रुग्णालय वगैरे माहिती दिलेली असते. तसेच, एकूण अपेक्षित मदत आणि आतापर्यंत झालेली मदत याचीही आलेख स्वरूपात माहिती दाखवलेली असते.
या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा प्रथम उपस्थित होतो. संबंधितांचे आवाहन वाचून बऱ्याच जणांना भावनिक दृष्ट्या अशी मदत करण्याची इच्छा होते. परंतु, आपण ज्या व्यक्तीस मदत करीत आहोत ती अजिबात ओळखीची नसते. दुसरे असे की, ज्या मध्यस्थ ऑनलाइन यंत्रणा आहेत त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवावा का अशी शंकाही आपल्या मनात येऊ शकते. यासंदर्भात माझ्या मनातील काही शंका आधी उपस्थित करतो :
१. समजा, ज्या व्यक्तीला ऑनलाईन मदत पाठवायची आहे तिच्या बँक खात्याची माहिती वृत्तपत्रातून आलेली आहे. समजा, अशी मदत एखाद्याने थेट त्याला पाठवली तर पाठवणाऱ्या व्यक्तीस आयकर सवलतीचा लाभ घेता येतो का ? बहुतेक नसावा.
२. समजा, एखाद्याला मोठ्या रकमेची मदत करायची आहे तर अशावेळी त्याला भावी वर्षात आयकर सवलतीची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. अशा प्रसंगी त्याने ऑनलाईन संस्थळाची मदत घेतल्यास फायदा होईल हे उघड आहे. अशा संस्थळावर ते लोक पाठवणाऱ्यांची संपूर्ण माहिती- नाव गाव पत्ता फोन इत्यादी सर्व काही विचारतात. इथे पाठवणाऱ्या व्यक्तीस अडखळल्यासारखे होऊ शकते.
अशा संस्थळाची विश्वासार्हता जोखण्याचे निकष काय असतात ?
३. जी संस्थळे किंवा ॲप्स अशी सेवा देत आहेत, ती आपण पाठवलेल्या रकमेतून काही वाटा त्यांच्या प्रशासकीय खर्चासाठी काढून घेणार हे उघड आहे. त्या वाट्याचे प्रमाण अंदाजे किती असते? आपण या पद्धतीने एकदा मदत केल्यानंतर आपली संपर्क माहिती त्या मध्यस्थ संस्थळाकडे जाते. कालांतराने त्यांच्याकडे जेव्हा नवी प्रकरणे येतील तेव्हा ते जुन्या देणगीदारांच्या मागे ससेमिरा लावण्याची शक्यता वाटते.
यासंबंधीचे कोणाचे काही अनुभव ?
या विषयावर थोडाफार विचार केल्यावर मला झालेला अर्थबोध असा आहे :
१. अनोळखी व्यक्तीस आपल्याला लहान स्वरूपात रक्कम पाठवायची असेल तर तर ती थेट व्यक्तीच्या खात्यावर पाठवलेली चांगली. म्हणजे त्याला ती पूर्ण मिळेल. परंतु अशा वेळेस ती रक्कम नेट बँकिंगने पाठवावी की UPI ने ? यापैकी जास्त सुरक्षित (आपल्या दृष्टीने) काय मानले जाते? की दोन्ही सारखेच ? नेट बँकिंगमध्ये नव्या व्यक्तीचे नाव नोंदवून चार तासानंतर पाठवणे हे सर्वाधिक सुरक्षित मानले जाते का? निदान त्या चार तासांमध्ये आपल्याला फेरविचार करायला वेळ मिळतो हा एक फायदा.
२. UPI ने पैसे पाठवल्यास पलीकडच्याला आपला फोन नंबर समजणार हे उघड आहे. नेट बँकिंगमध्ये तो न समजण्याचा फायदा दिसतोय पण आपल्या नावाची नोंद तर बँकिंग व्यवहारात होणारच.
३. एखाद्याला रक्कम तर पाठवायची इच्छा आहे परंतु त्याला त्याचे नाव, फोन नंबर, ईमेल असे काहीही दुसऱ्याला कळू नये अशी इच्छा असल्यास रक्कम रोख नेऊन देणे हाच एकमेव पर्याय राहतो का ? किंवा मध्यस्थ स्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीतही तशी गोपनीयता जपता येते का ?
४. आयकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी देणगीच्या रकमेसाठी काही किमान / कमाल मर्यादा असते का? भारतीय आयकर खात्याच्या 80G संबंधी माहिती जालावर आहे. परंतु तिथे भल्या मोठ्या याद्या आहेत. ते जरा सोप्या भाषेत विस्कटून माहितगारांनी सांगितल्यास बरे होईल. काही वेळेस सवलत शंभर टक्के आहे तर काही वेळेस 50%.
या आणि अशा अनेक प्रकारच्या शंका विचारण्यासाठी आणि त्यांचे माहितगारांकडून निरसन करून घेण्यासाठी हा धागा उघडतो आहे. इच्छुकांनी जरूर सहभागी व्हावे ही वि.
लक्षात घ्या :
मूळ मुद्दा, पूर्णपणे अनोळखी व्यक्तीस मदत हा आहे.
*******************************************
Impact guru ने मला फोन करून
Impact guru ने मला फोन करून वैताग दिला, कारण मी अनामिक दान केले नव्हते. आता त्यांच्याकडे माझं पूर्ण नाव, फोन नंबर, ढोबळ पत्ता व क्रेडिट कार्ड नंबर आहे. मी त्या व्यक्तीला सक्त ताकीद दिली की पुन्हा ही माहिती वापरायची नाही , तर 'तो अजूनही गरजू आहेत, खूप रुग्णांना उपचाराची गरज आहे. तुम्ही दर महिन्याला दान करू शकता' वगैरे म्हणू लागला. त्या धाग्यावरही आरोग्याचे कसलेही अपडेट आले नाहीत. मी वाट बघत होते. तातडीच्या वेळी गरजूंना 'बेनिफिट ऑफ डाऊट' देण्याकडे माझा कल असतो. तरीही बहुतेक मी आता कधीही इम्पॅक्ट गुरू वापरणार नाही. त्या कॉलने मला अस्वस्थ केलं .
मी अज्ञात पर्याय निवडला होता.
मी अज्ञात पर्याय निवडला होता. मला फोन कॉल्स येत नाहीत पण व्हॉटस अॅप आणि इमेल वर अशी आवाहने येतात. आज या धाग्याच्या निमित्ताने पाहिले तेव्हा STOP असा मेसेज आपण पाठवला तर त्यांच्या कडून पुन्हा मदतीचे आवाहन करण्यात येत नाही असे लिहिले आहे. बघतो प्रयत्न करून.
ही आवाहने अस्वस्थ करणारी असतात. मानसिक छळ आहे.
लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी
लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी आर्थिक मदत मागणार्या एका एनजीओमार्फत एकदा मदत केली होती. त्यानंतर त्यांचे सातत्याने ईमेल्स, फोन्स येऊ लागले. सुरुवातीचा काही काळ काही महिन्यांतून एकदा अशी काही मदत करत असे. पण फ्रिक्वेन्सी वाढली. इतक्या लोकांना मदत करणे शक्य नाही. एक नंबर ब्लॉक केला तर दुसर्या नंबरवरून फोन असं सुरू आहे. संस्थेची नावेही बदलून सांगतात. व्हॉट्स अॅप मेसेजेस तर गिल्ट कॉम्प्लेक्स देत.
एकदा इम्पॅक्ट गुरूच्या माध्यमातून निनावी मदत केली तेव्हापासून फेसबुक, यु ट्यूब ला त्यांच्या जाहिराती दिसू लागल्या. यु ट्यूबवरच्या जाहिराती तर काही वेळानेच स्किप करता येतात. मग नाइलाजाने ब्लॉक केलं.
इतक्या लहान मुलांना काय काय होत असतं, त्यांच्या पालक- आजी आजोबांची परवड होत असते हे पाहून वाईट वाटतं. पण आपल्याही काही मर्यादा असतात. आणि वैद्यकोपचारासाठी सरकारी योजना आहेत ना? त्यांचा उपयोग होतो की नाही?
माझ्या आईला, एनजीओवाले असेच
माझ्या आईला, एनजीओवाले असेच सतावत असत. बरं प्रत्येक फोन इमानइतबारे घ्यायचा.आई म्हणायची की असो जी काही ठराविक रक्कम द्यायची ती mi adhi dili aahe.तरी 500 तरी द्या म्हणून तगादा लावला.एकदा तिने वैतागून म्हटले की तुम्हीच ते द्या.शेवटी फोन कॉल ब्लॉक करायचे शिकवले.वर भरत म्हणाले तसे आपल्याही काही मर्यादा असतातच.
आवाहने अस्वस्थ करणारी असतात. मानसिक छळ आहे....+१.
यात खरोखर गरजू व्यक्ती भरडल्या जातात.आईकडे एकजण अनोळखी,बहिणीच्या ऑपरेशनसाठी पैसे मागायला आला होता.त्यावेळी मी तिथे होते.आई एकटीच त्या घरी रहायची.वाटले भावनेला हात घालून दारुसाठी पैसे मागत असेल.म्हणून 50 रुपये दिले.नंतर सहा महिन्यांनी तो माणूस परत आला.म्हणाला बहिणीचे ऑपरेशन चांगले झाले.धन्यवाद मानून निघून गेला.जाम खजील झाले होते.
पण आपल्याही काही मर्यादा
पण आपल्याही काही मर्यादा असतात. आणि वैद्यकोपचारासाठी सरकारी योजना आहेत ना? त्यांचा उपयोग होतो की नाही? >> मी नातेवाईक, मित्रांच्या ग्रुप्सवर प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेच्या लिंका टाकल्या. जे जे कुणी त्यात बसतेय त्यांनी या योजनेत सहभागी व्हा, नंतर मदत लागली तर मदतीसाठी आवाहने करू नका असे सांगायला विसरलो नाही.
कारण नेमक्या अडचणीच्या वेळी यांना मदत करावी लागते आणि आपली फजिती होते. दुर्लक्ष करणे शक्य नसते. अर्थात आता ते जमवावेच लागेल. इथून पुढे कुणीही आयजीच्या जिवावर बायजी उदार होत जाहीर आवाहन केले कि त्यालाच सगळी मदत करा असे सुनवावे लागणार आहे. इतक्या लोकांना मदत शक्य नसते. गेल्या महिन्यात टॅक्सची कामे चालू असताना असा त्रास झाला. त्या वेळी अगदी नाईलाजाने कटुता घ्यावी लागली.

अरे नका करू अशी डोनेशन्स.
अरे नका करू अशी डोनेशन्स.
मी परवा पिक्चर बघायला गेले होते तेव्हा गदर पाशी सेल्फी/ फोटो घेत होते तर एक पोरगा कायतरी अपील घेउन आला, मी काही विकत घेणार नाही म्हणून सांगितले तर म्हणे एक ओल्ड एज होम आहे त्यासाठी डोनेशन द्या म्हणून बडबडायला लागला. त्याला नो डोनेशन्स म्हणून कटवले.
हे सर्व बिझनेस पीपल्स ना जो अन अकाउंटेड पैसा असतो तो कुठे खर्च करायचा त्यासाठी मार्ग असतात. त्यांना करू दे खर्च. आपले रिसोर्सेस लिमिटेड असतात आपण नवकोट नारायण नाही. हे लक्षात ठेवावे.
एके वर्षी लेकीच्या वाढदिवसाला
एके वर्षी लेकीच्या वाढदिवसाला एका अनाथाश्रमला डोनेशन दिले होते. त्यानंतर ते दरवर्षी येत राहतात. घरीही येतात. मी त्यात पडत नाही. बायकोच बघते. मी विचारले तरी ती सांगत नाही आकडा. बहुधा आता ती कमी देत असेल. पण देते.
जमेल ते करावे पण मनस्ताप होऊ नये ही अपेक्षा मात्र योग्य आहे.
खरंय.
खरंय.
सर्वांच्या अनुभवावरून इथून पुढे आपल्याला योग्य तो बोध घेता येईल.
लहान मुलांच्या अनाथाश्रमाला
लहान मुलांच्या अनाथाश्रमाला मदत करण्यात चुकीचे वाटत नाही. अर्थात त्यांना कुठूनही मदत मिळत नाही हे कन्फर्म झाल्यावरच मदत केलेली बरी.
पण वैद्यकीय मदतीची आवाहने नकोत. शासनाच्या योजनांचा का लाभ घेत नाहीत ? वेळेत रजिस्ट्रेशन करायचं नाही आणि वेळ आली कि आवाहन करणे चुकीचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्याही योजना आहेत. आता तर रेशनकार्डाचा भेदभावही संपला.
https://nha.gov.in/PM-JAY#:~:text=Key%20Features%20of%20PM%2DJAY&text=It....
https://main.mohfw.gov.in/major-programmes/poor-patients-financial-support
आयुष्यमान भारत
https://www.india.gov.in/spotlight/ayushman-bharat-national-health-prote...
१५ प्रकारचे विमे
https://www.policybazaar.com/health-insurance/govt-scheme/
महाराष्ट्र शासन - म फुले जीवनदानी योजना
https://www.jeevandayee.gov.in/
महाराष्ट्र शासनाची सर्वांसाठी असलेली मोफत नवी योजना - रु ५ लाखाची सर्वांना मदत.
https://www.zeebiz.com/personal-finance/insurance/news-free-health-insur...
या योजना नेहमी आवाहन करणार्यांना पाठवाव्यात. त्यांनी त्यांच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना माहिती देऊन रजिस्ट्रेशन करून घ्यावे. म्हणजे आणिबाणिच्या वेळी हक्काची मदत मिळेल. सोशल मीडियावर विसंबून रहायची गरज पडणार नाही.
जर आपल्या सारखे, आपल्या
जर आपल्या सारखे, आपल्या ओळखीचे लोक असतील एखाद्या संस्थेत तर नक्की मदत करावी असं वाटतं.इम्पॅक्ट गुरूला किंवा मिलाप ला मदत करताना निनावी पर्याय सिलेक्ट करावा.(मी शक्यतो जिथे फक्त इमेल आयडी विचारला जातो तेथे मदत देते.एकदा फोन नंबर दिला की आपला कंट्रोल राहत नाही तो कुठे गेला आणि कोण वापरेल.अक्षय पात्र ला डोनेशन केले आहे 3-4 वेळा.बहुधा डू नॉट कॉल चा पर्याय निवडला असावा.कधी फोन आला नाहीये.
हेल्पेज इंडिया, स्माईल, क्राय यांना मदत करू नका, फोन येतात बरेच.
स्नेहवन ला मदत करते(अर्थात हल्ली त्यांना खूप आंतरराष्ट्रीय ओळख आहे, त्यामुळे कदाचित मदतीचा ओघ खूप वाढून सामान्य मदत लागणार नाही.आवर्जून फेसबुक पोस्ट असेल, आवाहन असेल तर करते.
मदत मागणाऱ्या व्यक्ती/संस्थानी शक्यतो 'अमक्याला फोन करून स्वतः चौकशी करा आणि मदत करा' वाला पॅटर्न कधीही घेऊ नये.ते टाळलं जातं.
धाग्याचा विषय अनोळखी
धाग्याचा विषय अनोळखी व्यक्तीशी संबंधित आहे. तिला केलेल्या मदतीबद्दल आहे.
थोडा दुरून संबंध असला तरी हिमाचल प्रदेशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत मदतीची अपेक्षा स्थानिक प्रशासन, राज्य सरकारने केली आहे. काही सहकारी तिथे अडकले आहेत. मदतकार्य आणि पुननिर्माणाचे काम वर्षभरापेक्षा जास्त काळ चालणारे आहे. वेगळा धागा काढत नाही. कुणाला इच्छा असेल तर या लिंकवर जाऊन मदत करावी. अन्य फंडस सुद्धा आहेत. मुख्यमंत्री / पंतप्रधान निधी पण आहेत.
सरकारी वेबसाईट आहे. अधून मधून बंद पडते. (आधी पाच रूपये, दहा रूपये पाठवा. सक्सेस झाल्यावर तुम्हाला द्यायची ती रक्कम पाठवा).
https://cmhimachal.hp.gov.in/index.php/donation/individual
सीएम रिलीफ फंड
https://hphamirpur.nic.in/service/cm-relief-fund/
( हा चेक केलेला नाही. कुणी पाठवले तर मेन्शन करा).
Pages