हिंदी चित्रपटांतील जुनी आवडती गाणी: १९६० पर्यंतची

Submitted by अवल on 29 June, 2023 - 22:28

मला आवडणाऱ्या जुन्या हिंदी चित्रपट गीतांसाठी हा धागा. सुरुवात किसी तऱ्हासे मुहोब्बतमें चैन पा न सके याने करते. बाकी खाली प्रतिसादामधे लिहीत जाईन, जसे जमेल तसे. तुम्हाला आवडणारी गाणी (पण जुनीच. 1960 पर्यंतचीच) लिहिलीत तर आवडेलच.

बडी माँ हा 1945 चा चित्रपट!
IMG_20230630_075518.jpg
मा. विनायक यांची निर्मिती अन दिग्दर्शन. सुप्रसिद्ध तारका- गायिका नूरजहाँ अन ईश्वरलाल, याकूब, सितारादेवी, मीनाक्षी, दामुअण्णा मालवणकर अशी तेव्हाची तगडी कास्ट असणारा हा चित्रपट. (1974 मधे आलेला बडी माँ हा चित्रपट वेगळा, अनेकदा दोन्हीची गल्लत केली जाते).

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा उलगडत जाते. जागतिक राजकारण, जपान, भारताचे देशप्रेम अशा अनेक वळणांनी हा चित्रपट समृद्ध होत जातो.

या गीताचे संगीतकार होते सुप्रसिद्ध के. दत्ता होते. तर गीतकार अंजुम पीलीभीत.
गायिका होती नूरजहाँन. स्वातंत्रपूर्व काळातली महान गायिका- नायिका. तिच्या आवाजातला तलमपणा, तीनही पट्यांमधे लिलया फिरणारा आवाज, गोडवा; तिचं सौंदर्य आणि अभिनय सर्वच लाजवाब!
या गाण्याची जान आहे ती नूरजहाँनच्या "पाऽऽ न सके" या मधे.

सुरुवातीच्या हिंदी चित्रपट सृष्टीमधे कोल्हापूर अन मराठी कलाकारांचा कसा वरचष्मा होता हे या चित्रपटाची कास्ट बघितली की कळतं. निर्माता, दिग्दर्शक(मा. विनायक), संगीतकार ( के. दत्ता म्हणजेच दत्ता कोरेगावकर) , बॅनर ( प्रफुल्ल पिक्चर्स), कथा ( व्ही. एस. खेडेकर) , एक गीतकार(राजा बढे), एक गायिका(लता), चार स्त्री कलाकार ( मीनाक्षी, लता, आशा, बेबी अलका), दोन पुरुष कलाकार (दामुअण्णा मालवणकर, दादा साळवी).
या शिवाय याकूब, सितारादेवी, लिला मिश्रा हेही या चित्रपटात होते.

आज या चित्रपटाची फिल्म, कुठेही उपलब्ध नाही. शक्यता आहे की फिल्म आर्काईव्हजमधे कुठेतरी असेल. पण किमान नूरजहाँच्या या आणि इतर गाण्यांनी (दिया जला कर आप बुझाया: https://youtu.be/gBczUcadYLw)
रसिकांच्या मनात हा चित्रपट जागा राहील.

सध्या इतकच!
---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संगीतकार एस एन त्रिपाठींचा विसर पडलाय का ?
संगीतकार + दिग्दर्शक + गीतकार + लेखक + पटकथाकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या त्रिपाठींच्या चाली अनवट आहेत.
त्यांची गाणी आज विशेष प्रसिद्ध नसली तरी आज पहिल्यांदा ऐकणार्‍याला सुद्धा ती आवडतील अशीच आहेत.

रघू लिहा न तुम्ही
प्रत्येकानी आपापली आवडती गाणी अन त्यावर लिहायच. इतिहास वा आढावा नाही, की ज्यात हा- तो विसरला असा गुन्हा होईल Happy
फिल फ्रि, आपापले आवडते गाणे, गायक-गायिका, संगीतकार, चित्रपट... कसंही येऊ दे. आवडणारं असल्याशी मतलब

गुन्हा काय ?
असं काही म्हणायचं नव्हतं. ही पद्धत असते आठवण करूना देण्याची. ही स्टँडर्ड वाक्ये आहेत. असा नकारात्मक समज का व्हावा हे समजले नाही.
आधी रघू तुम्ही लिहा इतकेच म्हटले असल्याने बरीच गाणी शोधून दुसर्‍या धाग्यावर दिली होती. त्यात खूप वेळ गेला.
त्यानंतर पुन्हा इथे आल्यानंतर ही कमेण्ट वाचनात आली. इथे आढावा अपेक्षित नाही हे समजले.
या सूचनेनुसार त्या कमेण्ट्स हलवल्या आहेत. गैरसोयीबद्दल व मनःस्तापाबद्दल क्षमस्व !

https://www.youtube.com/embed/EUVsSz_D5xY

आसू भरी है ये जीवन की राहें
परवरिश (1958) चित्रपटातलं हे गीत.
गायलय मुकेशनी.
संगीत: दत्ताराम,
दत्ताराम वाडकर गोव्यातून मुंबईत आल्यावर डॉकयार्डवर हमाल म्हणून काम केलं. पण तबल्यावरचे त्यांचे कौशल्य त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत खेचून घेऊन आले. सुरुवातीला सुप्रसिद्ध संगीतकार सज्जाद यांच्याकडे अन नंतर शंकर जयकिशन यांच्याकडे संगीत अरेंजर म्हणून काम केलं. पुढे राजकपूरने आपल्या चित्रपटासाठी संगितकार म्हणून दत्तारामना निवडलं. अन पुढे अनेक सुंदर गीतं त्यांनी दिली. त्यातलंच हे एक.

राजकपूरवर चित्रित हे गाणं फार गाजलेलं.
राजकपूर अन मुकेश या दोन व्यक्ती पण आत्मा एक असावेत इतके सारखे. राजकपूरच गातोय असं वाटावं.
मुकेशच्या आवाजातला दर्द अधिक की राजकपूरच्या चेहऱ्यावरील हे ठरवताच येत नाही...
गीतकार: हसरत जयपुरी.
हसरत जयपुरींचे शब्द तर आयुष्याचा, दु:खाचा अर्क पिळवटून येणारे.
दोन एकमेकांमधे गुंतलेले जीव.
या गाण्या आधी तिला कळतं की परिस्थितीमुळे लांब जावं लागणार तेव्हा "लुटी जिंदगी और गम मुस्कराये, तेरे इस जहाँ से हम बाज आये " हे तिचं दु:ख व्यक्त करणारं गीत. पण मग जगात चांगले लोकही आहेत हे कळून तिच्या मनासारखे होत असते. पण त्याला त्याचे कर्तव्य सोडता येत नाही. शेवटी तिचं मन तोडून तिला कठोरपणे दूर केल्यावर त्याचं भळभळतं हृदय या शिवाय दुसरं काय गाऊ शकतं?

14. गुजरा हुवा जमाना
- अवल

चित्रपट: शिरीं फरहाद (१९५६)
दिग्दर्शक : अस्पी इराणी
गीतकार: तन्वीर नक्वी
संगीतकार : एस. मोहिंदर
गायिका : लता मंगेशकर
नायिका :मधुबाला

निजामी गंजवी या सुप्रसिद्ध पर्शियन कवीचे हे एक गाजलेले प्रेमकाव्य - खुसरोव शिरीन ! त्यावर आधारित हा चित्रपट. एक राजकन्या आणि एक सामान्य तरूण यांच्यामधल्या असफल प्रेमाची अतिशय दु:खी कहाणी. लैला मजनू लिहिणाऱ्या कवीचे हे अजून एक काव्य.

मधुबालाच्या सौंदर्याच्या अनेक छटा आहेत. एक अवखळ, निरागसपण आहे. एक हसरं प्रगल्भपणााची आहे. एक सगळं मिळाल्याचा सुकून असणारी आहे. अन असीम दु:खाची एक झालर असणारी ही आहे.
या गाण्यात हीच ती मन हेलावून टाकणारी कारुण्याची किनार आहे. नुसत्या डोळ्यातून सारं पोहोचतं आपल्या पर्यंत... जगण्यात कसलच स्वारस्य न राहिलेलं, सगळं सगळं निर्ममपणे ओलांडून जातानाची एक दुखरी निरिच्छता, आपल्या दु:खापेक्षाही; सोडून जाताना आपण प्रियकराला काय दु:ख मागे ठेवून जातोय याच्यातली अपरिहार्यता, त्याला साधं शेवटचं भेटणंही जमवता न आलेल्याची असहाय्यता... काय काय नाही त्या डबडबलेल्या डोळ्यांमधे!

तन्वीर नक्वींनी याच तिच्या भावना काय उतरवल्यात शब्दात.

गुजरा हुवा जमाना, आता नहीं दुबारा

खुशियाँ थी चार पल की, आसूँ है उम्र भर के

तनहाईं में अक्सर रोयेंगे याद कर के...

तुफाँ है जिंदगी का अब आखरी सहारा...

निकला मेरा जनाजा, मेरी बारात बन कर...

हाफिज खुदा तुम्हारा..

अन संगीत! ते दिलय फार कमी माहिती असलेल्या एस. मोहिंदर यांनी. पंजाबी चित्रपट सृष्टीमधे खूप गाजले हे संगीतकार. हिंदी चित्रपट सृष्टीतही अनेक चित्रपट त्यांनी केले. पण त्यांचं गाजलं ते हे गाणं, गुजरा हुवा जमाना...

अन त्यामागे एक कहाणी आहे, तितकीच दर्दभरी. या चित्रपटामधे शिरिन आपला प्रियकर, गांव, देश, मुलुख सोडून दूर देशी- परदेशी चाललेली असते. तिला माहित असतं की आता परत हे सगळं कधीच आपल्याला दिसणार नाही. हे सगळं आता फक्त आठवणीतच असेल. अन त्यासाठीच शेवटचा हाफिज खुदा (निघते, अच्छा) म्हणतेय. मोहिंदर यांनाही हाच अनुभव आपल्या आयुष्यात आलेला.

मूळचे फैसलाबाद (आताच्या पाकिस्तानातील जिल्हा) जवळच्या गावातले एक शीख कुटुंब. त्यातील हा मुलगा मोहिंदर. संगीताची फार लहानपणापासून आवड असलेला. त्यासाठी शास्त्रीय संगीत शिकत मोठा झालेला. संगीतातच करियर करू पहाणारा एक तरुण मुलगा. वेगवेगळ्या गावी गाण्याचे कार्यक्रम करत असे. 1947 चा सुमार. लाहोरला एक कार्यक्रम गाजवून गावी परत जायला रेल्वे स्टेशनवर आला. पण यायला थोडा उशीर झाला अन गाडी चुकली. चुकली हे एका परीने बरच झालं; जीव वाचला. कारण पुढच्याच स्टेशनवर गाडीतल्या सगळ्या हिंदूंची कत्तल केली गेली होती. तरुण मोहिंदरने दुसरी कोणती गाडी गावाकडे जातेय विचारले रेल्वेमास्तरांना. त्यांनी सांगितलं, " मुला, समोरच्या गाडीत बस. अन जा, जीव वाचव आपला." गाडी होती मुंबईला येणारी. अक्षरश: दोन कपड्यासह मोहिंदरला मुंबईला यावं लागलं. गांव, शेत, घर, मुलूख, देश तडकाफडकी सोडावा लागला. शेवटचं डोळाभर पहायलाही मिळालं नाही.

जिथे वाढलो, जे आपलं गाव- घर- शेत- मुलूख तो असा सोडताना काय दु: ख होतं ते प्रत्यक्ष अनुभवलेला हा गायक. पुढे मुंबईत संगीतकार म्हणून काम करू लागला. अन जेव्हा शिरिन फरिहाद मधे तीच घटना चित्रित होताना बघून काळजातली ती हूरहूर, दु:ख, भळभळत बाहेर पडले ते असे- गुजरा हुवा जमाना....

मोहिंदर यांनी अनेक गोड गीतं दिली. शिरीन फरिहाद मधलचं अजून एक

सुन ले तू मेरी सदा रो रो मेरी मुहोब्बत
तुझको पुकारे आ आ जाओ जाने वफा
तुही बता तेरे सिवा दुनिया में कौन है मेरा
तुझसे सनम होके जुदा जिके करुंगी क्या
ना जा ना जाओ दिलरुबा - तलत, लता

तर पापी चित्रपटातलं (1953)

तेरा काम है जलना परवाने, चाहे शमा जले या ना जले - रफी (राज कपूर, नर्गिस)

पंजाबी चित्रपटातही अनेक सुंदर गीतं त्यांनी दिली. पण त्यांच्या मनाच्या सर्वात जवळचं होतं ते गुजरा हुवा जमाना हेच.

कालांतराने ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे एकदा व्हॉईस ऑफ अमेरिका मधे त्यांच्या मुलाखतीत हेच गाणे त्यांनी गायले. अन पुढे म्हणाले की अजूनही मला माझ्या मूळ गावी जायचय. माझं सारं आयुष्य इतरत्र गेलं. पण तिथे मी वाढलो, माझं बालपण गेलं, तारुण्य आलं ते गाव एकदा तरी जाऊन बघायचय. इतका दर्द ज्यांनी आयुष्यभर सोसला, त्यांचं तेच दु:ख त्यांच्या गाण्यातून पाझरलं!

ऐका, पहा

गुजरा हुवा जमाना, आता नहीं दुबारा

https://www.youtube.com/watch?v=I2RefAyeVRA
---

इंटरेस्टिंग माहिती अवल. वाचून वाईट वाटले. हे गाणे काही वेळा ऐकले/पाहिले आहे पण त्याच्या मागे असलेली कहाणी माहीत नव्हती. होपफुली त्यांना नंतर कधीतरी जाता आले असेल.

"काबुलीवाला" मधल्या "ऐ मेरे प्यारे वतन" गाण्यात तो कलाकार कोण आहे माहीत नाही - त्यालाही असेच आपले गाव/देश आठवत असतो. प्रत्यक्षात त्या गाण्यात दिसते ते वाळवंट, उंट वगैरे. इतरत्र राहणार्‍या लोकांना ते काही फार भारी वाटणार नाही. पण तेथे जे जन्मले त्यांना "सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगीन तेरी शाम" वाटत असेल हे सहज शक्य आहे.

धन्यवाद फा
मी शोधायचा प्रयत्न केला, की ते भेट देऊ शकले का, पण माहिती मिळाली नाही.
काबुलीवाला, हो बरोब्बर आठवण.

मला मराठीतले एक गाणे आठवते, "अखेरचा हा तुला दंडवत"
फार सुंदर गीत कवी संजीव, संगीत लता, गायिका लता, चित्रपट मराठा तितुका मेळवावा.

काबुलीवाला तला तो अभिनेता मला मदन पुरी वाटला. पण वझीर मोहम्मद खान आहे, असं कळलं. श्रेयनामावलीतही हे नाव दिसतंय.
अवल, संजीव या टोपणनावाने भालजी पेंढारकर गीत लिहायचे आणि लता त्यांना आनंदघन या टोपणनावाने संगीत द्यायची.

गुजरा हुआ जमाना मलाही फार आवडतं.

Pages