मुक्काम पोष्ट घोडपदेव (माझे पहिले पुस्तक)

Submitted by ASHOK BHEKE on 1 August, 2023 - 11:10

लेखकाचे मनोगत

माझ्या षष्ट्याब्दीपूर्ती निमित्ताने माझे पहिले मुक्काम पोष्ट घोडपदेव प्रकाशित करताना आनंद होत आहे. लहानपणापासून लेखन आणि वाचनाची आवड त्यामुळे लेखनाची उर्मी निर्माण झाली. मला रहस्यकथा वाचण्याचा छंद इतका जडला होता की, घेतलेले पुस्तक वाचून काढल्याशिवाय स्वस्थ बसता येत नव्हते. अशात घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे वाचताना लिहिताना एखादे काम राहून गेले की, पाठीवर धपाटा ही शाबासकी आई दिल्याशिवाय राहत नव्हती. मी माझ्या घरच्या परिस्थितीमुळे कमी शिकलो. माझ्या लहानपणाचा मागोवा येथे मांडणे कठीण आहे. कारण फाटक्या कपड्यात वावरणारा मी, ठिगळं लावलेल्या पेहरावाचे मी काय वर्णन करू...! कसा होतो मी.. बहुतेकांना कल्पना असेलच. फार भयानक गरीबी अनुभवली. तशी कुणाच्याही वाट्याला न येवो. माझ्या पायात चप्पल ही सातवी इयत्तेत असताना आली. अगदी शाळेत असताना रस्त्यावर पाणीपुरी, वडे भजी विकत दिवस काढले.खूप दू:खद अनुभवाची शिदोरी गाठीशी आहे. त्यामुळे माझ्या लहानपणाचा उल्लेख अद्यापपर्यन्त टाळत आलो. पण कधी ते दिवस आठवले तर मात्र डोळ्यात अश्रु अनावर होतात. अशा वेळी मी एकटाच एकांतात रडतो. असो....

दरदिवशी वाचनालयात येणारे पेपर आणि मासिके, साप्ताहिके, पाक्षिके वाचून आपल्या ज्ञानाची भूक भागवित आलो. प्रथमत: मला पत्रलेखन करण्याचा छंद जडला. सामाजिक स्वरूपाची समस्या शासन दरबारी मांडत असताना अनेक वर्तमानपत्रात लेखन करू लागलो. आपला वार्ताहर, वृत्तमानस आदी अनेक दैनिकातून लेखन केले. त्यामुळे मला प्रसिध्दीच्या शिखरावर नेले. पण व्यवसाय आणि नोकरी मुळे वर्तमानपत्रांना मला रामराम ठोकावा लागला.

माझा जन्म याच विभागात झाला असल्याने घोडपदेववर माझे नितांत प्रेम. या मातीशी नाळ जुळली आहे. सोशल मीडिया आला आणि मला आपल्या आठवणीतील माणसं, आपल्या मातीतीलपूर्वजांची थोरवी यांचा लोकांना परिचय करून द्यावा, विभागातील चर्चा, घडणार्‍या घटना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मी घोडपदेव समुहाच्या माध्यमातून घोडपदेवची माणसं हा लेख लोकांना अर्पण केला. खूप खूप वाहव्वा झाली. हळूहळू मग विभागातील जे हयात नाहीत पण त्यांचे घोडपदेव विभागासाठी अमूल्य योगदान आहे. त्यांच्यावर लिहीयला सुरुवात केली आणि आठवणीतील माणसं हे माझे सदर लोकमनात भारावून गेले. चर्चेतील माणसं या विषयावर देखील वाचकांना मेजवानी देताना वाचकांनी भरभरून दाद दिली. घोडपदेव विभागात जशी चांगली माणसं आहेत तशी जळू, आगलावी, भ्रष्ट मंडळी देखील आहेत त्यांचा काल्पनिकतेने समाचार घेताना कोठेही मुलाहिजा बाळगला नाही. विभागाचे भूषण शाहीर श्री मधुकर खामकर विभाग सोडून जाताना त्यांना घातलेली साद... अप्पा नका जाऊ हो दूर, पोष्टमन रिटायर्ड होत आहे, माझी शाळा पूर्व भायखळा, सिस्टर लता किंवा कोरोनाच्या काळात अनेक सोबती सोडून जात होते तेव्हा थरथरत्या हातांनी, डबडबल्या डोळ्यांनी श्रध्दांजली वाहायला मन धजावत नाही, असे लेखन करताना भरत परब आणि राजन सावंत यांची चित्र वाचकांपूढे उभी केली. बापमाणूस,वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको या लेखावर अनेक महाराष्ट्रातून प्रतिक्रिया आल्या. या पूस्तकात मी माझ्या माझ्या सहवासातील हिरेमाणिक मोती समान माझ्या मित्रांना देखील स्थान दिले आहे. काही चंदनासमान माणसं हेरली आणि सोबतीला घेऊन आयुष्याच्या या वाटेवर आलो आहे. माझ्या मनात अहंकाराचे रोपटे कधी उगवू दिले नाही.
राजकारणावर लिहिणे माझे पसंतीचे. पण माणूस जोडो अभियानात थोडेसे दुर्लक्ष केले. मुळात एखाद्याविषयी चांगले लिहिले की, त्याच्या प्रतिस्पर्ध्याला राग येत असे. प्रतिस्पर्ध्याविषयी लिहिले की पहिल्याला राग येत होता. सर्वसमावेशक लेखन तसे अवघड. तरीही समतोल राखत लिहिणे पसंत केले. त्यामुळे माझी मूळच्या लेखणीतील झंझावात, तीव्रता कमी झाली. कोण चुकत असेल तर त्याची चुकी दाखविणे हे लेखकाचे आद्यकर्त्यव्य.लेखनामुळे माझी ज्ञानसमृध्दी झाली. माझ्या रित्या झोळीत वाचकांनी शाबासकीचे दान देऊ केले. जन्माला आल्यावर काय हवे असते....! लोकांचे, कुटुंबीयांचे प्रेम भेटले की त्याला जगातील गर्भश्रीमंत झाल्यासारखे वाटते. आज माझ्या वाट्याला हे सुख आले.
मुक्काम पोष्ट घोडपदेव या पूस्तकाची कल्पना ही श्री दिलीप महाडीक यांनी दिली आणि श्री दिलीप वागस्कर यांनी पाठबळ दिले. या दोघांचे मी मनापासून आभार प्रकट करीत आहे.

अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण स्वतःला घडवलेत हे कौतुकास्पद आहे. पुस्तक परिचय छान लिहीला आहेत. पुस्तक रोचक असणार. मिळवून वाचेन. शुभेच्छा.

<<अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण स्वतःला घडवलेत हे कौतुकास्पद आहे.>> मम. पुस्तक प्रकाशनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.

भेके काका घोडपदेवच्या बाहेर पण कधी फिरलात की नाय? की फक्त घोडपदेव एके घोडपदेव.>>

ढोलकपुर ला ट्रेनिंग झाले आहे.