आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी, मागे सिंधुताई सपकाळ यांनीही बलात्कारासंबंधी हास्यास्पद विधाने केली होती. या लोकांना जर आजारपणात रक्त लागलं तर मला शाकाहारी माणसाचेच रक्त द्या असे ते म्हणतील का?

इव्हन भिड्यांच्या पाया पडण्यावरूनही सुधा मुर्तींना मी जज करणार नाही. तो त्यांचा चॉईस आहे. भिडे जे काय कर्मठ बोलतात त्याचा दोष भिड्यांचा आहे. सुधा मुर्तींचा नाही.....
हा प्रतिसाद आवडला/पटला.

राच्याकने ज्यावेळी पाय पडण्याची बातमी पहिली होती,त्यावेळी वाईट वाटले होते.पण म्हटले तो त्यांचा प्रश्न आहे.

माझा चमचा घेऊन फिरते म्हणालात तर कोणी काही बोलणार नाही. पण बापरे! या चमच्याने कधीतरी कोणी सामिष अन्न खाल्लं असलं तर! (नक्की काय होईल? धर्म भ्रष्ट होतो? .......... हे नाही झेपले.ज्याला मांसाहाराची सवय नसेल त्याला ही गोष्ट किळसवाणी वाटेल.बरे सुधा मूर्ती,आपणच हे सर्व कष्ट (चमचा,खाणे सोबत घेण्याचे)घेत आहेत.मग बाकीच्यांना त्रास होऊ नये.

(अगदी आमच्या घरीही सामिष, निरामिष स्वयंपाकासाठी वेगळी भांडी होती.दोन्ही घरी त्यांची ताटे,पेले वेगळे होते.
घासणी एकच होती. Wink )

कच्चं मांस ठेवण्यासाठी, चिरण्यासाठी जी भांडी, विळ्या, सुर्‍या, कटिंग बोर्ड वापरले जातात, ते प्रत्येक वापरानंतर स्टरलाइझ करणं हा स्वच्छतेचा भाग झाला. कच्चं मांस तुलनेत सहजगत्या कन्टॅमिनेट होऊ शकतं आणि त्या सूक्ष्म जीवजंतूंचा नायनाट करणं आवश्यक असतं म्हणून. त्याचा संबंध आरोग्याशी आहे.
पूर्ण शिजलेलं मांस वाढताना/खाताना वापरलेल्या चमच्याला (स्वच्छ घासलेला असेल तर) काय प्रॉब्लेम आहे? चमचा अस्वच्छ असेल तर शाकाहारी खरकटंही वाईटच की!

दुग्धजन्य पदार्थांसाठी निराळी भांडी वापरण्याचं मूळही त्यातच आहे. हे प्राणीजन्य पदार्थ आहेत आणि तुलनेने सहजगत्या कन्टॅमिनेट होऊ शकतात.

शिवाय याचा अर्थ शाकाहार बॅक्टेरिअल कन्टॅमिनेशनपासून मुक्त असतो असा नाही!

मी नॉन व्हेज खाते पण मला अंडे, चिकन नीट केले नसले तर त्याचा वास येतो. विकत आणलेल्या बेकरी पदार्थात मला अंड्याचा जरा जरी वास आला तर मी त्यावर फुली मारून टाकते. बर्‍याच रेस्टॉरंट मध्ये मी शाकाहारी पदार्थ मागवते याच कारणामुळे. त्यामुळे कोणा जन्मापासून शाकाहारी असलेल्या व्यक्तिला याचा कितीतरी अधिक त्रास होऊ शकतो याची मला जाणीव आहे. माझ्या ऑफिस कॅफे मध्ये एकच spatula घेऊन त्यानेच beef patty अणि veg patty परततात. सुरुवातीला मलाही नको वाटायचे. त्यामुळे प्रत्येकाचे threshold वेगळे असणार. त्यात त्या स्वतः त्रास घेऊन चमचे, खाणे घेऊन जाताहेत तर याचाही लोकांना इश्यू कशाला? As long as she's not forcing her choice on others, it's fine. वर काही कमेन्ट सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या वाटल्या. Under current छुपे हिंदू bashing आहे हे कळाले Happy
जर कोणी Jewish माणसाने मी फक्त kosher खाणार, किंव्वा मुस्लिम मनुष्याने फक्त हलाल खाणार असे म्हटले तर त्यांना असेच Troll कराल का? सणवार पुरणपोळ्या करणार्‍या हिंदू स्त्रिया अभागी, आणि hijab घालणाऱ्या मुस्लिम स्त्रिया शूर कारण त्यांचा चॉईस असे का Happy

पूर्ण शिजलेलं मांस वाढताना/खाताना वापरलेल्या चमच्याला (स्वच्छ घासलेला असेल तर) काय प्रॉब्लेम आहे?........ ही बाब त्या शाकाहाऱ्याच्या मानसिकतेवर अवलंबून asavi.

>>> जर कोणी Jewish माणसाने मी फक्त kosher खाणार, किंव्वा मुस्लिम मनुष्याने फक्त हलाल खाणार असे म्हटले तर त्यांना असेच Troll कराल का?
रेस्टॉरन्टमध्ये कोशर आणि हलाल चमचे वेगळे ठेवतात का? ज्युइश लोक प्रवास करताना आपले चमचे नेतात का?

इथे काही सुधा मूर्तींचं ट्रोलिंग सुरू आहे असं मला वाटत नाही. हे विचारमंथन आहे, जे होत असल्याचं त्यांना माहीतही नसेल Happy

मला असं वाटतं की आहारविहारांच्या (किंवा कुठल्याच) चॉइसेसमुळे माणसांमाणसांत घाऊकरीत्त्या भिंती निर्माण होणं वाईट आहे.
मग रेड मीट खाणार्‍यांपेक्षा फक्त व्हाइट मीट खाणारे श्रेष्ठ, त्यांच्याहून फक्त सीफूड खाणारे, त्यांच्याहून फक्त अंडी चालणारे, त्यांच्याहून डेअरी चालणारे, त्यांच्याहून गाईम्हशीपेक्षा शेळीचंच दूध चालणारे ('तुझे आहे तुजपाशी'मधले आचार्य आठवतात का?), त्यांच्याहून व्हीगन्स श्रेष्ठ, त्याच्याहून कांदालसूण न खाणारे, त्यांच्याहून फक्त कच्च्या भाज्या आणि फळं खाणारे इत्यादी इत्यादी - या उतरंडीला अंत नाही ना?

आपण एकीकडे 'सहनाववतु, सहनौभुनक्तु' म्हणून प्रार्थना म्हणणार आणि दुसरीकडे 'ते तसलं खाणार्‍यांना निराळं बसवा बुवा' म्हणणार यात विसंगती नाही का?

अशा व्यक्तीची तिच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरची मतं मननीय का असतील? सेलेब्रिटीज काय सर्वज्ञ असतात का? सुधा मूर्ती किंवा अन्य कोणी सेलेब्रिटी 'मला माझ्या कार्यक्षेत्राबाहेरचे प्रश्न विचारू नका, मला त्या विषयांतलं काही कळत नाही', >>> हे स्पेसिफिकली सुधा मुर्तींबद्दल नाही. पण अनेकांना हे प्रश्न आवर्जून विचारावेही लागत नाहीत. स्वतःहूनच असे सेलिब्रिटीज "फन फॅक्ट्स अबाउट मी" ची लेक्चरे घेत असतात Happy "सध्या देशभक्तांपेक्षा उपदेशभक्त वाढले आहेत" असे पुलं म्हंटले आहेत Happy

इतकेच काय सोशल नेटवर्क्सवरचे बरेच एकतर्फी विचार हे स्वतःची एका क्षेत्रातील अधिकारवाणी जीवनाच्या सर्व क्षेत्रात तितकीच पोर्टेबल आहे असा समज करून घेतल्याने आलेले असतात.

प्रत्यक्षात वस्तुस्थिती पूर्ण उलटी असते. एखाद्या क्षेत्रात झोकून काम केलेल्या लोकांचे इतर क्षेत्रातील विचार हे कमालीचे एकतर्फी व कधीही डेव्हलप न झालेले व कधीही इतरांनी क्वेश्चन न केलेले असतात. त्यांच्या कामातून त्यांना वेळ नसतो व त्यांचे स्थान असे असते की इतर लोक एकदम डेफरन्शियल असतात. सिंधूताई सपकाळ हे एक उदाहरण.

मला नाही वाटत त्या स्वतःला शाकाहारी म्हणुन श्रेष्ठ मानतात. असे काहीच दिसले नाही त्या प्रोग्राम मध्ये. इथेच अशी चर्चा चालू आहे जी शाकाहारी मांसाहारी शब्द एकत्र आले की होतेच Happy
कुठल्याही कारणाने माणसांमध्ये भिंती नकोत हे 100 % मान्य. पण जेव्हा सहनाववतु, सहनौभुनक्तु श्लोक लिहिला गेला तेव्हा खाण्या मध्ये एवढे प्रवाह तरी असतिल का Happy यावरून एक कार्टून आठवले Happy
download.jpeg

मनमोहन Lol
‘कसला रे आसिंधुसिंधू हिंदू बांधव, बेंबट्या!’ Lol

तुम्ही आपल्या महान संस्कृतीतला श्लोक कालबाह्य झालाय असं म्हणालात का चुकून? आता कालबाह्य देव तुमचं रक्षण करो! Proud

फा, अगदी!

लोल्स.
सोलुन भरलेली रोस्ट केलेली अख्खी कोंबडी टेबलवर ठेवली तर इथल्या मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटेल. शाकाहारी लोकांना आवडणार नाही. कोंबडीच्या जागी पिग असेल तर शांतिदूत धर्मियांना आवडणार नाही. पिग च्या जागी डॉग असेल तर इथले अनेक कट्टर लिबरल नॉनव्हेज लोक पण तिथे बसूही शकणार नाहीत. तिथून निघून जाताना आपण चायनीज कोरियन लोकांच्या फूड चा , कल्चरचा अपमान करतोय, भिंती उभारतोय वगैरे विचार ते करणार नाहीत.
प्रत्येकाचा threshold वेगळा, preferences वेगळे. त्यावरून ट्रोल कशाला करायचे?

सोलुन भरलेली रोस्ट केलेली अख्खी कोंबडी टेबलवर .. .

समोरच्याच्या विधानाचा विकृत विपर्यास करणे. वर आलेली कोशर/हलाल ही उदाहरणेही गैरलागू आहेत. तिथे 'विटाळ' ही संकल्पना नाही. एखाद्या चमच्याने एखाद्याने 'नॉन हलाल' खाल्लेले असेल तर तो 'विटाळला' व मग कितीही धुतला तरी 'शुद्ध' होत नाही ही संकल्पना नाही.

प्रिविलेज ची एक गंमत अशी असते की ती ज्यांच्याकडे असते त्यांनाही अनेकदा तिची जाणीव नसते. एखादी गोष्ट आपल्याला ऑफेन्सिव्ह वटत नाही कारण आपण receiving end ला नसतो. अमेरिकेत पूर्वी काळ्या व गोर्‍या लोकांना पाणी प्यायला वेगळे नळ होते, अनेक गोर्‍या लोकांना त्यात काहीच वावगे वाटत नसे. 'शामची आई' मी लहानपणी वाचली तेव्हा मला तो मोळीवाल्या म्हातारीचा प्रसंग खटकला नव्हता. नंतर एका दलित लेखकाने तो प्रसंग वाचून अस्वस्थ झालं असं लिहिलं तेव्हा मी वाचलं व मला जाणवलं. शेजारची लहान दलित मुलगी एखादा पदार्थ 'आम्ही घरी केलेला नाही हं' असं निक्षून सांगते तेव्हा हे जाणवतं.

एखाद्या शाळेत मुलांनी दलित महिलेने शाळेतच शिजविलेले अन्न खायला नकार दिला व आपल्या नकरार्थ विटाळालेला चमचा' व 'विटाळलेली महिला' हा तर्क दिला तर काय उत्तर द्याल ?

“Any Brahmin or sufficiently high caste Hindu prisoner from his class if eligible for appointment as cook.”

वरील वाक्य कोणत्या पुस्तकातले आहे बरे ? ते पुस्तक केव्हा दुरुस्त झाले ?

मुलाखतीत त्या म्हणतात की 'आय अ‍ॅम अ प्योर वेजेटेरिअन , आय डोन्त इव्हन ईट गार्लिक' हे बोलताना त्यांचा टोन व दुसर्‍या वाक्यावर कुणाल ची 'वॉव' ही प्रतिक्रिया बोलकी आहे. 'मी लसूण खात नाही' यात वॉव काय आहे?

>>> 'मी लसूण खात नाही' यात वॉव काय आहे?
मला वाटतं ते इतक्या कॉमन घटकपदार्थाबाबतचं पथ्य कसोशीने पाळता येण्याबद्दल असावं.
उदा. मला कोणी ‘मी अजिबात मीठ खात नाही’ किंवा ‘पायताणं घालत नाही’ असं सांगितलं तर माझ्याही तोंडून बहुधा wow जाईल प्रथम.

मला वाटतं विटाळ ही आपली कॉपीराइट संकल्पना असावी, त्यामुळे अगदी जसंच्या तसं उदाहरण इतर धर्मात सापडणं कठीण आहे. पण म्हणून विटाळ वाईट आणि नॉन विटाळ कारणं चांगली किंवा acceptable असं काही म्हणता येणार नाही. प्रत्येकाची प्रत्येक विषयातली प्रगल्भता वेगवेगळी असते. आता हेच बघा ना, आपल्याला नॉन विटाळ कारणं सहन होतात, पण कुणी विटाळ हे कारण दिलेलं सहन होत नाही. उलट त्यांना (सुधाबाईंना) विटाळ आणि विटाळेतर गोष्टी दोन्ही नाही सहन होत (बहुतेक. विटाळ हेच कारण आहे का, याची खात्री नाही). कोणाला काय सहन होतं हे त्यांच्या त्यांच्या स्थळकाळानुसार, अनुभवानुसार बदलतं. ज्या गोष्टी शिवकाळात चालत होत्या, त्यातल्या काही आता चुकीच्या समजल्या जातात. आपल्या पालकांचेच काही विचार आपण चुकीचे ठरवतो. आपले विचार पुढची पिढी बुरसटलेले ठरवेल. कुणी १००% मोकळ्या मनाचं आणि सर्वसमावेशक आहे असं छातीठोकपणे सांगू शकत असेल तर त्या व्यक्तीनेच तिला दगड मारावा (त्या येशूच्या गोष्टीनुसार).

वैयक्तिकरित्या बोलायचं तर मला कुणी वेगळे चमचे वापरणं हा पर्सनल चॉईस वाटतो. कुणाला काय घाण वाटेल सांगता येत नाही. मला कुणी संडासच्या तांब्याने आंघोळ करायला सांगितलं, तो कितीही धुतला असेल तरी, ते घाण वाटेल. पण मांसाहार वाटत नाही. तसं कुणाला मांस घाण वाटत असेल तर त्याला आपण काय करणार? त्यामागे 'विटाळ' 'धार्मिक अपवित्र' 'धर्म बुडाला' वगैरे कारणं असतील तर मात्र माझा विरोध आहे. पण ते करताना माझीही काही मतं एखाद्याला बुरसटलेली वाटू शकतात आणि काही वर्षांनी ती बदलू शकतात याची मला जाणीव आहे.

मी फक्त हलाल खाणार , फक्त कोशर खाणार असं म्हणणं आणि नॉन हलाल / कोशरसाठी हा चमचा कोणी वापरला असेल म्हणून मला तो नको. असं म्हणणं यात फरक आहे. मी माझे फुड चॉइसेस कोणावर लादत नाही , पण माझ्या वागण्यातून इतरांच्या फूड चॉइसवर कमेंटतर नक्कीच करतो.
---
हे तिथे बसूही शकणार नाहीत वगैरे कशावरून आणि कोणावरून ठरलं? एक मराठी व्यक्ती ईशान्येकडच्या राज्यात प्रवासाला गेली आणि तिथल्या लोकांनी तिला कुत्र्यापासून बनवलेला पदार्थ खायला दिला. तसंच पाहुण्याने खाणं नाकारणं हा त्या जमातीत यजमानांचा भयंकर अपमान मानला जातो, असंही त्या व्यक्तीला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे नाईलाजाने का होईना त्या व्यक्तीने तो पदार्थ थोडासा चाखला. हा किस्सा मी मायबोलीवरच वाचलाय की अन्यत्र ते आठवत नाही.
अमक्याच्या फ्रीजमधलं मांस बीफ आहे म्हणून त्याला तिथेच ठार मारणं हे उदाहरण का नाही आठवलं? की तोच होऊ घातलेला नॉर्म आहे?

इतरांच्या फुड चॉइसेसचा आदर करणं हे फार कठीण असू नये.

"तो त्यांच्या मानसिकतेचा भाग आहे "- एक्झॅक्टली. ती चुकीची आहे, हे त्यांना कळायला हवं.

<कोणाला काय सहन होतं हे त्यांच्या त्यांच्या स्थळकाळानुसार, अनुभवानुसार बदलतं> मूर्ती परदेशात जाताना सुद्धा आपला शिधा, भांडी, चमचे घेऊन जातात आणि यात त्यांना अभिमान वाटतो, लोकांना त्याचं कौतुक वाटतं तेव्हा वाक्यही सगळ्यांना लागू होत नाही.

चमच्याने आपला धर्म किंवा जे काय असेल ते बाटेल हा एक प्रकारचा paranoia नाही का?Paranoia is thinking and feeling like you are being threatened in some way, even if there is no evidence, or very little evidence, that you are. Paranoid thoughts can also be described as delusions. There are lots of different kinds of threat you might be scared and worried about.

हपानी लिहिलंय तसं टमरेल भरपूर स्वच्छ केलंय म्हणून तेच आता जेवायला वापरा, संडास अगदी स्वच्छ आहे म्हणून डायनिंग रूमऐवजी तिथे जेवायला बसा- यात काही जणांना चालेल, काहींना नाही.
त्याला - किंवा- हॉटेलमध्ये चमचा नीट धुतला नसेल तर- असं वाटण्याला तुम्ही paranoia म्हणू शकता. पण casteism चा संबंध नाही. रामतीर्थकर, मध्यान्ह भोजन वगैरे गोष्टी इथे आणण्याचं कारण नाही.
करोना काळात पण लोक इतकं वेगवेगळ्या range मधील वागत होते- की त्यातही आपलं ते नॉर्मल caution व दुसऱ्याचा तो paranoia असं वाटत होतं.

पुन्हा तेच. त्यांचा प्रश्न चमचा स्वच्छ नसण्याबद्दलचा नाहीच आहे. त्यांना या चमच्याने आधी कोणी सामिष पदार्थ खाल्ला असेल अशी भीती वाटणे हा आहे. त्यांनी स्वच्छ हा शब्द वापरलेला नाही.

हपा, तुम्ही चमच्याचं उदाहरण पटवायला टमरेल निवडून ते विशिष्ट स्कूल जॉइन केलंत का? ठीक आहे. आपण तांब्याचंच उदाहरण घेऊ या. मी सुधा मूर्ती आहे. मला तांब्या घ्यायचा आहे. दुकानात गेल्यावर माझ्या मनात विचार येतो की अरे या तांब्यांसाठी वापरलेला धातू जुनी भांडी वितळवून केलेला असेल तर? त्या जुन्या भांड्यांतलं एखादं कोणी टमरेल म्हणून वापरलं असेल तर? मग मी काय करेन तांब्याच्या किंवा मला हव्या त्या धातूच्या खाणीत जाऊन मला हवा तो धातू 'शुद्ध' रूपात मिळवेन आणि त्याचा तांब्या घडवून घेईन. माझ्या वर्तनात काहीही चूक नाही.

----
दुस र्‍याचं अन्न पाहून ई वाटण्याचं एक वेगळं उदाहरण देतो. एका तमिळ पंक्तीत त्यांची सांबार भात एकत्र करून त्याचा लाडू करून खाण्याची स्टाइल पाहणार्‍याला ओंगळवाणी वाटली. युट्यूबर क्रेझि इंडियन मॅन ईटिंग राइस अशा शीर्षकाचा व्हिडियो आहे. समजा आपण त्या पंक्तीत असू तर ई केलं तर चालेल का?

मूर्तींचे शब्द स्पष्ट असताना उगाच हायजीन किंवा फूड चॉइस वगैरेची तुलना सुरू आहे.

<<<"तो त्यांच्या मानसिकतेचा भाग आहे "- एक्झॅक्टली. ती चुकीची आहे, हे त्यांना कळायला हवं.>> हा कळीचा मुद्दा आहे. पण जे आणि जसे म्हटले ते ही (सर्व ठिकाणी शाकाहारी - मांसाहारी वेगळे चमचे न ठेवणे) समाजातील समस्या आहे असे सूचीत होते, व्हेअर ऍज मूळ समस्या ही मानसिकतेकची समस्या आहे.

पराचा कावळा कसा होतो हे माबोवर येऊन पाहावे. कुठल्याही क्षुल्लक घटनेतुन किती प्रचंड मोठा अनर्थकारी संदेश जाऊ शकतो ते इथे वाचले की कळते. धन्य ते लोक ज्यांची डोकी असे विचार करु शकतात.

*ईशान्येकडच्या राज्यात प्रवासाला जाणार नाही. तसं लांबच आहे. मग धडपड कशाला.

*पराचा कावळा कसा होतो?? - उगाचच चर्चा केल्याने. खाणाऱ्या लोकांनी आपलं खावं. न खाणाऱ्यांच्या वाटेला जाऊच नये.

*मी माझ्यापुरता प्रश्न सोडवतो.

लोक इथे पहिल्या पानापासून संबंध नसलेला स्वच्छतेचा मुद्दा रोज नव्याने आणताहेत आणि दुसऱ्या कोणी केलेल्या मांसाहारामुळे अपवित्र वाटतं हा ढळढळीत दिसणारा मुद्दा दुर्लक्षित करताहेत. आणि भरकटवायला काहीतरी टोकाची उदाहरणं देताहेत.
नीट समजून घेणं आणि विचार करता येणं, कठीण आहे की करायचं नाहीये?

>>> दुस र्‍याचं अन्न पाहून ई वाटण्याचं एक वेगळं उदाहरण देतो.
वेगळं उदाहरण कशाला, मला तर ती सुधाताईंची मुलाखत पाहातानाच तसं वाटलं. त्या केळीच्या पानावर अत्यंत अनाकर्षक पद्धतीने सगळे घन/द्रव पदार्थ वाढले जात होते (वाटी नाही तर निदान द्रोण त्या साबुदाण्याच्या खिरीला?!) आणि बोटं बुडवत, चाटत, ढेकरा देत, तोंडात घास असताना गप्पा सुरू होत्या. हे असं टीव्हीवर बघायला कोणाला आवडतं?! मला तर ते लग्नाबिग्नात जेवणावळी सुरू असताना फोटो काढतात तेही आवडत नाही.

ते धातू वितळवण्याचं काय ते कळलं नाही. सुधा(बा/ता)ईंना वितळणपूर्वकाळातील सामिष जेवणाशी आक्षेप आहे काय? (असला तरी आपल्याला काय फरक पडतो? देवा, त्यांना क्षमा कर, त्यांना माहीत नाही त्यांचे स्वतःचे चमचे आणि इतर भांडी कशी बनवली गेली आहेत ते - असं म्हणेन मी फार्फार तर.)

> लोक इथे पहिल्या पानापासून संबंध नसलेला स्वच्छतेचा मुद्दा रोज नव्याने आणताहेत आणि दुसऱ्या कोणी केलेल्या मांसाहारामुळे अपवित्र वाटतं हा ढळढळीत दिसणारा मुद्दा दुर्लक्षित करताहेत. आणि भरकटवायला काहीतरी टोकाची उदाहरणं देताहेत.

होना, टमरेल काय, सोलून ठेवलेली कोंबडी काय. ही लबाडी जुनीच अहे . अगदी सकच्छ कि विकच्छ वादाच्यावेळीही 'आज काष्टा नको म्हणाल, उद्या कपडेच नको, आम्ही तशाच हिंडू म्हणाल' हेही आलं होतं.

इथे सुधा मूर्तींबद्दल वाचून तो व्हिडियो पाहिला.
कुणालशी गप्पा मारत असताना बोलण्याच्या ओघात, मूर्तीनी वरचे विधान केले आहे.खरोखर त्याची इतका कीस काढण्याची गरज नसावी.जर त्या बाई आपली मते दुसऱ्यावर लादत असत्या तर बाब वेगळी होती.

बाकी ते जेवताना इतके बोलणे /ऐकणे वैतागवाणे होईल.

तोंडात घास असताना गप्पा सुरू होत्या. हे.....,.. सहमत.
परत कोणी काय करावे आणि करू नये हा प्रत्येकाचा प्रश्न आहे.

Pages