भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ४- कांगेर राष्ट्रीय उद्यान

Submitted by मनिम्याऊ on 20 July, 2023 - 04:21

भाग ३ नमन बस्तर
ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हजर झालेत. चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड म्हणूनही काम करतो म्हणाला.
म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
पुढे....
पहिला थांबा कांगेर अभयारण्य. जगदलपूर पासून दक्षिणेकडे ३५ किमी अंतरावर कांगेर अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. हा पूर्ण रस्ताच घनदाट वनामधून जातो. किरणकुमार बरेच बोलके निघालेत. बस्तरच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे मनापासून प्रेम आणि सार्थ अभिमान वागण्या बोलण्यात दिसून येत होता. 'रामजी' चे निस्सीम भक्त. "सीतामैय्या हमारी मैया, और लछमन हमारे बडे भैय्या. पार लगा दे सबकी नैय्या".अशी ठाम श्रद्धा. स्थानिक संस्कृतीबद्दल बरीच माहिती होती त्यांना. अर्ध्या तासात कांगेर घाटी नॅशनल पार्क च्या प्रवेशद्वारासमोर गाडी उभी केली.
kanger gate.jpg
इथे पूर्वी खाजगी गाडयांना आत जाऊ देत मात्र गेल्या काही वर्षांपासून वनविभागाच्या जिप्सी सफारींनाच प्रवेश आहे. त्याप्रमाणे सगळ्यांचे सफारीसाठी शुल्क भरले. जिप्सीचा नंबर यायला वेळ लागला तोवर किरणजी माहिती सांगू लागलेत.

सुमारे २०० वर्ग किमी क्षेत्रात पसरलेल्या कांगेर खोऱ्याचे नाव कांगेर नदीवरून पडले आहे जी छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवरून वाहते. या अरण्यात अनेक उंच पहाड, खोल दऱ्या, महाकाय वृक्ष आणि विविध वन्यफुले आणि वन्यजीव आढळतात. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती देखील येथे उगवतात. बस्तर मैना हा छत्तीसगढचा राज्यपक्षी जो हुबेहूब माणसासारखा आवाज काढू शकतो तो पण येथेच आढळतो.
mania.jpg
image source: internet
संपूर्ण बस्तर मध्ये अनेक छोटे मोठे धबधबे आहेत त्यांपैकी १० प्रमुख धबधबे कांगेर अभयारण्यात आहेत.
२ तासांच्या प्रतीक्षेनंतर जिप्सी आली. जंगल सफारी सुरु झाली. अगदी घनदाट असे जंगल. ज्याला ‘अरण्य’ हाच योग्य शब्द आहे. काही ठिकाणी झाडे आणि वेलींची तर इतकी दाटी आहे कि खरंच सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही.
forest from ji[si_0.jpg
.
long shot.jpg
आत जाण्याची वाट गर्द जंगलातून होती. वर निरभ्र निळेभोर आकाश, वाटेत कुठे एखाद्या झाडाखाली जंगली बोरांचा सडा पडलेला तर कुठे उंच उंच तपकिरी मातीची वारुळे उभी होती. मुंग्यांच्या वारुळांना ‘बांबी असे नाव आहे तर उधईच्या (वाळवी) वारुळांना इकडे 'वल्मिक' म्हणतात. या वल्मिकची एक गम्मत सांगितली गाईडने. कि हि उधईची वारुळे म्हणजे जंगलातले होकायंत्र. याची पूर्वेकडील बाजू नेहमीच सपाट गुळगुळीत असते तर पश्चिम टोकदार. या वारुळांमध्ये पावसाळ्याच्या सुरवातीला 'फुटू भाजी' उगवते. मश्रुमचा एक प्रकार असलेली हि भाजी स्थानिक आदिवासी गोळा करून आणतात व ती रायपूर आणि भुवनेश्वरच्या बाजारात १५०० ते २००० रुपये किलो भावाने विकली जाते.
varul.jpg

आजूबाजूला हिरव्या रंगाच्या अनेक छटा, नुसत्या बघण्यापेक्षा अनुभवण्यासारखा. जंगलातली निरव शांतता व मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा चिवचिवाट, वातावरणात भरून राहिलेला एक विशिष्ट गंध कितीतरी वेळा दीर्घ श्वास घेऊन छातीत भरून घेतला. ऐन डिसेंबरमधले कोवळे उबदार ऊन आणि जिप्सीच्या वेगामुळे सपासप कापली जाणारी थंडगार हवा. ती दहा पंधरा मिनिटे सगळे शांत बसून अनुभवत होते. जरा वेळाने दुरून पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला.
1_0.jpg
आम्ही आता कांगेर नदी जवळ पोचलो होतो. हि नदी बारमाही वाहणारी आहे. जंगलात बऱ्याच आतमध्ये एका मोकळ्या जागी जिप्सी थांबवली. पुढे काही नैसर्गिक पायऱ्या उतरून थोडे समोर जावे लागते. नदीच्या प्रवाहात 'धारा' नावाचा एक सुंदर छोटासा तीन पायऱ्यांचा धबधबा आहे. त्याला 'कांगेर-धारा' पण म्हणतात.
kanger river.jpg
,
kanger dhara1.jpg
हिरव्यागार परिसरात काळे खडक आणि मधून वाहणारी दुधासारखी शुभ्र धारा आणि ह्या शांततेत ऐकू येणारा फक्त आणि फक्त पाण्याचा खळखळाट. इथले पाणी उथळ आणि सुरक्षित आहे.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.44.56 PM.jpeg
नदीच्या दोन्ही बाजूंना विस्तीर्ण काळे खडक खाली उतरत जातात. तिथे कातळांवर बकरीची छोटी छोटी पिल्ले उड्या मारत बागडत होती. या वातावरणात ते दृश्य फार लोभसवाणे वाटत होते. तेथून पाय काही निघेना.
kd.jpg
.
kanger1.jpg
थोडे दूर भैसा दरहा नावाचे तळे आहे. दरहा/ दरा म्हणजे नदीने वळण घेताना तयार केलेला पाण्याचा तलाव. येथे मगरींचे नैसर्गिक निवासस्थान आहे तसेच कांगेर नदीला मिळणाऱ्या उपनद्या व हंगामी नाल्यांमुळे या खोऱ्यात काही भागात 'झोडी' (दलदलीसदृश्य जमीन) निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पर्यटकांना प्रवेश नाही.
my.jpg
छोटा पर्यटक

हे राष्ट्रीय उद्यान तीन विलक्षण लेण्यांचे घर आहे. कुटुंबसर, कैलास आणि दंडक. स्टॅलेग्माइट्स आणि स्टॅलेक्टाइट्सच्या रचनांसाठी आणि भूमिगत चुनखडीच्या गुहांसाठी प्रसिद्ध आहे.
यांपैकी कोटमसर गुहा बघायला निघालो. ही गुहा मूळात गोपनसर गुहा (गोपन = लपलेली) म्हणून ओळखली जात होती परंतु 'कोटसर' गावाजवळ असलेल्या या गुहेला कोटमसर (कुटुमसर) असे नाव पडले.
hidden entry.jpg
Hidden entry
गुहेचे प्रवेशद्वारkutumsar entry.jpg
या गुहेची लांबी ३३० मीटर असून सुमारे ५५ मीटर खोलवर पसरली आहे आहे. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय अरुंद असून १२ फूट खाली गेल्यावर एकावेळी दीडशे माणसे राहू शकतील एवढ्या विस्तीर्ण कक्षात आपण प्रवेश करतो. असे ५ मोठे कक्ष आतापर्यंत सापडले आहेत. एक लांबच लांब
मार्गिका पूढे अंतर्भागात घेऊन जाते.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.41 PM_0.jpeg
गुहेत १० वर्षांखालील मुले तसेच ६० पेक्षा जास्त वय असलेल्या किंवा श्वसनविकार असलेल्या पर्यटकांना प्रवेश नाही. त्यामुळे आमच्यापैकी फक्त मलाच गुहेत प्रवेश करता आला. आतील हवा ओलसर दमट होती व वातावरणात एक वेगळाच शेवाळलेला कुंद वास दरवळत होता. गुहेत जागोजागी मार्गदर्शक खुणा केल्या आहेत व ठराविक वाट सोडून इतस्त: फिरण्यास सक्त बंदी आहे.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.40 PM (1).jpeg
.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.41 PM (2).jpeg

आतमध्ये चुनखडीपासून निर्मित लवणस्तंभ आहेत. या लवणस्तंभांमुळे आतमध्ये विविध आकृत्या तयार झाल्या सारख्या दिसतात. गुहेच्या आतमधून पाण्याचा प्रवाह वाहतो व या गुहेच्या आतील पाण्यात शंकरी नावाचे रंगीबेरंगी आंधळे मासे आढळतात.
kutumsar internal.jpg
पुढे खोल अंतर्भागात एक प्राचीन शिवलिंग असून स्थानिक आदिवासींच्या श्रद्धेनुसार श्रीराम वनवासात असताना या भागात वास्तव्य करून होते व गुहेतल्या शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष रामाने केली आहे.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.40 PM.jpeg
असं म्हणतात कि या गुहेतून जाणारे गुप्त भुयार थेट जगन्नाथपुरीजवळ उघडते. अलीकडेच २०११ साली या गुहेत आणखी एक कक्ष सापडला आहे. पावसाळ्यात मात्र गुहेच्या आतील प्रवाह रौद्ररूप धारण करतो. त्यामुळे जून ते ऑक्टोबर सुरक्षेच्या कारणासाठी गुहा बंद ठेवतात.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.41 PM (1).jpeg
आतमध्ये बरीच माणसे होती व टॉर्चच्या प्रकाशात गाईड माहिती देत होता. पण गर्दीमुळे जास्त निरीक्षण करता आले नाही. शिवाय मी आत गुहेत गेल्यामुळे बाहेर लेकीने घाबरून पोंगा पसरला होता. आतमध्ये मोबाइल हि लागेना. शेवटी तिथल्याच एका माणसाकरवी निरोप पाठवून मला बाहेर बोलावून घेतले. लेक हमसून हमसून रडत होती. तिला जवळ घेऊन शांत केले. आणि जिप्सीत बसून पुढे निघालो.
क्रमशः
भाग ५ तीरथगढ जलप्रपात
(तळटीप : मागे म्हटल्याप्रमाणे लेखमाला ३-४ भागांत आटोपती घेण्याचा प्रयत्न होता. पण आता इतक्या भराभर लिहिता येत नाहीय. त्यामुळे कदाचित २-३ भाग आणखी वाढू शकतात. )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जितके भाग वाढतील, तितकाच आम्हाला वाचायला अधिक आवडेल. तुम्ही एक अनएक्सप्लोरड एरिया एक्सप्लोरड करत आहात.

छान लिहिताय
सगळे भाग वाचले
अतिशय सुंदर जागा आहे

भाग सावकाशपणे येऊ द्या .खूप वेगळ्या प्रदेशाची ओळख होते आहे. अजूनही सविस्तर वाचायला आवडेल

प्रोत्साहन दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार. जास्तीत जास्त विस्तृत वर्णन करण्याच्या प्रयत्न करते आहे

आकर्षक आहे. शिवाय इकडच्या भागांचे पर्यटन लेख फारसे नाहीत. त्यामुळे बारीक तपशीलही उपयोगी ठरेल. उदाहरणार्थ गुहेत जाण्यासाठी वयाची अट.