हिंदी चित्रपटांतील जुनी आवडती गाणी: १९६० पर्यंतची

Submitted by अवल on 29 June, 2023 - 22:28

मला आवडणाऱ्या जुन्या हिंदी चित्रपट गीतांसाठी हा धागा. सुरुवात किसी तऱ्हासे मुहोब्बतमें चैन पा न सके याने करते. बाकी खाली प्रतिसादामधे लिहीत जाईन, जसे जमेल तसे. तुम्हाला आवडणारी गाणी (पण जुनीच. 1960 पर्यंतचीच) लिहिलीत तर आवडेलच.

बडी माँ हा 1945 चा चित्रपट!
IMG_20230630_075518.jpg
मा. विनायक यांची निर्मिती अन दिग्दर्शन. सुप्रसिद्ध तारका- गायिका नूरजहाँ अन ईश्वरलाल, याकूब, सितारादेवी, मीनाक्षी, दामुअण्णा मालवणकर अशी तेव्हाची तगडी कास्ट असणारा हा चित्रपट. (1974 मधे आलेला बडी माँ हा चित्रपट वेगळा, अनेकदा दोन्हीची गल्लत केली जाते).

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा उलगडत जाते. जागतिक राजकारण, जपान, भारताचे देशप्रेम अशा अनेक वळणांनी हा चित्रपट समृद्ध होत जातो.

या गीताचे संगीतकार होते सुप्रसिद्ध के. दत्ता होते. तर गीतकार अंजुम पीलीभीत.
गायिका होती नूरजहाँन. स्वातंत्रपूर्व काळातली महान गायिका- नायिका. तिच्या आवाजातला तलमपणा, तीनही पट्यांमधे लिलया फिरणारा आवाज, गोडवा; तिचं सौंदर्य आणि अभिनय सर्वच लाजवाब!
या गाण्याची जान आहे ती नूरजहाँनच्या "पाऽऽ न सके" या मधे.

सुरुवातीच्या हिंदी चित्रपट सृष्टीमधे कोल्हापूर अन मराठी कलाकारांचा कसा वरचष्मा होता हे या चित्रपटाची कास्ट बघितली की कळतं. निर्माता, दिग्दर्शक(मा. विनायक), संगीतकार ( के. दत्ता म्हणजेच दत्ता कोरेगावकर) , बॅनर ( प्रफुल्ल पिक्चर्स), कथा ( व्ही. एस. खेडेकर) , एक गीतकार(राजा बढे), एक गायिका(लता), चार स्त्री कलाकार ( मीनाक्षी, लता, आशा, बेबी अलका), दोन पुरुष कलाकार (दामुअण्णा मालवणकर, दादा साळवी).
या शिवाय याकूब, सितारादेवी, लिला मिश्रा हेही या चित्रपटात होते.

आज या चित्रपटाची फिल्म, कुठेही उपलब्ध नाही. शक्यता आहे की फिल्म आर्काईव्हजमधे कुठेतरी असेल. पण किमान नूरजहाँच्या या आणि इतर गाण्यांनी (दिया जला कर आप बुझाया: https://youtu.be/gBczUcadYLw)
रसिकांच्या मनात हा चित्रपट जागा राहील.

सध्या इतकच!
---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप माहितीपूर्ण आणि रसपूर्ण धागा आहे. पुष्कळ जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ' जुने सूर अन् जुने तराणे ' मनात फेर धरू लागले

नूरजहाँनचे दोन व्हिडिओ आहेत, रेडिओ सिलोनचे. वेगवेगळी गाणीही आहेत. जरूर बघा, कॉमेंट्रीही चांगली आहे.
https://youtu.be/e56EI60FfNI
(यात अगदी शेवटी असलेलं "जिस दिन से पिया ले गये" हे गाणं कोणत्या गाण्याची आठवण करून देतय? लताचच बहुतेक)
आणि
https://youtu.be/ELGF1zuh-Qw
यात 1982 मधे ती भारतात आलेली तेव्हाचं आवाज दे कहाँ है जरूर ऐका. वयाच्या 58 वर्षीही काय आवाज, फिरक, पट्टी आहे, सुभान अल्ला! यातच मधे अन शेवटी जो काही आलाप आहे, अद्भूत.
रानभुली, हपा तुम्ही जरा ऐकून लिहा न यावर. म्हणजे त्यातले बारकावे समजून घ्यायला आवडतील.

>>> बाय द वे, "ऐसी रिमझिम मे ओ सजन" मधे जी चाल बदलली आहे, तशा पद्धतीने रचलेल्या गाण्याला काहीतरी विशिष्ठ शब्द आहे. स्वाती आंबोळेने एकदा त्याबद्दल माहिती दिली होती. मला स्पेसिफिक लक्षात नाही. ती इथे आली तर सांगेलच.

आले आले. Happy
त्या निराळ्या पद्धतीने 'संचार' करणार्‍या अशा ओळीला 'संचारी' असं म्हणतात. मूलतः ध्रुपद गायकीतून आलेली ही संकल्पना बंगाली संगीतात थोड्या निराळ्या पद्धतीने वापरली गेली, आणि बहुधा रवींद्रनाथांनी तिचा प्रथम वापर केला. मी वाचलं आहे त्यानुसार ही ओळ सप्तकाच्या सगळ्या स्वरांना स्पर्श करून येते, चुभूद्याघ्या.
या लिंकवर अधिक माहिती आणि उदाहरणं सापडतील. तिथे न आलेलं तुलनेत अलीकडचं उदाहरण ओंकारा चित्रपटातल्या 'नैना ठग लेंगे' या गाण्यातली 'नैना रात को चलते चलते स्वर्गा में ले जावे, मेघमल्हार के सपने बीजे हरियाली दिखलावे' ही ओळ.

इथे माहिती आणि दुव्यांचं खूप मौल्यवान भांडार गोळा होतंय. नीट सावकाशीने वाचते आणि ऐकते. Happy

ओह! चित्रपट संगीतातही संचारी वर्ण आहे हे माहीत नव्हतं. धृपदात त्याचं रूप थोडं वेगळं आहे. इथे तो शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरलेला दिसतो आहे. पण तरी सयुक्तिक. लिंक वाचून बघतो.

सामी मला 'उडन खटोला' मधील ते नदीवरचे गाणे फार म्हणजे फार आवडते. मुलायम भावना तसेच शब्द व संगीत.

https://www.youtube.com/watch?v=Vab1GnHU_vM

मेरे सैंयाजी उतरेंगे पार हो
नदीया धीरे बहो.

जिस दिन से पिया ले गये" हे गाणं कोणत्या गाण्याची आठवण करून देतय?
हे सांगा लोकहो, मला अजिबातच क्लिक होई ना.

“दिस दिन पिया से …” हे गाणे ऐकून दोन लताची गाणी आठवली.
१. जा जा रे… (लेकिन)
२. नंदनंदन सावरो सावरो…(गैरफिल्मी, मीरा)
मला वाटते या सर्व गाण्यांचा राग एकच आहे. तोडी किंवा त्याचा काही मिश्र राग.

फारच छान चालू आहे धागा आणि चर्चा. खूप खूप धन्यवाद सगळ्यांनाच. अवीट गोडीच माहीत नसलेले एखादे गाणे अचानक सापडणे ह्या सारखे सुख नाही. मॅडमचा विषय निघालाच आहे तर 'मुझसे पेहेली सी मोहब्बत मेरे मेहेबूब ना मांग..' ला विसरून कसे चालेल. फारच अप्रतिम गायलं आहे मॅडमनी. फैज अहमद फैजची गजल आहे, कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. मॅडमची देशभक्तीपर गाणी पण अप्रतिम आहेत. 'ए वतन के सजीले जवानो' नक्की ऐका. त्यांच्या पण युट्यूब वरच्या मुलाखती ऐकण्या सारख्या आहेत. ह्या फैज ची अजून एक गजल (बहुदा सर्वांना माहीत असेल)..

कुछ इश्क़ किया कुछ काम किया..
वो लोग बहुत ख़ुश-क़िस्मत थे
जो इश्क़ को काम समझते थे
या काम से आशिक़ी करते थे
हम जीते-जी मसरूफ़ रहे
कुछ इश्क़ किया कुछ काम किया
काम इश्क़ के आड़े आता रहा
और इश्क़ से काम उलझता रहा
फिर आख़िर तंग आ कर हम ने
दोनों को अधूरा छोड़ दिया l

लंपन, वा मस्त
मुझसे पेहेली सी मोहब्बत मेरे मेहेबूब ना मांग..'अरे खरच की हे राहिलच. धन्यवाद

चला आज जरा पुढे सरकू Happy
आज सुरैयाचे एक गाणे.
ही आवड माझ्या मैत्रिणीची. तिचं लाडकं गाणं हे. तिची फर्माईश म्हणून लिहिलेलं यावर, ते देते.

तारारी आरारी

https://www.youtube.com/embed/eme_kMZKyG4

दासताँ 1950 फार गाजलेला चित्रपट!
अब्दुल रशिद कारदार दिग्दर्शित
तीन भावंडं अन नव्याने आलेली एक अनाथ मुलगी. या सगळ्यांचा बालपणापासून तरुण पणा पर्यंतचा प्रवास म्हणजे दासताँ.
चित्रपटाचं संगीत आहे नौशाद यांचं.
गीत शकिल बदायुनी यांचं.
अन हे गाणं आहे तारारी, आरारी...
गायक सुरैय्या आणि रफी.
चित्रित केलय सुरैय्या अन राज कपूरवर. राजकपूरला सहसा असा आनंदी, रोमँटिक फार कमी पाहिलाय. त्याच्या रोमान्स मधे नेहमी एक समोरच्या नायिकेला तडपवण्याची झाक असते. त्याची नायिका सतत त्याच्यासाठी आसूसलेली वगैरे असते. अन प्रेमात नेहमी त्याचा वरचष्मा जाणवत रहातो. त्या काळातही काहीसा डॉमिनन्ट नायक त्याने साकारला. हे गाणं मात्र याला अपवाद आहे.
उलट सुरैय्या सगळा भाव खाऊन जाते या गाण्यात. अर्थात हे स्वाभाविक आहे, या वेळी सुरैय्या तिच्या करियरच्या सगळ्यात वरच्या पायदानावर हेती. तर राजकपूर तसा नवा होता. अशी जरा उलटी भूमिका बघताना मला तर थोडा आसूरी आनंद मिळाला Wink
एरवी राजकपूर कितीही आवडत असला तरी बायकांप्रती त्याचा अॅप्रोच मला खटकत आलाय. म्हणजे हृदयात एक कळ येते वगैरे ठिके हो, पण सतत का आपला त्याचा माज, हुर्रऽऽऽ Wink
तर ते असो. आज जरा बोलायचय ते संगीत अॅरेमजमेंट बद्दल. मलाही जरा कमीच माहिती होती. पण एका एशियन फिल्म फेस्टिव्हलमधे एक फिल्न बघितली अन डोळे लख्ख उघडले. नुसता संगीतकार नव्हे, गायक नव्हे, वादक नव्हे तर अरेंजरची किती मोठी भूमिका असते ते लख्ख कळलं.
या गाण्यात मधे मधे सतत साथ करणारं व्हॉयॆलिन वाजवल अँथनी गोन्साल्व्हिस यांनी. हेच ते महान अरेंजर. आता हे गाणं ऐका. अन मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन माझा त्यांच्यावरचा लेख जरूर वाचा.
https://www.maayboli.com/node/32041

जुना आहे पण वाचा. आवडला तर तिथेच प्रतिसादही द्या. त्यानिमित्तानं धागा वर येईल. माझ्यासाठी नाही; तर गोन्साल्व्हिस यांची माहिती पुन्हा वर यावी, अजून काहींना ती कळावी म्हणून!

सर्वांनी खूप छान लिहीले आहे.
लंपन, हपा, रानभुली छान पोस्टस.

लग जा गले हे गाणे इथे अवतरलं कि मला हाक मारा. हपा मारतील (हाक) ही अपेक्षा! Happy
हाक डबल झालं म्हणून कुणी तरी सांगेल.
आणि नाही सांगितले तर हपा हिंसक वळण देतील. Happy
शेवटी कंसाला शरण जावे लागले.

मजा येतेय वाचायला. आमच्याकडे होती जुनी जुनी गाणी. बाबांना आवड आहे. ते गुणगुणायचे देखिल. ते सैगलला प्रतिश्रीकांत समजायचे असा मला डाऊट आहे.

हे तारारी गाणं waltz rhythm मधे आहे. बॉलडान्समधे हा ठेक्यावर वॉल्ट्झ नृत्य करतात. तीन तीन स्टेप्स एकत्र असतात आणि स्त्रीपुरुष एकत्र नाचताना synchronize करून नाचावे लागते. पण हे नृत्य बघताना या लयीवर झुलणार्‍या जोड्या किती मस्त दिसतात.

अनेक सुंदर हिंदी गाण्यांमधे हा ठेका वापरलाय.

उदा. हम आपकी आँखोमे इस दिल को बसा दे तो , दिल की गिरह खोल दो चुप ना बैठो, फुलों के रंग से, लग जा गले, यादोंकी बारात.... इ.

लग जा गले हे गाणे इथे अवतरलं कि मला हाक मारा. >> इथे 'की' - दुसरी वेलांटी पाहिजे. असं काहीतरी करून तुम्ही हिंसेला प्रोत्साहन देता आचार्य! Wink

दो बीघा ज़मीन (1953) मधील बाबांचं आवडत गाणं
अपनी कहानी छोड़ जा, कुछ तो निशानी छोड़ जा
कौन कहे इस ओर तू फिर आए न आए
मौसम बीता जाए...

या गाण्याची गम्मत बाबा सांगायचे कि सगळे ते गाणं तेव्हा "मोसंबी ताजा रे …." असं गायचे

सांवरे सांवरे
चित्रपटः अनुराधा (१९६०)
संगीतः पं. रविशंकर

लता काय चिज आहे ते दाखवून देणार्‍या गाण्यात या गाण्याचा नंबर माझ्याकरता खूप वरचा लागतो.

अनेक वाद्यांच्या वादकांना एक अडचण असते - मिंड ! मिंड म्हणजे एका स्वरावरून दुसर्‍या स्वरावर जाण्यापर्यंतचा प्रवास. या प्रवासात गायक ज्या श्रुतींना स्पर्श करतो किंवा ज्या टाळतो त्यावरून त्याची / तिची गायकी ठरते (बाकीचे अनेक मुद्दे पण असतातच). पण अनेक वाद्यांत ती मिंड वाजवणं फार अवघड असतं. संतूरचं उदाहरण घेतलं तर अनेक स्वर ते वाद्य उत्पन्न करू शकतं पण ते डिस्टींक्ट असतात, एकसंध नसतात. गत वाढवून, दोन स्वरांमधला कालावधी कमी करून एकसंधतेचा (मिंड) आभास निर्माण केला जातो पण ती खरी मिंड नसते. मिंड नसेल तर एका स्वरावरून दुसर्‍या स्वरावर उडी मारली जाते, मिंड असेल तर तरंगत जाता येतं. जी व्यथा संतूरची तिच काही अंशी सतारीची!

जे वाद्याला जमत नाही ते मानवी गळ्याला सहज जमतं. खरं तर मिंड शिवाय सुटे स्वर वापरून गाण सुरेल करणं जवळपास अशक्य! मग एका अव्वल सतारीयाने चाल बांधली - सतारीची वैशिष्ठ्य दाखवणारी आणि गळ्याला पेलायला कठीण ! एका स्वरावरून दुसर्‍या स्वरावर नुसत्या उड्या मारायच्या तरंगायचं नाही, त्याने गायिकेला सांगितलं! ती काही कमी नव्हती, स्विकारलं तिने ते आव्हान!

गाणं सुरू होतं, सतार अप्रतिम वाजते - अगदी दिडदा दिडदा! एक एक स्वर स्वच्छ दाखवते. मग लता आलापीतले शब्द गाते - सांवरे सांवरे!काहिसा वरच्या पट्टीतला तो आलाप तिला सहज जमतो. त्या शब्दांनतर एक सतारीचा सुंदर तुकडा आहे. 'असं गायचय तुला' त्या तुकड्यातून पंडितजी लताला सांगतात. 'तुझी ती दोन स्वरांमधली कातिल आस बाजूला ठेव आणि उड्या मारत सुटे स्वर गा - सुरेलपणे! हेच आव्हान आहे या चालीचं.'

मुखड्यापासूनच स्वरांचे झोके घेणं सुरू होतं पण ते झोके असतात उड्या नसतात. जे मुखड्यात तेच पहिल्या अंतर्‍यात पण आहे. गाणं, लता आणि रविशंकर इथपर्यंतच आवडून गेलेले असतात. 'संग ना सहेली पायके अकेली' अंतर्‍याची पहिल्या ओळीनंतर एक ब्रीदर आहे. तो ब्रीदर संपल्यानंतर लता तीच ओळ पुन्हा म्हणते. पण त्या आधी एक सतारीचा छोटा तुकडा आहे. नीट ऐकून ठेवा तो.

रोको ना डगर मोरी - पहिला अंतरा संपायला येतो. आपण त्या स्वरांच्या झोक्यांबरोबर झुलतंच असतो. पंडितजींनी लताला दिलेल्या आव्हानाची आपल्याला कल्पनाच नसते. पण अंतर्‍यातलं शेवटचं अक्षर संपतं आणि विज कडाडते. वर लक्षात ठेवलेला सतारीचा तुकडा लता सहीसही गाऊन दाखवते. मिंड जराही नाही, नुसते सुटे स्वर! अ फ ला तू न !

मजा इथेच संपत नाही गाण्याची! पहिल्या अंतर्‍यानंतर पुन्हा मुखडा येतो. आणि तो संपवताना लता सांवरेतला रे असा काही तोडते की बुलेट ट्रेन एका कड्याच्या कडेला (?) येऊन क्षणार्धात थांबल्याचा भास व्हावा.

गाणं अप्रतिम आहे, सिनेमात ते गाणं पेलू शकणारी लिला नायडूसारखी लावण्यवतीही आहे पण ते गाणं टायटल्सच्या पार्श्वभूमीवर ऐकायला लागतं. समोर दिसत राह्तो फक्त रेडीओ. तर अनुराधा पाहणार असाल तर सुरुवात चुकवू नकाच!

मी वर रतन च्या गाण्यांबद्दल लिहिले आहे, आमच्याकडे फिलिप्स चा डबल कैसेट रेकॉर्डर होता. मॅक्सेल, सोनी च्या रिकाम्या केसेट्स आणून गाण्यांची लिस्ट बनवून रेकॉर्ड करून मिळायच्या . आवडते काम होते ते तेव्हा .
रतन ची गाणी कुठेच मिळत न्हवती मग बाबांनी एका मित्राकडून रतन ची कैसेट एका दिवसासाठी आणली आणि लगेच आम्ही ती सगळी गाणी रिकाम्या कैसेट वर रेकॉर्ड करून घेतली.
आणि मग एवढी पारायणं झाली गाण्यांची कि तेव्हा ऐकलेली गाणी अजून हि पाठ आहेत. Happy

माधव, आहा
काय गाणं निवडलत. अन काय गोड लिहिलत. रे वरची करामात ___/\___ अविट गाणी आहेत या चित्रपटात

सामी Happy
आमच्याकडे पहिला आला तो गोल रिळांचा कॅसेट प्लेअर. मग एका रिळावर चिकटवलेलं गाण्याचं नाव कुठल्या तरी दुसऱ्याच रिळावर पोहोचलेलं असे. कशाचा काही मेळ नसे Lol
कालांतराने रेकॉर्ड प्लेअर आला, काय रम्य, अद्भूत दिवस होते ते, रेकॉर्डवरचा आवाज आहाहा
मग हळूहळू चपट्या कॅसेटसचा जमाना, मग फ्लॉपी डिस्क, सीडीज. अन आता नेटवरचा खजाना...
पण अजूनही आवडते ती रेकॉर्डच Happy

छान मैफिल सुरू आहे. रानभुली, हपा,माधव आणि इतरही माहितीपूर्ण पोस्ट्स आवडल्या.
या काळातील सुलोचना कदम चव्हाण यांच्या हिंदी चित्रपट गाण्यांचा उल्लेखही केला पाहिजे.
मला आवडलेली काही ढोलक (१९५१) या चित्रपटातली:

हम तडपते रह गये वो मुस्कुराते चल दिये.

मौसम आया है रंगीन. (यात होले होले किती छान म्हटले आहे).

छलक रहा है.

संगीतकार वसंत देसाईंवर लिहू लिहू ठरवत होतो, पण जमलंच नाही. त्यामुळे आता ही लिंक गोड मानून घ्या.
सरगम के सितारे - वसंत देसाई ( विकास देसाई यांची मुलाखत)

https://www.youtube.com/watch?v=imNQ3VZJGVQ

फटकळ नूरजहानचे अजून दोन किस्से कुठेतरी वाचलेले - बहुदा कणेकर

कोणा बांगलादेशी पत्रकाराने तिन्ही देशांमधल्या सर्वश्रेष्ठ गायिका नूरजहान, लता आणि रुना लैला यांचा एक एकत्र गाण्याचा कार्यक्रम करावा असा प्रस्ताव मांडला. तेव्हा नूरजहान म्हणाली होती, "माफ कीजिये, पर लताके साथ किसी ऐरेगैरेका नाम मत लीजिये"

जगजीत सिंग आणि चित्रा सिन्ग पाकिस्तानमध्ये कार्यक्रम करायला गेले होते. तेव्हा कोणीतरी नूरजहानला त्यांच्या गाण्याबद्दल प्रतिक्रिया विचारली.
तेव्हा नूरजहान म्हणाली होती. "जगजीत ठीक गाता हैं मगर वो औरत बस उसकी चारपाई हैं"

>>> क्रिकेटबद्दल थांबवूयात आता
आँ? का म्हणून? धागा गाण्यांबद्दल आहे की! Proud

छ्या! तुमची ग.चु,मुळे माझा चांगला विनोद वाया गेला! Lol

>>> क्रिकेटबद्दल थांबवूयात आता
आँ? का म्हणून? धागा गाण्यांबद्दल आहे की! Proud

छ्या! तुमची ग.चु,मुळे माझा चांगला विनोद वाया गेला! Lol

Happy

अवल, तुमच्या राजकपूरबद्दलच्या मताशीही सहमत. किंबहुना मला तर त्याच्या नायिकांबद्दलच्या अरेरैवीमुळे तो डोक्यातच जातो. चेहऱ्यावरही सतत अत्यंत ओढून ताणून आणलेला बावळटपणा. असो. आता काही हघआशखकणआर्
सावरे सावरे…सुंदर विश्लेषण - मींड न घेता गायलेलं गाणं हे कधी लक्षातच आलं नव्हतं.

क्रिकेटबद्दल थांबवूयात आता >>
आँ? का म्हणून? धागा गाण्यांबद्दल आहे की >>> हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा .. असं म्हणून दोन्हींचा संदर्भ जोडता आला असता. पण दशक चुकल्यामुळे गचु होईल आता. छ्या! क्रिकेटच बरं आहे. शतकांचा विचार होतो, दशकांचा नाही. गल्ली क्रिकेट म्हणा हवं तर, म्हणजे ग चु चा प्रश्न नाही.

Pages