याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/83649
साक्षी आणि तो वर आले. तो त्याच्या खुर्चीवर बसला.
"तुम्हाला काही विचारू शकते?"
"हा पैसा, हा कंटेनर, ही कंपनी, याविषयी?"
"...नाही. तुमचं स्वप्न आहे ही कंपनी, तर तुम्ही ती इतक्या मोठ्या घोटाळ्यावर का उभी करताय? कधी ना कधी हे उघडकीस येईल."
"तुला काय वाटतं साक्षी? हा विचार मी केला नसेल?"
"मग?"
"मग एक लक्षात घे, जगात कुठलीही मोठी कंपनी, किती का मोठी असू दे... ती एकदम शुद्ध, पवित्र मार्गाने उभी राहिलेली नाहीये. या देशातला सगळ्यात मोठा ग्रुप आहे ना, तोच मुळात अफूच्या व्यापारावर सुरू झाला. सोन्याची लंका बनवायची असेल, तर मला रावण व्हावं लागेल साक्षी. जिंकावं लागेल सगळं. आणि सगळं सगळं जिंकेन मी, प्राजक्तासाठी. तुझा बॉस नात्यांमध्ये कशाचाही विचार करत नाही, वेडा असतो. बाकी मात्र एक एक गोष्ट वेल प्लॅन असते. प्रत्येक पाऊल..."
"सर सॉरी, पण आय फिल ही कंपनी माझ्यासाठी योग्य नाहीये. किंवा मी या कंपनीसाठी योग्य नाहीये."
"ते तू ठरवू नकोस साक्षी. इतक्या तरुण वयात दोन स्टार्ट अपची फाऊंडर होतीस तू... "
"...आणि दोन्हीही स्टार्ट अप बुडाले..." तिच्या स्वरात विषाद होता.
"पण तू हरली नाहीस. तुला काय वाटलं, मी असच कुणाला सीईओ बनवेन? नाही, तुझी सगळी इत्यंभूत माहिती काढूनच तुला मी सीईओ बनवलं. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे साक्षी. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही हे तू ठरव..."
ती विचारात गढली.
"लेट्स डू इट..." थोड्या वेळाने ती हसत म्हणाली.
"परफेक्ट. लेट्स गेट बॅक टू वर्क..." तो म्हणाला.
...ती तिथून निघून गेली...
*****
"आई."
"बोल ना."
"आठवण येत होती तुझी."
"घरी येत जा मग."
"नाही जमत ग. काम खूप वाढलंय."
"जाऊ दे. पुढच्या आठवड्यात मीच येते.
मस्त. बरं ऐक, रीतूचा फोन होता."
"काय म्हणते सिस्टर..."
"...तिचं म्हणणं असं आहे, सगळं नवीन त्यालाच. तिला काहीही नाही."
"म्हणजे?"
"तू नवीन आयफोन आणि आयपॅड घेतला ना, तेव्हापासून कुरबुर चालू आहे."
"असं? माझ्याकडे काही बोलली नाही."
"जाऊ दे. तुझी तब्येत कशी आहे?"
"आय एम परफेक्टली फाईन..."
"काळजी घे बाळा. गुड नाईट."
"गुड नाईट मॉम."
त्याने फोन ठेवला, व तो विचारात गढला.
*****
त्याची बहीण अभ्यास करत बसलेली होती.
रुमची बेल वाजली...
...समोरच एक व्यक्ती पार्सल घेऊन उभी होती.
"रितू."
"मीच."
"इथे सही करा."
"एक मिनिट," तिने पार्सल उघडलं.
"आईशपथ." तिचे डोळे विस्फारले. तिने पार्सल बाजूला ठेवलं, आणि सही केली.
तिने दार लावलं, आणि फोन हातात घेतला.
"आई."
"बोल, काय चाललंय?"
"तू दादाला काही बोललीस का?"
"कशाविषयी?"
"आयफोन आणि आयपॅडविषयी."
"का?"
"आताच पार्सल आलंय."
"मिळालं ना तुला. मग?"
"आई हे काय? मी फक्त सांगितलं होतं..."
"रितू एक सांगते, आणि हे मी तो फक्त तो माझा मुलगा आहे म्हणून नाही सांगत. तुझा भाऊ ना, खूप मूर्ख आहे. म्हणजे जर तो कुणावर प्रेम करत असेन ना, तर त्या व्यक्तीसाठी तो जीवही काढून द्यायला तयार होईल. त्याला देण्यात मजा वाटते, घेण्यात नाही.
...अशा व्यक्तींच्या आयुष्यात जर चांगली व्यक्ती आली ना, तरच ते आयुष्य नीट जगू शकतात, नाहीतर तुटून कोलमडून पडतात.
...शराचं प्रकरण आठवतंय ना?" ती बोलायची थांबली.
"...आई, त्याविषयी कधीही नाही बोलायचं हे तूच म्हणतेस ना?"
"नाही, पण लक्षात घे. प्लीज तुला सांगते, एक बहिण म्हणून तुझा हक्क जरूर गाजव, पण गैरफायदा घेऊ नकोस कधी.
कारण तो इतका मूर्ख आहे, की तू स्वतः हून त्याला सांगशील ना, की मी स्वार्थी आहे, तरीही तो हसून म्हणेल... ठीक आहे, नात्यात असं चालतं."
...ती तिकडून काहीही बोलली नाही.
"तू म्हणतेस नेहमी, तुझं फक्त त्याच्यावर प्रेम, त्याचावर जीव. कारण रितू, तू स्वतःचा विचार करू शकतेस. आणि तू स्वतःचाच विचार करशील याची खात्री आहे मला. पण तो तसा नाही ग. अशा माणसाचं काही खरं नसतं...
...तुझा दादा युद्धात जिंकेन, बुध्दीमत्तेत जिंकेन, सगळ्या जगाला वाटेल, हा किती परफेक्ट पुरुष आहे...
...पण प्रेमात सर्वस्व उधळून टाकेन, स्वतःला उधळून टाकेन, आणि संपून जाईन. आणि मला याचीच चिंता जास्त वाटतेय, या प्राजक्ता वेडाची."
"आई होईल ग सगळं नीट."
"तीच प्रार्थना आहे महादेवाकडे. चल. ठेवते."
आईने फोन ठेवला. रितू पुन्हा अभ्यासात गढली.
******
फॅक्ट्रीच्या समोर मोकळ्या पटांगणात तो उभा होता.
बरेचशे लोक जमलेले होते.
किंबहुना झाडून सगळेच लोक जमलेले होते.
पांढरा शर्ट, काळी पँट घालून तो उभा होता.
डोळ्यांवर काळा गॉगल.
कित्येक दिवसांपूर्वीचा तो, आणि आजचा तो...
जमीन अस्मानाचा फरक पडलेला होता.
सुजलेला चेहरा आता अर्धगोलाकार झालेला होता. आधीच लांब नाक आता अजून उठून दिसत होतं.
लांब अस्ताव्यस्त केस त्याने कुरळे केले होते. पूर्वी काळवंडलेला चेहरा आता गोरापान झाला होता.
...आणि त्याला साथ देत होती त्याची भारदस्त, पिळदार, प्रमाणबद्ध शरीरयष्टी...
नाशिकचा सगळ्यात यशस्वी उद्योगपती, आणि सगळ्यात मोठा ड्रग माफिया...
...आज कुणाचीतरी वाट बघता थांबला होता.
दूरवरून गाड्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. पाच-सहा स्कॉर्पिओ, दोन तीन बोलेरो ओळीने आत आल्या.
त्यातून काही मशीनगन घेतलेले लोक खाली उतरले...
...आणि सरतेशेवटी वसंता गौडा खाली उतरला...
...पांढरा शर्ट, पांढरं धोतर, कपाळाला भस्म...
त्याच्याच शेजारी विलास शिंदे येऊन उभा राहिला.
दमदार पावले टाकत गौडा चालू लागला, आणि त्याच्यासमोर आला...
"कसा आहेस?"
"ठीक आहे." तो म्हणाला.
"आत बसून बोलू. चल."
गौडा आणि तो आत आले.
तो काहीही बोलला नाही. नुसताच बसला.
"तमा." गौडाने बोलायला सुरुवात केली.
"तू फक्त ऐकणार की काही बोलणार?"
"नाही. मी फक्त ऐकणार."
"मग हा सगळा खेळ मी रचला होता. त्या दिवशी पिशवी चोरणारा मीच. त्या लोकांना तुला बघून पिशवी फेकायला लावणारा मीच.
तू त्यादिवशी पायऱ्या उतरत होतास, त्यादिवशी माझी नजर होती तुझ्यावर... ती पुडी तू उचलशील, यावर माझा पूर्ण विश्वास होता..."
"...इतकं सोपं नाहीये. काहीतरी अजून होतं. ती पुडी मी फेकणार होतो." तो म्हणाला.
"त्यासाठी मी तयार होतो. तो साधुसुद्धा मीच पाठवलेला होता." गौडा हसला.
वज्राघात...
त्याच्यावर अक्षरशः वज्राघात झाला.
इतके दिवस ज्या गोष्टीला तो महादेवाचा प्रसाद समजत होता...
...ते सगळं प्लॅनिंग होतं. गौडाचं प्लॅनिंग...
म्हणजे?
...म्हणजे हे महादेवाने घडवून आणलेलं नव्हतं...
...याला काहीही अधिष्ठान नव्हतं...
...त्याच्या डोक्यात विचारांची गर्दी सुरू झाली.
"जास्त विचार करू नकोस. आज गौडा समोर उभा आहे तुझ्या. पुढचं सगळं प्लॅनिंग करायला." गौडा म्हणाला.
"गौडा साहेब." तो म्हणाला.
"बोल तमा."
"मला आता जाऊ द्या. खरच जाऊ द्या. डोकं दुखतंय प्रचंड."
"जा आता. भेटू उद्या. इथेच..." गौडा म्हणाला.
तो तिथून निघाला.
*****
महादेवाचं मंदिर.
रात्रीची वेळ.
सगळीकडे शुकशुकाट.
तो शांत बसलेला.
मनात विचारांचं द्वंद्व सुरू झालेलं.
"जे आजपर्यंत मी केलं, जे मी सुरू केलं, माझं आयुष्य वाहिलं, ते सगळ फक्त तुमच्या आशीर्वादाने.
आणि आज कळतंय, मीसुद्धा कुणाच्या हातातलं खेळणं होतो.
इतके दिवस माझा आत्मविश्वास इतका प्रचंड होता, की मी ज्या गोष्टीचा विचार करेन, ते सगळं घडेन असच मला वाटायचं.
मात्र आता सगळं डळमळीत झालं आहे...
...प्राजक्ता हेही तुमच्याच मंदिरात ऐकलेलं नाव.
खरोखर ती प्राजक्ताच असेन ना, की अजून कुणी?
मिळेल ना ती मला?
सांगा महादेवा...
...की पुन्हा विश्वासघात करणार आहात?
सांगा देवा.
विश्वास उडालाय तुमच्यावर. पण या आयुष्यात जर तिचं आणि माझं मीलन होण्याचं सामर्थ्य कुणात असेल, तर तुमच्यात आहे.
चला. आजपासून तुमचा सोमवार माझा उपवास असतो ना?
फक्त पाण्यावर राहीन. फक्त आणि फक्त पाण्यावर, जोपर्यंत ती भेटत नाही, तोपर्यंत...
... रावण बनायचं आहे ना मला, आता रावणासारखा पण करतोय.
चला. येतो. रामराम घ्या...'
नमस्कार करून तो निघाला.
*****
"अमोल."
"बोल ना."
"गाडी थांबव."
"का?"
"अरे थांबव ना..."
त्याने गाडी थांबवली.
ती गाडीतून खाली उतरली.
समोरच एक भलीमोठी बिल्डिंग. आणि तिच्यावर प्राजक्ता नाव.
"फोटो काढ माझा. नाव येऊ दे."
"अग काय हे?"
"काढ ना."
"त्याने फोटो काढला..."
"...दाखव. बघ किती सुंदर दिसतेय मी."
"बरं. बस आता गाडीत."
"बघ, माझ्या कुणीतरी माझ्या सगळ्यात मोठ्या चाहत्याने माझ्यासाठी इतकी मोठी बिल्डिंग बांधली..."
"...हो, जा लग्न कर त्याच्याशी."
"नाही रे... असेल तर मी फक्त तुझी सात जन्मासाठी."
तिने त्याला मिठी मारली...
...आणि प्राजक्ता तिच्या नवऱ्याच्या मिठीमध्ये विसावली.
*****
साक्षी घरी आली.
"आलीस?" तिच्या आईने विचारले.
"हो. ताई कुठे आहे?"
"बसलीय तिच्या रूम मध्ये."
"हम."
ती फ्रेश झाली, व ताईच्या रूममधे गेली.
"ताई."
"अरे आलीस."
"हो. चॉकलेट आणलीय तुझ्यासाठी."
"माय फेवरेट."
"बाकी काय म्हणतं तुझं ऑफिस? सीईओसाहेबा."
"माझ्या ऑफीसपेक्षा माझा बॉस जास्त इंटरेस्टिंग आहे."
तिच्या कपाळावर आठी पडली.
"काय केलं त्याने आता."
"कंटेनर बोलावला. नोटांनी भरलेला."
"काय?"
"हो. असाच शॉक मला बसला होता."
"साक्षी, काही वाईट नाहीये ना करत तो?" तिचा स्वर काळजीचा होता.
"माहिती नाही ताई. पण एक सांगते... वेडा आहे तो. प्राजक्ता नाव ठेवलंय कंपनीचं, पण प्राजक्ता कोण हेच त्याला माहिती नाही."
'...त्याचा वेडेपणा माझ्याशिवाय कोणाला जास्त माहिती असणार?' ती पुटपुटली.
"काय ताई?"
"काही नाही ग. चल मला काम करू दे आता. आपण पाणीपुरी खायला जाऊ मग."
"डन..." साक्षी तिथून उठली...
...आणि शरावती विचारात गढली...
क्षणार्धात भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेला...
'...माझा हात सोड...'
त्याच्या गालात मारलेले अगणित फटके...
...आणि शेवटच्या क्षणी तिने मारलेली मीठी.
थरथर कापणारा त्याचा हात...
'...जाऊ नकोस शरा...' अचानक खाली कोसळलेला तो...
'प्लीज देवा. त्याला पुन्हा वेडा करू नकोस. कुणासाठी.
...आणि झालाच, तर सगळं नीट होऊ दे.'
नकळत तिचे हात जोडले गेले.
क्रमशः
कथेला रंगतदार वळण लाभतंय..
कथेला रंगतदार वळण लाभतंय..
मस्त भाग ..!
पुभाप्र..!
वा.. रंगत चाललीये कथा
वा.. रंगत चाललीये कथा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<<या देशातला सगळ्यात मोठा
<<<या देशातला सगळ्यात मोठा ग्रुप आहे ना, तोच मुळात अफूच्या व्यापारावर सुरू झाला>>>>
हे संपादित करता आले तर बघा.
त्या काळात अफू हा आजच्या इतका त्याज्य नव्हता. आणि निर्यातीवर बंदी नव्हती. शिवाय त्या उद्योगसमूहाचा तो एकमेव उद्योग नव्हता.
बाकी कथा नेहमीप्रमाणेच वेगवान
मस्त कलाटणी शेवटाला.
मस्त कलाटणी शेवटाला.
आवडला हा भाग... !!
शनिवारचा भाग नाही आला? सगळे
शनिवारचा भाग नाही आला? सगळे ठीक आहे ना?
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
नवीन भाग पोस्ट केला आहे...