हिंदी चित्रपटांतील जुनी आवडती गाणी: १९६० पर्यंतची

Submitted by अवल on 29 June, 2023 - 22:28

मला आवडणाऱ्या जुन्या हिंदी चित्रपट गीतांसाठी हा धागा. सुरुवात किसी तऱ्हासे मुहोब्बतमें चैन पा न सके याने करते. बाकी खाली प्रतिसादामधे लिहीत जाईन, जसे जमेल तसे. तुम्हाला आवडणारी गाणी (पण जुनीच. 1960 पर्यंतचीच) लिहिलीत तर आवडेलच.

बडी माँ हा 1945 चा चित्रपट!
IMG_20230630_075518.jpg
मा. विनायक यांची निर्मिती अन दिग्दर्शन. सुप्रसिद्ध तारका- गायिका नूरजहाँ अन ईश्वरलाल, याकूब, सितारादेवी, मीनाक्षी, दामुअण्णा मालवणकर अशी तेव्हाची तगडी कास्ट असणारा हा चित्रपट. (1974 मधे आलेला बडी माँ हा चित्रपट वेगळा, अनेकदा दोन्हीची गल्लत केली जाते).

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा उलगडत जाते. जागतिक राजकारण, जपान, भारताचे देशप्रेम अशा अनेक वळणांनी हा चित्रपट समृद्ध होत जातो.

या गीताचे संगीतकार होते सुप्रसिद्ध के. दत्ता होते. तर गीतकार अंजुम पीलीभीत.
गायिका होती नूरजहाँन. स्वातंत्रपूर्व काळातली महान गायिका- नायिका. तिच्या आवाजातला तलमपणा, तीनही पट्यांमधे लिलया फिरणारा आवाज, गोडवा; तिचं सौंदर्य आणि अभिनय सर्वच लाजवाब!
या गाण्याची जान आहे ती नूरजहाँनच्या "पाऽऽ न सके" या मधे.

सुरुवातीच्या हिंदी चित्रपट सृष्टीमधे कोल्हापूर अन मराठी कलाकारांचा कसा वरचष्मा होता हे या चित्रपटाची कास्ट बघितली की कळतं. निर्माता, दिग्दर्शक(मा. विनायक), संगीतकार ( के. दत्ता म्हणजेच दत्ता कोरेगावकर) , बॅनर ( प्रफुल्ल पिक्चर्स), कथा ( व्ही. एस. खेडेकर) , एक गीतकार(राजा बढे), एक गायिका(लता), चार स्त्री कलाकार ( मीनाक्षी, लता, आशा, बेबी अलका), दोन पुरुष कलाकार (दामुअण्णा मालवणकर, दादा साळवी).
या शिवाय याकूब, सितारादेवी, लिला मिश्रा हेही या चित्रपटात होते.

आज या चित्रपटाची फिल्म, कुठेही उपलब्ध नाही. शक्यता आहे की फिल्म आर्काईव्हजमधे कुठेतरी असेल. पण किमान नूरजहाँच्या या आणि इतर गाण्यांनी (दिया जला कर आप बुझाया: https://youtu.be/gBczUcadYLw)
रसिकांच्या मनात हा चित्रपट जागा राहील.

सध्या इतकच!
---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल >>> हो... रतनची गाणी छानच आहेत. 'साजन की गलियां' पहिल्यांदांच ऐकले मी. काय सुरेख आवाज आहे.

तराना चे 'सीनें में सुलगते है अरमां '. तलत आणि त्याच्या आवाजातील कंपने. लताबाईंच्या 'चूप हूँ' वरचा ठेका ऎका. त्यांचा आवाज अन तबल्याचा ठेका काय सुंदर मर्ज झालेत. यालाच तादात्म्य म्हणत असावेत.

तलतचेच 'शाम ए गम की कसम'

लताबाईंचे 'ला रा लप्पा'. या गाण्याने धुमाकूळ घातला होता म्हणे.

तलत आणि सुरैयाचे 'दिल ए नादां तुझे हुआ क्या है'

शमशाद बेगम चे 'ना सोचा था ये दिल लगानेसे पहले'

गीता दत्तचे 'मेरा सुंदर सपना बीत गया' कमालीचा विषण्ण करणारा आवाज आणि तिचाच 'उधर तुम हसीं हो' मधला खेळकर, रोमँटिक अंदाज

टेक्निकली 'जाने क्या ढूंढती रहेती है ये आँखें' १९६१ चे आहे. पण मला ते ५० च्या दशकातलेच वाटते. रफीच्या आवडत्या गाण्यांपैकी एक.

माझे मन थांबा थांबा, तलत इतक्यात सुरु करू नका Happy मग मी सुटेनच Wink
तलत चं एकूण एक गाणं म्हणजे आहाहा... त्याची चित्रपट गीतं, गज़ल, नॉन फिल्मी गीतं... वेगळा धागाच काढायला हवा Happy
जोक्स अपार्ट फार सुंदर गाणी निवडलीत तुम्ही सीने में सुलगते है अरमान तर ऑल टाईम फेवरेट

नूरजहाँ चा विषय निघाला आणि तिचं आणि रफीचं ‘यहाँ बदला वफ़ा का, बेवफ़ाई के सिवा क्याँ हैं’ चा उल्लेख झाला नाही (किंवा मी मिस केला) - बहुत नाइंसाफ़ी हैं। Happy

सॉरी हा फेफ Happy
पण मी अजून एकट्या नूरजहाँनला पचवतेय.
मस्त गाणं. लिहा न जरा सविस्तर.
आणि आता मी ख़फा, आमच्या दिलीप कुमारचा उल्लेख नाही केलात Wink

वाह! इथे काय सुरेल मैफिल सुरू आहे! इतक्यात असं लक्षात येतंय की १९५० च्या दशकातील गाणी माझी सर्वात जास्त आवडीची आहेत! त्यामुळे हा धागा वाचायला खूप मजा येतेय. आता यातली न ऐकलेली गाणी ऐकते. नूरजहां यांची गाणी फार ऐकलेली नाहीत.
लाहौर मधलं "दुनिया हमारे प्यार की" माझं आवडतं द्वंद्वगीत आहे.

खरं न, मलाच इतकं भारी वाटतय. ही इतकी जुनी गाणी आवडणारे लोकं भेटताहेत Happy
मला तर नेहमी वाटत आलय 1960 पर्यंतची गाणी जास्त गोड होती, जास्त भिडतात मनाला. शब्द, संगीत, गायक- गायिका, नायक- नायिका, कथा, भावना सगळ्याला पुरेपूर न्याय देणारी, जास्त खरी!
(आता इतरांचा रोष ओढवून घेणार मी Lol )

मस्त माहिती मिळत आहे. मला यातली अनेक गाणी माहीत नाहीत. मला जी माहीत आहेत ती बहुतांश १९५० च्या आसपास पासून आलेल्या पिक्चर्स मधली. यातली काही नंतरची असूनसुद्धा माहीत नव्हती. मात्र इथे Mazeman यांच्या पोस्टमधली बहुतांश ऐकलेली आहेत - ते शमशादचे सोडून. दिल ए नादान, शाम ए गम की कसम, लारा लप्पा वगैरे तर खूपदा ऐकलेली आहेत.

दिल ए नादान मधे "हम है क्ष्क्ष्क्ष्क्ष, और वोह बेजार" मधला तो शब्द नक्की काय आहे? काय वाट्टेल ते शब्द सुचतात त्या जागी ते गाणे आठवताना Happy

हपा - किशोरचे ओ जानेवाले बालमवा वाला सीन विसरलो होतो. काय धमाल आहे. ते दोघे एकमेकांकडे तोंड करून "व्वॉ" करतात ते जबरी आहे. तो किशोरचा आख्खा रोलच इतका अफलातून आहे.

आता मी ख़फा, >> Happy हे भारी आहे. पन्नास च्या दशकात "खफा" व्हावे. साठच्या दशकात रूठावे व नंतर ९० च्या दशकात नाराज व्हावे. मधल्या दोन दशकांत बहुदा नो वन वुड केअर Happy

हम हैं मुश्ताक़ और वो बे-ज़ार
या इलाही ये माजरा क्या है

आहे ते Lol

आणि ख़फा च कौतुक केलं म्हणून थांकु Happy

१९६० सालच्या परख चित्रपटातले सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले आहे.

ओ सजना बरखा बहार आयी

या गाण्याचा रसास्वाद घेतल्याशिवाय ते गाताही येत नाही नीट. ओबडधोबड पद्धतीने ऐकले आणि गायले असे या गाण्याबाबतीत करताच येत नाही. एक एक शब्द कसा गायलाय, कोणत्या अक्षरावर जोर दिलाय, कोणत्या अक्षरावर जोर नाही, कुठे हलकेच पाय देऊन वरची शिडी गाठली आहे हे खूप लक्षपूर्वक पहावे लागते. नोटेशन्स काढणे ज्याला जमते त्याच्याकडून काढून घ्याव्या लागतात. ज्यांना जमते त्यांना खरोखरीच नमस्कार ! नाहीतर प्रत्येक वेळी गाणे अधुरे वाटत राहते. समाधान होत नाही. ज्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण झाले आहे त्यांचा अशा गाण्यासाठी हेवा वाटतो.

ओ सजना

ग __सा’नि’__ रे’सा’__ सा’म

पुन्हा

ओSS सजना

पगप __सा’नि’__ रे’सा’__ सा’म

पहिल्या वेळी ओ सजना नंतर ना लांबवलेला नाही. जर साईन वेव्हची कल्पना केली तर ती खाली शून्याला टेकण्याआधीच वाय अक्षाकडून किंचित खाली येताना ग्राफ थांबलाय. तिथे सतारीचा पीस सुरू होतो. सतारीच्या पीस वर आवाज ओव्हरलॅप झालेला नाही. या गोष्टी मुद्दामून जरी नाही ऐकल्या तरी कुठे तरी नोंद झालेली असते. त्यामुळे असेल आपण स्वत: गाऊन नंतर ऐकले तर काही तरी चुकतेय असे वाटत राहते.

बरखा बहार आयी

उच्चारात कुठेच बरिखा असे नाही. ब र खा ब हा आ आ आ र आ यी

यात ब हा नंतर जो आलाप (सानिधप ) आहे तो अक्षरश: सुरांच्या वर्षावासारखा आहे.
यानंतरच्या दुसया ओळीत

अखियों मे प्यार लायी

यात खि वर थांबायचे नाहीये. तर एक लटका झटका घेऊन यों वर किंचित मुक्काम करायाचाय. मग प्या वर थोडा सैलसर आळस द्यायचा.
यातून एक आवर्तन तयार होते. हे आवर्तन संपूर्ण गाण्यात आहे.

ते कसे आहे ?
कुहू कुहू या कोकिळेच्या आवाजासारखे ते आवर्तन आहे.

तुम को पु का आ आ आ रे मेरे
इथे पुकारे मधे आ आ आ नीट ऐका. कोकिळच आहे.
कोकिळेची ही जी लय आहे ती या गाण्यात आहे. तीच लय, ते आवर्तन.
हे कौशल्य संगीतकाराचे कि गायिकेचे ? मला नाही माहीत.
पण जे जमून आलेय ते खूप खूप सुंदर आहे.

या संपूर्ण गाण्यात लताजी अशा गायल्यात कि त्याचं वर्णन करताच येत नाही.
बारीक सारीक खूप करामती आहेत.

काही शब्दात भाव व्यक्त झालेत. गाताना ते नाही घेतले तर खूप सपक होतं आपलं आपल्यालाच ऐकणं.
मोठा होईल प्रतिसाद म्हणून इतकेच.

खूपच छान चर्चा. तलत वर धागा काढला आहे. तो विषय तिकडे चालू ठेवा.
रानभुलीः फार सुंदर सरगमचे विश्लेषण. हे करू शकणाऱ्यांचा मला हेवा वाटतो. माझ्याकडेही कीबोर्ड आहे तेव्हा मी प्रयत्न करत असते अधूनमधून.

सुंदर पोस्ट रानभुली. माझा या गाण्यावर एक धागा लिहायचा वाचला. आता काही जास्तीचे मुद्दे इथेच लिहितो.

- पुका आ आ रे - इथे कोकिळा आहेच, पण त्यापेक्षा जास्त उठून दिसेल अशी कोकिळा त्याच्याच आधीच्या शब्दात आहे. ते 'तुमको पुकारे' मधलं जे को आहे ना, ती ओळ दोनदा म्हणताना त्यात व्हेरिएशन घेतलं आहे. पहिल्या तुमको ला 'गं गं रेंगं' आहे, आणि दुसर्‍या वेळेला 'गं गं गंपंगंपं' आहे. ते जे गंपंगंपं आहे ना, तिथे अगदी म्हणजे अगदी डोळे झाकून कोकिळा आहे. त्यात ब्यूटी ही की तिथे शब्दातलं अक्षरही 'को' येतं आणि तिथे कोकिळा जो लावते अगदी तोच पंचम स्वर (पं) लावला आहे. (इथे मी तार सप्तकातले स्वर दाखवायला स्वरांवर अनुस्वार काढले आहेत - भातखंडे नोटेशन पद्धत). ज्यांना हे गाणं आवडतं, पण स्वर वगैरे कळत नाहीत, त्यांनी ही एक ओळ - दुसर्‍यांदा येते तेव्हा तो 'को' - लक्ष देऊन नक्की ऐका. स्वर्गानुभव!

- ह्याच वाक्यात पहा . 'तुमको' वरती स्वर अगदी वरती गं किंवा पं पर्यंत जातात आणि 'पुकारे मेरे'तल्या शेवटच्या 'रे' पर्यंत खाली उतरत उतरत मध्य सप्तकातला ग लागतो. पुढे 'मन का पपीहरा' म्हणताना परत चाल वरवर चढत जाते आणि वाक्याच्या शेवटी येणार्‍या आ आ आ - हरकतीत पुन्हा वरच्या गं वर येऊन थांबते. इथे वरच्या ग वरून नॉर्मल ग पर्यंत आणि पुन्हा वरचा ग अश्या हिंदोळ्यातून ही चाल अगदी सहज जाते. असं किचकट विश्लेषण केलं नाही तर ऐकताना जाणवतही नाही की ह्यात खरं म्हणजे इतकं खालीवर जाणं आहे. सहजता हीच ह्या गाण्याची सौंदर्यता ( Wink ज्यांना कळलं त्यांनी ह घ्या) आहे.

- दुसर्‍या कडव्यात चाल मधल्या सप्तकात येते. ऐसे रिमझिम में ओ सजन (इथे सजनवर सा किंवा प असे ठलक स्वर न लागता तीव्र म व रती वाक्य संपवलं आहे, म्हणजे इथे एक स्वल्पविराम आहे आणि अजून मूळ मुद्दा सांगायचा बाकी आहे - हा फील येतो. नुसती ही पहिली ओळ २-४वेळा म्हणून बघा. इथे सजनवर गाणं संपत नाही, काहीतरी बाकी आहे हे जाणवतं.) .. प्यासे प्यासे मेरे नयन .. (इथे नय अ अ अ अन - इथे एक हरकत घेतली आहे). पुढची मजा ही सलील चौधरींचं खास वैशिष्ट्य आहे. 'तेरेही ख्वाबों में खो गए' - या वाक्याची चाल अगदीच वेगळी आहे. तिथे भारतीय रागाधारित संगितातून आपण (अचानक नाही, पण अगदी सहज, स्वाभाविकपणे) पाश्चात्य संगीतात कधी प्रवेश करतो ते आपल्याही लक्षात येत नाही. तेरेही ख्वाबों में - एवढाच तुकडा पुन्हा पुन्हा ऐकून पहा. मग त्यातली खूबी लक्षात येईल. त्यापुढे पुन्हा साँवली सलोनी घटा म्हणताना मूळची चाल आपल्याला परत येऊन भेटते. हे बदल सलीलदांनी इतके अफलातून केले आहेत, की आख्खी चाल एकसंध एकच भाव आहे असा आपल्याला भास होतो, पण तुकडे करून पाहता त्यातले भाव खूप वेगवेगळे असल्याचे जाणवतात.

- सतारीचा उत्तम वापर - हे ही सलीलदांचं वैशिष्ट्य. इथे व्हिडिओ बघताना जाणवेल की सतारीवरचे पीसेस पावसाच्या सरींसारखे अधून मधून शिडकावे टाकतात या गाण्यावर.

- मूळचं बंगाली गाणं ना जेओना हे एखाद-दोन पट्ट्या खालच्या स्वरांमध्ये गायलं आहे. हिंदीकरण करताना त्यांनी वरची पट्टी निवडली आहे. कदाचित हिंदी करताना त्यांनी ती कोकिळा जास्त प्रकर्षाने त्यात आणायचं ठरवलं असावं. तश्या हरकतीही दोन्हींमध्ये वेगळ्या वाटल्या. बाकी चाल तीच आहे. बंगाली शब्दांमुळे ते ऐकायला जास्त गोड वाटतं हे मा वै म.

रानभुली, हपा दोघांनाही ___/\___
इतकं शास्त्रीय संगीत कळणाऱ्यांचा आणि ते असं लिहून व्यक्त करणाऱ्यांबद्द फार फार आदर वाटतो.
गाण्यांचं चीज तुम्हीसारखे दर्दी करू शकतात.
आम्हाला गाणं भावतं पण अशी फोड करणं जमत नाही, अर्थात वाचायला, समजून घ्यायला जरूर आवडतं. खूप खूप धन्यवाद दोघांनाही. आता ही गाणी तुमचे लिखाण मनात ठावून पुन्हा ऐकायला हवीतच.

आणि हो, मूळ बंगाली गाणं जास्त गोड वाटतं हे खरय. असाच अनुभव नैना बरसे बद्दल. लतापेक्षा ( लता अन लताप्रेमींची माफी मागून) मूळ मदनमोहनचं गाणं जास्त भावतं.
आज त्यावर लिहिलेलच देते Happy

नैना बरसे .. ची चित्तर कथा 
(खरं तर हे जरा पुढच्या काळातलं, पण विषय निघालाय तर लिहिते इथेच)

https://youtu.be/cfOeTw7KJXc : मदनमोहन यांच्या आवाजात
https://youtu.be/9w5iETwBs2o : लताच्या आवाजात

कवी : राजा मेहंदी अलि खाँ
संगीत  : मदनमोहन
आवाज : लता मंगेशकर
चित्रपट  : वह कौन थी (1964)
दिग्दर्शक  : राज खोसला
निर्माता  : एन एन सिप्पी
स्क्रिन प्ले लेखन  : धृव चॅटर्जी
अभिनेत्री :  साधना

"नैना बरसे.." या गाण्याच्या निमित्ताने लिहायचं तर फार आधी पासून सुरुवात करावी लागते. अगदी थेट १८५९ सालापासून ! का? ऐका तर मग.

१८५९ साली "विकी कॉलीन्स" या ब्रिटिश साहित्यिकांची “दि वुमन इन व्हाईट ” ही कादंबरी प्रसिद्ध झाली. एक रहस्यपूर्ण कादंबरी ! ह्या कादंबरीमधले नाट्य इतके प्रभावी होते की अनेक नाटक कंपनींना, अनेक चित्रपट निर्मात्यांना, अनेक टीव्ही चॅनल्सना इतकेच नव्हे तर एका कॉम्पुटर गेम्स डेव्हलपरलाही याने भुरळ घातली. अगदी १८६० पासून २०१८ पर्यंत यावर विविध कलाकृती होत आल्या आहेत.

सहा नाटकं (1860 पासून 2005 पर्यंत ) ;
1912 मधे पहिल्यांदा चित्रपट - अमेरिकन सायलंट मुव्ही, पुढे विविध देशांत आणि विविध भाषांत (अगदी हॉलीवूड मध्येही), एकूण किमान आठ चित्रपट यावर निघाले;
विविध देशांमध्ये सहा टिव्ही सिरियल्स निघाल्या (यातली अगदी अलिकडची २०१८ मधली); 
या कादंबरीवर दोन रेडिओ ब्रॉडकास्टिंग केली गेली; आजवर युट्युबवर या कादंबरीची किमान ४ वाचन आढळतात;
इतकंच नव्हे तर या कादंबरीवर आधारित अजून तीन स्वतंत्र कादंबरयाही लिहिल्या गेल्यात;
हे कमी झाले म्हणून की के एक कॉम्पुटर गेम डेव्हलपरने यावर आधारित एक गेमाही तयार केला आहे.

अशा या उत्कंठावर्धक कादंबरीकडे हिंदी चित्रपट सृष्टीचे लक्ष वेधले न जाते तरच नवल.

प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांनी सुनील दत्त आणि वाहिदा रहमान यांना बरोबर घेऊन “राज” या चित्रपटाचा विचार सुरू केला. पुढे सुनील दत्त ऐवजी स्वत:च प्रमुख भूमिकेत राहून शूटिंग सुरु केले. परंतु काही शूटिंग झाल्या नंतर गुरुदत्त यांनी हा चित्रपट अपूर्णच सोडून दिला.

पुढे गुरुदत्त यांचे सहाय्यक राज खोसला यांनी या कथेवर विचार सुरू केला. मूळ कथेमधे काही महत्वाचे बदल करून ध्रुव चटर्जी यांच्या कडून नवी पटकथा त्यांनी लिहून घेतली. पुढे या पटकथेत मनोजकुमार यांनीही काही भर घातली. आणि “वह कौन थी” हा चित्रपट सुरू झाला.

एन एन सिप्पी हे निर्माते, दिग्दर्शक – राज खोसला, स्क्रीन प्ले लेखन - ध्रुव चटर्जी, संगीतकार - मदनमोहन, गीतकार - राजा मेहंदी आली खा, अभिनय – मनोज कुमार, साधना, हेलन, के एन सिंग, प्रेम चोप्रा अशी तंगडी कास्ट लाभलेला हा चित्रपट. बॉक्स ऑफिसवर तर यशस्वी झालाच शिवाय यातील संगीताने जनमानसवर जी भुरळ घातली ती आजतागायत!

मदन मोहन हे या चित्रपटापर्यंत;  न गाजलेल्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी संगीत दिलेली अनेक गीते  लोकांच्या ओठी होती. पण चित्रपट यशस्वी होत नव्हते. पण "वह कौन थी" ने हा गैरसमज दूर केला. या चित्रपटातील एक से एक गीतांनी तो काळ  गाजवला. यातलेच एक महत्वाचे गीत "नैना बरसे.."

या गाण्याची पण एक मोठी कथा आहे, किंबहुना दोन कथा आहेत.

या गीताचे संगीत, ट्यून मदनमोहन यांना जवळजवळ १८ वर्ष आधी सुचली होती. पण "वह कौन थी" या चित्रपटाच्या आधी, कोणत्याच चित्रपटात ती वापरावी अशी परिस्थिती (सिच्युएशन) सापडली नव्हती. अन कोणतेच गीतकार त्या संगीतावर गीत लिहू शकले नव्हते. या चित्रपटात मात्र अशी संधी सतत होती. गीतकार राजा मेहंदी आली खाँ यांनी अत्यंत चपखल शब्द घेऊन अतिशय सुंदर गीत यावर लिहिले. तेच हे अजरामर गीत, नैना बरसे..

दुसरी कथा अशीच, पण जास्त मजेशीर. या गाण्यांचे एक शूट हिमाचलमधे, बर्फात व्हायचे होते. पण तोवर गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले नव्हते. हे रेकॉर्डिंग मुंबईत होणार होते. ते होई पर्यंत हिमाचल प्रदेशांतले बाकीचे शूटिंग केले गेले. इकडे मुंबईमध्ये काही कारणांमुळे लता मंगेशकर गाण्यांच्या रेकॉर्डींगला येऊ शकल्या नाहीत. गाणे रेकॉर्ड करून तर पाठवणे भाग होते. हिमाचलचा बर्फ कमी होण्याआत गाणे शूट होणे भाग होते. मग मदनमोहन यांनी स्वत: हे गाणे गायले आणि मदनमोहन यांच्या आवाजातले "नैना बरसे..." हिमाचल प्रदेशात पाठवले गेले.

मदनमोहन यांना खात्री होती की आपण जसे बसवले आहे सूर अन सूर तसंच पकडून लता गाऊ शकेल.  

इकडे शूटींगला अजूनच धमाल आली. गाणे मदनमोहनच्या आवाजात आणि त्यावर अभिनय करतेय साधना! सगळ्यांची हसून हसून पुरेवाट. साधनाचे अभिनय कौशल्य पणाला लागले. हसू आवरून गंभीर चेहऱ्याने, एक प्रेम विराहिणी दाखवणे त्यातही बर्फाळ प्रदेशात साडीमधे, कोणतेही इतर गरम कपडे न वापरता अभिनय करायचा  होता. आजूबाजूच्या आमजनतेलाही हे गौडबंगाल कळेना. आवाज पुरुषांचा, गात फिरते बाई, नक्की कशाचे शूटींग चालू आहे ?  पण साधना, राज खोसला, सिनेमायफोटोग्राफर के एच कपाडिया यांनी सगळे निभावून नेले. याच कपाडियांना त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफर म्हणून फिल्मफेअर बक्षीस मिळाले. अर्थातच पुढे एडिटिंगमधे लताचे गाणे घातले गेले. (या चित्रपटातील एडिटिंगबद्दल अजून एक गंमत आहे, ती पुढे कधीतरी लिहेन)

तर अशी ही नैना बरसे.. या गाण्याची चितार कथा  Happy

धन्यवाद झुळुझुळु, हपा.

हपा , उत्कृष्ट रसग्रहण केलंय. शास्त्रीय गाणे शिकलेले नसल्याने असे लिहायची भीती वाटते. पण या गाण्याबाबत नाईलाजच झाला. तुमच्या प्रतिसादामुळे धीर आला कि अगदीच चुकीचं नाही लिहीलेलं. Happy
माझ्या एडीटर मधे अक्षरांच्या खाली यू नोटेशन करता येत नाही याचं वाईट वाटतंय. त्यामुळे कोणकोणती अक्षरे एकत्र घेता येतात हे न शिकलेल्याला सुद्धा समजते. बरहा किंवा गमभन एडीटर साठी वेगळी पद्धत राबवली पाहिजे. मी इथे अंडरस्कोअरने अक्षरसमूह वेगवेगळे केले आहेत. हे चालेल का ?

तुम्ही अचूक बोट ठेवले आहे.
पहिल्या वेळी तुमको हे गगरेग असं येतं. दुसर्‍या वेळी तुम_को गग_प पर्यंत जातं. Happy
गग_प च्या ऐवजी एखादा सूर खाली घेतला तर कंफर्टेबल होतं गायला. पण ऐकायला बरं वाटत नाही. हुबेहूब कॉपी नाही करायची. पण एखादी जागा थोडी जरी बदलली तरी गंमत जाते हेच वैशिष्ट्य आहे गाण्याचं.

मिठी मिठी अगनी मे जले मोरा जियरा

इथे मिठी या शब्दाचा उच्चार. विशेषतः ठ चा उच्चार उल्लेखनीय आहे. आशा भोसलेंनी सुद्धा एका गाण्यात ( जरासा झुम लूं मै) ठंडी ठंडी मधे ठ चा उच्चार वेगळ्या तर्‍हेने केल्याने ते उठावदार झालं होतं. त्याचं मूळ इथे आहे बहुतेक.

मिठी अगनी इथे ग नंतर ग चा उच्चार लांबवला आहे.
रेगम मगरे असं आवर्तन आहे.

त्यामुळे आगीचा चटका बसतोय (अग_नी मे) असा भास होतोय पण ही आग मी_ठी आहे. म्हणजे चटके तर बसतात पण ते हवेहवेसे आहेत. हा भाव खूप सुंदर आला आहे.
जले मोरा जियरा_आ _ आ _आ
या रा नंतरच्या सरगम मुळे ती गोड वेदना सुंदर व्यक्त झाली आहे.
( आता इथे पुरे :). माझा अधिकार नाही या विषयावर. तुमचे रसग्रहण वाचायला आवडेल. वेगळा धागा काढलात तरी चालेल. )

आभार अवल.
नैना बरसे हे सुद्धा आवडतं गाणं आहे. त्याची स्टोरी आवडली. मजा आली वाचायला.
मलाही मदनमोहनचं मूळ गाणं आवडलं होतं. इथेच मागे कधीतरी लिंक दिली होती. मदन मोहनचा आवाज सुंदर आहे.

रानभुली, हपा दोघांनाही ___/\___
इतकं शास्त्रीय संगीत कळणाऱ्यांचा आणि ते असं लिहून व्यक्त करणाऱ्यांबद्द फार फार आदर वाटतो.
गाण्यांचं चीज तुम्हीसारखे दर्दी करू शकतात. >>> +१

सगळे उल्लेख समजले असे नक्कीच नाही. पण त्या त्या वेळच्या करामती "ऐकलेल्या" लक्षात आहेत कारण हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. आता आज पुन्हा (पुन्हा) ऐकणार. तेव्हा हे बरेच आठवेल.

बाय द वे, "ऐसी रिमझिम मे ओ सजन" मधे जी चाल बदलली आहे, तशा पद्धतीने रचलेल्या गाण्याला काहीतरी विशिष्ठ शब्द आहे. स्वाती आंबोळेने एकदा त्याबद्दल माहिती दिली होती. मला स्पेसिफिक लक्षात नाही. ती इथे आली तर सांगेलच.

तेव्हा बर्‍याच गाण्यांची तीन कडवी असत. याच्या ज्या क्लिप्स आहेत त्यात दोनच आहेत. तिसरे कधीच नव्हते की उपलब्ध क्लिप्स मधे नाही बघायला पाहिजे. इतक्या सुंदर गाण्याचे अजून एक कडवे सापडले तर खजिना सापडल्यासारखे वाटेल.

याच पिक्चर मधले "मिला है किसीका झुमका" हे ही अ त्यंत आवडते गाणे आहे. पण ओ सजना ची लेव्हल काही वेगळीच आहे.

"नैना बरसे" हे ही पूर्वी अनेकदा ऐकलेले पण मधेच कधीतरी एखादे गाणे पोहोचण्याचा एक स्विच असतो डोक्यात तो ऑन झाला आणि मग तेव्हापासून किती वेळा ऐकले असेल लक्षात नाही. अवल - ते वर्णन/माहितीही आवडली.

धन्यवाद फारएण्ड.
यातलं माझं काहीच नाही. उसनवारी करून मदत घेतली आहे अनेकांची तेव्हां समजलेलंच इथे लिहीलं. जर मी चुका केल्या नसतील तर श्रेय त्या मंडळींना जाते. __/\__

किती छान मेहफिल रंगली आहे. रतन नंतर लगेच आठवलेला सिनेमा उडन खटोला .
उडन खटोला : १९५५

१. ओ दूर के मुसाफिर हमको भी साथ लेले
गायक: मोहम्मद रफ़ी
संगीतकार: नौशाद
गीतकार/गीतकार: शकील बदायूँनी

२. मेरा सलाम ले जा , दिल का पयाम ले जा , उडन खटोले वाले राही
गायक: लता मंगेशकर
संगीतकार: नौशाद
गीतकार/गीतकार: शकील बदायूँनी

३. सितारों की महफ़िल सजी तुम ना आये
गायक: लता मंगेशकर
संगीतकार: नौशाद
गीतकार/गीतकार: शकील बदायूँनी

मस्त लेख. प्रतिसाद नंतर वाचेन.
फक्त लिस्ट - लिंका नका हो. ती उघडायला इंटरेस्ट येईल असं काही तरी प्रत्येक लिंक साठी लिहा. खूप लिंका झाल्या कि बुफेट लंच सारखं काय खावं अन काहीच नाही होतं तसं झालं.

Pages