माझी भटकंती..गोकर्ण..मुर्डेश्वर..याना गुहा

Submitted by Prashant Mathkar on 27 June, 2023 - 13:46

कर्नाटकमधल गोकर्ण, तिथली मंदिरं, मठ, प्रसिद्ध ओम समुद्र किनारा, मुर्डेश्वर, शिवमंदिर याविषयी बरच ऐकल होत. कोस्टल कर्नाटक टुरमधली ही महत्वाची ठिकाणं माझ्या गावापासून म्हणजे सावंतवाडीपासून तीनशे किलोमीटरच्या आत. त्यामुळे एका सावंतवाडी फेरीत तिकडे जायच बरेच दिवसांपासून घाटत होत. या जूनच्या पहिल्या आठवड्यात सावंतवाडीला आम्ही सगळी बहीण भावंड सहकुटुंब एकत्र यायचा योग आला आणि गोकर्ण मुर्डेश्वर फेरीचा कार्यक्रम ठरला. लगेच गोकर्ण आणि मुर्डेश्वर हॉटेल बुकिंग करून शुक्रवारी दुपारी दोन गाड्यांमधून आम्ही गोकर्णाची वाट पकडली. पोहोचेपर्यन्त रात्रीचे नऊ वाजून गेले. मग जेवूनच हॉटेलवर जायच ठरल. आसपासच्या बहुतेक हॉटेल्समधून जेवण संपल्याचे बोर्ड दिसत होते. शोधाशोध करता करता एक फिशलँड नावाच हॉटेल दिसल पण आत शिरताना वेटरची फक्त बांगडा करी आणि भात मिळेल अशी सूचना ऐकून नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा म्हणीची आठवण झाली. मग बांगडा भातावर हात मारून मुक्कामच्या हॉटेलवर पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी गोकर्णमधल आमच्या भेटीचं पहील ठिकाण होत प्रसिद्ध महाबळेश्वर शिव मंदिर. या मंदिरात प्रवेश करताना पुरुषाना पांढर वस्त्र परिधान करूनच प्रवेश दिला जातो. आमच्यासारख्या हे माहीत नसलेल्या लोकांच्या सोयीसाठी मंदिराच्या समोरच दुकानं आहेत. मग पांढऱ्या वस्त्राची खरेदि करून ते परिधान करून आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. द्राविडी शैलीतल्या या मंदिरातली कोरीव दगडी शिव मूर्ती 1500 वर्ष जुनी आहे. मंदिरातल्या 6 फूट उंच शिवलिंगाला आत्मलिंग म्हणून ओळखल जात. पण भाविकांना या आत्मलिंगाच पूर्ण दर्शन होत नाही. फक्त जमिनीखालच्या त्याच्या टोकाला स्पर्श करता येतो.
1 Gokarna-Temple i.jpg
दर 40 वर्षांनी येणाऱ्या अष्टवंदना कुंभाशिकेषम या उत्सवात मात्र आत्मलिंगाच पूर्ण दर्शन भाविकांना दिल जात. या मंदिराला काशीइतकच महत्त्वपूर्ण मानतात आणि त्याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखल जात. या मंदिराची रामायण महाभारतातील पौराणिक कथांमधली आख्यायिका अशी..आत्मलिंग म्हणजे अजिंक्यता आणि अमरत्वाची गुरुकिल्ली मिळवण्यासाठी रावणाने शंकराची तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन शंकराने त्याला आत्मलिंग या अटीवर दिलं की ते जर पृथ्वीवर ठेवल तर ते ज्या ठिकाणी स्थापन होईल तिथून परत काढता येणार नाही आणि त्याची शक्ति नष्ट पावेल. या वरदानामुळे रावण सर्वशक्तिमान बनेल ही भिती देवांना वाटली त्यामुळे भगवान विष्णु आणि गणपती यांनी युक्तीने रावण आत्मलिंग लंकेला नेत असताना ते जमिनीवर ठेवण्यास भाग पाडल. त्यावेळी आत्मलिंग ज्या ठिकाणी स्थापन झाल त्याभोवती महाबळेश्वर मंदिर बांधल आहे.
दर्शन आटोपुन आम्ही जवळच्याच गोकर्ण समुद्रकिनाऱ्यावर थोडी भटकंती आणि पोटपूजा केली आणि गोकर्णपासून आठ किलोमीटरवरचा प्रसिद्ध ओम समुद्रकिनारा पहायला निघालो. ओम सारख्या दिसणाऱ्या त्याच्या आकारावरून या किनाऱ्याला ओम हे नाव पडल.
3 AOm Beach.jpg
किनाऱ्यावर जाण्यासाठी टेकडीवरून किनाऱ्यावर उतरणारी सुंदर पायवाट आहे. त्या वाटेवरून उतरताना या किनाऱ्याच नयनरम्य रूप समोर आल आणि किनाऱ्यावर उतरताच त्याच्या किर्तीची साक्ष पटली. खूपच सुंदर,नितळ आणि स्वच्छ असा हा किनारा. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसारखी गर्दी आणि गजबज नाही. मग सर्वांची सेल्फी..डीपी फोटोग्राफी जोरात सुरू झाली. तिथून निघेपर्यंत चार वाजत आले. मग वाटेत गोकर्णाला जेवण करून पुढे मुर्डेश्वरला पोहोचेपर्यन्त रात्रीचे आठ वाजले.
4 AOm Beach.jpg
मुर्डेश्वर..कर्नाटकमधल्या भटकळ तालुक्यातल अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच हे शहर. तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेल टेकडीवरच मुर्डेश्वर मंदिर, जगातली दुसरी सर्वात उंच शंकराची मूर्ती आणि गोपुरासाठी प्रसिद्ध. आमच इथल हॉटेल मंदिराच्या जवळच होत. मग रात्री जेवून आम्ही मंदिर आणि आसपासचा परिसर पाहण्यासाठी निघालो. लांबूनच दिव्यांच्या रोषणाइत न्हाऊन निघालेल मंदिरांच भव्य गोपूर दिसत होत. मंदिर परिसरात प्रवेश करताच गोपूरामागची निळ्या रंगातली शंकराची भव्य मूर्ती दृष्टीपथात आली. रात्रीच्या काळोखात निळ्या रंगात झळाळणारी शंकराची भव्य मूर्ती, साथीला समुद्राच्या लाटांची गाज..सगळ वातावरण भारलेल वाटत होत.
6 Murdeshwar.jpgया मूर्तीच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची स्थापना अशा ठिकाणी केली आहे की उगवत्या सूर्याची किरणं सर्वप्रथम या मूर्तीवर पडतात. अस मानल जात की आत्मलिंग आपल्या हातून हिरावून घेतल गेल्याने चिडून रावणाने जेव्हा त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आत्मलिंगाचे झालेले तुकडे ज्या ज्या ठिकाणी विखुरले गेले त्या त्या ठिकाणी तीर्थस्थान निर्माण झाली. मुर्डेश्वर हे त्यापैकी एक.
8 AMurdeshwar.jpg
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मंदिरात गेलो आणि प्रथम गोपूराच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टच्या रांगेत नंबर लावला. 249 फुट उंचीच्या या गोपूराला 21 मजले आहेत आणि लिफ्टने त्याच्या शिखरावर जाता येत. शिखरावरून अरबी समुद्राच्या विशाल पटलावर शंकराच्या निळ्या रंगातल्या भव्य मूर्तीचा विलोभनीय नजारा दिसतो. गोपूराच्या शिखरावरून ते दृश्य पाहून आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतल.
9 AMurdeshwar.jpg
शंकराच्या मूर्तीच्या खाली असलेल्या गुहेमध्ये रावणाच्या आख्यायिकेच सुंदर चित्रण पुतळ्यांच्या माध्यमातून साकारल आहे ते पाहून आम्ही समुद्र किनारा आणि मुर्डेश्वर शहराचा फेरफटका मारला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
परतीच्या वाटेत गुगलबाबा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ दाखवत होता, गोकर्णापासून पन्नास किलोमिटर अंतरावरच्या याना गावातील डोंगरावरच्या ‘याना गुहा’. पण या गुहांपर्यंत पोहोचण्यासाठी भर ऊन्हातुन डोंगरातल्या पायवाटेने करावी लागणारी दोन किलोमीटरची पायपीट आणि ती करताना चढाव्या लागणाऱ्या 350 पायऱ्या लक्षात घेता आमच्यातल्या बहुसंख्य मंडळीचा या प्रस्तावाला प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. पण, आता एवढ्या जवळ आलोच आहोत तर थोडी वाकडी वाट करून पायथ्यापर्यन्त तरी जाऊन पाहू, या प्रस्तावाला सर्व तयार झाले आणि दुपारी चारच्या सुमारास आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो.
14 AYana.jpg
या गुहा म्हणजे सह्याद्री पर्वतराजीच्या माथ्यावरच्या भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर नावाच्या दोन काळ्या रंगाच्या महाकाय खडकांचा समूह. काळ्या चुनखडीपासून नैसर्गिकरित्या बनलेले हे उभे खडक सुमारे 390 फूट उंच आहेत. भैरवेश्वर शिखराच्या प्रवेशद्वारावर शंकराच मंदिर आहे. या मंदिरातल भगवान शंकराच शिल्प हे नैसर्गिकरित्या बनल्याच मानल जात.
15 AYana.jpg
आमच्यापैकी निम्मे पुढच्या दोन किलोमीटरच्या ट्रेकसाठी तयार झाले आणि आम्ही चालायला सुरवात केली. जंगलातला रस्ता असल्याने हवेत गारवा होता. मधून मधून लागणारे सरळसोट चढ आणि पायऱ्या चढत मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचायला पाऊण तास लागला. मंदिर जवळ येताच हिरव्यागार जंगलाच्या पार्श्वभूमीवर ते महाकाय काळे खडक सामोरे आले. तिथल्या नीरव शांतेतत ते खडक, प्राचीन देऊळ, भोवताळची हिरवळ पहात आमचा थकवा क्षणात निघून गेला.
17 AYana.jpgमंदिरामधूनच गुहेच्या आत प्रवेशाच्या पायऱ्या आहेत. त्या चढून आपण गुहेच्या पोटातच शिरतो. मंदिराबाहेरच्या दुकानात पोटपूजा करून, दर्शन घेऊन आम्ही त्या पायऱ्यानी चढून गुहेत प्रवेश केला.
19 AYana.jpgसमोरच दृश्य डोळ्यांच पारण फेडणारं. दोन्ही बाजूला अजस्त्र काळ्याशार खडकांची लांबलचक भिंत आणि त्यामधून गुहेच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाणारी चिंचोळी वाट..छताकडच्या झरोक्यातून झिरपणारा प्रकाश....अगदी भान हरपून टाकणार दृश्य.. बाहेर गरमी असली तरी गुहेच्या आत मात्र गारवा होता. निसर्गाने बनवलेल ते कोरीव लेणच.
21 Yana.jpg
यानाशी संबंधित लोकप्रिय आख्यायिका इथे सांगितली जाते. भस्मासुर राक्षसाने शंकराची तपश्चर्या करून तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याची राख होइल असा वर मिळवला. पण कृतघ्न भस्मासुराने आपल्या उपकारकर्त्यावरच त्याची चाचणी घेण्याचे ठरवले. त्याच्यापासून वाचण्यासाठी भगवान शंकर पृथ्वीवर आले आणि इथे लपले. त्यावेळी भगवान विष्णूंनी एका सुंदर स्त्री, मोहिनीच रूप धारण करून, भस्मासुराला नृत्य करण्यास आव्हान दिल आणि नृत्य करताना त्याला स्वतःच्या मस्तकाला स्पर्श करण्यास उद्युक्त केल आणि त्यामुळे त्याची राख झाली. या भागात आढळणारी काळी राखेसारखी माती म्हणजे भस्मासुराची राख असल्याच मानल जात.
28 AYana.jpg
भौगोलिकदृष्ट्या हे खडक लाखो वर्षांपूर्वी तयार झाले आणि त्यांचा काळा रंग त्यांच्यामध्ये असलेल्या लोह, मॅंगनीज आणि सिलिकामुळे आहे. इथल्या जंगलात असे 61 खडक आहेत त्यापैकी, भैरवेश्वर आणि जगनमोहिनी हे दुहेरी शिखर सर्वात प्रसिद्ध. आमच्या या सफरीमधल हे शेवटच ठिकाण खूपच सुंदर म्हणजे Icing on the cake…
प्रशांत मठकर
मोबाइल 9619036406

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच झाली गोकर्ण मुर्डेश्वर ट्रिप. फोटो सुन्दर आलेत. विशेषतः तो समुद्राचा आणि याना खडकांचा जास्त आवडला.
याना गुहे बद्दल प्रथमच वाचलं हे काही माहीत नव्हतं.

सुंदर.
यानाला जायला आपलं वाहन लागतं. त्यामुळे तिकडे जाता आलं नव्हतं. शिवाय वाहन एका बाजूला देवळाकडे ठेवलं तर पलीकडे उतरून फायदा नसतो. अथवा तिकडूनही शिरसी गाठता येतं. अनवाणी जावं लागतं हे आणखी त्रासदायक.

मस्तच! कुटुंबाबरोबर एकत्र फिरायला जास्तच मजा आली असेल.
या भागात एकदा जायचं आहेच. याना गुहांबद्दल अजिबात माहिती नव्हतं. बरं झालं सांगितलंत ते. नक्की जायला पाहिजे.

छानच लेख व फोटो. मी ह्याचा व्हिसा टु एक्स्प्लोअर वाला व्हिडीओ पण बघितला. आहे. पूर्ण कोस्टल कर्नाटक / कर्नाटका फार सुरेख आहे. याना तर फार साय फाय आहे. जेम्स बाँड फिल्म ला उत्तम लोकेशन आहे खरेतर. ( धार्मिक भावनांचा आदर आहे.)

मस्त. याना केव्हज फार सुंदर आहे. इथे जायचेच होते. मागच्या वर्षी साऊथ गोव्याला गेलेलो तेव्हा एका दिवसात याना केव्हज बघून येता येईल असे लक्षात आले. लगेचच तो प्लॅन ठरवून गेलो. केव्हज ला जायला दोन रस्ते आहेत. एक वरच्या बाजूने एक खालच्या. वरच्या बाजूने गेलो तर अगदीच दहा मिनीटात केव्हज येतात. खालचा रस्ता बराच दूरचा आहे.
घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. शिवाय इथे खुप मोठी फुलपाखरे देखिल बघायला मिळतात.

पावसाळा संपल्यावर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गेल्यास चांगल एन्जॉय करता येईल.. एक दिवस मुक्काम पण करण्यासारखा आहे. जवळ रिसॉर्टही आहे..