अखईं तें जालें ● तुकाराम: हिन्दुस्तानी परिवेशात

Submitted by समीर चव्हाण on 29 June, 2023 - 09:33
उपोद्धात

समीक्षाग्रंथः अखईं तें जालें ● तुकाराम: हिन्दुस्तानी परिवेशात
लेखकः समीर चव्हाण
आवृत्ती : पहिली | हार्ड बाऊंड |
खंड १: पृष्ठे ३५०, खंड २: पृष्ठे ६००
प्रकाशकः शुभानन चिंचकर, स्वयं प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठः भास्कर हांडे
छायाचित्रे: रुपेश शेवाळे
प्रकाशनः २२ जुलै, ६.०० वा. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

या समीक्षाग्रंथाचे दोन्ही खंड प्रिन्टिंगला गेले आहेत. मूळ किंमत १४००/- तर
सवलतीत १०००/- (पोस्टेज चार्जेस सहित) मध्ये देत आहोत. प्रकाशनानंतर दोन्ही
खंड लगेच पाठवले जातील. बुकिंग साठी ९७९३४७१७५१ या क्रमांकावर पेटीएम्/गूगल
पे करून मेसेज शेअर कराल. सोबत पत्ता आणि मोबाईल क्रमांक द्याल. बुकिंग
कन्फर्म केले जाईलच.

...

उपोद्धात

मराठी भाषा आणि लोकजीवनाचा विचार करू जाता म्हांइभट, महदंबा, ज्ञानेश्वर, मुकुंदराज, केसोबास, नामदेव अशी लोकभाषिक साहित्याची परंपरा पुढे तुकारामांच्या कवितेत उत्कर्ष पावलेली आहे. ह्या कवितेची लोकभाषा पुढे आधुनिक मराठीत उत्क्रांत हो‌ऊन जनजनांची संवाद वाहिनी झालेली दिसून येते. तुकारामांची शब्दकळा, वाक्यप्रयोग आणि प्रतिमा/रूपकांचा आवाका प्रचंड आहे. तत्कालीन जनजीवनातल्या प्रतिमा आणि रोजच्या व्यवहारातले शब्द तुकारामांनी सढळ हाताने वापरले आहेत. ह्यातले अनेक शब्द आता भाषेच्या वळणाबाहेर गेल्याने बऱ्याच कवितांचा समाधानकारक अर्थ लावणे कठीण हो‌ऊन बसलेले आहे. हा खरेतर एक मोठाच विरोधाभास आहे; एकीकडे लोकोक्ती बनून बसलेल्या तुकारामांच्या सुलभ-सरस कवनांची संख्या मोठी असली, तरी एक युगद्रष्टा कवी म्हणून असलेलं तुकारामांचं कर्तृत्व ह्या पलिकडचं आहे. त्याला केवळ कवितेचेच नव्हे तर भाषेचे देखील आयाम आहेत. मोठा कवी केवळ कविता लिहीत नसतो, तो भाषाही घडवत असतो - प्रचलित भाषेला ठाशीव, रेखीव आकार देत असतो; आणि हे करत असताना भवतालच्या सामूहिक सुखदुःखांचे बखान देखील करीत असतो. ऐतिहासिक दृष्ट्या सुंदोपसुंदीने भरलेल्या सतराव्या शतकात, एकीकडे आधीच्यांची शब्दवेल्हाळ, दृष्टांतकी कविता आणि दुसरीकडे धगधणारे सामाजिक वास्तव, ह्या सांदणदऱ्याच्या मधोमध पाय रोवून ठामपणे उभे असलेल्या तुकारामांच्या लेखन व्यवहाराचा व्याप मोठा आहे. गाथेवरील ह्या आधीच्या व्याख्याकारांनी तुकारामांच्या अर्थनिर्णयात मौलिक काम करून ठेवलेले असले, तरी ढोबळ आध्यात्मिक अर्थांच्या बाहेर पडून कवितेच्या मानुषी रंगात तुकारामांचे कवित्व बघितले जाण्याची नितांत आवश्यकता होती. सदर ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाने ही निकड बऱ्याच प्रमाणात पूर्ण केली आहे असे वाटते. तुकारामांचे लेखन एखाद्या महासागराप्रमाणे विशाल आहे. ह्या पसाऱ्यातून बहुस्तर रचना निवडून त्यांचा सखोल परामर्श घेणे सोपे नाही. हे प्रचंड आवाक्याचे आणि अनेक नव्या वाटांकडे निर्देश करणारे काम मराठी साहित्यासाठी एक ठाशीव उपलब्धी बनून उतरले आहे.

कुठल्याही भाषेतलं, कुठल्याही कालखंडातलं मोठं साहित्य सामाजिक अथवा भौगोलिक पोकळ्यांमधून बनत नाही. जाणता कवी जागा असतो, डोळस असतो. जगाकडे बघण्याची त्याची दृष्टी बहुस्तरीय आणि लोकोन्मुख असते. त्याचे बह्वंशी काम एकांतात होत असले तरी जगण्याच्या, भाषेच्या आणि सामाजिक संकेतांच्या पलीकडे जा‌ऊन त्याचे सततावलोकन सुरू असते. तुकारामांच्या कवितेचा विचार महाराष्ट्री भूगोल आणि लोकजीवनापुरता मर्यादित न ठेवता हिन्दुस्तानी काव्यजीवनाच्या पटलावर करून चव्हाण यांनी अभ्यासक तसेच वाचकांना एक नवा दृष्टीकोन दिला आहे. कधी मीर, गालिब, कबीर ह्या हिंदुस्तानी किमयागारांच्या काव्यप्रतिभेच्या, तर कधी प्राचीन दर्शनांच्या मनोहारी तत्वचिंतनाच्या उजेडात तुकोबांची कविता आकळू बघणारे हे चिंतन अभिनंदनास पात्र आहे.

संशोधनात्मक साहित्याचे काम स्वत:च्या संकल्पना इतरांपुढे मांडणे नसून प्रस्थापित विचारसरणी आणि दृष्टीकोनांमधे मूलगामी बदल घडवून आणणे होय. तुकारामचिंतनाच्या नव्या पा‌ऊलवाटा शोधू बघणारे हे संशोधन ह्या दृष्टीतून देखील महत्वाचे ठरते.

अंनत ढवळे
हर्डंन, व्हर्जिनिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्दिक अभिनंदन समीर चव्हाण.
मुखपृष्ठही सुंदर झालं आहे. काही पानं आणि अनुक्रमणिका टाकता आली तर आत काय आहे याची आणखी चांगली कल्पना येईल वाटलं.
शुभेच्छा!

धन्यवाद. मी केवळ एकच इमेज जोडू शकलो वर. खंड १ आणि २ बद्दल थोडक्यात इथे देत आहे.

खंड १

तुकारामांचे कार्य क्रेंदस्थानी ठेवून वैदिक, बौद्ध, भागवत, नाथ, सूफी अशा अनेक परंपरांचे अवलोकन आणि त्या अनुषंगाने मराठी, हिन्दी, उर्दू, पंजाबी इत्यादी भाषांमधल्या जवळपास तीनशे रचनांवर विस्तृत चर्चा असे या खंडाचे स्वरूप आहे. हा खंड जिज्ञासा, व्यक्तिमत्त्व, संतत्व, कवित्व आणि दर्शन या विषयांना धरून पाच अध्याय आणि शासकीय गाथेचे स्वरूप व श्री तुकारामगाथा: शब्दार्थ संदर्भकोश - परिचय या दोन परिशिष्टांसह साकारला आहे.

खंड २

पहिल्या खंडात ये‌ऊ न शकलेल्या किंवा केवळ उल्लेखस्वरूपात आलेल्या जवळपास पंधराशे रचना या खंडात घेतल्या आहेत. या रचना विषयांना अनुसरून एकूण तेहतीस भागांमध्ये विभागल्या आहेत. प्रत्येक रचनेखाली सोपेकठीण, एकार्थी-अनेकार्थी व प्रचलित-अप्रचलित शब्दांचे अर्थ दिले आहेत. कधी कधी अर्थ केवळ शब्दांचे इतर पैलू पुढे आणण्याकरिता दिल्यासारखे झाले आहे पण रचना समजून घेण्यासाठी उपयुक्त हो‌ईल म्हणून समाविष्ट केले आहेत. जिथे अर्थनिश्चिती करता आली नाही तिथे एकाहून अधिक अर्थांच्या शक्यता समोर ठेवल्या आहेत किंवा प्रश्न उपस्थित केले आहेत. अर्थनिश्चिती करताना एकूण‌एक शब्दांचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न राहिलाय. काही ठिकाणी अर्थनिर्णयनात एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी या ग्रथांचा आधार झाला किंवा पडताळा करून पाहता आला. शब्दांच्या पुढे कंसामध्ये शब्दांचे पूर्वरूप किंवा शब्दकोशातले रूप दिले आहे. जिथे आवश्यक आहे तिथे अधिक माहितीसाठी शेरा दिला आहे. रचना शासकीय गाथेतून घेण्यात आल्या आहेत पण जिथे अर्थनिश्चिती करता आली नाही तिथे तळेगाव, देहू, पंढरपूर इत्यादी प्रतींमधले पाठभेद लक्षात घेतले आहेत.

समीर

हार्दिक अभिनंदन,
बर्‍याच परिश्रमानंतर हा ग्रंथ सिद्ध झाला आहे असे दिसते.
नंतर वेळ मिळेल तेव्हा अनुक्रमणिका व इतर थोडी माहितीही लिहिली तर छान होईल.

धन्यवाद, विजय जी.

खंड १ आणि खंड २ च्या अनुक्रमणिका इथे देत आहे:

खंड १

अनुक्रम

अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो (जिज्ञासा)
मी तो आगळा पतित (व्यक्तिमत्त्व)
कलियुगीं हरी बौद्धरूप धरी । तुकोबाशरीरीं प्रवेशला (संतत्व)
अक्षईं ते झालें (कवित्व)
देशकालवस्तु भेद मावळला (दर्शन)

परिशिष्टे
शासकीय गाथेचे स्वरूप
श्री तुकारामगाथा संदर्भ शब्दकोश - परिचय
तुकारामांच्या रचनांची सूची
इतर कवींच्या रचनांची सूची
व्यक्तिनाम सूची
पारिभाषिक शब्दांचे अर्थ
संदर्भसूची

खंड २

अनुक्रम

१. नव्हे आराणूक संवसारा हातीं (अस्वस्थता)
२. गुण गाई या देवाचे (गुणगान)
३. घ्यावी अखंडित सेवा (सेवाभाव)
४. सुंदर ते ध्यान (दृष्टिभरू)
५. कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी (सलगी)
६. भेटीलागीं जीवा लागलीसे आस (अंगसंग)
७. दासत्वें दाविलें धन्याचें भांडार (ठेवा)
८. इच्छाभोजनाचा दाता (सहभोजन)
९. तूं ठायींचा गोवळ (बाळगोपाळ)
१०. आडसोनि शुद्ध करीं वो साजणी (रूपक)
११. मैंद आला पंढरीस (तीर्थ)
१२. ठेवूं चित्त पायांपें (श्रद्धाभाव)
१३. आपुलें उचित केलें संतीं (उपकार)
१४. आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ (बळिवंत)
१५. भाव केला बळी (भावबळ)
१६. तुका ह्मणे माझी केळवते वाणी (झरवणी)
१७. बोलिलों तें कांही तुमचिया हिता (स्वहित)
१८. हा तों अनुभव रोकडा (साक्षत्व)
१९. नामसंकीर्तन साधन पैं सोपें (नामसंकीर्तन)
२०. करूं गदारोळी हरिकथा (आख्यान)
२१. शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन (आचरण)
२२. टेवां दावी थोर करूनियां (ममत्व)
२३. पाइकपणें तो सर्वत्र सरता (पाईकत्व)
२४. भेदाभेदभ्रम अमंगळ (समभाव)
२५. तेंग तें चि मूळ लटिक्याचें (फजितखोर)
२६. कुशळ हे भांड बहु जाले (वाचाळ)
२७. गाजराची पुंगी तैसे नवे जाले जोगी (भोरुपी)
२८. उभयतां नाड हित असे (तटस्थ)
२९. जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती (प्रेमसूत्रदोरी)
३०. लौकिका या बाहेरी (एकाकी)
३१. सहज लीळा मी साक्षी याचा (लीला)
३२. अनुभव सरिसा मुखा आला (क्षरा‍अक्षरावेगळा)
३३. केलें कौतुक नवल (वचने)

माहिती वरच्या माझ्या प्रतिसादात दिली आहे.

समीर

हार्दिक अभिनंदन समीर,

हॉल बुक केलाच आहे. कार्यक्रम अफाट होणार यात शंका नाही.

तुझे लेखन कसे असेल / आहे यावर अनंतने जे लिहिले आहे ते वाचून आवाका जबरदस्त आहे याची नम्र जाणीव झाली

भेटूच

भूषण, मनापासून धन्यवाद. सुरुवातीच्या लिखाणात तू, भारतीताई, शशांक अशा अनेकांनी एन्करेज केले होते. नक्कीच भेटू (कार्यक्रमाआधीही).

विशाखा, धन्यवाद.

दोन्ही खंडांचा आवाका खूपच मोठा आहे. त्यावरूनच श्री समीर ह्यांनी प्रदीर्घ काळ घेतलेल्या कष्टाची कल्पना येते. तुका खोलवर मनात रुजल्याशिवाय आणि त्याचा ध्यास लागल्याशिवाय हे शक्य नाही.
" अक्षरांचा श्रमो केला, फळा आला तेणे तो " हे ह्या खंडद्वयालाही लागू आहेच. जिज्ञासा आणि ज्ञानलालसा एके ठायीं आल्यावर किती मोठे कार्य घडू शकते ह्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
ग्रंथ वाचणे होईल तेव्हा होईल पण प्रत्येक प्रकरणाची शीर्षके इतकी बोलकी आहेत की त्यांमध्ये किती सखोल ' ऐवज ' असेल ह्याचा अंदाज येतो.
मनापासून अभिनंदन!