माझी पण वैशाली!

Submitted by केशवकूल on 24 June, 2023 - 06:36

वैशालीतली भेट!
मी टिंबक्टूला कंपनीच्या कामासाठी गेलो होतो. टिंबक्टूच्या राजाला त्याच्या झनानखान्याचा डेटा बेस बनवून पाहिजे होता. वयोमानपरत्वे राजाची स्मरणशक्ति त्याला दगा द्यायला लागली होती. कुठल्या दिवशी कुठल्या बेगामकडे वार आहे हे समजेना. एकूण किती मुलं आहेत? इत्यादि. तर ते काम आमच्या स्वस्त आणि मस्त कंपनीकडे आले होते.

मी टिंबक्टूहून परत आल्यावर “तो धबधबा बघितलास का?” हा प्रश्न सगळे विचारणार अशी माझी अपेक्षा होती. पण तीन दिवसाच्या धावपाळीत माणूस काय काय बघणार हो? म्हणून मी काय केले विकी वर जाऊन त्या जगप्रसिद्ध धबधब्याची माहिती वाचून ठेवली.
“बाबा तो धबधबा...”
“धबधबा? कुठला धबधबा? ते सोड. तू त्र्यान्भक्तला गेला होतास तेव्हा एक स्थळ चालून आले. सरदेसाई आमच्या सर्कल मधले आहेत त्यांची मुलगी. तिने एमेस्सी का कायते केले आहे. दयाळू अम्मा कुलीन स्त्रियांच्या इन्स्टिट्यूट मधून. आणि आता तिथेच नोकरी करतेय. गोष्टी पुढे न्यायच्या आधी तिला तुला भेटायचे आहे. तेव्हा ह्या रविवारी दुपारी चार वाजता वैशालीमध्ये मीटिंग ठेवली आहे.”
बाबा म्हणजे आमच्या एचआरच्याही वरताण होते. मला न विचारता मीटिंग पण फिक्स करून मोकळे झाले.
“हा आणि मी चेक केले आहे. रविवारी आकाश निरभ्र राहील. पावसाची सुतराम देखील शक्यता नाहीये.”
“पण बाबा माझा सध्या...”
“लग्नाचा विचार नाही असच म्हणायचे आहे ना? अरे मी पण असच म्हणत म्हणत फटदिशी केव्हा लग्न करून बसलो ते कळाले नाही. मुलगी बघितली कि लग्न करायलाच पाहिजे असं थोडच आहे. काही टेन्शन घ्यायचे नाही.”
ठीक आहे. त्या माझ्यावर चालून आलेल्या मुलीची भेट घ्यायला नाखुषीने तयार झालो. बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी टोमाटो कलरचा शर्ट घालून आणि जरूर ती कागदपत्रे घेऊन मीटिंगला हजर झालो. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे ती लेमन कलरचा टी शर्ट घालणार होती. दोन टॉप लेवलचे गुप्तहेर असेच भेटत असावेत अशी फीलिंग आली.
बरोबर चार वाजता ती लेमन कलरवाली तिथे पोचली. सरळ माझ्याकडे पोचली.
“मी फिनिका. यू केशव?” ह्या क्षणी बाबांनी माझे नाव रोहित, राहुल, अर्णव, आदित्य, अरमान न ठेवता केशव का ठेवले? असा विचार मनात आला.
मी मराठीत होय म्हणालो.
माझे इंग्रजी कच्चे असावे ह्याची दुःखद जाणीव तिला झाली असावी.
“ग्लॅड टू सी यू. अगदी वेळेवर आलास. आय लाईक दॅट.”
“चल.” म्हणून ती दमदार पावले टाकत वैशालीत शिरली. तिची सरावाची जागा असावी.
वैशालीत नेहमीच गर्दी असते असे ऐकून होतो. आता प्रत्यक्ष बघत होतो. तिथे बरीच भुकेली दीनवाणी लोकं वेटिंगमध्ये होते. मी बापुडा अंग चोरून भिजलेल्या उंदरासारखा बाजूला उभा होतो. वेटरने आमच्याकडे एक नजर टाकली आणि मामला काय आहे ते जोखले.
“चला या इकडून माझ्या मागे.” हसत हस्त आम्हाला सांगितले. त्याचे सूचक हास्य बघून मला लाजल्यासारखे झाले. आपण काही अनैतिक कृत्य करत आहोत कि काय? अशी भावना झाली.
ते वैशालीचे खास दालन होते.( हे मला नंतर समजले.) दोन दोन खुर्च्या लावलेली पाच सहा टेबल लावली होती. त्यातल्या तिनावर तीन जोडपी बसली होती. आमची चौथी जोडी.
बाजूला नजर टाकली तर तिथेही टोमाटो आणि लिंबू बसले होते.
“तुम्ही पहिल्यांदाच येताय ना. मग हे वाचा.” त्याने आमच्या समोर एक माहितीपत्रक ठेवले आणि तो चालता झाला.
समाज सेवा म्हणून वैशालीने लग्नेच्छू तरुण तरुणींसाठी हे नवीन दालन सुरु केले होते. पाच – दहा भेटीसाठी अशी दोन पॅकेज होती. पहिल्या भेटीसाठी इडली वडा सांबार on the house!
पुढच्या चार भेटीत खाद्यपदार्थावर तीस परसेंट छूट. त्यापुढील पाच भेटीसाठी वीस परसेंट सूट. अर्ध्या तासांची टाईम स्लॉट. आपले नाव त्वरित नोंदवा, आमचा “व्हेरीफाइड” हा बिल्ला पाहिजे असेल तर एक्ट्रा चार्ज. दहा भेटीत जर “जमले” नाही तर आमच्या कौंसिलरला भेटा...
शेवटी यशस्वी “सौ व श्री वैशाली”करांची यादी.
भेटा वैशालीत नि रहा खुशालीत. असं पाचकळ घोषवाक्य.
मी हसलो. ती पण हसली.
“मेक्स ए गुड बिझिनेस सेन्स.”
“काय?”
“काही नाही. आपण आपले काम करुया. मला अजून दोन इंटरव्यू घ्यायचे आहेत. एक इथेच वाडेश्वर मध्ये आहे. दुसरा जरा दूर कँप मध्ये आहे.” आता तिने आपल्या बॅकपॅकमधून लॅपटॉप काढला.
मला अजून दोन इंटरव्यू घ्यायचे आहेत.>>> बापरे हे भारी प्रकरण दिसतेय. आपल्याला नाही झेपणार. मी मनातल्या मनात तिला रिजेक्ट करून टाकलं. तुम क्या मुझे रिजेक्ट करोगी मै ही तुमको रिजेक्ट करता हू. वाईट वाटलं. कारण ती दिसायला सुरेख होती. वर ते “It” का काय म्हणतात तेही तिच्यात होते. पण...
प्रश्नोत्तराला सुरवात झाली. म्हणजे प्रश्न तिचे आणि उत्तरं माझी.
नाव, गाव, पत्ता, वय, शिक्षण, पॅनकार्ड, आधारकार्ड, नोकरी कुठाय इत्यादिवरून गाडी अखेर पगारावर आली.
“पेस्लीप आणली आहेस?” मी तयारच होतो. मित्रांच्या अनुभवावरून. हल्लीच्या तरुणी ना अगदी वाजवून घेतात बरका.
“ह्याच्यात बोनसची फिगर नाहीये? बोनस देते कि नाही कंपनी?”

“हो. मिळतो ना. पण तो इथे दिसणार नाही.”
“ओके. अमेरिकेला वगैरे जायचे चान्सेस?”
मी टिंबक्टू, धबधबा, त्से त्से, पिवळा ताप, जिराफ, झेब्रा अस काही बोलणार होतो. पण सावरलं.
“जाणार आहे. किक ऑफ साठी.”
“सेविंग काही केले आहे? म्युचुअल फंड, शेअर्स, गोल्ड, रिअल इस्टेट ...”
“हो.” मी उत्साहाने सांगायला सांगायला सुरुवात केली. “माझी सरकारी बॅंकमधे एफडी आहेत.”
तिने चेहरा कसनुसा केला.
अहो मी एफडी केली आहेत. लफडी नाहीत!
“त्याचे व्याज येत ना त्याचे काय करतोस?”
“त्याची पण एफडी...”
“आणि...”
“शेवटी जेव्हा शंभर रुपये व्याज येते तेव्हा एक डझन केळी आणि अर्धा लिटर चितळे दूध आणून शिकरण करतो.”
“आणि जोक सुद्धा.”
काय रोख होता काही समजलं नाही.
“चला आता तुझ्या सामाजिक जाणीवांविषयी. हुंडा देण्या घेण्या विषयी तुझे काय मत आहे?” तिने टोकदार प्रश्न केला. माझी पण कमावलेली कातडी. ती ह्याला कशी दाद देणार?
“द्यायला माझा पूर्ण विरोध आहे. पण आता हुंडा घ्यायचाच झाला तर...”
“अस गुळमुळीत नको बोलू. रोकठोक... एक मिनिट.”
तिने आपल्या लॅपटॉपमधे टिक टिक केलं.
“अं हम्म. हे पहा मी तुझ्या पुढील पन्नास वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेऊन आयआरआर काढला आहे. ही तुझी मिळकत, हे खर्च, मुला/मुलीचे शिक्षण, होमलोन, कारलोनचे हप्ते, बायकोचा नट्टाफट्टा, साड्या...”
“अग पण इतक्या साड्या? म्हणजे हे फार होतंय.”
“झाडू पोछा, पोळीण बाई, किराणा आणि दररोजच्या भाज्या... हे राहिलेच. हे सगळे धरलं तर तुझा आयआरआर निगेटिव्ह येतोच. हुंडा घेतोय कसला? उलट तुलाच मुलीला द्यावा लागेल.”
“आता मी तुला काही जनरल गोष्टी सांगते. वेळेवर यायला लागेल. बिडी-काडी, दारू प्यायला बंदी. स्त्रियांशी बोलताना लाळ टपकायची नाही. मित्रांबरोबर चकाट्या पिटायच्या नाहीत...”
मी तिला मधेच थांबवले आणि वेटरला बोलावले. तो पाणी घेऊन आला.
“पाणी नकोय मला. तुमच्याकडे ताट आहे काहो? ती अडीचशे रुपयेवाली फुल थाळी नकोय मला. रिकामे ताट पाहिजे. आण आणि ठेव माझ्या डोक्यावर.” वेटर ह्या ह्या करून हसला आणि चालता झाला. त्याला बहुतेक समजलं असावं.
तिला नाही समजलं.
“एनिवे अजून दोन उमेदवार आहेत. आम्हाला तिघांचं कंपॅरीटीव स्टेटमेंट करावे लागेल, थर्ड पार्टीकडून तुमचं कॅरॅक्टर चेक करावं लागेल. मग रँकिंग करून डिसिजन झाला कि आम्ही तुम्हाला कळवू किंवा न कळवू. तुम्ही मेल किंवा टेलिफोन करू नका.”
हिला काय वाटलं कि मी लटकून राहीन? मला तर खरं म्हणजे लग्नच करायचं नाहीये. बाबा म्हणाले म्हणून आलो झालं. आणि अगदी करायचच असेल तर हिच्याशी कशाला? नाही म्हणजे दिसायला तशी बरी आहे. पण जरा ज्यादा आहे. चालेल. चालेल काय चालेल? नाही चालणार. अरे, आता जादा असेल, लग्न झाल्यावर कमी होईल. पण तिने तुझा निगेटिव्ह आयआरआर का काय तो काढून दाखवला ते इतक्या लवकर विसरलास? हाच तो ज्यादापणा.
डोक्यात विचारांचे उलट सुलट काहूर माजले होते. वैशालीच्या बाहेर पडलो, आणि फर्गसन (हाच खरा उच्चार आहे असे आम्हाला मा का देशपांडेनी शिकवले आहे.) कॉलेजच्या मेन गेट पर्यंत चालत गेलो. मग इराण्याच्या हॉटेलात जाऊन बन मस्का खाल्ला आणि चहा प्यालो तेव्हा डोके शांत झाले.
घरी आलो. बाबा आणि आई वाट पहात होते.
“काय झाले?”
“काही नाही. स्मार्ट आहे. बघतो. विचार करतो.” असा कोमट प्रतिसाद दिला.
दोन दिवस शांततेत गेले. संध्याकाळी बाबा म्हणाले, “असा कसा रे वेंधळा तू? कलर ब्लाइंड. लिंबू आणि निंबोणी रंगातला फरक ओळखता येत नाही? सरदेसायांच्या लताने दुसरा कोणीतरी मुलगा पसंत केला. तू कुणाला भेटलास वैशालीत?”
“अहो त्याला का ओरडता? तो अजून लहान आहे. आणि पहिलीच वेळ.” इति आई.
आता माझ्या लक्षात घोळ आला. पण ही बाबांची चूक. बाबा लिंबू म्हणाले म्हणून मी एक लिंबू झेलू बाई दोन करत बसलो. निंबोणी म्हणाले असते तर कडूलिंबाच्या झाडा भोवती फेर धरला असता. आपल्याला काय ही काय नि ती काय.
मी चाप्टर झटकून टाकला.
तिसऱ्या दिवशी मला दोन मेल आल्या. एक होती “डूलिटल अँड डून थिंग” कंपनीचे ऑफर लेटर. आणि दुसरी “तिची.”
फ्रॉम: फिनिका@झमेला.कॉम
अबाउट: भेट तुझी माझी होता.
डीअर केशु
Ayya Ishsh
ऋणानुबंधाच्या “चुकून” पडल्या गाठी भेटींत रुष्टता मोठी...
आधी मला तुझा तो ताटाखालचा विनोद समजला नाही. घरी गेल्यावर गुगल केलं तेव्हा समजला.
असाच घो हवाय मला,
आता माझ्या विषयी. मी फिनिका देशपांडे. सीएफए केले आहे. संत श्री श्री १०८ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून एमबीए केले आहे. आणि आता डूलिटल एचआर मध्ये नोकरी करतेय.
हेच आमंत्रण/निमंत्रण समजून आपल्या बाजूचे एचआर, बारभाई, फौजफाटा, आणि बाजार बुणगे घेऊन आमच्या इकडे तहाच्या अटी ठरवण्यासाठी आणि नंतर तहावर सह्या करण्यासाठी डेरेदाखल व्हावे. एकूण पंधरा जणांचीच खातिरदारी करण्यात येईल.
कांदा पोहे मी बनवणार आहे म्हटलं!
यायचं हं नक्की.
नाहीतर मी भयंकर रागावेन. महागात पडेल.
आपलीच Ishsh
फिनी

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast aahe re

Rofl
कसल्या भन्नाट जागा घेतल्यात...
या ठिकाणी खूप हसलो....>>>>“शेवटी जेव्हा शंभर रुपये व्याज येते तेव्हा एक डझन केळी आणि अर्धा लिटर चितळे दूध आणून शिकरण करतो.”>>>
रिकामं ताट डोक्यावर....कसलं मार्मिक व्यंग आहे..

शेवटी दुसरीलाच खो दिला हा कळसच...

एकेकाळी वैशालीत रोज सकाळी नाष्टा करायचो विद्यार्थीदशेत...असलं काही का नव्हतं तेव्हा ?

केशवजी हा धागा मला वाटतं विनोदी लेखनात चपखल बसतोय...

अश्विनीमामी दसा
आपल्या सारख्या जाणकारांना आवडलंं म्हणजे झालच कि कष्टांचंं सार्थक!
दसा
हे जादूचे दालन तेव्हाही होत आणि आत्ताही आहे. पण हे फक्त "कर्तव्य" असणाऱ्यानाच दिसते. रिकामटेकड्या् चकाट्या पिटांंसाठी नाही.
विनोदी? जावे त्याच्या ... तेव्हा कळते.

>>>विनोदी? जावे त्याच्या ... तेव्हा कळते.>>>>
गुलमोहर विनोदी लेखन मध्ये असायला हवा गुलमोहर कथे ऐवजी....

वैशाली काय आहे ते मला आता पुढच्या पुणे भेटीत शोधायलाच पाहिजे. कारण आता जाणार नाही फक्त बाहेरूनच बघणार. हॉटेलात भूक लागल्यावरच जातो ,जवळपास टपरी नसली तर.

पण काय भन्नाट लिहिलं आहे.
एक आठवलं थोडे दिवसांपूर्वीच ' महाराष्ट्राची हास्य जत्रा'वर असा एक विनोदी किस्सा दाखवला होता. दादरचा ओंक्या राऊत आणि कोळसेवाडी कल्याणची शिवाली. काय भन्नाट काम केलंय शिवालीने.
बाकी पुण्याची बिबवेवाडीची इंदलकर ही भारीच काम करते.

पण वैज्ञानिक कथांपेक्षा हा फार्स आवडला केकूल.

@आबा. @अ'निरु'द्ध @Srd प्रतिसादांबद्दल धन्यवाद!|
@Srd
पण वैज्ञानिक कथांपेक्षा हा फार्स आवडला केकूल.>>> अशी तुलना प्लीज करू नका. जो तो आपल्या जागी सही आहे.

झकास आणि जबरदस्त...
केशवने जायलाच हवं आता, नाहीतर फिनिका रागवेन हं...

मस्तच जमलीयं कथा..!!
बाजूला नजर टाकली तर तिथेही टोमाटो आणि लिंबू बसले होते.>> चित्र अगदी डोळ्यांसमोर आलं आणि हसू फुटलं.

@अस्मिता
भाग २ ? इतना मेरा भाग कहा? बस, भागम भाग! आणखी काय?
@स्वाती२ आभार.

धमाल लिहिले आहे Lol

माबवर हल्ली विनोदी कथा येत नाहीत फार ...
येऊ द्या अजून

हे सगळे धरलं तर तुझा आयआरआर निगेटिव्ह येतोच. हुंडा घेतोय कसला? उलट तुलाच मुलीला द्यावा लागेल.”>>>> कसलं भन्नाट आहे हे! मस्तच.... मला फिनिका जाम आवडली आहे!

छान लिहिली आहे.
२० वर्षापूर्वी एका पुणेकर मित्रा बरोबर गेलो होतो वैशाली ला.... अखंड तारुण्याच वरदान लाभलय त्या वास्तूला....

>>>>शेवटी जेव्हा शंभर रुपये व्याज येते तेव्हा एक डझन केळी आणि अर्धा लिटर चितळे दूध आणून शिकरण करतो.>>>>
हे अगदी अचाट आहे .......

सामो
आभार. मला वाटल होत कि तुम्ही रागावलात कि काय. पण नाही.

बाजूला नजर टाकली तर तिथेही टोमाटो आणि लिंबू बसले होते.>>
शेवटी जेव्हा शंभर रुपये व्याज येते तेव्हा एक डझन केळी आणि अर्धा लिटर चितळे दूध आणून शिकरण करतो.>>>>

खूप मस्त!

Pages