पुस्तक परिचय- राग दरबारी

Submitted by वावे on 24 June, 2023 - 02:33

राग दरबारी - श्रीलाल शुक्ल

ही हिंदी कादंबरी मी नुकतीच स्टोरीटेलवर ऐकली. त्रिलोक पटेल यांनी अभिवाचन केलं आहे.
टोकदार,बुद्धिमान, जाणकार, सणसणीत उपरोध या कादंबरीत ठासून भरलेला आहे. विषय मुख्यतः राजकारण.

इतिहास या विषयात एम. ए. झालेला रंगनाथ नावाचा तरुण हवापालटासाठी, विश्रांतीसाठी, तब्येत सुधारण्यासाठी आपल्या मामाच्या गावाला, शिवपालगंजला येऊन राहतो. या सहा महिन्यांच्या काळात तिथे घडत असलेल्या घटनांनी ही कादंबरी बनते. शिवपालगंज हे उत्तर भारतातलं एक तालुक्याचं गाव आहे. रंगनाथचे मामा, वैद्यमहाराज म्हणजे ’बैदमहाराज’ हे शिवपालगंजमधलं सर्वात मोठं प्रस्थ. त्यांच्याकडे वीर्यनाशावर हमखास औषध आहे, अशी त्यांची ख्याती आहे. ते स्वयंघोषित समाजसेवक आहेत, राजकारणी आहेत आणि अनेक मोठमोठ्या राजकारणी नेत्यांप्रमाणे त्यांनाही राजकारणाचा तिटकारा आहे. (हा खास ’राग दरबारी’ उपरोध.) शिवपालगंजमधल्या मुलांना शिक्षण मिळावं या उदात्त हेतूने त्यांनी तिथे कॉलेज ( इंटर कॉलेज म्हणजे ज्युनियर कॉलेज असावं) काढलं आहे. एक सहकारी सोसायटीही त्यांनी काढली आहे.
बैदमहाराजांना दोन मुलं आहेत. मोठा बद्री पहिलवान आणि धाकटा रुप्पन बाबू. दोघे आपापल्या परीने गुंड आहेत. रुप्पन बाबूचे इंटर कॉलेजमधे ’डेरे पडले’ आहेत! मुळात तो कॉलेजला शिकण्यासाठी जात नसून विद्यार्थी युनियनचं काम करायला जातो, त्यामुळे त्याने तिथे डेरे टाकले आहेत असं म्हटलं पाहिजे. तिथे खरोखरीचे ’विद्यार्थी’ फार कमी असावेत आणि जे असतील, त्यांना शिक्षण मिळणं कठीणच, असं कॉलेजचं एकंदर वातावरण. ’सैराट’ मधल्या ’प्रिन्स’चेच नमुने बरेच. कॉलेजचे प्रिन्सिपल हे बैदमहाराजांच्या दरबारातलं एक प्यादं. कॉलेजच्या शिक्षकांमध्येही भरपूर गटबाजी, राजकारण, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न चालू.
बद्री पहिलवान हा खरोखरचा आखाड्यात कुस्ती करणारा पहिलवान. त्याचा चेला छोटे पहिलवान. छोटे पहिलवानाची खानदानी खासियत म्हणजे मुलगा आणि वडिलांची मारामारी. त्यांच्या घराण्यात प्रत्येक पिढीतला मुलगा आपल्या वडिलांना मारत आलेला आहे, अगदी हातात काठी घेऊन. आणि यात त्यांना काहीही लज्जास्पद वाटत नाही. जोगनाथ नावाचा गावातला अजून एक गुंड, आजूबाजूच्या गावातले असे अनेक लहानमोठे गुंड हे बद्री पहिलवानाचे मित्र किंवा चेले.
सहकारी सोसायटीत ’गबन’ झालेला आहे, म्हणजे एकाने पैसे खाल्ले आहेत. यावर बैदमहाराजांचं उत्तर असं, की भ्रष्टाचार झाला ही गोष्ट खरी आहे, पण आम्ही तो लपवून ठेवलेला नाही. भ्रष्टाचार सगळीकडे होतो, अनेक ठिकाणी तो लपवून ठेवला जातो, पण आम्ही नाही त्यातले. खरी गोष्ट अशी आहे की हा भ्रष्टाचार त्यांच्या संमतीनेच झालेला आहे.
सगळीकडे अशी भ्रष्ट, खोटी, ढोंगी माणसं बघून बघून आपल्याला उबग यायला लागतो, किळस वाटायला लागते. रंगनाथचंही तसंच होतं. रंगनाथ हे एक वैशिष्ट्यपूर्ण पात्र आहे. तो उच्चशिक्षित आहे, शहरातला आहे, तसा बहुश्रुत आहे. पण तो शिवपालगंजच्या माणसांपेक्षा अगदीच वेगळ्या ग्रहावर राहणारा नाहीये. तसा तो असता, तर तो इतक्या जवळून त्यांच्याकडे बघू शकला नसता, त्यांच्यात सामील होऊ शकला नसता. तो पूर्णपणे या माणसांना समजून घेऊ शकत नाही, पण निदान तसा प्रयत्न करू शकतो आणि तो करतोही. प्रिन्सिपल विरुद्ध खन्ना मास्टर हे शिक्षक, या भांडणात तो शेवटी खन्नांच्या बाजूने उभाही राहतो. कादंबरी आपण रंगनाथच्या दृष्टीने बघतो असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे रंगनाथ हा थोडा वेगळा, थोडा त्यांच्यातला, असाच असायला हवा, तसाच तो आहे.
’लंगड’ हे एक अत्यंत जबरदस्त पात्र आहे. आपल्या जमिनीचा एक साधा दाखला मिळवण्यासाठी तो पूर्ण वेळ खटपट करत आहे. वास्तविक दोनपाच रुपये चारले, तर त्याचं काम लगेचच होईल. त्याला तेवढे पैसे द्यायला परवडतीलही, पण पैसे न चारता दाखला मिळवायचा, या हट्टाला तो पेटला आहे. सरकारी दप्तराचे उलटेसुलटे नियम, त्यातल्या खाचाखोचा, इरसाल बाबू लोक हे त्याला जेरीस आणू पाहतात, पण त्याची जिद्द आणि सकारात्मकता अफाट आहे. वेडसरपणाच्या पातळीवर जाऊ पाहणारी त्याची ’सत्य की लडाई’ हे भ्रष्टाचाराने आणि अप्रामाणिकपणाने लडबडलेल्या व्यवस्थेवरचं भाष्य आहे.
हे सगळं लिहीत असताना लेखकाने आपला उपरोधाचा सूर कुठेही सोडलेला नाही. खरं सांगायचं तर ही कादंबरी ऐकताना सुरुवातीसुरुवातीला मला या उपरोधाचा कंटाळा यायला लागला होता. पण नेटाने पुढे ऐकत राहिले आणि मग मात्र तो उपरोध आवडायला लागला. त्यातून निर्माण झालेल्या अनेक विनोदांना मग मी मनापासून दाद दिली. ब्लॅक ह्यूमर या शैलीत मी तरी यापूर्वी काही वाचलं नव्हतं. ’राग दरबारी’ मधली अनेक वर्णनं अत्यंत सविस्तर आहेत. काही काही ठिकाणी तर किळसवाणी आहेत. पण तरीही ही कादंबरी शब्दबंबाळ नाही. इथे शब्दांचे पोकळ डोलारे नाहीत. वस्तुस्थिती सर्व बाजूंनी ढळढळीतपणे उभी करणे, हाच त्या वर्णनांमागचा उद्देश आहे.
या कादंबरीत स्त्री पात्रं फक्त उल्लेखातून येतात. इथे सार्वजनिक आयुष्यात स्त्रियांची किंमत ही फक्त त्यांच्याद्वारे करता येऊ शकणार्‍या राजकारणावर ठरते. एखादी मुलगी केवळ विरोधी पार्टीच्या माणसाची मुलगी आहे म्हणून तिच्या चारित्र्यावर भर कोर्टात वाटेल तसे शिंतोडे उडवले जातात, आपल्या मुलाने परजातीच्या मुलीबरोबर प्रेमप्रकरण केलं, की बोभाटा झाल्यावर ’आंतरजातीय विवाह’ करून दिला म्हणून मिरवता येईल म्हणून लग्न लावून देण्याची तयारी दाखवता येते.
अशी ही ’राग दरबारी’. मायबोलीवर यापूर्वी या पुस्तकावर दोन धागे आलेले आहेत, हे मला माहिती आहे आणि कादंबरी ऐकायला लागल्यावर मी ते शोधून वाचलेही. त्या दोन्ही धाग्यांवरही छानच लिहिलं गेलं आहे. पण माझा अभिप्राय लिहिता लिहिता वाढत गेला हे एक कारण आणि मी ऑडिओ बुक ऐकलं आहे, हाही एक अधिकचा मुद्दा, म्हणून स्वतंत्र धागा काढला.

त्रिलोक पटेल यांचं अभिवाचन उत्कृष्ट झालेलं आहे. चौदापंधरा तासांची ही कादंबरी आहे. हिंदी भाषेची लिपी देवनागरीच असली, तरी एवढी मोठी हिंदी कादंबरी मी हातात घेऊन वाचली असती की नाही याची मला शंका आहे. हिंदी ऐकायला मात्र काहीच अडचण वाटत नाही. श्राव्य पुस्तकांचा हा मोठा फायदा आहे. अनेक शब्द आधी माहिती नसले, तरी संदर्भाने अर्थ समजत गेले. अस्सल हिंदी उच्चार ऐकायला मजा आली. याआधी मी प्रेमचंदांची ’गोदान’ स्टोरीटेलवर ऐकली आहे. तोही अनुभव आवडला होता. चांगलं लिखाण आणि चांगलं अभिवाचन एकत्र आलं की मणिकांचन योग जुळून येतो, हे माझ्यासाठी परत एकदा सिद्ध झालं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

यावरील दूरदर्शन मालिका ( ? १९९० चे दशक ) पाहिली होती, मस्तच.
स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय-सामाजिक-नैतिक अधःपतनाची कथा...

मी‌ हेच लिहायला आले होते.‌ मालिका छान होती, आवडली होती, इतकंच आता लक्षात आहे. कादंबरी वाचायला/ ऐकायला हवी. राजकारण आवडीचा प्रांत असल्याने नक्कीच गंमत येईल.

परिचय विस्तृत आणि उत्सुकता वाढवणारा आहे.
राजकारण हा माझा पुस्तकाचा,सिनेमाचा,नाटकाचं विषय नाही. पण नेत्यांचे चरित्र वाचतो. ओडिओ बुक्स तर नाहीच.
( विशाखा-वावे हा आइडी वेगळा आहे का?)

धन्यवाद कुमार सर, अनया, Srd.
विशाखा-वावे हा माझाच दुसरा आयडी आहे. वावे या आयडीची फोटोंसाठीची जागा भरल्यामुळे तो काढलाय. ज्यात फोटो असतील असे धागे त्या आयडीने काढते Happy

आयडीची फोटोंसाठीची जागा भरल्यामुळे नवीन आइडी काढलाय. . . .
पक्षांचे फोटो पब्लिकसाठी दाखवायचे असे असतात त्यांवर वाटरमार्क टाकून (ऐच्छिक) किंवा असेच Imgur siteवर टाकून त्यातून इमेज लिंक मिळवणे सोपे आहे. ती इथे वापरा. अमर्यादित साठवण आहे अकाउंटला. शिवाय Imgur चे सभासदही प्रतिक्रिया देतात. फोटो फुल साईजचे इथे येतील. ते अगोदरच रिसाईज केल्यास तसे येतील.

छान ओळख. माझ्याकडे स्टोरीटेल नाही पण नेहमी काहीतरी ऐकायला लागते. त्यामुळे एकदा नक्की घेउन ही कादंबरी ऐकेन. औपरोधिक लेखन फार आव्डते मला.

छान ओळख. मी सुरूवातीचा काही भाग वाचून पुढे अजून वाचलेले नाही. पुन्हा एकदा नेटाने प्रयत्न करायला हवेत. हिंदी वाचायचा कंटाळा येतो. इथे ऐकायची सोय असेल तर बघतो.

सुरूवातीला मोठे शहर जेथे संपते तेथून पुढे खरा भारत सुरू होतो वगैरे वर्णन एकदम एंगेजिंग आहे Happy

यातले वर्णन बघितले की हास्यकवी शैल चतुर्वेदीच आठवतात. त्या वरती कुमार१ यांनी उल्लेख केलेल्या सिरीज मधे ते होते.

ह्याच पुस्तकात खेड्याच्या बाहेर 'लोटापरेड' होती, असा उल्लेख आहे का?
फारएण्डमुळे शैल चतुर्वेदी आठवले.

धन्यवाद लोकहो.
संप्रति, चाळून बघितला अनुवाद. जरा कृत्रिम नाही वाटत? तुम्ही अनुवाद वाचलाय की मूळ कादंबरी वाचली आहे?

@अनया, हो, हे वर्णनही आहे.
@ Srd, बघते Happy

ही दूरदर्शन मालिका मला अजिबात आठवत नाही. तेव्हा लहान असल्याने कदाचित काहीच समजलं नसेल त्यामुळे बघितली नसेल.

या लेखामुळे काल पुन्हा शोधले पुस्तक. आणि माझ्याकडे आहे तो मराठी अनुवादच निघाला Happy मला बहुधा चिनूक्सनेच तेव्हा हिंदीच आण म्हणून सांगितले होते ते आठवले. दुनियाने कितना समझाया मूमेन्ट एकदम. कृत्रिम वाटण्याबद्दल - पहिल्या काही पानात थोडा वाटतो तसा. अगदी लगेच जाणवणारे म्हणजे स्वतःचा "आम्ही" असा उल्लेख. हिंदीत स्वतःबद्दल "हम" म्हणतात त्याचे शब्दशः भाषांतर वाटते ते.

पण तरीही पहिल्या दोन पानात सुद्धा इतके धमाल वर्णन आहे!

याबद्दलची आणखी एक मजेदार आठवण. मी नुकताच ४-५ पुस्तके घेउन आलो होतो व घरी हॉल मधेच होती. त्यात हे होते. कोणीतरी आमच्याकडे आलेल्यांपैकी एकांनी या पुस्तकाचे नाव बघून मला विचारले की तू शास्त्रीय संगीतावरची पुस्तके वाचतोस का Happy

फारएण्ड Happy
'हम-आम्ही' यासारखं अजून एक म्हणजे भांग पिण्यासारख्या काही गोष्टी, ज्या उत्तर भारतात रुजलेल्या आहेत, त्या आपल्याकडे नाहीत. त्यामुळे तेही हिंदीत वाचायला/ऐकायला जेवढं नैसर्गिक वाटतं, तेवढं कदाचित मराठीत वाटणार नाही. ( अर्थात भांगेची अगदीच निमकराच्या खानावळीतली डुकराच्या मांसाची तळलेली भजी होणार नाहीत Lol )

छान ओळख.
सगळीकडे अशी भ्रष्ट, खोटी, ढोंगी माणसं बघून बघून आपल्याला उबग यायला लागतो, किळस वाटायला लागते.>>
आता इतका परिस्थितीचा उबग येण्या एवढी वेळ पूर्वी कधी आली असेल असं वाटत नाही.