परदेशी जाण्याआधीचे प्रश्न

Submitted by अनुरिका on 18 June, 2023 - 09:04

मी सध्या भारतात आहे. मला आणि नवऱ्याला USA(nyk) किंवा UK(Manchester) इथे संधी मिळू शकते.

मी लंडनला एक वर्ष राहिली आहे, त्यामुळे तिथे काहीच प्रॉब्लेम नाही. पण Manchester आणि USA- New York ची काहीच कल्पना नाही.

१. मी , माझा नवरा दोघेही वर्किंग आहोत. पाच वर्षांचा मुलगा आहे.

२. आम्ही दोघेही चाळीशीच्या जवळपास आहोत. नवरा बराच आळशी आहे, चटकन उठून कामे करण्याची सवय नाही.

३. मागची दोन वर्षे मुलाचा अभ्यास, घरातली कामं आणि ऑफिस करताना एक ना धड होत होतं. त्यामुळे घरकामाला बाया आहेतच, वरकामालाही मदतनीस आहे. स्वयंपाकालाही बाई आहे.

४. मला आणि नवऱ्याला ऑफिसमध्ये खूप काम असतं, कधी पंधरा तासही (म्हणून सगळ्या कामाला मदतनीस आहेत ), परदेशी जाऊनही एवढंच काम असण्याची शक्यता आहे. मी आणि नवरा ठराविक वेळ काम करण्याचा प्रयत्न करू, पण त्याची खात्री देता येत नाही.

५. मी गाडी चालवत नाही.

मला खालील माहिती पाहिजे.

१. मुलाचं शिक्षण - शाळांमध्ये खूप होमवर्क देतात का? किंवा परीक्षेची तयारी , प्रोजेक्ट्स मध्ये आमचा किती वेळ जाईल?

२. Extracurricular - भारतात सगळे क्लास तसे जवळपास असतात. तिथे dance, music, swimming वगैरेचे क्लास किती लांब असतात? रोजच्या वेळा कशा मॅनेज होतात? की अशा क्लासना कोणी घालता नाही? शाळेत सगळं होतं?

३. सुट्यांमध्ये आई बाबा आणि मुलं कसं मॅनेज करतात? समर कॅम्प वगैरे असतात का?

४. पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा आहे, गाडी न चालवणं याचा किती तोटा होईल?

५. लंडनमध्ये 10-12 पौंड तासाला अशा वरकामाला मदत मिळायची. माझ्या माहितीत काही कुटुंबे आठवड्याची साफसफाई कधी भाज्या निवडणे, दाणे रवा भाजणे, वगैरे कामं करून घ्यायची. मुळात तिथे धूळ नसल्याने महिन्यात दोनदा घर स्वच्छ केले तरी चालायचे.
अशी मदत Manchesterला किंवा New York ला मिळते का? परवडते का? नवरा बायको दोघेही working असताना लंडनचा 40 पौंड महिन्याचा खर्च काही जास्त नाही.

६. वरच्या दोन्ही ठिकाणी वाढत्या वयाच्या मुलासाठी खाऊ मिळेल का? (केक वगैरे मैद्याचे पदार्थ सगळीकडे असतातच.) की लाडू चिवडा वगैरे आपणच करायचा याची तयारी ठेवावी?

७. कधी आजारपण, कधी जास्त काम अशा वेळी डबा मिळेल का? अगदी घरगुती नसेल / हॉटेलचं असेल तरी किती लवकर मिळू शकेल? जर खूप वेळा मागावावं लागलं तर परवडेल का?

८. UK च्या NHS बद्दल पूर्ण माहीती आहे, USA बद्दल काहीही नाही. इन्शुरन्स आणि अजून काही माहिती द्याल का?

९. याव्यतिरिक्त अजून काही?

मी गूगल करत आहेच. पण इथे अनुभवाचे बोल असतात, त्याचा जास्त फायदा होईल

मी आळशी नाही, काम करायची इच्छा नाही असं नाहीये. पण लंडनला मला किती आणि काय करावं लागेल याचा पूर्ण अंदाज आहे, तसा या दोन्ही ठिकाणांचा आला तर नीट informed decision घेता येईल. तसंच अंग मोडून घरकामाची सवय नाही, यामुळे टेन्शन आले आहे.

सगळ्यात शेवटी कुठेही न जाता इथले आयुष्य आहे तसेच सुरू ठेवण्याचा option आहेच.

Group content visibility: 
Use group defaults

1. उस गावात जाऊन खरच financially खूप फरक पडेल का याचा आढावा घ्या. आज काल भारतात कमवून भारतात खर्च करून राहिलेली शिल्ल्क आणि उस गावात कमावून उस गावात खर्च करून राहिलेली शिल्लक यात जास्त फरक नाहीय.
2. न्यू यॉर्क महागडे शहर आहे पण ज्या गोष्टी भारतात मिळत नाहीत त्या देखील तिकडे मिळतील. अगदी भारतीय कुकर, हेवी ड्यूटी मिक्सर, सगळे मसाले, भांडी कुंडी सर्व मिळेल. त्यामुळे भारतातून काही न घेता आलात तरी चालेल. फक्त इकडे थोडे महाग मिळेल इतकेच.
3. सर्व कामे शक्यतोवर स्वताची स्वत: करावी लागतील. आम्ही फक्त डीप क्लिनिन्ग साठी एक लेडी महिन्यातून एकदा बोलवायचो जी $75 घ्यायची. त्यामुळे तासाला माणसे बोलावणे किंवा मोलकरीण ठेवणे थोडे महागडे ठरू शकेल. माझ्या माहितीत कोणी मदतनीस ठेवलेले नाहीत. पण दोघानी काम केल तर भरभार काम होतील.
4. पण सगळी कामे यंत्राच्या साहायाने करावी लागत असल्यामुळे तस अंग मोडून काम कराव लागत नाही. जो काही वेळ जाईल तो जेवण बनवण्यात जाईल. भांडी धुण्यासाठी डिश वॉशर आणि कपडयसाठी मशीन आणि ड्रायर असतात. महिण्यातून दोन तीन वेळेला घर वॅक्यूम क्लीनर ने क्लीन केल आणि तीन महिण्यातून एकदा डीप क्लीन केल तरी चालेल.
5. न्यू यॉर्क मध्ये बर्‍यापैकी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्यामुळे गाडी चालवता न येण एखादे वेळेस चालून जाईल. तशी उबेर आणि इतर टॅक्सी सर्विस आहे पण गाडी चालवता येण हे अमेरिकेत एक मस्ट हॅव स्किल आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर आत्मसात करून घ्या.
6. बाहेरून हल्ली मागवता येत पण ते रोज मागवल तर महागड पडत.
7. कंपनी चा इन्सुरन्स कोणता आहे यावर तुमचा मेडिकल वर किती खर्च होईल ते अवलंबून आहे. पण इन जनरल, इकडे मेडिकल फेसिलिटी चांगल्या असल्या तरी आजारी पडणे थोडेसे त्रासदायक आहे. साध्या सर्दी तापाला अपायंटमेंट मिळणे कठीण जाते. तसेच इन्षुरेन्स मध्ये काय कवर आहे काय नाही त्यावर तुमच्या ट्रीटमेण्ट चा खर्च अवलंबून आहे. eg बर्‍याचशा इन्षुरेन्स मध्ये डेंटल कवर लिमीटेड असते आणि डेंटल बर्‍यापैकी महागडे आहे.
8. शिक्षण आणि क्लासेस बाबत इतर लोक सांगतील. त्याबाबत माझा तिकडचा अनुभव नाही.

<< मला आणि नवऱ्याला ऑफिसमध्ये खूप काम असतं, कधी पंधरा तासही (म्हणून सगळ्या कामाला मदतनीस आहेत ), परदेशी जाऊनही एवढंच काम असण्याची शक्यता आहे. >>

भारतात असो किंवा भारताबाहेर, माझ्या मते तर याच्यावर विचार करण्याची गरज आहे सर्वात आधी.

तुमचं ऑफिस नक्की NYC मधेच असणारे की न्यूयॉर्क मेट्रो एरिया? त्यानुसार तुमची राहण्याची जागा निश्चित होईल. प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या आहेत. प्रॉपर NYC मध्ये देसी लोक कमी राहतात. टेम्पोररी (H १B/ L १ व्हिसा) लोक जर्सी सिटी/ Hoboken सारख्या न्यू जर्सी मधील गावांमध्ये राहतात. NYC पेक्षा बरंच स्वस्त आहे तिथे राहणं. तिथून न्यूयॉर्कला जायला डायरेक्ट ट्रेन असते. पण तिथे शाळा फारशा चांगल्या नाहीत. आणि private स्कूल्स महाग आहेत. शाळा चांगली हवी असल्यास commute वाढेल आणि स्वतःची गाडी चालवता येणं एकाला तरी आवश्यक आहे. (घरापासून स्टेशन/बस स्टॉप पर्यंत जायला वगैरे)

१. शाळेत तिसरीपर्यंत काहीच विशेष होमवर्क नसतो. परीक्षा वगैरे नसते. टीचर वेळोवेळी assesment करते, पण त्यासाठी घरून काही तयारी करायची नसते. तिसरीपासून होमवर्क असतं, वार्षिक परीक्षा असते. पण त्याचा फार बाऊ करत नाहीत. तुम्हाला वाटल्यास kumon वगैरे लावू शकता. गरज नाहीये.
२. Extra Curricular: सगळे मुलं निदान १-२ तरी classes करतातच. स्विमिन्ग/एखादा स्पोर्ट/पियानो/आर्टस्. तुम्ही कुठे राहणार त्यावर classes पायी जाण्याच्या अंतरावर मिळतील कि नाही, हे सांगता येईल. suburb मध्ये राहणार असलात तर गाडी लागेलच. classes महाग असतात.१/२ तास स्विमिन्ग साधारण $३०/क्लास आहे माझ्या एरिया मध्ये. (न्यूयॉर्क हुन ३० मिनिट्स) न्यूयॉर्क मध्ये अजून महाग असतील.
३. समर कॅम्प असतात. बऱ्याच शाळांमध्ये आफ्टर care/ before care असत. शाळा ९ -३ असते. त्यामुळे मुलांना आफ्टर care मध्ये टाकावं लागतं जर दोघंही वर्किंग असलात तर. शाळा फ्री असते पण याची फी असते. ($३००-५००/मंथ). WFH असल्यास हा खर्च वाचवू शकता.
४. वर सांगितल्याप्रमाणे कुठे राहता त्यावर गाडी आवश्यक/ ऑपशनल आहे.
५. कामाला बायका मिळतात. जर्सी सिटी पूर्णपणे देसी एरिया आहे. तिथे nanny/कूक वगैरे गुज्जू aunties मिळतात. शिवाय भरपूर इंडियन रेस्टॉरंट्स आणि घरगुती टिफिन बनवून देणाऱ्या मिळतील. सध्या साधारण $१८-२५ घेतात तासाचे गुज्जू ऑंटी. cleaning ladies जास्त घेतात. त्या तासाने काम नाही करत. एक रक्कम सांगतात. १ बेडरूम अपार्टमेन्टचे $१०० तरी घेतात per cleaning.
८. इन्शुरन्स तुमच्या कंपनीवर डिपेन्डन्ट आहे. एकूण healthcare महाग आहे.

घरकाम करावं लागतंच. रोजचा स्वयंपाक, भांडी, laundry, बारीकसारीक आवारसावर यातून सुटका नाही. मुलांना शाळेत/क्लासमध्ये पोचवणे, आणणे, ग्रोसरी करणे, हे देखील कामच असते. देसी एरियात राहिल्यास यातली काही कामे aunties च्या कृपेने थोडी सुकर होतात.

US/UK ला फक्त नवीन experience, change यासाठी येणार आहात कि काही विशिष्ट financial goal आहे त्यावर इथे येणं/ न येणं/राहण्याचं ठिकाण इ तुम्हाला ठरवता येईल.

कार चालवणे शिकून घ्या. तुम्ही कार घेणार नसाल तरी अमेरिकेत कार चालवणे हे अत्यावश्यक स्किल आहे. (रेंटल कार वगैरे. साठी)

माबोवर या विषयावर बरेच धागे आहेत. शोधावे लागतील.

न्यू यॉर्क म्हणजे नक्की कोठे - १. न्यू यॉर्क शहरात - डाउनटाउन मधेच काम व तेथेच राहणार? - हे फार रेअर आहे २. शहरात काम व राहायला न्यू जर्सी मधे - हे जास्त कॉमन आहे ३. न्यू यॉर्क "राज्यात" - म्हणजे अल्बानी वगैरे टाउन्स असतात तेथे कंपन्यांची ऑफिसेस असतात. रोजचे कम्युट व इतर लॉजिस्टिक्स मधे खूप फरक पडेल यातील नक्की कोणते आहे त्यावर.

दुसरे म्हणजे दोघेही खूप वेळ कामात व घरी पाच वर्षांचा मुलगा - हे रूटिन इथे सस्टेनेबल नाही. अधूनमधून ठीक आहे.

नवरा बराच आळशी आहे, चटकन उठून कामे करण्याची सवय नाही. >>> तुम्ही हे मोकळेपणी लिहिलंय म्हणुन सांगत आहे. यात बदल व्हायला हवा, नाहीतर अवघड होईल. त्यांना कल्पना द्या की बरंच काम करावं लागेल.

१. कामे दोघांनी मिळून करावी लागतील. त्याची तयारी ठेवावीच लागेल.
२. फ्रेंड सर्कल(तुमचे तसेच मुलांचे) नव्याने बनवावे लागेल.
३. यजमान एल१ वर येणार असले तर तुम्हाला लगेच जॉब करता येणार नाही. इएडी येण्यास वेळ लागतो.
४. पब्लिक ट्रान्सपोर्टवर विसंबून राहता येणार नाही. कार घ्यावी तसेच शिकणे क्रमप्राप्त आहे.

हे अमेरकेबद्दल ठळक काही. सिझन्ड अमेरिकावासी अधिक बैजवार सांगू शकतील.

वरच्या दोन्ही ठिकाणी वाढत्या वयाच्या मुलासाठी खाऊ मिळेल का? (केक वगैरे मैद्याचे पदार्थ सगळीकडे असतातच.) की लाडू चिवडा वगैरे आपणच करायचा याची तयारी ठेवावी? > देसी दुकानात लाडू चिवड्याच्या असंख्य varieties मिळतात. त्यामुळे आपण तो करण्याची तितकीशी गरज पडत नाही. काही विशिष्ट पद्धतीचा/ चवीचा लाडू चिवडा हवा असेल तर मात्र स्वतः करायची तयारी ठेवावी.
मुलांसाठी खाऊ म्हणून लाडू चिवड्या शिवाय अनेक विदेशी पदार्थही मिळू शकतील. वेगवेगळी फळं, ओटस पासून बनलेल्या कुकीज, सुकामेवा, गाजर-सेलरी ह्या सारख्या भाज्या आणि वेगवेगळी डिप्स. असे अनेक खाऊ (मैदाविरहित) मिळतात आणि मुलं आवडीने खातात.

कधी आजारपण, कधी जास्त काम अशा वेळी डबा मिळेल का? अगदी घरगुती नसेल / हॉटेलचं असेल तरी किती लवकर मिळू शकेल? जर खूप वेळा मागावावं लागलं तर परवडेल का? >> Ready to eat/ frozen प्रकारातले अनेक पदार्थ मिळतात. ते आरोग्यासाठी फारसे चांगले नसले तरी, एखाद्या दिवशी फार काम असेल/स्वयंपाकाला वेळ नसेल, तर ते गरम करून पोट भरता येतं.
भारतात जसं चारी ठाव जेवण रोज मिळतं तसं अमेरिकेत कदाचित मिळणार नाही. त्यामुळे mindset थोडासा बदलून, सोमवार ते गुरवार one dish meal खायची तयारी ठेवावी आणि weekend ला साग्रसंगीत स्वयंपाक करावा.

८. UK च्या NHS बद्दल पूर्ण माहीती आहे, USA बद्दल काहीही नाही. इन्शुरन्स आणि अजून काही माहिती द्याल का? >> तुम्ही कंपनी मार्फत येणार असाल त्या कंपनी इन्शुरन्स ऑफर करत असतील असे धरून चालतो. ह्याबद्दल माहिती काढा. तो ऑप्शन नसेल तर मार्केट मधून विकत घेऊ शकता. किरकोळ आजारांसाठी क्लिनिक मधे जाऊन खिशातले पैसे भरणे हा पर्याय असतोच (इंशुरन्स असो वा नसो)

गाडी न चालवणं याचा किती तोटा होईल? >> बोक्या ने सांगितले आहे त्याप्रमाणॅ इथे येऊन गाडी न चालवणे हे स्वतःवर विनाकारण घातलेले बंधन आहे. काही भागांमधे पब्लिक ट्रान्स्पोर्ट अर अवलंबून राहू शकता पण बहुतांशी जागांवर ड्राईव्ह करणे भाग आहे. वीकेंड ला कुठे फिरणार असाल वगैरे तर सगळॅच एकदम ठप्प होऊन जाउ शकते स्वतःला गाडी चालवता येत नसेल तर. (ह्यात तुम्ही दर वेळी उबर वगैरे करणार नाही असे गृहितक आहे)

नवरा आळशी आहे, तुम्ही गाडी चालवत नाही, सध्या तुमच्याकडे ३+ माणसं घरकामाला आहेत, नवर्‍याला १५ तास काम असतं, तुम्हीपण दिवसभर कामात असणार, तुम्ही चाळीशीत आहात आणि तुम्हाला ५ वर्षांचा मुलगा आहे .......... तितकंच निकडीचं कारण नसलं तर इकडे (अमेरिकेत) येऊ नका. अगदी न्यू-जर्सीत सुद्धा नाही. येऊन सेटल होणं, घर / शाळा नीट जमवणं, दोन-चार खरी मित्रमंडळी जोडणं, घरकामं करणं हे फार फार दमछाक करणारं असणारे पहीली तीन-पाच वर्ष. नुसतंच "अमेरिकेत यायची संधी मिळत्येय" असं असलं तर त्या संधीची फार मोठी किंमत आहे हे लक्षात घेऊन निर्णय घ्या.

सभासद +१
१५ तास काम करून मुलाला क्लासेस ला कोण आणि कसं घेऊन जाणार? २४ तास Nanny ठेवलीत तर.... इतकं करण्यापेक्षा ठेविले अनंते.. उत्तम.

मुळात अमेरिकेत येऊन कुणी १५ तास दररोज काम करतं का?>> मलाही हाच प्रश्न पडला होता. पण काही देशी कंपन्यांमधे अश्या पद्धतीने काम करताना लोकांना बघितलं आहे. अमेरिकेतसुद्धा. त्यावर उपाय म्हणजे केवळ अमेरिकेत शिरकाव मिळवण्यासाठी देशी कंपनीचा उपयोग करावा आणि तिथे जाऊन थोडं बस्तान बसलं की एखादी चांगली अमेरिकन कंपनी शोधावी. तिथे दररोज १५ तास काम करावं लागणार नाही. पण अश्या तर्‍हेची दुसरी नोकरी मिळवायची तर तुम्ही कोणत्या व्हिसावर अमेरिकेत येताय आणि तुमचं job profile काय आहे, हे महत्वाचे मुद्दे आहेत.

15 तास काम भारतातही सर्व घरकामात कितीही चांगली डोमेस्टिक मदत मिळाली तरी करायला लागू नये.ही जीवनपद्धती 3-4 वर्षं सतत चालू राहिल्यास हार्ट अटॅक नक्की.
(सॉरी राहवलं नाही. या धाग्याला माझी माहिती म्हणून मदत काही नाही.)

१५ तास काम तसही भारतात पण कोणी रोज करत नाही. थोडक्यात लेखिकेला जास्त काम असते असा अर्थ घ्या. १५ तास शब्दशः घेऊ नका Happy

परदेशात शहराप्रमाणे मेड्स दर असतात, त्याचप्रमाणे घराची साईज व काम कुठल्या प्रकाराचे त्यावर अवलंबून असते.
देसी कूक मिळेलच असे नाही.
गाडी नसेल चालवता येत असेल तर पब्लिक ट्रान्स्पॉर्ट जिथे आहे तिथे रहावे लागेल.
भरपूर गोष्टी स्वताच कराव्या लागतात. एखादा जर खुपच आळशी असेल तर दुसर्‍याला सर्वच कामाचे ( घर, मुलगा आणि ऑफ्फीस ) प्रेशर वाढेल , मग वाद मग डिवोर्से ( हो पाहिलेत झालेले) वगैरे.
आळशी पार्ट्नर पहिल्यां बदलाव करायला लागेल.
मानसिक, शारीरीक व आर्थिक बदलासाठी तयारी लागेल.
सगळेच निगेटीव वाटेल वाचून पण ४० नंतर हा बदल स्विकारायचा आहे का? कारण भारतात ज्या सोयींची सोय असते ती इथे पटकनच होइल असे नसतेच.
त्यामुळे नक्की कसला फायदा होणार आहे व करायचा आहे हा विचार जरावा

नवरा बराच आळशी आहे, चटकन उठून कामे करण्याची सवय नाही. >>> तुम्ही हे मोकळेपणी लिहिलंय म्हणुन सांगत आहे. यात बदल व्हायला हवा, नाहीतर अवघड होईल. त्यांना कल्पना द्या की बरंच काम करावं लागेल.<<<<<<
+१

नवरा बराच आळशी आहे, चटकन उठून कामे करण्याची सवय नाही. >>> तुम्ही हे मोकळेपणी लिहिलंय म्हणुन सांगत आहे. यात बदल व्हायला हवा, नाहीतर अवघड होईल. त्यांना कल्पना द्या की बरंच काम करावं लागेल.<<<<<<
+१

बरच काही कमवायची तसेच गमवायची तयारी ठेवा.
कार शिकून घ्या व जर जमले नाही (उदा - भीती वाटणे) तर कम्युट करायला सोपे ठिकाण निवडा.
१५ तास काम फार आहे हो. त्यावर खरच काहीतरी उपाय शोधा असा कळकळीचा सल्ला देइन.
आठवड्याला, महीन्याला थोडे पैसे खर्च करुन 'मेड' कडून घराची स्वच्छता करुन घेता येइल. आम्ही कधी केली नाही कारण नवर्‍याच्या मदतीने, मला ते मॅनेजेबल वाटले.
आजारपणात डबा मिळेलही पण कॅन्ड फुड, सॅलडस, कॅन्ड सूप, नुडल्स, फळे, ब्रेड, अंडी यावर निभावता यावे.
कंपनी जर इन्श्युरन्स देत नसेल तर विकत घेता यावा.

तुम्हाला यु के बद्दल सगळे माहिती आहेच. तरीही माझे २ पेन्स.
५ वर्षाचे मुल आणि दोघांचेही खूप जास्त काम हे यु के मध्ये निभण्यासारखे नाही, खास करुन जर नवर्‍याची मदत नसेल तर. पहिली काही वर्षे तुम्हाला काम कमी करावे लागू शकते.
मुलाच्या शाळेची प्रोजेक्ट्स नसतात. अभ्यासाव्यतिरिक्त अ‍ॅक्टीविटीजचे प्रमाण खूप जास्त असते. खुद्द लंडनमध्ये नसाल तर गाडी येणे चांगले.
काम करणार्‍या बायकांचे दर आत १५ ते २० पाउंड तासाला झालेले आहेत.
लंडनमध्ये रहात असाल तर एनएचएस वर लोड वाढल्यामुळे उपचार मिळणे अवघड झाले आहे. इंशुरंस असणे चांगले.