आपल्या वर्गात एखादी तरी कॅरी असतेच- सर्वांपेक्षा वेगळी, थोडी गोंधळलेली, अवघडलेली.तिच्या चालण्यावरून, कपड्यांवरून आपण तिला नावं पाडलेली असतात.कधी तिच्या मागे, कधी तिच्या समोर ही नावं पुढे येतात.एकत्र असण्याच्या बळाने वर्गातला अगदी शेळपटातला शेळपट मुलगा पण तिची टर उडवायचे नवे नवे उपाय शोधतो, अंमलात आणतो.एक समान धागा, एक समान शत्रू वापरून तो किंवा ती आपली इतर मुलांमधली प्रतिमा उंचावू पाहतात.कॅरीबरोबर सध्या जे वर्गात केलं जातंय ते आपल्या सोबत होऊ नये, कॅरीवरचं टवाळखोरांचं लक्ष आपल्यावर वळू नये म्हणून ते टवाळीला पूर्ण सहकार्य करतात.एखादा किंवा एखादीच असते- जिला किंवा ज्याला मनातून ही टवाळी अजिबात पटत नसते.पण आपल्या मित्र मैत्रिणींना ते चांगलं ओळखतात.विरोध करायला गेलं तर सगळं आपल्यावर उलटेल हे ओळखून ते गप्प राहतात.शक्य झाल्यास या टवाळीत शांत निष्क्रिय सहभाग पण नको म्हणून काही वेगळा उद्योग शोधून काढतात.सीन पासून लांब राहून प्रश्न आपल्या पुरता सोडवतात.
स्टीव्हन किंग च्या वर्गातही अश्या दोन कॅरी होत्या.वर्गातली टवाळी, शारीरिक खोड्या त्या नेहमी सहन करायच्या.त्यांच्या घरचे त्यांना समजू शकले नाहीत.किंग त्यावेळी 14 वर्षांचा असेल.मनातून पटत नसलं तरी तोही झुंड मानसिकतेचा होता.विरोध करण्याची हिंमत नाही आणि विरोध करणं महत्वाचं आहे हे समजण्याचं वयही नाही.यातल्या एका कॅरी ने आत्महत्या केली.दुसरी तरुणपणीच एका आजाराने मेली.
किंग च्या डोक्यात सतत फेर घालणाऱ्या या दोघी आणि 'या दोघींना त्यांच्या झालेला छळाचा सूड घेता आला असता तर' या कल्पनेचा विस्तार आणि परिपाक म्हणजे त्याची प्रसिद्ध भय कादंबरी-कॅरी. कॅरी च्या आवृत्ती आजही निघतात.कॅरी वर आधारित तीन पिक्चर येऊन गेले.प्रत्येक चित्रपटातल्या कॅरी ने वेगवेगळ्या प्रकारे ही सुन्न करणारी व्यक्तिरेखा मांडली.
एका टेलीकायनेटिक शक्ती असलेल्या, घरातल्या अत्यंत वेडपट टोकाच्या धार्मिक वातावरणामुळे जुनाट फॅशन चे कपडे घालणाऱ्या, अजागळ राहणाऱ्या आणि बाहेर कायम चेष्टेचा विषय ठरलेल्या, आणि शेवटी हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर एक भयंकर सूड घेणाऱ्या मुलीची ही कथा.
कॅरीला सुरुवातीपासून घरी आणि शाळेत जी वागणूक मिळते ती पाहता तिच्याबद्दल घृणा वाटण्याऐवजी सहानुभूतीच वाटते.अश्या अनेक शाळेच्या आयुष्यात बुलीइंग सहन केलेल्या आणि नंतर स्वतःला बदलून थोड्याफार आयुष्यात सुखी झालेल्या अनेक कॅरी या पुस्तकाचा शेवट वाचून मनात थोड्या सुखावल्याच असतील.
1976 साली कॅरी वर बनलेल्या पहिल्या चित्रपटातला प्रॉम सीन बघण्यासारखा आहे.कोणतेही भयप्रद प्रकार न करता फक्त कोऱ्या नजरेने भयंकर अभिनय कसा करता येतो याचं उत्तम उदाहरण.या सीन मध्ये जास्त म्युझिक नाही.एक विशिष्ठ लाल इन्फ्रारेड सारखा प्रकाश आणि इलेक्टरीकल वायरींचा नॉईज असावा इतकंच अगदी कमी आवाजातलं म्युझिक यावर हा सीन अंगावर शहारे आणून जातो.
कॅरी ची कथा सांगत नाही.किंडल वर विकत घेऊन प्रत्यक्षच वाचा.
कॅरी- स्टीव्हन किंग-
https://www.amazon.in/Carrie-Stephen-King-ebook/dp/B0037TPMOU/ref=aw_rtp...
हे पुस्तक (कधीतरी) वाचणार
हे पुस्तक (कधीतरी) वाचणार असल्याने धागा उघडावा की नको विचार करत होते.
शेवटी उघडला आणि पूर्ण वाचलाच.
छोटसंच, चांगलं, उत्सुकता वाढेल असं लिहलं आहे. शिर्षकात (स्पॉयलर नाहीत) असं लिहलं तर बरं पडेल वाटतं.
छान लिहिलंय. भय-कादंबरी हा
छान लिहिलंय. भय-कादंबरी हा माझा आवडता वाचनप्रकार नाही, पण हे आवडलं.
छान परिच य. मी हे वाचले आहे .
छान परिच य. मी हे वाचले आहे . कॅरी बद्दल साहानुभुती आहेच. मीन गर्ल्स ना चांगला धडा शिकवावा असे अश्या कॅरीना नेहमी वाट्त असते. सिनेमा पण बघितला आहे. हा भय पेक्षा करूण रस प्रधानच जासत करून वाटतो.
छान. पुस्तक परिचय आवडला.
छान. पुस्तक परिचय आवडला.
चांगला लिहिला आहे लेख..
चांगला लिहिला आहे लेख..
पुस्तक परिचय आवडला.
पुस्तक परिचय आवडला.