अंमली - (पुनर्लेखन) भाग ६!

Submitted by अज्ञातवासी on 17 June, 2023 - 08:33

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)

याधीचा भाग https://www.maayboli.com/node/83570

"ज्युनियर..." कित्येक वर्षांनी त्याला एक कॉल आला होता.
"येस सिनियर. तो आश्चर्याने उडालाच."
"पटकन द्वारकेला ये."
"अरे पण."
"ज्यूनियर मी जे सांगतो ते कर, आपल्याकडे अजिबात वेळ नाही, आणि मोठी गाडी घेऊन ये."
"सीनियर नेमकं झालं काय?"
"प्लीज प्लीज मी तुझ्या पाया पडतोय, काही विचारू नकोस लगेच द्वारकेला ये."
"द्वारकेला नेमकं कुठे?"
"पिंपळाच्या झाडाखाली."
"ठीक आहे पोहोचतो."
त्याची द्विधा मनस्थिती झाली होती, पण शेवटी जुन्या आठवणीनी व चांगुलपणाने त्याच्यावर मात केली...
तो गाडी काढून द्वारकेकडे निघाला.
रात्री एक वाजता, पाच मिनिटात तो द्वारकेला पोहोचला.
पिंपळाच्या झाडाखालीच तो उभा होता.
केस पिंजरलेले, डोळे तारवटलेले...
"डीक्की उघड." त्याने घोगऱ्या आवाजात सांगितले.
"अरे, झालंय काय तुला?" त्याने विचारले.
"डिक्की उघड ज्युनियर."
"त्याने डीक्की उघडली."
"हा ड्रम उचलू लाग मला." सिनियर म्हणाला.
त्याने हात लावला.
...प्रचंड जड असलेला ड्रम त्याने मोठ्या मुश्किलीने डीक्कीमध्ये ठेवला.
"ज्युनियर, यानंतर आपण कधीही भेटणार नाहीत. असं समज मी मेलो आहे. खरच मी मेलो आहे.
मी जास्त सांगणार नाही, असं समज, मला ज्यांनी हा ड्रम दिला, ती खूप पाशवी शक्ती आहे. खरच. ती दादासाहेब शेलाराना सुद्धा संपवेल. सगळं नाशिक संपवेल ती."
"सिनियर काय बोलतोय?"
"वेडा झालोय मी, ठार वेडा. ज्युनियर, जा आता. आणि या ड्रम ची नीट विल्हेवाट लाव. ते केव्हाही इथे पोहोचतील, बघ बघ, त्या गाड्या आल्या, जा."
"अरे कुठे गाड्या, काय बोलतोय?"
"ज्युनियर जा, बघ त्या गाड्या आल्या. बघ ती पाशवी शक्ती आली. बघ... जा ज्युनियर..."
...त्याची भीतीने गाळण उडाली, आणि तो गाडी स्टार्ट करून निघून गेला...
*****
"राहुल, वजन वाढव."
"सर बस इतकंच..."
"नाही राहुल, वाढव. पेन होत नाहीये. स्ट्रेस येत नाहीये."
"सर..."
राहुलने अजून एक प्लेट टाकली...
...आणि त्याने बार छातीच्या वर घेतला...
वीस रीपिटेशन मारून त्याने बार वर ठेवला.
"थोडा वेळ रेस्ट." राहुल म्हणाला.
तो तिथंच बसला.
राहुल बाजूला गेला.
"महिनाभरात इतका फरक? एका बाईने त्याच्याकडे बघत राहुलला विचारले."
"वेड आहे मॅडम. वेड. हे वेड असं सहजासहजी लागत नसत... काहीतरी खूप मोठं घडाव लागतं. टारगेट घेऊन चालला आहे तो, आणि जर त्याला पाहिजे ते त्याने अचीव केलं ना...
... तर यू विल सी मोस्ट हँडसम मॅन इन नाशिक..."
ती बाई हसली.
"राहुल, नेक्स्ट सेट..."
येतो सर. तो म्हणाला, आणि त्याच्याकडे गेला.
******
मूळ नाशिकपासून जरा दूरवर बोरगड आहे. तिथेच आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मागे मोठा डोंगर आहे.
तिथून एक नागमोडी रस्ता वर जातो.
आजकाल तिथे काही फॅक्टरी तुम्हाला दिसतील. बरेच कंटेनर, काही कच्च्या पक्क्या इमारती असं एकंदर स्वरूप.
आता कंटेनर एकावर एक रचून ठेवले, तर कितीही मोठं स्ट्रक्चर निर्माण होऊ शकतं.
... आणि तसंच एक स्ट्रक्चर आता निर्माण झालं होतं...
चार-पाच कंटेनर मिळून, आणि त्या कंटेनरच्या खाली तळघर, आणि त्या तळघरात भलीमोठी लॅब.
एक माणूस ओव्हरकोट घालून, मास्क लावून काम करत होता. आजूबाजूला तीन-चार लोक त्याची मदत करत होते. कंटेनरच्या वर सक्त पहारा होता. लोकांची वर्दळ होती.
एक स्कॉर्पिओ तिथे उभी येऊन उभी राहिली. त्यातून विलास शिंदे खाली उतरला.
विलास शिंदेला पाहताच सगळे सावध झाले...
"...भैरव" त्याने हाक मारली.
"सगळ्यांना एकत्र कर मीटिंग घ्यायची आहे, इथेच." एवढं बोलून तो कशासाठीही तिथे थांबला नाही, आणि सरळ तळघरात गेला.
"तुझं काम चालू आहे का नीट?" त्याने मास्क घातलेल्या माणसाला प्रश्न केला.
"तुमचं काम नीट चालू आहे का सर? असं विचारा." मास्कवाल्याने प्रश्न रिफ्रेम केला.
विलास शिंदेने कपाळाला हात मारला.
"तुमचं काम नीट चालू आहे का सर?" सर या शब्दावर जोर देत तो म्हणाला.
"तीन चार दिवसात दहा कोटींचा माल रेडी होईल. तुमची यंत्रणा कामाला लावा. मीटिंग बोलावली?"
"हो जमले असतील सगळे."
त्याने कोट काढून बाजूला ठेवला. मास्क सुद्धा बाजूला ठेवला...
चला वर जाऊयात...
आणि तो वर आला...
लोक जमलेले होते. आज कित्येक दिवसांनी तो वर आला होता. सगळ्यांसमोर.
"नमस्कार, सगळे जमले?" त्याने लोकांना प्रश्न केला.
खरं बघता त्याची लोकांना ओळख नव्हती, पण हा माणूस एक वेगळच रसायन आहे हे त्यांना माहिती होतं.
"माझं नाव, खरं बघता तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण माझ्या नावापेक्षा माझं काम महत्त्वाचं आहे. पण जर तुम्हाला नावाची गरज असेलच, तर तुम्ही मला सर म्हणू शकता."
जमलेले लोक आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिले.
"या विश्वाचा निर्माता कोण आहे? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने त्याचं काम केलंय. तुमच्यासाठी एवढी छान पृथ्वी निर्माण केली. आणि तुम्ही काय केलं? सांगा ना तुम्ही काय केलं? एक साधं घर बांधलं, दोन पोरं जन्माला घातले, तुमचं कर्तव्य संपलं.
ब्रह्मदेवाने माणूस बनवला तर काहीतरी सृजनशील नवनिर्माण करण्यासाठी. प्रत्येक माणसाकडे एक नवीन साम्राज्य निर्माण करण्याची ताकद असते, ती ताकद आज तुमच्यात नाही, पण जर तुम्ही सोबत असला तर एक नवीन साम्राज्य निर्माण होईल. जे साम्राज्य पाब्लो इस्कोबारने कोलंबियात निर्माण केलं होतं, त्याहीपेक्षा मोठं साम्राज्य या नाशकात मी निर्माण करेन.
इट्स न्यू वर्ल्ड, आणि यानंतर मालाचा प्रत्येक कण, हा विकला जाण्यासाठीच बनलेला असेल. पोलीस विकत घेऊ, प्रशासन विकत घेऊ, सगळं जग विकत घेऊ, पण माझं साम्राज्य सोन्याची लंका बनवल्याशिवाय मला राहवणार नाही.
आज पासून तुमचं काम फक्त माल विकणं असेल. तुम्ही ग्राम मध्ये नाहीतर किलोग्राम मध्ये विकला तरी चालेल, तितका पुरवठा होत राहील. जितका विकाल तितका पैसा तुम्हाला मिळेल. चला कामाला लागा.
आणि हो मी कमी वयाचा दिसत असलो, किंवा माझा अवतार असा कार्टून सारखा दिसत असला, किंवा तुम्हाला असा जाडजूड लीडर पहायची सवय नसेल, तर थोडे दिवस सवय करून घ्या. काही दिवसांनी तुम्हीच मला ओळखणार नाही. पण जर कोणी माझा यावरून अपमान करायचा प्रयत्न केला...
... तर त्याला मारून टाकण्याची जबाबदारी माझी..." तो हसत म्हटला.
विलास शिंदे वेड्यासारखा त्याच्याकडे बघत राहिला.
"शिंदे साहेब चला... काम करायचं आहे आपल्याला."
"येस सर." शिंदे अनाहूतपणे म्हणाला.
दोघेही पुन्हा आत गेले.
शिंदे थोडा वेळ गप्प बसला.
"शिंदे साहेब काय विचार करत आहेत, मला कळू शकेल?"
"काही नाही सर."
"बोला शिंदे साहेब."
"तुम्ही या नाशिकला लंका बनवायची स्वप्न बघताय. सोन्याची लंका. तुम्ही स्वतःला रावण समजताय."
"मग?"
"पण हे नाशिक आधीच कुणाचं तरी साम्राज्य आहे. आणि तुम्ही महादेवाला भजतात, पण लोक त्याला महादेवाचा अवतार मानतात."
"कोण? त्याने उत्सुकतेने विचारले."
"नाशिकचा सगळ्यात श्रीमंत माणूस, मनाने, पैशाने, माणसांनी... सरकार बनवत नाही एवढ्या बंदुका तो बनवतो. त्याची स्वतःची वाईनरी आहे, त्याच्या स्वतःच्या कंपन्या किती, हे त्यालाच माहिती नाही. नाशिकच्या प्रत्येक कंपनीत लेबर त्याचेच आहेत, नाशिकची प्रत्येक रिक्षा टॅक्सी युनियन त्याचीच आहे, नाशिकचे बिल्डर एक वीट रचताना त्याला आधी विचारतात, पोलीस स्वतःच बळ वापरण्याच्या आधी त्याच्या माणसांना बोलवून घेतात. नाशिक मधून कोण आमदार आणि कोण खासदार निवडून येईल हे तोच ठरवतो...
... हे साम्राज्य उभारण्याच्या तू गोष्टी करत आहेस, पण नाशिक हे आधीच कुणाचं तरी साम्राज्य आहे. आणि जर तुला ते साम्राज्य हवे असेल तर महायुद्ध होईल, आणि ते युद्ध करण्यासाठी तुला खरोखरचाच रावण बनावं लागेल...
... आणि एक गोष्ट लक्षात ठेव आपले उद्योग जर त्या माणसाला कळले ना, तर त्या क्षणी तो ही फॅक्टरी, तू, मी, ही सगळी माणसे यांना चिरडून टाकेल.
... कोण आहे तो," तो वैतागला
"... दादासाहेब शेलार, नाशिकचा वेताळ..."
तो हसला...
"... मग असं समजा की महायुद्ध नक्कीच होईल... तयारी करावी लागेल."
त्याने हाताची घडी घातली, व काळ्याभोर आकाशाकडे तो बघत राहिला.
*****
साडेपाचचा अलार्म वाजला.
ती पटकन उठली, व तिने तयारी केली.
लगेचच ती जॉगिंग ट्रॅकवर पोहोचली.
तिने चालायला सुरुवात केली. दररोज ती कमीत कमी पंधरा हजार पावले चालत होती.
तिने वेग वाढवला. डोक्यात अनेक विचार होते.
आज ती चक्क वीस हजार पावले चालून ती घरी आली.
घरी पोहोचताच ती तिच्या रूममध्ये गेली.
कुणीतरी मागून तिला मिठी मारली...
"अरे,डायरेक्ट अटॅक..." ती हसली.
...तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
"बघ, उठला तो. राघव. आले रे." ती त्याच्याकडे गेली.
...ती होती प्राजक्ता...
...त्याने ज्या मुलीचं स्वप्न बघितलं, ज्या मुलीला एक क्षण बघूनच त्याने महादेवाकडे फक्त तिला मागितलं...
...ती होती प्राजक्ता...
...आणि ती तिच्या संसारात रममाण झालेली होती.
ही एक प्रेमकथा नाशिकचं भविष्य बदलणार होती.
...ही एक प्रेमकथा, जगावेगळी ठरणार होती...
...तो हळूहळू रावण बनत चालला होता.
...ती त्याला पुन्हा राम बनवणार होती...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वा.. नवीन भाग आला..
आता पूर्ण वाचते.

<<ती दादासाहेब शेलाराना सुद्धा संपवेन. सगळं नाशिक संपवेन ती>>
संपवेल असे हवे इथे.

वाचतेय कथा...
कथा पुढेही रंगत जाईल असं वाटतंय..
कुठेही न थांबता, अडखळता कथा पूर्ण कराल अशी आशा..
पुढील लेखनास खूप शुभेच्छा...!

@रुपाली - खूप खूप धन्यवाद!!
हो, ही कथा पूर्ण करायचीच आहे, आफ्टर ऑल ही कथा हृदयाच्या खूप जवळ आहे.. Happy