राजकारणस्थिती भयप्रद...

Submitted by ASHOK BHEKE on 8 June, 2023 - 11:26

राजकारणस्थिती भयप्रद...
आजचे राजकारण पाहिले तर जे मागील निवडणुकीत निवडून आले होते. त्यांना पुन्हा निवडून येईल की नाही, याची भीती वाटते. नुकतेच शिरूरचे खासदार श्री अमोल कोल्हे यांना पक्षाने तिकीट दिले असताना देखील पून्हा येईन का ? याची भीती माध्यमांवर बोलून दाखविली. जे नव्याने राजकरणात आपले नशीब आजमावू पाहत होते त्यांना देखील भीतीने ग्रासले. निवडणूक म्हणजे आता पैश्याचा खेळ झाला आहे. लाखो कोट्यावधी रूपयांचा चुराडा केल्याशिवाय नशीब साथ देईल की नाही. ही भीती आहेच. महापालिका निवडणुका न झाल्यामुळे अनेकजण आज संभ्रमात पडले आहेत. कोठेतरी चिरीमिरी मिळत होती. ती देखील मिळायची बंद झाली आहे. आज लोकप्रतिनिधी साधे भरलेले गटार साफ करून घेतल्याबद्दल माध्यमांवर फोटो टाकीत आहेत. धूम्रफवारणी करून घेताना अनेक लोकप्रतिनिधी आपला फोटो प्रकाशित करताना आपल्या मनातील भीतीचे प्रदर्शन अप्रत्यक्ष करताना दिसत आहे. रस्त्यावर खड्डे बुजविताना लोकप्रतिनिधी आपल्या चार सवंगड्यासोबत, झकास फोटो बघायला मिळतात. मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत. सोबत आता लवकरच विधानसभा, लोकसभा निवडणुका लागतील. कधी न बघितलेले लोकप्रतिनिधी तळागाळातल्या जनतेला भेटत आहेत. तसं पाहिले तर आजच्या स्थितीने निवडणूक लढविणारी मंडळी अगदी रस्त्यावर आली आहेत. कारण त्यांच्या मनात भीतीचे काहूर माजले आहे.
समाज आहे तेथे राजकारण असतेच. राजकारण नाही असा समाज मिळणार नाही. एकमेकांवर प्रभुत्व आणि वर्चस्व गाजविण्याचे ठिकाण म्हणजे सत्तेचे राजकारण. सत्तेसाठी वाटेल ते करणारी मंडळी नैतिकता विसरून एकमेकांवर तुटून पडताना दिसताहेत. पण हेच लोकप्रतिनिधी अन्य पक्षाच्या नेत्यांशी सूत जुळवून असतात. पण कोणता कार्यकर्ता, समाज जर साधा त्यांच्याशी बोलला अथवा त्यांच्या घरगुती कार्यक्रमाला गेला तर संकुचित वृत्तीचे लोकप्रतिनिधी अबोला धरतील किंवा चार शब्द सुनावातील देखील... राजकारणातील स्पर्धा दोन प्रकारे असू शकतात. सामाजिक हित कशात आहे आणि ते साध्य करण्यासाठी कोणत्या योजना संकल्पना अमलात आणल्या तर लोकहित साध्य होईल याचा विचार करणारे आणि दूसरा प्रकार म्हणजे समाजाला वंचित समजून त्यांच्या जोरावर स्वार्थ साधणारे, मी भला आणि माझा कुटुंबकाफिला... या राजकीय पूलावर पहिल्या प्रकारात मोडणारे दुर्मिळ झाले आहेत तर दुसर्‍या प्रकाराचा राजकिय पूलावर वर्दळ वाढली आहे. राजकारण नावाचा हा विषय अगदी घरातून सुरू होतो. बाप एका पक्षात तर मुलगा दुसर्‍या पक्षात..
आज राजकारणाला नवी दिशा देणारा कोणीही नाही. मध्यंतरी शेषन नावाचे गृहस्थ निवडणूक आयुक्त म्हणून आले आणि कमालीचे निवडणुकीचे नियम धडे शिकवून गेले. भलेभले नरमले. आज ती स्थिती नाही. त्यामुळे राजकीय दुनियेत नव्याने संधि मिळेल न मिळेल त्यापेक्षा त्याकडे जाणे नाही, असा तरुणवर्ग दुसरी पायवाट धरीत आहे. आडदंड कोळ्याने नदीत जाळे टाकावे आणि माश्यांना घाबरविण्यासाठी लांब लाठीने पाण्यावर मारणे. त्यामुळे पाणी गढूळ होऊन मासे जाळ्यात येतात. कोळ्याला ते पिण्याचे पाणी आहे, हे समाजवून सांगणे देखील भयप्रद झाले आहे.
आजचा राजकारणी महागाई विषयवार बोलत नाही. केवळ एकमेकांची उणिधुनी काढण्यात व्यस्त आहे. महागाईच्या वणव्यात समाज होरपळत आहेत. घरगुती गॅसच्या किमंती वाढल्या आहेत.शिक्षणाच्या दुनियेत फी वाढीचे प्रमाण म्हणजे कोणी कुणाला विचारूच नये. अशी अवस्था झाली आहे. बेरोजगारी वर भाष्य करणारे शोधून सापडत नाहीत. कोरड्या तेलाच्या चपाती खाणारा समाज बोलू शकत नाहीत. परंतु या राजकीय दुनियेत वावरणारी प्रतिनिधित्व करणारी मंडळी आपल्या तोंडात मूग गिळून गप्प बसली आहेत. मानवी मन हे विचित्र असतं. आजवर आपण काय अनुभवलं किंवा काय मिळवलं यांचा विसर पडणारा समाज सर्वत्र दिसून येतो. टपरीवर चहा पिताना अंदाज घेतला तरी काळ्याकुट्ट अंधारात चालताना पाऊले जड होतात. त्याप्रमाणे लोकमनातील स्थिती दिसेल.
निवडणूक आली की ती घरोघर हात जोडून फिरणारी आकृती समाजाला ठाऊक आहे. आता लवकरच दर्शन द्यायला येतील, पण सांगतील मात्र मतदारांच्या दर्शनाला आलो आहोत. त्यांच्या सोबत कर्त्यव्यनिष्ठ कार्यकर्ते असतील. पेच डावपेच, शाब्दिक हल्ले, प्रतिहल्ले, कावे, गनिमी कावे यांचे यथोचित दर्शन होईल. याचा समाजावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परीणाम जाणवेल, प्रभाव पडेल तो सत्तेच्या जवळ पोहचेल. निवडणूक अंदाज काहीही असो समाजाच्या मनावर प्रभाव करणारा, दबाव निर्माण करणारा आणि पैश्याची उधळण करणारा लोकप्रतिनिधी निवडून येईल... अशी आजची राजकीय स्थिती.

अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमोल कोल्हे निवडून गेल्यापासून मतदार संघात फिरकलेच नाहीत. कसे निवडून येणार परत. त्याविरुद्ध आढळराव पडून सुध्धा मतदार संघ पिंजून काढत आहे. लागेल तिथे निधी आणून देत आहेत.