शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते. अशाच एका तुलनेने अपरिचित हॉर्मोनचा परिचय या लेखात करून देत आहे. त्याचे नाव आहे मेलाटोनिन (melatonin).
मेलाटोनिनचे उत्पादन
आपल्या मेंदूत ‘पिनिअल’ नावाची एक ग्रंथी असते. (चित्र पाहा).
डोळ्यातील दृष्टीपटलातून निघालेले काही विशिष्ट चेतातंतू या ग्रंथीत पोचतात. हे तंतू उद्दीपित झाले की त्याच्या प्रतिसादातून ही ग्रंथी एका अमिनो आम्लापासून मेलाटोनिन तयार करते. ही सर्व प्रक्रिया वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. दिवसाचा उजेड संपून जसा अंधार पडू लागतो तसे मेलाटोनिनचे उत्पादन वाढू लागते. मग रात्री ते अत्युच्च पातळी गाठते. जसा पुढचा दिवस उगवतो तसे त्या ग्रंथीचे उद्दीपन थांबते आणि मेलाटोनिनचा नाश होतो. अशी ही या हॉर्मोनच्या स्त्रवण्याची तालबद्धता (rhythm) आहे. मात्र माणसाचे वय आणि सवयी यांनुसार या तालबद्धतेत काही बदल होत असतात ते आता पाहू.
मेलाटोनिन आणि झोपेच्या सवयी
“लवकर निजे, लवकर उठे, तयास उत्तम आरोग्य लाभे”, हे आहे पूर्वापार चालत आलेले सुवचन. एकेकाळच्या कृषीप्रधान संस्कृतीत ते पाळले जात होते. पुढे शहरीकरण, औद्योगिकीकरण वगैरे बदलांमुळे आपली जीवनशैली अर्थातच बदलली. जसा कृत्रिम प्रकाश मुबलक उपलब्ध होऊ लागला, तसे आपल्या रात्री उशीरापर्यंत जागण्याचे प्रमाण वाढत गेले. एकंदरीत समाजावर नजर टाकता आपल्याला लोकांच्या झोपण्याच्या वेळेच्या भिन्न सवयी दिसतात.
• जे लोक पहाटे उठतात, त्यांच्या शरीरात रोज मेलाटोनिनचे उत्पादन संध्याकाळी लवकर सुरु होते. या उलट जे रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांच्यात ते तुलनेने उशीराच सुरु होते. तसेच ज्यांची झोप जास्तकाळ असते त्यांच्यात मेलाटोनिन अधिक काळ स्त्रवत असते.
• आता माणसाचे वय आणि मेलाटोनिनचे प्रमाण यांचा संबंध पाहू. बाल्यावस्थेत आपली झोप खूप असते आणि त्याचा शरीरवाढीशी संबंध असतो. जसे मूल किशोरवयीन अवस्थेत जाते तसे रोज संध्याकाळची मेलाटोनिनची स्त्रवण्याची वेळ लांबत जाते. त्यामुळे या वयात रात्री अपरात्री जागण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.
• मध्यमवयीन माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा मेलाटोनिनचे स्त्रवणे निसर्गतः कमी होत जाते. परिणामी झोप कमी होते. भल्या पहाटे उठून घरात चुळबूळ करणारे म्हातारे तरुणांसाठी त्रासदायक असतात !
प्रकाशाचा प्रकार आणि मेलाटोनिनचे प्रमाण
पृथ्वीवर जिथे उत्तम सूर्यप्रकाश ठराविक काळ उपलब्ध असतो तिथे मेलाटोनिनचे नैसर्गिक दैनंदिन चक्र व्यवस्थित काम करते. कृत्रिम प्रकाश आणि मेलाटोनिन उत्पादन यांचे नाते जरा गुंतागुंतीचे आहे. कुठल्याही ‘प्रकाशाचे’ अंतर्गत घटक असतात आणि त्यांच्या विशिष्ट तरंगलांबी असतात. त्यापैकी ४६०-४८० nm या पट्ट्यातील लांबी असलेला ‘नीलप्रकाश’ शरीरातील मेलाटोनिनचे उत्पादन दाबून टाकतो. त्यादृष्टीने आपल्या वापरातील कृत्रिम प्रकाशाचे प्रकार गेल्या शतकभरात कसे बदलत गेले ते पाहणे रंजक ठरेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरात बहुतांश लोक पिवळा प्रकाश देणारे बल्ब (incandescent ) वापरत. त्याच्या प्रकाशात ‘नीलप्रकाशाचे’ प्रमाण खूप कमी होते. आता अलीकडील काही वर्षांतील चित्र पाहा. पिवळ्या बल्ब्सचा वापर झपाट्याने कमी होत गेला आणि LED-बल्ब्सचा वापर वाढता राहिला. या आधुनिक बल्ब्सच्या प्रकाशात नीलप्रकाशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जर आपण रात्री अशा प्रकाशात – त्यातही झगमगाटात- अधिक काळ वावरलो, तर त्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. परिणामी निद्रानाश होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत तर आपला विविध इ-साधनांचाही वापर खूप वाढला. या सर्व उपकरणांकडे बघत राहिल्याने डोळ्यात नीलप्रकाशाच्या लहरी मोठ्या प्रमाणात जातात.
मेलाटोनिनची अन्य कार्ये
झोपेच्या प्रक्रियेव्यतिरिक्त हे हॉर्मोन शरीरातील अन्य काही यंत्रणांवरही सकारात्मक परिणाम करते. त्या यंत्रणा अशा आहेत:
१. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य
२. श्वसनयंत्रणा
३. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे
४. पेशींतील ऊर्जानिर्मिती आणि antioxidant कार्य
५. अन्य हॉर्मोन्सवर प्रभाव : विशेषतः जननेन्द्रीयांशी संबंधित हॉर्मोन्स
वरील सर्व कार्ये बघता मेलाटोनिनचा काही आजारांत औषधी उपयोग होऊ शकेल का ही उत्सुकता निर्माण होते. त्या अनुषंगाने वैद्यकात काही संशोधन झालेले आहे. त्यापैकी बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत. त्या तुलनेत मानवी अभ्यास अद्याप पुरेसे झालेले नाहीत. संशोधनाचा मुख्य रोख अर्थात मेलाटोनिन हे निद्रानाशावर उपयुक्त आहे का, यावर आहे. या मुद्द्याचा आता आढावा घेतो.
निद्रानाश आणि मेलाटोनिनचा औषधी उपयोग
समाजातील अनेकांना झोपेच्या समस्यांनी ग्रासलेले असते. त्यामध्ये रात्री उशीरापर्यंत झोप न लागणे, अपुरी झोप इत्यादी समस्या आढळतात. त्यावर उपाय म्हणून जीवनशैलीतील बदल आणि काही पारंपारिक घरगुती तसेच वैद्यकीय औषधे उपलब्ध आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांत मेलाटोनिनची भर पडू पाहत आहे. प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने तयार केलेले हे हॉर्मोन आता गोळ्या आणि द्रवाच्या रूपांत उपलब्ध आहे. अनेक देशांत ते डॉक्टरांच्या चिठ्ठीविना दुकानांतून सर्रास विकले जात आहे. त्याच्या पुरस्कर्त्यांनी या औषधाला अगदी प्रचारकी स्वरूप आणले आहे. पण निद्रानाशासाठी ते खरंच उपयुक्त आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. तज्ञांची मतेही काहीशी उलटसुलट आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार काही मुद्दे असे आहेत:
१. खूप लांब पल्ल्याच्या विमानप्रवासानंतर काही काळ लोकांना ‘जेट- लॅग’ जाणवतो. त्यामुळे संबंधित माणूस अवेळी झोपू लागतो. त्यातून त्याचे नैसर्गिक झोप-जाग हे चक्र बिघडते. अशा प्रसंगी मेलाटोनिनच्या वापराचे काही प्रयोग झाले आहेत. पण या समस्येला मुळात ते द्यावे का, हाच मूळ मुद्दा आहे.
२. निद्रानाश या समस्येसाठी रोज झोपेच्या वेळेआधी ४५ मिनिटे मेलाटोनिन घ्यावे असा एक मतप्रवाह आहे. पण हा उपाय प्रत्येकाला लागू पडतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो.
३. झोप व्यवस्थित लागण्यासाठी औषधापेक्षाही रोज संध्याकाळ नंतर प्रकाश-नियंत्रणाचे उपाय सुचवले गेले आहेत :
a) सध्या लोकांचा मोबाईल आणि संगणकाचा वापर खूप आहे. ही उपकरणे रात्री ८ नंतर वापरताना त्यांच्या पटलावरील प्रकाश हा मंद करण्यात यावा. काही उपकरणांत तो नारिंगी रंगछटेकडे झुकवता येतो.
b) काही लोकांना रात्री ८ नंतर भव्य दुकानांत जाण्याची सवय असते. अशा ठिकाणी LED दिव्यांचा अक्षरशः झगमगाट असतो. लेखात वर दिल्याप्रमाणे या प्रकाशझोतात नीलप्रकाशाचा मोठा वाटा असतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांनी अशा ठिकाणी वावरताना डोळ्यांवर नीलप्रकाशाला अवरोध करणारे गॉगल्स वापरावेत.
c) एक महत्वाची सूचना तर दखलपात्र आहे. ती म्हणजे आपल्या झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !
४. मेलाटोनिन हे औषध म्हणून उपयुक्त ठरण्यासाठी शरीरातील अनेक घटकांचा विचार करावा लागतो. रुग्णाचे वय आणि शारीरिक अवस्था हे प्राथमिक घटक आहेत. त्याच्या पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. तसेच एखादा दीर्घकालीन आजार असल्यास मेलाटोनिनच्या उपयुक्ततेवर परिणाम होतो. रुग्ण जर अन्य काही औषधे रोज घेत असेल, तर मेलाटोनिन दिल्यानंतर त्या औषधांचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो.
५. वरील सर्व मुद्दे बघता मेलाटोनिनच्या औषधी उपयुक्ततेबद्दल बऱ्याच शंका उपस्थित होतात. एक औषध म्हणून प्रमाणित मात्रेत ते प्रौढासाठी सुरक्षित आहे. मुलांत आणि किशोरावस्थेत मात्र त्याचा वापर टाळलेला बरा. मुळात त्याची गरज आणि उपयुक्तता वादग्रस्त आहे. सध्या तरी निद्रानाशाच्या रुग्णासाठी पारंपरिक औषधांचाच वापर करावा. सर्व नेहमीचे उपाय थकले असतील तरच मेलाटोनिनच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे तज्ञ सांगतात. मुळात ते झोप ‘आणणारे’ औषध नसून झोपेचे एक नियंत्रक आहे.
मेलाटोनिनचे अन्य औषधी उपयोग
काही प्रकारच्या डोकेदुखींत त्याचा उपयोग होऊ शकतो. मेलाटोनिनच्या antioxidant गुणधर्माचा एका क्षेत्रात चांगला वापर करता येतो. ज्या लोकांना किरणोत्सर्गाला जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते, त्यांच्यात किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी मेलाटोनिनचा वापर गरजेनुसार करता येतो.
याव्यतिरिक्त अन्य काही आजारांत मेलाटोनिन उपयुक्त असल्याचे जे काही दावे केले आहेत त्यात मात्र तथ्य नाही. असे काही आजार म्हणजे कर्करोग, फिट्सचा विकार, मासिक पाळीतील वेदना आणि काही मनोविकार. यासंदर्भात अजून भरपूर संशोधनाची गरज आहे.
गेल्या १० वर्षांत प्रगत देशांत मनःशांतीसाठी (!) उठसूठ मेलाटोनिन घ्यायची लाट आलेली दिसते. हे हॉर्मोन अधिकृत औषधाव्यतिरिक्त खुल्या बाजारात देखील ‘’वनस्पतीजन्य’ वगैरे लेबले लावून विकले जाते. ते जीवनसत्व असल्याचा अपप्रचार देखील होत असतो. त्यामुळेच त्याचा गैरवापर वाढत गेला. बिगर औषधी स्वरूपातल्या मेलाटोनिनच्या गोळ्यांमधील शुद्ध मेलाटोनिनचे प्रमाण नियंत्रित नाही. त्यामध्ये अन्य हॉर्मोन्स वा रसायनांची भेसळ आढळली आहे.
शालेय वयातील मुलांनी त्याचा अनियंत्रित वापर केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यातून त्यांना डोकेदुखी, वर्तणुकीतील बदल, प्रमाणाबाहेर झोपणे आणि झोपेत अंथरुणात लघवी होणे असे दुष्परिणाम झाल्याचे दिसते.
सरतेशेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपली रोजची झोप लागण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अनेक चेतातन्तूंची कार्ये आणि बरीच रसायने भाग घेतात. त्या सर्वांच्या समन्वयातून आपले नैसर्गिक ‘झोप-जाग’ चक्र कार्यरत असते. मेलाटोनिन हा या मोठ्या प्रक्रियेतील फक्त एक घटक आहे. तेव्हा विविध निद्राविकारांवर तो काही एकमेव रामबाण उपाय होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्यावरील मानवी संशोधन अजूनही अपुरे आहे. सामान्यजनांनी त्यासंबंधीची प्रसारमाध्यमांतील अर्धवट आणि प्रचारकी माहिती वाचून वैद्यकीय सल्ल्याविना त्याचा औषध म्हणून स्व-वापर करू नये हे उत्तम.
*************************************************************************************
आजच्या(शुक्रवार, 17 मार्च)
आजच्या(शुक्रवार, 17 मार्च) जागतिक निद्रादिना निमित्त सर्वांना उत्तम झोप लागण्यासाठी शुभेच्छा !
या दिवसाचे एक वैशिष्ट्य आहे. दरवर्षी तो 17 मार्चलाच येत नाही. तो दिवस ठरवण्याचे एक शास्त्र आहे. एखाद्या वर्षी ज्या दिवशी मार्च- विषुवदिन असेल, त्याच्या आधीचा शुक्रवार हा निद्रादिन धरला जातो.
2008 ते 2023 या वर्षांचे निरीक्षण केले असता असे दिसेल, की हा दिन 14 ते 20 मार्च या दरम्यान बदलत राहिलेला आहे.
वर्षभरात दोनवेळा पृथ्वीवर
वर्षभरात दोनवेळा पृथ्वीवर दिनमान ( आणि रात्रही)समसमान बारा तासांचे येते त्यातील एका दिवसाला घेतले म्हणजे कुणाची झोपमोड नको.
शिफारस :झोपू आनंदे :
शिफारस :
झोपू आनंदे : घोरासुराचा वध!
- डॉ. अभिजित देशपांडे
https://www.loksatta.com/women/sleep-happy-didgeridoo-musical-instrument...
गेल्या पाच वर्षांत मात्र ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या प्रख्यात वैद्यकीय नियतकालिकात दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील आदिवासी एक लांबलचक असलेले, कर्ण्यासारखे ‘डिजीरिडू’ नावाचे वाद्य वापरतात. घनगंभीर आवाज करणारे हे ‘डिजीरीडू’ अनेकांनी आमीर खानच्या ‘दिल चाहता है’ या सिनेमात ‘जाने क्यूँ लोग प्यार करते है’ या गाण्यामध्ये ऐकले आहे.
नील प्रकाशाला अवरोध करणाऱ्या
नील प्रकाशाला अवरोध करणाऱ्या चष्म्याच्या भिंगामुळे 'संगणकाच्या स्क्रीनमुळे डोळ्यावर येणारा ताण कमी होईल/ झोप सुधारेल'.... अशा दावा करणाऱ्या जाहिराती अलीकडे वाढल्यात (https://www.lenskart.com/cms-blu-smartphone-lenses).
इथे https://www.cochranelibrary.com/cdsr/doi/10.1002/14651858.CD013244.pub2/...
या विषयावरील 17 संशोधनांचा सारांश आहे. त्यानुसार अशा जाहिरातींच्या दाव्यात तथ्य नसल्याचे दिसले आहे.
Pages