कुंडलीतील चवथे घर

Submitted by सामो on 19 May, 2023 - 01:49

डिसक्लेमर - प्रत्येकाला लेखात दिलेला अनुभव येइलच असे नाही. बर्‍याच अन्य फॅक्टर्स्वरती अवलंबुन असते, निष्णात व अनुभवी ज्योतिषासच ठाम कळू शकेल.

कॉलेजात असताना, अर्थात आपण अप्रगल्भ असतो. आपल्याला स्वभान पूर्णपणे आलेले नसते. ठेचकाळत आपलीच, आपल्याशी ओळख होत असते अश्या वेळी अनेकांना लिंडा गुडमन ची 'सन साइन्स/ लव्ह साईन्स' पुस्तके भुरळ घालतात. थोडे फार स्वतःच्याच विषयीचे कुतूहल त्या चाचपडण्यामागे असते. पण ती फेज बहुसंख्य लोकांची निघून जाते. बरेच जण पुन्हा ज्योतिषाच्या नादीही लागत नाहीत, काहीजण तर अव्वल टिकाकार बनतात. माझ्यासारख्या काही लोकांना काहीतरी स्पार्क दिसतो, काहीतरी आहे त्यात असे वाटून आम्ही त्याकडे ओढले जातो. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती. आणि हो याच व्यक्ती तितक्या प्रकृती बरेचदा ज्योतिषी मंडळींना साद घालतात. त्यातील काहीजण अव्वल व्यावसायीक होतात तर माझ्यासारखे काहीजण काठाकाठाने विहार करत रहातात.

कुंडलीत असतात १२ घरे. प्रत्येक घराची काही कारकत्वे असतात. उदा - प्रथम घर - शरीरयष्टी, तुमचे एकंदर बाह्य व्यक्तीमत्व अथवा स्वरुप, दुसरे घर (= पहील्या घराचे विस्तारीकरण) म्हणजे आता पहील्यात बाह्य व्यक्तीमत्व झाले तर दुसर्‍यात येते तुमचे एक्स्टेंडेड व्यक्तीमत्व म्हणजे तुम्ही कशाचा अभिमान धरता (धन, संपत्ती, कार, घर आदि भौतिक गोष्टी) तसेच तुम्ही जपत असलेली मूल्ये.
प्रत्येक घर हे त्याच्या पुढील घराचा व्यय दर्शविते म्हणजे लपलेल्या बाबी दर्शविते. उदा - १२ वे घर पहील्या म्हणजे बाह्य व्यक्तीमत्वाचा व्यय/लपलेले असे काहीतरी अर्थात अमूर्त मन दाखवते. तसेच प्रत्येक घर हे आदल्या घराचे विस्तारीकरण दाखविते. १२ वे घर हे ११ व्या घराचे विस्तारीकरण कसे तर ११ वे घर असते. जगन्मित्र, जगाची काळजी वहाणारे. १२ वे त्याचा विस्तार म्हणजे पूर्ण युनिव्हर्सलच होउन जाते. विश्वचि माझे घर. वैश्विक पातळीपर्यंत विस्तारते.
------
माझे सर्वात आवडते घर ४ थे घर जो की कुंडलीचा पाया (फाउंडेशन) मानले जाते. प्रौढत्वातील स्व-रक्षणाचे आपले reflexes कसे होणार आहेत हे चवथे घर ठरविते. आपले बालपणी आलेले अनुभव या घरात क्रिस्टलाइझ होतात. म्हणजे ज्योतिषी या घरातील ग्रहांवरुन तसेच या घरात पडलेल्या राशीस्वामी, त्याची दॄष्टी, रास, अंशात्मक युती आदिवरुन बालपणीच्या काही गोष्टी जाणुन घेउ शकतात. हे घर कुंडलीतील मध्यरात्र दर्शविते. मध्यरात्री सर्व प्राणि-पक्षी कुठे असतात? आपापल्या घरट्यात. सुखेनैव निद्राधीन. शांत! ४थे, आठवे आणि बरावे ही ३ जलराशींची घरे कार्मिक मानली जातात. चवथे घर बालपणातील परावलंबित्व आणि त्यातून येणारी व्हल्नरेबिलिटी दर्शविते, आठवे म्रूत्यू आणि फोबियाज दाखविते तर १२ असते हाऊस ऑफ लॉस. ही तीनही घरे जलराशींची. जलाशय वरुन शांत पण आत खळबळलेला असतो. पोहता येत नसेल जलाशय आपल्याला गिळंकृत करतो.
---
माझी ज्योतिषाची आवड सखोल होण्याचे कारण माझ्या आयुष्यात आलेले २ जातक आणि त्यांचे मी केलेले त्रयस्थ नीरीक्षण - एकाच्या चवथ्या घरात प्लूटो, दुसर्‍याच्या चवथ्या घरात नेपच्युन.

चवथे घर घर म्हणजे बालपण तर प्लूटो = हिडीस life-altering/transforming trauma. शारीरीक असो, लैंगिक असो की मानसिक अ‍ॅब्युझ चवथ्या घरातील प्लूटो दाखवितो. हां हे झाले एक्स्ट्रीम केसेसमध्ये. ज्या घरात (४ थे) रात्री आश्रयाला जायचे, सुखेनैव निद्राधीन होण्याकरता जिथे आसरा शोधला तेच घर वखवखलेले , भुताटकीच्या पछाडलेले निघाले तर? चवथे घर हे जातकाच्या कुंडलीतील मध्यरात्र दाखविते, त्याचे घरटे, solace मिळण्याचे स्थान दाखविते. निदान इथे प्लूटो सारखा खुनी, अशुभ सैतानी ग्रह दडू नये. माइल्ड केसेकमध्ये आईवडीलांच्या कडून काही पॉवरप्ले झालेले असतात. जातक फार हार्शली जज झालेला असतो. जातकाच्या मनात भीती, हतबलता आणि एकंदर फेटॅलिस्टीक माईंडसेट असे विचित्र मिश्रण झालेले असते. प्लूटो इथे पडला की त्याला विषारी दूध म्हटले जाते. दूध जे अर्भकाच्या पोषणाकरता अत्यावश्यक असते तेच विषारी झाले तर त्या व्यक्तीने पाहायचे कोणाकडे? बालपणीचे abusive , lethal वातावरण - trauma कसा कळणार जगाला. मूक किंचाळी .... silent scream = चवथ्या घरातील प्लूटो. प्रतीकच घ्यायचे झाले तर साप असलेली काळी dark विहिर. जिथे पडलो असता किंचाळले तर ऐकायला कोणी नाही. प्रत्येकालाच कधी ना कधी स्वप्न पडलेले असते ज्यात काहीतरी दबा धरलेले संकट ऊभे ठाकते , आसपास लोकं असतात, पण तोंडामधुन आवाज फुटत नाही. त्या लोकांपर्यंत कसे पोचायचे ते कळत नाही.

अन्य जातकाच्या चवथ्या घरात नेपच्यून. नेपच्यून म्हणजे वरुण ग्रह. हा आहे सागरसम्राट, जलाधिपती. म्हणजे झिगझॅग. पाण्यात कधी नितळ प्रतिबिंब पडते का नाही कारण पाणी सतत हलत असते त्यामुळे वेडेवाकडेच प्रतिबिंब पडते. आठवा चवथे घर असतो पाया. आता पायाच जर पाणथळ निघाला, तर इमारतीचा डोलारा रहाणार कसा बरोबर. या लोकांच्या बालपणी काहीतरी गूढ किंवा न कळणारे अशी परिस्थिती झालेली असते. म्हणजे त्यांना स्वतःचे बालपण फार धूसर, धुक्यात वेढलेले किंवा पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबासारखे आठवते आणि आयुष्यभर सहसा हाँट करते. जिथे वॄक्षाने मूळ धरायला जायचे तीच जागा दलदलीची (क्विक सँड) निघाली तर झाड एक तर उन्मळून पडणार किंवा वाढ निकोप होणार नाही. खूप त्रासदायक बालपण गेलेले असते - असुरक्षितता, अनाकलनियता यांनी वेढलेले.

मंगळ्+केतू चवथ्या घरात असलेले जातकही पाहीलेले आहेत तसेच शुक्र चवथ्या घरात पडलेलेही. नॅह!! दीज केसेस डोन्ट इन्टरेस्ट मी. कारण हे नेहमीच्या पठडीतले ग्रहं याउलट ट्रान्स सॅटर्निअन म्हणजे आऊटर प्लॅनेटस म्हणजे (नेपच्यून, प्लुटो व युरेनस) या ग्रहांचे मला विलक्षण आकर्षण आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या चवथ्या घरात प्लूटो आहे. कर्क लग्न, पहिल्या घरात लग्न घरात शुक्र, दुसऱ्यात रवी, तिसऱ्या घरात मंगळ, बुध, गुरू, चौथ्यात प्लूटो, ५ - राहू, ६- नेपच्यून आणि युरेनस, सातवे रिकामे, आठव्यात शनि, ९ आणि दहा रिकामे, अकराव्या घरात चंद्र आणि .... केतू! बारावे घर रिकामे.

जेवढं वाचलंय, तेवढं कमी! विचित्र आहे एकदम सगळी लाईफ.. जे हवं त्याची फक्त झलक दिसते, सहवासही पण क्षणिक.. जे आहे त्यात समाधान शोधावे तर तिथं अपेक्षाभंग. वर-वर पाहता अगदी छान चाकोरीबद्ध आयुष्य दिसतं, पण अकराव्या घरातले चंद्र केतू विचार कर करून जास्त डोकं आउट करवतात.

राहू कृपेने आलेली व्यसने आहेत, पण त्यावर गुरुसाहेबांनी ठेवलेला कंट्रोल पण आहे.

मंदार शु फार उत्तम असतो ना ४ थ्यात?
अजिंक्यराव प्लू चे नीट माहीत आहे. बाकीचे माहीत नाही. हां अजिंक्यराव ६ व्यात नेपच्ञून मला वाटतं एक तर मादक द्रव्यांचे व्यसन दर्शवितो किंवा मग औषधांचे कॉकटेल. हा गूढतेचा कारक आहे ग्रहं. विचित्र आजार जे की चटकन डायग्नोस होत नाहीत ते दाखवतो.

मला माहित नाही. तुमचे वाक्य वाहुन मला वाटले काहीतरी गडबड असेल. Happy तुमचा लेख वाचुन सहज बघीतल ४थ्या स्थानात काय आहे तर शुक्र दिसला.

नाही नाही मला इन्टरेस्ट नव्हता त्या केसेसच्या अभ्यासात असे काहीसे म्हणायचे होते Happy मला आपले प्लू व ने. बरे वाटतात. फार मर्यादित निरीक्षणे आहेत हो.

फार काही कळालं नाही.
कसे पहायचे कोणत्या घरात कोणता ग्रह ते?
आणि ग्रह बदल होतात का?

I mean , पाचवा गुरू लागला सहावा गुरू आहे असे बोली भाषेत म्हणतात. म्हणजे ग्रह पुढच्या गजरात जात असतील ना?
माझे डिटेल्स सांगितले तर सांगू शकाल का काही?

झकासराव मला ज्योतिष कमी कळते. तुमचे डिटेल्स दिले तर नाही सांगू शकणार.
ते ग्रहं कुंडली ज्याला वाचता येते त्याला कळता कुठे पडलेले आहेत ते. मूळ कुंडलीतील ग्रहं स्थिर असतात कारण ती जन्माच्या वेळेची स्थिती आहे.
बाकी भ्रमण करणारे ग्रहं म्हणजे आता आकाशात फिरणारे.
माझं ज्योतिषाचे ज्ञान, ललित लिहीण्यापुरतेच आहे.

४ थे घर. एक व्यक्तीची कुंडली पहाण्यात आली. ( मी पत्रिका बघत नाही ) चतुर्थात गुरु शुक्र रवी. उच्च दर्जाचे वाहन् सुख, मोठा बंगला, भरपूर पैसा. शुक्र व रवी मुळे जेवढा पैसा, सुख तेवढाच त्रास कारण रवी शुक्र एकत्र कुठेही असले तरी वैवाहीक जीवनात किंचीत का होईना वादळ निर्माण करतात. का व कसे ते विचारु नका. तो ज्याच्या त्याच्या नशीबाचा भाग.

चतुर्थात चंद्र असेल तर घराजवळ कुठेतरी पाण्याचा स्त्रोत असतोच. आईशी खूप जवळचे संबंध म्हणजे आई वेडे असतात. मात्र चतुर्थात वृश्चिक रास असेल किंवा मकर राशीत गुरु असेल तर मात्र आईशी पटत नाही.

चतुर्थातला राहु वा शनी वास्तु पिडीत दाखवतो. वास्तुत प्रसन्नता जाणवत नाही. होम हवन पूजा पाठ भलेही करु नका. पण स्तोत्रे, श्लोक म्हणून वातावरण प्रसन्न ठेवा.

चतुर्था तला मंगळ ( पुरुषाच्या पत्रिकेत असेल तर ) सासु सुनेचे फारसे पटत नाही. ह्या व्यक्तीचे स्वतःचे बंगलेवजा घर मात्र होतेच, कारण मंगळ भूमीचा कारक ( कर्ता ) असतो.

चतुर्थात शुभ ग्रह असावे, पण हे नशीबी लागते.

फार काही कळालं नाही.
कसे पहायचे कोणत्या घरात कोणता ग्रह ते?
आणि ग्रह बदल होतात का?

I mean , पाचवा गुरू लागला सहावा गुरू आहे असे बोली भाषेत म्हणतात. म्हणजे ग्रह पुढच्या गजरात जात असतील ना?>>>>>> पाचवा गुरु लागला, सहावा लागला याचा अर्थ तो गोचरीचा म्हणजे फिरणारा ग्रह असतो. चंद्र हा प्रत्येक राशीत सव्वा दोन दिवस रहातो, रवी १ महिना, गुरु तेरा महिने, मंगळ पंचेचाळीस दिवस तर शनी हा सर्वात मंद ग्रह असल्याने तो एका राशीत अडीच वर्ष रहातो. म्हणजे समजा शनी आता मीन राशीत आहे तर कुंभ , मीन् व मेष राशीला साडेसाती आहे. कारण कुंभ ही ११ वी रास , तिच्या पुढची मीन व मीन च्या पुढची मेष १ नं रास.

Kundali Image.jpgमूळ पत्रिकेतले ग्रह बदलत नाही. या कुंडलीत जिथे १ आकडा आहे ते आहे मेष लग्न. हे कुंदलीतले पहिले स्थान .लग्न हे ज्योतिष भाषेत बोलले जाते, खरे लग्न नाही. या स्थानावरुन कळते व्यक्तीचा स्वभाव, धाडस, प्रवास वगैरे. इथे जर चंद्र १ आकड्यात असेल तर या व्यक्तीची जन्मता चंद्र रास व लग्न रास एकच ती म्हणजे मेष. ह्या व्यक्तीचा प्रवास खूप होतो, दिसायला आकर्षक असतात.

असे बरेच सांगता येईल.

रश्मी चं व ने कन्या राशीत, पहील्या घरात. मं+के सातव्यात. २ दा वैधव्य योग (म्हणजे अर्थात २ दा लग्न व तदुपरान्त). हे मं+के मुळे असेल का? तसेच कन्या म्हणजे किंचित एकलकोंडी रास. एकटे आयुष्य कंठणारी. सर्व कन्या जातकांना एकटे आयुष्य कंठावे लागते असे अर्थातच नाही. पण वरती दोन्ही योग, एकाकीपणाकडे कदाचित निर्देश करत असाव्यात.

९ आणि दहा रिकामे, अकराव्या घरात चंद्र आणि .... केतू! बारावे घर रिकामे.>>>> अजिंक्यराव पाटील, जितके होईल तितके माणसांच्या गराड्यात शरीर व मनाने पण रहा. चंद्र केतु ग्रहण युती. ९, १० व १२ वे घर रिकामे. चंद्राच्या मागच्या व पुढच्या घरात जर कुठलाच ग्रह नसेल तर माणसाला ( बाईला सुद्धा ) खूप एकटे वाटते. माणसात असतील तरी एकटेपणा जाणवतो. एक आहे. तिसर्‍या घरातल्या गुरुची ९ वी नजर या चंद्रावर असल्याने मित्र परीवार चांगला मिळु शकतो. फसगत होत नाही.

सामो मला इतके कळत नाही. पण मंगळ एकटा असता तर प्रश्न नव्हता, जोडीला केतू येऊन बसल्याने असे झाले असावे.

माझ्या एका ( सासरच्या ) पुरुष नातेवाईकाच्या पत्रिकेत सप्तमात शुक्र व राहु एकत्र. शुक्रामुळे बायको खूप सुंदर व संसारी मिळाली. पण काही वर्षातच तिने सासुच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली. नुसता एकटा राहु जरी असता तरी संसार झाला असता. पण युतीने गोंधळ केला.

हो हो. सॉरी ते लिहायचे राहीले. कोणाच्या पत्रिकेत असे योगायोग असले तरी काही होईलच असे नाही. प्रत्येक जण वेगवेगळे नशीब घेऊन जन्माला येतो. मला बर्‍याच जणानी उलट सुलट सांगुन घाबरवले होते. पण गुरु कृपेने व अध्यात्मीक जोड दिल्याने खूप फरक पडला .

देव भलेही मानु नका. पण अडलेल्यांना मदत अवश्य करा.

चवथे घर हे घरटे, solace मिळण्याचे स्थान दाखविते …..

अन् हे घर रिकामे असल्यास?

अच्छा सामो
रश्मी तुमचेही प्रतिसाद इंटरेस्टिंग आहेत

रिकामे असले तरी त्या घराचा भावेश हा असतोच आणि तो कुठे ना कुठे असतो. त्याचे अंशात्मक योग असतात, त्याची दृष्टी असत. एकंदर देअर इज नो एस्केप. सम युनिव्हर्सल एलिमेन्टस आर इन्डीड युनिव्हर्सल. वैश्विक.
म्हणण्याचा मुद्दा हा की - घर रिकामे असो वा गजबजलेले, प्रत्येकाला हे चवथे घर अनुभवास येतच.

काही ग्रह कोणत्या स्थानात हे पाहिल्यावर लगेच कळते की काय होणार. सामान्य ज्योतिष अभ्यासकालाही कळते. म्हणून ते स्पष्टपणे उघड न करण्याचा रिवाज आहे. कारण लोक लगेच आपली कुंडली काढून पाहतात आणि अरेच्चा हा ग्रह इथे कशाला कडमडला? यानेच वाट लावली. दु:खी होतात.

वा! एकदम interesting धागा आहे.
ह्या सगळ्या ग्रह आणि कुंडली ची माहिती सांगणारा धागा आहे का?

सामो, खूप छान विवेचन केले आहेस. रश्मी, वाटच बघत होते तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांची. srd, चांगली माहिती देताय.
शुभ ग्रह म्हणजे कोणते @रश्मी?पापग्रह नाहीत ते?

सामान्यतः गुरु,शुक्र,चंद्र शुभग्रह समजतात.
ते पापग्रह होत नाहीत. पण हे इतर पापग्रहांमुळे,दृष्टीमुळे,सानिध्यामुळे वाईट फले देतात.

गुरु ग्रह चांगला म्हणून ख्याती आहे परंतू हाच ग्रह फार रडवतो हे कित्येकांना माहीत नसते.
जिथे पाहतो तिथे चांगलं करतो पण जिथे असतो (बसतोच म्हणायचं. याचं वजन फार आहे. ते घर चेपून टाकतो.) हा ग्रह चंद्राला शत्रू मानतो. बरंच आहे पण जाणणे त्रासदायक आहे.

माहिती वाचून खरंच पत्रिका पाठवायचा मोह होतोय अगदी सामो आणि रश्मी यांना. मला अगदी शून्य ज्ञान आहे. पण असं वाचायला आवडतं. राशींबद्दल सगळंच सगळ्यांना लागू होत नाही. पण असं स्पेसिफिक बर्याच अंशी लागू होत असेल.

ज्या लोकांना खरोखर रस असेल त्यांनी एखाद्या चांगल्या गुरुजींना आपली पत्रिका दाखवून डिटेलमध्ये समजून घ्यावी. त्यांच्याशी बोलताना अंदाज येईलच की त्यांना आपली पत्रिका क्लिक झाली आहे का नाही. जर क्लिक झाली तर जबरदस्त अनुभव येऊ शकतात. योग्य मार्गदर्शन मिळतं. वैयक्तिक साधना काय करावी हे समजतं. नुसतं जेनेरिक पंचमात गुरू असा की तसा टाईप चर्चा करून फार काही हाती लागत नाही.पत्रिकेचा एकत्रित analysis व्हायला हवा.

सप्त्मात राहु हा सहसा चांगला नसतो वैवाहिक सुखासाठी. आता त्यात कुठल्या राशीत आहे हे सुद्धा आहे पण विवाहात प्रॉबलेम असतात्च. ते असे की छुप्या वळणाचे असत्तत. म्हणजे सहचर/सहचरी खुप आतल्या गाठीचे असतात. खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे असे.
अगदीच स्थान खराब असेल तर पार्ट्नर कारस्थानी वृतीचा/ वृतीची असु शकतो/ते.
नीचेचा राहू असेल तर प्रेम नसतेच नात्यात फक्त फायद्यासाठी एकत्र असतात. दिखावाच्या नातेसंबध.

Pages