डिसक्लेमर - प्रत्येकाला लेखात दिलेला अनुभव येइलच असे नाही. बर्याच अन्य फॅक्टर्स्वरती अवलंबुन असते, निष्णात व अनुभवी ज्योतिषासच ठाम कळू शकेल.
कॉलेजात असताना, अर्थात आपण अप्रगल्भ असतो. आपल्याला स्वभान पूर्णपणे आलेले नसते. ठेचकाळत आपलीच, आपल्याशी ओळख होत असते अश्या वेळी अनेकांना लिंडा गुडमन ची 'सन साइन्स/ लव्ह साईन्स' पुस्तके भुरळ घालतात. थोडे फार स्वतःच्याच विषयीचे कुतूहल त्या चाचपडण्यामागे असते. पण ती फेज बहुसंख्य लोकांची निघून जाते. बरेच जण पुन्हा ज्योतिषाच्या नादीही लागत नाहीत, काहीजण तर अव्वल टिकाकार बनतात. माझ्यासारख्या काही लोकांना काहीतरी स्पार्क दिसतो, काहीतरी आहे त्यात असे वाटून आम्ही त्याकडे ओढले जातो. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती. आणि हो याच व्यक्ती तितक्या प्रकृती बरेचदा ज्योतिषी मंडळींना साद घालतात. त्यातील काहीजण अव्वल व्यावसायीक होतात तर माझ्यासारखे काहीजण काठाकाठाने विहार करत रहातात.
कुंडलीत असतात १२ घरे. प्रत्येक घराची काही कारकत्वे असतात. उदा - प्रथम घर - शरीरयष्टी, तुमचे एकंदर बाह्य व्यक्तीमत्व अथवा स्वरुप, दुसरे घर (= पहील्या घराचे विस्तारीकरण) म्हणजे आता पहील्यात बाह्य व्यक्तीमत्व झाले तर दुसर्यात येते तुमचे एक्स्टेंडेड व्यक्तीमत्व म्हणजे तुम्ही कशाचा अभिमान धरता (धन, संपत्ती, कार, घर आदि भौतिक गोष्टी) तसेच तुम्ही जपत असलेली मूल्ये.
प्रत्येक घर हे त्याच्या पुढील घराचा व्यय दर्शविते म्हणजे लपलेल्या बाबी दर्शविते. उदा - १२ वे घर पहील्या म्हणजे बाह्य व्यक्तीमत्वाचा व्यय/लपलेले असे काहीतरी अर्थात अमूर्त मन दाखवते. तसेच प्रत्येक घर हे आदल्या घराचे विस्तारीकरण दाखविते. १२ वे घर हे ११ व्या घराचे विस्तारीकरण कसे तर ११ वे घर असते. जगन्मित्र, जगाची काळजी वहाणारे. १२ वे त्याचा विस्तार म्हणजे पूर्ण युनिव्हर्सलच होउन जाते. विश्वचि माझे घर. वैश्विक पातळीपर्यंत विस्तारते.
------
माझे सर्वात आवडते घर ४ थे घर जो की कुंडलीचा पाया (फाउंडेशन) मानले जाते. प्रौढत्वातील स्व-रक्षणाचे आपले reflexes कसे होणार आहेत हे चवथे घर ठरविते. आपले बालपणी आलेले अनुभव या घरात क्रिस्टलाइझ होतात. म्हणजे ज्योतिषी या घरातील ग्रहांवरुन तसेच या घरात पडलेल्या राशीस्वामी, त्याची दॄष्टी, रास, अंशात्मक युती आदिवरुन बालपणीच्या काही गोष्टी जाणुन घेउ शकतात. हे घर कुंडलीतील मध्यरात्र दर्शविते. मध्यरात्री सर्व प्राणि-पक्षी कुठे असतात? आपापल्या घरट्यात. सुखेनैव निद्राधीन. शांत! ४थे, आठवे आणि बरावे ही ३ जलराशींची घरे कार्मिक मानली जातात. चवथे घर बालपणातील परावलंबित्व आणि त्यातून येणारी व्हल्नरेबिलिटी दर्शविते, आठवे म्रूत्यू आणि फोबियाज दाखविते तर १२ असते हाऊस ऑफ लॉस. ही तीनही घरे जलराशींची. जलाशय वरुन शांत पण आत खळबळलेला असतो. पोहता येत नसेल जलाशय आपल्याला गिळंकृत करतो.
---
माझी ज्योतिषाची आवड सखोल होण्याचे कारण माझ्या आयुष्यात आलेले २ जातक आणि त्यांचे मी केलेले त्रयस्थ नीरीक्षण - एकाच्या चवथ्या घरात प्लूटो, दुसर्याच्या चवथ्या घरात नेपच्युन.
चवथे घर घर म्हणजे बालपण तर प्लूटो = हिडीस life-altering/transforming trauma. शारीरीक असो, लैंगिक असो की मानसिक अॅब्युझ चवथ्या घरातील प्लूटो दाखवितो. हां हे झाले एक्स्ट्रीम केसेसमध्ये. ज्या घरात (४ थे) रात्री आश्रयाला जायचे, सुखेनैव निद्राधीन होण्याकरता जिथे आसरा शोधला तेच घर वखवखलेले , भुताटकीच्या पछाडलेले निघाले तर? चवथे घर हे जातकाच्या कुंडलीतील मध्यरात्र दाखविते, त्याचे घरटे, solace मिळण्याचे स्थान दाखविते. निदान इथे प्लूटो सारखा खुनी, अशुभ सैतानी ग्रह दडू नये. माइल्ड केसेकमध्ये आईवडीलांच्या कडून काही पॉवरप्ले झालेले असतात. जातक फार हार्शली जज झालेला असतो. जातकाच्या मनात भीती, हतबलता आणि एकंदर फेटॅलिस्टीक माईंडसेट असे विचित्र मिश्रण झालेले असते. प्लूटो इथे पडला की त्याला विषारी दूध म्हटले जाते. दूध जे अर्भकाच्या पोषणाकरता अत्यावश्यक असते तेच विषारी झाले तर त्या व्यक्तीने पाहायचे कोणाकडे? बालपणीचे abusive , lethal वातावरण - trauma कसा कळणार जगाला. मूक किंचाळी .... silent scream = चवथ्या घरातील प्लूटो. प्रतीकच घ्यायचे झाले तर साप असलेली काळी dark विहिर. जिथे पडलो असता किंचाळले तर ऐकायला कोणी नाही. प्रत्येकालाच कधी ना कधी स्वप्न पडलेले असते ज्यात काहीतरी दबा धरलेले संकट ऊभे ठाकते , आसपास लोकं असतात, पण तोंडामधुन आवाज फुटत नाही. त्या लोकांपर्यंत कसे पोचायचे ते कळत नाही.
अन्य जातकाच्या चवथ्या घरात नेपच्यून. नेपच्यून म्हणजे वरुण ग्रह. हा आहे सागरसम्राट, जलाधिपती. म्हणजे झिगझॅग. पाण्यात कधी नितळ प्रतिबिंब पडते का नाही कारण पाणी सतत हलत असते त्यामुळे वेडेवाकडेच प्रतिबिंब पडते. आठवा चवथे घर असतो पाया. आता पायाच जर पाणथळ निघाला, तर इमारतीचा डोलारा रहाणार कसा बरोबर. या लोकांच्या बालपणी काहीतरी गूढ किंवा न कळणारे अशी परिस्थिती झालेली असते. म्हणजे त्यांना स्वतःचे बालपण फार धूसर, धुक्यात वेढलेले किंवा पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबासारखे आठवते आणि आयुष्यभर सहसा हाँट करते. जिथे वॄक्षाने मूळ धरायला जायचे तीच जागा दलदलीची (क्विक सँड) निघाली तर झाड एक तर उन्मळून पडणार किंवा वाढ निकोप होणार नाही. खूप त्रासदायक बालपण गेलेले असते - असुरक्षितता, अनाकलनियता यांनी वेढलेले.
मंगळ्+केतू चवथ्या घरात असलेले जातकही पाहीलेले आहेत तसेच शुक्र चवथ्या घरात पडलेलेही. नॅह!! दीज केसेस डोन्ट इन्टरेस्ट मी. कारण हे नेहमीच्या पठडीतले ग्रहं याउलट ट्रान्स सॅटर्निअन म्हणजे आऊटर प्लॅनेटस म्हणजे (नेपच्यून, प्लुटो व युरेनस) या ग्रहांचे मला विलक्षण आकर्षण आहे.
१) ज्योतिषाची (मराठी) पुस्तकं
१) ज्योतिषाची (मराठी) पुस्तकं वाचलीत तर महिन्यांत बरंच समजू लागते. ही चंद्र राशी वरची असतात. साडेसाती विचार,दशाविचार असतात. आयुष्यातील वरचढ आणि स्थित्यंतरं बरोबर वर्तवण्यात. शिवाय यातले योगविचार हे कौटुंबिक /व्यावसायिक/आर्थिक/सामाजिक मान वगैरे किती उंची गाठू शकतो हे सांगतात. बऱ्यापैकी मार्गदर्शक पद्धत. चतुर्थ स्थानास महत्व देणारी पद्धत.
२)ओनलाइन किंवा छापील इंग्रजी पुस्तकं ही बहुधा रवि राशीवर आधारित असतात. यास पाश्चिमात्य पद्धतही म्हणतात. दशम स्थानास महत्व देणारी पद्धत.
स्वभाव आणि सुख क्र १ सांगतील.
ऐहिक आणि व्यावहारिक विचार क्र २ सांगतील.
दोन्ही एकत्र अभ्यासू नये. एकच शाखा निवडावी.
आणखी ३) कृष्णमूर्ती पद्धत वेगळी शाखा भारतात शोधली गेली आहे. याचा मूळ शोध कृष्णमूर्ती यांचा नाही. त्यांनी ती पसरवली ओनलाइन. किचकट आहे.
४) नवमांश, चलित, भावेश,गोचरी वगैरे क्र १ चे उपप्रकार आहेत. खोलात आहे. काशी वाराणसीत वगैरे ठिकाणी होराभूषण पदवी प्राप्त करण्यासाठी हे शिकावं लागतं.
बापरे!
बापरे!
काय काय येतं इथल्या मान्यवरांना. कुठलं क्षेत्र बाकी आहे असं वाटतच नाही.
प्रतिसाद छान आहेत.
सामो मला यातलं ओ का ठो काही कळत नाही. पण कधी कधी भविष्य वाचतो माझं आणि कुटुंबियांच. चांगलं असेल तर सर्वांना वाचून दाखवतो. पदरची प्रशंसा भरीस घालतो. बरं वाटतं. सगळे आनंदी होतो.
माझी तर जन्मतारीखच घोळात. वडील म्हणायचे गुरुवारी जन्मला आई म्हणायची दत्तजयंती होती. म्हणून दत्तात्रय नाव. कार्यालयात एक वरिष्ठ म्हणायचे three headed God.
बरं वाटतं. सगळे आनंदी होतो.
बरं वाटतं. सगळे आनंदी होतो.
हो. राशीभविष्य आणि त्यातले विनोद फार हसवतात.
______________
पण कुटुंबातील जन्मलेल्या नव्या बाळाची कुंडली पाहून (म्हणजे तशी पाहावी लागत नाहीच. रोजची कुंडली आणि ग्रह माहीत असतातच. वेळेप्रमाणे बदलते) घरातलाच ज्योतिषीही कधीकधी हादरतो. कारण चतुर्थ स्थान. सुख आणि मोक्षाचं स्थान आहे. भारतीय ज्योतिषाविचारात सर्वात वरचे.
Pages