परवाचीच गोष्ट.
तब्येत बरी नसल्याने ऑफिसला अर्ध्या दिवसाने जात होतो. दुपारची वेळ, प्लॅटफॉर्म क्रमांक ‘१’ वर बेलापूर ट्रेनची वाट बघत उभा होतो. इतक्यात पलीकडल्या रुळावर बोरीबंदरला (आताच्या सीएसटीला) जाणारी ट्रेन लागली. आपल्याला जायचे नाही त्या दिशेची ट्रेन आधी येणे हे नेहमीचेच. मलाही तशी काही घाई नव्हती पण उकाड्याने जीव हैराण झाल्याने फलाटावर फार वेळ ताटकळत उभे राहण्यात रस नव्हता. पण या तप्त वातावरणातही समोरच्या ट्रेनला काही वीर दाराला लटकलेले दिसत होते. रोजचेच असल्याप्रमाणे त्यांच्या आपापसात कुचाळक्या चालू होत्या. आत बसायला जागा असूनही उन्हे झेलत बाहेर दाराला लटकण्याचे ते एक कारण असावे. मी सवयीनेच तिथे दुर्लक्ष केले. ट्रेनने भोंगा दिला आणि त्यांची ट्रेन सुटली. तसे अचानक त्या पोरांचा गलका वाढला. पाहिले तर आमच्या फलाटावर उभ्या काही महिला प्रवाश्यांना शुक शुक करत आणि त्याउपरही बरेच काही ओरडत, हातवारे करत चिडवणे चालू होते. त्यांचे ते तसे चित्कारणे संतापजनक होते खरे, पण फलाटावर उभ्या महिला देखील त्याला सवयीचाच एक भाग म्हणून स्विकारल्यागत, विशेष काही घडत नाहीये अश्याच आविर्भावात उभ्या होत्या. जवळपास उभे असलेले पुरुष, हो ज्यात एका कोपर्यात मी देखील उभा, यावर दुर्लक्ष करण्याव्यतिरीक्त फारसे काही करू शकत नव्हतो. फक्त चार ते पाच सेकंद आणि समोरची ट्रेन नजरेआड. या चार सेकंदात त्यांना प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करणे म्हणजे उलट आणखीन गलिच्छ प्रकारांना आमंत्रण देणे. किंबहुना म्हणूनच अश्यांना ऊत येतो. जेव्हा ट्रेनने वेग पकडलेला असतो वा जेव्हा ट्रेन समोरच्या ट्रॅकवर असल्याने जमावापासून सुरक्षित अंतरावर असते, तसेच दुपारची कमी गर्दीची वेळ असते तेव्हाच अश्यांची हिंमत वाढते.
असो,
ट्रेन गेल्यावर मात्र महिलांचे आपापसात यावर बोलणे सुरू झाले. अर्थात शक्य तितके सभ्य भाषेत अपशब्द वापरून मनातली भडास काढून हलके होणे हाच या मागचा हेतू असावा. कितीही सवयीचाच भाग म्हटले तरी अश्या प्रकारांचा त्रास होणे हे साहजिकच होते. यावेळी त्या जवळपास उपस्थित पुरुषांना देखील तुम्ही सुद्धा त्यातलेच एक आहात, पुरुष आहात, याच भावनेने बघत होत्या हे जाणवत होते. पण बोचत नव्हते. कारण ती भावना क्षणिकच आहे याची कल्पना होती. तरीही त्या क्षणिक विखाराला नजर देण्याची हिंमत नसल्याने मी खिशातून मोबाईल काढून त्यात डोके खुपसले. हा मगाशीच हातात असता तर कदाचित एखादा फोटोच टिपता आला असता असा विचार क्षणभर मनात आला. येऊन विरला आणि किस्सा इथेच संपला !
आता कालची गोष्ट.
शनिवारची सुट्टी असूनही ऑफिसला कामानिमित्त जायचे असल्याने आरामात झोप वगैरे पुर्ण करून सकाळी थोडे उशीराच उठून सावकाश घराबाहेर पडलो. साधारण साडेअकराची वेळ. आदल्या दिवशीचा किस्सा ताजा असूनही त्याला विस्मरणात टाकले होते. थोड्याफार फरकाने कालच्याच जागी मध्येच एखादी थंड झळ सोडणार्या पंख्याखाली हवा खात उभा होतो. माझी बेलापूर ट्रेन यायला अवकाश होता, त्या आधी अंधेरी ट्रेन होती. अर्थात ही आमच्याच फलाटाला लागते. ट्रेनला तुरळक गर्दी आणि दारांवर उभे प्रवासी. मात्र कालच्यासारखे घडण्याची शक्यता कमीच कारण तशीच आदर्श स्थिती नव्हती. ट्रेनने भोंगा दिला आणि सुटली, तसे अचानक एक लहानगी, वय वर्षे फार तर फार दहा-बारा, कळकट मळकट पेहराव, खांद्यावर येऊन विस्कटलेले आणि कित्येक दिवस पाणी न लागल्याने कुरळे वाटणारे केस, अश्या रस्त्याकडेच्या झोपडपट्ट्यांमध्ये आढळणारी टिपिकल अवतारातील मुलगी कुठूनशी आली आणि त्या नुकत्याच सुटलेल्या ट्रेनच्या अगदी जवळून तिच्या गतीच्या विरुद्ध दिशेने चालू लागली.
मुंबईत शक्यतो असे करणे सारे टाळतातच, कारण पुन्हा कधी कोण आपल्याला चालत्या ट्रेनमधून टपली मारून जाईल सांगता येत नाही. त्यामुळे साहजिक माझी नजर तिच्यावरच खिळली. पण या चिमुरडीचा हेतू काहीतरी वेगळाच दिसत होता. तिने स्वत:च ट्रेनच्या दारावर उभे असलेल्या प्रवाश्यांना हूल द्यायला सुरुवात केली. बरे हूलही अगदी ट्रेनच्या दिशेने झुकून, कंबरेत किंचितसे वाकून, मारण्याच्या आविर्भावात हात अगदी डोक्याच्या वर उगारून, असे की समोरची व्यक्ती दचकून मागे सरकायलाच हवी. माझ्यापासून ती दूर पाठमोरी जात असल्याने तिचा चेहरा वा चेहर्यावरचे भाव मला टिपता येत नव्हते, पण नक्कीच वेडगळ असावेत हा पहिला अंदाज. पहिल्या दरवाज्याला तिने हे केले तेव्हा तिथले प्रवासी या अनपेक्षित प्रकाराने भांबावून गेले, अन भानावर आले तसे मागे वळून तिला चार शिव्या हासडाव्यात असा विचार करेस्तोवर ती आपल्याच नादात पुढच्या डब्यापर्यंत पोहोचली देखील होती. तिथेही तिने हाच प्रकार केला आणि मी समजलो हे प्रकरण काहीतरी वेगळे दिसतेय.
पुन्हा एकदा दारावरची मुले बेसावध असल्याने त्यांचीही तशीच तारांबळ उडाली. मात्र झालेल्या फजितीचे उत्तर द्यायला म्हणून आपण त्या मुलीचे काहीच करू शकत नाही हे भाव त्यांच्याही चेहर्यावर स्पष्ट दिसत होते. आता मी हे सारे एखादा फनी विडिओ बघावे तसे एंजॉय करू लागलो. कारण सुरुवातीला मला वेडसर, आणि मग आचरट वाटणारी मुलगी अचानक धाडसी आणि निडर वाटू लागली होती. काल जो प्रकार अनुभवला त्याच्याशी मी हे सारे नकळत रिलेट करू लागलो आणि जणू काही त्याचीच फिट्टंफाट करायला म्हणून नियतीने हिला धाडले असे वाटू लागले. भले आताचे हे दारावर उभे असलेले प्रवासी कालच्यांसारखे मवाली गटात मोडणारे नसावेतही, तरीही ती मुलगी एका अर्थी प्रस्थापितांना काटशहच देत होती. हळूहळू ट्रेन वेग पकडत होती. आणि मागाहून येणार्या डब्यातील प्रवाश्यांना एव्हाना या मुलीच्या पराक्रमाचा अंदाज आला होता. आता त्यातील एखादा हिच्यावर पलटवार करणार का या विचाराने माझेही श्वास रोखले गेले. आणि ईतक्यात पुढचा डब्बा आला तसे दारावरचे सारेच प्रवासी स्वताला सावरून आत सरकले. उलटून प्रतिकार करणे तर दूरची गोष्ट उलट बचावात्मक पवित्रा घेऊन त्यांनी तिचे उपद्रवमूल्य मान्य केले. त्या मुलीचे वर्तन भले चुकीचे का असेना, त्या मागे सरकलेल्या माणसांनाही ती तशीच हूल देऊन पुढे सरकली तेव्हा तिच्या चेहर्यावर कदाचित विजयश्री मिळवल्याचे भाव नसतीलही, पण माझ्या चेहर्यावर मात्र हास्याची लकेर उमटली. या जगात प्रत्येकाला बाप मिळतोच तसे एखादी तुमची आई ही निघू शकते हे त्या मुंबई गर्लने दाखवून दिले होते.
- तुमचा अभिषेक
झकास..
झकास..
छान लेख.
छान लेख.
मस्तच...
मस्तच...
मस्त...
मस्त...
"ये है मुम्बई मेरी जान "
"ये है मुम्बई मेरी जान " ...कमाल आहे ....
छान लेख अभिषेक, Tit for Tat
छान लेख अभिषेक,
Tit for Tat
धन्यवाद सर्व प्रतिसाद !
धन्यवाद सर्व प्रतिसाद !
५ मे ... २०१४ चा लेख
५ मे ... २०१४ चा लेख
आज हा फेसबूक मेमरीत आला
आवडला. ऑफेन्स इज द बेस्ट
आवडला. ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स.
५ मे ... २०१४ चा लेख
५ मे ... २०१४ चा लेख
आज हा फेसबूक मेमरीत आला .
>>> तुम्ही जुन्या आय डी वरून खूप छान लिखाण करायचात.
तुम्ही जुन्या आय डी वरून खूप
तुम्ही जुन्या आय डी वरून खूप छान लिखाण करायचात.>>>+१ आता फक्त समाज सुधारक धागे काढणार. मरू देत न त्यांना. दारू पिऊ द्या. गुटका खौंद्या. जुव्वा खेळून्द्या. प्लीज पुन्हा एकदा अस लिवायला लागा.
धन्यवाद सामो, प्रथम म्हात्रे
धन्यवाद सामो, प्रथम म्हात्रे
@ प्रथम म्हात्रे. अहो जे काही बरेवाईट आहे तेच ईथूनही केले आहेच. फक्त ईथे ईतर पसाराही फार असल्याने वेचावे लागत असेल
केशवकूल
केशवकूल