गर्जा महाराष्ट्र माझा: महाराष्ट्र शाहीर साबळे चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 30 April, 2023 - 10:14

जर तुम्ही एखाद्या दगडाखालीच राहात असाल तरच " बहरला हा मधुमास नवा" हे गाणे व त्यावरील रील्स बघितली नसतील. प्रत्येक जण व त्याच्या काकूने व काकांनी सुद्धा ह्या गाण्यावर नाचून घेतले आहे तर कश्यातला आहे हा गोड प्रकार ह्या कुतुहलाने शोध घेतला तर शाहीर साबळे ह्यांच्या जीवनावर, कला प्रवासावर आधारित महाराष्ट्र शाहीर साबळे हा चित्रपट म. दिनाच्या लांबवीकांतालाच प्रदर्शित होणार आहे असे समजले.

शुक्रवारी सर्व सिस्टिम्स बंद करुन घरी आले. शनिवारी सकाळी लगेच म्याडम या बरं अशी लडिवाळ गर्भित धमकी आल्याने व मला काही उद्योग नसल्याने जनकल्याणार्थ ( आजकाल योगक्षेमं वहाम्यहं नी पण जन कल्याण सोडले आहे!!!) हपिसला जायचे ठरिवले व अडलेल्या पब्लिक ला सोडवुन पुढे म. शा. सा बघायचा पिलान केला. बुकमायशो वर तुरंत बुकिंग एका मिनिटात एम तिकेट आले पण. व्हिवीआना मॉल मध्ये एक व्हीआयपी म्हणून थेटरांचा समुह आहे त्याचेच काढले. मराठी चित्रपटास मॅक्स प्रोत्साहन मिळावे हीच सदिच्छा. ५६० रु. व नॉन कँन्सलेबल. १२ वाजता हजर. मग लाउंजमध्ये थोडावेळ आराम केला व थाइ चिकन ग्रीन करी व राइस बोल ऑर्डर केले . त्यात हपिसातून " आहात का तुम्ही अजून असा लैच लडिवाळ फोन आला, त्याला विनम्र पणे " नाही " असे उत्तर दिले. एकदाचे थेट्राचे हाउसकीपिन्ग/ क्लीनिन्ग संपवुन एकदाचे अंधार्‍या पोटात घे बाबा असा धावा करून आत शिरले. मला पण कामाचा कंटाळा येतो. कोतबो.. कोतबो.
==============================================================================================

म शा सा चित्रपट सुरू होतो तेव्हा मशासा कोणत्याशा युरोपिअन देशात एका चौकात सर्वदेशीय कला प्रदर्शन चालू असते तिथे आपला पवाडा म्हणत असतात. व त्याला भारावुन एक चॅनेल त्यांची मुलाखत घ्यायचे ठरवते व एक माणूस त्यांचा दुभाषा म्हणून येतो. पूर्ण चित्रपट ह्या मुलाखतीच्या स्वरुपातच आहे व मधून मधून आठवणी / फ्लॅशबॅक्स आहेत. शाहिरांचा मराठी बाणा सुरुवातीसच दिसतो. ऑल इंडिया रेडिओ मुंबई केंद्राचे चीफ अय्यर!! त्यांना पोवाड्यात सारखे महाराष्ट्र महाराष्ट्र आले नाही पाहिजे नाहीतर तुमचे गाणे बॅन करीन अशी उघड धमकी देतो. मग शाहीर चेवाने पेटून महाराष्ट्र शब्द असलेले वाक्य सहा सात वेळा वेगवेगळ्या पद्धतीने गातात. अगदी रोमांचक.

चित्रपटाची मांडणी व दिग्दर्शन अगदी सरधोपट आहे. एक फेज मग दुसरी फेज असे दाख्वत राहतात. व तुम्हाला मराठी संगीताचे/ लोकसंगीताचे प्राथमिक ज्ञान - माहिती - तरी असणे आवश्यक आहे नाहीतर चित्रपट कंटाळ वाणा वाटू शकतो. शाहिरांच्या बालपणा पासून सुरुवात आहे. बारका मुलगा चांगला गातो पण त्याने रूढ अर्थाने जीवनात यशस्वी व्हावे अशी आईची धारणा असते . ती त्याच्या डोक्यातून गाण्याचे सुरांचे खूळ घालवायचा प्रयत्न करते. वडील कीर्तनकार असतात पण स्वभावाने शांत, आई मुलाला माहेरी पाठवते; पुढे मुंबईला पाठवते व मुलाने नोकरी करावी चार पैसे कमवावेत अशी अपेक्षा करते. आईची व्यक्तिरेखा वैतागलेली, नौवारी साडी नेसलेली, पोटुशी असतानाही दोन घागरी पाणी दुरून चालत आणणारी खेडेगावातली स्त्री आहे. - ते गाव पसरणी. आजी तर डाउन राइट खडूस - चाइड अब्युजर लेव्हल. पण शाहिरांना साने गुरुजी भेटतात व त्याला गाणे पुढे न्यायला प्रोत्साहन देतात. गाडगे महाराज आजीकडे मुलगा मागतात तर ती जावयाचे मूल देउ शकत नाही म्हणून नाकारते. तरुण होई परेन्त शाहीर जीवनातले सूर दडपून टाकतात व गिरणी कामगार व्हायचा प्रयत्न करतात. एका क्षणी त्यांना जाणवते की आपण गाणेच केले पाहिजे व तसे आईला सांगून तिचा राग ओढवून घेतात.

आता चित्रपटा तील सर्वात गोड भाग आहे. अंकुश चौधरी ( शाहीर) वयात येतात व गाणे व शाहिरी करत असतात तेव्हाच भानुमती त्यांच्या जीवनात येते. प्रेम जमते. पसरणीच्या भैरवनाथाच्या आशिर्वादाने ते लग्न करतात. तेव्हाचे त्यांचे बाशिंग फार छान दिसते जरूर बघा. वडील सुनेला ज्ञानेश्वरी भेट देतात नवीन जोडपे तुझी कविता व माझा आवाज मोड मध्ये असतात ते क्ष ण फार सुरेख टिपले आहेत. ह्या प्रेमकथेतच ते बहरला मधुमास गाणे आहे.हा भाग सर्वात मस्त जमलेला आहे. नवीन जोडपे नव्या घरी येते तेव्हा शाहिरांचे मित्र/ सहकलाकार पदर ओढून नववधूला ओवाळतात तो सीन फार भारी. असे प्रेम कायम राहावे जीवनात असे वाट्ते पण अलास शाहिरांच्या जीवनातही प्रेमाला ओहोटी लागते व चार मुले पदरी टाकून भानुमती वेगळी होते. सेपरेशनचा प्रसंग अगदीच प्राथमिक पद्धतीने घेतला आहे.

पुढे शाहिरांच्या जीवनातील चढउतार व गाण्याची वाटचाल दाखवली आहे. मराठी संगीतातील नाट्यसंगीत सोडून जवळ जवळ सर्व प्रकार घेतले आहेत. बालगीत, ओवी, भक्तीगीत, अभंग, प्रेमगीत/ भावगीत, लग्नाची लोक गीते, पोवाडे, गोंधळ. देवाची गाणी, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या. उदा. ही सर्व गाणी आधीपासून माहित असल्याने ऐकायला फार छान वाटतात. अजय function at() { [native code] }तूल संगीत उत्तम आहे. कारण बॅक ग्राउंड मटेरिअल मुळात फार छान व स्ट्राँग आहे. मध्यंतरानंतर मात्र आपण मराठी बाणा बघत आहोत की काय
असा भास होउ लागतो तेव्ढ्यात बाळ ठाकरे ह्यांचा प्रवेश होतो. बाळ ठाकरे, शिवसेना पहिला दसरा मेळावा ह्याच्या हृद्य आठवणी जाग्या होतात. सध्याच्या परिस्थितीत तर संवाद अगदीच हलवून टाकतात.

राज्याची स्थापना होते तेव्हा व नंतर यशवंतराव चव्हाणही दिसतात. साने गुरुजी, गाडगे बाबा, कर्मवीर भाउराव पाटील, राजा मयेकर व अशीच मराठी व्यक्तिमत्वे कथानकाचा भाग म्हणून येतात तेव्हा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. वेळो वेळी राज्यात उभे राहिलेले समर प्रसंग, देवळात हरिजनांना प्रवेश, त्यासाठी उपोषणे, मुंबईतील आंदोलने, देशातील दुष्काळ, बदलती राजकीय समीकरणे मराठी माणसाची कुचंबणा, कथानकाच्या अनुषंगाने फिट बसवली आहेत. ह्या सर्वांची मला पूर्वीपासून माहिती होती त्यामुळे ते बघायला बरे वाटते. अनेक वेळा सद्गदित व्हायला होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर शाहीर स्वतः रजनीकांत सारखी उंच उडी मारून डि एम ऑफिस वर झेंडा रोवतात तो प्रसंग मात्र जास्तच वाटतो. गायक आहे की सुपरहिरो?! नव्या तरुण प्रेक्षकांना कितपत रुचेल कोण जाणे.

हलाखीच्या परिस्थितीत असताना साबळे कलकत्त्याच्या लोककला संमेलनात आपली कला पेश करतात व मुली कलांची देवाण- घेवाण करतात तेव्हा त्यांना एका वेगळ्या प्रतलाची जाणीव होते . त्यांची मुले कला पार्टी पुनरुज्जिवीत करतात व नव्याने कला पेश करु लागतात तेव्हा त्यांंना आपले संचितत आता नव्या पिढीकडे सोपवले पाहिजे हे पटते( व्हेरी रिलेटेबल )

एक फारिनर बाई ( मुलाखत घेणार्‍या कृ बरोबरची) त्यांची स्वाक्षरी मागते तेव्हा ती स्वाक्षरी सोन्याची होते व जय जय महाराष्ट्र गाण्याने चित्रपटाची सांगता होते. हे गाणे एका वेगळ्या पट्टीत सुरू होते. युट्युब वर जे उपलब्ध आहे ते मला आजिबात आवडले नाही. पण चित्रपटात गाण्याच्या मध्ये साउंड इंजिनिअरिंग करुन मूळ गाणे घातले आहे जे एकदम अंगावर काटे आणते. शेवटाला श्वेतश्याम फोटो दाखवले आहेत. प्युअर नॉस्टाल्जिआ.

बहरला हा मधुमास नवा मात्र लै भारी झ्याक श्रेया घोषाल आवाज सुमधुर आहे. नव्या प्रेमाचा ताजेपणा, गोडवा आहे. गोंधळाचे गाणे टिपिकल अ-अ. हे मला थेट्रात ऐकायचे होते. मस्त वाटते. चार गाण्यांचा अल्बम स्पॉटिफायवर उपलब्ध आहे. पण सिनेमात चार चार ओळींची खूपच वेगवेगळी गाणी घेतलेली आहेत. अ-अ म्युझिकल असेच चित्रपटाचे पोझिशनिंग आहे. संगीत हाच चित्रपटाचा प्राण आहे व ती बाजू मजबूत आहे. दिग्दर्शन ओके टाइप. कला दिग्दर्शन सुरेख आहे. वेगवेगळे भाषा प्रकार( मराठीचेच) घेतले आहेत. अहिराणी पण आहे. जुन्या काळातील दागिने, चौकटीच्या साड्या, जग्ग घेतलेली बस स्टँड वर बसलेली बाई, साने गुरुजींची वेषभूषा, बारकावे नीट पकडले आहेत.

अंकुशने व्यक्तिरेखा चांगली उभारली आहे. फार डेप्थ नाही पण नीट अभिनय. सना शिंदे काही मला फार आव्डली नाही. चेहर भावहीन व निबर वाटतो. अभिनयाला तिला काही स्कोपच नाही आहे फारसा. व तिच्या जागी येते ती अश्विनी ( आईकुठे काय करते मधली अंघा!!) ही तेच पुढे चालू ठेवते. व्हेरी डिसपॉइंटिन्ग. कोणीतरी दुसरी नटी घ्यायला हवी होती. बाकी सर्व व्यक्तिरेखा आपापल्या जागी.

महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनाच्या निमित्ताने मला हा चित्रपट बघायचाच होता. संगीत आव्डत असेल तर नक्की आवडेल. जय हिंद जय महाराष्ट्र फारच दिवसांनी थेट्रात जाउन पिक्चर बघितला . मजा आली खूपच. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याचा मराठी बाणा अबाधित राहतो हे नक्की.
===============================================================================================
खूपच दिवसांनी बाहेर पडले होते कामाव्यतिरिक्त म्हणून बहरला हा मधुमास गुणगुणत शॉपिन्ग केली नल्लीमधून साड्या, क्रॉसवर्ड मधून एक पुस्तक व एक सॉफ्ट टॉय, चक्क एक बास्केट बॉल ( सुगाच्या प्रेमानिमित्त) , शूज व एक पाण्याची बाटली डिकॅथलॉन मधून खरेदी केली व जी पे केले सर्व ठिकाणी. सर्व ठिकाणी तरूण स्टाफ व बिलिंग एक्सेक्युटिव्जशी मराठीतूनच गोड बोलले. गुड टाइम वॉज हॅड. नेक्स्ट डे पोन्निअन सेल्वन भाग दोन बघितला आज रविवारी. तो ही लै भारी. बाईंनी धागा काढला की तिथे लिहीन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पाहिला .
मला या सिनेमातील गाऊ नको किस्ना हे गाणे जाम आवडले .
त्या बालगायकाला पाहिजे तसेच गायला लाऊन अजय अतुल ने चार चांद लावले आहेत

आई ग्ग!! काय खुसखुशीत ओळख करुन दिलीत अमा. खूप मजा आली वाचायला. Happy अप्रतिम!
>>>>>बाईंनी धागा काढला की तिथे लिहीन.
बाई, मनावर घ्या Happy

आले आले. Proud
मस्त लिहिलंय, अमा. Happy
दगडाखाली नाही, पण पीएसच्या भल्यामोठ्या साउंडप्रूफ बबलमध्ये गेले काही दिवस असल्यामुळे गाणं आणि रील्स पाहिली नव्हती. तुमचा रीव्ह्यू वाचल्यावर गाणं शोधून ऐकलं. कर्णमधुर आहे खरंच. आता बाकीची गाणीही ऐकते.

लहानपणी शाहीर साबळ्यांचा कार्यक्रम ओपन एअरमध्ये पाहिल्याचं अंधुक आठवतं, अनेक गीतंदेखील परिचयाची आहेत.

दूरदर्शनवर एका मुलाखतीत त्यांना लेक देवदत्तने संगीतबद्ध केलेलं 'मनाच्या धुंदीत लहरीत ये ना' गीत गाण्याची विनंती केली गेली होती. त्यांनी ते ताठ मानेने पोवाड्याइतक्याच जोषात ठो ठो गायलं होतं अशी एक मजेशीर आठवणही आहे. 'प्रफुल्ल होउनि सपुष्प ठेले - ठेले म्हणजे ठाकले!' अशातलाच प्रकार. त्यात काही प्रेमाबिमाचं सुरू आहे अशी ऐकणार्‍याला दुरूनसुद्धा शंका आली नसती! असो. Happy

मला एकूण या चरित्रपटांचं एव्हाना अजीर्ण व्हायला लागलं आहे, त्यामुळे स्ट्रीमिंगवर आला की/तर कदाचित बघायचा विचार करेन, थिएटरमध्ये नक्कीच नाही.

छान खुसखुशीत लिहीलंय.

शाळेत असताना गणेशोस्तवात शाहीर साबळे प्रोग्रॅम लाईव्ह बघितलेला, राजा मयेकर होते सोबत, खुप आवडलेला. नंतर महाराष्ट्राची लोकधारा टीव्हीवर बघितलेली.

छान लिहिलंय.

'महाराष्ट्राची लोकधारा'बद्दल सिनेमात काहीच नाहीय का? (अंकुश चौधरी, भरत जाधवसहित आजच्या कितीतरी कलाकारांची सुरुवात तिथून झाली असं मागे वाचलं होतं.)
लहानपणी एका शाळेच्या ग्राऊंडवर तो कार्यक्रम पाहिला होता. खूप आवडला होता तेव्हा.

He he.

thank you Asmita. Much love.

Biographic ही माहिती पट स्वरूपात च असायला हवी.
सिनेमा तो विषय cover करताना थकून जाईल
ट्विस्ट, रोमान्स, गूढ ,भय , अँक्शन .
मनोरंजन हा सिनेमाचा पाया आहे.
महाभारत,रामायण, छत्रपती न वर आधारित सिनेमे,.
ह्या मध्ये खूप नाट्य आहे .
म्हणून ते लोकांस आवडतात.
आताच्या सर्वोच्य व्यक्ती chya जीवनावर बायोग्रफी टाईप सिनेमा काढला तरी लोक ते बघणार नाहीत.
थोडे वास्तव जगात माणसाने असेलच पाहिजे

बहितला. चांगला आहे. थोडा बाळबोध वाटतो. अंकुश चा मेकप वगैरे पण नीट जमला नाहीये असं वाटतं. ऑड दिसत राहिलाय बर्‍याच फ्रेम्समधे.
साबळेंच्या जिवनाबद्दल काहीच माहित नव्हते ते कळले. गाणी मात्र सगळी माहितीची होती. त्यामुळे बोर झाला नाही.

अमा, फारच छान.
तुमचे लेखन बर्‍याच दिवसांनी वाचनात आले. भारी वाटले.

Back to top