स्थित्यंतर

Submitted by ज्येष्ठागौरी on 30 April, 2023 - 01:12

स्थित्यंतर
Change is hard at first,messy in the middle and glorius in the end!Robin Sharma
भोग सरायला योग यावा लागतो असं पूर्वीची माणसं म्हणायची. एखादी चांगली नसलेली गोष्ट संपण्यासाठी त्याचा तळ गाठावा लागतो असंही ऐकलं होतं (rock bottom stage) आणि एखादी चांगली गोष्ट आयुष्यात येण्यासाठीही योगंच यावा लागतो नक्की.असा एक योग चार वर्षांपूर्वी आला. अचानक नाही म्हणता येणार. त्याआधीची जवळजवळ सोळा वर्ष वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक दुःख,अनेक चिंता, वेदना भेडसावत होत्या.तशा त्या प्रत्येकालाच असतात आणि त्या त्या त्या व्यक्तीला मोठ्याही वाटतात.पण प्रत्येकाची तोंड देण्याची क्षमता वेगळी, पद्धत वेगळी आणि नंतर त्याचे शारीर आणि मनावर होणारे परिणामही प्रत्येकाचे वेगळे!
माझ्या मनावर आणि शरीरावर काही प्रसंगअसे बरेच व्रण सोडून गेले.पण त्या प्रत्येक कठीण प्रसंगात माझा चुलत भाऊ मला वारंवार सांगत राहिला की तुला विपश्यनेचा फायदा होईल. तू विपश्यना जरुर कर..पण तेंव्हा जमलं नाही म्हणजे योग आला नव्हता म्हणा किंवा हिम्मत होत नव्हती.तशी हवी तेंव्हा काहीही कारणं पुढं करु शकतो आपण आणि कधीकधी एखादी गोष्ट विनाकारण टाळत राहतो कारण मनातून ती असोशी नसते. माझ्याही मनातून मला हे सगळं खूप अवघड वाटत होतं.
पण ह्यावेळी माझ्या मनानं एकदाची उचल खाल्ली आणि मी विपश्यनेला जायचं ठरवलं. माझ्या या बेताबद्दल संमिश्र प्रतिक्रिया मला मिळाल्या मात्र त्यातल्या चांगल्या मी माझ्या बाजूनी आहेत असं धरलं.माझ्यासकट सगळ्यांच्याच मनात खूप साशंकता होती,कारण मला बोलायला खूप आवडतं आणि माणसांचा सहवासही खूप आवडतो. मी एकटी न बोलता कशी काय राहणार ही अगदी वैध शंका माझ्याही मनात होतीच. सगळ्यात महत्त्वाचं आणि कठीण म्हणजे मी घरापासून लांब जाणार होते.कुठल्याही बाईला हे फार जड जातं आणि आपल्याशिवाय कसं होईल घराचं, हे वयाच्या कुठल्याही
टप्प्यावर वाटत राहतं. मलाही ते वाटत होतं पण नवरा आणि मुलं ह्यांनी अगदी खुल्या मनानं, तू हे करुन पहायला हवंस असं सांगितल्यामुळे काही पर्याय उरला नाही!घरची व्यवस्था लावली.जी खूप जवळची माणसं आहेत, ज्यांना आपल्याशी संवाद नाही झाला तर काही वेगळं वाटू शकतं फक्त तेवढ्याच लोकांना सांगितलं आणि मनात खूप वेगवेगळ्या भावनांचं संमेलन तोलत निघाले.जुलै महिन्याचा शेवट होता,भरपूर पाऊस होऊन गेला होता.आळंदीला इंद्रायणी नदी चांगली भरुन वाहत होती,अगदी धडकी भरेल अशी!तिला आणि आळंदीला नमस्कार केला. मरकळला पोचले.नोंदणी झाली.तुम्ही स्वतःकडे कुठलीही मौल्यवान चीज ठेवू शकत नाही, ती घरी ठेवून यायची असते अथवा तिथे लॉकर मध्येच ठेवायची असते.हे सगळं ठाऊक असल्यानं घरीच ठेवून आले होते.सोडायला आणि न्यायला नवरा येणार असल्यानं बाकी काही नकोच होतं बरोबर.एका जवळच्या मैत्रिणीनं कमीत कमी सामान घे असा सल्ला दिल्याने फार हलकं वाटत होतं.मी फोनसकट सगळं घरी ठेवून आले होते.त्यामुळे नोंदणी आणि इतर कामं फार लवकर झाली आणि मागच्या निवासस्थानाकडे जायला निघाले.स्त्री,पुरुष ह्यांचं वसतिगृह, जेवण्याची व्यवस्था संपूर्ण भिन्न आणि ध्यानधारणेची व्यवस्थाएकाच हॉलमध्ये असली तरी अजिबात संपर्क ना येणारी असते.संपूर्ण परिसर हा अतिशय सुरक्षित असल्यामुळे एकटी स्त्री ही पहाटे साडेचार वाजता निर्भय मनानं ध्यान करायला जाऊ शकते. खूप शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य असा परिसर आहे तो.चालत असताना अचानक माझा पाय सटकला आणि पडले आणि साधारण जिम्नॅस्ट्स करतात तशी एक पाय पुढे आणि एक मागे अशा विचित्र अवस्थेत पडले.नवरा आणि मुलगा होते बरोबर त्यांनी दोघांनी मला उठवलं.मला झालेल्या एका भीषण अपघातामुळे झालेल्या गुडघ्याच्या दोन शस्त्रक्रियांनंतर कुठलीही दुखापत म्हणजे काय विचारता!मनात भीतिचं हे मोठं मोहोळ उठलं. पण चालता आलं त्यामुळे फार मोडतोड झाली नसावी अशी खात्री पटली. खोली बघितली स्वच्छ आणि आरामदायी, आता पुढचे काही दिवस मी इथे राहणार होते. नवरा आणि मुलगा थोड्या वेळात परतले आणि माझ्या तिथल्या वास्तव्याला सुरुवात झाली.मी माझी खोली लावून घेतली आणि शांत बसून राहिले.
नंतर मग सर्व स्वाध्यायींसाठी सर्व सूचना अगदी नेमक्या शब्दात सांगण्यात आल्या.काय शिस्त पाळणं गरजेचं आहे हा त्यातला महत्वाचा भाग होता.ही एक मनाची शस्त्रक्रिया असल्यानं, जसं तुम्ही कुठल्याही शस्त्रक्रियेतून, ओपरेशन थेटर मधून पळून जाऊ शकत नाही तसं इथूनही जाऊ नका असंही सांगण्यात आलं.आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मौन. सुरुवातीलाच हे मौन हे 'आर्यमौन'असणार आहे असं सांगितलं गेलं.आर्यमौन म्हणजे नुसतं शब्दांचंच नव्हे ते मुद्रा किंवा देहबोलीचं मौन. कोणाकडेही बघायचं नाही, अगदी कटाक्षही टाकायचा नाही, स्मितरेषा नाही,हावभाव नाही.असं संपूर्ण शब्दांचं आणि देहबोलीचं मौन!कोणाशीही कुठल्याही प्रकारे संवाद साधता येणार नव्हता.पण काही अडचण असेल तर तिथल्या सेविका(ह्याही आपल्याबरोबर कोर्स करत असतात,त्यांना लिहून कळवता येते)
मला खाली बसता येणार नाही अशी आधीच विनंती केल्याने मला एक छान चौकी दिली होती ह्याच ठरलेल्या ठिकाणी मी पुढचे अकरा दिवस साधना करणार होते.तुमचं आसन हे तुम्हाला तासनतास बसायसाठी असतं आणि मला वाटतं तुमचा aura आभा त्याभोवती असल्यानं, ते बदलायचंही नसतं. त्या ठिकाणी जाऊन पोहोचले,हातातला बॅज त्या आसनाला डकवला.सूचना आणि गोएन्काजींचं धनिमुद्रित केलेलं व्याख्यान ऐकून त्या दिवसाची समाप्ती झाली.मिट्ट काळोख,चिट्ट शांतता आणि मनात मात्र विचारांचा डोंब उसळलेला! वेगवेगळेच विचार येत होते मनात. घरची,घरच्यांची आठवण येत होती.मनात खूप शंका,उत्सुकता, हुरहूर सगळं एकवटलं होतं..एकटं वाटत होतं आणि स्वतःचीच सोबतही होत होती.
गुडघ्याला भरपूर खरचटलं होतं ते चटचट चटचट ठणकत होतं.मग कधीतरी झोप लागली.
दुसऱ्या दिवशीपासून नवीन दिनचर्या सुरु झाली. साधारण पहाटे पावणेचारला उठून आवरुन साडेचार वाजता ध्यान करायला जायचं असायचं.साडे चार ते साडे सहा ध्यान आणि पठण ऐकणे आणि साडेसहाला सकाळचं खाणं. अतिशय चविष्ट असं खाणं असायचं.सात्विक!
इथे मी एक गोष्ट जरुर सांगीन की हे जेवण अतिशय सात्विक असतं, हे माझ्या चुलत भावाला नंतर सांगितलं तेंव्हा त्यानं सांगितलं की तिथे स्वयंपाक करणाऱ्या मावशींनी अनेकदा विपश्यना केली आहे.स्वयंपाक करताना गोविंद गोविंद मनात म्हणणारी आई आठवली.स्वस्थ मन असलं की स्वास्थ्यपूर्ण स्वयंपाक!
तिथून येऊन आपलं सगळं आवरायचं आणि मग आठ ते अकरापर्यंत ध्यान आणि विपश्यना.अकरा वाजता जेवण.तेही उत्तम चवीचं जेवण.मग एकपर्यंत विश्रांती. परत एक ते पाच अजून एक सत्र, पाचला संध्याकाळचं जेवण आणि मग सहा ते सात एक सत्र आणि मग गोएंका गुरुजींची ध्वनिमुद्रित व्याख्यान रात्री नऊला दिवे बंद! अशी विभागणी असायची.हे सर्व अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं चालतं, त्यात कुठलीही हयगय होत नाही आणि केलेली चालत नाही.एक दिवसात घडी बसली.सगळं व्यवस्थित लक्षात आलं.दहा दिवसांची, संसारी माणसाला (माझ्या बाबतीत बाईमाणसाला) पचेल इतपतच पण कडक तपश्चर्या!
सगळ्यात अवघड गोष्ट होती ती म्हणजे स्वस्थ बसणं.स्वस्थ बसणे ह्याला आपण फार बेकार समजतो. निष्क्रिय समजतो.आपल्याला सतत काहीतरी करायची सवय असते ना!धडपड ही आपल्या श्वासाइतकी नैसर्गिक झालीये आपल्याला..ना शारीर ना मानसिक स्वस्थता..अशा शरीराला आणि मनाला एका जागी बसवणं हे महाकठीण म्हणून हे दहा दिवस फार महत्वाचे. पहिले दोन दिवस तर फार चुळबूळ झाली.सर्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय बंड करुन उठली. शरीरातल्या वेगवेगळ्या दुखऱ्या अवयवांकडे सतत लक्ष जायला लागलं, मनासकट सगळ्या. मग सारखं डोळ्यातून पाणी वहायला लागलं.निसटून गेलेल्या गोष्टी,सोडून गेलेली माणसं, झालेल्या चुका,अपयश, अपमान हे सगळे एरवी कुठं दडलेले होतं काय ठाऊक पण आता बाहेर येऊन डोळ्यातून वाहायला लागलं.डोळे पुसायला माझ्याशिवाय कोणीच नव्हतं आणि मुळात माझे वाहणारे डोळे बघणारंही कोणीच नव्हतं त्यामुळे बाहेर पडणाऱ्या धो धो पावसाबरोबर माझे डोळे अविरत वहात राहिले. त्यामुळे दोन दिवसांनी खूप स्वच्छ निरभ्र वाटायला लागलं. विपश्यनेचे ते दहा दिवस माझ्या आयुष्यात मोठं स्थित्यंतर घेऊन आले.
मला त्या दिवसांनी श्वासाबरोबर राहायला शिकवलं.भूत भविष्य आणि भवताल,म्हणजे वर्तमान! ह्यातलं वर्तमान हे सगळ्यात महत्वाचं, त्याच्याकडे बघणं हेच खरं आहे.
सम्यक दृष्टीनं सुख दुःखाकडे बघणं.अर्थात हे सोपं नाही पण निदान तिकडे बघायची एक दृष्टी आली..मी आजही भूतकाळात पुष्कळ रमते पण आता त्याचा त्रास होणं कमी झालं,त्या सगळ्या गोष्टींकडे एक सापेक्ष दृष्टी आली.सुख दुःखाची आंदोलनं अजूनही आहेत पण टोकाची नाहीत आणि थोडं शांतपणे त्याकडे बघता येतंय, हेही नसे थोडके!आपल्या आत डोकावता आलं ह्या दहा दिवसांत.इतर कोणी आजूबाजूला नसल्यानं काही कबुली स्वतःला देता आल्या.unembellished अशा काही गोष्टींचा झळाळ डोळ्यांसमोर आला आणि आश्चर्य म्हणजे त्यानं डोळे दिपले नाहीत तर निवले..
इथे तुम्ही एखाद्या भिक्कूसारखं वावरता.इथलं वास्तव्य आणि भोजन निःशुल्क असतं. कमीतकमी वस्तूंमध्ये दिवस व्यतीत करता.तुमच्याकडे कुठलीही वस्तू विकत घेण्यासाठी साधनं नसतात.तसंही इथं काहीच घ्यावं लागत नाही. कोणीतरी रांधलेलं तुम्ही जेवता(इथलं वास्तव्य आणि भोजन संपूर्ण निःशुल्क असतं) आणि व्रतस्थ राहता. कुठल्याही संसारी स्त्री पुरुषाला नेहमीच्या जगात हे शक्य नाही पण इथले दहा दिवस हे वेगळेच असतात. मौजमजा करायला इथे कोणीही राहू शकत नाही.ही सहल किंवा हवापालट नाही.विपश्यना ही गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे आणि ती सामान्य माणसाला जमेल इतकी सहजही आहे.
आपण स्वतःला कधीच गांभीर्याने घेत नसतो,मनाकडे तर दुर्लक्ष करायची आपली जुनीच सवय.पण शिस्त असली आणि एकंदर हे करायची मनोमन इच्छा असल्याशिवाय होऊ शकत नाही.Learn,unlearn and relearn ह्या तिन्ही गोष्टींना खुल्या दिलानं सामोरं जायचं असेल तर विपश्यनेचं आभाळ खुलं आहे.मी हे सगळं त्यातलं भौतिक स्वरुप सांगितलं आहे, खरा मनावर होणारा परिणाम हा ज्याचा त्यानी अनुभवून घ्यायचा आहे आणि तो आयुष्यभर पुरेल एवढा मोठा आणि खोल आहे.त्याचे मनावर आणि शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम कायम जाणवतील असेच आहेत.Your entire life happens inside your body. It's the one home you will always occupy and can never sell.James Clear..हे वाचल्यावर तर विपश्यनेमुळे होणारे सकारात्मक मानसिक आणि काही शारीर बदल जाणवले हे नक्की.मला अजूनही त्या वास्तव्याची आठवण येते.आठवतं ते दृश्य म्हणजे पहाटे सव्वाचार वाजता मी चांगल्या जोरदार पावसात एक छत्री आणि छोटा टॉर्च घेऊन मिट्ट काळोखात ध्यान करण्याच्या हॉलकडे चालतीये.हवेत आर्द्र गारवा आणि हिरवा वास अनुभवत,अतिशय सुरक्षित वातावरणात,ती स्वस्थ भावना मनात घोळवत..माझ्या आयुष्यातलं हे स्थित्यंतर फार शांत आणि सुखद झुळूक घेऊन आलं. आपल्या अतीव सुखाच्या आणि परीक्षेच्या क्षणीही त्या क्षणांचा आठव यावा ह्यातंच त्या दिवसांचं श्रेय आहे.मी पूर्ण बदलले का ह्याचं उत्तर 'नाही' असंचं येईल पण वाटचाल नक्की सुरु झाली.माणसात पूर्ण बदल होतो किंवा रातोरात होतो अशा भाबड्या गोष्टीवर विश्वास ठेवायचं वय गेलंय आता आणि समज आलीये.पण तरीही मला फरक जाणवलाच.
ज्यांनी आधी विपश्यना केली होती त्यांनी मला काही युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या होत्या ,कोणी सांगितले की तू बरोबर काही खायचे पदार्थ ठेव तुला भूक लागली तर काय करणार आणि कोणी पूर्ण विरुद्ध सल्ला दिला होता की कमीतकमी सामान घेऊन जा आणि काही दुसरे घेऊन जाऊ नकोस. त्याप्रमाणे बरंच कमी सामान घेतलं जाताना कापड्यांबरोबर फक्त एक चादर ,पांघरुण, एक गजराचं घड्याळ आणि अगदी जुजबी व्यक्तिगत वापराच्या वस्तू घेतल्या आणि खरोखर मला इतक्या कमी गोष्टी लागल्या(हा एक उत्तम धडा मिळाला).गेल्या दिवसापासून आरशावर नॅपकिन टाकून दिला आणि इतकं मोकळं वाटलं.आपल्या शरीराच्या पलीकडे आपोआप बघता यायला लागलं.मुळात आपल्याकडे कोणी बघत नसल्यानं आणि आपण कोणाहीकडे बघत नसल्यानं विकार कमीच जागृत होतात.
तुमचे तुम्ही असता, आणि स्वतःचं मन आणि शरीर समस्वरात असणं हीच विपश्यनेची खासियत आहे.
गुरुजींची प्रवचने ऐकताना अगदी शांत वाटायला लागलं.विचारांचा वेग अगदी मंद मंद झाला.आपल्या शरीरात होणाऱ्या छोट्याछोट्या हालचालींच्या जाणीवा जास्त तेज झाल्या.मुख्य म्हणजे शांत बसता यायला लागला.माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी होती ती जेवणाच्या सुट्टीत जेवण झालं की शांत डोळे मिटून बसायची, ना पेंगायची ना झोपायची पण शांत बसायची,एकदा न राहवून तिला विचारलं तर तिनं सांगितलं की ही तिच्या आजोबांची शिकवण आहे की दिवसाच्या साधारण मध्यात दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसायचं.तेंव्हा जरा वेगळं वाटलं होतं पण आता वाटतंय ते किती खरं होतं. स्वस्थ आयुष्य ही संकल्पना हद्दपार होत असताना तिची अपरिहार्यता समजून घेऊन त्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करणं हे खरं आयुष्य जगणं असावं! आवडत्या गोष्टी करणं एक आणि अगदी थोडा काळ स्वस्थ शांत बसणं हे दुसऱ्या ठिकाणी.मग रहाटीच्या कोलाहलात आपलं एक आतलं शांत गाव सापडत जातं. ह्या स्थित्यंतरानी मलाही त्या गावाकडे जायचा रस्ता किलकिला झाला.विचारांमध्ये स्पष्टता यायला मदत झाली. समतोल आचार आणि विचार ह्याचा मनापासून अभ्यास सुरु झाला.तिकडून पहिले दोन दिवस परत आल्यानंतर सगळाच खूप कोलाहल वाटला, माणसांचे वाहनांचे आवाज मोठे वाटले, नंतर परत हळुहळू मी त्या कोलाहलाचा भाग बनले.पण मनात एक शांतवणारी भावना आली. रोजची कर्तव्य मनापासून आणि कधी कर्तव्यबुद्धीनं पार पाडत असतानाच आपल्या आतल्या त्या शांत ज्योतीचं तेवणं,ते स्निग्ध अस्तित्व जाणवत राहतं.आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीनं व्यतीत करता यावं यासाठीचे हे अकरा दिवस मला खूप वेगळ्या विश्वात घेऊन गेले.एक विमल भावना मनात आली, मनावर रोजच्या आयुष्यात राग,लोभ, मोह,माया असूया ह्यांची बारीकशी धूळ बसते,विकार जागृत होत राहतात पण तिथं शिकवल्यासारखं त्यात गुंतणं आणि त्यातून गुंतागुंत होणं दोन्ही खूप कमी व्हायला लागलं.
माझ्याबरोबर एक क्ष किरण तज्ञ डॉक्टर होत्या(ह्या मला पहिल्या दिवशी भेटल्या आणि अगदी निघताना ,अन्यथा माझ्याबरोबर कोण होतं हे मी सांगूही शकणार नाही) त्यांची ही तिसरी विपश्यना होती.त्यांनी त्यांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या सर्व मदतनीसांना भरपगारी रजा देऊन विपश्यनेला अकरा दिवस पाठवलं होतं.माझी भाची अगदी पंचेचाळीस दिवसांचीही विपश्यना करुन आली आहे. माझ्या अनेक मैत्रिणींनी दहा दिवसाची विपश्यना केली आहे आणि त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम अनुभवले आहेत.
तशी आपल्या आयुष्यात छोटी मोठी,चांगली,वाईट स्थित्यंतरं सदैव होत असतातच, काही सांगून, काही अचानक, काही सुखदायी तर काही कष्टप्रद पण होत असतात.खरंतर हेच शाश्वत सत्य असतं. सगळ्या बदलांना सामोरं जाण्याची आपली तयारी असतेचं असंही नाही ,कधी कधी ती होऊच शकत नाही.पण एखादं स्थित्यंतर आपल्याला फार सुखद अनुभव देतं. आपल्या स्वतःच्या जवळ जाण्याचं हे स्थित्यंतर मला खूप काही देऊन गेलं.त्यानं माझं बोट धरुन मला माझीच नव्यानं ओळख करुन दिली.तिथं असलेली अत्यंत शिस्तीची दिनचर्या, गुरुजींचं अनिश्च (the principle of impermanence) हा शब्द उच्चारणं, गाँठे मत बांधो(हे संकारा-संस्कार असतात ) म्हणणं,ती आतून आलेली शांतता, अगदी थोडक्या वस्तूत होणारी गुजराण ह्या सगळ्यानी मला माझ्या स्वतःच्या खूप जवळ नेलं आणि तेच खूप महत्त्वाचं स्थित्यंतर माझ्या बाबतीत घडलं.if your compassion does not include you, it is incomplete. Jack Kornfield
©ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्वांना सूट होत नाही विपश्यना असे ऐकून आहे त्यामुळे कधी साहस करणार नाहीये. पण लेख खूप आवडला.

अजून एक खूप उत्कट लिखाण... तुझे नाव वाचले की मी हाताशी भरपूर वेळ असेल तरच लेख उघडते. कारण तुझे लिखाण हे वरवर नुसतेच डोळे फिरवावे असे नसते. मी तर तुझे प्रत्येक वाक्य वाचून, अनुभवून ( feel करून) मगच पुढचे वाक्य वाचते.
हा लेख सुद्धा खूप मनापासून लिहीलाय. खूपच जास्त रिलेट झाले. विपश्यना करण्याचे खूप दिवसांपासून मनात आहे. 10 दिवस सलग रजा मिळाली की नक्कीच करणार. तुझा लेख खूप मार्गदर्शक ठरेल.
<<<तू विपश्यना जरुर कर..पण तेंव्हा जमलं नाही म्हणजे योग आला नव्हता म्हणा किंवा हिम्मत होत नव्हती.तशी हवी तेंव्हा काहीही कारणं पुढं करु शकतो आपण आणि कधीकधी एखादी गोष्ट विनाकारण टाळत राहतो कारण मनातून ती असोशी नसते. माझ्याही मनातून मला हे सगळं खूप अवघड वाटत होतं.>>> या स्थितीतून जातेय.. Happy

सामो, खरंतर सूट न होण्यासारखं काही नाही त्यात, माझाही पिंड तो नव्हता/नाही पण one day at a time असं करत करत दहा दिवस सहज आणि अत्यंत enriching गेले..

धनवंती खूप धन्यवाद! रजेचा प्रश्न मलाही होता, पण खरंच खूप काही देऊन गेली ती रजा, पुन्हा जायचं मनात आहे पण पुन्हा सलग दहा दिवस रजा कधी मिळेल तेंव्हा जरुर जाईन..

छान अनुभुती असते....
मी विपश्यना धम्मगिरी ( इगतपुरी) येथे गोयंका गुरुजींच्या सानिध्यात केली...
काही महिने खूप भारावलेल्या अवस्थेत गेले.
नियमित सरावाने चिरशांती येते.

द सा किती छान! मी थोडं आधी तयार झाले असते तर गुरुजींच्या बरोबर करता आली असती.नियमित होत नाही रोजच्या धकाधकीत पण मनात आहे.

सुंदर लेख . मनापासून लिहिलेला !! एक अनुभव घ्यायचा म्हणून , जावेसे वाटते आहे , पण मनाची तयारी नाही . मौन आणि शांतता यामुळे मनात जे कल्लोळ उठतील त्याची भीती वाटते . तुमचे कौतुक वाटले , सुरवातीलाच पडझड होऊन सुद्धा तुम्ही पूर्ण केलेत , मनाने तशीच शरीराने ही तुम्हाला साथ दिली.
मायबोलीवर याच विषयावर पाचपाटील यांनी लिहिलेला लेख आठवला .

अश्विनी धन्यवाद! बहुतेक सगळ्यांच्या भिंती ढासळतात सुरुवातीला, पण मग जे उभं राहतं ते खूप चांगलं असतं.. अतिशय सुखद अनुभव होता माझा!

सुंदर लेख . मनापासून लिहिलेला !! एक अनुभव घ्यायचा म्हणून , जावेसे वाटते आहे , पण मनाची तयारी नाही . मौन आणि शांतता यामुळे मनात जे कल्लोळ उठतील त्याची भीती वाटते . >>> +100000 .
मागे एकदा , एका ट्रेनिंगच्या दरम्यान असा प्रयत्न केला होता . 1 मिनिटात trainer ला म्हटलं , I cant do it . त्यानंतर जवळ जवळ अर्धा तास आठवणींचे उमाळे येउन रडत होते. Trainer फार छान होती , तिने नंतर personal counseling केलं. कधीतरी वाटतं , निचरा होण्यासाठी हे फार आवश्यक आहे , पण अजून मनाची तयारी होत नाहीये

स्वस्ति, अनुभव फार वेगळा असतो आणि चांगला असतो हे नक्की सांगू शकेन मी.खूप शांत वाटतं नंतर हेही अगदी खरं!

पण मुळात विपश्यना म्हणजे काय? १० दिवस मौनव्रत करायचे म्हणजे विपश्यना का?
ती का करायची, हे कळले नाही. विपश्यनेची मला माझ्या आयुष्यात गरज का/केव्हा पडू शकेल?

अतिशय सुंदर लिखाण ! फार पूर्वी पेट्रोलची खूप प्रसिद्ध जाहिरात होती, '.fill and feel the difference ! ' विपश्यना अनुभवल्याखेरीज त्याची प्रचिती येणं अशक्य हे तो विषय निघाला की जाणवायचं . पण लेख त्या अनुभूतीच्या इतक्या नाजिक नेतो, हे कौतुकास्पदच ! धन्यवाद .

ऊबो मला वाटतं काही गोष्टी या फक्त गरजेपोटी नाही तर एक सेल्फ-अ‍ॅक्च्युअलायझेशन किंवा प्रायोगिक तत्वावर करता येउ शकतात.