कॉस्मिक सेन्सॉराशिप भाग -१

Submitted by केशवकूल on 5 April, 2023 - 10:14

कॉस्मिक सेन्सॉरशिप

भाग -१

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -१

ccccccccccccccccccccccccccccccccccccccc
‘भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” केवळ पुण्याचेच नव्हे तर आशियाचे गर्वस्थान आहे. डॉक्टर राघवेंद्र करमरकर आणि त्यांच्या टीमला आत्मविश्वास आहे/होता की युरोपातल्या CERNच्या एलएचसी प्रेक्षा थोडा मोठा, म्हणजे जवळपास तीस किलोमीटर परीघ असलेला बीएलएचसी, अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.
““अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.””डॉक्टर शास्त्री विषण्णपणे हसले. ते डॉक्टर करमरकरांच्या समोर बसले होते.
शास्त्री नुकतेच जीवघेण्या अपघातातून केवळ नशिबानेच वाचले होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल अकरा दिवस बेशुद्धावस्थेत इस्पितळात पडून होते. सगळ्यांनीच आशा सोडून दिली होती. पण कोमातून ते सही सलामत परत आले. दोन शस्त्रक्रिया झाल्यावर ते चालायला लागले होते. कुबड्यांच्या मदतीने का होईना पण ते चालायला लागले.. सहा महिन्यानंतर ते आज प्रथम प्रयोगशाळेत आले होते.
“स्वागत आहे, शास्त्रीजी. कशी आहे तब्येत? डॉक्टरांनी फिरायची परवानगी दिली का?” डॉक्टर करमरकरांनी डॉक्टर शास्त्रींचे स्वागत केले. डॉक्टर शास्त्रींच्या पुनरागमनाने त्यांच्या अस्वस्थ मनाला किती दिवसांनी आज जरा दिलासा मिळाला.
त्याला कारण ही तसेच होते.
“भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” ही संकल्पना जरी त्यांची होती तरी ती प्रत्यक्षात उतरवण्याच्या कामी त्यांच्या सहकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. पंकज, धुरी आणि शास्त्री हे त्यांचे सहकारी त्यांच्या बरोबर नसते तर? एकटा माणूस कुठे कुठे पुरणार? ते बिचारे रात्रंदिवस त्यांच्या बरोबर राबले. खांद्याला खांदा लाऊन त्यांनी काम निभाऊन नेले. करमरकरांना त्या तणावपूर्ण रात्री आठवल्या. कॉफीचे प्याले रिचवत केलेल्या चर्चा आठवल्या.
पंकज! पंकज म्हणजे उत्साहाचे उधाण होते. डॉक्टर करमरकरांनी जी दोन समीकरणे आतापर्यंत सिद्ध केली होती त्यातील दुसरे समीकरण केवळ पंकजमुळे सिद्ध करणे शक्य झाले होते.
“सर, तुम्ही ह्यावर शोधनिबंध का नाही प्रसिद्ध करत?” पंकजने त्यांना विचारले होते.
“पंकज, हा चार समीकरणाचा संच आहे. आपल्याला केवळ दोनच माहिती झाली आहेत. ही चार समीकरणे एकत्रितपणे सोडवायची आहेत. जेव्हा आपण तो टप्पा गाठू तेव्हा आपल्याला पुढचा मार्ग दिसेल. कदाचित दिसणारही नाही. ह्या क्षणी हे संशोधन अपरिपक्व आहे. म्हणून मी प्रसिद्ध करायचे टाळतो आहे.” करमरकरांनी आपली भूमिका मांडली.
“सर, आपण ही दोन समीकरणं जगातील वैज्ञानिकांसमोर मांडली तर कदाचित कुणीतरी कुठेतरी हे संशोधन पुढे नेईल. ह्यात मानवजातीचा फायदा आहे. अस मला वाटत.” पंकजने नम्रपणे आपली भूमिका मांडली.
हा विषय तिथेच संपला.
दुसऱ्या दिवशी पंकज ऑफिसला आला नाही. त्याचा फोनही आला नाही. हे पहिल्यांदाच होत होते. असेल काही काम म्हणून डॉक्टरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
तिसऱ्या दिवशीही पंकज ऑफिसला आला नाही.
ऑफिसातून घरी जाताना डॉक्टर पंकजला भेटायला त्याच्या घरी गेले. पंकज सोफ्यावर बसला होता. डॉक्टरांना पाहताच त्याने उठून डॉक्टरांना मिठी मारली.
“अरे रामप्रशाद, कितने दिनोंके बाद आज मेरे घर आना हुआ. गावमे सब ठीक तो है?”
डॉक्टरांची मति गुंग करणारा प्रकार होता. स्वतःला सावरून त्यांनी स्वतःला पंकजच्या मिठीतून सोडवले. काय बोलावे? त्यांना काही सुचले नाही.
आतून पंकजची पत्नी बाहेर आली.
“अरे पंकज, मी डॉक्टर करमरकर.”
“तू डॉक्टर? तू रामप्रशाद नाही? मला कुठल्याही डॉक्टरची गरज नाही. मी वेडा नाहीये.” पंकज पत्नीकडे वळून तिच्यावर खेकसला, “मी तुला काय सांगितले होते? डॉक्टरांना बोलावू नकोस म्हणून. मग हा डॉक्टर इथे कसा उपटला?” पंकज उद्दीपित होऊन थरथर कापत होता. “यू डॉक्टर, रास्कल. गेट लॉस्ट. दफा हो जा मेरी नजरोंसे.”
डॉक्टरांना काय करावे समजेना. त्यांनी पंकजच्या पत्नीकडे अपेक्षेने पाहिले.
“करमरकर, प्लीज तुम्ही जा. नंतर मी आपल्याशी सविस्तर बोलेन.” तिने “डॉक्टर” हा शब्द कटाक्षाने टाळला होता हे डॉक्टरांच्या लक्षात आले. ते मुकाट्याने उठले आणि निघून गेले. नंतर त्यांना जे समजले होते ते भयावह होते.
डॉक्टरांशी समीकराणांबद्दल बोलल्या नंतर पंकज जेव्हा घरी पोचला तेव्हा त्याला चित्र विचित्र भ्रम व्हायला लागले, कुठेतरी डॉक्टरांची राऊंड टेबल चालली होती. पंकजच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याबद्दल त्यांची चर्चा सुरु होती. पंकजला शब्द न शब्द ऐकू येत होता.
हा भ्रम पुन्हा पुन्हा होत राहिला.
त्या दिवसापासून त्याने डॉक्टरजमातीशी वैर धारण केले. औषधे घेण्याचे नाकारले.
आपल्याला कैद करण्यात आले आहे आणि जेलर आसुडाचे फटके मारत आहे हे दृश्य त्याने कितीतरी वेळा बघितले. वेदना इतक्या असह्य होत कि तो गुरासारखा ओरडत असे. मारू नका, मारू नका अशी गयावया करत असे.
पंकजने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
जेव्हा हे असह्य झाले तेव्हा त्याच्या पत्नीने हृदयावर दगड ठेऊन पंकजला मनोरुग्णालयात अॅडमिट केले आहे. आजमितीस तो तेथेच आहे.
धुरी. त्याचं काय?
धुरी हा तसं पाहिलं तर शास्त्रज्ञ गणला जाणार नाही. तो इंजिनिअर होता. खरा इंजिनिअर हा जन्मावा लागतो. त्याच्या प्रतिभेला मर्यादा नसतात. धुरी हा असा जातिवंत इंजिनिअर होता. त्याला तुम्ही इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिविल अशी लेबलं चिटकवणे हा त्याचा अपमान करण्यासारखे होते. धुरी जागेवर नसता तर हा कोलायडरचा प्रकल्प उभा राहिला नसता हे निश्चित.
तर हा धुरी एके दिवशी नाहीसा झाला. सकाळी ऑफिसला जातो असं सांगून घराबाहेर पडलेला धुरी पुन्हा कधी कुणाला दिसला नाही. त्याची कार ऑफिसच्या रस्त्यावर बेवारशी सोडलेली मिळाली. सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी त्याने कुणाशी तरी संभाषण केले होते. कुणाशी? तो तपशील मोबाईल मधून पुसला गेला होता. नऊ वाजून तीस मिनिटांनी त्याने डॉक्टर करमरकर आणि डॉक्टर शास्त्री ह्यांना एसएमएस केला होता
“काळजी घ्या.”
डॉक्टर करमरकर सरांच्या समोर बसलेल्या शास्त्रींच्या मनात हाच संदेश घोळत होता.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

परिशिष्ट-१
भारत लार्ज हॅड्रॉन कोलायडर (BLHC) पुणे

भारत लार्ज हॅड्रॉन कोलायडर (BLHC) पुणे हा जमिनीच्या खाली १५० मीटर तीस किलोमीटर लांब परीघाच्या भोगद्यात आहे.
ह्या संयंत्रात उलट सुलट दिशांनी वेगाने धावणाऱ्या दोन रेणूंच्या “बीम”ची समोरा समोर टक्कर घडवली जाईल.
ह्या संयंत्रातील सर्व हवा काढून टाकण्यात येईल.
प्रत्येक “बीम’ मध्ये रेणूंचे ३००० पेक्षा जास्त जत्थे असतील.
प्रत्येक जत्थ्यात १०० बिलिअन रेणू असणार आहेत.
जेव्हा हा कोलायडर आपल्या पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असेल तेव्हा त्याची कार्यशक्ती ताशी १६०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या मोटारी इतकी असेल.
ह्या “बीम” चा वेग जवळपास प्रकाशाच्या वेगा इतका (अर्थात प्रकाशाच्या वेगापेक्षा काकणभर कमी) असणार आहे. ह्या वेगाने तो यंत्राच्या ११,२४५ चकरा मारेल.
जेव्हा हे यंत्र दहा तास सतत चालत राहील तेव्हा ह्या अणु रेणूंनी दहा बिलिअन किलोमीटरचा प्रवास केलेला असेल. हे अंतर नेपच्यून ग्रहाच्या “रिटर्न ट्रीप” एव्हढे आहे!
हे भुयार चतुःशृंगीच्या डोंगराखालून, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या फिजिक्सच्या इमारीतीच्या खालून, औंध खालून जाते.
विशेष सुचना: कृपया ह्या माहितीचा वापर जपून करा. ही अत्यंत गोपनीय माहिती केवळ तुमच्या साठी म्हणून इथे लिहिली आहे. कृपया ह्याचा कोणी गैरवापर करणार नाही अशी काळजी घ्या. तसेच ह्या प्रकल्पाबद्दल जास्त चर्चा, शंका, कुशंका विचारू नका.
ज्यांना अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी कृपया
https://www.blhc.com/new4_all ह्या साईटला भेट द्यावी.

·

·

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोली मारो भेजेमे बिचारे पंकज, धुरी...
पण एवढे उपद्व्याप कुणी सांगितलं....
खाणेका पिणेका मस्त रैनेका...कायको दिमाग का दही करणेका...जब अनंतकोटी ब्रम्हांडनायक Big Boss देख रैला है तो फिकर कायका?
तेवढं नवीन तारका समूह करायचं काम आमच्या शेजारी असलेल्या विश्वकर्मा मिस्त्रीला देता आलं तर बघा...नाय म्हणता, तुमची लय वट हाय वरच्या लेवला... Happy
जोक अपार्ट...कल्पक कथा असतात तुमच्या... उत्सुकता ताणते..
गोपनीय माहिती काढून टाकावी. किंवा ठिकाण न देता संक्षिप्त द्या...नाही दिली तरी hydrogen collider चा उल्लेख कथेत आलाय... that's enough.

थोडी बदलली आहे.
आता सगळे म्हणजे सहाही भाग तयार आहेत.
टाकतो एकेक करून.

सुरुवात अगदी उत्कंठावर्धक.
बऱ्याच दिवसांनी मायबोलीवर कोणत्यातरी कथेची आवर्जून वाट बघतोय.
येऊ द्या!!