अनुकंपा - एक विरंगुळा!

Submitted by छन्दिफन्दि on 26 August, 2022 - 12:57

सकाळी साडेआठ वाजता घाई घाईने छोट्याला खाली घेऊन आली. पण school van काही अजून आली नव्हती. "हुश्श" करत ती बाजूच्या कठड्यावर टेकली.शेजारची सविता पण सोहमला घेऊन तिकडे पोहोचली.
"आज थोडा लेट हो गया लगता है?"
"चलो अच्छा है मुझे लगा आज छूट जायेगी."
तिचं लक्ष पलीकडून पोळ्यांच्या मावशी येतायत का त्यावर होत.
"क्या रे?"
"वो मौसी आयेगी अभी"
" चपाती के लिये क्यू लगानेका बाई? तू घरपे ही तो है! तुम तीनो को कितना लगेगा. यूं फटाफट बन जाती है द्स पंधरा मिनिट मे|" सविताची ट्रेन काही थांबेना.
आता तिची लागोपाठची दोघं, वय वर्ष चार आणि सहा. नवऱ्याचा एक पाय परदेशात. त्यात छोट्याचा बाळ दमा त्यामुळे सकाळी त्याचे वाफारे, गरम पाण्याच्या गुळण्या, चाटण, औषधे, दोघांचे डबे, आंघोळी, कपडे, अंथरूण-पांघरूण आवरणे, मोठ्याचा (थोडाफार ) अभ्यास सगळं तिलाच बघावं लागे. सासूबाईनी एक कानमंत्र दिला होता "काही झालं तरी पोळ्यांची बाई सोडू नकोस, नोकरी कर किंवा नको करुस. पोळ्या एक ठेपी तयार असतील तर बाकी स्वयंपाक जाता येता होतो." आता हे सगळं ह्या सविताला काय सांगणार? पण तरी "अरे नही जमता है रे, बहुत प्रेशर रेहता है morning मे. एक बार चपाती हो गया तो बाकी ठीक है" तिने समजावण्याचा (निष्फळ) प्रयत्न केला.
" तू खाली फुकट टेन्शन लेती है| तू करके देख ना! मेरा सून तू निकाल दे, खाली फुकट पैसा क्यू देने का.
यू मिनिटों मे बनती है चपाती| " सविता आपलच रेटत राहिली.
आता मात्र हद्द झाली. " इतक्या फटाफट बनत असतील तर तूच माझ्या पण पोळ्या करत जा. आणि माझे पैसेच वाचवायची तुला इतकी चिंता असेल तर तू त्यांचे पैसे दे, नाहीतर कृपा कर आणि गप्प बस" वैतागून तिचं स्वगत सुरु झालं. पण तेवढ्यात Van ही आली आणि madam ला एवढा वेळ का लागला आज ते बघायला सविताकडची मुलांना सांभाळायला/ वरकामाला ठेवलेली ताई ही आली. तशी ताईला दिवसभराच्या सूचना देत सविता निघाली आणि तिनेही दीर्घ निःश्वास सोडला.

***
संध्याकाळी सहा वाजता आलेले. तिनं पटापट डेस्क आवरायला घेतलं. मेल आधीच ड्राफ्ट करुन ठेवलेलं. ते send करून ती निघाली, पळालीच म्हणा ना! "सासूबाई खोळंबल्या असतील, सूमीला पण घाई असते संध्याकाळी घरी जायची. कंपनीच्या गेट मध्येच शेअर रिक्षा मिळाली तर बरं होईल. तसे chances कमीच.. नाहीतर मेन रोड पर्यंत चालावं लागेल , म्हणजे परत १० मिनिट जास्त जातील.." पायांबरोबर डोक्यातली चक्रही जोरात चालू होती. तेव्हढ्यात हाक ऐकून ती क्षणभर थबकली. त्यांच्याच फ्लोअर वरची मीना. गप्पा सुरू.
"रिक्षा मेन रोडलाच मिळेल आता."
" तू ठाण्याला राहतेस ना? पण मग घरी कशी जातेस?" मीनाचा प्रश्न.
"कळवा नाक्याला शेअर रिक्षा सोडते. आणि दूसरी रिक्षा पकडते."
"रोज??"
"हो"
"पण बस आहे ना. बस का नाही घेत?"
"अगं घरून रिक्षा करून बस स्टॉपला जायचं, मग बसची वाट बघायची. परत बसला वेळ लागतो. जाता ना तर बघतेसच किती गर्दी पण असते बसला? घरी मला वेळेत पोहोचायच असतं" माझं पाल्हाळ.
"ए मग तू येताना आणि जाताना दोन्ही वेळेला रिक्षा करतेस?"
"हो"
"पण मग खूप पैसे होत असतील."
आता माझं गिल्ट वाढायला लागलं आणि धीर सुटायला लागला.
"हो ग, " माझी सारवा सारवी," सकाळी डबे, मुलांचं आवरून निघायचं म्हणुन घाई, तर संध्याकाळी सासूबाई, सांभाळणारी ताई सगळ्यांना घाई असते. म्हणून मग रिक्षाच बरी पडते."
हार मानेल तर मीना कसली. "तुमच्या जवळच्या बस स्टॉप वर शेअर रिक्षा मिळत असेल बघ. ती घे. एनएमएमटी ला ये. तिकडे बसेस ची लाईन असते......" बोलतच राहिली. इकडे तिच्या डोळ्यासमोर सकाळची रणधुमाळी उभी राहिली. मिनिटा मिनिटांची सकाळी मारामारी असते आणि बाई वेगळ्याच ट्रॅकवर आहेत. रिक्षा ने १५ मिनिटात घरी पोहचतेय म्हणून जॉब चालूतरी आहे नाहीतर काही खरं नाही.
एकीकडे मीनाची टकळी अजून चालूच आहे. " ...अग बघ मग किती पैसे उगाच जातात. तू आता बस ट्राय करून बघच."
"आता कृपा करून आवरत घे, अजून माझे पैसे मी कसे वाचवावे म्हणून सल्ले देत बसलीस तर आता शेअर रिक्षेचे पैसे तुला द्यायला लावीन...मग वाचवत बस माझे पैसे..." मन बोंबलत होत...शेवटी तिच्या आणि मीनाच्या नशिबाने आला तो कळवा नाका. शेअर रिक्षा चे पैसे देऊन दोघी आपापल्या दिशेने निघाल्या.

***
" काय ग तू नोकरी सोडलीस म्हणे? " शेजारच्या बिल्डिंगमधल्या मामींनी हटकले.
अत्यंत हळुवार कोपऱ्यालाच हात घातला मामींनी.
घरी आणि जॉबवर दोन्हीकडे होत्या काही अडचणी, खूप प्रयत्न करूनही नव्हते निघत इतर काही मार्ग. मग दोघांनी मिळून निर्णय घेतला.
"हो"
"कसं ग होणार? तुम्ही मुली इतक्या शिकता सवरता आणि आता घरी बसायचं.."
" थोडे दिवस तरी घरी गरज आहे वेळ द्यायची. पुढचं मग बघू काय होतंय.." तिन जरा टोन डाऊन करायचं प्रयत्न केला.
"नाही ग, फार वाईट वाटतं बघ तुझ्या साठी.." आणि बघता बघता मामिंच्या डोळ्यात पाणी. आता मात्र ती कावरी बावरी झाली. परत परत विचार करू लागली ' खरंच आपली इतकी दयनीय अवस्था आहे का? आपण तर विचारांती हा निर्णय घेतलाय, काही घाई तर नाही ना केली?..' तेवढ्यात तिची विचार शृंखला

तुटली ती मामींच्या समोरून येणाऱ्या सविताला केलेल्या प्रश्नाने "क्या रे कल क्यू इतना जोर जोरसे आवाज आ रहा था? क्या हुआ??" आणि त्या दोघींच्या गप्पा मधून तिने हळुच काढता पाय घेतला.

***
काही लोक त्यांच्या अतीअनुकंपेने आपल्याला अगदी बुचकळ्यातच टाकतात. तुम्हाला कधी अशी अतिदयाळू (की भोचक ??) माणसं भेटलीयेतं का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
भेटतात अशी माणसे ( त्यात बाया माणसे जास्त) ...
फारसे मनावर न घेता सोडून देण्यातच शहाणपणा आहे.

पण काही वेळेस या अती उत्साही सल्ल्यामधून काही कामाचे सल्ले पण हाती लागतात.

छान लिहिलेय !

अशी माणसे असतात आणि कोणासाठी ते आपणही असू शकतो.

आता यात भोचकपणाही असू शकतो. वा ती जेन्युईन कळकळही असू शकते, फक्त तिची आपल्याला गरज नसते. कारण जे निर्णय आपण आपल्या सोयीने आणि खुशीने घेतले असतात त्याकडे बघायची समोरच्याची नजर वेगळी असू शकते.

जसे वर नायिकेने पोळ्याला बाई लावली नसती वा बसच्या गर्दीत प्रवास करत असती. वा घरचे करूनही तिला जॉब करावा लागला असता तरी किती किती झेलावे लागते ही अनुकंपा आलीच असती. तुम्ही काहीही करा. तुम्हाला दुसरी बाजू बघणारे लोकं भेटणारच. किंवा याऊलट तुझी तर बाई मज्जा आहे बोलणारेही भेटतातच.

जर आपल्याला ही अनुकंपा सहानुभुती आवडत नसेल तर यावर ऊपाय म्हणजे पहिल्याच फटक्यात आणि विचारात कुठलाही गोंधळ न दाखवता कॉन्फिडन्टली क्लीअर करावे की हा निर्णय नाझ्या सोयीचाच होता म्हणूनच घेतला आहे. आणि यात मी खुश आहे. लाईफ आरामाची झालीय Happy

@अनिश्का , @ धनवन्तव, @ ऋन्मेऽऽष
Thank you for reading and sharing your thoughts/ perspective

जर आपल्याला ही अनुकंपा सहानुभुती आवडत नसेल तर यावर ऊपाय म्हणजे पहिल्याच फटक्यात आणि विचारात कुठलाही गोंधळ न दाखवता कॉन्फिडन्टली क्लीअर करावे की हा निर्णय नाझ्या सोयीचाच होता म्हणूनच घेतला आहे. आणि यात मी खुश आहे. << Good one

पण काही वेळेस या अती उत्साही सल्ल्यामधून काही कामाचे सल्ले पण हाती लागतात.<<< hmm

काही काही वेळा हे ' ऐकावे जनाचे ' सुद्धा असह्य होते. आपण आपला शांतपणा सोडत नसतो. पण वेळ जात असतो.
म्हातारी मेल्याचे दुःख नाही , पण काळ सोकावतो!

प्रामाणिक अनुभव प्रामाणिकपणे लिहिले आहेत. आवडले.

छान लिहिलेय. असे नमुने कायम च भेटत असतात गिल्ट देणारे.
आपलं उत्तर ठरलेलं असावं, मला तर असच आवडतं मी असेच करणार Happy

प्रामाणिक अनुभव प्रामाणिकपणे लिहिले आहेत. आवडले. >> हीरा, धन्यवाद!
काही काही वेळा हे ' ऐकावे जनाचे ' सुद्धा असह्य होते.>>> खर आहे.

छान लिहिलेय. असे नमुने कायम च भेटत असतात गिल्ट देणारे.>>> aashu29 , धन्यवाद!

काही काही वेळा हे ' ऐकावे जनाचे ' सुद्धा असह्य होते>> अगदी अगदी. मी नव्याने सिंगल पेरेंट झाले २००७-८ मध्ये तेव्हा एकदा मुली सोबत टूरला जात होते. मुलगी क्युट दिसायचे तेव्हा. तर सिकुरिटी च्या लाइन मध्ये धावत पळत जाताना जेट एअर्वेज ची एक ग्राउंड स्ताफ आली. मुलीचे कौतूक केले व तुम्ही दोघीच कुठे जात ( भ टकत) आहात? व्हेअर इज डॅडी असा लाडिक पणे प्रश्न विचारला!!! मला अगदी पोटात धस्स झाले होते तेव्हा. कारण बाबा हा अजुनही एक हळवा विषय आहे तिच्यासाठी व तेव्हा तर जरा टोकले तर रडु लागत असे. दोन दा विचारले तर मी सुद्धा. कसनुसा चेहरा करून आम्ही पुढे गेलो मला अजून लक्षात आहे ही फुकटची अनुकंपा. जळ्ळी ती जेट एअर्वेज.

कसनुसा चेहरा करून आम्ही पुढे गेलो मला अजून लक्षात आहे ही फुकटची अनुकंपा. जळ्ळी ती जेट एअर्वेज.>>>:( Sad Sad

तर सिकुरिटी च्या लाइन मध्ये धावत पळत जाताना जेट एअर्वेज ची एक ग्राउंड स्ताफ आली. मुलीचे कौतूक केले व तुम्ही दोघीच कुठे जात ( भ टकत) आहात? व्हेअर इज डॅडी असा लाडिक पणे प्रश्न विचारला!!! >>> ढालगज राग:

साधारण असाच अनुभव मला आला .. मी दोन्ही मुलांना घेऊन एकटीच मलेशिया फिरायला गेले होते..नवरा दिर्घ काळासाठी दूर देशात होता. आम्हाला तिकडे १ वयस्कर जोडपे भेटले रेसॉर्ट ला आणि काही गप्पां नंतर परत परत बाबांविषयी विचारायचे उगाच.
मी पण मुद्दाम हिंग लागू दिला नाही..
फुकट चौकशा! Angry
तर बफे घेताना माझ्या मुलाला विचारलेच की बाबा कुठे आहे तुझे?

मी एकटीच नैनीतालला गेले होते,त्यावेळी अजून एक 30_ ३५ ला मुलगा एकटा होता. त्याला नाही पण मला विचारले की मिस्टर नाही आले ? म्हटले मुलाबरोबर थांबले.तर अजून चौकशी करायला लागल्यावर म्हटले आपण इथेच थांबू.मग गप बसली.

आम्ही मनालीत भटकत असताना आमच्या ग्रुपटूर मधल्या एका वयस्कर जोडप्याबरोबर कार शेअर करत होतो 5 मिनिटाच्या प्रवासात बाईंनी आमच्याकडे किती मेड आहेत, पगार काय इत्यादी चौकश्या करून हे इतके खर्च कशाला करायचे, स्वतः सर्व करावे वगैरे सॅले दिले. वरचा पोळीचा अनुभव वाचून ते आठवले.

कुणाच्या घरी हेल्प आहे याचा लोकांना काय प्रॉब्लेम असतो कोण जाणे! आणि एकटेच का, बाबा/नवरा कुठे हे देखील! माझ्या बहिणीचा डिवोर्स झालेला तर मुलीला विचारायचे बाबाबद्दल. वर अ‍ॅमिकेबल डिवोर्स आहे, मुलीसाठी एकत्र ट्रीपला/मॉलला वगैरे जातात म्हणूनही पाठीमागून कुचकुच चालायची.

चांगलं लिहिलंय.. येतात असे अनुभव. ऋन्मेषने लिहिलंय तसं तो भोचकपणा असू शकतो किंवा कळकळ असू शकते. आपल्याला ती चौकशी आणि ते सल्ले नको असतात तेव्हा चिडचिड होते खरी. माझीही अनेक वेळा होते.
सल्ला आणि औषध मागितल्याशिवाय देऊ नये असं ऐकलंय! Happy