माझी अमेरिका डायरी - ७- पुरचुंडी, शाळेची!

Submitted by छन्दिफन्दि on 24 March, 2023 - 12:46

गेले काही भाग शाळेतला अभ्यासक्रम, पुस्तकं, वाचन, वाचनालये यांवरच केंद्रित होते. ह्या भागात इकडच्या शाळेतल्या मला त्यावेळी जाणवलेल्या, दिसलेल्या काही हटके गोष्टी सांगणारे.

तर आत्ता पर्यंत आपण बघितलं कि रंगेबिरंगी शाळा, तेव्हढेच रंगीत कपडे आणि नाना तऱ्हा करून आलेली मुलं-मुली, खेळण्यासाठी असलेली प्रचंड मोठी मैदान, क्रीडा सामग्री सगळंच वेगळं वाटत होतं.

मला खर आश्चर्य वाटलं, जेव्हा किंडरगार्डनच्या मुलांना मी शिक्षिकेला मिठी मारताना बघितलं, काही मुलं तिच्या हाताला धरून खेचत होती, तर काही तिच्या कमरेला बिलगलेली. तिसरी-चौथीची मुलं त्यांच्या वर्ग शिक्षिकेभोवती कोंडाळं करून बसलेली. त्यांचे काही हास्य विनोद चाललेले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बहुदा तिथल्या मदतीला आलेल्या एका भारतीय पालिकेने वाचले. खळखळून हसत मला म्हणाली, “मिस Taylor, म्हणजे अशीच आहे, एकदम खेळकर. मुलांबरोबर कधी कधी डान्स पण करते, अगदी गाणी-बिणी लावून ?”

मी बापुडी हा सांस्कृतिक धक्का पचवत होते. एक तर टीचर, मॅडम, सर वगैरे काही नाही, सरळ शिक्षकांना “मिस अमकी “, “मिसेस ढमकी”, “मिस्टर तमके” करूनच बोलावतात. कितीही तरुण असल्या तरी आमच्या देशमाने बाईंबरोबर आम्ही डान्स कसला? साधं अभ्यासाचं सोडूनही बोलल्याचं मला तरी आठवत नाही. लांबून येताना एखाद्या बाई दिसल्या (आम्ही मराठी शाळेत शिक्षिकांना “बाई” म्हणायचो ), कि हळूच लांबची वाट धरायचो. त्त्यांचा दराराच एव्हढा होता. क्वचित एखाद्या प्रेमळ बाईंचा अपवाद वगळता! कदाचित इथे एका वर्गात फक्त २२-२४ मुले असल्यामुळे त्यांना मुलांशी जवळीक साधणे सोपे जात असावे.
तुम्हाला मुलं फक्त वर्गातच अभ्यास करताना दिसतील असे नाही, कधी २-३ मुलं उन्हात बसून त्यांचं प्रोजेक्ट करताना दिसतील, एखाद मूल फ्री टाईमला वर्गातील मोकळ्या जागेत लोळत पुस्तक वाचताना दिसेल. पण सकाळी आठच्या घंटेला बरोबर सगळी मुलं त्यांच्या वर्गात असतात, तिथे एकदम वक्तशीर. एखाद्या ठिकाणी नीट लाईन लावतील, शांतपणे त्यांच्या पाळीची वाट बघतील, कचरा कचराकुंडीत टाकतील, जमिनीवरचा शाळेतला कचरा उचलतील (तिसरी चौथीच्या मुलांकडून हि कामे करून घेतली जातात).

ओघाने एक गंमत सांगते, मी दुसरीच्या वर्गात त्यांचं होमवर्क तपासायला जायचे. हो, तिकडे होमवर्क तपासणे, फोटो कॉपी (Xerox) करणे, इतर उपक्रमांमध्ये काही कच्ची तयारी करायची असल्यास ती करणे, शाळेच्या फील्ड ट्रिप (शैक्षणिक सहल) मध्ये मुलांवर लक्ष ठेवायला जाणे, आणि इतर काही वर कामे असतील ती करणे ह्या कामांसाठी पालक स्वयंसेवा करतात. वर्षाच्या सुरुवातीलाच प्र्त्येक शिक्षिका तिला मदत हवी असेल तर ती कामे आणि त्याचे वेळापत्रक जसं की वार, वेळा, महिन्यातून/ आठवड्यातून किती वेळा, जाहीर करतात. बाकी पालक तेथे त्यांच्या सोयीप्रमाणे जबादारी उचलतात, सगळं कस पद्धतशीर!
तर मी आणि एक पालक त्यांचा गृहपाठ तपासत होतो. त्या दिवशी नेमकी त्यांची शिक्षिका सुट्टीवर होती म्हणून तिच्या ऐवजी बदली शिक्षिका होती. तर ह्या शिक्षिकेला सगळी मुलं नवीन, त्यांची नाव नवीन. इकडे तर खूप वागवेगळ्या संस्कृतींमधून आलेली मुलं-मुली त्यामुळे त्यांची नावही वेगळी, स्पेलिंग वेगळी, उच्चार वेगळे. हे पालक रोमेनिअन होते, त्यांची नावे, आडनावे आणि उच्चार अजून वेगळे असतात.
इकडे शिक्षिकेने हजेरी घ्यायला सुरुवात केली, एकेका मुलाचे नाव ती घेत होती. एका नावाला ती अडखळली, ‘Iani’ तिने काही नाव घेतले, तो मुलगा उठून उभा राहिला “ माझे नाव असे नाही उच्चारायचे,” तो त्यांना ठासून म्हणाला.
मग बाकीची मुले तिला कसं उच्चारायचं ते सांगू लागली. इतक्या गोंधळात तिला काही सुधरेना. हा मुलगा आणि इतर मुलं परत परत सुधारून शेवटी २-३ मिनिटांच्या कोलाहलानंतर, तिने त्याच नाव एकदाच बरोबर घेतलं “यानी”
तेव्हा कुठे यानी आणि मंडळी गप्प बसली.
हे सगळं रामायण चालू असताना मी सहजच हसून त्या पालकांकडे बघितलं कारण तो त्यांचा मुलगा होता,
“काय मुलं आहेत ना ?”
“असायलाच पाहिजे, शेवटी त्यांचं नाव आहे, ते नीट घेतलच गेलं पाहिजे, ” तो ठामपणे म्हणाला.
इकडे मी विचारात, माणसा तूच काय? पण कोणीही पाश्चिमात्य माणसाने माझं नाव नीट घेऊन दाखवा असा आग्रह माझ्यासारखीने धरला तर समय को रुकना पडेगा.
बहुतेक चायनीज लोक त्यामुळे आपल्या मुलांची दोन नाव ठेवतात, एक चायनीज आणि दुसरं इकडच्या लोकांना सहज घेता येईल अस किंवा मग एखादा अगस्त्य त्याचे नाव “Aggy “ सांगतो, बहुदा हेच असावं का पौर्वात्य लोकांचं नेमस्त धोरण?
शाळांमध्ये मुख्य कमी शिपाई काकांची. त्यामुळे शाळेच्या ऑफिसमधून एखाद्या वर्गात काही निरोप द्यायचाय तर चक्क फोन करतात.हो, प्रत्येक वर्गात फोन, लँडलाईन वाला, असतो. शिक्षिकेकडे तिचा लॅपटॉप असतो, बोलायला मायक्रोफोन (छोटा ध्वनिक्षेपक)असतो, वर्गात व्हाईट बोर्ड आणि मार्कर (काळा फळा-खडू कधी नावालाही नाही दिसले). शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने, मायक्रोफोन आणि व्हाईट बोर्ड खरं तर आपल्या शाळांमध्येही हवेत. प्रत्येक वर्गात एक प्रोजेक्टर असतो, ज्याच्या वर मधून मधून मुलांना कार्टून्स, चित्रपट दाखविले जातात.
शाळेत दुसरीपर्यंतच्या प्रत्येक मुलाला टॅब देतात. तिसरीच्यापुढे मुलांना Chromebook देतात. Covid काळामध्ये मुलांना वर्षभर वापरायला Chromebook घरी दिले होते. अजून मोठ्या म्हणजे हायस्कुलच्या मुलांना प्रत्येकी लॅपटॉप दिलेला असतो.
JIJI Math, बिग ब्रेन, प्रोडीजी यांसारखी अनेक गणिताची अँप्स, Newsela वर ऑनलाईन वाचायला लेख ह्यासाठी मुख्यतः ही devices दिलेली असतात. Covid च्या आधी पासूनच अशा कितीतरी गोष्टी त्यांना ओनलाईन करायला होत्या. मग Covid मधल्याकाळात तर जगभर सगळीकडे झूमवर शाळा, ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मुलांचा स्क्रीनटाइम प्रमाणाबाहेर वाढला. आता जग पूर्ववत होऊ लागलय तरी मुलांचा स्क्रीनटाईम काही म्हणावा तेवढा कमी झालेला नाही.
साधारण आठ ते तीन शाळा असल्यामुळे एक छोटी सुट्टी आणि एक मोठी सुट्टी (५० मिनिटे ) असते. शाळेमध्ये, सकाळी ब्रेकफास्ट आणि दुपारी HOTLunch मिळतं. साधारण ७०% मुलं तरी शाळेतच जेवण घेतात. लंच मध्ये एक मुख्य पदार्थ, “ब्रेड आणि प्रोटीन “असेल असा, दूध, आणि फळ किंवा गाजर / ब्रोकोली असा साधारण थाट असतो. पूर्वी दीड डॉलर ला ब्रेकफास्ट आणि सव्वातीन डॉलरला जेवण मिळे. ज्यांचे उत्पन्न ठरविक रकमेच्या खाली आहे, त्यांना ते जेवण अत्यंत कमी दारात म्हणजे २५ सेंट्स (पाव डॉलर ), ५० सेंट्स (अर्धा डॉलर) अशा किमतीत मिळे.
ह्या HOTLunch चा महत्व Covid काळात अधोरेखित झाले. कितीतरी घरांमध्ये शाळेतून मुलांना मिळणारे जेवण हेच मुख्य अन्न असते. शाळा बंद तर मुलांच्या जेवणाचे काय? मग त्यासाठी जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा शाळा शाळांमधून आठवड्याभराचे कोरडे शिधा वाटप केले जाई. मला आपल्याकडे अंगणवाडीत चालणाऱ्या खिचडी उपक्रमाची आठवण झाली. तसेच अमेरिकेसारख्या संपन्न देशातही Child Hunger (मुलांची उपासमार ) समस्या असल्याचे ठळकपणे समोर आले. Covid नंतर कॅलिफोर्निया मध्ये सगळ्या शाळांमध्ये मुलांना जेवण फुकट दिले जाते.
मुलांच्या हट्टपायी मी कधीतरी त्यांना HOTLunch घेऊ देई पण बहुदा ते पोळी भाजी, सँडविच ह्यासारख काही डब्यात घेऊन जात, कारण शेवटी HOTLunch म्हणजे फ्रोझन फूड आयत्यावेळी गरम करून दिलेलं असत. ते भारतीय आयांच्या मनास उतरत नाही. बाजूला खाऊ म्हणून ते ग्लुकोज बिस्किटं, शेव -चिवडा असं काही घेऊन जात. गमतीची गोष्ट म्हणजे कधी इकडच्या मुलांना ते भारी आवडे. ग्लुकोजची बिस्किटे तर बरीच मुलं त्यांच्याकडून मागून मागून खात. आता हे अनुभव काही सरसकट सगळ्यांना आणि सगळीकडे येतीलच असे नाही पण इकडे मिळणाऱ्या इतक्या प्रकारच्या कुकीज मध्ये त्यांना आपल्याकडे अतिशय साधी मानली गेलेली ग्लुकोज बिस्किटे इतकी आवंडावीत ह्याच मला जरा आश्चर्य आणि कौतुक वाटलं म्हणून मुद्दाम सांगितलं.
पाचवीपासून बऱ्याच शाळांमध्ये बँड किंवा orchestra असतो. म्हणजे मुलांना बासरी, व्हायोलिन, चेलो , ट्रूम्पेट, सॅक्सोफोन असे एखादे वाद्य शिकता येते. माझ्या मुलाचा पहिला बँड परफॉर्मन्स झाला तेव्हा आम्हाला त्याच कोण अप्रूप वाटलेलं, एका हॉल मध्ये १०-१२वर्षांची, जवळ जवळ १५०-२०० मुले एकाच सुरात, शिस्तीत संगीत वाजवत होती. हा भाग वेगळा की आता तेच वाजवलं तर मुलगा धावत येतो “इतकं बेसूर, कधीच आहे?” म्हणत.
त्याव्यतिरिक्त सांगायचं तर रोज एक तास PE चा असतोच असतो. त्याव्यतिरिक्त ४० मिनिटांचे मधल्या सुट्टीतले खेळणे. बरीचशी मुलं शाळा सुटल्यावरपण बास्केटबॉल, फुटबॉल (अमेरिकन), सॉकर (बाकी जगाचा फुटबॉल), स्विमिन्ग, कराटे ह्यांतील एक किंवा दोन खेळ खेळायला, प्रशिक्षणाला जातात.
मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे एक प्रोजेक्ट होता YMCA चा. तो अँटी बुलिंग कार्यक्रम होता. त्याअंतर्गत काही ठराविक पुस्तके होती ज्यात मुलांना मिळून मिसळून कसे राहावे, कोणाला एकट पडू नये अशा आशयाच्या गोष्टी होत्या. महिन्यातून एकदा, पालक स्वयंसेवक वर्गात जाऊन, त्यातील गोष्ट वाचून दाखवी, त्या अनुषंगाने मुलांकडून काही गमतीशीर खेळ, गाणी, ऍक्टिव्हिटीज करवून घेई. शाळेमध्ये सर्वसमावेशक वातावरण तयार व्हावे, बुलिंग होऊ नये हा त्यामागील उद्देश. ही कल्पना आपल्याकडे भारतात पण राबवली तर खूप बरे होईल असे वाटून गेले.
एक अभाव जाणवला तो म्हणजे इकडे आपल्यासारखे वार्षिक स्नेहसंमेलन होत नाही. चित्रकला, हस्तकला हे उपक्रम पालकांनी राबविले तरच शाळांमधून होतात. शिक्षक शिकविण्या व्यतिरिक्त आणि शाळेच्या वेळेबाहेर जाऊन सामान्यतः काही करत नाहीत. एकंदर मुलांशी अत्यंत प्रेमाने बोलतात, वातावरण खेळीमेळीचे ठेवतात पण नियमावर बोट ठेवून तेवढेच काम करतात. ती लक्ष्मण रेषा पार करून कधी आमच्या दहावीच्या बाईंसारखे एक्सट्रा पेपर्स तपासून देत नाहीत कि त्यांच्या एखाद्या ऑफ पिरिअडला न समजलेलं एखाद अवघड गणित समजावून सांगायला बोलवत.
इकडच्या शिक्षण पद्धतीत जरी समजून घेण्यावर, वाचनावर भर दिला, तरी त्यांचा पाठांतरावर अजिबात जोर नसतो. फक्त घोकमपट्टी जेव्हढी चांगली नाही तेवढच अजिबात स्मरणशक्तीला ताण न देणं हेही वाईटच.
“मला स्पेलिंगज नाही लक्षात रहात” हे जेव्हा माझ्या मुलाच्या शिक्षिकेनी मला सांगितले तेव्हा मात्र हात नकळत कपाळाकडे गेला. “ह्या बाईच्या प्रांजळपणाचे कौतुक करू का शिक्षिका असून स्पेलिंग कसे येत नाही म्हणून खडसावू ?” अशी अवस्था झाली.

आता शाळा आणि शिक्षण ह्यांच्यापासून विश्रांती घेते. सुट्टया, सुट्टीत पाहिलेली आसपासची ठिकाणं, रोजच्या दैनंदिन आयुष्यात जाणवणारे फरक ह्याविषयी जाणून घेऊ या पुढल्या भागात.

क्रमश:

https://photos.app.goo.gl/bycytLWSGiPzzGLfA
वरील लिंकवर विडिओ आणि फोटो पाहू शकता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यापेक्षा भारतातल्या त्या गोणपाटावर बसवणाऱ्या आणि दामले मास्तर टाईप एकावेळी चार वर्ग घेणाऱ्या शाळा पण जास्त बऱ्या हो. >> भारतातल्या शिक्षकाने शिक्षा म्हणून मुलाला पहिल्या मजल्यावरून फेकून दिले, शाळेला ऊशीर झाला म्हणून शिक्षकाने लाथा बुक्क्यांनी दहा वर्षाच्या मुलाला तुडवून मारले, केस बांधले नाहीत म्हणून मुलीला मारून टाकले, खिचडीतून विषबाधा होऊन दोन डझन मुले दगावली आणि अनेक अत्यवस्थ झाली, स्कूल बसच्या ड्रायवरने केलेले अब्यूज असे भारतातल्या शाळांत घडलेल्या किती केसेस सांगू?
चार बोटे आपल्याकडे असतात वगैरे....

आणि हो तुम्हाला काही कारणाने मुलाला शाळेत पाठवायचेच नसेल... कारण काही का असेना... गन वायलंसचा विक्टिम होण्याची शक्यता, ड्रग्ज च्या आहारी जाण्याची शक्यता, रेसिझम, बुलिईंग, वॅक्सिनेशन नाही करायचे, अगदी शाळा सडलेल्या आहेत, माझे मूल जिनिअस आहे आणि शाळेचा करिक्युलम त्याच्यासाठी फार चॅलेंजिंग नाही असे काहीही तर अमेरिका तुम्हाला होम स्कुलिंगचा पर्याय देते की. ती सुद्धा ईथल्या स्कूल सिस्टिमचीच ऊपलब्धी म्हणावी लागेल की.

मी हा प्रयत्न केला होता, पण हळूहळू - विशेषतः पूर्णवेळ शाळेत जायला लागल्यावर मुलगा इंग्रजीतूनच विचार करायला लागला, आणि घरी आल्यावर तो उत्साहाने काही सांगायला लागला की त्याला अडवून 'नाही, मराठीत सांग' असं म्हणणं हा माझा मलाच दुष्टपणा वाटायला लागला. आधी डोक्यात भाषांतर करून मग बोलण्याच्या खटाटोपात त्याचा काय ते सांगण्यातला उत्साह मारला जातो असं जाणवलं, जे मला अजिबात व्हायला नको होतं. भाषा महत्त्वाची नाही, संवाद महत्त्वाचा हा धडा मी त्यातून घेतला. >> ह्याला पूर्ण अनुमोदन. स्वतःहून वाटल्यावर मराठी लिहिण्यापर्यंत जी प्रगती झाली ती नुसती वीकेंड च्या शाळॅने झाली नाही. वर कोणी तरी मात्रुभाषा कळणे-बोलणे ह्याचे अप्रूप वाटाणे हा टिपीकल मराठी अनुभव आहे असे म्हटलय ते पण पटलं. ओळखीच्या इतर भाषियांमधे मात्रुभाषा येणे गृहित धरले गेलेय हे लक्षात आले.

बाकी अमेरिकेसारखी सिस्टिम, प्लस युनिवर्सल हेल्थ केअर, लेस गन्स असं आखुड शिंगी बहु दुधी काही हवं असेल तर या जरा उत्तरेकडे. फोर्टीनाइन्थ पॅरलल ला स्वागत आहे. Wink

"मी हा प्रयत्न केला होता, पण हळूहळू - विशेषतः पूर्णवेळ शाळेत जायला लागल्यावर मुलगा इंग्रजीतूनच विचार करायला लागला, आणि घरी आल्यावर तो उत्साहाने काही सांगायला लागला की त्याला अडवून 'नाही, मराठीत सांग' असं म्हणणं हा माझा मलाच दुष्टपणा वाटायला लागला. " - स्वातीताई, ह्या सगळ्या पोस्टला अनुमोदन!!

माझाही लेक उत्साहाच्या भरात इंग्रजीत बोलायचा, काही बिनसले असेल तर सगळी चिडचिड इंग्रजीतूनच बाहेर पडे. अशावेळी मी त्याला मराठीत बोल असे न सांगता माझ्या बाजूने मराठीत बोलत राही. बरेचदा तो इंग्रजीत आणि मी मराठीत असे चाले. त्याच्या कानावर मराठी शब्द पडत, संदर्भातून अर्थही मनात कुठेतरी नोंदला जाई. सलग मराठी बोलणे हे हळू हळू वाढत गेले. पुढे हायस्कूलच्या वरच्या वर्गात फ्रेंचचा सराव करताना कुठेतरी त्याचे त्यालाच काहीतरी क्लिक झाले असावे पण एकंदरीत मराठी बोलण्यात बरीच सहजता आली.

या ताईंनी काय झाडी काय डोंगार काय हाटील च्या धर्तीवर काय ती क्लासरूम काय तो हॉट लंच काय ती लायब्ररी असा सूर लावला होता ते जरा खटकलं कारण वास्तवात भयानक परिस्थिती आहे.>>>> उगाच वाड्याचं तेल वांग्यावर काढल्यासारखं वाटतंय.

जे मला इकडे आल्यावर मला चांगलं वाटलं/ अनुभवलं ते लिहिलं.
काय तो डोंगर. काय ती झाडी असं कोणाही शहरातून गावी गेलेल्या माणसाला वाटतं आणि काय त्या उंच बिल्डिंग, केव्हढे मोठे मॉल्स वगैरे असं गावातून शहरात गेलेल्याला वाटत. बहुदा त्याच लाइनीवर मी पण गेले असावे.
सगळ्या गोष्टी उत्कृष्ट आहेत असं माझं म्हणणंच नाहीये,
गन vilolence च तर कोणी समर्थनही करत नाहीये. झाली ती घटना उद्विग्न करणारीच आहे.

काय ती झाडी असं कोणाही शहरातून गावी गेलेल्या माणसाला वाटतं आणि काय त्या उंच बिल्डिंग, केव्हढे मोठे मॉल्स वगैरे असं गावातून शहरात गेलेल्याला वाटत. >> सहमत. त्यासाठी कुणाला कमी लेखणे योग्य नाही.

आमच्यावेळी इंजिनीरिंगच्या पहिल्या वर्षाला सुतारकाम सक्तीचं होत आणि एकच गोष्ट बनवायची होती लाकडाचा T. मला आठवतंय त्याप्रमाणे सगळ्यांची दमछाक झालेली, काही जणांनी तर बाहेरून रेडिमेड करून पण घेतलेलं.

मग आता इकडे १२-१४ वर्षांची मुलं ह्या अशा वस्तू बनवतात हे बघून कौतुक तर वाटणारच ना? त्यांना अभ्यास , screentime ह्यावरून टोकत असतो तर हात दुखेस्तोवर रंधा मारून, सॅन्डिन्ग करून बाजारात पण मिळणार नाहीत एवढ्या
गुळगुळीत फिनिश च्या वस्तू केल्या बद्दल दोन चांगले शब्द बोलले तर काय चुकलं? इकडच्या काही शाळा मुलांना ह्या संधी देतात त्याचंही अप्रूप वाटलं तर तेही ओघाने आलच...
1654053880786.jpgIMG_20230331_191812586.jpg

>>> या ताईंनी काय झाडी काय डोंगार काय हाटील च्या धर्तीवर काय ती क्लासरूम काय तो हॉट लंच काय ती लायब्ररी असा सूर लावला होता ते जरा खटकलं >>> Lol Lol

Recommend:
Soft White Underbelly - You Tube or Facebook channel

हा ही लेख आवडला. पुलंनीच बहुधा विकसित देशांच्या चकाचकपणा पेक्षा तेथील लोकांना या सुविधा मिळतात याचाच जास्त हेवा वाटतो हे लिहीले आहे. ग्रंथालये, प्रचंड मैदाने, बागा - तेथे असलेली तरूणाई ई चे वर्णन त्यांच्या 'जावे त्यांच्या देशा' किंवा 'अपूर्वाई' मधे आहे.

ते मराठी शिकण्या/बोलण्याबाबत वरती स्वाती व अनेकांनी लिहीलेले आमच्याबाबतीतही साधारण तसेच. आता मुलेच काय, मी ही अनेकदा इंग्रजीत विचार करतो असे मलाच वाटते. कारण माबोवर लिहीताना तिसर्‍या चौथ्या शब्दापर्यंत आलो की विभक्तीप्रत्ययांचा गोंधळ होत आहे असे लक्षात येते. मग मागे जाउन वाक्यरचना परत करावी लागते. तुम्ही एरव्ही ९०% इंग्रजीच वापरत असाल, तर ते ही कधीतरी होणे साहजिक आहे.

बाकी हा काही तुलनात्मक लेख नाही. तेव्हा "बघा तेथे कशा वाईट गोष्टी आहेत" हे लावून धरायची काय गरज आहे माहीत नाही. व्हाइटहॅट यांची पहिली प्रतिक्रिया त्याच दिवशी नॅशव्हिलची घटना झाल्याने या चर्चेत स्वाभाविक म्हणता येइल. पण नंतर पुढेही तो वाद आला आहे. गन व्हायोलन्स हे काही शाळेच्या सिस्टीमशी संबंधित नाही. अनेक विकृत लोक या सुंदर सिस्टीमची वाट लावायला निघाले आहेत ते सगळे खरे आहे. पण हे म्हणजे एखाद्या प्रवासवर्णनाच्या लेखात "पण तेथील मजूरांची हालत पाहिलीत का" ची पिंक टाकण्यासारखे आहे.

या गन संस्कृती विषयी पण थोडं लिहा प्लिज, म्हणजे सामान्य नागरिकांना गन इतक्या सहजी कशा उपलब्ध होतात, त्या चालवायचं काही प्रशिक्षण दिलं जात का? ती लहान मुलांच्या हाती लागून अजाणतेपणी काही अपघात होऊ नये म्हणून काय व्यवस्था आहे? तिच्यातल्या गोळ्या (बुलेट्स की काय ते माहीत नाही) या किती घेता येतात? त्याचा काही कोटा वगैरे असतो का? सामान्य नागरिक गन नेहमी सोबतच घेऊन फिरतात का ? (तसे नसेल तर ती जवळ बाळगण्याचे नेमकी गरज का भासते?) हे शाळांमध्ये अंधाधुंद गोळीबार करणारे माथेफिरू गन घेऊन सुरक्षायंत्रणा ना कसे चकवतात?

मागच्या महिन्यात लेक स्टेट्स मध्ये सुट्टीला गेलेली होती. न्युयॉर्क ते शिकागो फ्लाइट मिस झाली. इथल्या सवई प्रमाणे ( वरसोवा ते घाटकोपर मेट्रो २५ मिनिटे - घाटकोपर मुलुंड साधी लोकल १५ - २० मिनिटे कॅब ने दीड दोन तास लागतात व महा गही पडते.) पब्लिक ट्रान्सपोर्ट ने गेली व फ्लाइट मिस झाली थोड्याषा फरकाने. दुसरी घेतली ती शार्ल ट मध्ये थांबोन जाणार होती पुढे. ह्या फ्लाइट मध्ये टर्ब्युलन्स लागला पण निभावले
रात्रीची फ्लाइट शार्लट मधून वेळेवर निघाली. शिकागोला व्यवस्थित पोहोचली पण मोठी बॅग जी चेक इन केलेली होती ती शार्लट लाच राहिली.
ही दोन तीन दिवसांनी घरपोच मिळाली.

तर ही जेव्हा पोहोचली तेव्हा शिकागोत रात्रीचे तीन वाजलेले. पण कॅब घेउन गंतव्य स्थळी पोहोचली. हा प्रवास पूर्ण होई परेन्त मी अगदी देव पाण्यात ठेवलेले!!! शिकागोची क्रिमिनल हिस्त्री वाचून माहिती. पण ऑन ग्राउंड तिला काहीच जाणवले नाही. कॅब ड्रायवर पॅलेस्ट्निअन म्हातारा होता तेव्हा तिने इस्रायल पेलेस्टाइन वर गप्पा मारल्या. पिकप करायला कोणी आले नाही हेच नॉर्मल आहे असे तिने मला सांगितले.

दुरून आपल्याला लै भीति दायक वाटते पण मेबी गन कल्चर तिथे पार घटनेत मान्य केलेले असल्याने सामान्य नागरिक फक्त काळजीच घेउ शकतात. शिकागो व जनरली तिथे वावरताना तिला काही त्रास झाला नाही व फार असुरक्षित आजिबात वाटले नाही. मजा म्हणजे तिने तिथे केलेल्या क्रेडिट कार्डावरील खर्चाने मला इथे माझी क्रेडिट लिमिट खूपच वाढवून मिळाली. डाँट मिस अंड्रएस्टिमेट द पावर ऑफ डॉलरा आय से.

अमा, एखादी सिटी अनसेफ असते म्हणजे अख्खी सिटी अनसेफ असते असं काही नाही. काही काही भाग धोकादायक असू शकतात दिवसातल्या काही वेळी. आणि इथे गन्स हा मोठाच प्रॉब्लेम आहे पण म्हणून सगळे कमरेला लावून फिरतात असंही नाही.

अमा, एखादी सिटी अनसेफ असते म्हणजे अख्खी सिटी अनसेफ असते असं काही नाही. काही काही भाग धोकादायक असू शकतात दिवसातल्या काही वेळी. आणि इथे गन्स हा मोठाच प्रॉब्लेम आहे पण म्हणून सगळे कमरेला लावून फिरतात असंही नाही>> हो मला तेच म्हणायचे. होते. मी वाचीव
माहिती वर घाबरले होते. पण ऑन ग्राउंड काहीच इशू नव्हता. इथे राहून तिथली परिस्थ्ती कळत नाही.

मला श्रीलंकेच्या दोन मुली भेटल्या होत्या. त्यांना भारताबद्दल फार आकर्षण आहे. पण तिथे महिलांना सुरक्षित वातावरण नाही असं त्यांनी ऐकल्यामुळे बाकी बरेच देश फिरल्या असल्या तरी भारतात जायला घाबरल्या होत्या. वरचा अनुभव वाचून याची आठवण झाली. त्यांनाही मी तेच सांगितलं - "एखादी सिटी अनसेफ असते म्हणजे अख्खी सिटी कंट्री अनसेफ असते असं काही नाही"

Pages