माझी अमेरिका डायरी - ७- पुरचुंडी, शाळेची!

Submitted by छन्दिफन्दि on 24 March, 2023 - 12:46

गेले काही भाग शाळेतला अभ्यासक्रम, पुस्तकं, वाचन, वाचनालये यांवरच केंद्रित होते. ह्या भागात इकडच्या शाळेतल्या मला त्यावेळी जाणवलेल्या, दिसलेल्या काही हटके गोष्टी सांगणारे.

तर आत्ता पर्यंत आपण बघितलं कि रंगेबिरंगी शाळा, तेव्हढेच रंगीत कपडे आणि नाना तऱ्हा करून आलेली मुलं-मुली, खेळण्यासाठी असलेली प्रचंड मोठी मैदान, क्रीडा सामग्री सगळंच वेगळं वाटत होतं.

मला खर आश्चर्य वाटलं, जेव्हा किंडरगार्डनच्या मुलांना मी शिक्षिकेला मिठी मारताना बघितलं, काही मुलं तिच्या हाताला धरून खेचत होती, तर काही तिच्या कमरेला बिलगलेली. तिसरी-चौथीची मुलं त्यांच्या वर्ग शिक्षिकेभोवती कोंडाळं करून बसलेली. त्यांचे काही हास्य विनोद चाललेले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बहुदा तिथल्या मदतीला आलेल्या एका भारतीय पालिकेने वाचले. खळखळून हसत मला म्हणाली, “मिस Taylor, म्हणजे अशीच आहे, एकदम खेळकर. मुलांबरोबर कधी कधी डान्स पण करते, अगदी गाणी-बिणी लावून ?”

मी बापुडी हा सांस्कृतिक धक्का पचवत होते. एक तर टीचर, मॅडम, सर वगैरे काही नाही, सरळ शिक्षकांना “मिस अमकी “, “मिसेस ढमकी”, “मिस्टर तमके” करूनच बोलावतात. कितीही तरुण असल्या तरी आमच्या देशमाने बाईंबरोबर आम्ही डान्स कसला? साधं अभ्यासाचं सोडूनही बोलल्याचं मला तरी आठवत नाही. लांबून येताना एखाद्या बाई दिसल्या (आम्ही मराठी शाळेत शिक्षिकांना “बाई” म्हणायचो ), कि हळूच लांबची वाट धरायचो. त्त्यांचा दराराच एव्हढा होता. क्वचित एखाद्या प्रेमळ बाईंचा अपवाद वगळता! कदाचित इथे एका वर्गात फक्त २२-२४ मुले असल्यामुळे त्यांना मुलांशी जवळीक साधणे सोपे जात असावे.
तुम्हाला मुलं फक्त वर्गातच अभ्यास करताना दिसतील असे नाही, कधी २-३ मुलं उन्हात बसून त्यांचं प्रोजेक्ट करताना दिसतील, एखाद मूल फ्री टाईमला वर्गातील मोकळ्या जागेत लोळत पुस्तक वाचताना दिसेल. पण सकाळी आठच्या घंटेला बरोबर सगळी मुलं त्यांच्या वर्गात असतात, तिथे एकदम वक्तशीर. एखाद्या ठिकाणी नीट लाईन लावतील, शांतपणे त्यांच्या पाळीची वाट बघतील, कचरा कचराकुंडीत टाकतील, जमिनीवरचा शाळेतला कचरा उचलतील (तिसरी चौथीच्या मुलांकडून हि कामे करून घेतली जातात).

ओघाने एक गंमत सांगते, मी दुसरीच्या वर्गात त्यांचं होमवर्क तपासायला जायचे. हो, तिकडे होमवर्क तपासणे, फोटो कॉपी (Xerox) करणे, इतर उपक्रमांमध्ये काही कच्ची तयारी करायची असल्यास ती करणे, शाळेच्या फील्ड ट्रिप (शैक्षणिक सहल) मध्ये मुलांवर लक्ष ठेवायला जाणे, आणि इतर काही वर कामे असतील ती करणे ह्या कामांसाठी पालक स्वयंसेवा करतात. वर्षाच्या सुरुवातीलाच प्र्त्येक शिक्षिका तिला मदत हवी असेल तर ती कामे आणि त्याचे वेळापत्रक जसं की वार, वेळा, महिन्यातून/ आठवड्यातून किती वेळा, जाहीर करतात. बाकी पालक तेथे त्यांच्या सोयीप्रमाणे जबादारी उचलतात, सगळं कस पद्धतशीर!
तर मी आणि एक पालक त्यांचा गृहपाठ तपासत होतो. त्या दिवशी नेमकी त्यांची शिक्षिका सुट्टीवर होती म्हणून तिच्या ऐवजी बदली शिक्षिका होती. तर ह्या शिक्षिकेला सगळी मुलं नवीन, त्यांची नाव नवीन. इकडे तर खूप वागवेगळ्या संस्कृतींमधून आलेली मुलं-मुली त्यामुळे त्यांची नावही वेगळी, स्पेलिंग वेगळी, उच्चार वेगळे. हे पालक रोमेनिअन होते, त्यांची नावे, आडनावे आणि उच्चार अजून वेगळे असतात.
इकडे शिक्षिकेने हजेरी घ्यायला सुरुवात केली, एकेका मुलाचे नाव ती घेत होती. एका नावाला ती अडखळली, ‘Iani’ तिने काही नाव घेतले, तो मुलगा उठून उभा राहिला “ माझे नाव असे नाही उच्चारायचे,” तो त्यांना ठासून म्हणाला.
मग बाकीची मुले तिला कसं उच्चारायचं ते सांगू लागली. इतक्या गोंधळात तिला काही सुधरेना. हा मुलगा आणि इतर मुलं परत परत सुधारून शेवटी २-३ मिनिटांच्या कोलाहलानंतर, तिने त्याच नाव एकदाच बरोबर घेतलं “यानी”
तेव्हा कुठे यानी आणि मंडळी गप्प बसली.
हे सगळं रामायण चालू असताना मी सहजच हसून त्या पालकांकडे बघितलं कारण तो त्यांचा मुलगा होता,
“काय मुलं आहेत ना ?”
“असायलाच पाहिजे, शेवटी त्यांचं नाव आहे, ते नीट घेतलच गेलं पाहिजे, ” तो ठामपणे म्हणाला.
इकडे मी विचारात, माणसा तूच काय? पण कोणीही पाश्चिमात्य माणसाने माझं नाव नीट घेऊन दाखवा असा आग्रह माझ्यासारखीने धरला तर समय को रुकना पडेगा.
बहुतेक चायनीज लोक त्यामुळे आपल्या मुलांची दोन नाव ठेवतात, एक चायनीज आणि दुसरं इकडच्या लोकांना सहज घेता येईल अस किंवा मग एखादा अगस्त्य त्याचे नाव “Aggy “ सांगतो, बहुदा हेच असावं का पौर्वात्य लोकांचं नेमस्त धोरण?
शाळांमध्ये मुख्य कमी शिपाई काकांची. त्यामुळे शाळेच्या ऑफिसमधून एखाद्या वर्गात काही निरोप द्यायचाय तर चक्क फोन करतात.हो, प्रत्येक वर्गात फोन, लँडलाईन वाला, असतो. शिक्षिकेकडे तिचा लॅपटॉप असतो, बोलायला मायक्रोफोन (छोटा ध्वनिक्षेपक)असतो, वर्गात व्हाईट बोर्ड आणि मार्कर (काळा फळा-खडू कधी नावालाही नाही दिसले). शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने, मायक्रोफोन आणि व्हाईट बोर्ड खरं तर आपल्या शाळांमध्येही हवेत. प्रत्येक वर्गात एक प्रोजेक्टर असतो, ज्याच्या वर मधून मधून मुलांना कार्टून्स, चित्रपट दाखविले जातात.
शाळेत दुसरीपर्यंतच्या प्रत्येक मुलाला टॅब देतात. तिसरीच्यापुढे मुलांना Chromebook देतात. Covid काळामध्ये मुलांना वर्षभर वापरायला Chromebook घरी दिले होते. अजून मोठ्या म्हणजे हायस्कुलच्या मुलांना प्रत्येकी लॅपटॉप दिलेला असतो.
JIJI Math, बिग ब्रेन, प्रोडीजी यांसारखी अनेक गणिताची अँप्स, Newsela वर ऑनलाईन वाचायला लेख ह्यासाठी मुख्यतः ही devices दिलेली असतात. Covid च्या आधी पासूनच अशा कितीतरी गोष्टी त्यांना ओनलाईन करायला होत्या. मग Covid मधल्याकाळात तर जगभर सगळीकडे झूमवर शाळा, ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मुलांचा स्क्रीनटाइम प्रमाणाबाहेर वाढला. आता जग पूर्ववत होऊ लागलय तरी मुलांचा स्क्रीनटाईम काही म्हणावा तेवढा कमी झालेला नाही.
साधारण आठ ते तीन शाळा असल्यामुळे एक छोटी सुट्टी आणि एक मोठी सुट्टी (५० मिनिटे ) असते. शाळेमध्ये, सकाळी ब्रेकफास्ट आणि दुपारी HOTLunch मिळतं. साधारण ७०% मुलं तरी शाळेतच जेवण घेतात. लंच मध्ये एक मुख्य पदार्थ, “ब्रेड आणि प्रोटीन “असेल असा, दूध, आणि फळ किंवा गाजर / ब्रोकोली असा साधारण थाट असतो. पूर्वी दीड डॉलर ला ब्रेकफास्ट आणि सव्वातीन डॉलरला जेवण मिळे. ज्यांचे उत्पन्न ठरविक रकमेच्या खाली आहे, त्यांना ते जेवण अत्यंत कमी दारात म्हणजे २५ सेंट्स (पाव डॉलर ), ५० सेंट्स (अर्धा डॉलर) अशा किमतीत मिळे.
ह्या HOTLunch चा महत्व Covid काळात अधोरेखित झाले. कितीतरी घरांमध्ये शाळेतून मुलांना मिळणारे जेवण हेच मुख्य अन्न असते. शाळा बंद तर मुलांच्या जेवणाचे काय? मग त्यासाठी जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा शाळा शाळांमधून आठवड्याभराचे कोरडे शिधा वाटप केले जाई. मला आपल्याकडे अंगणवाडीत चालणाऱ्या खिचडी उपक्रमाची आठवण झाली. तसेच अमेरिकेसारख्या संपन्न देशातही Child Hunger (मुलांची उपासमार ) समस्या असल्याचे ठळकपणे समोर आले. Covid नंतर कॅलिफोर्निया मध्ये सगळ्या शाळांमध्ये मुलांना जेवण फुकट दिले जाते.
मुलांच्या हट्टपायी मी कधीतरी त्यांना HOTLunch घेऊ देई पण बहुदा ते पोळी भाजी, सँडविच ह्यासारख काही डब्यात घेऊन जात, कारण शेवटी HOTLunch म्हणजे फ्रोझन फूड आयत्यावेळी गरम करून दिलेलं असत. ते भारतीय आयांच्या मनास उतरत नाही. बाजूला खाऊ म्हणून ते ग्लुकोज बिस्किटं, शेव -चिवडा असं काही घेऊन जात. गमतीची गोष्ट म्हणजे कधी इकडच्या मुलांना ते भारी आवडे. ग्लुकोजची बिस्किटे तर बरीच मुलं त्यांच्याकडून मागून मागून खात. आता हे अनुभव काही सरसकट सगळ्यांना आणि सगळीकडे येतीलच असे नाही पण इकडे मिळणाऱ्या इतक्या प्रकारच्या कुकीज मध्ये त्यांना आपल्याकडे अतिशय साधी मानली गेलेली ग्लुकोज बिस्किटे इतकी आवंडावीत ह्याच मला जरा आश्चर्य आणि कौतुक वाटलं म्हणून मुद्दाम सांगितलं.
पाचवीपासून बऱ्याच शाळांमध्ये बँड किंवा orchestra असतो. म्हणजे मुलांना बासरी, व्हायोलिन, चेलो , ट्रूम्पेट, सॅक्सोफोन असे एखादे वाद्य शिकता येते. माझ्या मुलाचा पहिला बँड परफॉर्मन्स झाला तेव्हा आम्हाला त्याच कोण अप्रूप वाटलेलं, एका हॉल मध्ये १०-१२वर्षांची, जवळ जवळ १५०-२०० मुले एकाच सुरात, शिस्तीत संगीत वाजवत होती. हा भाग वेगळा की आता तेच वाजवलं तर मुलगा धावत येतो “इतकं बेसूर, कधीच आहे?” म्हणत.
त्याव्यतिरिक्त सांगायचं तर रोज एक तास PE चा असतोच असतो. त्याव्यतिरिक्त ४० मिनिटांचे मधल्या सुट्टीतले खेळणे. बरीचशी मुलं शाळा सुटल्यावरपण बास्केटबॉल, फुटबॉल (अमेरिकन), सॉकर (बाकी जगाचा फुटबॉल), स्विमिन्ग, कराटे ह्यांतील एक किंवा दोन खेळ खेळायला, प्रशिक्षणाला जातात.
मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे एक प्रोजेक्ट होता YMCA चा. तो अँटी बुलिंग कार्यक्रम होता. त्याअंतर्गत काही ठराविक पुस्तके होती ज्यात मुलांना मिळून मिसळून कसे राहावे, कोणाला एकट पडू नये अशा आशयाच्या गोष्टी होत्या. महिन्यातून एकदा, पालक स्वयंसेवक वर्गात जाऊन, त्यातील गोष्ट वाचून दाखवी, त्या अनुषंगाने मुलांकडून काही गमतीशीर खेळ, गाणी, ऍक्टिव्हिटीज करवून घेई. शाळेमध्ये सर्वसमावेशक वातावरण तयार व्हावे, बुलिंग होऊ नये हा त्यामागील उद्देश. ही कल्पना आपल्याकडे भारतात पण राबवली तर खूप बरे होईल असे वाटून गेले.
एक अभाव जाणवला तो म्हणजे इकडे आपल्यासारखे वार्षिक स्नेहसंमेलन होत नाही. चित्रकला, हस्तकला हे उपक्रम पालकांनी राबविले तरच शाळांमधून होतात. शिक्षक शिकविण्या व्यतिरिक्त आणि शाळेच्या वेळेबाहेर जाऊन सामान्यतः काही करत नाहीत. एकंदर मुलांशी अत्यंत प्रेमाने बोलतात, वातावरण खेळीमेळीचे ठेवतात पण नियमावर बोट ठेवून तेवढेच काम करतात. ती लक्ष्मण रेषा पार करून कधी आमच्या दहावीच्या बाईंसारखे एक्सट्रा पेपर्स तपासून देत नाहीत कि त्यांच्या एखाद्या ऑफ पिरिअडला न समजलेलं एखाद अवघड गणित समजावून सांगायला बोलवत.
इकडच्या शिक्षण पद्धतीत जरी समजून घेण्यावर, वाचनावर भर दिला, तरी त्यांचा पाठांतरावर अजिबात जोर नसतो. फक्त घोकमपट्टी जेव्हढी चांगली नाही तेवढच अजिबात स्मरणशक्तीला ताण न देणं हेही वाईटच.
“मला स्पेलिंगज नाही लक्षात रहात” हे जेव्हा माझ्या मुलाच्या शिक्षिकेनी मला सांगितले तेव्हा मात्र हात नकळत कपाळाकडे गेला. “ह्या बाईच्या प्रांजळपणाचे कौतुक करू का शिक्षिका असून स्पेलिंग कसे येत नाही म्हणून खडसावू ?” अशी अवस्था झाली.

आता शाळा आणि शिक्षण ह्यांच्यापासून विश्रांती घेते. सुट्टया, सुट्टीत पाहिलेली आसपासची ठिकाणं, रोजच्या दैनंदिन आयुष्यात जाणवणारे फरक ह्याविषयी जाणून घेऊ या पुढल्या भागात.

क्रमश:

https://photos.app.goo.gl/bycytLWSGiPzzGLfA
वरील लिंकवर विडिओ आणि फोटो पाहू शकता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> शिक्षक शिकविण्या व्यतिरिक्त आणि शाळेच्या वेळेबाहेर जाऊन सामान्यतः काही करत नाहीत.>>
आमच्या भागात शिक्षक शाळे आधी आणि नंतरही विद्यार्थ्यांसाठी वेळ देतात. शाळेव्यतिरिक्त मार्गदर्शनासाठी फारसे पर्याय नाहीत, जे आहेत ते पालकांसाठी वेळ आणि पैसा दोन्ही बाजूने न परवडणारे. त्यामुळे बुडलेला अभ्यास/टेस्ट्स पूर्ण करणे, कठीण भाग समजून घ्यायला मदत हे सर्व शाळेतील शिक्षक आत्मियतेने करतात. अगदी पदरमोड करुन शैक्षणीक साहित्य, खाऊची सोय करणे ते स्वतःच्या ओळखीत शब्द टाकून पार्ट टाईम जॉब मिळवायला मदत असे बरेच काही कुठलाही गाजावाजा न करता करतात.

पण नियमावर बोट ठेवून तेवढेच काम करतात. >> हे पटलं नाही.
कॅलिफोर्निआत असताना तिकडे फंड रेजिंग साठी वॉकथॉक असायची, स्पेल-अ-थॉन असायची, मूव्ही-अंडर-द -स्टार्स असायची, सुपरबक्स असायचे (म्हणजे काही चांगलं केलं की शिक्षक हे सुपरबक्स द्यायचे. आणि मग दर दोन- तीन महिन्यांनी सुपरबक्स स्टोर मधून हे सुपर बक्स देऊन मुलं खरेदी करायची. आपल्या घरात नको असलेल्या नीट वापरलेल्या लहान लहान वस्तू आपण सुपरबक्स स्टोरला डोनेट करायच्या आणि मुलं त्यांच्या चांगल्या वागण्यातून मिळालेल्या करंसी मधुन त्या विकत घ्यायची. यात पालकांचा बराच सहभाग असला तरी शिक्षकांविना ते शक्य न्हवतं.), काही येत नसेल तर परत परत मुलांकडून करुन ही घ्यायचेच. सायन्स फेअर असायची.
वर्गात लागणारे शैक्षणिक साहित्य कित्येक शिक्षक पदरमोड करुन आणतात.
वाचताना साऊंड आउट जसं करायला शिकवतात तसे साईट वर्ड नुसते बघुन लक्षात ठेवून ही वाचायला शिकवतात. घोकंपट्टी आपल्या शाळेत करायचे तशी न करताही पाठ करता येते हे शिकवतात. स्पेलिंगची टेस्ट असते.
कॅनडात आल्यावरही शाळे-व्यतिरिक्त शिक्षक अनेक उपक्रमांत भाग घेतात, मागे राहिलेल्या मुलांना मधल्या सुट्टीत वर्गांत थांबवुन सराव करुन घेतात. बारक्याला शाळेतल्या बाईंनी मधल्या सुट्टीत पत्त्यांचा एक नवा खेळ शिकवला.
आमच्या भारतातील शाळेतल्या एखाद दोन शिक्षकांचा अपवाद सोडला तर कुणाला सेन्स ऑफ ह्युमरही न्हवता. काही आलं नाही तर पट्टीने बडवून काढत. अगदी तिसरीतल्या मुलाला देखिल. आणि एकोणचाळीस नंतर तीस म्हटलं तर कसं येत नाही दाखवायला सर्कशीतल्या जनावरा सारखं आजूबाजूच्या वर्गांत घेऊन जाऊन जाहीर पाणउतारा करत असत. असे हिस्त्र शिक्षक आमच्या शाळेत होते.

फोटोतली शाळा मला माहित आहे असे वाटते , सांता क्लाराच्या जवळपास आहे का ? <<< वेस्ट गेट मॉल जवळची कंट्री लेन

गदी पदरमोड करुन शैक्षणीक साहित्य, खाऊची सोय करणे ते स्वतःच्या ओळखीत शब्द टाकून पार्ट टाईम जॉब मिळवायला मदत असे बरेच काही कुठलाही गाजावाजा न करता करतात.>>> हे चांगलं आहे. छान वाटलं ऐकून

कॅलिफोर्निआत असताना तिकडे फंड रेजिंग साठी वॉकथॉक असायची,>>>> त्यासाठी पॅरेण्ट ऑर्गनायझेशन जास्त ऍक्टिव्ह होती. आणि मेजर स्पॉनसोर्स बे एरियातील कंपन्या. ह्यांच्या शाळेत शक्षक मुलांकडून एकत्रित आर्टवर्क करून घ्यायचे, जे ऑक्शन मध्ये पालक विकत घ्यायचे.

मूव्ही-अंडर-द -स्टार्स असायची,<<< इकडे नव्हतं कधी

सायन्स फेअर असायची. <<<पालक किंवा घरीच मुलं ग्रुप ने काही करतील तर ते
वर्गात लागणारे शैक्षणिक साहित्य कित्येक शिक्षक पदरमोड करुन आणतात. <<<< मी थोडं फार पॅरेण्ट टीचर संघटनेचं काम बघितलेलं तेव्हा लक्षात आलं कि प्रत्येक शिक्षकांना वर्षाच्या सुरुवातीला काही ठरविक रक्कम त्यांना दिली जाते/ किंवा टीचर ग्रांट मागू शकतात
बाकी प्रिंटिंग पेपर्स, पेपर टॉवेल्स , sanitizer वगैरे सगळं वर्षाच्या सुरुवातीला पालक देतात किंवा काही शाळांमधून त्याचे एकदमच पैसे घेतात

सुपरबक्स स्टोर<< ह्यांच्या शाळेत (मिडल स्कूल मध्ये ) कुपन स्टोर होतं त्यात त्यांना किडुक मिडूक toys किंवा लॉलीपॉप मिळायचे कुपन्स च्या बदल्यात . ते विद्यार्थी चालवायचे .
मला प्रमुख्याने gathering नाही ते जाणवलं .
स्पेलिंगची टेस्ट असते<<< हो हे खर आहे.
पण इन general पाठांतर कमीच जस पाढे, वर्ग , घन काही पाठ करत नाहीत.

वाचताना साऊंड आउट जसं करायला शिकवतात तसे साईट वर्ड नुसते बघुन लक्षात ठेवून ही वाचायला शिकवतात.<< हे कदाचित घेतलं असेल पण आम्ही इकडे किंडर गार्डन इथे न केल्याने कळले नसेल

काही आलं नाही तर पट्टीने बडवून काढत. अगदी तिसरीतल्या मुलाला देखिल. आणि एकोणचाळीस नंतर तीस म्हटलं तर कसं येत नाही दाखवायला सर्कशीतल्या जनावरा सारखं आजूबाजूच्या वर्गांत घेऊन जाऊन जाहीर पाणउतारा करत असत. असे हिस्त्र शिक्षक आमच्या शाळेत होते. <<< Uhoh व्हेरी sad

आमच्या शाळेत क्वचित एखादा अपवाद वगळता शिक्षक आणि शिक्षिका चांगल्या होत्या.

कदाचित मुलांना मारत असतील << << Proud Proud Proud जस्ट किडींग

इकडे बरेच डेज असायचे जस स्प्रिंग डान्स, international cultual डे वगैरे वगैरे पण हे सगळे प्रामुख्याने पालकच संयोजन करायचे .
माझी तक्रार नाहीये पण माझं निरीक्षण/ अनुभव असा आहे.

पण नियमावर बोट ठेवून तेवढेच काम करतात. >> आमचा अनुभव सुदैवाने वेगळा आहे. असेही काही शिक्षक बघितले आहेत हे त्यांच्या जबाबदारीच्या पुढे जाऊन बरेच काही करतात. सगळॅच करतात असे नाही पण नियमावर बोटे ठेवून एव्हढेच करणारे कमी होते. हे स्कूल किंवा स्टेट पेक्षाही मनुष्यस्वभावावर असावे. भारतातही जेव्हढ्यास तेव्हढे नि रेषेच्या पुढे जाणारे असे दोन्ही प्रकारचे शिक्षक होतेच कि.

हे स्कूल किंवा स्टेट पेक्षाही मनुष्यस्वभावावर असावे. भारतातही जेव्हढ्यास तेव्हढे नि रेषेच्या पुढे जाणारे असे दोन्ही प्रकारचे शिक्षक होतेच कि<<<< हे पटलं

>>>>नि रेषेच्या पुढे जाणारे असे दोन्ही प्रकारचे शिक्षक होतेच कि
होय अगदी खरे आहे. १००% खरे आहे. रेषेच्या पुढे जाणारे शिक्षक लाभले. फर्ग्युसनचे एम प्रकाश, आचार्य. गुप्ते क्लासच्या गणिताच्या मॅडम. आणखीही अनेक.

अतिशय सुंदर लेख!

एक तर टीचर, मॅडम, सर वगैरे काही नाही, सरळ शिक्षकांना “मिस अमकी “, “मिसेस ढमकी”, “मिस्टर तमके” करूनच बोलावतात. कितीही तरुण असल्या तरी आमच्या देशमाने बाईंबरोबर आम्ही डान्स कसला? साधं अभ्यासाचं सोडूनही बोलल्याचं मला तरी आठवत नाही.>> पुलंची असा मी असामी आणि बिगरी ते मॅट्रिकमधली वाक्यं आणि ते ते शिक्षक आठवले. दामले मास्तर, मिस अनु बोगा, आपली सरोज खरे वगैरे.

दामले मास्तर, मिस अनु बोगा, आपली सरोज खरे >> Happy Happy Happy

एकोणचाळीस नंतर तीस म्हटलं तर कसं येत नाही दाखवायला सर्कशीतल्या जनावरा सारखं आजूबाजूच्या वर्गांत घेऊन जाऊन जाहीर पाणउतारा करत असत. असे हिस्त्र शिक्षक>>> दामले मास्तर

आमच्या शाळेतल्या श्रोत्री बाई . संस्कृत दिनाला दोन फुलस्केप भरून कुंतीच स्वगत, संस्कृत मध्ये पाठ करवून घेतलेलं , त्या रिटायर्ड झाल्यावरही मुलांना शाळेत येऊन येऊन शिकवत असत कितीतरी वर्ष >> त्यां आठवल्या की चितळे मास्तर आठवतात किन्वा vice versa

हाही लेख छान. तिथल्या पद्धतीही छान.
लहानपणापासूनच टॅब आणि क्रोमबुक आहे तर वह्या, पेन वापरतात का? या गोष्टी कालबाह्य होतीलच. सध्या काय स्थिती आहे? पाढे, स्पेलिंग पाठ करायचीही गरज नसेल.

मस्त लेखमाला आहे. मुलगी elementary आणि middle school अमेरिकेत शिकली असल्याने बर्याच गोष्टी रिलेट झाल्या. अपवाद एकाच गोष्टीचा , आम्ही ज्या भागात राहात होतो त्या भागात सगळे शिक्षक शाळेच्या वेळेबाहेर पण काम करायचे. मुलाबरोबर कधीतरी शनिवारी बाहेर आउटिंग करायचे, डिबेट , फुटबॉल , चेस वगैरे कॉपिटिशन ला घेउन जायचे. आम्ही ज्यु बहुल लोकाच्या district मध्ये राहत होतो. मेअर आणि सगळे शाळेचे मेंबर ज्यु असल्याने शाळेचे बजेट चांगले असायचे. त्यामुळे अमेरिकेच्या बाकीच्या शिक्षकापेक्षा ४०% जास्त पगार होते म्हणुन कदाचित शिक्षक जास्त वेळ देत असावेत.
यात आम्ही अनुभवलेल्या दोन मजेदार गोष्टी ,
१> शाळेतल्या शेवटच्या दिवशी सगळी मुले केक , अ‍ॅपल पाय किंवा आजुन काही तरी घेउन जातात आणि आपल्या नावड्त्या टिचर ला केक किंवा पाय फेकुन मारतात आणि आपला राग काढयचा आणि त्यानंतर दोघे मिठी मारुन पुन्हा मित्र व्हायचे. अन्नाची नासाडी बघुन वाईट वाटले पण मुल ह्या दिवसाची वाटच बघत असतात.
२> शाळेत वेलेंटाईन दिवस साजरा करतात. त्या दिवशी सकाळी पालक आणि मुलाबरोबर शिक्षक ब्रेकफास्ट करतात आणि एकमेकावर आपुलकी व्यक्त करतात.

नंतर मुलगी हायस्कुल ला पुण्याला आल्यावर पहिले काही महिने खुप अवघड गेले. टिचर ला नावाने बोलवणे , टिचर शी खुप freindly वागणे, टिचर काही चुकली की लगेच दाखऊन देणे, उत्तरे उभे राहुन न देता बेंच वर बसुन देणे, प्रत्येक क्लास नंतर बाहेर जाउन फिरुन येणे अश्या तक्रारी येत होत्या. पण नंतर मात्र भारतातिल स्कुल enjoy केली.

मस्त लेखमाला आहे. मुलगी elementary आणि middle school अमेरिकेत शिकली असल्याने बर्याच गोष्टी रिलेट झाल्या. अपवाद एकाच गोष्टीचा , आम्ही ज्या भागात राहात होतो त्या भागात सगळे शिक्षक शाळेच्या वेळेबाहेर पण काम करायचे. मुलाबरोबर कधीतरी शनिवारी बाहेर आउटिंग करायचे, डिबेट , फुटबॉल , चेस वगैरे कॉपिटिशन ला घेउन जायचे. आम्ही ज्यु बहुल लोकाच्या district मध्ये राहत होतो. मेअर आणि सगळे शाळेचे मेंबर ज्यु असल्याने शाळेचे बजेट चांगले असायचे. त्यामुळे अमेरिकेच्या बाकीच्या शिक्षकापेक्षा ४०% जास्त पगार होते म्हणुन कदाचित शिक्षक जास्त वेळ देत असावेत.
यात आम्ही अनुभवलेल्या दोन मजेदार गोष्टी ,
१> शाळेतल्या शेवटच्या दिवशी सगळी मुले केक , अ‍ॅपल पाय किंवा आजुन काही तरी घेउन जातात आणि आपल्या नावड्त्या टिचर ला केक किंवा पाय फेकुन मारतात आणि आपला राग काढयचा आणि त्यानंतर दोघे मिठी मारुन पुन्हा मित्र व्हायचे. अन्नाची नासाडी बघुन वाईट वाटले पण मुल ह्या दिवसाची वाटच बघत असतात.
२> शाळेत वेलेंटाईन दिवस साजरा करतात. त्या दिवशी सकाळी पालक आणि मुलाबरोबर शिक्षक ब्रेकफास्ट करतात आणि एकमेकावर आपुलकी व्यक्त करतात.

नंतर मुलगी हायस्कुल ला पुण्याला आल्यावर पहिले काही महिने खुप अवघड गेले. टिचर ला नावाने बोलवणे , टिचर शी खुप freindly वागणे, टिचर काही चुकली की लगेच दाखऊन देणे, उत्तरे उभे राहुन न देता बेंच वर बसुन देणे, प्रत्येक क्लास नंतर बाहेर जाउन फिरुन येणे अश्या तक्रारी येत होत्या. पण नंतर मात्र भारतातिल स्कुल enjoy केली.

मला वाटतं बऱ्याच शाळांचा अधीक्षकांचा अनुभव वेगळा आहे. मला तुम्ही आपापले अनुभव सांगितल्यामुळे कळले. थँक यू

२> शाळेत वेलेंटाईन दिवस साजरा करतात. त्या दिवशी सकाळी पालक आणि मुलाबरोबर शिक्षक ब्रेकफास्ट करतात आणि एकमेकावर आपुलकी व्यक्त करतात.>>> खूप छान

पाय फेकुन मारतात ... पण मुल ह्या दिवसाची वाटच बघत असतात.>>> I can imagine.
मला वाटत एक वर्ष वॉके थॉनला बहुदा आमच्या शाळेत होतं तस. ५$ का काही द्यायचे आणि पाहिजे त्या टीचर ला पाय फेकून मारायचे. मी ऐकून चाट पडलेले. आणि मला ते थोडं शिक्षकांचा अनादर केल्यासारखं वाटलेलं. पण ते लोकं म्हणजे मुलं आणि शिक्षक कूल होते. सांस्कृतिक धक्का होता (त्या धाग्यात टाकायला पाहिजे )

अन्नाची नासाडी बघुन वाईट वाटले >>>> विषयांतर होतंय पण राहवत नाही म्हणून सांगते. मी जवळून बघतेय. मधल्या सुट्टीत एक बदली ठेवतात आणि ज्यांना नकोय ते सगळं दूध त्या बादलीत टाकतात. मोठी च्या मोठी पिंप भरून रोज फूड वाया जातं एकेका शाळेत. कदाचित मिडल/ हाय स्कुल मध्ये हे होत नसावं.

वह्या, पेन वापरतात का? >>> हो वापरतात हो वापरतात अजूनतरी AP आणि SAT पेपर वर असतात
पाढे, स्पेलिंग पाठ करायचीही गरज नसेल.>>> गरज असते. स्पेलिंग टेस्ट असतात. पाढे वगैरे पाठ करण्यावर अजिबात जोर नसतो. कदाचित हे सुद्धा शाळा शालनमध्ये वेगळं असू शकतं
AP टेस्टिंग ला त्यांना फॉर्मुला शीट्स देतात . ते बघून मी उडालेले. पण कदाचित ते अँप्लिकेशन अवघड ठेवत असावेत.

खूप सुंदर लेखमाला... छान वाटतंय वाचताना..!

भारतातही आता शिक्षक -विद्यार्थी आंतरक्रिया अधिक मैत्रीपूर्ण व आनंददायी होऊ लागल्या आहेत. अभ्यासक्रम व शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थिकेंद्रित आणि कृतीप्रधान अध्ययन अनुभवांना प्राधान्य दिले जात आहेत.

छान चालूय लेखमाला
सर्व भाग वाचले आहेत.

मला खर आश्चर्य वाटलं, जेव्हा किंडरगार्डनच्या मुलांना मी शिक्षिकेला मिठी मारताना बघितलं,
>>>>
हे आता ईथेही कॉमन आहे. फार लाडात वागणे असते. कधी कधी आपल्यालाही जाऊन एक मिठी मारावीशी वाटते. तसेच मोठ्या मुलांसाठी क्लास रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून काही निव्वळ गोड गोड बोलणाऱ्या मुली असतात. त्या स्टुडंट आणि टीचरमधील दुव्याचे काम करतात. टीचर्स आणि पालकांचा कॉमन व्हॉटसपग्रूप असतो ज्यात बहुतांश बायकाच असतात तिथेही नुसती धमाल चालू असते. शाळेचा ग्रूप आहे की सोसायटीतील बायकांचा हे कळत नाही. शिक्षक-विद्यार्थी नाते जसे बदलले आहे तसे शिक्षक-पालक यांच्यातील नातेही बदलले आहे. मुलांच्या शाळा बदलल्या तरी त्यांच्या जुन्या टीचर माझ्या व्हॉटसप स्टेटसला त्यांचे कारनामे बघून रिप्लाय देत असतात. सगळं वातावरणच फ्रेंडली झालेय.

>>>>>कधी कधी आपल्यालाही जाऊन एक मिठी मारावीशी वाटते.
Lol Lol शाहरुखचे सोडता तुमचे बहुसंख्य प्रतिसाद आवडतात. काहीतरी मजेशीर किंवा हळवा पैलू असतो.

Pages