अरे काय बोलतोय हा, असं कुठे असता का, एका दिवसात कधी 25 तास असतात का, एक दिवस म्हणजे 24 तास हे शिकलोय ना आपण शाळेत... थांबा थांबा.. अहो खरंच आमच्या दिवसात 25 तास आहेत, अगदी पुराव्यानिशी शाबीत करतो बघा...एवढेच काय तर आमचा एक दिवस 23 तासांचा पण आहे.
खरं वाटत नसेल पण अगदी तसच आहे हे. उत्तर गोलार्धातील काही पुढारलेले देश आपल्या मर्जी पुढे कधी कोणाचे ऐकतात का, मी म्हणेल ती पूर्व दिशा असेच ह्यांचे कायदे. बिचाऱ्या घड्याळ्यालाही ह्यांनी सोडले नाही. वर्षात दोन वेळा ह्या घड्याळाचे "हात" पकडुन त्याला मागे पुढे खेचतात आणि स्वतःच्या ह्या जबरदस्तीला नाव देतात "डे लाईट सेव्हींग"
होतं काय तर हिवाळ्यात दिवस इतका लहान होते की दुपारी 3 वाजता संध्याकाळ होते आणि उन्हाळ्यात दिवस इतका मोठा होतो की रात्री 11 वाजता ही उजेड असतो. मग काय ह्यांच्या झोपेचे होते खोबरे. कधी लवकर उठतात तर कधी उशिरा, ह्यात एकसंध पणा नको का, ह्याचसाठी सगळी खटाटोप.
ह्या झोपेसोबत दिवसाच्या उजेडाचे गणित ही बिघडते. लवकर उठावे लागते, लवकर शाळेत जावे लागते, लवकर ऑफिस मध्ये यावे लागते आणि ह्या सगळ्या कामासाठी घरातील दिवे लवकर लावावे लागतात. मग ह्यावर उपाय काय तर घड्याळाचे काटे एक तासाने मागे पुढे करायचे. ह्यामुळे अंधारून येण्याची वेळ मागे पुढे होईल. कारण वेळ ही सापेक्ष आहे, तुम्ही आम्ही ठरवू ती वेळ जगमान्य. जेव्हा घड्याळाचा शोध लागला तेव्हा कोणीतरी वेळ ठरवली आणि तीच आता आपण पाळतो. त्याला मान्यता दिली, प्रमाण वेळा ठरवल्या हे सगळे आपण आपल्या सोई प्रमाणे केले.
बस मग असेच काही ही मंडळी करते, ते ही वर्षातून दोनदा. जशी पानगळ (fall) सुरू होते आणि दिवस छोटा व्हायला लागतो तसे घड्याळ्याचे काटे एका तासाने मागे घेतले जातात. ह्यालाच "Fall Back" म्हणतात. म्हणजे रात्री जेव्हा घड्याळात 2 AM होणार असतील तेव्हा काटे मागे आणल्याने 1 AM होतात. म्हणजेच त्या दिवसात एका तासाची भर पडून तो दिवस 25 तासांचा होतो. ह्याच्या उलट उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा वसंत (स्प्रिंग) ऋतूची चाहूल लागते तेव्हा काटे पुढे ढकलले जातात, ह्याला "Spring Forward" म्हणातात. म्हणजे जेव्हा रात्री घड्याळात 2 AM होणार असतील तेव्हा 3 AM होतात आणि त्या दिवसातील एक तास कमी होऊन तो दिवस 23 तासांचा होतो.
बरं ही सगळी कसरत करण्याचे काही फायदे आहेत की नाहीत? आहेत फायदे ही आहेत आणि तोटे ही आहेत. मुख्य फायदा म्हणजे सूर्याच्या वेळेनुसार आपली वेळ चालते. एक्स्पर्ट लोकांच्या नुसार ह्यामुळे एनर्जी सेव्हींग होते, फिजिकल आणि मेंटल हेल्थ मध्ये वाढ होते, ट्रॅफिक अक्सिडेंट कमी होतात आणि बिझनेस मध्ये वृध्दी होते. तर काही लोकांच्या नुसार असे काहीच घडत नाही, उलट व्याप वाढतात. शेतकरी लोकांच्या म्हणण्यानुसार गाई म्हशीच्या दूध देण्याच्या वेळेत काहीच बदल होत नाही, त्या तर सूर्य चक्राप्रमानेच चालतात.
बऱ्याच देशात ह्यावर बरेच वाद प्रतिवाद होतात आणि त्यामुळेच काही देशांनी आता नेहमीच्या डे लाईट सेव्हींग वेळेत येण्याचे ठरवले आहे तर काही देश ही पूर्ण प्रक्रिया बाद करण्यावर विचार करत आहेत. ह्या देशांचे पुढे काय होईल हे माहिती नाही पण उद्या रविवार 12 मार्च (मार्च महिन्यातील दुसरा रविवार), "स्प्रिंग फॉरवर्ड" चा दिवस, त्यामुळे आमचा हा दिवस 23 तासांचा असेल आणि हिवाळ्यात (6 नोव्हेंबर 2022, नोव्हेंबर मधील पहिला रविवार) हा आमच्या आयष्यातील 25 तासांचा दिवस होता.
आहे की नाही मज्जा!
<<आहेत फायदे ही आहेत आणि तोटे
<<आहेत फायदे ही आहेत आणि तोटे ही आहेत. >>
इथल्या एका अनेक वर्षे सरकारी सल्लागार असणार्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते ज्याने काही विवक्षित (राजकारण्यांना भरपूर देणग्या देणार्या ) लोकांचे काहीतरी फायदे होत असतील म्हणूनच कायदे करतात. मग ते अर्थशास्त्र, बहुमत इ. फालतू गोष्टींचा विचार करत नाहीत.
उत्तर गोलार्धातील काही
उत्तर गोलार्धातील काही पुढारलेले देश >> न पुढारलेले देश ही पाळतात ना हे डे लाईट सेव्हिंग. शिवाय दक्षिण गोलार्धातले काही देशही पाळतात. आफ्रिका खंडातला इजिप्तही पाळतो. चिली, पॅराग्वे, इस्राईल, लेबनॉन, पॅलेस्टाईन, युक्रेन, ऑस्ट्रेलियातली काही राज्ये, न्यूझिलंड असे कित्येक देश हे पाळतात. त्याचा संबंध उत्तरेत असण्याशी किंवा पुढारलेला असण्याशी नाही, तर दिवस आणि रात्रीच्या काळाशी होणार्या विषम विभागणीशी आहे (जे पुढे तुमच्या लेखात आले आहे). देश जेवढे विषुववृत्तापासून दूर, तेवढे त्यात दिवस व रात्र यांत उन्हाळा व हिवाळ्यात जास्त तफावत आढळते.
होतं काय तर हिवाळ्यात दिवस इतका लहान होते की दुपारी 3 वाजता संध्याकाळ होते आणि उन्हाळ्यात दिवस इतका मोठा होतो की रात्री 11 वाजता ही उजेड असतो. मग काय ह्यांच्या झोपेचे होते खोबरे. कधी लवकर उठतात तर कधी उशिरा, ह्यात एकसंध पणा नको का, ह्याचसाठी सगळी खटाटोप. >> हे झोपेचे कारण पटले नाही. उलट उन्हाळ्यात घड्याळ १ तास मागे सरकवल्याने रात्री (घड्याळ्यातली वेळ पाहता) जास्त वेळ प्रकाश राहतो व झोपेचं जास्तच खोबरं होण्याची शक्यता वाढते. टाइम मॅगझिनच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात जास्त उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश आणखी जास्त वेळ उपभोगता यावा, जेणेकरून ऊर्जेची बचत होईल (संध्याकाळी दिवे लवकर लावावे लागणार नाहीत वगैरे वगैरे) म्हणून १९१६मध्ये जर्मनीने पहिल्यांदा हा प्रकार नियम म्हणून आणला. १९१८मध्ये पहिले महायुद्ध चालू असताना अमेरिकेनेही ऊर्जेपायी लागणार्या इंधनाची बचत व्हावी म्हणून डे लाईट सेव्हिंग करणे चालू केले.
चांगला विषय.
चांगला विषय.
या संदर्भात माझा इथला ( https://www.maayboli.com/node/73074?page=4) प्रतिसाद पुन्हा इथे डकवतो :
अमेरिकेत गेली कित्येक वर्षे दोन भिन्न मोसमांत ‘डे-लाइट सेविंग टाइम (DST)' ची संकल्पना राबवली जाते. यानुसार दरवर्षी Spring मध्ये घड्याळे एक तास पुढे नेली जातात, तर Autumn मध्ये ती पुन्हा पूर्ववत केली जातात. व्यवसाय आणि विरंगुळा या दोन्ही दृष्टीने त्याचे काही फायदे असल्याने ही कल्पना अस्तित्वात आली.
नुकतेच अमेरिकेच्या संसदेने ‘कायमस्वरूपी डीएसटी’ हे विधेयक मंजूर केले आहे. परंतु या निर्णयाविरोधात निद्रातज्ञांच्या वैद्यकिय संघटनेने आवाज उठवला आहे. त्यांच्या मते असा कायमस्वरूपी बदल वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी चांगला नाही. आपल्या शरीराचे अंतर्गत जैविक घड्याळ सूर्यानुसार चालत असते. आपण जेव्हा कृत्रिमरीत्या घड्याळाच्या वेळा बदलतो त्यातून हृदय व मेंदूकार्यात बिघाड, काही मनोविकार आणि वाहनांचे अपघात या सर्व गोष्टींमध्ये वाढ होते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
https://jcsm.aasm.org/doi/10.5664/jcsm.8780
https://www.wsj.com/amp/articles/why-permanent-daylight-saving-time-is-b...
अमेरिकेत हवाई आणि अॅरोझोना
अमेरिकेत हवाई आणि अॅरोझोना राज्या मध्ये डेलाइट सेविंग टाइम ची संकल्पना नाही. फार पुर्वी ईडियाना मध्ये पण डेलाइट सेविंग टाइम न्हवते.
युरोपमध्ये मार्चच्या शेवटच्या
युरोपमध्ये मार्चच्या शेवटच्या रविवारी आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी घड्याळाचे काटे पुढे-मागे होतात. इथे पण अमेरिकेनं स्वतःचे वेगळेपण जपायला मार्चच्या दुसऱ्या रविवारी घड्याळ पुढे आणि नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी घड्याळ मागे करते. या ३ आठवड्यामुळे त्यांना बराच फायदा होतो हे कारण देत काही वर्षांपूर्वी हे बदल केले.
आजच्या घडीला फायदा फक्त
आजच्या घडीला फायदा फक्त प्रोग्रॅमर्सचा होतो. हे गोंधळ निस्तरायला कोड लिहावा लागतो, माने तो जॉब सिक्युरिटी. बाकी काहीही फायदा नाही.
कॅनडात आमच्या राज्याने हे बंद करायचा कायदा केलेला आहे, रॉयल असेंट पण मिळालेला आहे. पण इकॉनॉमी आणि रोजचे कामाला येणाजाणारी माणसे, राजधानीच्या शहरातील अर्धी हापिसे एका राज्यात अर्धी दुसरीकडे इ. कारणांमुळे न्यूयॉर्क आणि क्यबेक जोवर कायदा पास करत नाहीत तोवर आमचा कायदा लागू होणार नाही असं त्रांगडं आहे. न्यूयॉर्कची परत ट्रायस्टेट डिपेंडन्सी असेल, त्यांची आणखी काही असेल.
थोडक्यात काँग्रेस आणि म्हातारबाने सही केली तर होईल काही. नाहीतर भिजत घोंगडं.
आजच्या घडीला फायदा फक्त
आजच्या घडीला फायदा फक्त प्रोग्रॅमर्सचा होतो. हे गोंधळ निस्तरायला कोड लिहावा लागतो, माने तो जॉब सिक्युरिटी. >> कसली डोंबलाची सिक्युरिटी. सगळ्यात वैतागवाणा कोड आहे - लिहिणे तर किचकट, टेस्ट करणे आणखीन त्रासाचे. किती सिस्टम्स ची डेट चेंज करुन टेस्टिंग करावे लागते. तरी दरवर्षी काही ना काही कटकटी उद्भवतातच. त्यात अर्ध्या सिस्ट्म्स अवर एंडिंग आणि बाकीच्या अवर बिगिनिंग धरणार्या असतील तर आणखीन मजा .
काही वर्षांपूर्वी एप्रिल - ऑक्टोबर बदलून मार्च- नोव्हेंबर केले तेंव्हा तर जास्तच धमाल होती !
आम्ही जिथे रहातो तिथे तर
आम्ही जिथे रहातो तिथे तर काहीच गरज नाही, उगी एक तासाचा जेटलॅग येतो. खूर्चीवर उभं राहून भिंतीवरची घड्याळं बदलावी लागतात. गाडी , मायक्रोव्हेव , अवन ही बदलली लगेच. रविवारची सकाळ फोन बघून दचकण्यात गेली, कारण तिथे आपोआपच पुढे गेले. कॅनडातही फक्त पंधरा दिवस लवकर उजाडल्यासारखं वाटतं पण पुन्हा संधिप्रकाशातच सकाळ जाते.
आम्ही नोव्हेंबरात बदलू बदलू
आम्ही नोव्हेंबरात बदलू बदलू करत जानेवारी उजाडवतो. मग आता परत थोड्या दिवसांनी बदलावी लागतील तर कशाला ते! करुन मार्चची वाट बघतो.
(No subject)
Spring forward - Fall
Spring forward - Fall backward
घसरून पडला/ली आणि पार्श्वभागावर आपटला/ली म्हणजे फॉल मध्ये Fall backward (घड्याळ मागे).
पुढे उडी मारली म्हणजे स्प्रिंग मध्ये Spring forward (घड्याळ पुढे).
लक्षात ठेवण्यास सोपे
लेख वाचल्या बद्दल आणि
लेख वाचल्या बद्दल आणि प्रतिसादा बद्दल सगळ्यांचे धन्यवाद
इथल्या एका अनेक वर्षे सरकारी
इथल्या एका अनेक वर्षे सरकारी सल्लागार असणार्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते ज्याने काही विवक्षित (राजकारण्यांना भरपूर देणग्या देणार्या ) लोकांचे काहीतरी फायदे होत असतील म्हणूनच कायदे करतात. मग ते अर्थशास्त्र, बहुमत इ. फालतू गोष्टींचा विचार करत नाहीत.
Submitted by नन्द्या४३ on 14 March, 2023 - 03:00
>>>>> अगदी अगदी, नोटबंदी आणि असेच बरेच निर्णय आहेत ज्यावर वाद होईल, कोणाचा तरी छुपा किंवा थेट फायदा होत असेल तर मग तुम्ही म्हणता तसे अर्थशास्त्र, बहुमत इ. गोष्टींचा कोणी विचार करत नाहीत, परिणाम काहीही होवो.
उत्तर गोलार्धातील काही
उत्तर गोलार्धातील काही पुढारलेले देश >> न पुढारलेले देश ही पाळतात ना हे डे लाईट सेव्हिंग. शिवाय दक्षिण गोलार्धातले काही देशही पाळतात. आफ्रिका खंडातला इजिप्तही पाळतो. चिली, पॅराग्वे, इस्राईल, लेबनॉन, पॅलेस्टाईन, युक्रेन, ऑस्ट्रेलियातली काही राज्ये, न्यूझिलंड असे कित्येक देश हे पाळतात. त्याचा संबंध उत्तरेत असण्याशी किंवा पुढारलेला असण्याशी नाही, तर दिवस आणि रात्रीच्या काळाशी होणार्या विषम विभागणीशी आहे (जे पुढे तुमच्या लेखात आले आहे). देश जेवढे विषुववृत्तापासून दूर, तेवढे त्यात दिवस व रात्र यांत उन्हाळा व हिवाळ्यात जास्त तफावत आढळते.
>>>> बरोबर , पण पुढारलेले देश कायदा करतात मग त्याच्या मागे इतरांना यावे लागते. उत्तर गोलार्ध प्रणाम दक्षिण गोलार्धात सुद्धा काही देश हे डे लाईट सेविंग पाळतात हे अगदी मान्य, पण कोणते देश हे पाळतात, कोणते नाही हे डिटेल करण्याचा लेखाचा हेतू नाही, त्यामुळे अगदी सखोल नवे लिहिली नाही
होतं काय तर हिवाळ्यात दिवस इतका लहान होते की दुपारी 3 वाजता संध्याकाळ होते आणि उन्हाळ्यात दिवस इतका मोठा होतो की रात्री 11 वाजता ही उजेड असतो. मग काय ह्यांच्या झोपेचे होते खोबरे. कधी लवकर उठतात तर कधी उशिरा, ह्यात एकसंध पणा नको का, ह्याचसाठी सगळी खटाटोप. >> हे झोपेचे कारण पटले नाही.
>>>> ह्या साठीच हे झाले असे वाचनात आले होते, लिंक मिळाली तर नक्की डकवतो
उलट उन्हाळ्यात घड्याळ १ तास मागे सरकवल्याने रात्री (घड्याळ्यातली वेळ पाहता) जास्त वेळ प्रकाश राहतो व झोपेचं जास्तच खोबरं होण्याची शक्यता वाढते. टाइम मॅगझिनच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात जास्त उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश आणखी जास्त वेळ उपभोगता यावा, जेणेकरून ऊर्जेची बचत होईल (संध्याकाळी दिवे लवकर लावावे लागणार नाहीत वगैरे वगैरे) म्हणून १९१६मध्ये जर्मनीने पहिल्यांदा हा प्रकार नियम म्हणून आणला. १९१८मध्ये पहिले महायुद्ध चालू असताना अमेरिकेनेही ऊर्जेपायी लागणार्या इंधनाची बचत व्हावी म्हणून डे लाईट सेव्हिंग करणे चालू केले.
Submitted by हरचंद पालव on 14 March, 2023 - 07:59
>>>> उलट तर इथे अनेक इमारती दिसतात ज्यात दिवस रात्र दिवे सुरु असतात, मोशन सेन्सर दिवे असूनही किमान २० ते ३०% दिवे सुरु असतात. कधी पूर्ण काळोख असा होत नाही. कदाचित तुम्ही उपग्रहांनी टिपलेलेलाईट पोलुशन चे फोटो बघितले असतील, त्यावरून अंदाज येईल.
हरचंद पालव जी, तुम्ही लिहिल्या प्रतिसादाच्या खालीच असलेल्या प्रतिसादात सुद्धा निद्रातंज्ञानाचा उल्लेख आला आहे बघा
इथे कंमेंटला लाईक आणि थेट
इथे कंमेंटला लाईक आणि थेट प्रतिसाद अशी सुविधा असायला हवी होती असो....
Submitted by कुमार१ on 14 March, 2023 - 11:02 >>>> अगदी बरोबर
Submitted by साहिल शहा on 14 March, 2023 - 12:18 >>>> कॅनडा मधील काही प्रोव्हिएन्सने सुद्धा हे वेळ बदलीची कटकट मागे टाकली आहे
Submitted by नरेन. on 14 March, 2023 - 13:58 >>>> इथे पण अमेरिकेनं स्वतःचे वेगळेपण जपायला मार्चच्या दुसऱ्या रविवारी घड्याळ पुढे आणि नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी घड्याळ मागे करते >> येस, उगाच आम्ही किती भारी हे दाखवायला
Submitted by अमितव on 14 March, 2023 - 17:05 >>>> कोड आता chatGPT लिहेल
Submitted by मेधा on 14 March, 2023 - 17:43 >>>> तेच, ह्या बदला मुळे उपदव्याप वाढतात
Submitted by अस्मिता. on 14 March, 2023 - 18:47 >>>>
Submitted by अमितव on 14 March, 2023 - 19:51 >>>>
Submitted by चामुंडराय on 15 March, 2023 - 01:29 >>>> येस, व्हेरी इसि टू रिमेम्बर
माझ्या माहिती प्रमाणे
माझ्या माहिती प्रमाणे कॅनडातील प्रोव्हीन्सनी ( बीसी आणि ओंटारिओ) DST रद्द करायचा कायदा पास केला आहे पण तो अंमलात यायला अनुक्रमे कॅलिफोर्निया आणि क्यबेक/ न्यूयॉर्क ने बदल करण्याची अट आहे. काही राज्ये कधीच पाळत न्हवती पण नव्याने कोणी नियम बदलून अमलात आणलेला ऐकलेलं नाही.