आंतरराष्ट्रीय झोप दिवस

Submitted by किंकर on 17 March, 2023 - 16:06

आंतरराष्ट्रीय झोप दिवस - आज मार्च १७ , शुक्रवार खरे तर इतर अनेक दिवसांच्या सारखा एक दिवस . पण आंतरराष्ट्रीय स्तरावर असे नसते . प्रत्येक दिवसाला एक बिरुद जोडून तो साजरा करणे याला फार महत्व दिले जाते . आजच्या दिवसाला World Sleep Day 2023 म्हणून साजरा करण्याचे ठरले आहे ,

आता एक तारीख ठरवली आणि ती साजरी केली तर कसे बरे असते . म्हणजे झोपेत जरी विचारले तरी सांगता येते, कि अमुक तारीख म्हणजे अमुक अमुक
जसे कि बसायची तारीख कोणती तर -' ३१ डिसेंबर ' नाही म्हणजे पटकन आठवले म्हणून हे उदाहरण दिले . असो .

बरे यांना प्रत्येक दिवस साजरा करायचा असतो पण एका निश्चित तारखेला नाही . पाश्चिमात्य जगात बरेच वेळा अमुक महिन्याचा तिसरा सोमवार , अमुक महिन्याचा दुसरा शुक्रवार असे दिवस साजरे होतात आता यांचा आंतरराष्टीय झोप दिवस हा प्रत्येक वर्षी वसंत ऋतू च्या आगमनाच्या आधीच्या शुक्रवारी साजरा करतात . या वर्षी यांचा वसंत येतो आहे सोमवार दिनांक २० मार्च रोजी , म्हणून शुक्रवार दिनांक १७ मार्च हा यांचा आंतराष्ट्रीय झोप दिवस .

आता यातील गंमत बघा. मुळात समजत नाही कि झोप साजरी करायची असेल तर त्यासाठी दिवस का ? खरेतर ती हवी 'आंतराष्ट्रीय झोप रात्र '
पण नाही आम्ही निवडला शुक्रवार वसंत येण्याच्या आधीचा. म्हणजे आमचा विकांत सुरु . शिवाय आता वसंत अक्षरशः उसळी मारून येणार म्हणून आम्ही तो शुक्रवारी रात्री साजरा करणार, कसा तर झोपेचे खोबरे करून आणि काय साजरा करणार तर आंतरराष्ट्रीय झोप दिवस .

या विसंगतीतूनच आपल्याला शोधायचा आहे या दिवसाचा हेतू . झोपेचे महत्व नक्की कोणाला समजते माहित आहे ज्याची झोप उडाली आहे त्याला . आता याठिकाणी झोप उडणे म्हणजे ' Sleep disorder ' मग यात रात्र रात्र झोप न लागणे , दिवसा सतत झोप येणे , झोपेत सतत उलघाल सुरु असणे आणि अथवा स्वतःच्या किंवा सोबत झोपलेल्या व्यक्तीच्या घोरण्याने आपल्या झोपेस 'घोर लागणे '

या सर्व अडचणींवर मात करीत जो खरोखर शांत झोपू शकतो तो जगज्जेता अलक्झेडार पेक्षा नशीबवान . काही जण म्हणतात - 'आम्हाला नाही झोपेची काळजी . आमची झोप हुकमी आहे ' जर हे त्यांचे वाक्य खरे असेल तर ते देखील घोड्यावर बसल्या बसल्या झोप घेणाऱ्या बाजीराव पेक्षा नशीबवान . किंवा मी म्हणेन झोपेच्या बाबतीत ते अगदी बाजीराव लागून गेलेत .

पण दुर्दैवाने आपल्या बदलत्या जीवन शैलीने आपली झोप कमी केली नाही तर अक्षरशः उडवली आहे . लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा लाभे . हा पूर्वजांचा संदेश आता पुन्हा अमलात आणा हेच शास्त्रीय अभ्यास करून वैज्ञानिक आणि वॆद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत . त्यांनी पण नियमित झोपेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध घोषणा किंवा बोधवाक्ये निवडली आहेत . मार्च १४ २००८ रोजी पहिला आंतरराष्टीय झोप दिवस साजरा करतानाची घोषणा होती , “Sleep Well, Live Fully Awake.” तर या वर्षी ते म्हणतात - 'Sleep is Essential for Health'.

कारण शांत झोपेचे जसे फायदे आहेत तसे अस्वस्थ झोपेचे दुष्परिणाम देखील गंभीर आहेत . अपुरी अथवा अस्वस्थ झोप फक्त वैयक्तिक आरोग्यास घातक नसून मोठ्या प्रमाणातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरणार घटक आहे . म्हणून झोप नियमित व स्वस्थ घेण्यासाठी -
दररोज ( म्हणजेच ) दररात्री किमान सात ते आठ तास झोप घ्या .
खूप जास्त जेवण , अति मद्यपान , उतेजक पेये चहा कॉफी , या गोष्टी शक्यतो टाळा
चालणे , अन्य व्यायाम यात सातत्य ठेवा .
आपण अशा जीवन शैलीकडे उघड्या डोळ्यांनी बघायला शिका म्हणजे आपणास मिटल्या डोळ्यांनी शांत झोपता येईल .

जीवनाच्या शर्यतीत सशाप्रमाणे अवेळी झोपून शर्यत हरण्यापेक्षा झोपच्या बाबत जागेपणी आवश्यक काळजी घेत रात्री शांतपणे झोपू या

नाहीतर , " आंतराष्ट्रीय झोप दिवस मी रात्रभर आढ्याकडे डोळे लावून साजरा केला " असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही .

म्हणूनच आजच्या -
World Sleep Day च्या नंतर येणाऱ्या प्रत्येक रात्रीस आपण सगळेच म्हणू या - " शुभ रात्री "

Group content visibility: 
Use group defaults

ललित आवडले.
दुपारच्या वामकुक्षीसाठी कोणता दिवस?
दुपारची झोप घ्या आणि आयुष्य वाढवा हे सांगणारा आणि झोपणारा प्रसिद्ध लेखक विन्स्टन चर्चिल. आम्ही प्रसिद्ध नसलो तरी झोपतो. ते जाऊ द्या. जपानी लोकांना आवडते झोप म्हणून त्यांनी कामाच्या वेळात दुपारी झोपा आणि तरतरीत होऊन उशिरापर्यंत कामाची तयारी करा म्हटलंय.

कधी नव्हे ते लवकर उठलो होतो काल शुक्रवारी, आणि आता वाचलं इथे की हा झोप दिवस होता म्हणून. छ्या! न झोपता वाया घालवला दिवस.

माझ्या साठी प्रत्येक दिवस "झोप दिवस". रात्री तर झोपतोच पण दुपारच्या झोपेची खुमारी काही अलगच. झोप कुठेही केव्हाही त्याला काल वेळ जागा ह्यांची बंधने कशाला?
‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल एट वंस’...

Srd , हरचंद पालव , केशवकूल - प्रतिसादासाठी मनपूर्वक धन्यवाद !
आपणा सर्वाना जागतिक निद्रा दिन आवडला , हे वाचून आता शांत चित्ताने झोपता येईल .

अरे वाह छान माहिती दिलीत.

सध्या मी सरासरी फक्त चार तास झोपत आहे. काय कसे माहीत तरीही जगतोय. रोज ऑफिसला जाऊन सुट्टी न घेता काम करतोय. पण त्यानंतर माझा पर्सनल टाईम सुरू होतो आणि झोपावेसेच वाटत नाही. काही न करता झोपलोय म्हणजे टाईम वेस्ट होतोय असे वाटते.

झोपेचे महत्व कळतेय पण वळत नाही असे झालेय.

मी तर हपिसातही झोपा काढतो.
>>>
हो. हे मी करतो. वर्क फ्रॉम होमला दुपारी झोप काढतो. आता ऑफिसला झोप नाही जमत पण डुलकी काढतो. तेव्हा पर्सनल टाईम वेस्ट होतोय असे वाटत नाही. उलट कामाच्यावेळी झोपलो आता पर्सनल वेळेत जागता येईल या विचाराने छान वाटते.

चाहत्यांना चार तास विरह सहन करायला लावणे हा क्रूरपणा नव्हे काय ?
>>>

स्वप्नात मारतो आम्ही गप्पा. चिंता नसावी.
झोपेबाबत हा बेस्ट पार्ट आहे. स्वप्ने ईतकी फास्ट असतात की चार तासांच्या झोपेत जी काही तासभर स्वप्न पडत असतील त्यात आठ दहा तासांचा वेळ व्यतीत केला असे वाटते.

अरे वा ! चाहत्यांसाठी स्वप्नात दर्शन देणे ही सेवा सुरू केलीत काय ? अभिनंदन !
मला चाहतेच नाहीत. एक दोन चाहते बनवू काय ?

जपानी लोकांना आवडते झोप म्हणून त्यांनी कामाच्या वेळात दुपारी झोपा >>>>> हे आमच्या चितळेंना कधीच माहित होते. Wink

हर्पा आणि आचार्य Lol
झोप कुठेही केव्हाही त्याला काल वेळ जागा ह्यांची बंधने कशाला?>>>> अर्जुन कधीही, कुठेही, कितीही कमी किंवा जास्त वेळ झोपूनही आपल्या पूर्ण क्षमतेने व एकाग्रतेने काम करू शकायचा म्हणून त्याला गुडाकेशही म्हणायचे. तो निद्रेच्या अधिन नव्हता, निद्रेवर विजय मिळवला होता. Happy

>>>>हे असले दिवस साजरे करण्याची पण फॅशन पण चालू झाली का?
Happy
मूलभूत गरजा दिवस सुरु व्हावा आता - म्हणजे मीडोमिमो.