नातं

Submitted by saakshi on 13 December, 2009 - 05:22

तो. smart, handsome, stylish..... अशी सगळी विशेषणं एकामागून एक आठवावीत त्याला पाहिल्यानंतर असा. नाव आकाश... त्याचं मित्रमंडळ दांडगं.... मैत्रिणीमंडळ तर त्याहून मोठं. पोरी जीव टाकायच्या त्याच्यासाठी... पण हा पठ्ठ्या म्हणायचा "छे! अरे ती मुलगी मला अजून भेटलीच नाही. जिला बघून असं वाटेल की YES! हीच ती....."
त्याचे मित्र म्हणायचे "लेका, college मधल्या पोरी संपल्या पण तुला अजून ती भेटली नाही.... कसं होणार रे तुझं????" यावर तो फक्त हसायचा, मनात म्हणायचा, "ती अशी असेल की तुम्हा सगळ्यांना माझा हेवा वाटेल.... ती अशी दिसेल की तिच्या comparison साठी कोणी असणारच नाही...."
हा हा म्हणता त्याचं college संपलं. job चे दिवस चालू झाले.त्याच्या कंपनीत ही काही वेगळी स्थिती नव्हती. त्याच्याबरोबर join झालेल्या सर्वांशी त्याची गट्टी जमली. छान ग्रुप झाला त्याचा. पण त्यातल्या मुलींच्यातही त्याला "ती" नाहीच सापडली.
----------------------------------------------------------------------------

त्याचा त्याच्या आईवर खूप जीव. त्याचे बाबा गेल्यापसून आईनच त्याला मोठा केला, त्याचेसगळे हट्ट पुरवले, खूप प्रेमानं वाढवलं, त्याला... आई म्हणजे त्याचा प्राण.... आणि तो म्हणजे आईचा जीव! आईला एव्हढसं काही झालं की तो सैरभैर व्हायचा. office मधून दिवसातून १० वेळा घरी फोन करायचा. शेवटी आई म्हणायची, "अरे वेड्या, इतकी काय धाड भरलीये मला? इतक्या नाही हो काही होणार.... तुझ्या लेकरांना खेळवल्याशिवाय नाही जायची हो मी..... "
त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. आईला कृतकृत्य वाटायचं, आपला बछडा आप्ल्याला किती जीव लावतो म्हणून...!
एके दिवशी तो नेहमीप्रमाणे office ला गेला. त्यादिवशी आठवडी बाजार म्हणून त्याची आई बाजारात गेली. त्याला ही भाजी आवडते, ती फळं आवडतात असं करत बराच वेळ गेला. सूर्य अगदी माथ्यावर आला होता. ती घरी जाण्यासाठी वळली आणि काय होतय हे कळायच्या आधीच आजूबाजूच्या गोष्टी फिरल्या.....
बर्याच वेळानंतर त्याच्या आईला जाग आली ती चेहर्यावर होणारया थंड पाण्याच्या स्पर्शामुळं. समोर पाहते तर एक मुलगी हातात पाण्याची बाटली घेउन बसलेली. आजूबाजूला घोळका जमलेला.सगळ्यांच्या चेहरयावर कुतुहल आणि चिंतेचं मिश्रण. मग त्या मुलीनच त्याच्या आईला उठवलं. नंतर आई नको म्हणत असतानाही ती मुलगी म्हणाली,"असू दे हो काकू... त्यात कसला आलाय त्रास? तुम्हाला पुन्हा चक्कर आली तर? चला बरं मी येते तुमच्याबरोबर.... तुम्हाला घरी सोडून मग जाईन मी..."
ती त्याच्या आईला सोडायला घरी आली.

ती. एकदम classic. साधी.. सरळ.... सुंदर नाही म्हणता येणार पण रेखीव. एखाद्या शांत, स्वच्छ तलावासारख्या निर्मळ मनाची.... बोलक्या डोळ्यांची... नाव अवनी.

त्याच्या आईनं तिचं नावगाव विचारलं....तर ती मुलगी त्यांच्याच भागात रहाणारी निघाली. तिला वाटलं... किती गोड पोर आहे, माझ्यासारख्या अनोळखी बाईच्या मदतीला धाऊन आली. थोडा वेळ थांबून, चिवचिव करून अवनी निघून गेली पण आकाशच्या आईच्या मनात कायमचं घर करून गेली.... आईनं मनात जोडी पण जुळवून पाहिली.... आकाश-अवनी.... किती सुंदर नातं आहे ना, आकाशाचं आणि अवनीचं- पृथ्वीचं.....
संध्याकाळी तो office मधून आला. झालेला प्रकार ऐकून त्याला खूप वाईट वाटलं, वाटलं आपली आई इतके कष्ट करते आपल्यासाठी, आपल्यामुळे तिला हा त्रास.. हा ताप... पण त्याला आईनं समजावलं. मग दोघं मायलेकरं बराच वेळ बोलत बसले. आईनं पुन्हा त्याच्या लग्नाचा विषय काढला. नेहमीप्रमाणं तो हसला, म्हणाला "आई, अजून मला माझी ती कुठं सापडलीय???"
---------------------------------------------------------------------

त्यानंतर १-२ आठवड्यांनंतरची गोष्ट. तो सुट्टी म्हणून घरीच होता. इतक्यात फोन खणखणला. फोनवरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून तो flat!!!!! त्यानं सरळ आईलाच जाब विचारला, त्यावर ती म्हणाली,"अरे तुला सांगितलं नव्हतं का ती मला घरी सोडायला आलेली मुलगी..... अवनी नाव तिचं. तिच्याबद्दल गेले काही दिवस मी माहिती काढली. घराणं चांगलं आहे, शिकलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे गुणी आहे हो पोर..... मीच तिच्या वडिलांना फोनवरून विचारलं होतं, त्यांच काय म्हणणं आहे? काय म्हणाले ते????"
त्यानं सरळ शब्दात नारजी व्यक्त केली. मी येणार नाही असं स्पष्ट सांगितल त्यानं. आईनं थोडा वेळ त्याची मनधरणी केली पण नंतर शांत बसली.कितीही झालं तरी मुलाला आईकडे हट्ट करता येतो, पण आईला मुलाकडे थोडीच!! हिरमुसलीच ती... त्याला ते जाणवलं पण तो मनात म्हणाला, आईचा राग म्हणजे श्रावणातला पाऊस.... आत्ता जाईल आणि छान उबदार ऊन पडेल तिच्या मायेच...

पण तसं झालं नाही. दुसर्या दिवशी तो office मधून परत आला तेंव्हा आई अंथरूणावर पडलेली. धावपळ करून त्यानं डॉक्टरांना बोलावलं, त्यांनी गोळ्या दिल्या पण तिचं मनच आजारी पडलं होतं.... ते काही केल्या ऊभारी घेईना... संध्याकाळी तो तिच्या शेजारी बसला होता तेंव्हा तो सल बाहेर पडलाच!
"मी नाही रे पुरणार तुला आयुष्यभर... मी जाण्याआधी तुझं काळजी घेणारं कोणीतरी आलेलं पाहू दे मला....." त्याच्या काळजाला घरं पाडून गेले ते शब्द....

त्या रात्री त्यानं खूप विचार केला.. डोकं शिणेपर्यंत... शेवटी त्याला वाटलं.."आईनं क्ती केलं आपल्यासाठी!!! पण आपण काय दिलं तिला??? काहीच नाही. आज ती जे मागतीये ते ही आप्ल्यासाठीच! का नाही देउ शकत मी?" शेवटी त्यानं त्याची स्वप्नं चुरगाळून फेकून दिली.... त्यांच्यापेक्षा त्याला आईच्या चेहर्यावर्चं हसू जास्त प्रिय होतं..... त्याच्या आईला तर आकाश ठेंगणं झालं.... यथावकाश आकाश- अवनीच लग्न झालं.
त्याची आई खूप खुश होती, तो सुखावला, आपल्यामुळं आईला चार सुखाचे क्षण दिसले म्हणून..... पण त्याचं दुसरं मन म्हणत होतं,
"नाही आकाश.......... ही ती नाही..... ती नाही.........."

(क्रमशः)

गुलमोहर: