
गरोदरपणाच्या अखेरच्या महिन्यातील वाहनप्रवास हा एक संवेदनशील विषय आहे. सर्वसाधारणपणे मानवी गरोदरपणाची कालमर्यादा 40 आठवडे मानली जाते. परंतु,
“नववा लागल्यानंतर काही खरं नसतं!”,
हा पूर्वापार चालत आलेला आजीबाईंचा सल्ला देखील दुर्लक्ष करण्याजोगा नसतो. एखाद्या गरोदर स्त्रीला डॉक्टरांनी व्यवस्थित काढून दिलेली “तारीख” दरवेळेस अचूक ठरतेच असे नाही. कित्येकदा अपेक्षेपेक्षा बऱ्याच लवकरही प्रसूतीवेदना चालू होतात. कधी कधी या वेदनांचा प्रारंभ आणि बाळाचा जन्म या घटना आश्चर्यकारक वेगाने घडतात. अशा प्रकारे नको तिथे बाळंत होण्याचे काही प्रसंग आपण अधूनमधून ऐकतो. त्यांमध्ये अगदी घरातील शौचालयापासून ते पार विमानात झालेल्या अपत्यजन्मांच्या घटना आहेत. अशा घटनांकडे तुलनेने बघायचे झाल्यास विमानांमध्ये झालेले अपत्यजन्म हे खूपच कमी – विरळा - आहेत. परंतु जमिनीवरील वास्तव्याशी तुलना करता विमानात निर्माण झालेली अशी परिस्थिती अत्यंत तापदायक असते आणि काही वेळेस ती गंभीर होते. अशा क्वचित घडणाऱ्या हवाईजन्मांच्या घटनांवर शास्त्रीय आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून टाकलेला हा दृष्टिक्षेप.
या विषयाच्या संदर्भात एक दीर्घकालीन अभ्यास-अहवाल प्रकाशित झालेला आहे (संदर्भ *1). सन 1929 ते 2018 या सुमारे 90 वर्षांच्या कालावधीत, जगभरात एकूण 73 व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणांमध्ये मिळून एकूण 74 बालके जन्मली; त्यापैकी 71 सुखरूप राहिली, 2 जन्मानंतर लगेचच मरण पावली तर अन्य एकाची तब्बेत गंभीर झाली. म्हणजेच, अधिकृत नोंदणीनुसार 90 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत जगभरात व्यावसायिक प्रवासी विमानांत फक्त 74 हवाईजन्म झालेले दिसतात. त्यापैकी सुमारे दोन तृतीयांश जन्म लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासांत झाले.
गरोदरपणाचा कालावधी पूर्ण भरल्यानंतर अपत्यजन्म होणे ही एक अत्यंत नैसर्गिक घटना आहे. या घटनेदरम्यान सगळे काही जेव्हा सुरळीत व स्त्रीच्या नैसर्गिकमार्गे पार पडते, तेव्हा डॉक्टरांपेक्षा निसर्गाचा वाटा अधिक असतो. परंतु नॉर्मल अपत्यजन्माच्या प्रसंगी देखील वैद्यकीय पूरक मदत ही महत्त्वाची आहेच. बाळंत होताना स्त्रीच्या जनेंद्रियांना कमीत कमी इजा व्हावी, जंतुसंसर्ग होऊ नये आणि जन्मलेल्या बाळाची तातडीने वैद्यकीय तपासणी व्हावी हे त्यामागील हेतू आहेत. काही गरोदर स्त्रियांमध्ये नैसर्गिक बाळंतपण मुळातच अडथळ्याचे असते तर अन्य काही गरोदर स्त्रियांत प्रत्यक्ष बाळंत होताना देखील अनपेक्षित अडचणी उद्भवू शकतात. हे सर्व पाहता प्रसूतीक्रिया ही तज्ञ डॉक्टर अथवा अनुभवी नर्सच्या उपस्थितीतच होणे केव्हाही श्रेयस्कर.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत असलेल्या स्त्रियांच्या विमानप्रवासाच्या बाबतीत काही नियमावली असणे आवश्यक ठरते. या संदर्भात असलेली वैद्यकीय शिफारस अशी आहे :
1. ज्या गरोदर स्त्रीच्या उदरात एकच बाळ आहे आणि वैद्यकीय तज्ञाच्या मते सर्व परिस्थिती नॉर्मल असल्यास, गरोदरपणाच्या 36 व्या आठवड्यापर्यंतचा विमानप्रवास ‘सुरक्षित’ असतो.
2. परंतु जुळे (अथवा एकाहून अधिक कितीही गर्भ) उदरात असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत ही कालमर्यादा 32 आठवड्यापर्यंत खाली आणलेली आहे.
नमुना म्हणून आपण या बाबतीतले ‘एअर इंडिया’चे (जालावर उपलब्ध असलेले) काही मूलभूत नियम पाहू (संदर्भ *2) :
1. सर्वसाधारण नियमानुसार गरोदरपणाच्या 32 व्या आठवड्यापर्यंतच प्रवासाची परवानगी.
2. जर बुकिंग करते वेळेस 32 वा आठवडा उलटून गेला असेल तर प्रत्यक्ष प्रवासाचे वेळेस 35 व्या आठवड्यापर्यंतची परवानगी आहे. मात्र अशा परिस्थितीत संबंधित डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक. त्यात गर्भवतीची तब्येत उत्तम आणि नॉर्मल बाळंतपणाची (जास्तीत जास्त) शक्यता लिहिलेली असावी लागते.
3. 35 आठवडे उलटून गेल्यानंतर तातडीच्या कामासाठी प्रवास करायचा असल्यास अनुकंपा तत्त्वावर परवानगीचा विचार. त्यासाठी विशिष्ट अर्ज भरल्यानंतर उच्चपदस्थ वैद्यकीय संचालक त्यावर निर्णय घेतात.
4. उदरात एकापेक्षा अधिक बाळ असल्यास किंवा गरोदरपणात कुठल्याही प्रकारची आरोग्य समस्या निर्माण झाली असल्यास 32 वा आठवडा हीच अंतिम मर्यादा.
प्रथमोपचार व्यवस्था
आता एक प्रश्न असा उपस्थित होईल, की तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी विमानातली प्रथमोपचार व्यवस्था काय स्वरूपाची असते? विमानाच्या अंतर्गत सेवा कर्मचाऱ्यांना मूलभूत प्रथमोपचारांचे शिक्षण दिलेले असते. त्यामध्ये अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास करावयाच्या प्राथमिक गोष्टींचा समावेश असतो. विमानात असलेल्या प्रथमोपचार संचात सामान्य प्रकारची व तातडीच्या उपचारांची औषधे, किरकोळ ड्रेसिंगची सोय आणि defibrillator व तत्सम व्यवस्था असते (परंतु वास्तवातील चित्र समाधानकारक नाही. कित्येक विमान कंपन्यांचे प्रथमोपचार संच हे प्रमाणित निकषांप्रमाणे नसल्याचे आढळले आहे). खूप वर्षांपूर्वी काही विमान कंपन्यांमध्ये अंतर्गत कर्मचाऱ्यांपैकी किमान एक जण प्रसूतीसेवेचे प्राथमिक प्रशिक्षण घेतलेली असायची. परंतु अलीकडे ही प्रथा पाळलेली दिसत नाही. याचे कारण मजेशीर आहे. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा एकंदरीत अनुभव असा आहे, की लांब पल्ल्याच्या प्रत्येक उड्डाणात साधारणपणे किमान एखादा डॉक्टर प्रवासी असतोच ! मग वेळप्रसंगी त्यालाच कुठल्याही मदतीचे आवाहन केले जाते.
विमानमार्गबदल की हवाई प्रसूती ?
इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. जर लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान एखाद्या गरोदर स्त्रीला प्रसूती वेदना चालू झाल्या, तर विमानाने त्याचा मार्ग बदलून सर्वात जवळच्या विमानतळावर उतरावे का? हा सल्ला वरकरणी सोपा वाटला तरी कित्येक वेळा कार्यवाही खूप अवघड असते. विमान महासागरांवरून जात असताना तर प्रसंग अधिकच बिकट होतो. अशा वेळेस जर विमानात कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची वैद्यकीय मदत (डॉक्टर, नर्स) उपलब्ध झाली तर अशा वेळेस वैमानिक डॉक्टरच्या सल्ल्याने व तारतम्याने निर्णय घेऊन विमानातल्या प्रसूतीला प्राधान्य देतात. तसेही, अशा प्रकारच्या हवाईजन्मानंतर बाळ बाळंतिणीला योग्य त्या सुश्रुषा केंद्रात लवकर न्यावे लागते. अशा प्रकारे विमानाचा मूळ मार्ग बदलून जेव्हा विमान अन्यत्र फिरवावे लागते त्याचा सध्याचा अतिरिक्त खर्च सुमारे एक लाख अमेरिकी डॉलर्स असतो.
संशोधनाचे निष्कर्ष
आता वर उल्लेख केलेल्या 74 हवाईजन्मांच्या बाबतीतले प्रत्यक्ष अनुभव पाहू. त्यापैकी 10% जन्म हे गरोदरपणाच्या 37- 38 व्या आठवड्यात झाले, 12% जन्म 32 व्या आठवड्यापूर्वीच झाले आणि बाकीचे सर्व या दोघांच्या दरम्यानच्या आठवड्यांमध्ये झालेले आहेत. यावरून हे लक्षात येईल, की गरोदरपणाच्या 30 व्या आठवड्यानंतरच परिस्थिती काहीशी अशाश्वत होते. म्हणून अशा गर्भवतींनी शक्यतोवर विमान प्रवास टाळलेलाच बरा.
विमानातील बाळंतपण
वरील हवाईजन्मांच्या दरम्यान विमानातल्या विमानात परिस्थिती हाताळणे हे कौशल्याचे काम होते. ती हाताळणी अशी केली गेली:
1. सुमारे ७४% घटनांमध्ये कुठली ना कुठली वैद्यकीय मदत मिळाली. त्यापैकी ४५% घटनांमध्ये एखाद्या प्रवासी डॉक्टरानेच स्वयंस्फूर्तीने मदत केली.
2. काही घटनांमध्ये डॉक्टरांच्या मदतीला नर्सबाई होत्या तर अन्य काही प्रसंगी फक्त नर्स किंवा फक्त वैद्यकीय विद्यार्थी अशी परिस्थिती सुद्धा होती.
3. काही मोजक्या घटनांमध्ये विमानाच्या कर्मचाऱ्यांनीच प्रसूतीची परिस्थिती कशीबशी हाताळली.
गरोदर स्त्री नैसर्गिकपणे प्रसूत होताना तिला योग्य प्रकारे कळा देण्याच्या सूचना तर महत्त्वाच्या असतातच, पण त्याचबरोबर पुढील गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. उदरातून बाळ बाहेर आल्यानंतर त्याच्या नाळेला व्यवस्थित चिमटा लावून ती कापणे हे पण एक अतिशय महत्त्वाचे काम. यासाठी निर्जंतुक केलेली उपकरणे आवश्यक. आता विमान हे काही शल्यगृह नव्हे ! तेव्हा अशा आणीबाणीच्या प्रसंगी ही सर्व कामे तिथे गोळा केलेल्या दुय्यमतिय्यम गोष्टींद्वारे उरकण्यात आली. अशा या जुगाडांचे हे काही रोचक किस्से:
1. बाळाची नाळ बांधणे : यासाठी एखाद्या प्रवाशाच्या बुटाच्या लेसचा वापर केला गेला.
2. नाळ कापणे : यासाठी जी कात्री आवश्यक होती ती स्त्री प्रवाशाच्या सौंदर्यप्रसाधनाच्या संचातून मिळवली गेली ! (प्रवाशाजवळची कात्री विमानतळावरील धातूशोधक यंत्रणेला गंडवून विमानात आली काय?). कात्री निर्जंतूक करण्यासाठी विमानातील व्हिस्की किंवा व्होडका यांचा वापर.
3. जननेंद्रियाची अंतिम स्वच्छता : बाटलीबंद पाण्याचा वापर.
4. काही प्रसंगी मातेचा श्वसनरोध किंवा बाळाच्या तोंडातील द्रव साफ करण्यासाठी प्रवाशांच्या ज्यूसबॉक्स बरोबर आलेल्या स्ट्रॉचा वापर केला गेला.
एक त्रयस्थ म्हणून आपल्याला वरील किस्से वाचायला मजा वाटेल. परंतु अशा सगळ्या अशास्त्रीय हाताळणीमधून गंभीर जंतुसंसर्गाचा धोका होऊ शकतो हे खरे. किंबहुना, हा धोका सुसज्ज रुग्णालयाशी तुलना करता दुप्पट असतो.
विमानांतर्गत पर्यावरण आणि प्रसूतीची आव्हाने
जमिनीवरील सर्वसामान्य वातावरणाच्या तुलनेत विमानाच्या अंतर्गत पर्यावरणात निश्चितच फरक असतात. तिथे हवेची आर्द्रता कमी असते तसेच हवेचा दाब सतत बदलता राहतो. या खेरीज विमानात प्रवाशाला सतत अवघडलेल्या स्थितीत बसून राहवे लागते.
या सर्व कारणांमुळे गरोदर स्त्रीच्या शरीरधर्मात असे फरक होऊ शकतात:
1. रक्तातील ऑक्सिजन संपृक्ततेचे प्रमाण कमी होणे
2. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता वाढते
3. नाडीचे ठोके आणि रक्तदाबही वाढू शकतो.
प्रस्तुत संशोधनात एकूण 74 घटनांपैकी 35 वेळा बालकांचा जन्म मुदतपूर्व (preterm) झालेला होता. 3 प्रकरणांत मुले जन्मताना पायाळू निघाली. अन्य तीन प्रकरणांमध्ये मातेला ‘सीपीआर’ या जीवरक्षक तंत्राची मदत द्यावी लागली. ३ प्रकरणांत जन्मलेली बालके मृतावस्थेत विमानाच्या स्वच्छतागृहातील कचऱ्यात टाकून दिलेली आढळली.
प्रस्तुत संशोधनाचे निष्कर्ष पाहिल्यानंतर आपल्याला विमानातील प्रसूती किती कटकटीची आणि धोक्याची आहे हे नक्कीच जाणवेल. मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांचे प्रश्न तर अजून गंभीर असतात. बाळाच्या मातेला जर प्रसूतीपश्चात अनियंत्रित रक्तस्त्राव झाला तर तोही एक चिंतेचा विषय असेल. हे सर्व पाहता गरोदरपणाच्या शेवटच्या दोन महिन्यात संबंधित स्त्री आणि तिच्या कुटुंबीयांनी प्रवासाचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतलेला बरा.
सुदैवाने विमानातल्या अनपेक्षित प्रसूतींचे एकूण प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे सटीसामाशी अशी एखादी जरी घटना जगात कुठेही घडली, की तिला भरपूर प्रसिद्धी दिली जाते.
डिसेंबर 2017 मध्ये एअर फ्रान्सच्या विमानात घडलेल्या अशा घटनेला माध्यमांमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली होती (संदर्भ *3).
त्या प्रकरणात एक नायजेरियाची स्त्री गरोदरपणाच्या 38व्या आठवड्यात प्रसूत झाली होती. सुदैवाने विमानात एक मूत्रशल्यचिकित्सक आणि एक बालरोगतज्ञ होते. त्या दोघांनी मिळून परिस्थिती कौशल्याने हाताळली आणि बाळ-बाळंतीण सुखरूप राहिले. त्या प्रवासामध्ये विमानाचा पहिला वर्ग पूर्ण रिकामा असल्यामुळे त्याचे छानशा तात्पुरत्या प्रसूतीगृहात रूपांतर करता आले. सदर बालकाचा जन्म अमेरिकेच्या हवाई हद्दीत झाल्यामुळे ते, जन्मानुसार मिळणाऱ्या अमेरिकी नागरिकत्वासाठी पात्र ठरले. हवाईजन्म या विषयाचा हा अजून एक पैलू.
90 वर्षांच्या कालावधीत जन्मलेल्या वरील 71 हवाईपुत्र अथवा हवाईकन्यांना मोठेपणी त्यांच्या स्वतःच्या हवाईजन्माची कथा रंजक वाटली असणार यात शंका नाही !
****************************************************************************************************************************
*संदर्भ:
1. https://www.researchgate.net/publication/333702614_Skyborn_In-flight_Eme...
2. https://www.airindia.in/expectant-mothers-and-new-born-babies.htm
3. https://thepointsguy.com/2018/01/baby-born-flight-air-france-la-premiere/
लेखातील चित्रे जालावरून साभार !
सामो धन्स. पाहतो.
सामो
धन्स. पाहतो.
फारच रोचक माहिती डॉक्टर...
फारच रोचक माहिती डॉक्टर... नेहमीप्रमाणेच वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण...!
अशा हवाईप्रवासा दरम्यानच्या प्रसुतीमध्ये वैद्यकिय मदत व संसाधनाचा तुटवडा हा मोठाच प्रश्न असेल. पण उंचावरील हवेच्या दाबातील फरकामुळे गर्भवती स्त्री च्या इतर parameters ( रक्तदाब, ऑक्सिजन, हृदयाची गती, इत्यादी) मध्ये पण गंभीर फरक पडू शकेल ना ?
फक्त पुरुषांनाच वैद्यकीय शिक्षणाची मुभा असल्याने आपला स्रीवेश टाकून पुरुषी पेहराव पत्करलेल्या एका चिनी मुलीची मालिका यू ट्यूब वर आहे. पण ही हलकीफुलकी, गमतीशीर प्रेमकथा आहे. (उदात्त ध्येय, महिला सक्षमीकरण वगैरे औषधाला पण नाही.) पण पुरुष डॉक्टराचे सोंग घेऊन एका राजाची सेवा करताना तिची ती त्रेधा तिरपीट उडते ती बघण्यासारखी आहे.
DR Cutie
https://youtu.be/DKZPC0V-B6Y
स्वासु
स्वासु
धन्स.
*गर्भवती स्त्री च्या इतर parameters ( रक्तदाब, ऑक्सिजन, हृदयाची गती, इत्यादी) मध्ये पण गंभीर फरक पडू शकेल ना ?
>>> होय, ते लेखात दिले आहे मी, "विमानांतर्गत पर्यावरण आणि प्रसूतीची आव्हाने" या परिच्छेदात.
..
DR Cutie
सवडीने पाहतो.
रोचक आणि मनोरंजक माहीती..
रोचक आणि मनोरंजक माहीती..
कुठून कुठून शोधून संकलन करता तुम्ही.. धन्यवाद
विमानांतर्गत पर्यावरण आणि
विमानांतर्गत पर्यावरण आणि प्रसूतीची आव्हाने"...ओह.. हे माझ्याकडून मिस झाले होते..
' अधिकारीक' हा शब्द प्रयोग
गल्ली चुकली.
Submitted by ऋन्मेऽऽष on 10
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 March, 2023 >>> धन्स !
...........................................................
१९९०-९१ मध्ये इथिओपियात यादवी युद्ध झाले. तेव्हा बेटा इस्रायली लोकांना धोका निर्माण झाला. त्यांच्या सुटकेसाठी इसराएलने ऑपरेशन सॉलोमन राबवले. तेव्हा १४००० हून अधिक ज्यूंना इथिओपियातून इसराएलमध्ये आणण्यात आले.
या ऑपरेशन दरम्यान अवघ्या ३६ तासांत ३५ विमानांनी उड्डाण केले आणि त्या दरम्यान विमानांत एकूण आठ बाळांचा जन्म झाला होता!
या विशेष मोहिमेदरम्यानचे हे आठ जन्म या लेखातील 74 अंकांमध्ये मोजलेले नाहीत.
Submitted by ऋन्मेऽऽष on 10
दु प्र
>>>३६ तासांत ३५ विमानांनी
>>>३६ तासांत ३५ विमानांनी उड्डाण केले आणि त्या दरम्यान विमानांत एकूण आठ बाळांचा जन्म झाला होता!>>> भारीच !
ईजराईल बद्दल थोडे अवांतर..
ईजराईल बद्दल थोडे अवांतर..
जगाच्या पाठीवर कुठेही जन्मलेल्या ज्यू वंशीय मुलाला 'बर्थराईट ईसराईल' कार्यक्रमाअंतर्गत ईसराईल सरकार आणि तेथील संस्थांकडून, विमान प्रवास, रहाणे, खाणे, पर्यटन अशा कुठल्याही खर्चाविनाचा मोफत ('ऑल पेड') अशा ईजराईलच्या सांस्कृतिक वारसा दर्शन करवणार्या हेरिटेज प्रवासाचे गिफ्ट मिळते. १८ ते २६ ह्या वयात कोणीही ज्यू मुलगा/मुलगी अगदी एकट्याने, एकही दमडी न खर्चता एक ज्यू नागरिक म्हणून सन्मान देणारा हा प्रवास करू शकतो. ह्या प्रवासा दरम्यान जर त्या मुलाने/ मुलीने ईजराईल मध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या पुनर्वसनासाठी लागणारी सगळी मदत ही 'बर्थराईट ईसराईल' कार्यक्रम चालवणारी संस्था अगदी आनंदाने आणि तत्परतेने करते.
'बर्थराईट ईसराईल' >>>
'बर्थराईट ईसराईल' >>>
चांगली माहिती. आवडली.
इसराएलची अधिकृत भाषा हिब्रू आहे. त्यातील एक वचन मला आवडते :
" जो कोणी एका मनुष्यमात्राचा जीव वाचवतो, तो जग वाचवतो ! "
डॉ कुमार, नेहमीप्रमाणे अतिशय
डॉ कुमार, नेहमीप्रमाणे अतिशय माहितपूर्ण आणि intresting लेख आहे. प्रतिसाद सुध्दा intresting आहेत. तुम्हाला असे हटके विषय सुचतात तरी कसे?
मीरा,
मीरा,

नेहमीप्रमाणेच उत्साहवर्धक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ! खरंय, असा एखादा विषय जेव्हा अचानक सुचतो तेव्हा माझे मला देखील आश्चर्य वाटते.
लेखात उल्लेख केलेल्या एअर फ्रान्समधील घटनेवर वैद्यकविश्वात बरीच चर्चा झाली होती. त्यातून मग हवाईजन्म या विषयाचा आढावा घ्यावा असे मनात आले.
जो कोणी एका मनुष्यमात्राचा
जो कोणी एका मनुष्यमात्राचा जीव वाचवतो, तो जग वाचवतो ! "
>>>>
शिंडलर्स लिस्टमधल्या ज्यू लोकांनी हे वाक्य कोरलेली अंगठी देऊन इस्राएलमधे शिंडलरचा गौरव केला होता असं वाचले आहे.
हे वाक्य कोरलेली अंगठी देऊन
हे वाक्य कोरलेली अंगठी देऊन
>>
वा ! छान माहिती दिलीत.
ती अंगठी बनवण्यासाठी जे सोने वापरले होते ते Simon Jeret या व्यक्तीच्या दातांमध्ये केलेल्या plaster कामातून काढण्यात आले होते.
https://en.wikipedia.org/wiki/Oskar_Schindler#:~:text=The%20ring%20was%2...
१) प्रसूती कधी होईल ह्याचा
१) प्रसूती कधी होईल ह्याचा अंदाज जवळ जवळ अचूक असतो.
२) हवाई प्रवास हा कोणी प्रसूती करणाऱ्या दवाखान्यात admit होण्यासाठी करत नाही.
किंवा check up साठी पण करत नाही
३) रेल्वे मध्ये ज्या प्रसूती होतात..त्या स्त्रिया एक तर check-up साठी जातात किंवा admit होण्यासाठी.
त्यांची तुलना हवाई प्रवाशी लोकांशी करता येणार नाही.
४), निष्काळजी पना आणि ओव्हर कॉन्फिडन्स, ही मोठी कारणे अशा प्रसंग मागे आहेत.
काही कमी कारणे च योग्य असतात.
त्या मुळे हा प्रश्न काही मोठा नाही.
प्रसूती कधी होईल ह्याचा अंदाज
प्रसूती कधी होईल ह्याचा अंदाज जवळ जवळ अचूक असतो.
>> सहज म्हणून इथे एक नजर टाकली (https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/preterm-birth) :
दरवर्षी संपूर्ण जगभरात मिळून दीड कोटी बालके मुदतपूर्व जन्मतात.
अशा जन्मांचे विविध देशांमधील प्रमाण ५ ते १८ टक्के आहे.
मोठे प्रमाण आहे.
मोठे प्रमाण आहे.
विमान, रेल्वे अशी प्रवासात होणारी प्रसूती नैसर्गिक होते.
अशा प्रसूती (प्रवासात) आई च मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असावे .
असे वाटते.
नक्की काही आकडेवारी आहे का?
बघूया, शोधावी लागेल.
बघूया, शोधावी लागेल.
प्रवासाच्या वाहनप्रकारानुसार वेगवेगळा विदा निघेल, असा अंदाज.
>>>त्याच्या पुनर्वसनासाठी
>>>त्याच्या पुनर्वसनासाठी लागणारी सगळी मदत ही 'बर्थराईट ईसराईल' कार्यक्रम चालवणारी संस्था अगदी आनंदाने आणि तत्परतेने करते.>>>
छान योजना.
डॉ कुमार, नेहमीप्रमाणे अतिशय
डॉ कुमार, नेहमीप्रमाणे अतिशय माहितपूर्ण आणि intresting लेख आहे. प्रतिसाद सुध्दा intresting आहेत. ....... +१.
देवकी धन्यवाद !
देवकी धन्यवाद !
सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा !
हवेच्या बदलत्या दाबाचा परीणाम
हवेच्या बदलत्या दाबाचा परीणाम बाळाच्या कर्णपटलावर आणि क्वचीत मेंदूवरही होउ शकतो म्हणून साधारणपणे ६ महिन्यापर्यंत बाळाने विमानप्रवास करू नये असा सल्ला डॉक्टर देतात. इथे तर बाळाचा जन्मच विमानात झाला. अशा केसेस मध्ये बाळावर त्याचे काही परीणाम होतात का?
साधारणपणे विमानात प्रसूती
साधारणपणे विमानात प्रसूती करायची ठरल्यास वैमानिक विमान विशिष्ट सुरक्षित उंचीवरच ठेवतात, जेणेकरून हवेच्या दाबातील चढ-उतार कमीत कमी राहतात. बाळाचा प्रत्यक्ष जन्म तिथे झाल्यानंतर लवकरात लवकर विमान योग्य त्या ठिकाणी नेऊन बाळाला योग्य त्या शुश्रुषा केंद्रात पाठवले जाते.
जन्मानंतर जेमतेम दोन तास विमानात असल्यास फार काही परिणाम होतील असे वाटत नाही. बाळाच्या कानात बोळे घालायची काळजी घेतली जात असावी.
मुळात अशा बाळांवर झालेल्या या प्रकारच्या अभ्यासाचा विदा सापडला नाही. मात्र जन्मतःच एखाद्या बाळाला हृदयविकार किंवा अन्य काही गंभीर जन्मजात विकृती असल्यास अशा बाबतीत धोका संभवतो
माहितीपूर्ण आणि interesting
माहितीपूर्ण आणि interesting लेख
किशोर, कुमार या जोडीने आणखी
किशोर, कुमार या जोडीने आणखी एक मासिक यायचे.
त्यात उपसंपादकांच्या डुलक्या, मुद्राराक्षसाचा विनोद या बरोबर "ऐकावे ते नवलच" "विलक्षण....." अशी सदरे असायची.
कुमार सरांचे काही धागे असे आहेत.
हा एक, प्रतिभावंतांच्या तर्हा इ.
त्यांची दृष्टी संपादकाची आहे. हे धागे सदराप्रमाणे अव्याहत चालू राहणारे आहेत.
कोणत्याही संस्थळासाठी असे सदस्य अॅसेट असतात.
ते अमृत मासिक....
ते अमृत मासिक....
. जाहिरातदारांचा विनोद हे आणखी एक सदर होतं.
कोणत्याही संस्थळासाठी असे
कोणत्याही संस्थळासाठी असे सदस्य अॅसेट असतात.>>
+ १००००
र आ, धन्यवाद !
र आ व शर्मिला
धन्यवाद !
तुम्ही म्हणताय ते मासिक म्हणजे अमृत
. . .
आवर्जून प्रतिसाद देणारे आणि चर्चेत सहभागी होणारे वाचक हे खरे मायबोलीचे वैभव आहेत!
जाहिरातदारांचा विनोद हे आणखी
जाहिरातदारांचा विनोद हे आणखी एक सदर होतं. >> त्यात काय स्वरूपाचे विनोद असायचे?
नेहेमीप्रमाणे रोचक लेख डॉ. कुमार.
अवांतर: डॉ कुमार यांना भेटण्यासाठी पुन्हा एकदा तळजाई गटग झाले*च* पाहिजे हा ठराव मी यानिमित्ताने पुन्हा एकदा मांडते आहे अध्यक्ष महोदय.
Pages