
गरोदरपणाच्या अखेरच्या महिन्यातील वाहनप्रवास हा एक संवेदनशील विषय आहे. सर्वसाधारणपणे मानवी गरोदरपणाची कालमर्यादा 40 आठवडे मानली जाते. परंतु,
“नववा लागल्यानंतर काही खरं नसतं!”,
हा पूर्वापार चालत आलेला आजीबाईंचा सल्ला देखील दुर्लक्ष करण्याजोगा नसतो. एखाद्या गरोदर स्त्रीला डॉक्टरांनी व्यवस्थित काढून दिलेली “तारीख” दरवेळेस अचूक ठरतेच असे नाही. कित्येकदा अपेक्षेपेक्षा बऱ्याच लवकरही प्रसूतीवेदना चालू होतात. कधी कधी या वेदनांचा प्रारंभ आणि बाळाचा जन्म या घटना आश्चर्यकारक वेगाने घडतात. अशा प्रकारे नको तिथे बाळंत होण्याचे काही प्रसंग आपण अधूनमधून ऐकतो. त्यांमध्ये अगदी घरातील शौचालयापासून ते पार विमानात झालेल्या अपत्यजन्मांच्या घटना आहेत. अशा घटनांकडे तुलनेने बघायचे झाल्यास विमानांमध्ये झालेले अपत्यजन्म हे खूपच कमी – विरळा - आहेत. परंतु जमिनीवरील वास्तव्याशी तुलना करता विमानात निर्माण झालेली अशी परिस्थिती अत्यंत तापदायक असते आणि काही वेळेस ती गंभीर होते. अशा क्वचित घडणाऱ्या हवाईजन्मांच्या घटनांवर शास्त्रीय आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून टाकलेला हा दृष्टिक्षेप.
या विषयाच्या संदर्भात एक दीर्घकालीन अभ्यास-अहवाल प्रकाशित झालेला आहे (संदर्भ *1). सन 1929 ते 2018 या सुमारे 90 वर्षांच्या कालावधीत, जगभरात एकूण 73 व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणांमध्ये मिळून एकूण 74 बालके जन्मली; त्यापैकी 71 सुखरूप राहिली, 2 जन्मानंतर लगेचच मरण पावली तर अन्य एकाची तब्बेत गंभीर झाली. म्हणजेच, अधिकृत नोंदणीनुसार 90 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत जगभरात व्यावसायिक प्रवासी विमानांत फक्त 74 हवाईजन्म झालेले दिसतात. त्यापैकी सुमारे दोन तृतीयांश जन्म लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासांत झाले.
गरोदरपणाचा कालावधी पूर्ण भरल्यानंतर अपत्यजन्म होणे ही एक अत्यंत नैसर्गिक घटना आहे. या घटनेदरम्यान सगळे काही जेव्हा सुरळीत व स्त्रीच्या नैसर्गिकमार्गे पार पडते, तेव्हा डॉक्टरांपेक्षा निसर्गाचा वाटा अधिक असतो. परंतु नॉर्मल अपत्यजन्माच्या प्रसंगी देखील वैद्यकीय पूरक मदत ही महत्त्वाची आहेच. बाळंत होताना स्त्रीच्या जनेंद्रियांना कमीत कमी इजा व्हावी, जंतुसंसर्ग होऊ नये आणि जन्मलेल्या बाळाची तातडीने वैद्यकीय तपासणी व्हावी हे त्यामागील हेतू आहेत. काही गरोदर स्त्रियांमध्ये नैसर्गिक बाळंतपण मुळातच अडथळ्याचे असते तर अन्य काही गरोदर स्त्रियांत प्रत्यक्ष बाळंत होताना देखील अनपेक्षित अडचणी उद्भवू शकतात. हे सर्व पाहता प्रसूतीक्रिया ही तज्ञ डॉक्टर अथवा अनुभवी नर्सच्या उपस्थितीतच होणे केव्हाही श्रेयस्कर.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत असलेल्या स्त्रियांच्या विमानप्रवासाच्या बाबतीत काही नियमावली असणे आवश्यक ठरते. या संदर्भात असलेली वैद्यकीय शिफारस अशी आहे :
1. ज्या गरोदर स्त्रीच्या उदरात एकच बाळ आहे आणि वैद्यकीय तज्ञाच्या मते सर्व परिस्थिती नॉर्मल असल्यास, गरोदरपणाच्या 36 व्या आठवड्यापर्यंतचा विमानप्रवास ‘सुरक्षित’ असतो.
2. परंतु जुळे (अथवा एकाहून अधिक कितीही गर्भ) उदरात असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत ही कालमर्यादा 32 आठवड्यापर्यंत खाली आणलेली आहे.
नमुना म्हणून आपण या बाबतीतले ‘एअर इंडिया’चे (जालावर उपलब्ध असलेले) काही मूलभूत नियम पाहू (संदर्भ *2) :
1. सर्वसाधारण नियमानुसार गरोदरपणाच्या 32 व्या आठवड्यापर्यंतच प्रवासाची परवानगी.
2. जर बुकिंग करते वेळेस 32 वा आठवडा उलटून गेला असेल तर प्रत्यक्ष प्रवासाचे वेळेस 35 व्या आठवड्यापर्यंतची परवानगी आहे. मात्र अशा परिस्थितीत संबंधित डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक. त्यात गर्भवतीची तब्येत उत्तम आणि नॉर्मल बाळंतपणाची (जास्तीत जास्त) शक्यता लिहिलेली असावी लागते.
3. 35 आठवडे उलटून गेल्यानंतर तातडीच्या कामासाठी प्रवास करायचा असल्यास अनुकंपा तत्त्वावर परवानगीचा विचार. त्यासाठी विशिष्ट अर्ज भरल्यानंतर उच्चपदस्थ वैद्यकीय संचालक त्यावर निर्णय घेतात.
4. उदरात एकापेक्षा अधिक बाळ असल्यास किंवा गरोदरपणात कुठल्याही प्रकारची आरोग्य समस्या निर्माण झाली असल्यास 32 वा आठवडा हीच अंतिम मर्यादा.
प्रथमोपचार व्यवस्था
आता एक प्रश्न असा उपस्थित होईल, की तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी विमानातली प्रथमोपचार व्यवस्था काय स्वरूपाची असते? विमानाच्या अंतर्गत सेवा कर्मचाऱ्यांना मूलभूत प्रथमोपचारांचे शिक्षण दिलेले असते. त्यामध्ये अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास करावयाच्या प्राथमिक गोष्टींचा समावेश असतो. विमानात असलेल्या प्रथमोपचार संचात सामान्य प्रकारची व तातडीच्या उपचारांची औषधे, किरकोळ ड्रेसिंगची सोय आणि defibrillator व तत्सम व्यवस्था असते (परंतु वास्तवातील चित्र समाधानकारक नाही. कित्येक विमान कंपन्यांचे प्रथमोपचार संच हे प्रमाणित निकषांप्रमाणे नसल्याचे आढळले आहे). खूप वर्षांपूर्वी काही विमान कंपन्यांमध्ये अंतर्गत कर्मचाऱ्यांपैकी किमान एक जण प्रसूतीसेवेचे प्राथमिक प्रशिक्षण घेतलेली असायची. परंतु अलीकडे ही प्रथा पाळलेली दिसत नाही. याचे कारण मजेशीर आहे. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा एकंदरीत अनुभव असा आहे, की लांब पल्ल्याच्या प्रत्येक उड्डाणात साधारणपणे किमान एखादा डॉक्टर प्रवासी असतोच ! मग वेळप्रसंगी त्यालाच कुठल्याही मदतीचे आवाहन केले जाते.
विमानमार्गबदल की हवाई प्रसूती ?
इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. जर लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान एखाद्या गरोदर स्त्रीला प्रसूती वेदना चालू झाल्या, तर विमानाने त्याचा मार्ग बदलून सर्वात जवळच्या विमानतळावर उतरावे का? हा सल्ला वरकरणी सोपा वाटला तरी कित्येक वेळा कार्यवाही खूप अवघड असते. विमान महासागरांवरून जात असताना तर प्रसंग अधिकच बिकट होतो. अशा वेळेस जर विमानात कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची वैद्यकीय मदत (डॉक्टर, नर्स) उपलब्ध झाली तर अशा वेळेस वैमानिक डॉक्टरच्या सल्ल्याने व तारतम्याने निर्णय घेऊन विमानातल्या प्रसूतीला प्राधान्य देतात. तसेही, अशा प्रकारच्या हवाईजन्मानंतर बाळ बाळंतिणीला योग्य त्या सुश्रुषा केंद्रात लवकर न्यावे लागते. अशा प्रकारे विमानाचा मूळ मार्ग बदलून जेव्हा विमान अन्यत्र फिरवावे लागते त्याचा सध्याचा अतिरिक्त खर्च सुमारे एक लाख अमेरिकी डॉलर्स असतो.
संशोधनाचे निष्कर्ष
आता वर उल्लेख केलेल्या 74 हवाईजन्मांच्या बाबतीतले प्रत्यक्ष अनुभव पाहू. त्यापैकी 10% जन्म हे गरोदरपणाच्या 37- 38 व्या आठवड्यात झाले, 12% जन्म 32 व्या आठवड्यापूर्वीच झाले आणि बाकीचे सर्व या दोघांच्या दरम्यानच्या आठवड्यांमध्ये झालेले आहेत. यावरून हे लक्षात येईल, की गरोदरपणाच्या 30 व्या आठवड्यानंतरच परिस्थिती काहीशी अशाश्वत होते. म्हणून अशा गर्भवतींनी शक्यतोवर विमान प्रवास टाळलेलाच बरा.
विमानातील बाळंतपण
वरील हवाईजन्मांच्या दरम्यान विमानातल्या विमानात परिस्थिती हाताळणे हे कौशल्याचे काम होते. ती हाताळणी अशी केली गेली:
1. सुमारे ७४% घटनांमध्ये कुठली ना कुठली वैद्यकीय मदत मिळाली. त्यापैकी ४५% घटनांमध्ये एखाद्या प्रवासी डॉक्टरानेच स्वयंस्फूर्तीने मदत केली.
2. काही घटनांमध्ये डॉक्टरांच्या मदतीला नर्सबाई होत्या तर अन्य काही प्रसंगी फक्त नर्स किंवा फक्त वैद्यकीय विद्यार्थी अशी परिस्थिती सुद्धा होती.
3. काही मोजक्या घटनांमध्ये विमानाच्या कर्मचाऱ्यांनीच प्रसूतीची परिस्थिती कशीबशी हाताळली.
गरोदर स्त्री नैसर्गिकपणे प्रसूत होताना तिला योग्य प्रकारे कळा देण्याच्या सूचना तर महत्त्वाच्या असतातच, पण त्याचबरोबर पुढील गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. उदरातून बाळ बाहेर आल्यानंतर त्याच्या नाळेला व्यवस्थित चिमटा लावून ती कापणे हे पण एक अतिशय महत्त्वाचे काम. यासाठी निर्जंतुक केलेली उपकरणे आवश्यक. आता विमान हे काही शल्यगृह नव्हे ! तेव्हा अशा आणीबाणीच्या प्रसंगी ही सर्व कामे तिथे गोळा केलेल्या दुय्यमतिय्यम गोष्टींद्वारे उरकण्यात आली. अशा या जुगाडांचे हे काही रोचक किस्से:
1. बाळाची नाळ बांधणे : यासाठी एखाद्या प्रवाशाच्या बुटाच्या लेसचा वापर केला गेला.
2. नाळ कापणे : यासाठी जी कात्री आवश्यक होती ती स्त्री प्रवाशाच्या सौंदर्यप्रसाधनाच्या संचातून मिळवली गेली ! (प्रवाशाजवळची कात्री विमानतळावरील धातूशोधक यंत्रणेला गंडवून विमानात आली काय?). कात्री निर्जंतूक करण्यासाठी विमानातील व्हिस्की किंवा व्होडका यांचा वापर.
3. जननेंद्रियाची अंतिम स्वच्छता : बाटलीबंद पाण्याचा वापर.
4. काही प्रसंगी मातेचा श्वसनरोध किंवा बाळाच्या तोंडातील द्रव साफ करण्यासाठी प्रवाशांच्या ज्यूसबॉक्स बरोबर आलेल्या स्ट्रॉचा वापर केला गेला.
एक त्रयस्थ म्हणून आपल्याला वरील किस्से वाचायला मजा वाटेल. परंतु अशा सगळ्या अशास्त्रीय हाताळणीमधून गंभीर जंतुसंसर्गाचा धोका होऊ शकतो हे खरे. किंबहुना, हा धोका सुसज्ज रुग्णालयाशी तुलना करता दुप्पट असतो.
विमानांतर्गत पर्यावरण आणि प्रसूतीची आव्हाने
जमिनीवरील सर्वसामान्य वातावरणाच्या तुलनेत विमानाच्या अंतर्गत पर्यावरणात निश्चितच फरक असतात. तिथे हवेची आर्द्रता कमी असते तसेच हवेचा दाब सतत बदलता राहतो. या खेरीज विमानात प्रवाशाला सतत अवघडलेल्या स्थितीत बसून राहवे लागते.
या सर्व कारणांमुळे गरोदर स्त्रीच्या शरीरधर्मात असे फरक होऊ शकतात:
1. रक्तातील ऑक्सिजन संपृक्ततेचे प्रमाण कमी होणे
2. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता वाढते
3. नाडीचे ठोके आणि रक्तदाबही वाढू शकतो.
प्रस्तुत संशोधनात एकूण 74 घटनांपैकी 35 वेळा बालकांचा जन्म मुदतपूर्व (preterm) झालेला होता. 3 प्रकरणांत मुले जन्मताना पायाळू निघाली. अन्य तीन प्रकरणांमध्ये मातेला ‘सीपीआर’ या जीवरक्षक तंत्राची मदत द्यावी लागली. ३ प्रकरणांत जन्मलेली बालके मृतावस्थेत विमानाच्या स्वच्छतागृहातील कचऱ्यात टाकून दिलेली आढळली.
प्रस्तुत संशोधनाचे निष्कर्ष पाहिल्यानंतर आपल्याला विमानातील प्रसूती किती कटकटीची आणि धोक्याची आहे हे नक्कीच जाणवेल. मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांचे प्रश्न तर अजून गंभीर असतात. बाळाच्या मातेला जर प्रसूतीपश्चात अनियंत्रित रक्तस्त्राव झाला तर तोही एक चिंतेचा विषय असेल. हे सर्व पाहता गरोदरपणाच्या शेवटच्या दोन महिन्यात संबंधित स्त्री आणि तिच्या कुटुंबीयांनी प्रवासाचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतलेला बरा.
सुदैवाने विमानातल्या अनपेक्षित प्रसूतींचे एकूण प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे सटीसामाशी अशी एखादी जरी घटना जगात कुठेही घडली, की तिला भरपूर प्रसिद्धी दिली जाते.
डिसेंबर 2017 मध्ये एअर फ्रान्सच्या विमानात घडलेल्या अशा घटनेला माध्यमांमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली होती (संदर्भ *3).
त्या प्रकरणात एक नायजेरियाची स्त्री गरोदरपणाच्या 38व्या आठवड्यात प्रसूत झाली होती. सुदैवाने विमानात एक मूत्रशल्यचिकित्सक आणि एक बालरोगतज्ञ होते. त्या दोघांनी मिळून परिस्थिती कौशल्याने हाताळली आणि बाळ-बाळंतीण सुखरूप राहिले. त्या प्रवासामध्ये विमानाचा पहिला वर्ग पूर्ण रिकामा असल्यामुळे त्याचे छानशा तात्पुरत्या प्रसूतीगृहात रूपांतर करता आले. सदर बालकाचा जन्म अमेरिकेच्या हवाई हद्दीत झाल्यामुळे ते, जन्मानुसार मिळणाऱ्या अमेरिकी नागरिकत्वासाठी पात्र ठरले. हवाईजन्म या विषयाचा हा अजून एक पैलू.
90 वर्षांच्या कालावधीत जन्मलेल्या वरील 71 हवाईपुत्र अथवा हवाईकन्यांना मोठेपणी त्यांच्या स्वतःच्या हवाईजन्माची कथा रंजक वाटली असणार यात शंका नाही !
****************************************************************************************************************************
*संदर्भ:
1. https://www.researchgate.net/publication/333702614_Skyborn_In-flight_Eme...
2. https://www.airindia.in/expectant-mothers-and-new-born-babies.htm
3. https://thepointsguy.com/2018/01/baby-born-flight-air-france-la-premiere/
लेखातील चित्रे जालावरून साभार !
छान माहितीपूर्ण लेख. मला
छान माहितीपूर्ण लेख. मला यातला नागरिक त्वाचा भाग तेवढा माहीत होता.
मला वाटतं हवाई प्रवासात जन्माला येणार्या मुलांपेक्षा रेल्वे प्रवासात जन्माला येणार्या मुलांची संख्या अधिक असावी. मुंबईच्या लोकल प्रवासात झालेल्या बाळंतपणांची बातमी होते. इथे थाबा , जमीन , मदत , इस्पितळ तुलनेने जवळ असतात.
धन्यवाद !
धन्यवाद !
रेल्वे प्रवासात जन्माला येणार्या मुलांची संख्या अधिक असावी
>>>
होय, अगदी अगदी !
ट्रेन प्रमाणेच रिक्षा आणि कारमध्ये प्रसूत झालेल्यांची संख्या देखील भरपूर असते.
झकास ! वैद्यकीय अँगलने कधी
झकास ! वैद्यकीय अँगलने कधी विचार नव्हता केला, बरीच गुंतागुंत आहे.
नागरिकत्वाबद्दल माहित होते. आधी काही विमानकंपन्या आपल्या विमानात जन्मलेल्या व्यक्तीला आजन्म फुकट प्रवास करू देत, आता नाही देत बहुतेक.
आपल्या अपत्याला अमुक देशाचे नागरिकत्व मिळावे म्हणून गर्भारपणाबद्दलची माहिती दडवून विमानप्रवास करणारी एक बॉलीवूड सिनेअभिनेत्री प्रसिद्ध आहे, तिने ही क्लुप्ती (!) वापरून दोन्ही मुलींसाठी अमेरिकेचे जन्मना नागरिकत्व मिळवले
धन्यवाद !
धन्यवाद !
विमानकंपन्या आपल्या विमानात जन्मलेल्या व्यक्तीला आजन्म फुकट प्रवास करू देत, आता नाही देत बहुतेक.
>>>
सध्या त्या बालकाचा जन्मानंतरचा लगेचचा प्रवास तर फुकट होतोच आणि विमान वेळापत्रक / मार्ग बदलण्याचा अतिरिक्त खर्च त्याच्या पालकांकडून वसूल केला जात नसावा !
छान आढावा....
छान आढावा....
मला नागरिकत्वाविषयी जाणून घ्यायचे होते....
बाळाचा जन्म दाखला कोण देईल? हवाई हद्द असलेला देश की विमान कंपनी?
त्यात जन्म स्थळ जवळचं विमानतळ असेल बहुतेक.
मुंबई लोकलमध्ये अशा प्रसंगी प्रवाशी खूप सहकार्य करतात. तात्पुरता आडोसा तत्परतेने करतात. हल्ली स्टेशनवरही आरोग्य केंद्रं झालीत.
छान माहितीपूर्ण लेख.
छान माहितीपूर्ण लेख.
>>>एक नायजेरियाची स्त्री गरोदरपणाच्या 38व्या आठवड्यात प्रसूत झाली होती. >>>>
इथे नियम डावलू न त्या बाईना विमानात घुसू कसे दिले ?
धन्यवाद !
धन्यवाद !
.. ..
बाळाचा जन्मदाखला कोण देईल? हवाई हद्द असलेला देश की विमान कंपनी? >>
जर बाळाचा जन्म विमान समुद्रावर असताना झाला तर नागरिकत्वाचे नियम प्रत्येक देशागणिक वेगळे आहेत.
इथे सविस्तर माहिती आहे:
https://worldpopulationreview.com/country-rankings/countries-with-birthr...
काही ठळक मुद्दे :
१. काही देशांत, जर विमान त्या देशाच्या मालकीचे असेल तर ते नागरिकत्व मिळते.
२. अमेरिकेच्या बाबतीत सागरी आणि हवाई हद्दीत बाळ जन्मले असता नागरिकत्व मिळते. पण इंग्लंडच्या बाबतीत असे मिळत नाही.
३. काही देशांमध्ये पालकांचेच नागरिकत्व मुलाला लागू केले जाते
२.इथे नियम डावलून त्या बाईना
२.
इथे नियम डावलून त्या बाईना विमानात घुसू कसे दिले ?
>>
इथे २ शक्यता दिसतात :
1. नियम डावलला गेला.
२. अनुकंपा तत्त्वावर (? पटवापटवी करून) परवानगी दिली गेली.
काही विमान कंपन्यांचे नियम शिथिल आहेत. तर डेल्टा एअरलाइन्समध्ये असा काही नियमच नाहीये
https://thepointsguy.com/news/what-happens-when-women-give-birth-on-planes/
२.इथे नियम डावलून त्या बाईना
दु प्र.
@ अनिंद्य
@ अनिंद्य
Spirit airlines त्यांच्या विमानात जन्मलेल्या मुलाला दरवर्षी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी फुकट ट्रिप देतात.
https://5thvoice.news/legalnews/OTI4MA==/Citizenship-of-Sky-born-babies-...
रोचक माहिती.
रोचक माहिती.
अश्या घटनाविषयी वर्तमानपत्राद्वारे वरवरचं माहिती होते .
पण डिटेल वार माहिती आज वाचली.
धन्यवाद
छान माहितीपूर्ण लेख.
छान माहितीपूर्ण लेख.
फार रोचक माहीती आहे. अशा
फार रोचक माहीती आहे. अशा बाळांची कुंडली मांडताना जन्मस्थान काय धरायचे - असा मजेशीर प्रश्न मनात डोकावुन गेला.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
हा विषय मला रंजक वाटल्याने त्याची व्यवस्थित माहिती काढली.
बाळांची कुंडली मांडताना जन्मस्थान

>>
हम्म ! हा मुद्दा माझ्या परिप्रेक्ष्याबाहेरचा आहे.
तरीसुद्धा इच्छुकांना चर्चा करायची असल्यास मी शांतपणे वाचू शकतो
>>>>>हम्म ! हा मुद्दा माझ्या
>>>>>हम्म ! हा मुद्दा माझ्या परिप्रेक्ष्याबाहेरचा आहे.
तरीसुद्धा इच्छुकांना चर्चा करायची असल्यास मी शांतपणे वाचू शकतो Happy Happy
नाही नाही
रोचक माहिती. धन्यवाद !
रोचक माहिती. धन्यवाद !
बर्याच एअरलाईन्स सातव्या
बर्याच एअरलाईन्स सातव्या महिन्यापुढे मेडिकल सर्टिफिकेट मागतात. (असं सर्टिफिकेट असतानासुद्धा इंटर्नॅशनल ट्रॅव्हलमधे ट्रांझिटींग एअरपोर्टवर थांबवून, एअरपोर्टवरच्या डॉक्टरकडून परत सर्टिफिकेट घ्यायला लावण्याचा - आणि त्यापायी विमान चुकण्याचा प्रसंगही आहे).
"Spirit airlines त्यांच्या विमानात जन्मलेल्या मुलाला दरवर्षी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी फुकट ट्रिप देतात." - फुकटसुद्धा जाऊ नये अशी एअरलाईन आहे ती.

..... फुकटसुद्धा जाऊ नये अशी
..... फुकटसुद्धा जाऊ नये अशी एअरलाईन आहे ती.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
..
फुकटसुद्धा जाऊ नये अशी एअरलाईन आहे ती.
>> लैच भारी !
वर्षातला एक दिवस त्यांचा एक हक्काचा प्रवासी
स्पिरिट एअरलाइन बकवास आहे असे
स्पिरिट एअरलाइन बकवास आहे असे ऐकलेले.
खूप छान माहिती डॉ कुमार
खूप छान माहिती डॉ कुमार
तुमची माहिती नेहमीच वेगळी आणि रंजक असते
रच्याकने रोचक नंतर परिप्रेक्ष्याबाहेरचा हा आणखी एक नवीन शब्द समजला तुमच्याकडून
खूप छान माहिती डॉ कुमार,
खूप छान माहिती डॉ कुमार,
तुमची माहिती नेहमीच वेगळी आणि रंजक असते.
रच्याकने रोचक नंतर परिप्रेक्ष्याबाहेरचा हा आणखी एक नवीन शब्द समजला तुमच्याकडून
धन्यवाद !
धन्यवाद !
..
रोचक नंतर ....... एक नवीन शब्द >>
रोचकबद्दल बऱ्याच जणांचा गैरसमज का झालाय कुणास ठाऊक !
हा शब्द माझा नाही.
मी तो संस्थळावरच कोणाकडून तरी शिकलो
कोणाकडून तरी शिकलो >>...हो पण
कोणाकडून तरी शिकलो >>...हो पण मी तर तुमच्याकडूनच शिकलेय
रोचक आहे असे उपरोधिक
रोचक आहे असे उपरोधिक बोलण्याची सुरुवात कोणी केली ते मला माहीत आहे. पण रोचकचा मूळ अर्थच उत्तम आहे. काही लोकं पॉलिटिकली करेक्ट रहाण्याकरता तो शब्द वापरतात. मला राग येतो त्याचा.
आदू किंवा कुमार - तुम्हा कोणाला उद्देशुन नाही.
>>>ट्रांझिटींग एअरपोर्टवर
>>>ट्रांझिटींग एअरपोर्टवर थांबवून, एअरपोर्टवरच्या डॉक्टरकडून परत सर्टिफिकेट घ्यायला लावण्याचा - आणि त्यापायी विमान चुकण्याचा प्रसंगही आहे).>>> हे अतिच झाले राव. पुन्हा जायचे नाही त्यांच्या विमानाने.
थोडेसे अवांतर:
थोडेसे अवांतर:
नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने प्राचीन ग्रीसमधील ही दंतकथा :
त्या काळी महिलांना वैद्यकीय शिक्षण घेण्यास बंदी होती. हा अन्याय दूर करायचे Agnodice हिने ठरवले. तिने स्वतःचे केस कापले आणि पुरुषी वेश धारण करून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आणि शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर ती एकदा रस्त्याने जात असताना तिला एका ठिकाणाहून एका स्त्रीच्या किंकाळ्या ऐकू आल्या. तातडीने ती धावत गेली तेव्हा तिला दिसले की त्या किंकाळ्या एका प्रसूतीत अडलेल्या गरोदर स्त्रीच्या होत्या. ती लगेच पुढे झाली आणि तिने त्या स्त्रीला बाळंत व्हायला मदत करायची तयारी दाखवली. परंतु त्या स्त्रीने Agnodice हा ‘पुरुष’ आहे या कारणाखाली त्याही अवस्थेत नकार दिला. Agnodiceला मात्र तिच्या वेदना पाहवेनात. मग तिने हळूच आपले कपडे बाजूला सरकवून त्या स्त्रीला दाखवले, की ती स्वतः पुरुष नसून स्त्रीच आहे ! मग त्या स्त्रीने लगेच होकार दिला आणि तिची प्रसूती निर्वेधपणे पार पडली.
Agnodiceला ग्रीसमधील पहिली स्त्री प्रसूतीतज्ञ मानले जाते. परंतु, ती ऐतिहासिक व्यक्ती होती का नाही, या संदर्भात उलटसुलट मते आहेत.
@कुमार मी हा सिनेमा पाहीला
@कुमार मी हा सिनेमा पाहीला आहे. यु ट्युब वरती आहे. फार आवडला होता. Barbra Streisand होती. अशाच विषयावर आहे तो. फक्त agnodice वरच आहे का माहीत नाही. नाव आता आठवत नाही.
शोधला - Yentl
- A Jewish girl disguises herself as a boy to enter religious training.
सामोagnodice
सामो
agnodice
युट्युब वर आठ ते पंधरा मिनिटांचे लघुपट किंवा परिचय दिसत आहेत.
संपूर्ण चित्रपट आहे असा?
Yentl कुमार सर. त्या
Yentl कुमार सर. त्या सिनेमाचे नाय Yentl. या सिनेमाची कथा त्या गोष्टीशशी मिळती जुळती आहे.
- A Jewish girl disguises herself as a boy to enter religious training.
Pages