माझी अमेरिका डायरी -४ - शाळा, अभ्यास आणि बरचं काही

Submitted by छन्दिफन्दि on 3 March, 2023 - 22:33

कधी नव्हे ते सकाळी पहिल्या हाकेलाच दोघंही टुणकन उठून बसली. पटापट आवरून तयार झाली . ना दुधावरून कटकट ना आवरायला टंगळ मंगळ. कारण आज नवीन शाळेत जायचा पहिलाच दिवस होता ना!
सकाळी ८ ते दुपारी ३. सात तास शाळा त्यामुळे दोन डबे, पाण्याची बाटली. झालं भरलं दप्तर. तुम्ही म्हणाल किंडरगार्डन ला अजून काय असणार ? अहो पण तिसरीच्या मुलालाही ? मग मीच त्याला एक पेन्सिल बॉक्स आणि वही बळे बळे दिली.

आज त्यांचा पहिला दिवस असल्यामुळे आम्ही दोघंही गेलो सोडायला. आम्हाला ठाणा-मुंबईच्या शाळा पाहायची सवय असल्याने आमच्या डोळ्यासमोर शाळा म्हणजे ३-४ माजली उंच बिल्डिंग आणि पुढे थोडी (अत्यंत दुर्मिळ अशी) मोकळी जागा, शाळेनी “ग्राउंड” असं लेबल दिल्याने ते शाळेचं ग्राउंड.
Shala_n1.jpg

इथे शाळेची इमारत म्हणजे तीन लांबुडकी बैठी घरचं जणू. आणि त्यापुढे खूप मोठं ग्राउंड. त्यातला काही भाग डांबरी (त्याला ब्लॅक टॉप म्हणतात ) त्याच्यावर किंडरगार्डन च्या मुलांसाठी, छोटे प्ले structures, जस कि घसरगुंडी, see -saw. पहिले ते तिसरीच्या मुलांसाठी थोडे मोठे प्ले structures .तर चौथी पाचवीच्या मुलांसाठी अजून मोठे प्ले structures. ठीक ठिकाणी बास्केटबॉल चे पोल्स. मधेच एक मोठी पत्र्याची शेड दिसली. नंतर कळले कि ते पत्रे नाहीत तर सोलार पॅनेल्स आहे. ग्राउंडला कडेने जॉगिंग ट्रॅक आणि मध्यभागी हिरवंगार Lawn. ग्राउंड अल्युमिनिम च्या जाळीने बंदिस्त केलेलं. शाळेला ३-४ गेट्स. जे गेट तुमच्या घराजवळच त्या गेटने शाळेत आतमध्ये जा.
सकाळी तो परिसर छोट्या मुलांनी आणि त्यांच्या सोडायला आलेल्या पालकांनी गजबजून गेला होता. गोरी, ब्राऊन , काळी हरतऱ्हेच्या रंगाची, हिरवे, निळे, तपकिरी, काळेभोर डोळे असलेली, सोनेरी, तपकिरी , लाल , काळ्या केसांची छोटी छोटी मुले, त्यांचे रंगेबी रंगी कपडे, जॅकेट्स, केसांच्या निरनिराळ्या तऱ्हा, एकदम उत्साहित वातावरण होते सगळीकडे.
इकडे पब्लिक शाळांना युनिफॉर्म नसतो, ना इतर कसली बंधने म्हणजे केस इतकेच हवेत असेच बांधले पाहिजेत वगैरे वगैरे!
मला आठवली तिकडची शाळा, कडक युनिफॉर्म, मुलांचे केस एकदम बारीक, मुलींचे बॉब असतील तर त्यांना एकाच रंगाचे हेअर बँड, केस मोठे असतील तर त्यांचे बो, वेण्या, त्याही वर बांधलेल्या, त्यांना ठराविक रंगांच्या रिबिनी. पायामधे ठराविक रंगाचे सॉक्स आणि shoes. एकदम कडक शिस्तीत पहिल्या बेलला सर्वानी रांगेने वर जाणे.
छोटया मुलाच्या बाईंनी आम्हाला ५ मिनिट आधी आत बोलावून घेतलं. इतकी सुरेख सजवलेली रंगेबिरंगी रूम होती ती. अगदी सात बुटक्यांच्या घरात आल्यासारख वाटलं. छोटी छोटी टेबलं, छान तीन-तीन च्या ग्रुप मध्ये मांडून ठेवलेली. तेवढ्याच छोट्या आणि लाल, निळ्या. पिवळ्या रंगाच्या खुर्च्या. एका कोपऱ्यामध्ये टीचर च डेस्क.
दारात भिंतीला लागून एक उंचीला छोटा पण लांबलचक रॅक, साधारण २५ एक कप्पे असतील त्यात. प्रत्येक कप्प्याला एका मुलाचं नाव चिकटवलेलं. मग टीचरने त्याला पण एक कप्पा दिला आणि त्यात बॅग ठेवायला सांगितली. त्याच्या समोरच्या भिंतीला लागून अजून एक मोठी शेल्फ, त्यात खूप सारी पुस्तक छान लायब्ररी सारखी मांडून ठेवलेली. बाजूलाच अजून एक शेल्फ ह्याच्यात खूप सारे पझ्झले बॉक्सेस, मोठमोठे प्लास्टकचे पारदर्शक खोके, त्यात ठेवलेली खेळणी, बाहुल्या, सॉफ्ट toys., लेगो. बाकी सगळीकडे छान चित्र लावलेली, पताका लावलेल्या, नजर जाईल तिकडे सुंदर, रंगेबिरंगी, आकर्षक असं काहीतरी! दुसऱ्या एक कोपऱ्यात एक छानशी जाडसर मॅट टाकलेली. समोर एक अगदी बैठं स्टूल कम टेबल, हा एरिया जास्त करून गोष्ट वाचून दाखवायला किंवा सांगायला वापरला जातो. कधी कधी टीचर्स, मुलांचे आई बाबा, कधी कोणी पाहुणे मुलांना मोठ्याने गोष्ट वाचून दाखवतात, चित्रे दाखवतात. कधी मुलांच्या बर्थ डे ला त्या मुला-मुली चे आई किंवा बाबा त्याच्या-तिच्या आवडीची गोष्ट वाचून दाखवतात.
IMG_20230110_123011456.jpg
मोठ्याचा वर्ग एकदम दुसऱ्या टोकाला. शाळा सुटल्यावर याच्या टीचर ने पण आत बोलावले. हा वर्ग हि असाच सजवलेला, इथेही पुस्तकांची कपाटे, मुलांना बॅग ठेवायला शेल्फ, प्रोजेक्टर, कोपऱ्यात एक जाडसर मॅट. फक्त टेबल्स आणि खुर्च्या जरा मोठ्या होत्या.

प्रत्येक टीचरला एक रूम दिलेली असते, ती रूम कायम तिचीच असते. जरी ती टीचर एखाद वर्ष दुसरी ऐवजी तिसरीला शिकवायला लागली तरी तिची रूम तीच असेल . मुलेच गरज असेल तर वर्ग बदलतात.
खाऊच्या किंवा जेवणाच्या सुट्टीत मुलांना ठराविक एरियात लंच करावे लागते. इतकया सुंदर सजवलेल्या वर्गांमध्ये डबा खाल्ला जात नाही. अगदीच पाऊस असेल तर गोष्ट वेगळी . गेले दोन वर्ष तर covid नंतर मुलांना शाळेमध्ये फ्री ब्रेकफास्ट/ हॉट लंच मिळते.

IMG_20150513_115257471_HDR.jpg

मला सगळ्यात आश्चर्य वाटलं ते ह्याच कि कुठेच “पियुन “ दिसत नव्हते. इकडे असं काही नसत. सगळी काम स्वतः शिक्षकांनाच करावी लागतात. किंवा काही कामात जसे खुप Xerox काढायच्यात, एन्व्हलप तयार करायचेत तर त्यासाठी पॅरेण्ट वोल्लेन्टीर्स असतात. तसच वर्गामध्ये मुलांनाही जॉब्स वाटून दिलेले असतात. ती मुलं डब्यांची कार्ट ओढून नेणे, कचरा रिसायकल करणे, दार बंद करणे, लाईट्स बंद करणे अशासारखी कामे आळीपाळीने करतात.

तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलच असेल, इतक्या रंगीत वातावरणात अभ्यास पण कसा होत असेल. बहुतांश शाळांचं मुख्य ध्येय असत कि मुलांना स्ट्रेस फ्री वातावरण हवं. ती आनंदी राहायला हवी. त्यामुळे होमवर्क पण फारसा नसतोच. असला तरी तिसरीपर्यंत २० मिनिटांचा आणि चौथी पाचवीला ३० मिनिटांचा एवढाच होमवर्क.

इकडे मुख्यत्वे गणित आणि भाषा (म्हणजेच इंग्लिश ) हे दोन विषय असतात. सायन्स प्रोजेक्ट बेस्ड वेनी शिकवतात. खूप डिफाइन्ड पोर्शन (ठराविक अभ्यासक्रम ) किंवा टेक्सटबूक(क्रमिक पुस्तक ) नसत. हेच सोशल सायन्स लाही लागू होतं. आणि अजून एक महत्वाचा विषय म्हणजे PE, शारीरिक शिक्षण. खेळाला ह्या देशात खूप महत्व आहे तसच फिटनेसलाही. PE मध्ये त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात.
गणिताच्या आणि इंग्लिशच्या मात्र वर्षातून ३-४ डायग्नोस्टिक टेस्ट्स घेतल्या जातात. त्यांची मांडणी अशी असते की त्यातून त्यांची गणिताची तयारी, reasoning स्किल्स, नंबर स्किल्स ह्याचा अंदाज येतो. तसेच इंग्लिश रिडींग लेवल , रायटिंग लेवल कळते.
इंग्लिश साठी तुमच्या रीड़ीन्ग लेवल (वाचन क्षमते) नुसार तुम्हाला ठराविक गटात टाकतात . आणि एकाच (क्षमतेची) लेव्हलची असल्यामुळे ते गटागटात मिळून बुक क्लब प्रमाणे पुस्तके ठरवून ती वाचतात, त्यांचे प्लॉट्स, characters इत्यादी वरती डिस्कशन (गट चर्चा) करतात. एक पुस्तक संपलं कि पुढचं पुस्तक अशी एकंदर धाटणी असते कि ज्यामुळे मुलांना सखोल वाचायला शिकवले जाते.

आठवड्याला काही शब्दांची लिस्ट मिळते, आणि त्यावर पुढच्या आठवड्यात टेस्ट, असे करून मुलांचा शब्द संग्रह वाढवतात. तसच प्रत्येक quarterला सहा पुस्तके वाचली तर वर्षाच्या शेवटी पार्टी असत. त्यात मेख अशी आहे कि तुमच्या रिडींग लेव्हलच पुस्तक वाचायचं आणि त्यावर quiz घ्यायचं , ते पास झालात तरच तुमचं पुस्तक गणलं जात. खूप पुस्तकं वाचणाऱ्या मुलांना movie बघायला घेऊन जातात , तर थोडी कमी पुस्तकं वाचणार्यांना शाळेतच मूवी दाखवतात. आणि जे अजिबात काही वाचत नाहीत त्यांना मात्र त्या दिवशी लायब्ररीत बसावे लागते.

परीक्षांचं म्हणाल तर इकडे तिसरीपासून मुलांना एक स्टेट लेव्हलची इंग्लिश आणि गणिताची टेस्ट घ्यावी लागते. पण ह्याचा रिस्ल्ट मुलांपेक्षा शाळेची आणि शिक्षकांची तपासणी करण्यासाठी असतो. ह्या परीक्षेतील मुलांच्या प्रगतीवर शाळेचं प्रगतीपुस्तक अवलंबून असते. त्यामुळे ही परीक्षा अतिशय गांभीर्याने घेतात. पण जेव्हा पहिल्या वर्षी अशा परीक्षेआधी शाळेकडून जे पत्रक आले ते वाचून मी उडालेच. कारण कुठेही मुलांचा अभ्यास घ्या असे लिहिले नसून, “मुलांना लवकर झोपवा, त्यांना स्ट्रेस देऊ नका, शाळेत यायच्या आधी व्यवस्थित ब्रेकफास्ट द्या “ ह्या आणि अशा सगळ्या सूचना. त्यातून लेक घरी आला तो तर जाम खुश, म्हणे स्ट्रेस येऊ नये म्हणून टीचर नि त्यांना एकेक गम खायला दिल. हे ऐकून मात्र न कळत हात कपाळावरच गेला.

एकदा वेगवेगळ्या देशातून आलेल्या काही जणी गप्पा मारत होतो. विषय निघाला चिल्ड्रेन’स डे चा.”भारताचा अमुक एक दिवशी, चायनाचा तमुक एक दिवशी, रशियाचा आणिक कोणा दिवशी वगैरे वगैरे’, तशी सगळ्यांना थांबवून त्यातल्या त्यात एक वृद्ध स्त्री म्हणाली, “ आणि अमेरिकेत तर रोजच चिल्ड्रेन्स डे असतो “ ह्यावर मात्र सगळ्यांनीच हसून मोहोर उमटवली .

***
तळटीप : हे एलिमेंटरी शाळेचे कॅलिफोर्निया मधले माझे अनुभव आहेत. स्टेट प्रमाणे किंवा डिस्ट्रिक्ट प्रमाणे तुमचे अनुभव वेगळे हि असू शकतात.

माझी मुलं इकडे आली तेव्हा मोठा टेक्स्ट बुक सोडून फार काही वाचत नव्हता, आणि छोटा तर अगदीच नवखा होता. ह्या सगळ्या वाचनवीरांबरोबर रहायच तर वाचन समृद्ध करणं खरंच गरजेचं होतं. त्यासाठी धावून आली इकडची वाचनालये. वाचनालयांविषयी जाणून घेऊ या पुढच्या भागात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
चौथ्या फोटो लंच एरिया आहे का? आणि वर सोलर पॅनल?

शाळेत क्लिनिंग टीचर्सनी करायचं तर काम <<< नाही त्यासाठी कस्टोडियन असतात (एकच माणूस ). शाळा सुटल्यावर ते एकदा व्हॅक्युम / cleaning करून जातात

अच्छा, मग ठिक.

ते प्युन नाही, शिक्षकांना सगळी कामे करावी लागतात असं वाचलं म्हणून मला इथल्या शाळेत प्युन्स जी कामे करतात, ते वाटलं.

ते प्युन नाही,<<<म्हणजे शाळेत शिपाई इकडन तिकडे निरोप, पुस्तके पोहोचविणे, मुलांना गेट मधून आत घेणे , किंवा तत्सम कामे दिवसभर करायचे तस कोणी एक्सट्रा कामांसाठी नव्हतं दिसलं

हपा , धन्यवाद!

छानच.

भारत आणि अमेरिका शिक्षण पद्धती आणि शाळा यामध्ये बरेच फरक असले तरी शिक्षकांना तुटपुंजा मोबदला हे मात्र सेम टू सेम आहे Happy

पु भा प्र

म्हणजे शाळेत शिपाई इकडन तिकडे निरोप, पुस्तके पोहोचविणे, मुलांना गेट मधून आत घेणे , किंवा तत्सम कामे दिवसभर करायचे तस कोणी एक्सट्रा कामांसाठी नव्हतं दिसलं >>> हो हो ह्याबरोबरच आमच्याकडे शाळेत साफसफाईही करायचेना, खुप कामं असायची त्यांना, म्हणून क्लिनिंगचा विचार आला, अर्थात तिथे धुळ फार नसेल, म्हणून शाळा सुटल्यावर एकदा येऊन केलं तरी चालत असेल, इथे आनंदी आनंद. शिपाईमावशींना केर वगैरेही बरेचदा काढायला लागायचा.

मालिका आवडते आहे. तुम्ही डोळसपणे आनंद आणि नवा अनुभव घेताय. हे सर्वांनाच जमत नाही. बरेचदा आपण फक्त पळत असतो आणि आसपासचे बारकावे, सौंदर्यस्थळे, कृतज्ञ होण्याच्या संधी गमावत असतो.

शिक्षकांना तुटपुंजा मोबदला <<<<<
खूप तुटपुंजे नसावेत. पण इथे SF बे एरियामध्ये घरांच्या किमती खूप जास्त असल्यामुळे मध्ये काही महिने शाळांमधून शिक्षक मिळत नसल्याची बातमी वाहिन्यांवर फिरताना बघितली.
आणि आता शिक्षकांसाठी परवडणारी घरे, सवलती देतायत अशीही बातमी वाचली.

… शिक्षकांसाठी परवडणारी घरे, सवलती देतायत …

चांगला पगार असलेला शालेय शिक्षक हे कॉमनप्लेस असेल तर उत्तमच आहे

अर्थात तिथे धुळ फार नसेल, म्हणून शाळा सुटल्यावर एकदा येऊन केलं तरी चालत असेल<<< इकडे वर्ग बंदिस्त असतात आणि सगळीकडे एकतर डांबरीकरण.किंवा काँक्रिटीकरण नाहीतर गावात असते त्यामुळे धूळ कमी असते हे खरे.

अनिंद्य , SharmilaR, सामो, सदासुखी, वावे सगळ्यांना वाचून दिलेल्या प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद!