तो एक ऊन्हाळी दिवस होता. आकाशात चिटपाखरूही दिसत नव्हतं. माणिकराव आज सकाळीच घरातून बाहेर पडले होते. झपाट्याने पावलं टाकत ते सासुरवाडीला निघाले होते. रणरणत्या उन्हामुळे त्यांचा जीव कासावीस झाला होता. म्हणून एका झाडाची सावली बघून ते घडीभर बसले. तंबाखूची चंची सोडली. गोळी दाढेखाली धरली. थोडा दम खाऊन पुन्हा चालू लागले. दिवस मावळतीला आला तेव्हा ते पिंपळगावी पोचले.
"सुमेss पावनं आलं बग" माणिकरावांना बघताच पारूआत्यांनी लेकीला हाळी दिली. आणि सुमाताई डोक्यावरून पदर घेत खुदकन लाजल्या.
एकेकाळचे लेखक साधारणतः अशी सुरूवात करायचे..! कथावस्तूत प्रवेश करण्याचा एक रूढ मार्ग..!
शहरी वाचकांना ग्रामीण जीवनातील किस्से वाचायला देऊन त्यातून त्यांची सांस्कृतिक भूक भागवणं, ही एक जबाबदारी असेल समजा.
मी काही तेवढा मुरलेला नाही. माझा अजून तेवढा हातखंडा नाही. माझ्या माणसांचा चेष्टेचा विषय करायला मला जमत नाही. माझी अजून तेवढी उत्क्रांती झालेली नाही. अजून तेवढा काही सुसंस्कृत झालेलो नाही मी.
मी सुरुवातीलाच हटून बसतो. माझ्या पात्राला मी सासुरवाडीला जाऊच देत नाही. कारण मलाच तिथं कुणी विचारत नाही. सासू आणि माझी बायको आत काहीतरी कुजबुजत असतात. मेहुणा मी दिसलो की चपापतो आणि ताबडतोब बाहेरच्या बाहेर पसार होतो. आणि सासरे माझ्यापुढे बसून पेपरची पानं पलटत राहतात. अधूनमधून हताशपणे मान हलवतात. माझ्यासाठीच ते तशी मान हलवत असतील, असा मला संशय आहे. कारण त्यांच्या मुलीनं माझ्यात काय बघितलं हा प्रश्न अजून त्यांना सतावतो, हे मला माहीत आहे.
तर अशा सगळ्या विपरीत परिस्थितीत धमाकेदार जावईस्वागताची अपेक्षा मी करू शकत नाही. माझी बायको बाहेर यावी आणि त्या ऑकवर्ड सिच्युएशनमधून माझी सुटका करावी, एवढीच अपेक्षा बाळगत मी तिथं बसून असतो..! आता या बिंदूवर तुमचं मध्यमवर्गीय कुतुहल चाळवण्यात मी यशस्वी झालो असेन, अशी मला आशा आहे.
इथंच मी वेगळा ठरतो..! मला हल्ली रंगवून रंगवून गोष्ट लिहिता येत नाहीत. महत्वाचं सगळं आधीच सांगून नंतर डोक्याला हात लावून बसण्याची माझी पद्धत झाली आहे.
पूर्वी असं नव्हतं. माझ्या पूर्वीच्या शैलीमुळे लांबून लांबून लोक यायचे माझ्या दर्शनाला. रांगा लागायच्या. पगारी बाऊन्सर ठेवले होते पण त्यांनाही गर्दी आवरायची नाही. अमावस्या वगैरे असेल तर हाणामाऱ्या व्हायची वेळ यायची दारात.. सुरूवातीला हे बघून मी हादरून गेलो होतो. पण नंतर नंतर अशा स्वप्नांची सवय झाली...
आता फक्त पिरपिरणं उरलेलं आहे. फक्त ते ऐकून घेणारे असले म्हणजे झालं. परंतु दुर्दैवानं तसं घडत नाही. मी बोलायला सुरुवात करताच लोकांना कुणाचेतरी अर्जंट फोन येतात.. नसले आले तर ते स्वतःच कुणालातरी फोन लावतात आणि बोलण्याचं ढोंग करत सरकत सरकत माझ्यापासून दूर जातात..! मी समजा मनमिळाऊ असल्यामुळे त्यांना माफ करतो. कारण झाल्या गोष्टी तिथंच सोडून द्यायला आता मी शिकलो आहे.
तरीही मी अगदीच काही बैरागी वृत्तीचा नाही. सदा सेवी आरण्य तारूण्यकाळी, हे वर्णन मला लागू पडत नाही. मी फक्त दाढी वाढू दिलीय, एवढंच..! कारण दाढीवर अजूनतरी टॅक्स द्यावा लागत नाही.. बाकी मग मला अजूनही जुनी गाणी गुणगुणायला आवडतात. मन रमतं त्यात. वेळ कसा जातो कळत नाही.
उदाहरणार्थ..
"जी में आता है,
तेरे दामन में
सर छुपा के हम,
रोते रहें, रोते रहेंss."
परंतु हे ही लोकांना बघवत नाही. शेजारच्या खिडकीतून एक बाई हमखास रसभंग करते..!
"नका गाऊ..! आता थांबवा हे, प्लीज..! आमची लहान मुलं घाबरून रडायला लागलीयत इथे...! तुमच्या भेसूर आवाजामुळेच तसं होतंय, ही वस्तुस्थिती मान्य करा..! नका गाऊ..! प्लीज..!"
पण हे असे अरसिक लोक असतात जगात. सर्वत्र असतात. सर्व काळात असणार आहेत. परंतु त्यांच्यात राहूनच माणसाला विहित कार्य करावं लागतं..! असो.
तर सांगायचं आहे सगळं तुम्हाला.. फक्त सुरुवात कुठून करायची कळत नाही..! वरच्यासारखीच सुरूवात केली तर चालेल काय, अशा विचारात पेनचं टोपण चावत बसून आहे सध्यातरी.
_/\_
_/\_
अमेझिन्ग…. सुरवात धमाकेदार
अमेझिन्ग…. सुरवात धमाकेदार झालीय… आता पुढचेही येऊ द्या हळुहळू.
मस्त.
मस्त.
कणेकरांसारखी शैली वाटली काही ठिकाणी.
कशाला करायची सुरुवात वगैरे?
कशाला करायची सुरुवात वगैरे? हे चाललंय ते चांगलं चाललंय.
धमाल लिहिले आहे.
धमाल लिहिले आहे.
खतरनाक लिहिलय स्फुट. आता
खतरनाक लिहिलय स्फुट. आता मध्य, शेवट, अॅपेंडिक्स वगैरे पण हवे असा हावरटपणा करावासा वाटतोय.
धमाल लिहिले आहे.
धमाल लिहिले आहे.
क्या बात है!!
क्या बात है!!
>>>>>>> महत्वाचं सगळं आधीच सांगून नंतर डोक्याला हात लावून बसण्याची माझी पद्धत झाली आहे.
खी: खी: