मराठी भाषा गौरव दिन - लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - anudon - उंबरठा

Submitted by anudon on 28 February, 2023 - 01:22

उंबरठा म्हटलं की ती आठवते, तिच्यासाठी नसलेलं तिचं घर आठवतं! जवळपास ३८ वर्षांआधी पडद्यावर साकारलेली तिची जेमतेम दोन तासांची गोष्ट आठवते!

सुरुवातीच्या एका मिनिटभरात भरलेल्या घरात ती आतून रिकामी आहे हे तिच्या १/२ अस्फुट वाक्यांवरुन खोलवर जाणवतं. तिचा वावर घरभर आहे पण तिची स्वत:ची अशी जागा ती शोधते आहे. कधी बाहेरच्या बागेतल्या पाळण्यावर, तर पोर्चच्या बाजूच्या बाकावर.

घरातल्या सगळ्यांना त्यांच्या आयुष्याचं गमक सापडलंय, हिला मात्र नाही. स्वत:ला काय हवंय याबद्दल तिच्या मनात जरासुद्धा संभ्रम नाही. म्हणूनच नावाजलेल्या सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या तिच्या सासूबाई त्यांच्या अपंगासाठी करत असलेल्या संस्थेत तिनं यावं असं सुचवितात, तेव्हा काही काळ तसा प्रयत्न करुन ती ते थांबवते, जे मला करायचे आहे ते हे नाही म्हणून. तिला एक गोड मुलगी आहे, पण तिची थोरली जाऊ प्रेमळ आणि निपुत्रिक. त्यामुळे हिच्या एकुलत्या एका मुलीवर आईप्रमाणे, किंचित आईपेक्षा जास्तच जीव. तिथे ही आपल्या अपत्यप्रेमाचा मालकीहक्क गाजवू शकत नाही. तिला जे हवंय त्या जवळ पोचेपर्यंतचा प्रवास मात्र तिला तिच्या वर्तमानापासून, रोजच्या आयुष्यापासून अलिप्त ठेवतो आहे.

तिच्या नवऱ्याला तिची घालमेल जाणवते, पण त्यासाठी तो काही करू शकेल असे नाही, आणि त्याला ही जाणीव असणे, हे तिच्यासाठी पुरेसे नाही. खरंतर ती फारशी कधीच काहीच बोलत नाही. काही ठिकाणी तिने अगदी पेटून उठावं, असं आपल्याला वाटतं त्या प्रसंगात सुद्धा शांतपणे ऐकून ती तिथून उठून निघून जाते. तिचा वकील नवरा विरुद्ध बाजूच्या स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून एक केस सहजगत्या जिंकल्याचं सांगतो. हा असाच एक प्रसंग. तिला त्याबद्दल काहीव वाटले नाही असे नाही पण एका पत्नीच्या नात्याचा उंबरा ती ओलांडून ती त्याच्या व्यावसायिक प्रांतात पाऊल ठेवत नाही.

अशातच, तिच्याकडे असलेल्या समाजशास्त्राच्या सुवर्णपदकासह मिळालेल्या पदवीच्या जोरावर तिला दूरच्या एका खेड्यातल्या सरकारी महिला सुधारगृहात अधिक्षिकेच्या जागेवर नेमणूक मिळते. सासूबाई थांबवायचा प्रयत्न करतात. पण तिचा नवरा एक वकील म्हणून तिची बाजू घरच्यांसमोर अगदी नेमकेपणाने मांडतो. घरचे काहीशा नाराजीनेच संमती देतात. तिला अगदी भरुन येतं, मुलीसाठी जीव तुटतो, पण ती जातेच. ह्या नव्या जगात जातांना तिच्या मनातले हे शब्द तिच्या विवेकशीलतेची आपल्याला ओळख करुन देतात:

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे

हा एवढा आदर्शवाद आजकाल आपल्याला सोसवत नाही. आताशा आपल्याला त्याची सवय पण राहिलेली नाही, पण तिच्याकडे पाहातांना ते तिच्या व्यक्तीत्वाचाच एक भाग बनून येतं, आणि त्या सहजसौंदर्याने आपण मोहित होतो, हे खरं.

महिलांचे पुनर्वसन करायचे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे हे दोन हेतू तिच्या डोक्यात असतात. त्यासाठी ती नवनवीन उपक्रम राबवते. बेशिस्त महिलांमध्ये शिस्त आणू पाहते. तिला तिचा आत्मा सापडू लागतो. त्यांचं प्रार्थनागीत सुरु असतांनाचा तिचा वावर म्हणजे देहबोलीचा नितांत परिपूर्ण परिपाठ आहे. आपल्या ध्येयासाठी स्वत:ला असं सर्वस्वीपणे झोकून देणारी ती नखशिखांत सुंदर भासते.

ह्या तिच्या संसाराच्या परिघाबाहेरच्या जगात तिला कितीतरी थांबलेली, पिचलेली आयुष्यं दिसतात. जबरदस्तीने लग्न लावून दिलेल्या म्हाताऱ्या नवऱ्याला सोडून आलेली, असफल प्रेमातून मुलीला जन्म दिलेली आणि मग आता आश्रम सोडून जावे लागेल ह्या विचाराच्या हताश क्षणी, स्वत:च्या मुलीचा बळी घेणारी, एकमेकींचा फक्त मानसिक नाही तर शारिरिक आधार घेऊ पाहणाऱ्या आणखीन दोघीजणी!! त्यांची उध्वस्त आयुष्यं तिच्या परीने ती सावरण्याचा प्रयत्न करत असते.

आश्रमाच्या घडी बसविण्याच्या कामात ती तिचा सगळा वेळ जात असला तरी एखाद्या रात्री, तिची कर्तव्यदक्ष नजर चुकवुन काही क्षण तिला हळवं करतातच. नवऱ्याचा आणि मुलीचा फोटो पाहत तिचं अबोल मन फुलु लागतं.

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या...

असं असूनही तिच्या हातातून संसाराची वाळू निसटतच चालली आहे. एकदा तिच्या ध्यानीमनी नसतांना तिचा नवरा तिला भेटायला येतो. तेव्हा तिला झालेला आनंद तिच्या डोळ्यांमधून ओसंडतो आहे, त्याला कुठे ठेवू अन कुठे नको असा तिच्या फक्त नजरेतून दिसणारा भाव रोमांचित करतो. पण आश्रमातल्या स्त्रियांना वाटणारी रेक्टरबाईच्या नवऱ्याला बघायची उत्सुकता आणि काहीशी असूया तिच्या ह्या आनंदाला जरा लगाम घालतात. त्यात नेमकं त्याच रात्री तिला एका गर्भार बाईच्या अकाली प्रसृतीसाठी रात्री उशीरापर्यत बाहेर राहावं लागतं. तिच्या बरोबर काही रात्री तरी घालविण्याच्या अपेक्षेने आलेला तो, त्या रात्रीनंतर, दुसऱ्याच दिवशी परत निघतो, तो तिच्याकडून झालेल्या अपेक्षाभंगाच्या टोचणी घेऊनच. तिला याची जाणीव असते, पण त्याच्या अकस्मात येण्याचा तिला झालेला आनंद, ती त्याला देता येणाऱ्या वेळेत मात्र दाखवू शकत नाही. आणि तिला झालेला आनंद हा त्याच्यासाठी पुरेसा नसतो. त्याला तिच्याबरोबर हक्काचा वेळ हवा असतो.

पुढे उलट सुलट घटना त्या सुधारगृहात घडत राहतात. संस्थांमध्ये होणारा गैरकारभार, तिथल्या आधीच समाजाकडून, सासरकडच्यांकडून नागवलेल्या गेलेल्या स्त्रियांचं होणारं शोषण. सुधारगृहात चालणारे अनैतिक धंदे ती उघडकीस आणते, तिथला अन्याय आणि महिलाना दिली जाणारी वागणूक याविषयी आवाज उठवते. तिला वाटते की आपण रास्त काम करतो आहोत. परंतु प्रत्यक्षात घडते वेगळेच, तिच्या या आदर्शवादी कारभारामुळे व्यवस्थापन समितीतले सर्व सदस्य तिच्या विरोधात जातात. तरी महिला सुधारगृहातील महिलांचा आपल्याला मनापासून पाठिंबा आहे हे तिला ठाऊक असते. नेमलेल्या समितीला पुराव्याअभावी तिच्या विरुद्ध काही कारवाई करणे शक्य होत नाही. पण आता ह्या संस्थेत काम करणे म्हणजे ह्या व्यवस्थापनाच्या आणि पर्यायाने संस्थेच्या चालकांच्या विरुद्ध लढणे, हे तिला उमजून चुकते, आणि ती अगदी स्वच्छ मनाने राजिनामा देते, आणि ती तिच्या घराकडे परत निघते....

ती घरी परत येते, तिला आपण ह्या जगाला दुय्यम स्थान दिले होते याची पुरेपुर जाणीव असते, त्यामुळे परत आल्यावर ती अगदी समरसून त्यात रमू पाहते, पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असतं. मुलीसाठी तिची काकू म्हणजे आईच झालेली असते. तिची त्याबद्दल तक्रार नसते, गोष्टी बदलतील आणि त्यासाठी थांबावे लागेल हे तिला समजलं असतं.

पण, पण, एका रात्री तिचा नवरा अगदी प्रांजळपणे “मी तुझ्या इतर गरजा समजून घेऊन तुला स्वीकारलं आहे, मग तू नसतांना मी केवळ शारीरिक गरज म्हणून एका दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले आहे, आणि फक्त तू परत आली आहेस म्हणून मी ते तोडू शकत नाही, हे तू समजून घे”. असा प्रस्ताव ठेवतो.

घराबाहेरील जगाने तिच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले त्यांमुळे विमनस्क अवस्थेत घरी परतलेल्या तिला तिच्या असफल ठरलेल्या निर्णयासाठी बाकी सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची तयारी असते, पण हे ऐकून मात्र तीचा तिला त्या घराशी बांधून ठेवणारा दोर तुटतो. आपल्या अनुपस्थितीत बायको या नात्याची अशी स्पेस भरून निघणे तिला अपेक्षित नसतं.

सर्व घडामोडीमुळे ती खचून जात नाही अन मनाशी ठाम निश्चय करून ती घराचा 'उंबरठा' परत एकदा ओलांडते. यावेळेस पुन्हा घरी न परतण्यासाठी ती बाहेर पडते. तिच्या आत्मशोधासाठी ती बाहेर पडलेली असते... ती रेल्वेत बसून विचार करते आहे आणि तिचा अनामिक दिशेने प्रवास सुरु आहे. तिची पडद्यावरची गोष्ट इथेच संपते. पण मनात मात्र ती वेळी-अवेळी डोकावत राहते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दोन्ही लेख छान झाले आहेत. ४१ वर्ष जुना सिनेमा आहे. आज विकेंड मॅरेज ते ओपन मॅरेज असे सुटसुटीत पर्याय तसे समाजमान्य झालेले असतानांही स्त्रियांची नोकरीत पीछेहाट होत आहे. त्यामुळे हा सिनेमा कालबाह्य झाला असेही म्हणता येत नाही.

दोन्ही लेखात 'चांद मातला' चा उल्लेख नाही. पब्लिक डोमेनमध्ये काही उंबरठे आजही ओलांडायचे नसतात Happy मीच लिहीते - समाजाच्या उतरंडीत आश्रमातील स्त्रिया तशा एकदम तळाला. त्यांना कुठल्या इच्छा असतील हे कुणाच्या खिजगणतीत नाही. त्यात प्रेम, समर्पण वगैरे असं सो-कोल्ड "वरच्या" प्रतलातलं काही नाही कारण ते सफळ व्हायला काही वाव नाही. मग इच्छाही होतात त्या थेट वेड्या लहरींचा पिंगा! इच्छा तिथे मार्ग असतं तसं मार्ग तेवढ्याच इच्छा. बघताना भडभडून येतं. त्या प्रसंगात खरं तर एखादं लक्ष्मी-पार्वतीचे गाणे देऊन भागले असते. त्यामुळे हे असं अचानक 'चांद मातला' हे फार 'स्टार्टलिंग' आहे. (त्यात वसंत बापट गीतकार ऐकून अरे देवाच झालं!! )

(अनुदोन, संयुक्ता याद आ गयी)

एकमेकींचा फक्त मानसिक नाही तर शारिरिक आधार घेऊ पाहणाऱ्या आणखीन दोघीजणी!! असा उल्लेख आहे की या लेखात बार्सिलोना.

त्यामुळे हे असं अचानक 'चांद मातला' हे फार 'स्टार्टलिंग' आहे. >>>>
चित्रपट फार लहान वयात बघितला होता त्यामुळे आठवत नाहीये. खास करून चांद मातलाचा कॉंटेक्स्ट. नंतर कधीतरी गाणं ऐकलं तेव्हा ते फारच थेट वाटलं होतं. त्या काळचा प्रेक्षक/श्रोता जास्त प्रगल्भ होता का असं वाटतं. आताच्या काळात हाईप किंवा कॉंट्रोवर्सी यापैकी एक नक्कीच झालं असतं.

छान लिहिलं आहे.
माझा अतिशय आवडता चित्रपट . आणि बघितल्यावर प्रत्येक वेळी अस्वस्थच करणारा.
चित्रपटात स्मिता पाटील नायिका असल्याने शेवटी ती नाईलाजाने जेव्हा पुन्हा घराचाउंबरठा ओलांडून बाहेर पडते तेव्हा तिला प्रेक्षकांची सहानुभूती मिळायला हवी. पण तस होत नाही हेच चित्रपटाचं मोठं क्रेडिट आहे. प्रत्येक जणच ( अगदी गिरीश कर्नाड ही ) आपापल्या जागी बरोबरच वाटतो. कोणीच व्हिलन, चूक वाटत नाही तरी ही शोकांतिका आहे ही.

मस्तच लिहिलंयस.

>>> ती घराचा 'उंबरठा' परत एकदा ओलांडते. यावेळेस पुन्हा घरी न परतण्यासाठी ती बाहेर पडते
अगदी नेमकं! आपण भरारी घेतली असं वाटलं तरी घराची ओढ सुटली नव्हती, पाय उंबरठ्यातच अडलेले होते अशी जाणीव तिला यावेळी लख्खपणे होते. यापुढे खरी पंख पसरायची सुरुवात.

कोणीच व्हिलन, चूक वाटत नाही >> Happy ती परत आल्यावर शरीरसंबंध झाल्यावर "उं बोलेगा साला" गत गिरीश कर्नाड तिला सांगतो केवळ शारीरिक गरज म्हणून एका दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले आहे तो सीन उलटा इमॅजिन करून बघ. ती सांगते केवळ शारीरिक गरज म्हणून एका दुसऱ्या पुरूषाशी संबंध ठेवले आहे. येतंय लक्षात काय कुठे कुणी कशी केव्हा का "चूक" केली? Happy (चूक शब्द वापरायला आवडत नाही कारण आपण कोण चूक-बरोबर ठरवणारे, तरी इथे वापरते.)

सुंदर लेख.

कित्येक वर्षापूर्वी पाहिलेल्या या सिनेमातील दोन प्रसंग अजूनही अस्वस्थ करतात.
गिरिश कर्नाड ( वकील असतो तो) ला आई विचरते की तुझ्या त्या रेप केस च काय झालं. तो म्हणतो 'त्यात काय एवढं ? तिचे चारित्र्य वाईट होते हे सिद्ध करायचे, मग झालं'. हे सारे इतक्या सहजपणे !

आश्रमात त्या बायका टिपिकल हिंदी सिनेमा टीव्ही वर बघत असतात तेव्हा त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव बरंच काही सांगून जातात.

'चांद मातला' हे गाणे अतिशय समर्पक आहे. ते मानसिक वगैरे आहेच पण शारीरीक गराजांबद्दल जी कुचंबणा त्या महिलांच्या वाट्याला आलेली आहे त्याकरता ते गाणे चपखल आहे.

Happy असं एका वाक्याने अस्वस्थ झालं तर 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' कसा पूर्ण बघून व्हायचा? स्लट शेमिंगची वेळ आली की पोटचं पोरही आईला सोडत नाही इतकं ते समाजात भिनलेलं आहे.

छानच लेख अनु !

त्यात वसंत बापट गीतकार ऐकून अरे देवाच झालं!! ) ?? >> बापटांच्या काही कविता वेगळ्या आहेत - पटकन सोज्वळ रुपातली 'जीना' आठवली.

परीक्षण उत्तम. मला सिनेमा पाहिल्यावर जे जसं वाटलं तसेच विचार आहेत. अपवाद वगळता मराठी सिनेमाच्या वाटे जात नाही, पण खुप ऐकल्यामुळे बराच उशिरा जाणत्या वयात हा चित्रपट पाहिला. आणि त्या वयात पाहिल्यामुळे जास्त समजला / पटला. हा एक फारच चांगला सिनेमा आहे.

गिरीश कर्नाड तिला सांगतो केवळ शारीरिक गरज म्हणून एका दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले आहे तो सीन उलटा इमॅजिन करून बघ. ती सांगते केवळ शारीरिक गरज म्हणून एका दुसऱ्या पुरूषाशी संबंध ठेवले आहे. येतंय लक्षात काय कुठे कुणी कशी केव्हा का "चूक" केली >>>>> मला गिरीश क किंवा स्मिता पा कोणाही कडून हे ऐकलं असतं तर चूक वाटलं नसतं. शारीरिक गरज आहे. सगळेच संत नसतात. नवरा अथवा बायकोचा शारीरिक दुरावा एवढ्या मोठ्या कालावधीसाठी एखाद्याला, esp पुरुषाला (कारण नैसर्गिक रित्या पुरुषांचा libido high असतो. general statement झालं, पण बायकांच्या तुलनेत पुरुष आत्मिक प्रेमापेक्षा शारीरिक प्रेमात जास्त वहात जातात) अवघड वाटू शकतो. त्याने तिला करिअर करण्यासाठी मदत केली, पण तिच्या महत्वकांक्षेसाठी त्याने शारीरिक गरज मारणे हा कुठला न्याय? Fire बघताना कुलभूषण खरबंदा foreplay नंतर बायकोला दूर सारतो (कारण गुरूंनी सांगितलेलं असतं की त्या उच्च लालसेच्या क्षणी मोह आवरता आला तर ती खरी साधना /योग. तेव्हा आपण शबानाला सहानुभूती दिली होतीच ना. तिने शारीरिक गरज भागवण्यासाठी शोधलेला मार्ग चालवून घेतला होता ना.
आणि हे मी कर्नाड (तिच्या पतीच्या) चुकिवर नाही तर तिच्याकडून अशी चुक (?) झाली असती तरी निसर्ग आहे अस म्हणून त्याने समजून घ्यावं अशीच अपेक्षा केली असती.
हे फार advanced वाटतं आहे का? किंवा मी काही चुकीचं बोलते आहे का?

सर्वसाधाणपणे मी ही पारंपरिक विचारच केला असता. माझा हा दृष्टिकोन तयार झाला तुंबाड मधल्या काही ओळी वाचल्यावर. संदर्भ साधारण असा होता की स्वातंत्र्याच्या चळवळीत आणि गांधींच्या प्रभावाखाली खुप अविवाहित आणि विवाहित देखील तरुण तरुणींनी ब्रह्मचर्या चा स्वीकार केला, पण मग विवाहित जोडप्यांमधील दुसऱ्या पार्टनरच्या शारीरिक गरजांच काय? त्याबद्दल थोडा ऊहापोह आहे आणि तो पटला.

सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. प्राचीनचे स्पेशल आभार, कारण तिचा उंबरठा ह्याच चित्रपटावरचा लेख/परीक्षण दिसले आणि मला मी लिहिलेला हा लेख आठवला/टाकावसा वाटला.