मराठी भाषा गौरव दिन- लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया -एमरल्ड -घो मला असला हवा

Submitted by -शर्वरी- on 27 February, 2023 - 04:17

‘घो मला असला हवा’ हा सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या द्वयींचा२००९ चा चित्रपट. फारसा जुना नाही आणि त्यांच्या नेहेमीच्या जॅानरपेक्षा जरा वेगळ्या प्रकारात मोडणारा. मी भावे-सुकथनकरांचे चित्रपट चुकवत नाही. हा सुद्धा चुकवु नये या कॅटेगरीतलाच पिक्चर आहे.
हा चित्रपट पाहण्याआधी मला घो हा शब्दच माहित नव्हता. एव्हढ्या कोऱ्या पाटीने पाहिला आणि प्रत्येक फ्रेम गणिक आवडतच गेला. राधिका आपटे सावीची भूमिका जगली आहे. कोकणातल्या एका लहानशा वाडीवजा गावात राहणाऱ्या मुलीचे-सावीचे लग्न तिला न विचारता भोप्याशी-जो मुंबईत नोकरी करतो- ठरते आणि होतेही. यातून बाहेर पडायला सावी काय बरं मार्ग शोधत असेल? ही आहे एका ओळीत पिक्चर ची स्टोरी. आता हे वाचले तर वाटेल की हा बराचसा गंभीर, समांतर सिनेमा असावा. पण हा आजीबातच गंभीर नाही. दिग्दर्शकांनी हा सिनेमा अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. कोकणातला सुंदर निसर्ग, अतिशय अर्थपूर्ण, अवीट गोडीची गाणी, राधिका आपटे, रविंद्र मंकणी, नीना कुलकर्णी, रिमा लागुचा नैसर्गिक अभिनय यातून हा चित्रपट फुलत जातो. सगळ्यात मजा येते ते संवाद ऐकताना. सावित्री चं लग्न ठरलय. तिला न विचारताच. ती वडलांपाशी नाराजी व्यक्त करते. पण तरीही एकदा होणाऱ्या नवर्याला बघुन घेण्याएवढी प्रॅक्टिकल ती आहे. त्याला बघुन मात्र तिला पक्क कळलय की असा नवरा तिला नकोय. तिला हुशार,’अक्कलवान’ नवरा हवा आहे.

कोकणातल्या दशावतारात सावित्रिचे आख्यान ती बघते. सावित्री ला तिचा नवरा निवडण्याचे स्वातंत्र्य होते हे लक्षात आल्यावर आजची सावीही ठरवते की तिचा नवरा कोण ते तिच ठरवणार. हा नवरा तिला सापडतो. ती त्याला पटवुनही देते की तिच कशी त्याच्यासाठी योग्य आहे आणि अख्ख्या गावाचा, आईवडिलांचा पाठिंबा मिळवत भोप्याशी झालेले लग्न कसे झालेच नाही हे सिद्ध करुन आपल्या पसंतीचा नवरा कसा मिळवते अशी ही धमाल गोष्ट आहे.

सावी बुद्धिमान आहे, जनरित पाळायलाही तिची ना नाही. खुप कष्ट करायची तिची तयारी आणि हिम्मतही आहे. मात्र आई वडिलांचे ऐकुन, पुरेसा विरोध करुनही मनासारखे होत नाही तेंव्हा स्वतःच्या आयुष्याचे सारथ्य स्वतः करायला लागणार हे ती वेळीच ओळखते आणि विलक्षण बुद्धीच्या जोरावर ती ते करुन दाखवते. कसं तर चलाखीने. वेगवेगळ्या युक्त्या-प्रयुक्त्या करुन. हा सारा प्रवास खुप मनोरंजक पद्धतीने दाखवला आहे. सावित्रीचे आख्यान ऐकता ऐकता ही आजची सावी तिचे आयुष्य आखायला घेते. परंपरा, रुढी यांच्या विरुद्ध न जाता, त्यांना स्वतःला पाहिजे तसे लवचिक बनवत, प्रसंगी वापरुन घेत सावी जे पाहिजे ते मिळवते.

भावे-सुकथनकरांचा हा सिनेमा त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा, हलका-फुलका आहे. गंभीर नाही. पण म्हणुन तो महत्वाचा नाही असं नाही. सरळ, गमतीचा टोन पकडून मांडलेला विषय गंभीर आणि कालातीत आहे. सावीचा स्त्रीवाद शब्दबंबाळ नाही. अश्रु ढाळणारा किंवा हातात हत्यार घेऊन लढणाराही नाही. फारसा बंडखोर सुद्धा नाही. पण तरीही पुर्ण चित्रपटात तो जाणवत राहते. आयुष्यात स्वतःचा साथीदार स्वतः निवडण्याचा हक्क सावी सोडत नाही. अगदी लग्न झाले तरी सोडणार नाही ही हिम्मत तिच्यात आहे. हा सिनेमा प्रेम, निवडस्वातंत्र्य, चालीरिती, राजकारण, पोलिसांसारख्या सरकारी संस्थांचे गावातील समाजजीवनात गुंतलेले असणे अशा अनेक गोष्टींवर भाष्य करत हसवतो.
गंभीर चित्रपट बघणारा एक ठरावीक प्रेक्षकवर्ग असतो. त्यांना स्रीवाद, लिंगभेद, विषमता यांबद्दल जाणीव व जागरुकता असु शकते. मात्र असाही प्रेक्षकवर्ग असतो ज्याला चित्रपट म्हणजे मनोरंजन पाहिजे असते. डोक्याला त्रास नको, त्रासदायक विचारही नको असतो. अशा प्रेक्षकांकरितासुद्धा चांगला, प्रगल्भ चित्रपट बनला पाहिजे. ते काम हा चित्रपट बनवून सुमित्रा भावे व सुकथनकरांनी केले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच आहे हा चित्रपट! एकेक संवाद ऐकण्यासारखे आहेत! राधिका आपटे शोभून दिसली आहे सावी म्हणून.
शेवटच्या 'शांता नांदली पाहिजे' याचा अर्थ कळायला मला जरा वेळ लागला होता Lol

ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद एमेराल्ड. फार छान ओळख करून दिलीत तुम्ही. चित्रपट नक्की बघणार.

छान ओळख करून दिलीत. इंटरेस्टिंग कथा वाटतेय. बघायची इच्छा आहे. कुठे पाहिला?

छान लिहिलंय..
चित्रपट बघितला नव्हता. आता बघायला लागेल..

सर्वांना धन्यवाद.
वावे, ‘शांता नांदली पाहिजे’ भारी होतं Lol
माझेमन, zee5 वर आहे असं वाटतय.

छान लिहिलंय. ह ह पु वा मुव्ही आहे.
हा आणि धोबीपछाड कुठूनही मधूनच पाहिला तरी मजा येते स्टोरी माहीत असल्याने.

छान लिहिलं आहे.

या चित्रपटाची पटकथा सुमित्रा भावे यांनी वर्धा ते पुणे या रेल्वेप्रवासात लिहिली. म्हणजे त्यांना ती सुचली. त्यांनी ती सांगितली व बरोबर असलेल्या रेणुका दफ्तरदार यांनी उतरवून घेतली.
मूळ पटकथेचं नाव 'मासा' होतं. निर्माते रवींद्र मंकणी यांनी ते बदललं. राधिका आपटे यांचा हा पहिला चित्रपट.
आज नावारूपास आलेले वरुण नार्वेकर, सारंग साठ्ये हे या चित्रपटासाठी साहाय्यक होते.

सर्वांना मनापासून धन्यवाद.

चिनूक्स, चित्रपटाच्या जन्माची कथा वाचायला, पुढचा प्रवास कसा झाला ते वाचायला नेहमीच आवडते. या माहितीसाठी धन्यवाद.

Back to top